कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.
कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट. भाग - १
हा खटला जेव्हा न्यायालयात उभा राहिला तेव्हा सरकारी वकील होते श्री. चंद्रचूड आणि त्यांना मदत होती अर्थातच श्री. रामजेठामलानींची.
हा खटला दाखल करून घ्यायच्या अगोदर सरकारला हे सिध्द करून दाखवणे भाग होते की न्यायधिशांनी ज्युरींची दिशाभूल होऊ दिली. यात बिचार्या श्री. मेहता नावाच्या न्यायाधिशांचा उगचच बळीचा बकरा झाला. असो. ते सिध्द करण्यासाठी खलील मुद्दे विचारात घेण्यात आले.
१ जेव्हा कावस प्रेम आहूजाच्या घरी गेला तेव्हा त्याची त्याच्याशी झटापट झाली आणि त्या दरम्यान अपघाताने गोळी ऊडून प्रेम आहूजाला लागली. ज्या अर्थी हे कावसचे म्हणणे होते त्यामुळे हे सिध्द करण्याची जबाबदारी कावसवर पडते. ज्युरींना याची कल्पना देण्यात आली नव्हती.
२ दुपारी १ वाजता सिल्व्हियाने जो गौप्यस्फोट केला त्यामुळेच हे झाले असे ज्युरींना स्पष्ट करण्यात आलेले नाही. एखादी तिसरी व्यक्तीही एखाद्या व्यक्तीला खुन करण्यास प्रवृत्त करू शकते असा शेरा न्यायधिशांनी मारायची काही आवश्यकता नव्हती.
३ ज्युरींना “ Beyond reasonable doubt” या वाक्याचा अर्थ सविस्तरपणे सांगितला गेला नव्हता.
ही कारणे ग्राह्य धरून ज्युरींचा निर्णय रद्दबादल ठरवला गेला आणि परत नव्याने खटला चालू झाला.
कावसच्या वकिलांनी परत तेच मुद्दे मांडले.
अर्थात त्या मुद्द्यांची श्री. चंद्रचूडांनी सहज चिरफाड केली. त्यातले महत्वाचे मुद्दे असे.
१ जर झटापट झाली असती तर प्रेम आहूजाच्या कमरेला टॉवेल राहिला नसता. पंचनाम्यात तो तसाच प्रेतावर गुंडाळलेला होता असे नमूद केलेले आहे.
२ प्रेम आहूजाची जी मोलकरीण होती तिने तिच्या साक्षीत असे सांगितले आहे की तिने लागोपाठ तीन आवाज ऐकले. त्यामुळे झटापटीचा प्रश्नच येत नाही.
३ ती जर झटापट झाली असती तर मॅमी आहूजा जी प्रेम आहूजाची बहीण होती आणि तेथेच होती, तिने जेव्हा हा आवाज ऐकला तेव्हा “ हे काय चालले आहे ? “असा प्रश्न विचारला नसता. तो प्रश्न ऐकल्यावर कावस शांतपणे तेथून चालता झाला होता.
४ जर रागाच्या भरात हा गुन्हा घडला असं म्हणायचे असेल तर त्याने हा गुन्हा लगेच करायला हवा होता. शांतपणे संध्याकळी नाही.
५ डि.सि.पी. लोबो यांनी अशी साक्ष नोंदवली आहे की जेव्हा कावस त्यांच्या ऑफिसमधे दाखल झाला तेव्हा त्याने आपण खून केल्याची कबुली दिली होती.
६ नौदलाच्या नोंदीच्या वहीत कावसने रिव्हॉल्व्हर व त्याची काडतुसे केव्हा घेतली याची नोंद आहेच.
७ कावसचे मन थार्यावर नव्हते असेही म्हणता येत नाही कारण गुन्हा केल्यावर त्याने शांतपणे आपली कार राजभवनाकडे नेली त्या वेळी ड्युटीवर असलेल्या प्रोव्होस्ट मार्शलला हे सांगितले आणि त्याच्या सल्ल्यानुसार श्री लोबो यांना भेटायला गेला.
८ श्री लोबो यांच्या येथे स्वत:च्या नावाच्या स्पेलींगमधली चुकही दुरूस्त केली.
या वरून हेच सिध्द होते की गुन्हेगाराने हा खून थंड डोक्याने, विचार करून केलेला आहे.
यासाठी शिक्षा होती मृत्यूदंड किंवा जन्मठेप.
कावसची नोकरी गेली, त्याचा हुद्दा काढून घेण्यात आला. त्याने मग सर्व्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला पण तेथेही हाच निकाल लागला.
आणि शिक्षा ठोठवण्यात आली “ जन्मठेप”.
शिक्षेची तीन वर्षे झाली होती.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते म्हणून कावस हा भारतात जन्मला होता. १९६०च्या सुमारास एक भाई प्रताप नावाचा सिंधी व्यापारी पाकिस्तानातून फाळणीमुळे भारतात आला होता. त्याने सिंधी लोकांसाठी खूप काम केले होते त्यामुळे तो एक राजकारणीही होता व त्याची व पं नेहरू यांची चांगलीच ओळख होती. या व्यापार्याला आयातीसाठी बरेच परवाने मिळाले होते. त्या काळात लायसेन्सराजमूळे या परवान्यांवर सरकारी बारीक नजर असायची. तर कुठल्यातरी एका प्रकरणात हा भाई सापडला आणि त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्यांचे वकील होते श्री राम जेठमलानी – परत सिंधीच. पण प्रतापभाईंना या तरूण रक्ताच्या वकीलाची खात्री वाटेना म्हनून त्यांनी याला दुय्यम भुमिका देऊन एक अनुभवी वकील नेमला. दुर्दैवाने या ही वकीलाला यश न येऊन त्याला १८ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली. ही भोगण्याची त्याची मुळीच तयारी नसल्यामुळे त्याने आपली पं नेहरुंशी असलेली ओळख पणाला लावली.
प्रतापभाईला तर सोडायचे होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या श्रीमती विजयालक्ष्मी पंडित. या कोण होत्या हे सांगायची गरज नाही. शेवटी प्रतापभाईनी नेहरूंकडचे आपले वजन वापरून महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे आपला दयेचा अर्ज दाखल केला. यामुळे ही फाईल परत उघडली गेली. या फाईलचा अभ्यास दुर्दैवाने मला वाटते दोन पारशी गृहस्थांकडे होता. ( खात्री नाही ). त्यांनी असा शोध लावला की ती सगळी चौकशी चुकीची आहे. प्रतापभाईंवर हा गुन्हा दाखल करायची काही आवश्यकताच नव्हती. मग पूढचा मार्ग सोपा होता. त्याने एक दयेचा अर्ज द्यायचा आणि त्याला सोडून द्यायचे. पण इथे सरकारची जरा पंचाईत झाली. या सिंध्याला सोडला तर कावसचे काय ? सर्व समाजाचे आणि पारशी समाजाचे हे म्हणणे तर होतेच की कावसला ही शिक्षा फार होते आहे. तो काही सरावलेला गुन्हेगार नाही. झाली तेवढी शिक्षा बास झाली आणि त्याला माफी द्यावी.
सिंधी आणि पारशी समाजाच्या या संघर्षात सरकारची फारच पंचाईत झाली. पण आपल्याकडे सुपीक डोक्यांची काही कमी नसल्यामुळे या ही प्रकरणातून मार्ग निघालाच.
एकदिवस श्री. रामजेठमलानींनी आपला दरवाजा उघडला आणि ते चक्रावून गेले. दारात सिल्विया आणि तिचे वकील श्री. रजनी पटेल उभे होते. त्यांनी एक प्रस्ताव आणला होता.
“सरकार प्रताप भाई आणि कावसला दोघांनाही माफ करायला तयार होते आणि हे दोन्हीही समाजांना न दुखवता करायचे होते. जर मॅमी आहुजानी कावसला माफ करून हा दावा मागे घेतला तर कावसच्या दयेच्या अर्जावर विचार होऊ शकतो. प्रताप भाईचा जो अर्ज अगोदरच राज्यपालांकडे पोहोचला आहे त्याबद्दल सहानभुतीपुर्वक विचार होऊ शकतो. फक्त मॅमी आहूजाला पटवण्याचे काम, ते श्री जेठमलानी यांनी करावे.”
श्री. राम जेठमलानी यांना मॅमी आहूजांना हे पटवण्यात यश आले. मग कावस नानावटी आणि प्रताप भाई यांना दोघांना एकाच दिवशी माफ करून निर्लज्जपणे सोडण्यात आले.
कावस नानावटी आणि त्याचे कुटुंब रातोरात देश सोडून परागंदा झाले. त्यांनी नाव बदलले आणि कॅनडामधे स्थाईक झाले त्यांचा परत पत्ता लागला नाही.
या सगळ्या प्रकरणात भारतात ज्युरींची मते ही दबाव टाकून बदलता येतात हे सिध्द झाल्यामुळे ही पध्दत कायमची त्यागण्यात आली. या खटल्यामुळे मला वाट्ते कॅनडा, आणि अजून एक दोन देशातून ही पध्दत नष्ट झाली. हे सगळे वाचल्यावर काही प्रश्न मनात उपस्थित होतात ते असे –
१ या प्रकरणात न्याय झाला का ?
२ ज्या न्यायधिशाच्या बाबतीत त्याने जुरींना चुकीची माहिती दिली असे सिध्द केले गेले त्याचे काय ?
३ एखाद्या सामान्य माणसाच्या हातून असा गुन्हा घडला असता तर त्याला कॅनडामधे सरकारने पाठवू दिले असते का ?
४ सरकारवर दबाव टाकून आपल्याला हवा तसा निकाल लावून घेता येतो याचा पायंडा पं नेहरूंनी पाडला का ?
५ एका गुन्हेगाराला माफ करण्यासाठी दुसरर्या गुन्हेगारालाही माफ करणे हे कुठल्या न्यायदानाच्या पध्दतीत बसते ?
आपल्या इथे शेवटची ज्युरींच्या समोर सुनावणी झाली ती आपण बघितली. हा खटला शेवटचाच. आपण बघितले जनमानसाची मानसिकता, भावना याचा अतिरेक झाला की ज्युरींचा निर्णय इकडून तिकडे लंबका सारखा हेलकावे खाऊ शकतो.
पण आजचा आपला मुख्य विषय हा नाही. ज्युरीची पध्दत चालू असताना त्याच काळात घडलेली एक घटना आणि त्या संदर्भात ज्युरींनी चालवलेला एक खटला हा या लेखाचा विषय आहे. या खटल्यात ज्यूरींच्या मनातली वादळे, त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा कसा परिणाम होतो हे आपल्याला नाट्यस्वरुपात दिसणार आहे.
चला तर आपण प्रत्यक्ष ते नाट्यच बघूया –
न्यायाधीश :
या शतकातील फौजदारी न्यायालयात चालवलेल्या गेलेल्या अत्यंत महत्वाच्या खटल्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. थंड डोक्याने व विचारपूर्वक, जाणून बुजून केलेला खून अथवा हत्या हा फौजदारी कायद्यातील अत्यंत गंभीर असा आरोप आहे हे आपण सर्व जाणताच. दोन्ही पक्षाचा प्रदीर्घ आणि विद्वत्तापूर्ण असा युक्तिवाद आपण गेले सहा दिवस ऐकलात. या खटल्याच्या सुरवातीला एका माणसाची हत्या झालेली आहे आणि आता एका माणसाच्या आयुष्यापुढे प्रश्नचिन्ह उभे आहे. १०० दोषी सुटले तरी चालतील पण एकही निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये या तत्वाला अनुसरून आपण या युक्तिवादाची चिरफाड कराल अशी या न्यायालयाची अपेक्षा आहे. पण त्याच बरोबर तो दोषी असेल तर त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा व्हायला पाहिजे यात आपल्या मनात कसलीही शंका नसेल अशी मी आशा करतो.
दोषी किंवा निर्दोष या पैकी एकच निर्णय आणि तो सुध्दा एकमताने आपल्याला द्यायचा आहे. अत्यंत प्रामाणिकपणे व गंभीरपणे आपण या न्यायप्रक्रियेत सहभागी व्हाल यात मला शंका नाही.
कारकून :
सर्व ज्युरी सभासदांनी कृपया आपल्या दालनात जावे..............................
या पुढचे नाटक एका वेगळ्या धाग्यावर “एक विरूध्द अकरा” या नावाने वाचायला, अनुभवायला मिळेल.
या नाटकाचा मुळ लेखक आहे श्री. रेजिनाल्ड रोज” आणि नाटकाचे नाव आहे
“12 angry Men”................
क्रमश्: पण दुसर्या धाग्यावर.......
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
“एक विरूध्द अकरा” या नावाने
आवडतय
वाचतोय.. १२ एंग्री मॅन आणि एक
+१
रंजक
विकीपिडीयावरील या खटल्याच्या
मला वाटते, नानावटीला सोडायचे
पंडित नेहरु यांचा उल्लेख
शंका
नको असलेला उल्लेख....!!
जर हे सगळे खरे असेल तर, दोन
संपादकाना विनंती की हा शब्द
कदाचित 'निर्लज्जपणे सोडण्यात
फाईल....!
नाही हो गैर समज वैगरे काही
ये रास्ते है प्यारके... हा
भाषेचे महत्व
(विषय दिलेला नाही)