फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो...
कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना....
सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज...
काही मैत्रिणींचे त्यांच्या लग्नातले जगासमोर मांडलेले 'सुंदर' म्हणावं लागतं असे फोटोज आणि त्याखालच्या त्यांच्याच गल्लीत अर्धं आयुष्य घालवलेल्या त्यांच्या मैत्रिणींच्या कॉमेंट्स 'ओह बेब्स, लुकिंग गुड!' किंवा 'वॉव, वंडरफुल कपल, लव यु गाईज!!' किंवा 'सो क्युट!' वगैरे वगैरे .......
अजून काही मैत्रिणी आणि मित्रही, ज्यांचे आपापल्या नवजात अपत्त्यांबारोबारचे फोटोज.....आणि मग त्याखालच्या बाळाचं कौतुक करणाऱ्या मावश्या 'ओह..माय क्युट बेबी !!!' 'सो SSS स्वीट...'. इत्यादी....काही जणांचे कुठल्यातरी बार मधले किंवा क्लब मधले नाचतांनाचे फोटो....आणि त्याखाली 'वॉव ...यु रॉक !!' वगैरे.........
मायामी , न्यूयॉर्क, लंडन, कॅलिफोर्निया, शिकागो, आयफेल टोवर, टोक्यो, सिंगापूर ह्या ठिकाणांचे सुमारे ५ अब्ज फोटो आणि बहुतांश फोटोज मध्ये दोन्ही हात फैलावून आकाशाकडे बघणारी ती व्यक्ती......
पावडर ने मढवून अत्यंत मोठा खरा दाणा दिसणाऱ्या साखरपुड्याच्या अल्बम मधल्या मुलीला 'खूपच छान दिसत आहेस फोटोत !' अश्या प्रतिक्रिया....काही ठिकाणी हसू येईल इतक्या वैयक्तिक आयुष्यातल्या बाबी ( उदा. 'काल रात्री खाल्लेल्या चोकलेट केक बद्दल माझ्या प्रिय नवऱ्या (हबी डार्लिंग!) , तुला खूप धन्यवाद!' ) .........
काही अजून म्हणजे स्वतःचे किंवा स्वतःशी निगडीत फोटो न लावता कोणीतरी 'अर्जुन रामपाल', 'शाहरुख खान', 'कतरिना कैफ', 'ऐश्वर्या राय' असल्या सुमार लोकांचे किंवा ज्यांचं नाव तोंडानी उच्चारता येणार नाही अश्या फ्रेंच मॉडेल्सचे फोटोज आणि त्या खाली फोटोच्या टायटल मध्ये 'यु आर सो ब्युटीफुल' असा काही मजकूर..!!......
ह्याशिवाय कोणीतरी गल्लीतला किड्यांचे, माश्यांचे, पानांवर पडलेल्या थेंबांचे, किल्ल्यांवरच्या भग्नावशेषांचे (सेपिया कलर मधले), फटाक्यांचे, सुरकुतलेल्या चेहेऱ्यांचे फोटो काढून एका काळ्या चौकटीत बसवून त्याखाली स्वतःचं नाव (उदा. अमित, आनंद वगैरे !....ही नावं खूप कॉमन आहेत म्हणून बरं का !) लावणारा फोटोग्राफर.........शिवाय अजून एक नवीन टूम, पुणेरी पाट्या आणि त्याखाली ९०० वेळा 'हा हा हा !!' वगैरे.......काही अति-धार्मिक लोकही आहेतच! रोज बायबल मधलं एक वचन किंवा रोज एक तमिळ शब्द वगैरे.....अमेरिकेत पाळीव कुत्रीही फेसबुकात समाविष्ट आहेत... कुत्र्यांचे आणि मांजरांचे केविलवाणे फोटो त्यावरची दुनियेची स्तुती-सुमनं. .... .
सचिन आणि गांगुलीचे फोटो आणि त्याखाली त्यांना दिलेलं देवपद, अनुसरून त्यांच्या आरत्या ( 'ऑफ-साईडला आधी साक्षात
देव आणि मग गांगुलीच!', 'जय सचिन देवा.!' )........
असे एक नाही अनेक तर्हेचे ग्रुप्स आहेत.....पण प्रत्येकजण कुठला ना कुठला तरी आकृतिबंध अनुसरतोय. सगळेजण लग्नाआधी एकट्याचे फोटो लावणार, दोन-चार गडांवर जाऊन दोन-चारशे फोटोज लावणार नाहीतर लडाखला बाईकवर जाऊन येणार, कॉलेजमधल्या ग्रुपचा फोटो, मग साखरपुड्याचे बटबटीत फोटो, मग प्रत्येकजण आपण किती 'फुलीश रोमांटीक' आहोत हे दाखवणार...आणि लग्नाच्या आधी प्रत्येकाला विरह ( हल्ली त्याला 'जुदाई' म्हणतात!) होणार मग त्याचे फोटो........नंतर लग्नाचे फोटोज ज्यात सगळ्या मुलांनी फेटे घातले असणार, शिवाय हनिमूनचं प्रदर्शन आहेच ! तुमचं कुठल्या व्यक्तीबरोबर काय नातं आहे (प्रेयसी, प्रियकर, एकटा/टी, साखरपुडा झालेला, विवाहित इ.), ते अचूक शब्दांत सांगावं लागणार! मधून मधून आपला नवीन फोटो टाकल्यावर एकमेकांना 'सो चार्मिंग!' म्हणावं लागणार !
ह्या फोटोजवर लिहावं इतकं कमी तर व्हीडीओ चं जग तर त्याहीपेक्षा कमालीचं मजेदार आहे ! शिवाय लोकांचे एकमेकांना मेसेजेस आणि त्यातून घडणारा विनोद हा पराकोटीला जाईल एवढा आहे ! प्रश्न असा आहे, 'का?'...... काय लपवण्यासाठी ही सगळी मास्क्स (मुखवटे) लावावी?.......का सगळ्यांनी इतरांसारखं बनावं? अशी कोणती भीती आहे ज्यामुळे आपण बाहेर फेकले जाऊ ?
आपण का एवढं खोटं बोलतोय? का उगाच दुसऱ्याबद्दल काळजी असल्याचं दाखवतोय? का इतरांचं अनुकरण करतोय? उगाच सगळ्या फोटोजना 'लाईक' करून, सगळ्यांशी गुडी-गुडी बोलण्याचा आव आणून, अमेरिकेतल्या कंपन्यांच्या फुकट जाहिराती करून, 'पॉलीटिकली करेक्ट' बोलून, आपल्या घरीच असणाऱ्या आई-बाबांना फेसबुक वर खातं काढायला लावून आपण काय मिळवतो आहे? भरपूर बुद्धिमत्ता असणारे आपण स्वतःला अश्या सामान्यतेत का ढकलत आहोत? कोणत्या वेबसाईट वर प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला जग बदलून टाकणारी कल्पना सुचणार आहे ?
प्रिय मिपाकर/वाचकहो, छोटी छोटी निरीक्षणं मांडावी आणि विनोदी लिहावं म्हणून बसलो होतो आणि ठरवलं होतं की कुठलाही शब्द खोडायचा नाही, पण शेवटी थोडं गंभीर झालंच! तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्यायचं आहे....
धन्यवाद!
-दैत्य
प्रतिक्रिया
7 Jan 2011 - 9:21 am | अमोल केळकर
छान विचार
(अवांतर : पण माझ्यासाठी फेसबूक हे चांगलेच वरदान ठरले आहे . आतापर्यंत असलेल्या गिर्हाईकांच्यात / जातकांच्यात साधारण ५० % याच फेसबुकने मिळाले) :)
अमोल केळकर
6 Jan 2011 - 2:03 pm | परिकथेतील राजकुमार
ओक्के.
पण प्रामाणिकपणे सांगायचे तर लेखन वाचुन असे वाटले की लेखकाला अजुनही फेसबुक निट कळलेच नाहिये :)
असो..
6 Jan 2011 - 2:05 pm | स्पा
अजुनही फेसबुक निट कळलेच नाहिये
प्रामाणिकपणे सांगायचे तर आम्हाला कळले नाहीये कि तुम्हाला काय म्हणायचेय?
जरा विस्कटून सांगाल काय?
6 Jan 2011 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार
फुकटात ?
मोठे व्हा !!
6 Jan 2011 - 2:06 pm | अन्या दातार
मी कित्ती कित्ती घोर पातक करतोय याची जाणीव करुन देण्याच्या प्रयत्नाबद्दल दैत्यरावांचे कौतुक करावे तितके कमीच!
मलातरी चेपु वापरण्यात काहीही गैर्/कमीपणा/कमीनेपणा वाटत नाही. शेवटी ज्याने त्याने ठरवावे कि काय वापरायचे नि काय नाही.
आनि सोशल नेटवर्किंग साईट्स या अशाच असतात.
(चेपु युझर) अन्या
6 Jan 2011 - 2:08 pm | छोटा डॉन
लेख आवडला !
- छोटा डॉन
6 Jan 2011 - 2:10 pm | गणपा
डावं उजवं असायचंच रे दैत्या.
माझ्या लहान पणी घरात फोन असणं हे श्रिमंत असल्यच लक्षण होतं. ४-४ महिने वाट पहायला लागायची लाईन साठी. शाळेत असताना ना नेट फोफावल होतं ना मोबाईल.
जवळ रहाणारे मित्रं तेवढे संपर्कात होते. पण आज ३० वर्षांनी जेव्हा बालवाडीतला मित्र या फेसबुक/ऑर्कुट मुळे भेटतात तो आनंद काय वर्णु. शाळेत असताना मुलींकडे केवळ शत्रुपक्ष म्हुणुन न बोलणारे आम्ही आज जेव्हा य मैत्रिणी नेटवर भेटुन गप्पा हाणतात ते जुने दिवस आठवतात. कोणती मैत्रिणीच्या मनात कुठल्या मित्राबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता ते सांगतात तेव्हा कसल्या गुदगुदल्या होतात. =)) =))
तेव्हा फेसबुक काय किंवा मिपा काय ही तर केवळ माध्यम आहे. कोण कसा वापर करतो त्यावर अवलंबुन आहे ते.
6 Jan 2011 - 2:30 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला, मी फेसबुकावर नाही, ऑरकुटवर असून नसल्यासारखीच आहे, म्हणजे नुसतेच खाते आहे.. तिथे क्वचित ६ महिन्यातून एकदा जाते.. पण ओळखीतले लोकं,मित्रमैत्रिणी सतत तिथे ये असे बोलावत असतात, अजून तरी जावेसे वाटत नाहीये.पण
तेव्हा फेसबुक काय किंवा मिपा काय ही तर केवळ माध्यम आहे. कोण कसा वापर करतो त्यावर अवलंबुन आहे ते.
गणपाचे हे वाक्यही आवडले,
म्हणून इथे उप प्रतिसाद.
स्वाती
6 Jan 2011 - 3:33 pm | यशोधरा
गणपा वा स्वातीताईप्रमाणेच म्हणते.
दुसरे म्हणजे फक्त आपली ज्यांच्याशी खरोखरच मैत्री आहे, ज्यांचे विचार/ वागणे पटते अशांनाच फेसबुकात ठेवा. ज्यांना तुमच्या बर्या वाईट गोष्टींनी काहीच फरक पडत नाही, त्यांना कशाला ठेवायचे? मग असे सो कॉल्ड खोटे वागायची गरजही लागणार नाही.
6 Jan 2011 - 3:52 pm | स्पा
अनुमोदन
6 Jan 2011 - 10:01 pm | संदीप चित्रे
>> जवळ रहाणारे मित्रं तेवढे संपर्कात होते. पण आज ३० वर्षांनी जेव्हा बालवाडीतला मित्र या फेसबुक/ऑर्कुट मुळे भेटतात तो आनंद काय वर्णु. शाळेत असताना मुलींकडे केवळ शत्रुपक्ष म्हुणुन न बोलणारे आम्ही आज जेव्हा य मैत्रिणी नेटवर भेटुन गप्पा हाणतात ते जुने दिवस आठवतात.
१००% सहमत !
फेसबुक हा एक भन्नाट प्रकार आहे.. कसा वापरायचा ते वापरणार्याच्या कुवतीवर आणि अग्रक्रमांवर अवलंबून आहे :)
तसेच प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी 'लिंक्ड इन' हा प्रकार बेष्ट !
6 Jan 2011 - 2:25 pm | नगरीनिरंजन
छान लिहीलंत. मला वाटतं ही फेसबुकवरची टीका नसून साचेबद्धपणावरची आहे. सगळ्यांचे कसे ठराविक सुखाचे पाडाव, ठराविक साच्यातला कलंदरपणा वगैरे वाटणं स्वाभाविकच आहे. हे सगळं आधीही होतंच फक्त फेसबुकमुळे ते आता अंगावर येतंय एवढंच. शिवाय सगळे लोक सारखे असणे, त्यांच्या गरजा सारख्या असणे ही बाजारपेठेची गरज आहे आणि आपण समूहाच्या बाहेर पडू नये ही आपली गरज आहे त्यामुळे हे एकजिनसीकरण पुढे वाढतच जाणार.
6 Jan 2011 - 2:36 pm | दिपक
हो आहे.
facebook.com/cooldeepak :-)
छान प्रकटन दैत्य.
6 Jan 2011 - 2:41 pm | गवि
हेहेहे :) .. तुनळीवर एक "फेसबूक इज स्टुपिड इडियट" नावाचा गाणे कम व्हिडीओ पाहून धमाल हसलो होतो.
तुम्हीही बघा.. झकास आहे.
पण तसे फेसबुकविषयी ओव्हर ऑल मत वाईट नाही आमचे.
चांगली सुविधा आहे. परदेशस्थ लोकांशी / गावोगावी देशोदेशी पसरलेल्या मित्रांशी संपर्कात रहायला.
शिवाय कधीच परत भेटणार नाहीत असे वाटलेले कायमचे हरवलेले शाळेतले जवळ जवळ सर्व दोस्त मला फेबु मुळे परत मिळाले. ही एक खूप मोठी देणगीच..
6 Jan 2011 - 2:46 pm | कवितानागेश
लोक फेस्बुकात फक्त फोटो बघायलाच येतात असा निष्कर्ष काढावा का?
अजून खूप खूप गोष्टी असतात तिथे..... टीका करण्यासरख्या!
6 Jan 2011 - 3:33 pm | स्मिता.
दैत्यराव, आपण लिहिलेलं सगळं खरं असलं तरी फेसबूकच्या संबंधीत सर्वच गोष्टींना एकाच रांगेत बसवून त्या सर्व चुकिच्या किंवा वाईट आहेत हे दाखवणं पटलं नाही... त्यात वावगं काय तेच कळलं नाही.
बहुतेकांचे एकाच ठिकाणचे एकसारखेच फोटो बघून जरी तुम्हाला जरी कंटाळा आलेला असला तरी प्रत्येक जण त्या-त्या ठिकाणी पहिल्यांदाच गेलेला असतो. पूर्वी जसे आपण घरी आलेल्या नातेवाईकांना/मित्रमंडळींना फोटोचा अल्बम उत्साहाने दाखवत होतो तसेच फेसबूकवर फोटो टाकण्यातही तोच उत्साह असतो. त्यावर येणार्या कमेंटस् बद्दलही तसेच!
खरे तर या सोशल नेटवर्कींग मुळे अनेक वर्ष संपर्कात नसलेले मित्र-मैत्रिणी भेटतात आणि यापुढे कायम जवळपास/संपर्कात असल्याचा भास होतो.
कोणत्या वेबसाईट वर प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला जग बदलून टाकणारी कल्पना सुचणार आहे ?
तसे तर फेसबूक काय आणि मिपा काय, सारखेच आहे. पण ज्याला जेथे व्यक्त व्हायला आवडते तेथे तो आपले विचार व्यक्त करतच असतो. प्रत्येकाची 'कम्फर्ट लेव्हल' वेगवेगळी. (असंही इथे मिपावर पण तर आपण एखाद्या लेखाला, कथेला, पाकृला वा-वा, छान-छान, +१ म्हणतच असतो.)
6 Jan 2011 - 2:54 pm | आत्मशून्य
५०० मीलीयन अॅक्टीव युजर्सच फेस्बूक एका पानात कोन बस्वल म्हून. मानले तूम्हाला खरोखर वास्तववादी नीरीक्षण. स्वतःला एक्स्प्रेस करणे न्हवे तर सदैव स्वत:ची मीरवणे यासाठीच फेस्बूक वापरले जाते....
6 Jan 2011 - 3:19 pm | चिंतामणी
प्रिय मिपाकर/वाचकहो, छोटी छोटी निरीक्षणं मांडावी
तु लिहील्यावर एखादा मुद्दा राहीला आहे का याचा अभ्यास करायला लागेल.
तु काही वाईट लिहीले नाहीस. काहीजण चेष्टा करतील पण दुर्लक्ष कर.
6 Jan 2011 - 3:50 pm | मितान
सगळे लोक करतात ती गोष्ट केल्याने किंवा कमी लोक करतात ती गोष्ट केल्याने तुम्ही सामान्य किंवा असामान्य बनू शकत नाही.
मुखवटा घालायचा की नाही ही चॉईस १०० % आपल्या हातात असते. ओर्कुट,फेसबुकवर काय किंवा मिपावर काय जी गोष्ट मनापासून आवडली तिलाच दाद द्या. न आवडणार्या गोष्टींकडे संपूर्ण दुर्लक्ष करा. हे करताना कोण काय म्हणेल यापेक्षा स्वतःला काय वाटतं त्याकडे लक्ष द्या. जे लोक तुमचा मुखवटा बघून नातं ठेवतात ते लोक 'तुमचे' असू शकत नाहीत. आणि जे खरंच 'तुमचे' लोक आहेत त्यांना तुम्ही मुखवटा घातला न घातला तरी काही फरक पडत नाही. नाही का ?
मी तरी अशीच वागते. आणि मला स्वतःचे मानसिक आरोग्य जपायला त्याचा पुरेपुर उपयोग होतो.
6 Jan 2011 - 5:03 pm | आत्मशून्य
चांगली व्याख्या आहे पण, चे.पू. वर अथवा इतर ठीकाणी तूम्ही कोण आहात या पेक्शा तूम्ही स्वतःला कसे दाखवता आणी कोणा कोणाला ओळखता यांचाच खेळ चालू असतोय. त्यावरच तूम्ही कसे आहात हे ठरवले जाते आणी मग सूरू होते थापांचे मायाजाल...
6 Jan 2011 - 5:10 pm | मितान
पुन्हा तेच..
त्या खेळात सामिल व्हायचे की नाही हे तुम्हीच ठरवायचे असते. :)
6 Jan 2011 - 6:10 pm | आत्मशून्य
हे मी तूम्हाला तूमच्य पेक्शा जास्त चांगले पटवू शक्तो पण आपण आपल्या हातात काय आहे यावर चर्चा करतच नाही आहोत. आपण चर्चा ही करतोय की आपल्या हातून काय घडतय आणी मूख्य म्हणजे त्यामधे आपण कसे एकसूरे बनून गूंतत चाललो आहोत, उद. गेले३ वर्षे मी आमच्या ग्रूप मधील कोण ना कोण कसे लद्दखला बाइक वरून गेले याचे तेच ते फोटो बघत आहे... वैताग आहे हा. आणी त्याचे खाले तेच ते ठरावीक रीप्लाय........ वास्सप, यु रोक, यो बेबी...... १ नंबर, सही... या पलीकडे मजल नाय कोणाची मग एकाद कसा नूकताच टिंबक्तूला जाणार असेल कंपनी कडून की लगे १५ डेज टू गो , २ डेज टू गो , १ डेज टू गो आणी गोईंग टू टिंबक्तू, लँडीग अॅट टिंबक्तू असले फडतूस स्टेटस बघणे.. म्हणजे छ्या छ्या छ्या छ्या
होय हे तेव्हडे खरे आहे :) पण पूढे काय ?
6 Jan 2011 - 6:36 pm | गणपा
का एवढा त्रागा करुन र्हायले भाऊ.
अहो तो संगणक का स्वतःच्या बुद्धीने फेसबुकच पान उघडतो. नाही आवडत तर नका जाऊ तिकडे.
हाय काय अन् नाय काय?
6 Jan 2011 - 6:41 pm | खादाड अमिता
असेच
6 Jan 2011 - 6:45 pm | सिद्धार्थ ४
>अहो तो संगणक का स्वतःच्या बुद्धीने फेसबुकच पान उघडतो. नाही आवडत तर नका जाऊ तिकडे.
हे मात्र एक नबर !!! पटल आपल्याला.
6 Jan 2011 - 5:22 pm | मेघवेडा
चे.पू. वर अथवा इतर ठीकाणी तूम्ही कोण आहात या पेक्शा तूम्ही स्वतःला कसे दाखवता आणी कोणा कोणाला ओळखता यांचाच खेळ चालू असतोय.
निलाजरेपण कटिस नेसले निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व चढविला भाळा
उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला..
असंच एकूण चालतं म्हणा ना..
पटलं थोडंफार तुमचं, पण अर्थात कुठे कसे वागायचे याचे स्वातंत्र्य आहे तुम्हालाच. तेव्हां आपण यात ओढले जातो वगैरे तद्दन बाष्कळ गप्पा आहेत.
6 Jan 2011 - 4:28 pm | शरदिनी
शेवटच्या काही ओळींपर्यंत लेख मस्त चालला होता .. मजा येत होती तोपर्यंत अचानक गिअर बदलून तुम्ही शेवटी "प्रवीण दवणे" ष्टाईल पकडलीत , त्याचीही गंमत वाटली...
( कसं होणार आपलं किंवा कसं होणार त्यांचं? वगैरे वगैरे ... यात थोडं "आमच्या वेळी असं , आता कसं "असा थोडा नॉस्टाल्जिया मिसळला असता की मस्त "डोळ्यांतून पाणी काढलंत, गहिवरलो " वगैरे प्रतिसाद भरभरून आले असते)
(चतुरंग पुरवणीत मुकुन्द टाकसाळे यांनी असाच एक मजेदार लेख लिहिला होता त्यात कविता महाजन यांना फेसबुकवर इतका वेळ घालवून लिहायला वेळ कधी मिळतो असे लिहिले होते)
6 Jan 2011 - 5:57 pm | मुक्तसुनीत
(चतुरंग पुरवणीत मुकुन्द टाकसाळे यांनी असाच एक मजेदार लेख लिहिला होता त्यात कविता महाजन यांना फेसबुकवर इतका वेळ घालवून लिहायला वेळ कधी मिळतो असे लिहिले होते)
...आणि कविताबाई फेसबुकावर (किंवा अन्यत्र) कितीकिती वेळ कसकसा घालवतात हे टाकसाळ्यांना कसं बरं कळलं असेल ? (यावर एक गंभीर लेख लिहिता यावा ;-) )
6 Jan 2011 - 5:13 pm | अवलिया
हे फेसबुक काय आहे?
6 Jan 2011 - 6:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्हाला माहित नाही? मग तात्यांना संपर्क करा. त्यांना माहित आहे. अन्यथा तुमचे जालमित्र आहेतच की. ते पण असतात म्हणे तिथे. (आता "कोण जालमित्र" असे नका विचारू बुवा ;-) )
6 Jan 2011 - 6:53 pm | परिकथेतील राजकुमार
काय रे नाना उगाच आपल्याला फार काही माहिती नाही असे दाखवुन सनसनी निर्माण करतो आहेस का मिपावर ?
बाबा रे, परदेशात एकटे पडल्यावर हात द्यायला उपयोगी पडते हो फेसबुक. गेला आहेस का कधी परदेशात शिंच्या ? आणि गुत्त्याशिवाय कधी कुठे एकटा तरी पडला आहेस काय ?
6 Jan 2011 - 6:56 pm | अवलिया
>>>काय रे नाना उगाच आपल्याला फार काही माहिती नाही असे दाखवुन सनसनी निर्माण करतो आहेस का मिपावर ?
च्यामारी ! माहित नाही ते विचारले तर गुन्हा झाला काय ? ऑ !
>>>बाबा रे, परदेशात एकटे पडल्यावर हात द्यायला उपयोगी पडते हो फेसबुक. गेला आहेस का कधी परदेशात शिंच्या ?
ह्या ! परदेशात कसे जाणार? साधा पासपोर्ट पण नाही आपल्याकडे !
>>>आणि गुत्त्याशिवाय कधी कुठे एकटा तरी पडला आहेस काय ?
कधीच नाही. आणि गुत्त्यात पण नाही. मित्र असतातच. आणि समजा एकटा गेलो तरी मित्र जमवायला वेळ लागत नाही. :)
6 Jan 2011 - 6:59 pm | परिकथेतील राजकुमार
मग निट विचारावे की लोकांच्या खरडवह्यात जाउन. उगाच show-off कशाला करतो ?
6 Jan 2011 - 7:02 pm | अवलिया
मिपावर १०००० + सदस्य आहेत. किती जणांच्या खवत जाऊन विचारायचे? ऑ !
6 Jan 2011 - 7:20 pm | असुर
>>> मिपावर १०००० + सदस्य आहेत. <<<
आम्ही समजत होतो की १००००+ आयडी आहेत!!!
>>> किती जणांच्या खवत जाऊन विचारायचे? ऑ ! <<<
ज्यांच्या खरडवह्या चालू आहेत असे!!! अनेकांच्या वह्या बंद असतात हल्ली!
नानासाहेब, डु-आयडींना सदस्यत्व देऊन आज तुम्ही त्यांना जो बहुमान दिलाय त्याबद्दल काय बोलावे??? शब्द संपले!!! =)) =)) =)) =))
--असुर
7 Jan 2011 - 8:05 am | नरेशकुमार
मेलो, फुटलो, आदळलो, धडकलो, आपटलो, चिरडलो, तुकडे तुकडे झाले, भुगा झाला.
----------------------------------------------------------------------------------------------------------
7 Jan 2011 - 12:45 pm | गणपा
अरे वा आलात आपण परत :)
6 Jan 2011 - 5:25 pm | सुहास..
'फेसबुक' वर आहेस का? यापेक्षा 'फेसबुक' वर का आहेस ? असे विचारले असते तर उत्तर दिले असतो .
बनेल घोळकर
6 Jan 2011 - 5:59 pm | खादाड अमिता
<<'का?'...... काय लपवण्यासाठी ही सगळी मास्क्स (मुखवटे) लावावी?.......का सगळ्यांनी इतरांसारखं बनावं? अशी कोणती भीती आहे ज्यामुळे आपण बाहेर फेकले जाऊ ?>>
मला नाही वाटत कि कोणाला पण फेस बुक वर या अशी जबरदस्ती केली गेली होती. हो, १०० फ्रेन्ड्स नी 'आय अॅम ओन फेस बुक, आर यु?' अस जरूर विचारल होत सारखे इ मेल करुन. पण मी स्वता, बघू तरी हे काय आहे ते अश्या कोउतुहुलानेच तिथे गेले होते. आणि आज ही आहे.
यशो ताई म्हणाल्या तस जर आपण खरच फक्त जे आपले खरे मित्र आहेत त्याननाच आपल्या नेट्वर्क वर ठेवल तर असे मुखवटे लावायची वेळ येणार नाही.
त्यातुन ही मी कोणाला काहीही वाईट बोल्ण्या पेक्षा चांगलं बोलणं किंवा काही न बोलणे ह्या मताची आहे.
:)
6 Jan 2011 - 6:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>आपण खरच फक्त जे आपले खरे मित्र आहेत त्याननाच आपल्या नेट्वर्क वर ठेवल तर असे मुखवटे लावायची वेळ येणार नाही
ठरवले तर इतरांसाठीही मुखवटे नाही घालावे लागत. कुणी जबरदस्ती करतो का की माझ्याशी दिखावू पणे वाग म्हणून. ज्यांना otherwise ही show -off आवडतो ते तिथे पण तेच करतात. ज्यांना नाही आवडत ते नाही करत.
इतरही फायदे आहेत की. माझ्या ओळखीत असे अनेक लोक आहेत जे कधीकाळी माझ्या संपर्कात होते. आज फार नाहीत. पण ते ओर्कुट किंवा फेसबुक वर नेटवर्क मध्ये आहेत. कधी कधी बोलणे होते. कधी अचानक वेळ आली तर मदत पण मिळू शकते. (त्यांना वेळ पडली तर मी पण करतो मदत)
परदेशात एके ठिकाणी एकटा पडलो होतो तेव्हा असाच ओर्कुट ने हात दिला होता आणि काही खूप छान मित्र मिळवून दिले. शेवटी ही सगळी संपर्काची साधने आहेत. कसा उपयोग करायचा ते आपले आपण ठरवावे.
6 Jan 2011 - 7:04 pm | यशोधरा
अगदी खरं आहे मेहेंदळे. कधीच कोणासाठी कसलेच मुखवटे लावायची गरज नसते. लावूही नयेत.
6 Jan 2011 - 7:15 pm | अविनाशकुलकर्णी
आपले कौतुक कुणी करावे आपले गुण दाखवण्यास जागा मिळावी असे वाटत असेल तर चेपु व इतर योग्य आहे..नसले तरी हरकत नाहि चेपु वाचणे हा पण एक विरंगुळा आहे..
तात्या म्हणतात तसे चेहेरे बघण्यास हरकत नाहि
बाकि लेख छान लिहिला आहे..लेखन शैलीला दाद ...
6 Jan 2011 - 7:48 pm | दैत्य
छान लिहीलंत. मला वाटतं ही फेसबुकवरची टीका नसून साचेबद्धपणावरची आहे. सगळ्यांचे कसे ठराविक सुखाचे पाडाव, ठराविक साच्यातला कलंदरपणा वगैरे वाटणं स्वाभाविकच आहे. हे सगळं आधीही होतंच फक्त फेसबुकमुळे ते आता अंगावर येतंय एवढंच. शिवाय सगळे लोक सारखे असणे, त्यांच्या गरजा सारख्या असणे ही बाजारपेठेची गरज आहे आणि आपण समूहाच्या बाहेर पडू नये ही आपली गरज आहे त्यामुळे हे एकजिनसीकरण पुढे वाढतच जाणार
धन्यवाद न.नि .!
हा लेख किंवा विचार खरंच फेसबुक वरची टीका नाही. मी स्वतः फेसबुक वापरतो आणि मला सुद्धा वाटतं की तिथे मित्रांना भेटावं आणि मजा करावी.....मी ज्याबद्दल लिहिला आहे ती गोष्ट म्हणजे, एक नव्हे तर सगळ्यांमुळे आणि सगळ्यांच्या ठराविक वागण्याच्या पद्धतीमुळे बनलेला एक साचा आणि त्याचं ह्या वेबसाईट वर दिसणारं रूप ! त्यात विनोद आहे, एकसुरीपणा आहे, थोडा विचार केला तर कोणत्या तरी जीवन-पद्धतीला मूक-संमती आहे, काही लोकांसाठी रोजगार आणि काहींसाठी ग्रुपमध्ये जागा मिळावी म्हणून धडपड आहे....इथेच काही लोकांच्या म्हणण्यानुसार जगातले ५० कोटी लोक एकत्र येत असतील तर सहाजिकच त्यातून वेग-वेगळे आकृतिबंध तयार होणार.......
हा लेख कोणा एका व्यक्ती-बद्दलही नाही आणि सगळ्यांच्या आवडत्या वेबसाईट बद्दल मी वाईटसाईट (वाईट वेबसाईट नाही!) बोलतही नाही !
6 Jan 2011 - 9:48 pm | विसोबा खेचर
मस्त.. :)
6 Jan 2011 - 11:42 pm | शिल्पा ब
मला तर आधी हे फेसबुक काय आहे हेच माहित नव्हतं...एकदा अकौंट बनवलं आणि ओर्कुटचाच एक जण अॅडला...मग वर्षभर मी काही त्याकडे पहिलेच नाही...कोणी फारसं ओळखीचं नसल्याने कोणाला अॅडणार? मग मिपाची एक सदस्य एक दिवस दिसली आणि तिला फ्रेंड केल आणि आता बहुतेक सगळेच मिपाचे लोक आहेत....बाकी लोक नाही अन त्यांचा संग्रह तर अजिबात नाही आमच्याकडे...
आणि सगळे ओळखीचे असल्याने त्यांच्या सगळ्या फोटो, status अन जे काय असल ते त्याला छान छान म्हणावं लागतं :)
आता ऑर्कुट नाही. :) पण लोक खुपदा वैयक्तीक माहीती नेटावर देतात ते काही पटत नाही...चालायचेच.
7 Jan 2011 - 3:15 am | मीली
फेसबुक हे वापरण्यावर आहे.खूप कंटाळा आला कि टाईमपास साठी ठीक आहे.
पण अतिवापर केला तर आपल्यालाच आपला राग येतो आणि वेळ वाया गेल्यामुळे चिडचिड होते ...
लवकर अपडेट कळतात, पण काही काही लोक /मित्र/मैत्रिणी खरेच असे अपडेट टाकतात कि बस!
जसे खूप भूक लागली आहे काय खावू ......
बाळाला पाळणाघरात डब्यात काय देवू......!
नवर्याकडून आयफोन मिळाला.....!
मग मित्र पण भन्नाट प्रतिसाद देतात ...
पण वाचायला जोक म्हणून मजा येते.काही जण धडाधड फोटो अपलोड करत जातात ...त्यांचा उत्साह पाहून गम्मत वाटते.
सारख्या आवडी निवडी च्या लोकांशी पण आपण मैत्री करू शकतो.पण काही लोक मात्र स्वताची टिमक्या वाजवताना दिसतात तेव्हा मात्र प्रदर्शन करणाऱ्या वृत्तीचा राग येतो.
थोडक्यात काय तर ,खूप काम करून कंटाळा आला असेल तर फेसबुक वर चक्कर मारून यावी!
लेख छान लिहिला आहे.उत्तम निरीक्षण!
गगनविहारी यांनी पाठवलेल्या लिंक वर चे गाणे भारी आहे!
7 Jan 2011 - 3:19 am | मराठे
या विडियोची आठवण झाली....
7 Jan 2011 - 7:52 am | बबलु
दैत्या... लेख आवडला. बरेचसे विचार पटले.
अजून काही मैत्रिणी आणि मित्रही, ज्यांचे आपापल्या नवजात अपत्त्यांबारोबारचे फोटोज.....आणि मग त्याखालच्या बाळाचं कौतुक करणाऱ्या मावश्या 'ओह..माय क्युट बेबी !!!' 'सो SSS स्वीट...'. इत्यादी....काही जणांचे कुठल्यातरी बार मधले किंवा क्लब मधले नाचतांनाचे फोटो....आणि त्याखाली 'वॉव ...यु रॉक !!' वगैरे.........
हा हा !!!!!
पावडर ने मढवून अत्यंत मोठा खरा दाणा दिसणाऱ्या साखरपुड्याच्या अल्बम मधल्या मुलीला 'खूपच छान दिसत आहेस फोटोत !' अश्या प्रतिक्रिया
लै भारी.
मायामी , न्यूयॉर्क, लंडन, कॅलिफोर्निया, शिकागो, आयफेल टोवर, टोक्यो, सिंगापूर ह्या ठिकाणांचे सुमारे ५ अब्ज फोटो आणि बहुतांश फोटोज मध्ये दोन्ही हात फैलावून आकाशाकडे बघणारी ती व्यक्ती
हे सर्वात बेष्ट !!! :) :)
बाकी... मुखवट्यांचं म्हणाल तर, ते आपण कायमच वापरत असतो, काय ?
बर्थडे ला गेलो की कौतुकाचा मुखवटा.
हापिसात hard-work मुखवटा.
पार्टीत खर्या-खोट्या श्रीमंतीचा आणि टेंभा मिरवण्याचा मुखवटा.
नातेवाईकांशी प्रेमाचा मुखवटा.
वगैरे... वगैरे.
असो.... २००५-०६ च्या वेळेस मायस्पेसची महाप्रचंड हवा होती. आज फेसबूकची चलती आहे. उद्या अजून काहीतरी असेल. :) :)
7 Jan 2011 - 8:56 am | रणजित चितळे
मी आहे पण मला ते कृत्रीम वाटते. दोन महिन्यातून एकदा वगैरे जातो त्या स्थळावर. नाव हेच आहे.
7 Jan 2011 - 9:18 am | दैत्य
धन्यवाद मित्रांनो !
7 Jan 2011 - 11:30 am | योगी९००
दैत्य..
लेख आवडला आणि बरेचसे विचार पटले..
आजून काही ...
१) लग्नानंतरचे फोटो आणि त्यावरच्या एकदम "मेड फॉर इच आदर" सारख्या प्रतिक्रिया..जरी नवरा बायको एकदम विजोड असले तरी...
२) उगाच लिहीलेले वाल मेसेज .." आज ऑफिसमध्ये खुपच काम होते"..(जणू काही इतर लोकं ऑफिसमध्ये गोट्याच खेळत असतात).. "आज ऑफिसला जायला किंवा कोठेतरी जायला खुपच उशिर झाला" ...."आज मला माझा डबा खुपच आवडला"...वगैरे वगैरे निर्बुद्ध वाल मेसेजेस...अशा लोकांना सोशल नेटवर्किंग म्हणजे काय हे सांगावे वाटते..
बाकी गणपा यांनी म्हणले तेच आचरणात आणतोय...संगणक काही स्वतःहून फेस बुक चालू करत नाही...पण मोबाईल मधील फेसबुक विजेट मात्र करते..म्हणून ती फेसबुक विजेटच उडवून टाकली..
आता सुखी आहे. जास्त त्रागा होत नाही.
7 Jan 2011 - 11:30 am | योगी९००
दैत्य..
लेख आवडला आणि बरेचसे विचार पटले..
आजून काही ...
१) लग्नानंतरचे फोटो आणि त्यावरच्या एकदम "मेड फॉर इच आदर" सारख्या प्रतिक्रिया..जरी नवरा बायको एकदम विजोड असले तरी...
२) उगाच लिहीलेले वाल मेसेज .." आज ऑफिसमध्ये खुपच काम होते"..(जणू काही इतर लोकं ऑफिसमध्ये गोट्याच खेळत असतात).. "आज ऑफिसला जायला किंवा कोठेतरी जायला खुपच उशिर झाला" ...."आज मला माझा डबा खुपच आवडला"...वगैरे वगैरे निर्बुद्ध वाल मेसेजेस...अशा लोकांना सोशल नेटवर्किंग म्हणजे काय हे सांगावे वाटते..
बाकी गणपा यांनी म्हणले तेच आचरणात आणतोय...संगणक काही स्वतःहून फेस बुक चालू करत नाही...पण मोबाईल मधील फेसबुक विजेट मात्र करते..म्हणून ती फेसबुक विजेटच उडवून टाकली..
आता सुखी आहे. जास्त त्रागा होत नाही.