कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट. भाग - १
हा खटला जेव्हा न्यायालयात उभा राहिला तेव्हा सरकारी वकील होते श्री. चंद्रचूड आणि त्यांना मदत होती अर्थातच श्री. रामजेठामलानींची.
हा खटला दाखल करून घ्यायच्या अगोदर सरकारला हे सिध्द करून दाखवणे भाग होते की न्यायधिशांनी ज्युरींची दिशाभूल होऊ दिली. यात बिचार्या श्री. मेहता नावाच्या न्यायाधिशांचा उगचच बळीचा बकरा झाला. असो. ते सिध्द करण्यासाठी खलील मुद्दे विचारात घेण्यात आले.
१ जेव्हा कावस प्रेम आहूजाच्या घरी गेला तेव्हा त्याची त्याच्याशी झटापट झाली आणि त्या दरम्यान अपघाताने गोळी ऊडून प्रेम आहूजाला लागली. ज्या अर्थी हे कावसचे म्हणणे होते त्यामुळे हे सिध्द करण्याची जबाबदारी कावसवर पडते. ज्युरींना याची कल्पना देण्यात आली नव्हती.
२ दुपारी १ वाजता सिल्व्हियाने जो गौप्यस्फोट केला त्यामुळेच हे झाले असे ज्युरींना स्पष्ट करण्यात आलेले नाही. एखादी तिसरी व्यक्तीही एखाद्या व्यक्तीला खुन करण्यास प्रवृत्त करू शकते असा शेरा न्यायधिशांनी मारायची काही आवश्यकता नव्हती.
३ ज्युरींना “ Beyond reasonable doubt” या वाक्याचा अर्थ सविस्तरपणे सांगितला गेला नव्हता.
ही कारणे ग्राह्य धरून ज्युरींचा निर्णय रद्दबादल ठरवला गेला आणि परत नव्याने खटला चालू झाला.
कावसच्या वकिलांनी परत तेच मुद्दे मांडले.
अर्थात त्या मुद्द्यांची श्री. चंद्रचूडांनी सहज चिरफाड केली. त्यातले महत्वाचे मुद्दे असे.
१ जर झटापट झाली असती तर प्रेम आहूजाच्या कमरेला टॉवेल राहिला नसता. पंचनाम्यात तो तसाच प्रेतावर गुंडाळलेला होता असे नमूद केलेले आहे.
२ प्रेम आहूजाची जी मोलकरीण होती तिने तिच्या साक्षीत असे सांगितले आहे की तिने लागोपाठ तीन आवाज ऐकले. त्यामुळे झटापटीचा प्रश्नच येत नाही.
३ ती जर झटापट झाली असती तर मॅमी आहूजा जी प्रेम आहूजाची बहीण होती आणि तेथेच होती, तिने जेव्हा हा आवाज ऐकला तेव्हा “ हे काय चालले आहे ? “असा प्रश्न विचारला नसता. तो प्रश्न ऐकल्यावर कावस शांतपणे तेथून चालता झाला होता.
४ जर रागाच्या भरात हा गुन्हा घडला असं म्हणायचे असेल तर त्याने हा गुन्हा लगेच करायला हवा होता. शांतपणे संध्याकळी नाही.
५ डि.सि.पी. लोबो यांनी अशी साक्ष नोंदवली आहे की जेव्हा कावस त्यांच्या ऑफिसमधे दाखल झाला तेव्हा त्याने आपण खून केल्याची कबुली दिली होती.
६ नौदलाच्या नोंदीच्या वहीत कावसने रिव्हॉल्व्हर व त्याची काडतुसे केव्हा घेतली याची नोंद आहेच.
७ कावसचे मन थार्यावर नव्हते असेही म्हणता येत नाही कारण गुन्हा केल्यावर त्याने शांतपणे आपली कार राजभवनाकडे नेली त्या वेळी ड्युटीवर असलेल्या प्रोव्होस्ट मार्शलला हे सांगितले आणि त्याच्या सल्ल्यानुसार श्री लोबो यांना भेटायला गेला.
८ श्री लोबो यांच्या येथे स्वत:च्या नावाच्या स्पेलींगमधली चुकही दुरूस्त केली.
या वरून हेच सिध्द होते की गुन्हेगाराने हा खून थंड डोक्याने, विचार करून केलेला आहे.
यासाठी शिक्षा होती मृत्यूदंड किंवा जन्मठेप.
कावसची नोकरी गेली, त्याचा हुद्दा काढून घेण्यात आला. त्याने मग सर्व्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला पण तेथेही हाच निकाल लागला.
आणि शिक्षा ठोठवण्यात आली “ जन्मठेप”.
शिक्षेची तीन वर्षे झाली होती.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते म्हणून कावस हा भारतात जन्मला होता. १९६०च्या सुमारास एक भाई प्रताप नावाचा सिंधी व्यापारी पाकिस्तानातून फाळणीमुळे भारतात आला होता. त्याने सिंधी लोकांसाठी खूप काम केले होते त्यामुळे तो एक राजकारणीही होता व त्याची व पं नेहरू यांची चांगलीच ओळख होती. या व्यापार्याला आयातीसाठी बरेच परवाने मिळाले होते. त्या काळात लायसेन्सराजमूळे या परवान्यांवर सरकारी बारीक नजर असायची. तर कुठल्यातरी एका प्रकरणात हा भाई सापडला आणि त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्यांचे वकील होते श्री राम जेठमलानी – परत सिंधीच. पण प्रतापभाईंना या तरूण रक्ताच्या वकीलाची खात्री वाटेना म्हनून त्यांनी याला दुय्यम भुमिका देऊन एक अनुभवी वकील नेमला. दुर्दैवाने या ही वकीलाला यश न येऊन त्याला १८ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली. ही भोगण्याची त्याची मुळीच तयारी नसल्यामुळे त्याने आपली पं नेहरुंशी असलेली ओळख पणाला लावली.
प्रतापभाईला तर सोडायचे होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या श्रीमती विजयालक्ष्मी पंडित. या कोण होत्या हे सांगायची गरज नाही. शेवटी प्रतापभाईनी नेहरूंकडचे आपले वजन वापरून महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे आपला दयेचा अर्ज दाखल केला. यामुळे ही फाईल परत उघडली गेली. या फाईलचा अभ्यास दुर्दैवाने मला वाटते दोन पारशी गृहस्थांकडे होता. ( खात्री नाही ). त्यांनी असा शोध लावला की ती सगळी चौकशी चुकीची आहे. प्रतापभाईंवर हा गुन्हा दाखल करायची काही आवश्यकताच नव्हती. मग पूढचा मार्ग सोपा होता. त्याने एक दयेचा अर्ज द्यायचा आणि त्याला सोडून द्यायचे. पण इथे सरकारची जरा पंचाईत झाली. या सिंध्याला सोडला तर कावसचे काय ? सर्व समाजाचे आणि पारशी समाजाचे हे म्हणणे तर होतेच की कावसला ही शिक्षा फार होते आहे. तो काही सरावलेला गुन्हेगार नाही. झाली तेवढी शिक्षा बास झाली आणि त्याला माफी द्यावी.
सिंधी आणि पारशी समाजाच्या या संघर्षात सरकारची फारच पंचाईत झाली. पण आपल्याकडे सुपीक डोक्यांची काही कमी नसल्यामुळे या ही प्रकरणातून मार्ग निघालाच.
एकदिवस श्री. रामजेठमलानींनी आपला दरवाजा उघडला आणि ते चक्रावून गेले. दारात सिल्विया आणि तिचे वकील श्री. रजनी पटेल उभे होते. त्यांनी एक प्रस्ताव आणला होता.
“सरकार प्रताप भाई आणि कावसला दोघांनाही माफ करायला तयार होते आणि हे दोन्हीही समाजांना न दुखवता करायचे होते. जर मॅमी आहुजानी कावसला माफ करून हा दावा मागे घेतला तर कावसच्या दयेच्या अर्जावर विचार होऊ शकतो. प्रताप भाईचा जो अर्ज अगोदरच राज्यपालांकडे पोहोचला आहे त्याबद्दल सहानभुतीपुर्वक विचार होऊ शकतो. फक्त मॅमी आहूजाला पटवण्याचे काम, ते श्री जेठमलानी यांनी करावे.”
श्री. राम जेठमलानी यांना मॅमी आहूजांना हे पटवण्यात यश आले. मग कावस नानावटी आणि प्रताप भाई यांना दोघांना एकाच दिवशी माफ करून निर्लज्जपणे सोडण्यात आले.
कावस नानावटी आणि त्याचे कुटुंब रातोरात देश सोडून परागंदा झाले. त्यांनी नाव बदलले आणि कॅनडामधे स्थाईक झाले त्यांचा परत पत्ता लागला नाही.
या सगळ्या प्रकरणात भारतात ज्युरींची मते ही दबाव टाकून बदलता येतात हे सिध्द झाल्यामुळे ही पध्दत कायमची त्यागण्यात आली. या खटल्यामुळे मला वाट्ते कॅनडा, आणि अजून एक दोन देशातून ही पध्दत नष्ट झाली. हे सगळे वाचल्यावर काही प्रश्न मनात उपस्थित होतात ते असे –
१ या प्रकरणात न्याय झाला का ?
२ ज्या न्यायधिशाच्या बाबतीत त्याने जुरींना चुकीची माहिती दिली असे सिध्द केले गेले त्याचे काय ?
३ एखाद्या सामान्य माणसाच्या हातून असा गुन्हा घडला असता तर त्याला कॅनडामधे सरकारने पाठवू दिले असते का ?
४ सरकारवर दबाव टाकून आपल्याला हवा तसा निकाल लावून घेता येतो याचा पायंडा पं नेहरूंनी पाडला का ?
५ एका गुन्हेगाराला माफ करण्यासाठी दुसरर्या गुन्हेगारालाही माफ करणे हे कुठल्या न्यायदानाच्या पध्दतीत बसते ?
आपल्या इथे शेवटची ज्युरींच्या समोर सुनावणी झाली ती आपण बघितली. हा खटला शेवटचाच. आपण बघितले जनमानसाची मानसिकता, भावना याचा अतिरेक झाला की ज्युरींचा निर्णय इकडून तिकडे लंबका सारखा हेलकावे खाऊ शकतो.
पण आजचा आपला मुख्य विषय हा नाही. ज्युरीची पध्दत चालू असताना त्याच काळात घडलेली एक घटना आणि त्या संदर्भात ज्युरींनी चालवलेला एक खटला हा या लेखाचा विषय आहे. या खटल्यात ज्यूरींच्या मनातली वादळे, त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा कसा परिणाम होतो हे आपल्याला नाट्यस्वरुपात दिसणार आहे.
चला तर आपण प्रत्यक्ष ते नाट्यच बघूया –
न्यायाधीश :
या शतकातील फौजदारी न्यायालयात चालवलेल्या गेलेल्या अत्यंत महत्वाच्या खटल्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. थंड डोक्याने व विचारपूर्वक, जाणून बुजून केलेला खून अथवा हत्या हा फौजदारी कायद्यातील अत्यंत गंभीर असा आरोप आहे हे आपण सर्व जाणताच. दोन्ही पक्षाचा प्रदीर्घ आणि विद्वत्तापूर्ण असा युक्तिवाद आपण गेले सहा दिवस ऐकलात. या खटल्याच्या सुरवातीला एका माणसाची हत्या झालेली आहे आणि आता एका माणसाच्या आयुष्यापुढे प्रश्नचिन्ह उभे आहे. १०० दोषी सुटले तरी चालतील पण एकही निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये या तत्वाला अनुसरून आपण या युक्तिवादाची चिरफाड कराल अशी या न्यायालयाची अपेक्षा आहे. पण त्याच बरोबर तो दोषी असेल तर त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा व्हायला पाहिजे यात आपल्या मनात कसलीही शंका नसेल अशी मी आशा करतो.
दोषी किंवा निर्दोष या पैकी एकच निर्णय आणि तो सुध्दा एकमताने आपल्याला द्यायचा आहे. अत्यंत प्रामाणिकपणे व गंभीरपणे आपण या न्यायप्रक्रियेत सहभागी व्हाल यात मला शंका नाही.
कारकून :
सर्व ज्युरी सभासदांनी कृपया आपल्या दालनात जावे..............................
या पुढचे नाटक एका वेगळ्या धाग्यावर “एक विरूध्द अकरा” या नावाने वाचायला, अनुभवायला मिळेल.
या नाटकाचा मुळ लेखक आहे श्री. रेजिनाल्ड रोज” आणि नाटकाचे नाव आहे
“12 angry Men”................
क्रमश्: पण दुसर्या धाग्यावर.......
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
18 Nov 2010 - 11:38 am | मृत्युन्जय
“एक विरूध्द अकरा” या नावाने वाचायला, अनुभवायला मिळेल
एक रुका हुआ फैसला ची मूळ कथा काय? चित्रपट अफलातून आहे. कुठलाही प्रस्थापित कलाकार नसताना, कुठलीही ड्रामेबाजी न करता चित्रपट मस्त जमला आहे.
बाकी ज्युरीची सीस्टिम बेकार होती यात काही वादच नाही. अमेरिकेत बहुधा अजुनही अशी व्यवस्था आहे. जाणकार यावर योग्य ते भाष्य करु शकतील. पण अनेक खटल्यांमध्ये ज्युरींना कायद्याचे व्यवस्थित ज्ञान नसल्यामुळे अथवा त्यांची दिशाभूल करणे सोपे असल्यामुळे अथवा त्यांना फितवणे किंवा धमकावणे सोपे असल्यामुळनाकिंवा त्यांचे इगो चुचकारुन अथवा भडकावून निर्णय फिरवणे सोप्पे असल्यामुळे बर्याच खटल्यांमध्ये चुकीचे निर्णय दिले गेले आहेत हे सिद्ध झाले आहे. बाकी सगळ्या गोष्टी कायदेतज्ञांच्या बाबतीत पण होउ शकतात. पण कायद्याची जाण नसल्यामुळे जे प्रश्न उपस्थित होतात ते गंभीरे असतात.
18 Nov 2010 - 11:49 am | लॉरी टांगटूंगकर
जुरी ची निवड कशी करतात ???
18 Nov 2010 - 11:56 am | निखिल देशपांडे
वाचतोय..
१२ एंग्री मॅन आणि एक रुका हुवा फैसला दोन्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच आहे.
ज्युरीची पद्धत आपल्या कडे नाही पण पिडाकाकांचे अमेरिकेतला ज्युरी ड्युटीचा अनुभव आठवला.
18 Nov 2010 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार
पिडाकाकांचा लेखच आठवला सगळ्यात आधी. तसेच मिपावरच्या देवदत्त ह्यांच्या ह्या धाग्यावरील काही प्रतिक्रीयांमधुन '१२ अँग्री मॅन' विषयी अजुन माहिती मिळेल.
18 Nov 2010 - 12:54 pm | श्रावण मोडक
रंजक!!!
21 Nov 2010 - 4:24 pm | नितिन थत्ते
विकीपिडीयावरील या खटल्याच्या पानावर सुद्धा भाईप्रताप आणि कावसजीची सुटका यांचा संबंध जोडून दाखवलेला आहे. आणि विजयालक्ष्मी पंडित आणि नेहरू ही नावे घेतली गेली आहेत.
पण राज्यकर्त्यांना भाई प्रतापला सोडायचे होते म्हणून नानावटीला सोडणे भाग पडले असा जो अन्वयार्थ दिसतो तो बरोबर वाटत नाही. उलट नानावटीला सोडावे असे वाटत होते म्हणून भाई प्रतापच्या खटल्याचा वापर केला होता असे वाटते. याचे मला वाटणारे कारण असे....
भाई प्रतापने दयेचा अर्ज केला होता. त्या प्रकरणाची पुनर्चौकशी होऊन त्याला उगाच दोषी ठरवले गेले आहे असा निष्कर्षही आला होता. तेव्हा भाई प्रतापला तसेच सोडणे राज्यपालांना सहज शक्य होते. त्यासाठीची पुरेशी सामग्री सरकारजवळ होतीच. नानावटीला सोडणे ही भाई प्रतापला सोडण्यासाठीची प्रीकंडिशन असण्याचे काहीच कारण नव्हते.
तरीही हा फॉर्म्युला ठरवण्यामागे नानावटीला सोडण्याची इच्छा/दबाब हेच कारणीभूत असावेत. (पारशी सिंध्यांपेक्षा खूपच श्रीमंत आणि वजनदार होते)
21 Nov 2010 - 5:39 pm | जयंत कुलकर्णी
मला वाटते, नानावटीला सोडायचे असते तर सरकारला ज्युरींच्या निर्णयानंतरच सहज शक्य होते. घटनांचा क्रम बघितला तर हे लक्षात येईल की आपण म्हणता त्याच्या बरोबर उलटे होते. पं नेहरूनी जयंती शिपींग मधे जी भुमिका घेतली होती, ती बघता हे सहज शक्य आहे असे माणण्यास जागा आहे.
दुसरे म्हणजे कावस हा नेहरूंचे अतिनिकटचे सहकारी श्री कृष्ण मेनन यांच्याशी चांगला संबधीत होता. त्याला सोडायचे असते तर पं नेहरूंना आणि श्री. मेनन यांना सहज शक्य होते. पण बहुदा तसे नसावे कारण याच्यात कसलाही आर्थिक व्यवहार नव्हता. कावस मेला काय आणि जिवंत राहिला काय याचे सोयर सुतक दोघांनाही असायचे कारण नव्हते. आणि ते बरोबरही होते. तो आता सामान्य गुन्हेगार होता. पण प्रताप भाईंचे तसे नसावे राजकारणात त्यांचे चांगलेच वजन होते आणि सिंधी समाजाची एकगठ्ठा मते हे ही एक कारण होतेच. दुसरे म्हणजे ज्या दोन अधिकार्यांनी ती फाईल परत उघडली त्याच्यातल्या एकाचे नाव होते पेमास्टर हे बहुदा पारशी होते. त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे हे सगळे त्या क्षणापासून प्लॅन्ड होते असा संशय येण्यास भरपूर जागा आहे.
असो हा सगळा तर्क आहे त्यामुळे त्यालाही तेवढेच महत्व द्यायला लागेल :-)
आपल्याला सगळ्यांनी चांगलेच म्हणायला हवं या हट्टापोटी माणूस काहीही करू शकतो ( ते एक जबरी व्यसन आहे ) आणि पं नेहरूंना कुठल्याही प्रि-कंडिशन्ची आवश्यकता असेल असे मला वाटत नाही.
21 Nov 2010 - 5:00 pm | अप्पा जोगळेकर
पंडित नेहरु यांचा उल्लेख झाल्यानंतर तुमचा प्रतिसाद अपेक्षित होताच.
21 Nov 2010 - 7:47 pm | नितिन थत्ते
मग नको होता का द्यायला प्रतिसाद?
21 Nov 2010 - 7:18 pm | इन्द्र्राज पवार
"....निर्लज्जपणे सोडण्यात आले....."
~ श्री.जयंत कुलकर्णी यांच्या लागोपाठच्या दोन सुंदर धाग्यातील मला फार खटकलेले हे वाक्य....ज्याची काहीही आवश्यकता नव्हती. मूळ धाग्याचा हेतू (जो स्पष्टच आहे) एका गाजलेल्या खटल्याची, त्यामागील इतिहासासह, माहिती इथे देणे आणि घटनाक्रमाची कारणमीमांसा इतपतच अभिप्रेत होते, शिवाय सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेल्या या खटल्याच्या निकालावर मल्लीनाथी अपेक्षित नसते. [कदाचित 'निर्लज्जपणे सोडण्यात आले....' ही न्यायालयाचा अपमान ठरावा अशातर्हेची टिपणी आहे.]
कावस्+सिल्व्हिया+प्रेम = अटळ आणि भयावह शेवट...इतके सरळधोपट हे गणित होते, जे करंजियाच्या ब्लिट्झने रस्तोरस्ती करून (पांच का दस...पांच का दस....टाईप) अकारण दोन समाजाच्या संबंधावर रान उठविले आणि अगदी उच्चपदस्थांनासुद्धा यात (कदाचित इच्छा नसतानाही.....उगाच "कावस हा मेनन यांच्या फार जवळचा आणि मेनन यांच्या शब्द नेहरू कधीही पडू देत नव्हते..." असल्या टॅब्लॉईड धाटणीच्या सवंग विधानांना काही अर्थ नसतो. कावस काय खुशवंत काय हे त्या काळातील लंडन हायकमिशनमधील अनेक सबऑर्डिनेट नोकरांपैकी एक...त्यांना मेनन यांनी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले असे बिलकुल नसते.) लक्ष घालावे लागले....मग पुढे जे काही घडले त्याचा उहापोह श्री.कुलकर्णी यांच्या रीपोर्टिंग मध्ये वर केला आहेच. हे प्रकरण आणि यातील घटनाक्रमाचे अक्षरनअक्षर मला त्याचप्रमाणे इथल्या अनेक सदस्यांनी माहिती असूनही चर्चेसाठी एक चांगला धागा आला म्हणून मला आनंद झाला होता आणि मी दोन्ही भाग लक्षपूर्वक वाचले...जे आवडले ते अगोदर कळविले होतेच....आणि म्हणूनच जे आवडले नाही ते इथे कळविणे मला खूप गरजेचे वाटते, ही बाब कृपया श्री.जयंतरावांनी समजून घ्यावी.
कहाणी पुढे ~~
कॅनडाला स्थलांतर झाल्यावर नानावटी कुटुंबियांनी जवळपास अज्ञातवासातच राहणे पसंत केले. कावस नानावटींचा २००३ मध्ये मृत्यु झाला, वयाच्या ७८ व्या वर्षी. तत्पूर्वी काही शोधपत्रकारांनी त्यांच्याशी पत्रव्यवहाराच्या माध्यमाने संपर्क साधला असता (त्यावेळी ते ७७ वयाचे होते) त्यांनी नम्रपणे लेखी विनंती केली की, "ते प्रकरण आमच्या आयुष्यातील एक दु:खद घटना आणि जी आम्ही विसरू इच्छितो, सबब या विषयावर कृपया मी चर्चा कदापिही करू शकत नाही. क्षमस्व !"
आपणही इथे ती फाईल बंद केलेलीच ठीक.
इन्द्रा
21 Nov 2010 - 7:59 pm | जयंत कुलकर्णी
जर हे सगळे खरे असेल तर, दोन गुन्हेगारांना सोडून देण्यात आले हे खरे नाही काय ? असे सामान्य माणसाला सोडून देण्यात आले असते का ? आपण हे लक्षात घ्या की हे झाले ते न्यायालयाचा निकाल झाल्यावर ! त्यामुळे खरे तर त्या सोडून देण्यात न्यायालयाचा काहीच संबंध नाही. मी जे या बद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत याची उत्तरे आपल्याकडे असतील तर कृपया द्यावीत. ( त्या अर्थाने मी तो शब्द वापरला ).
//कावस्+सिल्व्हिया+प्रेम = अटळ आणि भयावह शेवट...इतके सरळधोपट हे गणित होते, जे करंजियाच्या ब्लिट्झने रस्तोरस्ती करून (पांच का दस...पांच का दस....टाईप) अकारण दोन समाजाच्या संबंधावर रान उठवि////
बॉटम लाईन काय आहे ?..............हे आपण लिहीले आहे तेथपर्यंत सरळधोपटच होते. करंजियांनी पारशी समाजाच्या भावनेला हात घालून रान उठवले, सिंधीसमाजाने ओळखीचा फायदा करून घेतला. न्यायाची ऐसी तैशी !........
शेवटचे वाक्य आपण मला उद्देशून लिहीले आहे काय ? तसे असेल तर सांगण्यास आनंद वाटतो की अशा अनेक फायली बंदच आहेत.
21 Nov 2010 - 8:37 pm | जयंत कुलकर्णी
संपादकाना विनंती की हा शब्द योग्य वाटत नसेल तर तो काढला तरी चालेल कारण त्याने काहीच काही फरक पडत नाही. कृपया योग्य तो बदल करावा ही विनंती.
22 Nov 2010 - 8:41 am | अप्पा जोगळेकर
कदाचित 'निर्लज्जपणे सोडण्यात आले....' ही न्यायालयाचा अपमान ठरावा अशातर्हेची टिपणी आहे.
कोणत्याही गोष्टीचे, घटनेचे वस्तुनिष्ठ परीक्षण करत असताना असंबंधित व्यक्ती, संस्था इत्यादी बाबींवर टीका टिप्पणी करण्यात अयोग्य असे काय आहे ? तुम्हाला जर ही टीका टिप्पणी मान्य नसेल तर ती खोडून काढण्याचे स्वातत्र्य तुम्हाला आहेच आणि ते तुम्ही वेळोवेळी अतिशय चांगल्या पद्धतीने करत असताच. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की न्यायालय असो, राज्यसंस्था असो, विशिष्ट धर्म असो किंवा एखादा आदरणीय महापुरुष असो; एखादी गोष्ट स्वच्छपणे चुकीची आहे असे वाटत असेल तर तसे ठणठणीतपणे सांगितले पाहिजे. मला वाटत श्री. कुलकर्णी यांनी तेच केले आहे. आणि निर्लज्ज जा शब्द अश्लाघ्य आहे असेही वाटत नाही.
21 Nov 2010 - 7:46 pm | इन्द्र्राज पवार
".....आपणही इथे ती फाईल बंद केलेलीच ठीक...."
~ श्री.जयंत जी....तुमच्या प्रतिसादाला उत्तर देण्यापूर्वी 'फाईल' संदर्भातील खुलासा करणे गरजेचे वाटत आहे. वरील वाक्य फक्त "तीन वर्षानंतर सुटका" याच्याशीच संबंधित आहे. लेखातील अन्य मुद्दे आणि विचाराशी नाही.
गैरसमज झाला असेल तर क्षमस्व !
इन्द्रा
21 Nov 2010 - 8:06 pm | जयंत कुलकर्णी
नाही हो गैर समज वैगरे काही नाही. मला खटकणारा मुद्दा हाच आहे की समजा उद्या अशाच गुन्हेगाराला सोडले तर काय म्हणायचं ? करंजियांच्या खेळाला सरकार बळी पडले. खरे तर कावसला त्या दोघांचे संबंध होते याची पूर्ण जाणीव होती, मग त्यात एकटा प्रेम आहूजा दोषी कसा ? मग असे म्हणायच का की शिक्षा फक्त प्रेम आहूजाला मिळाली आणि ती सुध्दा मृत्यूदंडाची ? आणि याला कारण कोण ?
:-)
21 Nov 2010 - 8:25 pm | अविनाशकुलकर्णी
ये रास्ते है प्यारके...
हा सिनेमा निघला होता नानावटी खटल्यावर....सुनिल दत्त होता हिरो..
त्यातले..ये रास्ते है प्यारके.. ...चलना संभल संभल के...गाणे बिनाका वर हिट्ट झाले होते
22 Nov 2010 - 12:38 pm | इन्द्र्राज पवार
श्री.जयंत कुलकर्णी आणि श्री.अप्पा जोगळेकर यांनी मांडलेल्या 'निर्लज्ज' प्रयोजन मतावर एकत्रच उत्तर देत आहे.
१) एक बाब स्पष्ट केली पाहिजे की, भाई प्रताप हे गुन्हेगार नव्हते तर त्यांच्यावर चुकीने लायसन्स प्रकरणात ठपका ठेवण्यात आला होता (जे पुढे उघडकीसही आले) व शिक्षा झाली होती...ती ते भोगत होते. नानावटी प्रकरण झाले नसते तरी पुढे केव्हातरी त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलीच असती त्यामुळे ते गुन्हेगार या अभिनामास पात्र होत नाहीत. नानावटींच्याबाबतीत तसे म्हणता येणार नाही. कारण हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने त्यांनी भारतीय दंडविधान कलम ३०२ अंतर्गत दोषी करार केले आणि ग्राह्य असलेली शिक्षा सुनावली. इथे एक अध्याय संपतो.
२) तीन वर्षाच्या कैदेनंतर त्यांना माफी मिळाली व ते लागलीच सिल्विया आणि दोन्ही मुलांसह कायमच्या वास्तव्यासाठी कॅनडाला निघून गेले व २००३ साली वयाच्या ७८ व्या वर्षी त्याच देशात निधन पावले. त्या 'माफी प्रकरणावर' जसे श्री.कुलकर्णी यानी लिहिले तद्वतच अन्य माध्यमांनीही त्या काळात केसच्या समाप्तीनंतर खूप काही लिहिले असल्याने व तीवर झालेल्या मंथनाचा आढावा घेतला असता असे दिसते की, समाजातील एक फार मोठा हिस्सा [ज्यात केवळ पारशीच नव्हे तर हिंदूही होते, राजकीयच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही होते - असतील -] कमांडर नानावटीना थेट अर्थाने 'खूनी' मानत नव्हते....'गुन्हेगार' हे विशेषनामही त्याना लावायला कुणी धजत नव्हते. जनतेच्या नजरेत त्या त्रिकोणातील खलनायक होता 'प्रेम आहुजा' ज्याला जी शिक्षा मिळायची ती मिळाली असाच सार्वत्रिक समज होता. तसे पाहिले तर 'सिल्व्हिया' देखील न शिक्षा झालेली गुन्हेगारच. पण आय.पी. सेक्शन ४९७ नुसार "विवाहीत स्त्रीबरोबर नवर्याशिवाय अन्य पुरूषाने समागम केल्याचे आढळले आणि तशी तक्रार नवर्याकडून नोंदविण्यात आल्यास तो दुसरा इसम गुन्ह्यास पात्र मानला जाईल व त्यास ५ वर्षाची दंडासह शिक्षा होईल. मात्र तसा समागम बलात्कार व्याख्येखाली येणार नाही. त्यात सहभागी असलेल्या त्या पत्नीस शिक्षेस पात्र मानले जाणार नाही कारण तो सहसंमतीचा समागम असेल." अशी व्याख्या त्या कलमात असली तरी सामाजिक व्याख्येत सिल्व्हिया ही खर्या अर्थाने 'निर्लज्ज' म्हणावी लागेल....जरी ती कायद्यापासून बचावली असली तरी.
३) सुप्रीम कोर्टाने कावस नानावटी याना दोषी मानले [कायद्यातील तरतुदीनुसार] तरीदेखील अगोदरच्या कोर्टात, जिथे 'ज्युरी सिस्टीम' अस्तित्वात होती...तेथे ८ विरूद्ध १ अशा बहुमतांनी त्याना 'निर्दोष' सोडावे असाच निकाल दिला होता.....कावसने 'कोल्ड ब्लडेड मर्डर' केला आहे हे सिद्ध होऊनदेखील....मग या ८ ज्युरींनी 'निर्लज्ज' पणे त्यांची मुक्तता केला असे आपण म्हणू शकतो का?
४) तीन वर्षानंतर जे काही पोलिटिकल मशिनेशन झाले त्याचा परिपाक म्हणून दोघांनाही स्टेट गव्हर्नर यांनी माफी देऊन मुक्तता केली असली तरी कायद्याच्या भाषेत एक जबरदस्त पाचर होती जी निघाल्याशिवाय गव्हर्नरमॅडम माफीनाम्यावर सहीच करू शकत नव्हत्या....त्या पाचरीचे नाव होते "मॅमी आहुजा"....मृत प्रेम आहुजाची बहीण. केस तिच्या नावाने दाखल झाल्यामुळे तिच्या संमतीशिवाय माफी प्रस्तावालाही काही अर्थ येणार नव्हता. तीन वर्षाच्या कालावधीत पुलाखालून बरेचसे पाणीही वाहून गेल्यामुळे श्रीमती मॅमीनीही 'झाले ते पुष्कळ' समजून राम जेठमलानींच्या सल्ल्यानुसार त्या माफीनाम्यासाठी आवश्यक असणारे No Objection Certificate सही करून दिले.
इतपत प्रवास झाल्यानंतर आता आपण त्या माफी प्रकरणाला 'निर्लज्जपणे सोडण्यात आले' असे म्हणू नये एवढेच माझे म्हणणे.
मी असे लिहितो म्हणजे कावस नानावटी हा कुणी पंख छाटलेला देवदूत होता असे माझे बिलकुल मत नाही. पण त्याचप्रमाणे प्रेम आहुजा हा देखील एक सद्गुणाचा पुतळा होता आणि त्याच्या मृत्युने सिंधी समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली असेही नाही. हा त्रिकोणच एकमेवाद्वितीयम असा झाल्याने त्याचा रंगही वेगळाच आहे. "मिसळपाव" वरील सर्वच सदस्य रूढार्थाने सुशिक्षित आहेत, विविध पदावर, व्यवसायात कार्यरत आहेत, कायद्याची जाण असलेले आहेत, नसेल तर ते जाणून घेण्याची पात्रता बाळगून आहेत, असे असताना एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करताना त्यातील भाषा संयमित असावी हीच माझी भूमिका होती आणि आहे.
इन्द्रा
22 Nov 2010 - 1:19 pm | जयंत कुलकर्णी
:-)