काही महिन्यांपुर्वीची गोष्ट. शनिवारची सकाळ, म्हणजे तसे दहा वाजून गेलेले, पण तरीही ती सकाळच. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ऑफिसात इमर्जन्सी रिलीजवर काम करून, आयटीतला माणूस झोपू शकेल तितपत, ढाराढूर झोपलेला बंडू रस्त्यावरच्या वाहनांच्या कर्कश कलकलाटाने जागा झाला. बिछान्यावर पडल्या पडल्याच त्याने कानोसा घेतला. स्नेहलता आयटीत असल्यामुळे स्वयंपाकघरातून पोहे-उप्पीट वगैरेचा खमंग वास येणे शक्य नाही हे माहिती असूनही उगाचच वेडी आशा लावून त्याने एक खोल श्वास घेतला. अपेक्षेप्रमाणे अपेक्षाभंग झाल्यावर किमान एक आयता चहा तरी आज पदरात पाडून घ्यावा म्हणून त्याने खास ठेवणीतला लाडिक स्वर काढून हाक मारली,
"स्नेहूऽऽऽ", आणि थोडं थांबून, "ए, स्नेहाऽऽऽ".
दोन-पाच मिनीटे गेली तरी काहीच उत्तर नाही हे बघून चरफडत बंडू उठला आणि झकत स्वतःच चहा करून घ्यायला किचनकडे निघाला. स्टडीवरून जाताना त्याने दारातून आत पाहिले तेव्हा ओले केस टॉवेलात गुंडाळलेली आणि अंगात बेदिंग गाऊन घालून स्विवेलिंग चेअरवर बसून कंम्प्युटरचा कीबोर्ड बडवत मैत्रिणीशी चॅट करणारी स्नेहलता त्याला दिसली. बंडू दारात उभा राहून पाहतोय हे तिच्या गावीही नव्हते. खुदूखुदू हसत ती भराभर काही तरी टंकत होती. दोन मिनीटे हताशपणे तिकडे बघून बंडूने खांदे उडवले आणि चहा करायला निघून गेला.
बंडूचा चहा करून झाला तरी स्नेहलताचं चॅटींग काही संपलं नव्हतं. तिच्या वाटेचा चहा भांड्यात झाकून ठेवून त्याने आपला कप घेतला आणि मग आपला आयफोन घेऊन तो टेरेसवरच्या रिक्लाईनरवर जाऊन बसला. मन्या आणि मोहनने ढकललेले दोनचार फनी व्हिडिओज पाहत पाहत तो चहाचे घुटके घेत राहिला. त्याचा चहा संपता संपता स्नेहलता अखेर स्टडीतून बाहेर आली आणि चहा तयार असल्याबद्दल किंचितही आश्चर्य किंवा आनंद व्यक्त न करता तिचा कप भरून आली आणि बंडूसमोर बसली.
"आज कुठे जाऊ या जेवायला? ", बसल्या बसल्या तिने प्रश्न फेकला.
"तू म्हणशील तिकडे", बंडू आयफोनवरची नजर न उचलता म्हणाला.
त्या नंतर चहा संपवून कपडे बदलायला जाईपर्यंत पाच-दहा मिनीटे ती रेस्टॉरंटस् आणि क्विझिन्स वगैरेवर काहीतरी बोलत होती असं बंडूला वाटलं. ती गेल्यावर त्याने इमेल बंद करून फेसबुकचे अॅप उघडले. फेसबुक उघडल्या उघडल्या सगळ्यात वरती त्याला स्नेहलताचा स्टेटस अपडेट दिसला. तिने लिहीलं होतं 'पिंक', अर्थातच इंग्रजीतला. बंडूला काही समजलं नाही पण फार विचार न करता तो इतरांचे अपडेटस् पाहू लागला. दोनचार फालतू अपडेटस् पाहिल्यावर त्याला मन्याच्या बायकोचं रागिणीचं स्टेटस दिसलं, "ब्लॅक". मित्रमंडळातल्या आणखी दहाबारा महिलासदस्यांनीही असेच काही काही रंग लिहीले होते. बऱ्याच गुलाबी होत्या, काही ब्लॅक, काही व्हाईट तर काहीं हिरव्यापिवळ्याही झाल्या होत्या. बंडूला आता फारच गंमत आणि उत्सुकता वाटू लागली होती. त्याने प्रयत्नपूर्वक ते लक्षात ठेवून लंचला जाताना स्नेहलतेला विचारलं देखील, पण तिने ताकास तूर लागू दिला नाही. नुसतीच गालात जीभ घोळवत हसत राहिली. बंडूने हरतऱ्हेने प्रयत्न केले पण तिने सांगितलं नाही ते नाहीच. आता बंडू चांगलाच इरेला पडला आणि त्यात आणखी नवीन रंगीत अपडेटस् ची भर पडतच होती. त्याने संध्याकाळी मन्याला फोन केला आणि त्याला विचारलं, पण मन्यालाही काहीच पत्ता नव्हता. तो दिवस असाच गेला. संध्याकाळपर्यंत त्याच्या मित्रांच्या बायका, त्याच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी आणि एवढंच काय ऑफिसमधल्या कलिग्जनीही एक एक रंग टाकला होता. रात्री टीव्ही पाहायाला बसला तरी बंडूचे लक्ष त्यात लागेना शेवटी चक्क अकरा वाजताच टीव्ही बंद करून बंडू स्टडीत जाऊन कंप्युटरसमोर बसला. बराच विचार करूनही एखादी गोष्ट कळाली नाही तर करण्यासारखी एकच गोष्ट त्याला माहिती होती. त्याप्रमाणे त्याने गूगलवर जाऊन फेसबुक, कलर, लेडीज वगैरे जेवढी संगत त्याला लागत होती तेवढे सगळे शब्द टाकले आणि सर्च मारला. गूगलने दिलेले रिझल्टस पाहून तो तीनताड उडालाच आणि हे सगळं ब्रेस्ट कॅन्सरच्या अवेअरनेससाठी चाललं आहे हे वाचून त्याने कपाळावर हात मारून घेतला. घाईघाईने त्याने मन्याला फोन लावला.
"मन्या, तुला कळालं का? "
"काय? "
"अरे ते रंगाचं रे"
"नाही ब्वॉ. मी विचारच केला नाही. दुपारी झोपलो होतो मस्त योगीची बिर्याणी चापून. हॅ हॅ हॅ"
"ऐक मग. अरे ते ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी चालू केलेलं कँपेन आहे बायकांचं. "
"काय सांगतो. अरे पण फेसबुक वापरणार्या किती लोकांना ब्रेस्टकॅन्सरबद्दल माहिती नसेल आधीच? आणि हे रंग लावून कसं काय बॉ कळणार कॅन्सरबद्दल? "
"अरे ते रंग म्हणजे ना... ते रंग म्हणजे ना.... अरे ते एकेकीच्या ब्राचे कलर आहेत रे... "
दोन मिनीटे भयाण शांतता...
"म्हणजे स्नेहलताने आज पिंक....? ", मन्या हळूच म्हणाला.
"आणि रागिणीने ब्लॅक?.. ", शहारत बंडू बोलून गेला आणि दुसऱ्याच सेकंदाला त्यांनी फोन ठेवून दिला.
बंडूला फारच गिल्टी वाटत होतं पण कितीही प्रयत्न केले तरी त्याचा मेंदू त्याच्या इच्छेविरुद्ध काल्पनिक चित्रं तयार करतच राहिला. थकून बंडू उत्तररात्री झोपला पण स्वप्नातही त्याला नको त्या स्त्रिया येऊन नको ती माहिती देत राहिल्या. त्यानंतरही बरेच दिवस त्या अपडेटस् वाल्यांपैकी कोणतीही स्त्री समोर आली की "आज कोणता रंग असेल? " असा प्रश्न नकळत कुठूनतरी येऊन त्याला लाजवून जायचा.
बर्याच दिवसांनी आणि बर्याच प्रयत्नांनी बंडू सावरला पण एका कापडातून दुसया कापडाचा रंग ओळखायची सवय मात्र त्याला कायमचीच जडली.
त्यानंतर गेल्या आठवड्यातली गोष्ट. अशीच शनिवारची रम्य सकाळ. तसंच ते चॅटींग आणि तसाच तो चहा. हे सगळं नेहमीप्रमाणे घडून गेल्यावर बंडूने फेसबुक उघडले. स्नेहलतेचा अपडेट पाहून तो बावरला आणि सावध झाला. तिने लिहीलं होतं, " आय लाईक इट ऑन बेड". सावधपणे बंडूने इतरांचे अपडेटस् पाहिले. रागिणीने लिहीलेलं वाचून बंडू लाजून चूर झाला. तिने लिहीलं होतं, "आय लाईक इट ऑन द डायनिंग टेबल". आणखी एकीने लिहीलं होतं, "आय लाईक इट एनीव्हेअर व्हेअर एनीवन कॅन सी इट". आणखी चार-पाच जणींनी असेच प्रक्षोभक अपडेटस् टाकलेले त्याने पाहिले आणि तो स्टडीकडे धावला. धडधडत्या काळजाने त्याने सर्च मारला आणि थरथरत्या हाताने सर्च रिझल्टवर क्लिक केलं. पुन्हा हा प्रकार ब्रेस्ट कॅन्सरच्याच अवेअरनेससाठी आहे हे वाचून त्याचं डोकं फिरलं. नशीब या वेळी "तुमची पर्स तुम्हाला कुठे ठेवलेली आवडते" या प्रश्नाची ती उत्तरं होती. सुटकेचा निश्वास टाकून त्याने कपाळावरचा घाम टिपला न टिपला तोच त्याचा फोन वाजला.
फोन उचलता क्षणीच पलीकडून मन्या किंचाळला,
"अरे बंडू, हा आता काय नवीन प्रकार आहे? तू वाचलंस ना? शिव शिव शिव... आता नक्की कशाबद्दल बोलतायत या बायका? "
"शांत हो मन्या, " बंडू आचार्य बंडो रजनीश झाल्याच्या थाटात बोलला, " या वेळी त्या फक्त पर्सबद्दल बोलत आहेत. त्यांना त्यांची पर्स कुठे ठेवलेली आवडते ते त्या सांगत आहेत. "
मन्याने सोडलेला सुस्कार त्याला स्पष्ट ऐकू आला. संध्याकाळी कट्ट्यावर भेटायचं ठरवून त्यांनी फोन ठेवला.
संध्याकाळी नेहमीच्या अड्ड्यावर बंडू, मन्या आणि मोहन जमले. नेहमीची चहाची ऑर्डर दिली आणि मग विषयाला पुन्हा तोंड फुटलं.
"च्यायला या बायकांच्या, " मन्या करवादला," सगळं ताळतंत्रच सोडलंय यांनी आजकाल. मी रागिणीला म्हणालो सुद्धा, तर म्हणते कशी.. 'तुमच्याच मनात चांदणं आहे आम्ही तर आपलं सरळ मनाने लिहीलंय'. छ्या, चोर तो चोर वर शिरजोर. आणि मी म्हणतो किती अवेअरनेसतरी वाढवायचा त्या ब्रेस्ट कॅन्सरचा? बाकीचे कॅन्सर नाहीत की काय या जगात? पुरुषांना का कॅन्सर होत नाही? पुरुष का माणसं नाहीत?"
मन्या इमोशनल झालेला पाहून मोहन कळवळला, "हो रे. काही तरी केलं पाहिजे बघ. अरे... अरे अर्चनाने तर लिहीलंय 'आय लाईक इट ऑन झोपाळा'... आता हे बरं दिसतं का तूच सांग. "
दोघं असं तावातावानं बोलत असताना बंडू मात्र धुरांच्या वलयांकडे शांतपणे बघत बसला होता. बर्याच वेळाने त्याने तोंड उघडलं, " मन्या, तू म्हणतोस ते बरोबर आहे. पुरुषांचे पण कॅन्सर आहेतच की. आपण आपलं कॅंपेन सुरू करायचं"
"आपलं कँपेन?"
"हो, पुरुषांचं कँपेन.प्रोस्टेट कॅन्सर अवेअरनेस. या बायका आपल्याला लाजवतात ना, आपणही त्यांना लाजवायचं. कसं ते मी सांगतो. "
मग त्या तिघांनी डोक्याला डोकं लावून मध्येमध्ये एकमेकाना टाळ्या देत, मध्येमध्ये खिंकाळत बरीच खलबतं केली आणि शेवटी सगळं ठरवून एकमेकांचा निरोप घेतला.
त्या नंतरचा शनिवार. दहा वाजता बंडू उठून नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात गेला तेव्हा स्नेहलता आंघोळीला गेली होती. चहा करून घेऊन तो रिक्लाईनरवर बसला आणि त्याने फेसबुक उघडले. मन्याचा अपडेट पाहून तो मनाशीच हसला.
मन्याने लिहीलं होतं, " सहा इंच"
आणखी एक-दोघांनीही असंच लिहीलं होतं. कोणी साडेपाच इंच, कोणी सात इंच. एक जण अतिउत्साहाच्या भरात आठ इंचावरदेखील पोचला होता.
"हं, हळूहळू लागण होतेय तर. पब्लिसिटी बरोबर झाली म्हणायची", बंडू म्हणाला आणि त्याने झोकात स्टेटस अपडेट टाकला, "साडेसहा इंच" आणि मग तो खुशीत चहा पिऊ लागला.
स्नेहलता तिचा चहा घेऊन आली तोपर्यंत मात्र तो एकदम गंभीर होऊन बसला होता आणि लंचला जायला निघेपर्यंत आवरताना आतून खूप उकळ्या फुटत असूनही त्याने चुकूनही तिच्याकडे पाहिले नाही. आंघोळीला गेल्यावर शॉवरखाली मात्र त्याने पोटभर हसून घेतले.
लंचला जाताना कारमध्ये स्नेहलताचा मूड उखडल्यासारखा वाटला.
"काय झालं गं, लतू? ", त्याने मुद्दाम विचारले.
"हा काय चावटपणा लावलाय तुम्ही लोकांनी? ", तिला थोडी कल्पना असूनही चिडखोरपणे तिने विचारलं.
"कसला चावटपणा ब्वॉ? ", गालात जीभ घोळवत बंडूने विचारले.
ती उसळून काही तरी बोलणार होती पण काही तरी विचार करून गप्प बसली.
दिवसभर बंडू, मन्या आणि मोहनने एकमेकांना फोन करून करून भरपूर आनंद लुटला. महिलावर्गात मात्र अस्वस्थता होती. खुद्द स्नेहलतेने किमान दहा-बारावेळा तो विषय काढला होता पण तिला काही पुढे बोलता येईना. दिवसभर तिने कळ काढली.
पण रात्री झोपायला गेल्यावर मात्र ठेवणीतला रडवेला चेहरा करून तिने बंडूला विचारले,
"ए बंडू, सांग की रे असं काय करतो? "
"काय सांगू? "
"हेच तुम्ही कसले आकडे लिहीलेत? "
"अगं ते कँपेन आहे आमचं. प्रोस्टेट कॅन्सरच्या अवेअरनेससाठी"
"हो पण मग हा असला चावटपणा कशाला? "
"कोण म्हणतं तो चावटपणा आहे? ती खरीखुरी मापं आहेत. आम्ही प्रामाणिकपणे मोजून लिहीली आहेत", बंडू सात्त्विक संतापाने म्हणाला.
"शीः, वर तोंडकरून सांगायला लाज नाही वाटत? पुरुष मेले चावटच असतात. आणि तू आणि तुझे मित्र तर एक नंबरचे अश्लील आहात. काहीच कशी लाजलज्जा नाही म्हणते मी? वर खुशाल तोंड वर करून सांगतोस? तुला बोलवतं तरी कसं? सगळ्या बायका हसताहेत तुम्हाला आणि नाही नाही ते प्रश्न विचारताहेत एकमेकींना... " असं आणि आणखी बरचसं बोलत तिने जीभेचा पट्टा सोडला.
बंडू खरं म्हणजे तिला आणखी ताणणार होता. "काय प्रश्न विचारतात एकमेकींना आणि का हसतात? " वगैरे विचारून तिला बोअर करायचं होतं पण तिचे डोळे पाणावलेले पाहून आणि नाकाचा शेंडा लाल झालेला पाहून तो विरघळला आणि मोठमोठ्याने हसू लागला.
त्याला हसताना पाहून ती बोलायची थांबली आणि मुसमुसत रागाने त्याच्याकडे पाहू लागली.
" अगं ब्रेस्ट कॅन्सरच्या अवेअरनेससाठी तुम्ही कसं कँपेन केलं तसंच हे. तुम्ही तेव्हा चावटपणा केलात तो विसरलात वाटतं. तुम्हाला धडा शिकवायचा म्हणून आम्ही हे प्रोस्टेट कॅन्सरचं कँपेन चालू केलं आणि ती मापं आमच्या हाताच्या तळव्याच्या लांबीची आहेत. तुला काय वाटलं? अं अं? आहात की नाही तुम्ही बायकाच चाव्वट?"
एवढं बोलून बंडू डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसत राहिला आणि हळूहळू स्नेहलताही त्यात सामील झाली.
प्रतिक्रिया
10 Oct 2010 - 2:17 pm | Nile
हा हा हा, काय योगायोग. आत्ताच मित्रांबरोबर या विषयावर चर्चा झाली. प्रथम एका मैत्रिणीचे ' आय लाईक इट ऑन टीव्ही' पाहुन उडालो होतो. अर्थात 'टीव्ही' मुळे मला लवकर शोधाशोधाची बुद्धी झाली अन कळाले. (बादवे, सद्ध्याचा "आय लाईक इट ऑन फ्लोअर" हा सर्वात जास्त शोध पैकी एक आहे.)
पण ह्याने कँपेनला मदत होते आहे का? वगैरे प्रश्नांवरच चर्चा झाली. काही शोधाशोध करणारे सोडले तर बर्याच लोकांना चावटपणाचेच निमित्त मिळत आहे, असो.
इंचांची कल्पना आवडली. अमलात आणावी काय असा विचार करत आहे. ;-)
10 Oct 2010 - 2:29 pm | नगरीनिरंजन
नेकी और पूछ पूछ?
11 Oct 2010 - 2:29 am | मेघवेडा
म्हणतो. होऊन जाऊदे नायल्या!
लेख आवडला! मस्त खुसखुशीत!
10 Oct 2010 - 2:33 pm | नंदन
असले स्थितिसंदेश म्हणजे 'अळवावरचं पाणी'च की ;)
11 Oct 2010 - 1:36 pm | सूड
10 Oct 2010 - 2:38 pm | कानडाऊ योगेशु
चावट पण भलताच खुसखुशीत लेख!
10 Oct 2010 - 7:25 pm | धनंजय
असेच म्हणतो.
अगदी सोज्ज्वळ चावटपणा. बॅलन्स साधलेला आहे.
11 Oct 2010 - 2:55 am | शहराजाद
+१
10 Oct 2010 - 2:57 pm | अवलिया
हा हा हा
मस्त लेख !!
10 Oct 2010 - 3:04 pm | Pain
लेख आवडला!
जशास तसे /पेराल ते उगवते :)
10 Oct 2010 - 3:47 pm | सहज
छान लिहलाय!
10 Oct 2010 - 4:19 pm | मदनबाण
खी खी खी... ;)
छान लिखाण... ;)
10 Oct 2010 - 6:20 pm | सन्जोप राव
लेख आणि कल्पना भलतीच आवडली. गाडगीळांना समाधान वाटले असते. प्रतिसादांची संख्या पाहून मिसळपावची प्रेरणा कम दुस्वास अशा वरणभात संकेतस्थळाच्या दिशेनेच मिसळपावची वाटचाल चालू आहे की काय अशी शंका आली....
10 Oct 2010 - 7:16 pm | चित्रा
लेख शनिवारी/रविवारी आला आहे यामुळे प्रतिसादांची संख्या कमी आहे हे तुमच्यासारख्या अनुभवी लोकांना माहिती असेलच.
असो.
उत्तम ललित लेखन.
बंडू/स्नेहलतेचा मॉडर्न अवतार पाहून आनंद झाला.
स्नेहलता म्हटली की नयनतारा बाई डोळ्यासमोर उभ्या राहतात.
10 Oct 2010 - 7:40 pm | शाहरुख
असेच म्हणतो !
बाकी तळव्याच्या लांबीवरून एका प्रसिद्ध अफवेची आठवण झाली ;-)
11 Oct 2010 - 11:13 am | अवलिया
संजोपरावांशी सहमत आहे.
रावांच्या वाटचालीवर नजर टाकुन त्यांनी प्रोत्साहन दिलेले प्रतिसाद पाहिले. डोळे पाणावले.
बहुधा काही करुन मिपाला नावे ठेवायचीच ही जुनी सवय अजुन कायमच आहे असे दिसते
12 Oct 2010 - 8:10 am | सन्जोप राव
आमच्या वाटचालीचा इतका बारकाईने अभ्यास केल्याबद्दल धन्यवाद. पण हा वेळ वाया घालवलात. याच वेळेत स्वतःची बौद्धिक वाढ करण्याचा प्रयत्न केला असता, तर तो सत्कारणी लागला असता. अर्थात आपल्याला काय जमेल आणी काय जमणार नाही याची आपल्याला पूर्ण जाणीव आहेच म्हणा.
दरम्यान मिसळपावचे वकीलपत्र खाली ठेवा. स्वतःचे खाते उडणार नाही, एवढी काळजी घेतली तरी आपल्या वकूबाच्या मानाने फार झाले. 'लोका सांगे' हे तर पटलेच, पण 'मोजून माराव्या पैजारा' हेही आठवले.
12 Oct 2010 - 1:53 pm | अवलिया
हॅ हॅ हॅ
माझा वेळ वाया घालवला का सत्कारणी लावला याची चिंता आपण करु नये. आमच्या बौध्दिक वाढीची आपणास असलेली कळकळ पाहुन डोळे पाणावले. बाकी आमचा वकुब वगैरे काढतांना तुमची तशी लायकी आहे का हा प्रश्न नक्कीच पडतो. असो.
बाकी मिसळपाव आम्ही आमचे मानतो, तुमच्या सारख्या केवळ शिंतोडे उडवण्यार्यांना ते कसे कळणार?
आमचे खाते ऊडाले काय किंवा नाही उडाले काय याची चिंता आपल्याला का पडावी? ज्याची त्याची जाण समज वगैरे...
आम्हाला जे वाटले ते आम्ही लिहित असतो... यापुढील चर्चा खव मधुन करु. असो
12 Oct 2010 - 4:14 pm | सन्जोप राव
की मिसळपाव आम्ही आमचे मानतो, तुमच्या सारख्या केवळ शिंतोडे उडवण्यार्यांना ते कसे कळणार?
हेच ते वकीलपत्र. अशीच एकतर्फी निष्ठा बाळगत राहा.
आम्हाला जे वाटले ते आम्ही लिहित असतो... यापुढील चर्चा खव मधुन करु. असो
गरज नाही. अनाहूत खरडींकडे दुर्लक्ष केले जाईल.
12 Oct 2010 - 6:22 pm | अवलिया
>>हेच ते वकीलपत्र. अशीच एकतर्फी निष्ठा बाळगत राहा.
ज्या गोष्टीतले तुम्हाला काही माहीत नाही त्यामधे आम्ही काय करावे आणी काय नाही हे सांगायला तुमची आवश्यकता नाही. फुकाचे सल्ले देऊ नये.
10 Oct 2010 - 6:30 pm | वेताळ
आवडला.....
10 Oct 2010 - 7:02 pm | शुचि
आई शप्पत =)) =))
इतकी हसले इतकी हसले
10 Oct 2010 - 7:25 pm | शेखर
मस्तच लेख फुलवलाय..
10 Oct 2010 - 7:40 pm | सुनील
मनोरंजक!
10 Oct 2010 - 10:06 pm | पैसा
गाडगिळांचा खरा बंडू आता आला असता, तर काहीसा असाच असता! जरा चावट, जरा हुषार.
10 Oct 2010 - 10:12 pm | शिल्पा ब
मस्त... चावटपणाची हिंट असलेला लेख..
10 Oct 2010 - 10:40 pm | हर्षद आनंदी
खुमासदार लेख!!
10 Oct 2010 - 10:51 pm | रेवती
धन्य आहात हो निरंजनभौ!
10 Oct 2010 - 11:13 pm | आनन्दा
आम्ही पण ते सर्व अप्डेट्स पाहून चक्रावून गेलो होतो... एका चांगल्या विषयाला तोंड फोडल्याबद्दल धन्यवाद!!
-आनन्दा
10 Oct 2010 - 11:37 pm | स्वाती२
भारी लिहिलय!
11 Oct 2010 - 12:06 am | इंटरनेटस्नेही
जबरदस्त लेख!
(महाचावट) इंट्या,
11 Oct 2010 - 1:52 am | राजेश घासकडवी
मस्त लेख.
वरवर पाहाता हा लेख चावट वाटतो खरा, पण त्यामध्ये गहन अर्थ दडलेला आहे. ती लिंगभूमिकांविषयी काळ्या विनोदातली टिप्पणीच आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. आता आम्हाला काही सरळसोट गोष्टींमध्ये वात्रट अर्थ दिसतात, तर काही वात्रट लेखनांमध्ये गंभीर मुद्दे हाताळलेले जाणवतात हा आमच्या नजरेचाच दोष. असो. यावर आम्ही एक अभ्यासपूर्ण लेखच लिहायचं ठरवलेलं आहे.
11 Oct 2010 - 2:54 am | शहराजाद
गुर्जींच्या अभ्यासपूर्ण लेखाची वाट बघत आहे.
11 Oct 2010 - 3:48 am | सुनील
एकनाथ आणि विष्णुदास नाम्याच्या काव्याचे वाचन/रसग्रहण कमी करा!
11 Oct 2010 - 8:18 am | स्पंदना
एक विचारु ? एव्हढ चवताळण्या सारख काय वाट ल तुम्हाला त्यात? बायकांनी मिळुन केली थोडी मजा अं?
बाकी लेखाबद्दल विचारुच नका..___/\___.
11 Oct 2010 - 8:59 am | llपुण्याचे पेशवेll
झक्कास लेख आहे. :) साला असले रंगीत स्टेटस पाहून असा गूढ अर्थ त्यामागे आहे हे कधी सुचलेच नसते. ;) बाकी आधी रंग वेगळ्याच कशाचातरी वाटला होता.
नगर्या भारी लेख रे. आवडेश.
11 Oct 2010 - 6:43 pm | सुहास..
___/\___
मस्त लिखाण
11 Oct 2010 - 7:23 pm | प्रभो
__/\__
असेच म्हणतो...
16 Oct 2010 - 12:59 am | चिगो
-------^-- :-) ढिश्क्यॅव..
9 Feb 2013 - 6:08 am | खटपट्या
मला पण आधी रंग वेगळ्याच कशाचातरी वाटला !!!!
11 Oct 2010 - 9:08 am | रन्गराव
हसून हसून पोट दुखायला लागल!
11 Oct 2010 - 9:12 am | समई
मस्त ...अगदि शेवत पर्यंत खुसखुषित पणा आहे...जोरात आहे.. :)
11 Oct 2010 - 10:11 am | चेतन
सही लिहलयं. ;)
कधीपासुन हासतोय
11 Oct 2010 - 11:01 am | विकाल
"एक नम्बर......"
11 Oct 2010 - 11:15 am | गांधीवादी
झ्यॅक लेखन.
५.९५
11 Oct 2010 - 11:23 am | अरुण मनोहर
मस्तच!
11 Oct 2010 - 12:10 pm | बिपिन कार्यकर्ते
हॅहॅहॅ!!! मस्तच लेख.
- (५ इंची)
11 Oct 2010 - 12:57 pm | गणपा
एकदम खुसखुशीत लेख. :)
11 Oct 2010 - 1:03 pm | यशोधरा
मस्त लेख!
11 Oct 2010 - 1:25 pm | sneharani
मस्त लेख!!
11 Oct 2010 - 1:32 pm | श्रावण मोडक
चावट! :)
11 Oct 2010 - 1:40 pm | स्मृती
चावट भुंगा! :)
11 Oct 2010 - 3:29 pm | धमाल मुलगा
=)) =)) =)) =))
हा निरंजन काय यडाऽय काय? :D कस्सलं ज ह ब ह र्या लिहिलंय राव !!!
बंडू आणि स्नेहलता नव्या काळात मुरलेले पाहुन आनंद झाला. :)
हा निरंजन भेटेल तेव्हा ह्याची निरंजनांनी आरती ओवाळली पाहिजे बुवा. काय भारी डोका चालतोय.
- सव्वा सहा इंच.
11 Oct 2010 - 3:54 pm | विलासराव
हा हा हा!!!!!!!!!!!
खुप हसलो मी आणी मित्र आपला लेख वाचुन.
11 Oct 2010 - 6:55 pm | मितान
भारीये राव..
नाव वाचून उघडायची भितीच वाटुन राहिली व्हती..
उघडून वाचले तर सगळे कळलेच !!!!
मला हसताना बघुन एक गुज्जु मैत्रिणीने काय वाचतेस विचारले मी धाग्याचे नाव वाचून दाखवले. आणि तिच्या नजरेत मला माझ्या बद्दल प्रचंड आदर दिसू लागला ;)
11 Oct 2010 - 7:02 pm | धमाल मुलगा
नक्की कोणत्या शब्दांमुळे? :?
-(पांढरा) धम्या.
11 Oct 2010 - 7:54 pm | प्राजु
मस्त लेख..!
आवडला.
12 Oct 2010 - 8:53 am | नगरीनिरंजन
मंडळी,
बंडूची आयड्या तुम्हाला आवडली हे पाहून आनंद झाला. तरीही चुकुन कोणाच्या 'अंतरंगाला' धक्का बसला असल्यास मी क्षमा मागतो.
ब्रेस्टकॅन्सर अथवा इतर कोणत्याही कॅन्सरची टवाळी करण्याचा हेतू नाही हे स्वच्छ दिसतच असेल अशी आशा करतो.
दिलखुलास आस्वाद घेऊन दिलखुलास प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
- (आखुडशिंगी बहुदुधी) नगरीनिरंजन
12 Oct 2010 - 4:38 pm | satish kulkarni
एकदम जबरदस्त लिहिले आहे....आणि नाव तर लै भारी दिलय लेखाला...
ह.ह.पु,वा.
बन्डु आणि स्नेहलताच पन्खा...
सतिश
13 Oct 2010 - 1:48 pm | टुकुल
जबरा लेख, लिहिताना कुठेच तोल जास्त वाकडा जावु दिला नाहीत.
--टुकुल
14 Oct 2010 - 2:42 am | उपास
ननि, गाडगीळांप्रमाणेच मला मंगला गोडबोलेंच्या लिखाणाची छाप दिसली.. जी विशेष भावली.. मुळात परिस्थितीजन्य विनोद असल्याने खूप सकस आहे, त्यामुळे कुठेही ओढाताण करावी लागली नाही.. छानच पेल्लाय लेख, निख्खळ मनोरंजन.. असे विज्ञानामुळे झालेल्या (प्र/अधो)गती मुळे बदलणार्या जीवनावर मार्मिक लेख लिहीत राहाण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन आणि शुभेच्छाही..
16 Oct 2010 - 1:51 am | मराठमोळा
जबराट!!!
चुकुन वाचायचा राहुन गेला होता हा लेख..
शैलीही मस्तच. :)
येऊ देत अजुन.
16 Oct 2010 - 1:59 am | मस्तानी
फसफसून बाहेर पडणार हसू ऑफिस मध्ये असलं की किती म्हणून थांबवणार :) :) :)
गेल्या अनेक दिवसांपासून मनात जो प्रश्न होता की हे सगळ्याजणी असं काय लिहितायेत त्याचं उत्तर मिळालं बरं का !
16 Oct 2010 - 8:28 am | निरंजन
फ़ारच छान. सकाळी क्लास चालू व्हायच्या जस्ट आधी वाचल आणि इतका मोठ्यानी हासलो की ्सगळे विचारायला लागले काय झाल म्हणून काय सांगणार त्यांना. काही नाही म्हणून गप्प बसलो.
16 Oct 2010 - 8:13 pm | निमिष सोनार
छान इनोदी :-) लेख आहे.
बायकांना सडेतोड जशास तसे उत्तर देणारा हा विनोदी लेख खुप आवडला.
बायका (शाळकरी मुली सुद्धा) अश्लील लिहिण्यात आणि बोलण्यात फार पुढे गेलेल्या आहेत.
फरक एवढाच की त्यांना तसे म्हटलेले आवडत नाही. त्या आजुबाजूला पुरुष असले तरी अश्लील बोलतात.
त्याचे त्यांना काहीच वाटत नाही.
कुठेही बस स्टॉप किंवा बस मध्ये इंग्रजाळलेल्या भारतीय मुली, बायका एखाद्या चित्रपटाबद्दल, विदेशी गायिकांबद्दल बोलतांना, चर्चा करताना ऐकून तर पाहा.
खात्री पटेल.
मात्र पुरुष थोडे जरी तसे सार्वजनिक ठिकाणी बोलले की लगेच नाही नाही ते अश्लीलतेचे आरोप केले जातात.
29 Jul 2012 - 5:13 pm | मन१
जबराट....
30 Jul 2012 - 9:20 am | स्पंदना
परत वाचल. तेव्हढच हसु आल जेव्हध पहिल्यांदा आल होत.
नगरी लिहित नाही हल्ली?
30 Jul 2012 - 12:47 pm | बॅटमॅन
ही ही ही ही लै भारी!!!!!!! इंच इंच लढवलेली खिंड तर जबराच!!!!
9 Feb 2013 - 3:56 am | शुचि
परत वाचला. प्रचंड हसले :)
9 Feb 2013 - 11:23 am | खटासि खट
:D
जबराट लिखाण. सा. प्रणाम, दंडवत इ.
9 Feb 2013 - 11:56 am | प्रसाद गोडबोले
अगदी ब्यॅलन्स पाळुन जबरा चावट विनोद केलाय =))
(रंग दिलेला नाही ) =))
10 Feb 2013 - 12:28 am | एस
खूपच दर्जेदार लिखाण
10 Feb 2013 - 12:31 am | मन१
अरे कुणीतरी मलाही थँक्स म्हणा की. माझ्या वाचनखुनेत असल्यानच हा लेख सापडलाय ह्याची मला खात्री वाटते. पण तसा माझ्याकडे पुरावा नाही.
10 Feb 2013 - 12:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उशीरा का होईना, विनोद झेपला आणि आवडलाही. (एकेकाळी मूळ मुद्दल काय हेच माहित नसल्यामुळे लेखकाशी उगाच वाद घातल्याबद्दल क्षमस्व.)
10 Feb 2013 - 2:39 pm | यशोधरा
प्रचंड हसले! मस्त लेख आहे! :)
18 Jun 2015 - 10:46 am | अनुप ढेरे
=))
18 Jun 2015 - 11:06 am | चिनार
जबराट !
18 Jun 2015 - 11:48 am | अत्रुप्त आत्मा
तुफ्फान मारामारी! :-D
हसून हसून इंचा इंचावर शहीद झाल्या गेले आहे! =))
18 Jun 2015 - 12:42 pm | मित्रहो
मस्त लेख
जबरी कल्पना. एक सुंदर नर्मविनोदी लेख.
18 Jun 2015 - 12:51 pm | मोहनराव
भन्नाट लेख..
18 Jun 2015 - 5:18 pm | प्रणित
झक्कास
18 Jun 2015 - 5:33 pm | रेवती
हीहीही. पुन्हा एकदा वाचून हसू आले.
18 Jun 2015 - 6:39 pm | अजया
=)) वन आॅफ द बेस्ट आॅफ मिपा!आता का लिहित नाहीत लेखकराव?
18 Jun 2015 - 9:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अर तेज्या...हे असं मॅटर होतं होय. मेरी भलतीचं समजुत हो गयी थी.
18 Jun 2015 - 9:17 pm | अनिरुद्ध.वैद्य
मस्त लेख ... भरपूर हसलो :)
19 Jun 2015 - 9:03 am | नाखु
बंडू प्रेमी
नाखु
19 Jun 2015 - 12:51 pm | आगाऊ म्हादया......
ह ह पु वा.
लेख खूप आवडला.
2 Feb 2021 - 4:42 pm | शाम भागवत
मस्त.