काही चित्रपट आनंदासाठी, विरंगुळ्यासाठी नसतातच. तुम्हाला ज्ञात-अज्ञात वास्तवाचा प्रत्यय आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजात आपल्या आजू बाजूला घडणाऱ्या अनेक घटनांनी, अस्वस्थ करणाऱ्या वास्तवांनी मनात जे प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं शोधणं जरी एका व्यक्तीला शक्य नसलं तरी अशी व्यक्ती मग चार चौघांत आपलं मत मांडते, शक्य असेल तर मग जोगवा सारखी एखादी कलाकृती निर्माण होते. ह्यात काम करणारे अभिनेते, त्यातून मिळणाऱ्या बिदागीच्या आशेने तर येत नाहीतच मात्र, आपली ह्या लोकोपयोगी कार्याला काही मदत होईल का ह्या विचाराने पुढे सरसावतात.
देवाला वाहून घेतलेल्या, थोडक्यात देवासाठी सोडून दिलेल्या जोगीणींची आणि जोगत्यांची हि कथा. नाही म्हणजे विषय तसा साधा सरळ आहे. त्यातील बऱ्याच सत्यतेचा अंदाजही आपल्याला असतोच. पण ह्या गोष्टी अश्या होणारच असे मानणारे आपण आणि त्यात काही खटकण्याजोगं आहे हे समजणारे ते श्रीपाल मोरखिया नाहीतर राजीव पाटील ह्या सारखे लोक. कर्नाटकामधलं एक साधं सरळ गाव, नाव काय माहित नाही. किंव्हा तितकंसं लक्षात राहत नाही. एकूण काय एकंदर सर्वच गावांची ही तऱ्हा. इकडून तिकडून सारखीच. न- कळत्या वयात केसांमध्ये जट निघाली म्हणून देवीला वाहिलेली सुली, आणि तय्याप्पाची ही कहाणी. दोघांची मनस्थिती निराळी, दोघांवर समाजाचे आघात निराळे. एकंदर पंथाचा दृष्टीकोनही हताश आणि निराशावादी. तरीही हा चित्रपट कंटाळवाणा आणि अगदीच नकारात्मक होत नाही. संपूर्ण समाजाचा दृष्टीकोन दाखवताना, त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावनांचा पण तितकाच व्यापक विचार लेखक आणि दिग्दर्शकाने केलेला आहे.
मी तसं पाहता विषयासाठी चित्रपट पहिला असा म्हणणं तसं चूक ठरेल. मी पाहिला उपेंद्र लिमये साठी. मला तर त्याचा अभिनय नेहमीच आवडलेला आहे. त्याला तर ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसंच मुक्ता बर्वेही अभिनयाला कुठेही उणी पडली नाही. दोघांच्या संवेदनशील आणि जिवंत अभिनयामुळे कलाकृती आणि निर्मात्यांचा आशय सरळ मनाचा ठाव घेतो. विनय आपटे, किशोर कदम अश्या सहकलाकारांनी पण ह्या जोडीला चपखल साथ दिलेली आहे.
श्रद्धा. सर्व धर्माचं मूळ. ह्या धर्माचं मग कर्मकांडात कधी रुपांतर होतं हे कळतही नाही. आणि सवयीने मग ते खटकतही नाही. श्रद्धेच्या गरजेतून मग अश्या काही निष्पापांचा बळी दिला जातो आणि समाजाचा गाडा अविरत चालू राहतो. आपल्या सारख्या शहरी संस्कृतीत वाढलेल्या मनांना जेंव्हा ह्या वास्तवाची जाणीव होते तेंव्हा ते आपल्याला जरूर अस्वस्थ करून जातं, आणि वर्षानुवर्षे ह्या चालीरीतींना मानत आलेल्या सश्रद्ध समाजाच्या मनाच्या कोडगेपणाचं आश्चर्य वाटत रहात. असं जरी असलं तरी तेथील सामान्य माणसासाठी ही गोष्ट नेहमीचीच असते, आणि ह्या वस्तुस्थितीची जाणीव चित्रपट आपल्याला हळुवारपणे करून देतो.
आत्तापर्यंत मी हा चित्रपट पाहिला नव्हता ही माझी चूकच. पण तशी आपण करू नये ही विनंती. अनेकांनी आत्तापर्यंत हा पाहिला असेलच. नसल्यास जरूर पहा, शहरीकरणाच्या थोड्याच दूर असणार्या वास्तवासाठी पहा, त्याला चव्हाट्यावर आणणाऱ्या धाडसी निर्मात्यांसाठी पहा. आपल्या अभिनयाने त्यात जान ओतणाऱ्या कलाकारांसाठी पहा. समाजाच्या जाणिवेचे पदर अनुभवण्यासाठी पहा, निष्कारण वाया गेलेल्या आयुष्यांसाठी पहा. आईचा हा मेळा जरूर पहा.
प्रतिक्रिया
8 Dec 2010 - 10:03 pm | रेवती
बघायचा आहे पण बघवेल का हा चित्रपट असं वाटतं आहे म्हणून डोक्यातून तो काढून टाकलाय.
आपण असल्या चालीरिती मानत नाही. जे मानतात त्यांना फारसा त्रास होत नाही. आपण मात्र अस्वस्थ होउन जातो म्हणून आजकाल अश्याप्रकारचे चित्रपट पाहणं टाळते. त्यातली गाणी मात्र आवडलीत. त्यातही उपेंद्र लिमयेच्या अभिनयाची चुणुक पहायला मिळते.
8 Dec 2010 - 11:21 pm | सुहास..
छान !!
अवांतर : कधीतरी १९८५ च्या जुन्या " जोगवा " मुळे मागे राहिलेला, २००९ चा " एक कप चहा "पण प्या कधीतरी आमच्यासाठी !! पुणेकर आहे पण फु़कट पाजतो हवे तर !!
8 Dec 2010 - 11:24 pm | स्वाती दिनेश
उपेंद्र लिमयेचे काम तर अफाटच झाले आहे,
किशोर कदम, मुक्ता बर्वे सुध्दा लक्षणीयच!
जोगवा पूर्ण सलग पाहू शकले नाही, पाहत असताना अनेकदा सुन्न झाले आणि पोझ मोडवर टाकून शांत झाल्यावर पुढे सिनेमा पाहिला.
अवांतर- 'झुलवा'ने सुध्दा असच अस्वस्थ केले होते ,सयाजी शिंदे होता त्यात..
9 Dec 2010 - 2:48 am | दिपाली पाटिल
>>जोगवा पूर्ण सलग पाहू शकले नाही, पाहत असताना अनेकदा सुन्न झाले आणि पोझ मोडवर टाकून शांत झाल्यावर पुढे सिनेमा पाहिला.
असं केल्याशिवाय बघवतच नाही जोगवा...फार अस्वस्थ करतो हा चित्रपट, अस्संच "बयो" बघताना झालं होतं...
9 Dec 2010 - 3:07 am | मेघवेडा
जोगवा पाहिलेला नाही. पाहीन मिळेल तेव्हा. 'बयो' भारीच! मूळ कथानक ताकदीचं आहेच, आणि सर्वांनीच ताकदीचा अभिनय केला आहे.
9 Dec 2010 - 6:09 am | विंजिनेर
जोगवा उत्कृष्ठ आहे, विषयाशी सच्चा आहे. साधारण उपेक्षित वर्गाची गोष्ट सांगणारा चित्रपट असून सुद्धा कुठेही अंगावर येत नाही. प्रेक्षकाला खिळून ठेवतो. केवळ अतिप्रसिद्धीमुळे चाललेल्या नटरंगपेक्षा खूप उजवा आहे.
महाराष्ट्रातल्या लोककलेचा समृद्ध वारसा इतक्या ताकदीने मांडणारा कुणी दिग्दर्शक आहे हे बघून मला अभिमान वाटला होता.
गाण्यांबद्दल सुद्धा काय बोलावे महाराजा -
मुक्ता बर्वे समर्थ अभिनेत्री आहेच पण "जीव दंगला" मधे ती फक्त हॉट दिसते :)
पारंपारिक चालीत बांधलेला, उत्कृष्ठ छायाचित्रण, नृत्य असलेला जागर - "लल्लाटी भंडार" सुद्धा वेड लावतो.
9 Dec 2010 - 6:15 am | बेसनलाडू
लल्लाटी भंडार मधील लिमयेंचा नेत्राभिनय केवळ उत्तम आहे. काही न बोलता डोळ्यांनीच सगळं आणि खूप काही सांगून जातात. इतर चित्रपटांमध्ये लिमयेंची काहीशी दादागिरी स्वरूपाची व्यक्तीरेखा, 'आगाऊ' छापाची संवादशैली असते. यांपेक्षा जोगवा मध्ये खूपच वेगळी प्रतिमा आहे. या व्यक्तिरेखेत सुरुवातीला बरीचशी अगतिकता दाखवली आहे आणि मग कुठेतरी एक-दोनदा त्या अगतिकतेतून बाहेत येण्यासाठीची फुटकळ बंडखोरी नि तिचे शेवटी पूर्ण बंडात झालेले पर्यवसान. लिमयेंच्या या आधीच्या भूमिकांच्या तुलनेत हे तसे आव्हानात्मकच होते.
या भूमिकेतील बारकावे समजून घेण्यासाठी, जोगत्यांचे-जोगतिणींचे खरे आयुष्य अभ्यासण्यासाठी ते एका जोगत्याबरोबर काही दिवस राहत होते, असेही कळले. या भूमिकेसाठी त्यांनी केलेली तयारी आणि पडद्यावर दिसणारा त्याचा परिणाम दोन्ही स्तुत्य!
थोड्या हळव्या, भावनाप्रधान भूमिकांसाठी त्यांना 'जोगवा'सारख्या एक-दोन आणखी संधी मिळणे महत्त्वाचे आहे. तसे झाल्यास ते लवकरच अष्टपैलू अभिनेते होतील, यात शंका नाही.
(प्रेक्षक)बेसनलाडू
10 Dec 2010 - 8:40 pm | भानस
करणारा व अतिशय नेमके व सच्चेपणाने उतरला आहे. कलाकारांची कामेही अप्रतिमच. उपेंद्रचे काम उत्कृष्टच. जरूर जरूर पाहावा असा चित्रपट.