नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले.
नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे. त्यामुळे ५० पैसे समजून ५ रू जाण्याची शक्यता जास्त म्हणून भरपूर लोकांनी सरकारकडे ते नाणे बदलण्याची विनंती केली असे वाचले होते. असा प्रकार आधीही झाला होता जेव्हा २ रू चे स्टीलचे नवीन नाणे काढले होते. मीही १ रू समजूनच ते एकाला देणार होतो. पण तेवढ्यात लक्षात आले, आणि जमा करून ठेवले. आणखी मागे जावे तर १ रू, ५० पैसे, २५ पैसे व १० पैशाची स्टीलची नाणी चलनात आली होती. नाण्यांचे ते सर्व प्रकार दिसतात घरी आताही. स्टीलच्या नाण्यांचे एक बरे आहे ती लोहचुंबकाला चिकटतात त्यामुळे एखाद्या लोहचुंबकावर भरपूर सुट्टे पैसे साठवून ठेवता येतात.
कधी काळी जुनी नाणी जमा करायचाही छंद लागला होता. पण जास्त काळ टिकला नाही. असो, जे छंदिष्ट आहेत ते बरोबर करतात जमा. इतिहासकालीन नाणी, वेगवेगळ्या देशांची नाणी आणि काय काय?
लहानपणी माझ्या आईने ५ पैशाची भरपूर नाणी जमा केली होती. त्यांचे एक जहाज बनवायचे होते म्हणून. पण ते ही काही झाले नाही. वेळेवर ती चलनात काढून टाकली म्हणून बरे, नाहीतर नुकसान झाले असते. ते झाले जुने. २/३ वर्षांपुर्वी मला सवय लागली होती, ऑफिसमधून घरी आल्यावर खिशातील नाणी ड्रॉवर मध्ये टाकायची. मग कधी वेळेवर उपयोगी पडायची.मी माझ्या बहिणीलाही सांगितले होते, 'पाहिजे तेव्हा काढून घे, पण किती जमा झाले मोजायचे नाही.' नंतर मुंबईबाहेर असल्याने त्यात खंड पडला. पण तो घरातील ड्रॉवरमध्ये नाणी जमा होण्यात. मी जिथे रहायचो तिथे हे सुट्टे पैसे एकत्र ठेवणे सुरूच होते. आता २ महिन्यांपुर्वी जेव्हा साफसफाई करताना पूर्ण ड्रॉवर रिकामे केले तेव्हा पाहिले भरपूर नाणी जमा झाली होती, १०० ते ११० रुपये. पण त्यातही थोडे नुकसान हे की २५ पैशांची नाणीही आहेत जी आता कोणी घेत नाही. जरी रिझर्व बँकेने बंद नाही केलीत, (हो, छापणे बंद केले) तरी लोकांनी ती बाद केलीत चलनातून. मधेच ऐकले होते की , बेस्ट चे वाहक घेतात ती नाणी. बघेन प्रयत्न करून.
ह्यावरून आठवले, माझ्यासारखेच किती लोकांनी घरी नाणी जमा करून ठेवली असतील. ज्यातील काही नाण्यांचा उपयोग आता होत नसेल. त्यामुळे आपले व सोबत देशाचेही नुकसान झालेच. तरी ह्यावर मार्ग आहे की बँकेने ती नाणी परत घेतली तर हे टळू शकेल. पण जी नाणी आपण देवाच्या नावाने नदीत/विहिरीत टाकतो ते पैसे तर गेल्यातच जमा आहेत. काही वर्षांपुर्वी त्याबद्दल ही पेपरमध्ये लेख वाचला होता. आधीच नास्तिक त्यात हा लेख वाचल्याने, दुसर्यांना नदीत पैसे टाकायला परावृत्त करू लागलो ;)
बरे, नाण्यांचा इतर उपयोग काय?
सर्वात पहिले समोर दिसते ते नाणे उडविणे. TOSS अर्थात नाणेफेकीत कोणाचा कौल लागतो ते पाहण्यासाठी. शोलेमधील ते प्रसिद्ध नाणे सर्वांना माहित असेलच. किंवा मग अंदाज अपना अपना मधील "चित मैं जिता, पट तू हारा". ह्यातील चित म्हणजे छापा की काटा? Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा. पण नंतर ती स्टीलची नाणी आल्यानंतर ते बदलून गेले. पण नंतर कधी छाप काट करण्याकरता काय वापरले आठवत नाही.
तसेच दिव्यात वात नीट रहावी म्हणूनही सर्वात पहिले आपण खिशातील नाणेच बाहेर काढतो.
इतर नाण्यांबद्दल आता नक्की अंदाज नाही, पण १ रुपयाचे नाणे भलतेच उपयोगात आणले गेले सगळीकडे. सार्वजनिक टेलिफोन, वजन करायचे यंत्र, भेट देण्याची पाकिटे. बरं, ह्यातील भेट देण्याच्या पाकिटात १ रूपयाचे नाणे चिकटवून ठेवणे गेल्या ४/५ वर्षात चालू झाले असेल पण टेलिफोन मध्ये ह्याचा वापर फार जुना आहे. अर्थात त्या यंत्रांना हे कळत नसेल की टाकण्यात आलेले नाणे हे खरोखरीचे नाणेच आहे की लोखंडाचा तुकडा, म्हणून तर एक रुपयासारख्या एखाद्या लोखंडाच्या चकतीचा वापरही करण्यात येत होता. किंवा मग खरोखरीच एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडून त्याला दोरा बांधून ते त्या यंत्रात टाकायचे व आतील खटका पडला की ते नाणे परत वर ओढून घ्यायचे असले प्रकार ही लोकांनी केल्याचे मी ऐकले आहे.
अरे हो, आणखी आठवले. माझी फजीतीच म्हणा. लहानपणी वजन करायच्या यंत्रात मी सहज गंमत म्हणून २५ पैशाचे नाणे टाकले ते तिकिट देणार्या वाटीत परत आले. मग मी ५० पैशाचे नाणे टाकले. ते ही परत आले. उचापतीत मग मी खिशातील २ रुपयाचे नाणे टाकले तर त्या नालायक यंत्राने ते नाणे आत घेतले. :( तेव्हा केलेले वजन २ रुपयांना पडले. त्यामुळे माझे वजन कमी झाले होते का ते आठवत नाही. पण खिशातील पैशांचे वजन असेही कमी होऊ शकते हे कळले :D
आता तर वजन/उंची/ तसेच वजन-उंची ह्यांचा समतोल आहे की नाही ते सांगणारे (Body Mass Index) यंत्रही आले आहे, जे मागते ५ रुपयांचे नाणे. ह्यावर काही मी तसे करून पाहणार नाही ;)
गेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मित्राकडे गेलो होतो तिथे त्यांनी घरातील ठराविक नाणी पूजेत ठेवण्यास काढली होती. त्यात मी कधी न ऐकलेले १० रू चे नाणे पाहिले. बहुधा हे नाणे ही चलनात आले नव्हते.
असो, माझे नाणेपुराण एवढेच.
रिझर्व बँकेच्या ह्या संकेतस्थळावर भारतीय गणराज्यातील नाण्यांची यादी आहे. त्यात हे १० रुपयाचे नाणे नाही. तसेच १२/१५ वर्षांपुर्वी काढलेली ५ रुपयांची नाणी ही त्यात नाहीत. कोणास आठवतेय का ते नाणे? मोठ्या आकाराचे व मागे श्रीमती इंदिरा गांधीचे चित्र असलेले? तसेच आणि काही नाणी माहीत आहेत का जी रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरही नमूद नाहीत?
प्रतिक्रिया
11 May 2008 - 4:57 pm | स्वाती दिनेश
नाणेपुराण आवडले,
१०रु चे नाणे... ही नवीच माहिती मिळाली,
स्वाती
11 May 2008 - 6:02 pm | देवदत्त
पुन्हा १० चे नाणे काढणार आहेत असे ऐकले. पाहूया.
12 May 2008 - 12:15 am | गणपा
१० रुपयाचे नाणे माझ्या संग्रही आहे. पण सध्या ते भारतात आहे नाहितर फोटो काढुन इथे टाकला असता.
--गणपा.
11 May 2008 - 5:20 pm | रामदास
नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे.
आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात.
१० रुपयाचे ते नाणे आहे माझ्याकडे.
मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.
11 May 2008 - 5:58 pm | देवदत्त
आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात.
असली वाक्ये ही आठवली नव्हती हो. नाहीतर आणखी मजा आली असती मला लिहायला.
धन्यवाद.
ह्यावरूनच खोटा सिक्का हा शब्द प्रयोग, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात हा वाक्प्रचारही आठवला. :)
ते १० रुपयाचे नाणे कधीचे आहे हो?
मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.
नक्की जाईन पहायला वेळ जमल्यास.
11 May 2008 - 5:45 pm | प्रभाकर पेठकर
आपल्या लेखाने खूप जुन्या-जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मस्त लिहिले आहे.
अभिनंदन.
11 May 2008 - 6:01 pm | देवदत्त
धन्यवाद..
आपल्या लेखाने खूप जुन्या-जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
पेठकर काका, तुमच्या अनुभवाच्या पोतडीतून काढा की त्या आठवणी. आम्हालाही मजा येईल वाचायला. :)
11 May 2008 - 6:59 pm | बिपिन कार्यकर्ते
नाणे पुराण आवडले... मला पण असं काही काही लिहावसं वाटतं, पण काय करणार, आपलंच नाणं खोटं... :''(
11 May 2008 - 7:00 pm | रामदास
नाण्याचा आवाज त्यातल्या धातू मुळे असतो.सगळे धातू सोनोरस नसतात. जे असतात ते महाग असतात. उदा. कथील.
त्यामुळे खोटी नाणी बनवणारे त्यात शिसे वापरतात. नाणे बद्द वाजते.गंमत म्हणजे आजही नाणे हातात घेउन केवळ वजनाच्या आधारावर खरे -खोटे सांगणारे मी पाहिलेत.
बेल मेटल हा मिश्र धातू खणखणीत आवाजाचे एक उत्तम उदाहरण.
मोनल दुसरे. हो मोनल हा मिश्र धातू आहे.
आणखी माहिती साठी एकदा कपूर चे मेटालर्जी चे पुस्तक बघा.
असो. लेखापेक्षा प्रतीक्रिया मोठी व्हायला नको.
11 May 2008 - 7:19 pm | शितल
लेख छान जमला आहे.
माझ्या मिस्टरा॑नाही नाणे जमविण्याचा छ्॑द आहे, माझ्याकडे एक रूपयाचे एक नाणे आहे त्यावर ज्ञानेश्वर माऊलीचे चित्र आहे.
11 May 2008 - 7:22 pm | प्रभाकर पेठकर
मला नोटा जमवायला आवडते. मी त्या बँकेत साठवून ठेवतो.
11 May 2008 - 7:30 pm | कुंदन
कंगाल बँकेत ठेवायला...
11 May 2008 - 10:37 pm | राजे (not verified)
माझ्या कडे ही एक नाणे आहे तांब्याचे दोनशे वर्षापुर्वीचे आहे... मला कोठे मिळाले हे आठवत नाही आहे पण माझ्याकडे ते लहान पणापासूनच आहे.
व चिल्लर जमा करण्याची सवय मला लहान पणापासूनच.. खुप उपयोगी पडते ही सवय...
लहानपणी आम्ही मातीच्या गुल्लक मध्ये जमा करत होतो.. कधी आई कडून तर कधी बाबाच्याकडून.. जे मिळाले ते गुल्लक मध्ये जमा.. व दिवाळीच्या आदल्या दीवशी त्याचा नारळ करुन टाकायचा ;)
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
12 May 2008 - 12:31 am | स्वाती राजेश
छान लिहिले आहे. नविन माहिती मिळाली.
12 May 2008 - 12:46 am | प्रियाली
भारतात माझ्याकडे बर्याच देशांतील नाण्यांचा संग्रह होता. त्यात युरोप आणि आखातातील बरेचसे देश, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएसए, कॅनडा इ. इ. अनेक देशांची आणि भारतातील जुनी नाणीही जमवली होती. सध्या ती घरात कुठे आहेत की गेली त्याचा पत्ता नाही.
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. परंतु, हेड्सची ही पद्धत मूळची ग्रीकांची. ग्रीकांच्या नाण्यांवर त्यांच्या प्रमुखांचे चित्र छापलेले असे. ग्रीकांच्या (अलेक्झांडरच्या) स्वारी नंतर भारतातही हीच पद्धत रूढ झाली.
असो, नाणेपुराणावर एक समग्र लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण वेळ होत नाही हल्ली.
12 May 2008 - 7:20 pm | देवदत्त
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली.
ह्या बाबतीत जास्त माहिती नव्हती. आणि खरं तर कधी शोधायचा प्रयत्न ही नाही केला.:(
माहितीबद्दल धन्यवाद :)
12 May 2008 - 1:16 am | ईश्वरी
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला.
छान जमलंय नाणेपुराण.
नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात.
नाण्यासंदर्भात अजून एक वाक्प्रचार आठवला: एकाच नाण्याला दोन बाजू असतात.
ईश्वरी
13 May 2008 - 8:35 am | विसोबा खेचर
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला.
छान जमलंय नाणेपुराण.
सहमत आहे..
दत्तराव, तुमचे नाणेपुराण आवडले. आता नोटापुराणही येऊ द्या! :)
आपला,
(पैशांचा लोभी) तात्या.
अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो!
आपला,
(निरिक्षक) तात्या.
13 May 2008 - 8:17 pm | देवदत्त
धन्यवाद तात्या..
नोटापुराणाचाही प्रयत्न करतो.
अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो!
सहमत. मलाही छान वाटले.
12 May 2008 - 5:14 am | चतुरंग
माझे मूळ गाव नगर. तिथे एक ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आहे त्यात मी शिवराई बघितली आहे.
मीही काही काही जुनी नाणी जमवली होती. अशीच सातवी आठवीत असताना जमवलेली. त्यात काही जुनी तांब्याची होती. एक (बहुधा रुप्याचे) पंचकोनी नाणे होते त्यावर पंचम जॉर्जचा मुखवटा होता बरंच जुनं होतं. त्यानंतर आपल्याकडचीच एक, दोन, पाच, दहा, वीस, पंचवीस, पन्नास पैसे अशीही नाणी होती. काही कॅनडियन आणि अमेरिकन नाणीही होती. जुना एक आणा होता. मला वाटतं ढब्बू पैसाही असावा.
त्यानंतर कधीतरी तो नाद सुटला, त्याला छंदाचं स्वरुप मी देऊ शकलो नाही.
सध्या माझ्या मुलासाठी मी नव्याने तो धागा पुन्हा सुरु करायच्या बेतात आहे. अमेरिकेच्या पन्नास संस्थानांच्या नावाची क्वार्टर्स (पंचवीस सेंट्स) ची नाणी आहेत. त्यापैकी ३६ संस्थानांची आम्ही जमवली आहेत उरलेल्याच्या शोधात आहोत.
चतुरंग
12 May 2008 - 8:58 am | प्रमोद देव
विकिपिडिया वर ची माहिती बघा.
एक नमुना खाली पाहा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
12 May 2008 - 10:02 am | ऋचा
माझ्याकडे जुनी खुप नाणी आहेत.
बाकीच्या देशांचीपण आहेत,
हा लेख छान आहे
आवडला,
12 May 2008 - 10:48 am | आर्य
वाचून मजा आली...................खरच काही आठवणींना ऊजाळा मिळाला
घरी आल्यावर मी आजही खिशातील नाणी ऐक डब्यात टाकतो, वेळेवर उपयोगी पडातात.
एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडुन दोरा बांधायचा...............परत वर ओढून घ्यायचे - दाखवीन कधी तरी दाखवीन ते नाणं, आमच्या महाविद्यालयीन जीवनातील हि ऐक आठवण माझ्या ऐका मित्राने जपुन ठेवली आहे. आणि हो माझ्याकडे ही १० रू चे नाणे आहे.
१ रु चे नाणे मिस कॉल द्यायलाही उपयोगी पडायचे त्याच बरोबर कॉल ही फुकट करता यायचा - पुण्यात कॉलेजच्या ग्रंथालया बाहेर ऐक कॉईन बॉक्स होता, आमच्या सुदैवाने (तो डबा गंडला होता) त्या वरुन ४/५ सेकंद फुकट बोलता यायचे, नाणे नंतर आत पडायचे. अशा तर्हेने ऊशीरा येणार्यांना सगळे जमल्याची वर्दी देत द्यायला उपयोगी पडायचा- SMS चा पण खर्च होऊ दिला नाही दुरसंचार निगमने आमचा. (त्या बद्दल पुन्हा ऐकदा धन्यवाद)
(काही मि पाव कर दुरसंचार निगम मधे असल्याने त्या कॉईन बॉक्सचा पत्ता येथे नमुद केलेला नाही)
आपला
आर्य
12 May 2008 - 4:14 pm | मैत्र
हे नाणे माझ्याकडे होते पण घर बदलताना कुठे तरी हरवले... परत कोणाकडे पाहिले नाही... इतक्या मोठ्या आकाराचे दुसरे नाणेही परत निघाले नाही.. साधारण १७-१८ वर्षांपुर्वी होते... दोन रु. च्या मोठ्या नाण्यापेक्षा सुमारे दुप्पट व्यासाचे आणि चांगले जड होते...
दहा पैशांचे अतिशय छोटे स्टील चे नाणे छान होते... आणि त्या बरोबरचे गेंडा वाले २५ पैशांचे ही... ही नाणी नंतर बंद करण्यात आली...
12 May 2008 - 7:18 pm | देवदत्त
ते पाच रुपयाचे नाणे होते आमच्याकडेही. बहुधा ५ नाणी होती. आता मलाही माहित नाही कुठे आहेत.
13 May 2008 - 1:41 am | मदनबाण
मलाही नाणी जमवायचा छंद आहे...देशी आणि विदेशी.
माझ्या कडे काही जुनी नाणी सुद्धा आहेत्,,,,अगदी कुठल्या नवाबापासुन ते जिवाजी राव सिंधीया असे लिहले असलेल्या नाण्यापर्यन्त.....
१ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....)
१० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते.....
(संग्रहक)
मदनबाण.....
13 May 2008 - 10:30 am | रामदास
.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....)चढणारच. अल्कलॉइड आणि कॉपर सॉल्ट.
13 May 2008 - 8:23 pm | देवदत्त
१ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....)
पैशाचा नशा म्हणतात ते हेच का? ;)
१० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी.
13 May 2008 - 8:46 pm | इनोबा म्हणे
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी.
अरे,देवा! त्या गेंड्याला १० आणि २५ पैशातला फरक काय कळणार? तो गेला बिचारा पायजे तिथं. जाऊ दे!
बाकी वेगळ्या विषयाचा हा लेख आपल्याला जाम आवडला. असेच वेगवेगळे विषय हाताळून मिपाला समृद्ध करत रहावे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
14 May 2008 - 9:45 am | मदनबाण
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी.
तुम्ही बरोबर आहात.....१० पैशाच्या नाण्या मागे गेंड्याचे चित्र नाही.
14 May 2008 - 9:37 am | डॉ.प्रसाद दाढे
माझ्याकडेसुद्धा थोरल्या महाराजा॑च्या दोन शिवराया आहेत (प्रतापगडावर सापडलेल्या). तसेच माझ्या आजोबा॑नी मला पारत॑त्र्यातील भारताची काही चा॑दीची नाणी दिली आहेत (प॑चम जॉर्ज, सातवा एडवर्ड इ). त्या खजिन्यात एक निजामाचे नाणे आहे व एक ढब्बू पैसासुद्धा आहे.
तशा शिवराया पुष्कळ सापडतात पण शिवाजी महाराजा॑चे सुवर्ण होन मात्र फारच दुर्मिळ आहेत. भारतातील उपलब्ध स॑ख्या दहा-बारापेक्षा जास्त नसावी.
14 May 2008 - 10:56 am | मदनबाण
माझ्या कडील काही नाण्यांची छायाचित्रे येथे देत आहे.....
(ही तिन्ही नाणी १ पैश्याचीच आहेत....)
मदनबाण.....
14 May 2008 - 12:19 pm | स्वाती दिनेश
किती दिवसांनी ही नाणी पाहिली..मला २० पैशांचं नाणं फार आवडायचं..आणि ती मी बरीच जमाही केली होती अर्थात तेव्हा ती चलनात असल्याने,सुटे पैसे लागले की ती नाणी घरातली मोठी मंडळी वापरायची..
14 May 2008 - 2:36 pm | प्राजु
माझ्याकडेही भरपूर नाणी होती... जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 May 2008 - 10:04 pm | देवदत्त
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
आणखी काही माझ्याकडे असलेली नाणी जी वर नमूद नाहीत :) आणखीही मिळाल्यावर इथे टाकेन.
२५ पैशाच्या नाण्यावरून दिसते की तेव्हा सरकारने आशियाई खेळांकरीता भरपूर जाहिरातबाजी, प्रोमोशन (ह्याला मराठीत काय म्हणतात?) केले असेल. महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय?
तसेच ५ पैशाचे तांबे-निकेल चे नाणे माझ्याकडे आले तेव्हा थोडे वेगळे वाटायचे कारण त्यावेळी ५, १० आणि २० पैशाची अल्युमिनिअमची नाणी, २५ व ५० पैशांची जी नाणी वापरात होती ती तेवढी जड नव्हती. पण हे ५ पैशाचे नाणे त्या मानाने बर्यापैकी जड होते, नाणेफेकीप्रमाणे अंगठ्याने उडविले की मस्त खण्ण्ण्ण्णऽऽऽ असा आवाज यायचा. म्हणून मी ते नेहमी खिशात ठेवायचो.
18 May 2008 - 10:17 pm | रामदास
महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय?
होय. खेळाडूंची ने -आण करण्यासाठी वापरल्या होत्या.
एशियाड चे खेळ संपल्यानंतर सगळ्या राज्यांना सारख्या वाटून दिल्या.
महाराष्ट्र सरकारने नको म्हणून सांगीतल्यावर त्या आंध्र प्रदेशनी घेण्यासाठी होकार दिला.
एक सनदी अधिकारी (सचीव) मुख्यमंत्र्याशी चक्क भांडले.
म्हणून त्या गाड्या आपल्याकडे राहील्या.
सचीवांनी आपले वचन पाळले. एका वर्षात एशियाड गाड्यांनी महामंडळाला नफ्यात आणले.
19 May 2008 - 7:26 am | विद्याधर३१
त्या गाड्यांचे Design / बांधणी पुण्याच्या दापोडी S. T. Workshop मध्ये झाली होती...... =D>
विद्याधर
( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)
10 Jan 2011 - 2:07 pm | संग्राम
मला आलेल्या एका ढकलपत्रानुसार,
Indian coins are mainly produced in 4 cities
1. Delhi
2. Mumbai
3. Hyderabad
4. Kolkata
The production in city puts an identification mark under the year of issue. Coins produced in:
1. Delhi - have a dot
2. Mumbai - have a diamond
3. Hyderabad - have a star
4. Kolkata - Nothing beneath the year
Isn’t it amazing? Check your coins now :)
10 Jan 2011 - 8:33 pm | देवदत्त
हे माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.
तसेच ह्या बातमीनुसार २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बाद होणार आहेत. तेव्हा कोणाकडे असतील तर वापरात काढून घ्या.
10 Jan 2011 - 8:46 pm | सुनील
माहितीपूर्वक लेख आणि प्रतिक्रिया.