'द किंग'

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
25 Jan 2011 - 9:03 pm

१९५० चा काळ, अमेरिकेत ज्याकाळात वर्णद्वेष ब~यापैकी वास्तव होते तेव्हा मिश्रवस्ती असलेल्या 'मेम्फिस' शहरामध्ये एक गौरवर्णीय मुलगा खूपदा कृष्णवर्णीयांच्या मौजेच्या ठिकाणी दिसायचा. त्यांच्या म्युझिक क्लब्स मध्ये जायचा, गाण्यांच्या कार्यक्रमात जायचा, इतकंच नाही तर गौरवर्णीयांच्या क्लब्समध्येही 'ज्यूकबॉक्स'मध्ये '~हिदम एन ब्लूज', 'गोस्पेल' आणि 'स्पिरिच्युअल' प्रकारची गाणी ऐकायचा. एरवीही रेडिओला चिकटण त्याला नवीन नव्हत. स्वत: कोणत्याही प्रकारचं औपचारीक सांगीतिक शिक्षण न घेतलेल्या या मुलाला मात्र संगीताने पार नादावून टाकलं होतं.

कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करणा~या याने त्या धुंधीतच एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळीही त्याची भट्टी काही जमत नव्हती. दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं.

हे गाणं पहिल्यांदा 'रेडिओ'वर वाजवलं जाताच लोकांनी 'रेडिओ स्टेशन'वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र 'ब्लूज-गोस्पेल' ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना. रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं.

गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे 'रॉक एन रोल' अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता 'द किंग' या नावाने नंतर ओळखला गेलेला 'एल्व्हिस प्रेस्ले' आणि ते गाणं होतं "That's All Right, Mama".

http://www.youtube.com/watch?v=e1s-E1WWipc

'एल्व्हिस'ने आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या 'रॉक एण्ड रोल' संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे 'एल्व्हिस' स्टाईलचंच आहे. अशा गाण्यांपैकी काहींची थोडी माहिती घेण्यात जराही हरकत नाही.

मूळ 'जॉर्ज वाईस', 'ह्युगो पेरेत्ती' आणि 'लुइगी क्रियेटर' यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली 'एल्विस'ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला 'एल्विस'चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा. त्याची 'लार्जर द्यान लाईफ' प्रतिमा होण्यामागे त्याचा पर्फोर्मंस आणि ही अशी गाणीच कारणीभूत असावी. व्यक्तिश: मलाही त्याचं हे गाणं खूप आवडतं.

http://www.youtube.com/watch?v=-rS55BtfNtI&feature=related

'एल्विस'चं आणखी एक भन्नाट गाणं आहे, "Jailhouse Rock". 'जेरी लिबर' आणि 'माईक स्टोलर' यांनी लिहिलेलं हे परफेक्ट 'रॉक एन रोल' गाणं 'एल्विस'ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. 'एल्विस'च्या या सादरीकरणाच्या चित्रिकरणातून भारतातील कोण या शैलीने प्रभावित झालेलं आहे हे देखील लक्षात येतं. (आता कसं, शैलीने प्रभावित होणं इ. इ. हे वाचायलाही बरं वाटत, उगाच नक्कल वगैरे का म्हणा...?)

http://www.youtube.com/watch?v=zRu3tw9fYxE&feature=related

'एल्व्हिस'चं महत्त्व यातही आहे की शक्य असूनही त्याने आपल्या लोकप्रियतेचा वाईट अर्थाने फायदा करुन घेतला नाही. ६०च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी 'एल्व्हीस'चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता. आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट 'प्रिसिला बिलिव'शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं.

लष्करी सेवेनंतर 'एल्व्हिस'ने आपलं करीअर पुन्हा सुरु केलं. संगीत, काव्य याबरोबरच त्याने अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्याची लोकप्रियता कैक पटीने वाढली. ६०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७०च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. या सगळ्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. त्याला अमली पदार्थांच व्यसन जडलं, त्याचा विवाह-विच्छेद झाला, शरीर व्याधींनी पोखरून निघालं.

या पार्श्वभूमीवर १६ ऑगस्ट १९७७ रोजी दुपारी अमेरिकन संगीताचा चेहरा-मोहरा बदलणा~या 'द किंग' एल्व्हिस प्रिस्लेची प्राणज्योत मालवली. 'रॉक एन रोल'च्या सम्राटाला हा माझा शाब्दिक मुजरा!

http://www.youtube.com/watch?v=GBOtPvrluhU

कलानृत्यसंगीतमौजमजाप्रकटनमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

चांगलं लिहिलं आहे.
एक गोष्ट सांगितल्यावाचून राहवत नाही म्हणून सांगतो, थोडे दिवस थांबून जर हा लेख टाकला असतात तर जास्त सयुक्तीक झालं असतं. शेजारी भिमसेनांचा फोटो असताना इतर कुठल्या गायका बद्धल वाचताना थोडं विचित्र वाटलं. अर्थात मी एल्विसला कमी लेखतोय असं कृपा करून समजू नका..

प्रास's picture

25 Jan 2011 - 10:26 pm | प्रास

मराठेजी,

तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे. थोडे दिवस थांबून हा लेख टाकला असता तर जास्त संयुक्तिक झाले असते.

तरी स्वरभास्कर भीमसेनांविषयी काही लिहिण्यासाठी मी माझी लेखणी पारजावी इतकी तिची लायकी नाही असं मला वाटतं. तसा विचार आहे पण त्यावर मनन करण्याइतपतही धीर अजून गोळा करु धजलो नाहीये. आणि म्हणूनच त्यांचा एकप्रकारे सांगीतिक सहप्रवासी असलेल्या 'एल्व्हिस'वर लिहून थोडा मनावरचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रियेबद्दल आभार पण अजाणतेपणी काही चूक झाली असल्यास उदार मनाने क्षमा करावी.

आमोद शिंदे's picture

26 Jan 2011 - 4:03 am | आमोद शिंदे

शेजारी भिमसेनांचा फोटो असताना इतर कुठल्या गायका बद्धल वाचताना थोडं विचित्र वाटलं.

हे जरा अतीच होतय हा! अण्णा गेले अतिशय दु:खद घटना पण म्हणून त्यांचा फोटो मिपावरुन काढेपर्यंत कुठल्याही गायकाविषयी लिहू नये हे कसले सयुक्तिक?

एल्व्हिस प्रिसले ची "गॉसपेल" गाणी ऐकली आहेत. अतिशय आवडली........खूप खूप आवडली. संध्याकाळी दुवे टाकते.
प्रास आपला लेख खूप आवडला. : )
मला वाटतं ही खालची गाणी एल्व्हीस प्रिसले ची गॉसपेल गाणी आहेत. तसं कुठेही ठळक म्हटलं नाही पण अनावर जादू आहे. -
http://www.youtube.com/watch?v=62Ym0gONsaU&feature=related
http://www.youtube.com/watch?v=P1d4Rp8SXF8&feature=related
http://www.youtube.com/watch?v=SSFFciPS-xA&feature=related
http://www.youtube.com/watch?v=cLTYlxmQs90&feature=related
http://www.youtube.com/watch?v=lAjgCElQXVE&feature=related
http://www.youtube.com/watch?v=zaNLgPmUTUY&NR=1

प्रास's picture

25 Jan 2011 - 10:35 pm | प्रास

धन्यवाद शुचि......

इन्द्र्राज पवार's picture

25 Jan 2011 - 11:23 pm | इन्द्र्राज पवार

फार सुंदर (आणि तितक्याच भावुकतेने...) रितीने "किंग" वर लिहिले आहे 'प्रास' यानी. अमेरिकेत नोकरी निमित्ताने असलेल्या माझ्या एका मित्राच्या थोरल्या काकांनी (जे आत्ता वयाच्या सत्तरीत असतील) त्याला कधीतरी सवड मिळाल्यास फॉरेस्ट हिल्स एरियात 'ग्रेसलॅण्ड' या ठिकाणी जाऊन येण्यास सांगितले होते व तिथे न चुकता 'प्रिस्ले म्युझियम' ला भेट देण्याची आठवण केली होती. मित्र आजच्या पिढीतील असल्याने 'एल्व्हिस' बद्दल फक्त जितके वाचले होते तितपतच त्याला माहिती, पण आपले काका किंगबद्दल 'मॅड' का होते (आजही आहेतच...) हे त्याला प्रत्यक्ष ग्रेसलॅण्डच्या म्युझियमला भेट दिल्यावरच कळाले. प्रतिवर्षी (अगदी आजही....एल्व्हिसच्या मृत्युनंतर ३५ वर्षानीही) जवळपास ८ ते १० लाख पर्यटक 'लाडक्या एल्व्हिस प्रिस्ले' च्या आठवणीसाठी तिथे हजेरी लावून त्याच्या जादुचा जो आनंद घेतात तो केवळ प्रत्यक्ष अनुभवण्यासारखाच आहे असे मित्राने आम्हाला इथे पत्राद्वारे कळविले होते. एक रॉक एन्ड रोल गायक आणि सार्‍या अमेरिकेच्या गळ्यातील ताईत बनतो आणि जितक्या वेगाने तळपतो तितक्याच वेगाने पृथ्वीतलावरून नाहिसाही होतो (त्याच्या मृत्युमागील कारणाचे थडगे उकरण्यातही काही अर्थ नसतो... असे कलाकार एका धुंदीतच जगतात आणि जातानाही त्या धुंदीत निघून जातात. त्यांच्या जीवनशैलीची सर्वसामान्यांच्या शैलीशी तुलना न करणे हेच खरे !).

एल्व्हिस प्रिस्ले, पॅट बून आणि क्लिफ रिचर्ड या कलाकारांनी १९५० ते १९७० हा कालखंड आपल्या गायनशैलीने असा काही अविस्मरणीय केला होता की त्या काळातील त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेले लेखन वाचले की त्यांनी जगभरातील कानसेनांचे आयुष्य किती मनोहारी केले होते याची झलक मिळते.

छान आठवण शब्दबध्द केली आहे, प्रास तुम्ही...धन्यवाद !

इन्द्रा

अरेच्च्य्या!! मेंफीस म्हणजे तर माझं जुनं गाव!!....मी दोन वर्षं तिकडं राहिलो आहे... 'मेंफीस आणि एल्व्हिस' ऐकायला माझे कान सतत टवकारले जातात!... एल्व्हिसबद्दल म्हणाल तर लोक अजूनही मानतात. ग्रेसलंड तसं सिटीच्या बाहेर आहे, पण त्या भागात सुट्टीच्या दिवशी भरपूर गर्दी असते. शहरात प्रवेश करतानांच एल्व्हिसचं मोठं चित्र आहे, आणि निऑन साइन वाली गिटार वगैरे....

सध्या तसंही रॉक एन रोल इतिहासजमा झाल्यामुळे त्याला फक्त 'पर्यटन मूल्य' राहिलं आहे.

मी-सौरभ's picture

26 Jan 2011 - 2:18 am | मी-सौरभ

ऐकल पाहिजे परत एकदा सगळं

आवडाबाई's picture

26 Jan 2011 - 11:58 pm | आवडाबाई

काय आठवण करून दिलीत !
"तू कधी एल्विस ऐकला नाहीस ? धन्य आहेस ! माझ्याकडून कॅसेट घेऊन जा, पण ऐक !" - असं सांगून ती कॅसेट (तेव्हा कॅसेटच असायच्या) अक्षरश: माझ्या गळ्यात मारून मला ऐकायला भाग पाडणार्‍या मित्राचे किती आभार मानू !
जास्त करून रॉक न रोल ऐकले आहे - लव मी टेंडर, डेविल इन डिसगाईज, कान्ट हेल्प फॉलिंग इन लव, इट्स नाऊ अऑर नेवर आणि अर्थात आर यू लोनसम टूनाईट ! वॉव !

काही गॉस्पेल ऐकलीत, आता पुन्हा ऐकते ! दुवा देणार्‍या सार्‍यांना दुवा !

त्याची कमी गाजलेली, पण छान अशी कुठली गाणी आहेत? कारण त्याची शेकडो गाणी आहेत असे ऐकले आहे, पण ऐकली गेली आहेत काही सिलेक्टेड.

मस्त लेख !