कातीन हत्याकांड ... दडवलेला इतिहास...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
15 Sep 2010 - 3:26 am

आन्द्रे वायदा (http://en.wikipedia.org/wiki/Andrzej_Wajda) नामक पोलिश दिग्दर्शकाचा हा २००७ सालातला सिनेमा. ( या सिनेमाला २००८चं फ़ॊरीन फ़िल्मसाठीचं ऒस्कर नॊमिनेशन होतं)

कातीन हत्याकांड हा दुसर्‍या महायुद्धातला ( त्या मानानं कमी प्रसिद्ध पण ) प्रचंड अस्वस्थ करणारा इतिहास...

कातीन हा रशियाच्या पश्चिमेकडचा स्मॊलेन्स्कजवळचा भाग...


जर्मनीने पोलंडवर ( सप्टेम्बर १९३९ )पश्चिमेकडून हल्ला करून युद्धाला सुरुवात केली त्याच सुमारास रशियानेही पूर्वेकडून पोलंडमध्ये सैनिक घुसवले...( पोलंड या रशियन सैनिकांशी लढला नाही.तसे आदेशच सैनिकांना होते). रशियन रेड आर्मीने हजारो पोलिश सैनिक आणि लष्करी अधिकारी बंदी बनवले, त्यांना स्पेशल कॅम्पात बंदी बनवून ठेवलं गेलं.... शिवाय उच्चशिक्षित, प्राध्यापक, शास्त्रज्ञ असे नागरिकही पकडले आणि एप्रिल १९४० च्या सुमारास या ( लष्करी आणि नागरी मिळून) सुमारे २२००० माणसांची स्टॅलिनच्या सहीने आलेल्या आदेशाने "कातीन"च्या जंगलामध्ये गोळ्या झाडून हत्या केली गेली...हजारो लोकांच्या कबरी खणून त्यांना गाडले गेले.... ( स्टॅलिन्चा या हत्याकांडामागे काय हेतू होता याबद्दल विविध मते आहेत. त्याच सुमारास जर्मनीशी त्यांची असलेली दोस्ती संपुष्टात येत होती..संपूर्ण पोलंड युद्धानंतर हुशार, राष्ट्रवादी नागरिकांसह पुन्हा उभा राहू नये, आणि लष्करी ताकद नष्ट व्हावी या हेतूने अत्यंत योजनापूर्वक हे हत्याकांड घडवले गेले हे मात्र खरे) ....
नंतर रशियाने पोलंडमधून माघार घेतली आणि संपूर्ण पोलंड जर्मनीने व्यापला. आणि १९४३ सालामध्ये जर्मनीला या प्रचंड कबरी सापडल्या..... ( गोबेल्सने रशियाची बदनामी करायची ही संधी सोडली नाही.त्याच्या पद्धतीने त्याने आंतरराष्ट्रीय तटस्थ निरीक्षक वगैरे बोलावून त्या कबरी उकरून काढून शवविच्छेदन करून रशियाची हरामखोरी जगापुढे आणली. जसे काही जर्मन धुतल्या तांदळासारखेच होते.. पण ते असो)...
त्यानंतर १९४५ च्या मध्यात रशियाने पुन्हा पोलंडवर कब्जा केला. युद्ध संपले. जेते म्हणून रशियनांनी अर्थातच पुन्हा इतिहास बदलून टाकला आणि हे हत्याकांड जर्मनांचेच काम आहे असा कांगावा केला. पुन्हा विच्छेदन, कबरी उकरणे, शास्त्रीय पुरावे वगैरेंनी दिशाभूल करणे वगैरे साग्रसांगीत पार पडले. आता युद्धातून उभा राहणारा पोलंड मनात एक अत्यंत भळभळती जखम घेऊन जगत होता....
प्रत्येकाच्या मनात कातीन हत्याकांडाविषयी आक्रोश होता, सारं सार्‍यांना माहिती होतं पण कम्युनिस्ट सरकारमध्ये बोलायची सोय नव्हती....

१९९० मध्ये मात्र गोर्बाचेव सरकारने या हत्याकांडाची जबाबदारी त्या काळातल्या NKVD या रशियन गुप्त पोलीसांची होती असे थोडे थोडे मान्य केले...( पण त्या संदर्भातले नि:संदिग्ध कागदपत्रांचे पुरावे दिले नाहीत.. हे एक वांशिक हत्याकांड होते हे अजिबात मान्य केले नाही ). मग खूप पोलिश नागरिकांचीआंदोलने, आंतरराष्ट्रीय दबाव वगैरे वगैरे झाले , पुन्हा संशोधन, पुरावे गोळा करणे झाले आणि काही वर्षांनी पुतिन सरकारने सर्व पुरावे द्यायचे मान्य केले... रशिया पोलंड संबंधांवर दूरगामी परिणाम करणार्‍या या घटनेची जबाबदारी अखेर रशियन सरकारने मान्य केली. त्यासंदर्भातले सर्व पुरावेही द्यायचे मान्य केले.

आन्द्रे वाज्दा नामक पोलिश दिग्दर्शकाचा कातीन हा २००७ सालातला सिनेमा. ( या सिनेमाला फॉरीन फ़िल्मसाठीचं ऑस्कर नॊमिनेशन होतं).. हा सिनेमा २०१० मध्ये अधिकृतरित्या रशियन दूरचित्रवाणीवरती दाखवला गेला.

पण यात अजूनही काही घडायचे बाकी होते. १९४० साली घडलेल्या या हत्याकांडाची सत्तरावी स्मृती जागवण्यासाठी होणार्‍या समारंभासाठी निघालेले पोलिश अध्यक्ष कॅझिन्स्की आणि त्यांच्याबरोबर लष्करी अधिकारी, उपपंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि कातीन हत्याकांडात बळी पडलेल्यांचे नातेवाईक असे ९६ लोक होते ते सारे कातीनपासून १९ किलोमीटर अंतरावर स्मॊलेन्स्क शहराजवळ झालेल्या विमान अपघातात एप्रिल २०१० मध्ये ठार झाले. कातीन हे कायमच पोलंडसाठी भयंकर दुर्दैवी आठवणी घेऊन येणार होते.

अधिक माहितीसाठी हे आणि हे पहा.
https://www.cia.gov/library/center-for-the-study-of-intelligence/csi-pub...
http://en.wikipedia.org/wiki/2010_Polish_Air_Force_Tu-154_crash
http://en.wikipedia.org/wiki/Katyn_massacre

तर अशा या घटनेवरचा कातीन नावाचा सिनेमा मी दोन दिवसांपूर्वी पाहिला.सिनेमा उत्तम आहे. वॉरफ़िल्ममध्ये असतात तशी युद्धाची दृष्ये यात नाहीत .परंतु घरी राहिलेल्या कुटुंबाच्या दृष्टीने या सार्‍याकडे कसे पाहिले जाते त्याचे छान चित्रण आहे.... चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एक पोलिश लष्करी अधिकारी रशियन रेड आर्मीचा युद्धबंदी होतो, आणि त्याच्या प्राध्यापक वडिलांनाही अख्ख्या स्टाफ़सकट क्रॅकोव युनिवर्सिटीमधून उचलून नेऊन बंदी बनवले जाते. त्याची बायको, मुलगी आणि आई त्या दोघांच्या नंतर येणार्‍या मृत्यूच्या बातम्या सहन करतात...१९४३ मध्ये कातीन हत्याकांड उघडकीस येते आणि बळी पडलेल्यांची लिस्ट तयार होते. जर्मन लोक बळी पडलेल्या जनरलच्या पत्नीचा रशियाविरुद्धच्या प्रचारासाठी वापर करायचा प्रयत्न करतात.युद्ध संपते आणि उलटा रशियन प्रोपोगंडा सुरू होतो की याला जबाबदार जर्मनच आहेत. युद्धोत्तर पोलंडपुढचे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत.. झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा नवीन सरकारशी तडजोडी करत करत राष्ट्रनिर्मितीसाठी झटायचं की मेलेल्यांच्या स्मृतीसाठी नव्या सरकारशी भांडायचं? युद्धानंतरच्या पोलिश नागरिकांची ही द्विधा मनस्थिती यात सुंदर दाखवली आहे...
शेवट हत्याकांड कसे घडले ते तपशीलवार दाखवले जाते.. बघवत नाही...स्वत: आंद्रे वायदाचे वडील या दुर्घटनेतले बळी होते. त्याने अत्यंत संवेदनशीलतेने हा सिनेमा तयार केला आहे.
चित्रपटाबद्दल मुद्दामच अधिक लिहित नाही. या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी अस्वस्थ करणारी अतिशय वाईट माहिती वाचायला मिळाली, ती शेअर करावीशी वाटली म्हणून बर्‍याच दिवसांनी काही लिहिले....

हा एक चुकवू नये असा सिनेमा आहे हे नक्की. जरूर पहा.

संस्कृतीइतिहाससमाजचित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

महत्त्वाची घटना आहे. मला अजिबात माहिती नव्हती. नक्की मिळवायचा प्रयत्न करतो. धन्यवाद.

संपूर्ण पोलंड युद्धानंतर हुशार, राष्ट्रवादी नागरिकांसह पुन्हा उभा राहू नये, आणि लष्करी ताकद नष्ट व्हावी या हेतूने अत्यंत योजनापूर्वक हे हत्याकांड घडवले गेले हे मात्र खरे

कुठे खंडप्राय रशिया आणि कुठे ते चिमुकले पोलंड ? पुन्हा उभे राहिले काय किंवा उड्या मारल्या काय, रशियाच्या खिजगणतीतही येणार नाही. मग हा संहार का ?

राजेश घासकडवी's picture

15 Sep 2010 - 7:18 am | राजेश घासकडवी

संपूर्ण राष्ट्राचं खच्चीकरण करण्याची ही योजनापूर्वक कृती वाचूनच अंगावर शहारा येतो. सिनेमा बघवेल की नाही हे सांगता येत नाही. पण ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे.

या वेगळ्या चित्रपटाची ओळख करुन दिल्या बद्धल धन्यवाद...

पाषाणभेद's picture

15 Sep 2010 - 8:30 am | पाषाणभेद

पहिल्या तसेच दुसर्‍या महायुद्धात युरोपातील अनेक राष्ट्रांच्या नागरीकांनी अनेक यातना भोगल्यात. मानवतेला काळीमा फासणार्‍या अनेक घटना या भुमीत घडल्या.
मास्तरांनी चित्रपटाची छान ओळख करून दिलीत.
मास्तरांचे हे पुनरागमन समजावे काय?

अवांतर: उजवीकडून दुसरा सैनिक सचिन तेंडूलकरसारखा दिसतोय का?

अवांतर: उजवीकडून दुसरा सैनिक सचिन तेंडूलकरसारखा दिसतोय का?

मला तर डावीकडून दुसरा नान्या सारखा दिसतोय.... ;)

आनंदयात्री's picture

15 Sep 2010 - 8:43 am | आनंदयात्री

मास्तर इज बॅक !!
ओळख अस्वस्थ करणारी आहे, २२००० या आकड्यासाठी हत्याकांड शब्द अपुरा वाटतो.

दिपक's picture

15 Sep 2010 - 9:17 am | दिपक

उत्तम माहिती. २२००० ही संख्या हादरवुन टाकणारी आहे. एप्रिल मध्ये झालेल्या दुर्घटनेमुळेच ह्या मानवसंहाराबद्दल कळाले. चित्रपट मिळवला आहे लवकरच पाह्यला हवा. मागे डंकर्क च्या धाग्यात पुष्करिणीताई ह्यावर लिहिणार होत्या.

चतुरंग's picture

15 Sep 2010 - 9:28 am | चतुरंग

२२००० म्हणजे वंशविच्छेदच म्हणायला हवा हत्याकांड हा शब्द अगदीच तकलादू वाटतो.
दुसर्‍या महायुद्धात पोलंडने केवढे अत्याचार सहन केलेत ह्याची काही परिसीमाच नाहीये! सगळीकडूनच भरडला गेलेला देश ठरला तो.
मास्तर तुम्ही करुन दिलेली ओळख आंगावर शहारे आणणारी आहे.
आधी जालावरचे दुवे बघितले तिथलीच चित्रे पाहूनच मला मळमळायला लागले. आत्तातरी हा सिनेमा मी पाहू शकेन असे वाटत नाही. मला हिंमतच गोळा करायला हवी! :(
(सत्तापिपासा ह्या एका गोष्टीखातर माणसे केवढी नृशंस होऊ शकतात हे बघितले की माणूस म्हणून जन्मल्याची लाज वाटते!)

(सर्द)चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

15 Sep 2010 - 10:26 am | भडकमकर मास्तर

चित्रपट पाहिल्यावर लगेच याबद्दल " नाझी भस्मासूराचा उदयास्त " या पुस्तकात कॅटीनबद्दल काही माहिती आहे का ते चेक केले. त्यात माहिती मिळाली नाही, पण रशियाने १९४५ मध्ये पुन्हा पोलंडला फसवले त्याची महिती वाचली...

१९४५ च्या पहिल्या काही महिन्यांत जर्मनी हरणार हे स्पष्ट झाले होते.. रशिया फौजा घेऊन वॉर्सामध्ये घुसणार होता, त्या काळात पोलंडमध्ये स्वातंत्र्यचळवळ करणारे राष्ट्रवादी नागरिक होते, त्यांना रशियाने " आम्ही येत आहोत , तुम्ही उठाव करा " असे सुचवले.... त्याप्रमाणे भूमिगत कार्यकर्त्यांनी उठाव केला... पण रशियाने ( आधीच ठरवल्याप्रमाणे आत जायला काही दिवस उशीर केला.... या मधल्या काळात जर्मनीने अर्थातच चळवळ मोडून काढली, सर्व कार्यकर्त्यांना ठार केले...( भूमिगत गटारांध्ये लपलेल्या कार्यकर्त्यांवर गॅस सोडून सर्वांना मारण्यात आले) ... मधल्या काळात रशियाची ही चाल ओळखून दोस्तांनी रशियाच्या भूमीवरून विमान उड्डाण करून पोलंडला मदत करायची रशियाकडे मागणी केली.... रशियाने त्याला नकार दिला... "तुम्हीही काही करू नका आणि आम्हीही काही करणार नाही..." .. पोलिश स्वातंत्र्य चळवळ पूर्ण दडपली गेल्यावरच ( पुन्हा काही हजार नागरिकांची निर्घृण कत्तल झाल्यावर ) रशियाने दिमाखात पोलंडमध्ये प्रवेश केला.... लाल सरकार विनाविघ्न चालावे यासाठी जर्मनांकडूनच उरलेसुरले पोलिश सैनिक / कार्यकर्ते मारण्याची ही काय भयानक कल्पना रशियाने अंमलात आणली, पचवली.

हे वाचल्यावर कॅटीन नरसंहार करायची कल्पना आणि त्याचा आदेश अगदी स्टॅलिनच्या सहीने आलेली असणार यात काहीच शंका वाटत नाही...

सहज's picture

15 Sep 2010 - 10:50 am | सहज

बीबीसीची 'बिहाइंड क्लोज्ड डोअर्स' नावाची सिरीयल होती. दुवा. त्यात पोलंडची केलेली फसगत आली आहे.

चिगो's picture

15 Sep 2010 - 10:46 am | चिगो

भयानक आहे हे... सत्तापिपासू वृत्ती माणसाला किती क्रूर बनवते याचं अस्सल उदाहरण..

इन्द्र्राज पवार's picture

15 Sep 2010 - 11:24 am | इन्द्र्राज पवार

मनुष्यप्राण्यात जन्मजात काहीतरी चांगुलपणा असतो, या समजावरचा विश्वास कापरासारखा उडून जाईल अशा पद्धतीची कृत्ये त्याच्याकडून आपल्या भावंडाप्रतीच होत असतो, याची प्रचिती या चित्रपटामुळे येईल असे प्रत्ययकारी वर्णन या चित्रपटाच्या निमित्ताने धागाकर्ते श्री.भडकमकर यांनी केले आहे. दोन्ही महायुध्दावर आधारित अनेक चित्रपट पाहिल्यामुळे आजपर्यंत तरी असे एक समीकरण बहुतांशी जनाच्या मनी ठसले आहे की, नरसंहार = जर्मन. पण लाल अस्वलदेखील या बाबतीत त्यांच्यापेक्षा रत्तीभरदेखील मागे नव्हते हेच अंतीम सत्य या निमित्ताने वाजदा यांनी जगासमोर आणले आहे. मनाच्या सार्‍या संवेदना कोळपवून टाकणारा हा "वाजदा" अनुभव आहे.

जर्मनीच्या अनेक छ्ळछावण्यापैकी ऑश्वित्झमधील दाहक अनुभवानंतरही जिवंत राहिलेली एक हंगेरियन महिला ओल्गा लेंग्येल यांच्या (श्री.जी.ए.कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल्या 'वैर्‍याची एक रात्र') या आत्मकथनाची आठवण आली.

मन घट्ट करून का होईना, चित्रपट नक्की पाहणार.

इन्द्रा

मृत्युन्जय's picture

15 Sep 2010 - 2:19 pm | मृत्युन्जय

वैर्‍याची एक रात्र वाचवत नाही. त्या छळछावण्यांमध्ये जे मारले गेले ते सुटले असेच म्हणावे लागेल. ज्यांना जिवंत ठेवले त्यांना धड आत्महत्या करवेना आणि जगणं सोसवेना अशीच अवस्था झाली असणार. शत्रुशी वैर असणे समजु शकते. शत्रुला मारणारा नराधम असेही मानुन सोडुन देता येते. पण जिवंतपणी निरपराध लोकांना ज्या यातना पोलिश छळछावण्यांमध्ये दिल्या गेल्या त्या वि़कृतपणाची परमावधी होत्या.

छळछावण्यांमध्ये फक्त ज्यूंना त्रास दिला गेला हा दुसरा एक गैरसमज. रशियाने ज्या पद्धतशीरपणे पोलंडची एक पिढी कापली अगदी तशीच आणि त्याच कारणासाठी नाझींनी कापली. फरक इतकाच की रशियाने त्यांना उदारपणे सरळसरळ मृत्युच्या खाइत लोटले तर नाझींनी वैर्‍यालाही भोगायला लागु नयेत अश्या मरणयातना दिल्या. पोलिश लोक नाझींसाठी केवळ गिनीपिग होते. त्यांच्या विकृत प्रयोगांचे बळी. जिवंतपणी त्या लोकांनी नरक अनुभवला. नाझींना त्यातुन विकृत आनंद मिळायचा ही अजुन एक दुर्दैवी बाब.

बाकी राहिता राहिली विकृत नरराक्षसांची बाब. तर त्या बाबतीत नाझी आणि लाल अस्वलंच काय तर गोरे इंग्रज तरी कुठे कमी होते? जालियनवाला बागेत केलेले नृशंस हत्याकांड, लखनौ मध्ये आपल्याच बांधवांचे रक्त प्यायला लावणे ही काय सुसंस्कृत माणसाची लक्षणे आहेत? पोर्तुगिजांनी जहाजे भरभरुन भारतातुन नेलेले गुलाम कसले लक्षण आहे? त्यातील ३०% लोक फक्त जिवंत पोचायचे. जे मरायचे ते नशिबवान उरलेल्यांच्या नशिबी जनावरांहुन वाइट वागणुक असायाची. तीच गोष्ट अफ्रिकेतुन अमेरिकन्सनी नेलेल्या काळ्या गुलामांची.

माणुसकी ने या सगळ्या देशांतुन कधीच जीव दिला होता. ब्रिटिशांनी ही साथ स्वातंत्र्यपुर्व भारतातही पसरवली आणि त्याचे पर्यवसान १९४७ च्या फाळणीच्या हत्याकांडात झाली.

अर्थात या सर्व घटनांमधुन देखील जर जास्त नृशंस वर्तणुक ठरवायची असेल तर नाझी तरीही नक्कीच जिंकतील. Stalin will be close second.

Pain's picture

16 Sep 2010 - 7:17 pm | Pain

तुम्ही मुस्लिमांनी इ.स. ८०० ते १८०० पर्यंत केलेले भारताचे कल्याण विसरलेले दिसता, आणि युरोपियनांनी उध्वस्त केलेल्या अ‍ॅझटेक, मायान व इतर द. अमेरिकेतील संस्कृती आणि स्थानिक लोकांचा संहारही.
ह्या रेघा इतक्या मोठ्या आहेत आहे की त्यापुढे नाझींची रेघ छोटी दिसते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2010 - 11:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद मास्तर! जरूर बघेन हा चित्रपट.

एका पोलिश मित्राकडून या आणि अशा अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. कम्युनिस्टांचं नाव काढलं तरी हा संतापाने लाल होतो. त्याचे आजी-आजोबांची जर्मन छळछावण्यांमधून जिवंत बाहेर आले. ऐशीच्या पुढची त्याची आजी, आजही टेबलावर सांडलेले ब्रेडक्रम्ज (पावाचे कण) गोळा करून खाते, हे ऐकून मला काय बोलावं हे अजूनही कळलेलं नाही. हा मित्र तसा लहान असतानाच कम्युनिस्टांना सत्ताउतार व्हावं लागलं. पण त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर "पाव, दूध आणि मांसासारख्या बेसिक गोष्टींसाठी रांग लावावी लागते आणि तरीही या गोष्टी मिळत नाहीत हे मी कधीच विसरू शकत नाही. माझे आई-वडील काही फार गरीब नव्हते, शाळा आणि कॉलेजमधे शिकवतात आणि आमच्यावर ही वेळ होती."
युद्धानंतर पोलंड पुरता बेचिराख झाला. एक क्रॅकॉव सोडलं तर धर्मप्रिय, कॅथलिक पोलंडमधे फारशी कुठेच जुनी चर्चेस उरलेली नाहीत यावरूनही त्याची कल्पना करता येते.
कम्युनिस्ट सत्ताउतार झाले तो दिवस पोलंडमधे आपल्या स्वातंत्र्य दिनासारखा साजरा करतात, हे ऐकल्यावर कम्युनिस्टांबद्दल सामान्य पोलिश लोकांमधे किती राग आहे याची कल्पना आली.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2010 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

भयानक ! वाचुनच अंगावर काटा आला.

मास्तर चित्रपटाचा टोरेंट उतरवुन घेतला आहे, आज मारतो डाऊनलोड.

प्रभो's picture

15 Sep 2010 - 7:14 pm | प्रभो

असेच म्हणतो.

चिंतामणी's picture

15 Sep 2010 - 10:20 pm | चिंतामणी

डाउनलोड मार. पण वरील वर्णन वाचल्यावर मला प्रश्ण पडला. तु हा सिनेमा कधी बघणार?

उत्तर शोधले.

तु गुहेतुन बाहेर आल्यानंतरच हा सिनेमा बघणार.

बरोबर ना?

पुष्करिणी's picture

15 Sep 2010 - 1:28 pm | पुष्करिणी

अतिशय प्रभावी सिनेमा आहे हा.

पोलंड म्हणजे फक्त भौगोलिक दॄष्ट्या चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे अतोनात हाल अपेष्टा नशिबी आलेला देश .

१९४० पासून जवळजवळ १७ लाख पोलिश नागरिकांना बळजबरीनं रात्री घरांवर धाडी टाकून NKVD नं( रशियन सिक्रेट पोलिस ) रशियन लेबर कॅम्प मधे हलवण्यात आलं. तेही डायरेक्ट सैबेरिया आणि कझकस्तानमधे, अतिशय थंडीत अपुर्‍या अन्न्-वस्त्रा शिवाय बैलांनी ओढण्यात येणार्‍या ट्रेनचा हा प्रवास बरेच लोकं झेलू नाही शकले आणि वाटेतच मेले.

ह्या डिपोर्टेशन मधे १९२० मधे सैनिक असणारे, सध्या सैन्यात असणारे, व्यापारी, शेतमजूर, जमिनदार यांचा समावेश.
या काळात बर्‍याच लोकांचा अंत perversion of the mind and abdication of the spirit असाही झाला .

२२ जून १९४१ ला जर्मनीनं रशियावर हल्ला केला आणि निर्लज्ज रशियानं स्वतःच्या स्वार्थासाठी लंडनहून कारभार पहाणार्‍या पोलिश सरकारशी एक करार केला की 'रशियन भूमीवर पोलिश सैन्य उभं करण्यास आम्ही परवानी देतोय आणि आमच्या हद्दीत असलेल्या सगळ्या पोलिश नागरिकांना स्वातंत्र्य दिलं जाइल, ते आता बंधक नाहीत'. रशियातल्या पोलिश राजदूतावर आपल्या नागरिकांना शोधण्यापासून ते अन्नछत्र, दवाखाने, शाळा इ. सोयी करण्याच अवघड काम येउन पडलं.

रशियन अत्याचारापासून सुटण्यासाठी १४-१५ वर्षाची मुलंही सैन्यात दाखल झाली, पुढे १९४२ मधे या सैन्याला तेहरानला नेउन तिथून इतरत्र हलवण्यात आलं .
महायुद्धसंपल्यावरही रशियाला खूष करण्यासाठी पोलंड्चा तसा बळीच गेला..

नशिबाचा खेळही असा की गेल्या वर्षी जेंव्हा पोलिश राष्ट्राध्यक्ष आणि इतर मान्यवर कातिनला श्रद्धांजली वहायला गेले असताना अपघातात सगळे नेते मरण पावले.

हे स्टॅलिनचं कातिनसंदर्भात सही शिक्क्याच पत्र

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2010 - 1:34 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर आणि माहितीपुर्ण प्रतिसाद.

ते वाचनखुणा साठवण्याचे काहीतरी करा रे.

भडकमकर मास्तर's picture

15 Sep 2010 - 2:11 pm | भडकमकर मास्तर

उत्तम माहिती.. धन्यवाद पुष्करिणी...

महायुद्धसंपल्यावरही रशियाला खूष करण्यासाठी पोलंड्चा तसा बळीच गेला..
याविषयीही अधिक माहिती मिळाल्यास आवडेल...

पुष्करिणी's picture

16 Sep 2010 - 12:50 am | पुष्करिणी

दुसरं महायुद्ध जिंकल्यावर मित्र राष्ट्रांनी पोलंड्ची कड घेउन सीमा रिस्टोअर करण्याऐवजी रशियाला पोलंडचा १९३९ साली जिंकलेला भूभाग अक्षरशः आंदण दिला. हे ब्रिट्न-रशिया -अमेरिका यांनी पोलंडच्या अपरोक्ष तेहरान बैठकीत आपसांतच ठरवून टाकलं.

नंतर झालेल्या याल्टा बैठकीदरम्यान आख्खा पोलंडच आयर्न कर्टन खाली आणायला फारसा विरोध दाखवला नाही, म्हणजे पुढची काही दशकं पूर्ण कम्युनिस्ट ऑक्युपेशन .

दुसर्‍या महायुद्धात पोलिश आर्मी हे ४ थ्या नंबरच (संख्येन )सैन्यदळ होतं, फ्रान्सपेक्षाही जास्त.
सर्वात जास्त काळ पोलिश सैन्य युद्ध लढलं अगदी स्टार्ट-टू-फिनिश. पोलिश सरकार कधीही जर्मनीला शरण गेलं नाही की त्यांनी कुठला करारही केला नाही ( जसा फ्रान्सनं केला होता ). बर्लिनला जी शेवटची लढाइ झाली त्यात रशियन आणि पोलिशच सैनिक होते. तरीही जीवंत राहिलेल्या पोलिश सैनिकांना जी व्हिक्टरी परेड झाली त्यांत मित्र राष्ट्रांनी भाग घेउ दिला नाही. हे सैनिक ,जे खांद्याला खांदा लावून लढले त्यांना बाजूला उभ राहून ही मिरवणूक बघावी लागली. कारण १९४६ साली पोलंडहा रशियाच्या आख्त्यारित आला होता आणि स्टॅलिनला दुखवायच नाही म्हणून पोलिश होम आर्मीच्या रिप्रेझेंटेटिव्हला निमंत्रित केलं गेल नाही.

जे पोलिश सैनिक पाशिमात्य देशात होते त्यांना घरी परत जाता आलं नाही कारण नव्या पोलिश सरकारनं त्यांना देशद्रोही ठरवलं. जे सैनिक पोलंड मधेच होते त्यांना मरणप्राय यातनांना सामोरं जाव लागलं कारण ते पोलिश होम आर्मीचे सैनिक होते , रशियानं त्यांच्यावर खटले, तुरूंग , फाशी हे सत्र चालू ठेवलं

म्हणजे ज्या युद्धात पोलंड्ची १८% लोकं मेली, ३८% वित्तहानी झाली, देश तोडला गेला, पुढचं जवळ जवळ अर्धशतक कम्यनिझमच्या अधिपत्याखाली घालवावं लागल त्या देशान थिओरेटिकली युद्ध जिंकूनही सर्व बाजूनं त्याला हारच पत्कारावी लागली.

भडकमकर मास्तर's picture

16 Sep 2010 - 1:57 am | भडकमकर मास्तर

खूप छान माहिती...धन्यवाद...

बीबीसीने बनवलेल्या त्या डॉक्युमेन्टरीमध्ये एक पोलिश आर्मी ऑफिसर म्हणतो की दोस्तराष्ट्रांसाठी चर्चिल कोणी महान वगैरे असेल पण आमच्यासाठी तो अनेक लुटारूंपैकी एकच राहील....
युद्ध जिन्कूनही हरायचं .... भयानक आहे हे...

मृत्युन्जय's picture

16 Sep 2010 - 10:08 am | मृत्युन्जय

चर्चिल एक गर्विष्ठ, माजोरडा आणि उन्मत्त लुटारुच होता.

इन्द्र्राज पवार's picture

16 Sep 2010 - 11:56 am | इन्द्र्राज पवार

"दोस्तराष्ट्रांसाठी चर्चिल कोणी महान वगैरे असेल पण आमच्यासाठी तो अनेक लुटारूंपैकी एकच राहील...."

~~ आणि हे फक्त त्या पोलिश ऑफिसरचेच नव्हे तर आपलेही त्याच्याबद्दल वेगळे मत काय असू शकेल.

(त्यातही वाईट वाटते की, आचार्य अत्रे यांच्यासारख्यांनी त्यांचे कॉन्ग्रेस नेत्यांसमवेतचे अकौंट सेटल करण्यासाठी चर्चिलच्या वर्तणुकीला डोक्यावर घ्यावे. चर्चिलवरील एका लेखात अत्रे म्हणतात :

"हा महापुरुष [चर्चिल] नजरेसमोर आणला म्हणजे ह्या देशातले राजकीय पुढारी डबक्यात बसून 'डराँव डराँव' करणार्‍या बेडकासारखे क्षुद्र भासू लागतात आणि दारूबंदीची बाष्कळ स्त्रोत्रे गाणार्‍या बेवकूफ गांधीवाद्यांना तर शहाणपणा यावा म्हणून चर्चिलच्या पायाचे तीर्थ मुद्दाम पाजावेसे वाटते..."

काय भाष्य करायचे ? आपल्या लेखणीने राज्य गाजविणार्‍या सिंहाची जर अशी डरकाळी, तर मग चर्चिल महान की लुटारू याची चर्चाच खुंटली. [चर्चिल मोठा का? तर तो रोज दारू पीत असे....असे अत्रे यांचे म्हणणे असेल?]

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 12:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्रिटनवर बाँब पडू नयेत म्हणून हिटलरशी तह करणं चर्चिल यांना शक्य होतं, हिटलर हात पुढे करतही होता. पण चर्चिल यांनी हे होऊ दिलं नाही. चर्चिल यांनी संपूर्ण ब्रिटनला लढण्यासाठी उभं केलं. जेव्हा पॅरिसमधल्या वास्तू आणि वस्तू वाचवण्यासाठी फ्रेंचांनी नाक घासलं तेव्हा चर्चिल "आम्ही अटलांटीकच्या पार जावं लागलं तरीही लढू" असं म्हटलं होतं.
अर्थात यामागे त्यांचा उद्देश राणीचं साम्राज्य अबाधित ठेवणं हा असला तरीही हिटलरविरूद्ध लष्करी ताकदीसह उभा रहाणारा हा एकच नेता. फ्रेंच (तेव्हा पदच्युत) जनरल गॉल यांना लढण्याची इच्छा होती पण फ्रेंच सरकारने हे होऊ दिलं नाही, पोलंडचा फडशा पडला होता आणि तेव्हा स्तालिन जर्मनीशी युद्ध करत नव्हता याचा विचार केला तर चर्चिल यांनीच हिटलरचा पराभव होऊ शकेल अशी आशा दाखवली असं म्हणायला हरकत नाही.

चर्चिल साम्राज्यवादी होते, पण ते काही भारतासाठी आणि पोलंडसाठी लढत नव्हते. कारण काहीही असेल पण चर्चिल यांनी आपल्या आधीचे ब्रिटीश पंतप्रधान नेव्हील चेंबरलेन यांची री ओढत हिटलरला मोकळं रान दिलं नाही हे अमान्य करणं चर्चिल यांच्यावर अन्यायकारक आहे.

आचार्य अत्र्यांनी (किंवा कोणीही) चर्चिल (किंवा कोणाचीही) यांची चुकीच्या कारणास्तव स्तुती केली यात चर्चिल यांचा काय दोष?
आणि/किंवा
अत्र्यांनी चर्चिल यांच्याबद्दलची चर्चा दारूपानावरून सुरू करून तिथेच थांबवली तरी आपण अत्र्यांना देव मानून ही चर्चा तिथेच थांबवण्याची गरज नाही. चर्चिल यांचे दारूपान जोपर्यंत त्यांच्या सार्वजनिक जीवनात तापदायक ठरत नव्हते/नाही तोपर्यंत आपण त्याबद्दल बोलण्याची काय गरज?

पिवळा डांबिस's picture

28 Oct 2010 - 9:45 am | पिवळा डांबिस

म्हणुनच आम्हाला ही दुर्बिटणेबाई आवडते...
आमचे भला मोठा प्रतिसाद द्यायचे कष्ट ती स्वतः उठवते!!!!
:)
चर्चिल यांचे दारूपान जोपर्यंत त्यांच्या सार्वजनिक जीवनात तापदायक ठरत नव्हते/नाही तोपर्यंत आपण त्याबद्दल बोलण्याची काय गरज?
सहमत!! चर्चिलच्या खाजगी सवयीचा त्याच्या नेतेपेदाशी संबंध लावला न जाईल तर ते अधिक मॅच्युअर!!

मृत्युन्जय's picture

16 Sep 2010 - 12:12 pm | मृत्युन्जय

देशभक्तीसाठी चर्चिल मोठा नक्कीच. त्याच्या नेतृत्वामुळेच इंग्रज वाचले. त्या आघाड्यांवर कदाचित अत्र्यांनी ते विधान केले असेल.

बाकी चर्चिल हा दरवडेखोरांचा नायक होण्यासाठी एकदम पात्रच होता म्हणा.

लंडनचे वैभव पाहुन माझातरी तिळपापड झाला होता. निमवैभव(निम्मे कसले जास्तच म्हणा) वैभव भारतामुळेच होते. त्यांच्या राणिचा मुकुटही साला आपल्या हिर्‍यावर दिमाख मिरवतो. मध्ये त्यांचा केमेरून येउन निर्लज्जपणे बोलुनही गेला की,"कोहिनूर परत करता येणार नाही, असे प्रत्येक देशाचे वैभव परत करत बसलो तर आमच्य तिजोर्‍या रिकाम्या होतील,"" अश्या देशाचा नायक होण्यासाठी चर्चिल सारखा माणुस योग्यच होता

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 12:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी चर्चिल हा दरवडेखोरांचा नायक होण्यासाठी एकदम पात्रच होता म्हणा.
अश्या देशाचा नायक होण्यासाठी चर्चिल सारखा माणुस योग्यच होता

या वाक्यांचा संदर्भ समजला नाही.

ब्रिटनची संपूर्ण भरभराट औद्योगिक क्रांती आणि वसाहती या दोन कारणांमुळे झाली हे संपूर्णपणे मान्य आहे; पैकी वसाहतींमधून त्यांनी कच्चा माल (आणि हिरे, माणकं) लुटले हे मान्य असली तरी औद्योगिक क्रांती हे (वैज्ञानिक, अभियांत्रिकी) यश नाही का?

बाकी डेव्हीड कॅमेरॉनच्या वक्तव्यावर टीका करण्यापेक्षा भारताकडून लुटले गेलेले कोहीनूर आणि इतर जडजवाहीर परत मिळवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याचा धागा काढलात तर उत्तम!
अवांतरः मागे एकदा बीबीसीच्या एका माहितीपटात लातव्हिया (किंवा लिथुआनिया किंवा बेलारूस) यांनी रशियाकडून नुकसानभरपाई म्हणून प्रचंड प्रमाणात परकीय चलन घेतल्याची माहिती ऐकली होती, त्याची आठवण झाली.

असो, हे सगळं 'कातिन'संदर्भात फार अवांतर आहे.

मृत्युन्जय's picture

16 Sep 2010 - 12:45 pm | मृत्युन्जय

ब्रिटनची संपूर्ण भरभराट औद्योगिक क्रांती आणि वसाहती या दोन कारणांमुळे झाली हे संपूर्णपणे मान्य आहे; पैकी वसाहतींमधून त्यांनी कच्चा माल (आणि हिरे, माणकं) लुटले हे मान्य असली तरी औद्योगिक क्रांती हे (वैज्ञानिक, अभियांत्रिकी) यश नाही का?

त्यांनी त्यांचा तयार माल कुठे खपवला हे आपल्याला माहित नाही का? त्यांच्या तयार मालासाठी कच्चा माल कुठुन गेला हे आपल्याला माहित नाही का? त्यांना कच्चा माल स्वस्तात कसा मिळाला हे आपल्याला माहित नाही का? त्यांनी त्यांचा तयार माल विकला जावा म्हणुन एतद्देशीय कारगिरी पद्धतशीरपणे संपवली हे आपल्याला माहित नाही का? प्रसंगी कारागिरांची अंगठे तोडले हे पण खोटे आहे का?

त्यांची औद्योगिक क्रांती यशस्वी झाली म्हणुन त्यांनी भारताची लूट केली हे अमान्य करण्यात यावे का? लूट करताना कुठलेही तारतम्य बाळगले नाही हे खोटे आहे का?

बाकी डेव्हीड कॅमेरॉनच्या वक्तव्यावर टीका करण्यापेक्षा भारताकडून लुटले गेलेले कोहीनूर आणि इतर जडजवाहीर परत मिळवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याचा धागा काढलात तर उत्तम!

आपण भीक मागितली आणि त्यांनी तो परत केला एवढे सोप्पे तर हे सगळे नक्की नाही आहे. तो परत कसा मिळवता येइल याचे उत्तर माझ्याकडे असले असते तर नक्की दिले असते? दाउदला भारतात आणण्यासाठी काय करता येइल यासारखा प्रश्न आहे हा. पण एकुणात केमेरून चे उत्तर निर्ल्लज्जपणाचा कळस होते

इन्द्र्राज पवार's picture

16 Sep 2010 - 12:41 pm | इन्द्र्राज पवार

"आचार्य अत्र्यांनी (किंवा कोणीही) चर्चिल (किंवा कोणाचीही) यांची चुकीच्या कारणास्तव स्तुती केली यात चर्चिल यांचा काय दोष?...."

~~ अदिती, सर्वात महत्वाचे म्हणजे तू हे लक्षात घे की, त्या पोलिश ऑफिसरचे उदगार काय होते ~~ "दोस्तराष्ट्रांसाठी असतील चर्चिल महान, पण आमच्यासाठी ते लुटारूच होते..."
कोण होती ही दोस्त राष्ट्रे? खुद्द इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, (आणि नंतर आयतोबा म्हणून ते रशियन अस्वल या पंगतीत येऊन बसले...) संपली यादी. इंग्लंड सोडून बाकी तीन राष्ट्रांना चर्चिलचे गुणगान गायाला काय बिघडते? त्यांच्यासाठी तो महान असेल....(आणि हे व्हाईस-व्हर्सा आहे हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.. म्हणजे चर्चिलला महान म्हटले की, इंग्रजांनी रुझव्हेल्ट, स्टालिन, गॉल किती किती 'महान' होते याच्या झांजपताका लावायच्या, चिनी फटाके उडवायचे, मग फ्रेंचानी ती माळ पुढे ओढायची इ. इ. ....हे जागतिक राजकारणात चालतेच चालते....आम्ही नाही, चाऊ आणि माऊ आमचेच भाऊ म्हणून कोकलत होतो, एकेकाळी?).

विसर ते महायुद्ध (झालेच नाही असे समज क्षणभर....) आणि निर्लेप मनाने "चर्चिल आणि भारतीय स्वातंत्र्यलढा" या रस्त्यावर तुझी मर्सिडिझ घाल आणि कर विचार आता मर्क ड्रायव्हिंग सुखाचे वाटते का? काय दिसेल तुला इथे...? भारताचा तो कट्टर दुष्मन होता....गांधीजीना साधे भेटीचे सौजन्यदेखील त्याने कधी दाखविले नाही. 'नंगा फकीर' म्हणून तो गांधींजीची टर उडवत असे.

भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न ज्या ज्या वेळी पटलावर आला त्या त्या वेळी "ब्रिटीश साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी काही मी इंग्लंडचा मुख्य प्रधान झालो नाही,' ही त्याचे घोषणा सु (की कु?) प्रसिद्धच आहे. त्यामुळे वाचवले असेल त्यांने आपल्या बुद्धीच्या जोरावर इंग्लंडला... द्यावे लागेल त्याला श्रेय हिटलरला नेस्तनाबूद करण्यामागील त्याची जिद्द..... पण भारताच्या दृष्टीने तो लुटारूच.... ओन्ली सो सोफिस्टिकेटेड, नॉट लाईक चेंगिझ खान ऑर नादीरशहा !

"देशभक्तीसाठी चर्चिल मोठा नक्कीच. त्याच्या नेतृत्वामुळेच इंग्रज वाचले. त्या आघाड्यांवर कदाचित अत्र्यांनी ते विधान केले असेल. "

~~ बिलकुल नाही मृत्युंजय....त्या आघाड्यांविषयी लिहिले असते तर वादच नव्हता, कारण चर्चिलचे ते गुण जगाने पाहिले, अनुभवले आणि गायले...त्यात आपणही आहोतच. पण म्हणून त्याच्या दारू पिण्याचे कौतुक करताना 'मोरारजी देसाई' ना शिव्या घालण्याचे काय प्रयोजन? खालील वाक्य पाहा :

"जन्मभर दारू पिऊन संयम न सोडता काय जागतिक पराक्रम करता येतात याचा चर्चिल हा एक अदभुत आदर्श आहे. त्याच्या बुटाचेसुद्धा पाणी पिण्याची मोरारजी देसाईंची लायकी नाही..."

कोणती मनोवृत्ती दर्शविते वरील वाक्य?

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विसर ते महायुद्ध (झालेच नाही असे समज क्षणभर....)

असं खरंच समजता येतं? या "जर तर" फारसा काही अर्थ नाहीये, पण ललित लेखनच करायचं असेल तरः

महायुद्ध झालं नसतं तर चर्चिल अर्थमंत्रीपदाच्या (Chancellor of exchequer) पुढे गेले असते का? नक्की कोणत्या परिस्थितीत चेंबरलेन यांना बाजूला करून चर्चिल यांना पंतप्रधान बनवलं गेलं? युद्ध संपल्यावर ब्रिटनचं पंतप्रधान कोण झालं?

चर्चिल पक्के साम्राज्यवादी होतेच होते. बोअर युद्धात त्यांची जी काही वागणूक होती ती सुद्धा तशीच होती. गांधीजींशी ते काही चांगलं वागले नाहीत हे पण मान्य! पण त्यांच्यामुळेच दुसरं महायुद्ध युद्ध सुरू राहिलं ना? चर्चिल काही सद्गुणाचे पुतळा होते असं माझं मत नाही. पण

पुन्हा एकदा जर तरः
जो पोलीश अधिकारी त्यांना लुटारू म्हणाला त्याच्याबद्दल संपूर्ण सहानुभूतीच, पण जर चर्चिल युद्ध लढलेच नसते तर? चर्चिल करार करून, ब्रिटनला बॉम्ब्जपासून वाचवत बसले असते तर त्यांना लुटारू म्हणण्यासाठी तरी पोलिश जमात पोलंडमधे उरली असती का? हिटरलला पश्चिम आघाडी आणि आफ्रिकेत लढावंच लागलं नसतं तर रश्यासुद्धा सोशालिस्टांच्या टाचेखाली आला असता का नाही?

चर्चिल वाईटच होते आणि त्यांनी सगळीच कृत्य चुकीची केली असे जे काही प्रतिसाद, सूर आहेत त्याचा प्रतिवाद सुरू आहे. सदर चर्चा कातिन, पर्यायाने दुसर्‍या महायुद्धाबद्दल सुरू आहे म्हणून मतं तिथपर्यंतच प्रदर्शित करते.

पण भारताच्या दृष्टीने तो लुटारूच.... ओन्ली सो सोफिस्टिकेटेड, नॉट लाईक चेंगिझ खान ऑर नादीरशहा !

चेंगिझ खान आणि नादीरशहाच्या जोडीला एक हिटरलचंही नाव टाकायला हरकत नाही.

पुष्करिणी's picture

16 Sep 2010 - 6:30 pm | पुष्करिणी

अगदीच अवांतर : बोअर युद्धांत गांधीजींनी स्थानिक भारतीय लोकांबरोबर ११०० स्वयंसेवकांची तुकडीही तयार केली होती. या युद्धाबद्द्ल गांधिजींना ब्रिटीशांकडून पदक पण मिळालं होतं

पुष्करिणी's picture

16 Sep 2010 - 12:58 pm | पुष्करिणी

इंद्रा, तुमचा एक भारतीय म्हणून चर्चिलवरचा राग योग्य आहे, पण स्वतःच्या देशाचं कल्याण, भरभराट पहाणं हेच प्रत्येक नेत्याच कर्तव्य असलं पाहिजे; नाही का ? या कसोटीवर चर्चिल निश्चितच खरा उतरतो.

कोहिनूर वगैरे बर्‍याचशा गोष्टी त्यांनी लढायांत जिंकल्या आहेत , किंवा वैयक्तिक भेट म्हणून देण्यात आल्या आहेत . सतराशे साठ संस्थानिकांच्या ताब्यातली ही रत्नं माणकं. एकतर इंग्रज डायरेक्ट हल्ला बोल करून आलेच नाहीत भारतात, बर्‍याचशा संस्थानिकांनी आपापली भाउबंदकी सांभाळण्यासाठी त्यांच्या शिरकावाला अटकाव केला नाही.

चर्चिलनं चॅनल आयलंड्सचं काय केलं? तो तर अधिकृतरित्या त्यांचाच भाग होता.

मृत्युन्जय's picture

16 Sep 2010 - 1:09 pm | मृत्युन्जय

कोहिनूर वगैरे बर्‍याचशा गोष्टी त्यांनी लढायांत जिंकल्या आहेत , किंवा वैयक्तिक भेट म्हणून देण्यात आल्या आहेत .

राजा रणजितसिंगाच्या अनाथ मुलाचा (दिलीपसिंग बहुधा) सांभाळ त्याचे वतन जप्त करुन ब्रिटनची राणी करत होती. वयाच्या ५ व्या वर्षापासुन तो लंडनलाच होता. त्याच्या वयाच्या १०-११ वर्षी राणीने त्याला विचारले की मी कोहिनूर घेउ का? आणि तो हो म्हणाला. मग त्याच्या हस्ते राणिला तो अर्पण करण्याचे नाटक झाले. अश्याप्रकारे कोहिनूर इंग्रजांच्या ताब्यात गेला.

पुष्करिणी's picture

16 Sep 2010 - 6:46 pm | पुष्करिणी

२९ मार्च १८४९ ला पंजाब पडलं , राजधानी लाहोर वर ब्रिटीशांचा ध्वज फडकला. त्यावेळी झालेल्या तहात कोहिनूर राणीला द्यायची मागणी केली गेली. अत्यंत गुप्तपणे हा हिरा मुंबइ बंदरातून H.M.S. Medea या बोटीमधून इंग्लंडकडे रवाना झाला. तो मग इस्ट इंडिया हाउसमध्ये ठेवण्यात आला.

१८५१ मध्ये लॉर्ड डलहौसीनं महाराजा दुलिपकरवी तो राणीला सर्वांसमक्ष फक्त पेश केला.

इन्द्र्राज पवार's picture

16 Sep 2010 - 6:54 pm | इन्द्र्राज पवार

(१) अदिती.....
"असं खरंच समजता येतं? या "जर तर" फारसा काही अर्थ नाहीये,....."

~~ इतिहासच नव्हे तर विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांच्या अनेक शाखांचा अभ्यास करताना वा संशोधन करताना बर्‍याच वेळा अशी 'जर-तर' ची गृहितके मांडावीच लागतात. तू स्वतः विज्ञान विषयात संशोधन करतेस, म्हणजेच निश्चित स्वरूपात तुला 'लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी' माहिती असणारच. तेव्हा तिथे खोलवर न जाता इतपतच म्हणत आहे की, महायुद्धांच्या न होण्याच्या 'शक्यते' वरदेखील पुढील काळात जर चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले असते तरी भारताच्या व गांधीजींच्याबाबतीतील त्यांच्या कट्टर मतात केसभरही फरक पडला नसता.

~~ प्रतिसादात तू ललितलेखनाचा मुद्दा या संदर्भात मांडला आहेस....! त्याचा इथे इतिहासातील घटनेंचा मागोवा घेताना काही उपयोग होत नसतो, कारण घडून गेलेल्या घटनांचे पटल सुस्पष्टपणे आपल्यासमोर पुराव्यानिशी ठाकले असताना ललितेचा पतंग उडविण्याची काही आवश्यकता नाही. चर्चिलने कायमपणे 'भारत ही आपल्या गोठ्यातील दुभती गाय आहे, आणि 'लेबर' पक्ष ती इथल्या नेत्यांना देण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे जर तसे झाले तर आमचे दिवाळ निघेल,' असाच दृष्टिकोन ठेवला होता. "दि नॅशनल चर्चिल म्युझियम, लंडन" दप्तरी नोंद करण्यात आलेल्या (आणि ब्रिटीश इतिहासकारांनीच लिहिलेल्या) कित्येक ग्रंथात चर्चिलच्या 'भारताचे स्वातंत्र्य' धोरणावर कडाडून टीकाच केली आहे. १९२८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या 'लेबर पार्टी'ने डिसेंबर '२९ मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या दर्जासम हिंदुस्थानालाही तसास दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडला त्यावेळी त्या दोन देशांना विरोध न करणार्‍या (आता विरोधी पक्षात बसलेल्या) चर्चिलने इथे मात्र विरोधाचे आकाशपाताळ एक केले. त्याच्याच हुजूर पक्षाच्या स्टॅन्ले बाल्डविन यांनी सरकारच्या भूमिकेचे स्वागत करून सहकार्याचा हात पुढे केला त्यावेळी तिरिमिरीने समविचारी खासदारांसह चर्चिलने पक्षच सोडला हा इतिहास आहे.

इतकेच नव्हे तर व्हॉइसरॉय ऑफ इंडिया आणि म.गांधी यांच्या या संदर्भात होऊ घातलेल्या प्रस्तावित भेटीबाबत काय उदगार काढले होते, ते वाचायचे आहेत तुला, अदिती ?

"It is alarming and also nauseating to see Mr.Gandhi, a seditious Middle Temple Lawyer, now posing as a fakir of a type well known in the East, striding half-naked up the steps of the Viceregal Palace, while he is still organizing and conducting a defiant campaign of civil disobedience, to parley on equal terms with the representative of the King-Emperor."

~ वरील भाषणाचा भाग लिखित स्वरूपातील आणि लंडन म्युझियममध्येच उपलब्ध असल्याने त्याच्या सत्यतेविषयी शंका घेण्याचे कारण नाही. काय दाखविते ही मनोवृत्ती? शिवाय खाजगीमध्ये गांधीजींच्याबद्दल त्यांनी उदगार काढलेले त्यांच्या चरित्रकारांनी नोंदविले आहेत, त्यातील एक "Gandhi should be bound hand and foot at the gates of Delhi and trampled on by an enormous elephant." ~ असली व्यक्ती झाली असेल त्या महायुध्दातील त्याच्या पराक्रमाने काही देशांच्या नजरेत महान !....म्हणून आपण त्याच्या आपल्या संदर्भातील इतिहासाची पाने दुर्लक्षीत करावीत असे नाही.

केवळ याच संदर्भात नव्हे तर भारतीयांनी 'ब्रिटिश एम्पायर' साठी दुसर्‍या महायुद्धात सैन्य आघाडीवर केलेल्या कामगिरीचा विचार करून आता पूर्ण स्वातंत्र्य देणे किती गरजेचे आहे हा प्रश्न आल्यानंतर चर्चिलने त्या अगोदर मुस्लिमांच्या पाकिस्तान निर्मितीला उघडउघड पाठिंबा दर्शविला.

खूप काही उकरता येईल या विषयावर, अदिती.....पण बाहेर निघेल ती केवळ संतापजनक सत्याची प्रेते.

(२) पुष्करिणी....

सुमारे ५०-६० वर्षे सक्रिय राजकारणात आयुष्य काढलेल्या चर्चिल यांच्या गुणवत्तेबाबत सार्‍या जगाला तीळभरदेखील शंका येण्याचे अजिबात कारण नाही. त्याच्या युध्दकालीन मुत्सद्दीपणाचे तुम्हाआम्हा सर्वांना आदरच वाटतो. हिटलरसारख्या नृशंसाला पूर्ण नेस्तनाबून करण्यात चर्चिलचा एकटयाचा जेवढा हिस्सा आहे तेवढा बाकी तीन दोस्त राष्ट्रप्रमुखांचा. माझा विरोध आहे तो फक्त त्याच्या 'भारत भूमिके'ला, ज्याची कारणमीमांसा काही प्रमाणात मी वर केली आहे.

"कोहिनूर" आणि "भवानी तलवार" हे विषय वेगळे आहेत, त्याची 'कातीन' वा 'चर्चिल' संदर्भात इथे उल्लेख नको.

इन्द्रा

पुष्करिणी's picture

16 Sep 2010 - 7:05 pm | पुष्करिणी

तुमच्या दोन्ही चर्चिल आणि अवांतर या मुद्द्यांना सहमती .

चर्चिलच्या ह्या हिरोगिरीला मिडीयाची अमाप साथ होती आणि आहे, जी इतरांना नाही लाभली .

Pain's picture

16 Sep 2010 - 7:06 pm | Pain

अवांतर: रणजितसिंग याने वयोवृद्ध असतानाही ब्रिटीशांशी यशस्वी लढा दिला. त्याच्या हयातीमधे ब्रिटीशांना त्याचे राज्य जिंकता आले नाही. कदाचित याचा सूड अशाप्रकारे घेतला गेला असावा.

Pain's picture

16 Sep 2010 - 7:08 pm | Pain

चर्चिलनं चॅनल आयलंड्सचं काय केलं? तो तर अधिकृतरित्या त्यांचाच भाग होता.

याबद्दल कुठेही वाचले / ऐकले नाही. माहिती किंवा लिंक देता का ?

पुष्करिणी's picture

17 Sep 2010 - 12:40 am | पुष्करिणी

दुसर्‍या महायुध्दाच्या काळात ब्रिटनचा फक्त चॅनल आयलंड्स (जर्सी,सार्क्,गर्न्झी, अल्डर्नी ) हा भाग जर्मनीनं काबिज केला . हा भाग म्हणजे इंग्लिश खाडीत फ्रान्स आणि इंग्लंडच्या मधे येणारी छोटी छोटी बेटं ; जी १०६६ पासून ब्रिटनच्या ताब्यात होती. ही बेटं फ्रान्सच्या किनार्‍यापासून साधारण २० मैल आणि इंग्लंडच्या किनार्‍यापासून १०० मैल अंतरावर आहेत.
फ्रान्सला जर्मनीपासून वाचवण्याच्या असफल प्रयन्तांना सुरूवातीपासूनच अतिप्राधन्य दिलं गेल्यामुळं ही बेटं चर्चिलनं सर्वात कमी महत्वाची ठरवली , कारण ह्या बेटांचा जर्मनी अथवा मित्रराष्ट्र यापैकी कोणालाच युद्धासाठी फारसा उपयोग नाही असा त्याचा समज होता.
मे १९४० पासून हे नक्की झालं की बेटं सरळ सरळ हिटलरच्या टप्प्यात येत आहेत, आणि या वेळी चर्चिलनं सगळं सैन्य या बेटांवरून काढून घेतलं. या लोकांनी डंकर्कच्या वेळी अडकलेल्या फौजांना सोडवण्यासाठी बरीच मदतही केली होती, पण चर्चिलन त्यांना कुठल्याही सैन्यदलाशिवाय जर्मन फौजांशी तोंड द्यायला वार्‍यावर सोडून दिलं.

हिटलरला याची कल्पना नसल्यानं त्यानं जूनमधे बॉम्ब टाकले आणि १ जुलैला जवळ जवळ २५००० जर्मन फौजांनी जेंव्हा बेटांचा ताबा घेतला तेंव्हा तिथं एकही सैनिक नसलेला पाहून चाटच पडले .

हिटलरला चर्चिल काय करेल याची अजिबात खात्री नव्हती,त्यामुळं मोठ्याच्या मोठ्या भिंती उभारून
किल्ले तयार केले. इकडून तिकडून पकडून आणलेले युद्धकैदयांच्या छावण्या उभारल्या, ज्यूंना वेगळं केलं, सगळ्यांना ओळखपत्र दिली, कायदे बदलले, शेतात काय उगवायच इथपासून कुठे मासेमारी करायची इथपर्यंत बंधनं घातली, १०००-१२०० लोकांना जर्मनीतल्या छावण्यात कैदेत टाकलं, रेडीओ ऐकणं दखलपात्र गुन्हा झाला. हे सगळं जवळ जवळ ५ वर्ष चालू होतं.

नॉर्मंडीनंतर १९४४ ला जेंव्हा फ्रान्सबरोबरची शेवट्ची लिंक तुटली तेंव्हा सगळा अन्न्धान्य, इंधन आणि औषधपुरवठा ठप्पं झाला. ब्रिटीश सरकारनं बेटावरच्या लोकांना काहीही द्यायला सपशेल नकार दिला कारण तेच अन्नधान्य जर्मन सैनिकांच्या हातीही पडेल म्हणून. भूकबळींची परिस्थिती इतकी बिकट झाली की शेवटी रेडक्रॉसनं तात्पुरता उपाय म्हणून ३० डिसेंबर १९४४ ला थोडा अन्नपुरवठा केला. हे ९ मे १९४५ पर्यंत युध्द्संपेपर्यंत चालू होतं.

इन्द्र्राज पवार's picture

17 Sep 2010 - 1:10 am | इन्द्र्राज पवार

"या लोकांनी डंकर्कच्या वेळी अडकलेल्या फौजांना सोडवण्यासाठी बरीच मदतही केली होती, पण चर्चिलन त्यांना कुठल्याही सैन्यदलाशिवाय जर्मन फौजांशी तोंड द्यायला वार्‍यावर सोडून दिलं."

~~ पुष्करिणी....हेच निरिक्षण मला टिपायचं होतं तुझ्याकडून. त्याच्या महानतेचा डमरू वाजवताना त्याची लबाडीही या निमित्ताने जगाला दिसणे गरजेचे आहे.

सुंदर आणि माहितीपूर्ण प्रतिसाद आहे तुझा.

इन्द्रा

Pain's picture

17 Sep 2010 - 2:13 am | Pain

एवढे सगळे टंकण्याचे कष्ट घेतलेत याबद्दल धन्यवाद.
मिपावर संपूर्ण धागा पीडीफ किंवा इतर काही स्वरूपात डाउनलोड करण्याची सोय असती तर बरे झाले असते. असो.

थोडेसे का होईना पण ब्रिटीश लोकांचे हाल झाल्याचे वाचून आनंद झाला. ते ही त्यांच्याच पंतप्रधानामुळे, म्हणजे दुधात साखर :)

धनंजय's picture

17 Sep 2010 - 3:41 am | धनंजय

(येथे सांगणे आले, की चर्चिलबद्दल मला फारसे प्रेम नाही. येथे बघा.)

पण ब्रिटनकडे जितक्या काय सैनिकी तुकड्या होत्या त्या कुठेकुठे पाठवायच्या याबद्दल त्या काळात तडकाफडकी निर्णय झाले असतील. त्यातील काही चुकले असतील, काही शहाणे ठरले असतील.

शिवाजी महाराजांनीसुद्धा कधीकधी किल्ले-मुलुख सोडण्याचा दु:खद निर्णय घेतलाच ना? त्यांच्याकडेसुद्धा सैन्य मर्यादित होते म्हणूनच ना? प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक-एक तुकडी मृत्युमुखी दिली नाही.

चर्चिलबद्दल टीका करण्यालायक खूप आहे. पण त्या मुद्द्यांपैकी हा मुद्दा नाही, असे मला वाटते.

(कदाचित पुष्करिणी यांनाही हेच म्हणायचे आहे. मात्र प्रतिसाद-उपप्रतिसादांत मी जरा हरवलेलो आहे.)

इन्द्र्राज पवार's picture

17 Sep 2010 - 10:45 am | इन्द्र्राज पवार

श्री.धनंजय....

तुम्ही 'येथे बघा' असे सांगितले म्हणुन 'तिथे बघण्यास' गेलो...पण पहिल्यांदा "पान सापडले नाही"...असा संदेश तर दुसर्‍या खेपेस चक्क "तुम्हास या पानाशी पोहचण्यास अनुमती नाही..." असा धमकीवजा फटका. असो...तुमचे (अन्य) लिखाण मी वाचत असतोच, त्यामुळे 'येथे बघा' ठि़काणी चर्चिलबद्दल जर काही लिहिले असेल तर त्या लिखाणाचा पोत काय असेल याची कल्पना मी करू शकतो.

बर्‍याच वेळा आम्हा भारतीयांची समजुत अशी होते की (किंबहुना झालेली आहेच...) हिटलरला संपविणारा चर्चिल म्हणजे जणुकाही वेगळ्या मुशीतील सेनानी ज्याच्या पाठीशी साक्षात आकाशातील बाप उभा होता. युध्दनेतृत्व आणि देशनेतृत्व यात जमिनअस्मानाचा फरक असतो (अर्थात हा वेगळा विषय होईल..) त्यामुळे युध्दभूमीवरील यशाच्या भांडवलावर जनतेचा आदर (जो विशिष्ट काळापुरताच असतो...) मिळतो, पण देशाचे शकट चालविता येत नसते हे खुद्द चर्चिलाच युध्दानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत समजले होते, तर "वॉर हीरो" ला त्याची जागा काय आहे हे सिव्हिलमधील नेता वेळ आली की दाखवून देत असतोच (प्रेसि. ट्रुमन वि. जन.मॅकआर्थर).

त्यामुळे ज्यावेळी चर्चिल आणि भारत हा विषय पटलावर येतो त्यावेळी चर्चिलने दुसर्‍या महायुद्धात काय पराक्रम केला हे दुय्यम ठरते.

इन्द्रा

मृत्युन्जय's picture

17 Sep 2010 - 11:25 am | मृत्युन्जय

ज्यावेळी चर्चिल आणि भारत हा विषय पटलावर येतो त्यावेळी चर्चिलने दुसर्‍या महायुद्धात काय पराक्रम केला हे दुय्यम ठरते.

१००% सहमत.

धनंजय's picture

17 Sep 2010 - 8:44 pm | धनंजय

दुवा चुकलेला होता :-(

विन्स्टन चर्चिल यांनी भारताला सुखासुखी स्वतंत्र होऊ दिले असते का?
http://mr.upakram.org/node/1421

तसा काही अभ्यासपूर्ण वैचारिक लेख नाही :-) - भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधात १९३१ साली चर्चिलने भाषण दिले होते, त्याचे मराठी भाषांतर आहे...

इन्द्र्राज पवार's picture

18 Sep 2010 - 1:49 pm | इन्द्र्राज पवार

श्री.धनंजय....
दुवा वाचला.....आणि गंमत म्हणजे तुम्ही ती चर्चा दोन वर्षापूर्वी घडवून आणली होती हे मी वाचन संपल्यानंतर पाहिले. कारण मी विचार करीत होतो की, 'तिथे' मला उत्तर देता येईल का?....पण एकतर तिथे मी सदस्य नाही सबब त्याचे उत्तर शोधण्याचा प्रश्न उदभवला नाही, आणि तशातच त्या चर्चेनंतर कालावधीही बराचसा गेला आहे.

'त्या' अनुषंगाने 'इथे' काही मते व्यक्त केली तर मिपा नियमांचा भंग होईल का? कुणाला विचारावे?

इन्द्रा

पुष्करिणी's picture

17 Sep 2010 - 4:00 pm | पुष्करिणी

मलाही दिलेला दुवा दिसत नाहीये.

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मला चर्चिल सर्वगुणसंपन्न नेता / व्यक्ती नाहीच वाटत, पण त्याचे नेतृत्वगुण नक्कीच भावतात ( त्याच्या देशाच्या दॄष्टीनं पहाता). भारत किंवा आंतरराष्ट्रीय दॄष्टीकोणातून पहाता वेगळे मुद्दे समोर येतात.

वर इंद्रराज पवार म्हणतात की हिटलरचा बिमोड केला म्हणून भारतीय चर्चिलला डोक्यावर चढवतात्..पण आझाद हिंद सेना नाझी / जपान्यांबरोबर होती. सुभाषबाबूंनी हिटलरची भेटही घेतली होती; त्यामुळे सगळ्या भारतीयांचं चर्चिलबद्द्ल उजवं मत असावं असं वाटत नाही.

मृत्युन्जय's picture

17 Sep 2010 - 4:03 pm | मृत्युन्जय

नेताजींची नाव अजुनही दुसर्‍या युद्धाच्या गुन्हेगारांमध्ये येते म्हणे. कारण त्यांनी हिटलरची मदत स्वीकारली होती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2010 - 6:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता यात चर्चिल यांचा हात नसावा, नाही का?

मृत्युन्जय's picture

17 Sep 2010 - 11:54 pm | मृत्युन्जय

छे छे. चर्चिल सारखा सहृदय आणि सज्जन माणूस असा खोडसाळपणा करेल असे वाटत नाही मला.

Pain's picture

16 Sep 2010 - 7:01 pm | Pain

चर्चिल त्याच्या देशासाठी जसा होता त्या तुलनेत तेव्हाचे किंवा आत्ताचे राजकारणी (आपल्या देशासाठी) काहीच नाहीत असे त्यांना म्हणायचे आहे.

यशोधरा's picture

15 Sep 2010 - 2:36 pm | यशोधरा

सुरेख प्रतिसाद पुष्का.

मध्यंतरी लोकप्रभा मध्ये पोलंडवर अतिशय सुरेख लेखमाला येत होती. अजूनही येत आहे का, कल्पना नाही. त्यात लेखकाने पोलंडवर झालेले अत्याचार, अजूनही त्याच्या जपलेल्या खुणा, एकूणातच ह्या अत्याचारांचे तेथील जनमानसावर झालेले व आजही टिकलेले मानसिक परिणाम ह्यासंबंधी अतिशय प्रभावी पद्धतीने लिहिलेले आहे. वाचताना सुन्न व्हायला होते.

यशोधरा's picture

15 Sep 2010 - 4:09 pm | यशोधरा

प्रकाटाआ.

चिंतातुर जंतू's picture

15 Sep 2010 - 2:00 pm | चिंतातुर जंतू

पोलंडचा एकंदरीत इतिहास हा फारच करुण आहे. दुसर्‍या महायुध्दाअगोदरही रशिआ, ऑस्ट्रिआ आणि जर्मनीसारख्या सत्तापिपासू राष्ट्रांच्या आक्रमणांपायी पोलंड दबला आणि विभागला गेला होता. पहिल्या महायुध्दात दोस्त राष्ट्रं जिंकली तेव्हा कुठे पोलंडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून काही वर्षं जगता आलं, पण दुसर्‍या महायुध्दानं पुन्हा ते सर्व नष्ट केलं.

युरोपातलं एक संस्कृतीसमृध्द पण दुर्लक्षित राष्ट्र म्हणून पोलंडची पहिल्यांदा जाणीव ग्युंटर ग्रासच्या 'टिन ड्रम' या कादंबरीनं करून दिली. या कादंबरीवर निघालेला चित्रपटही खूप चांगला आहे. त्याला परकीय चित्रपटासाठीचं ऑस्कर आणि कान महोत्सवामध्ये पारितोषिक होतं. खुद्द आंद्रे वायदा ('कातीन'चे दिग्दर्शक) यांच्या इतर चित्रपटांत होणारं पोलंडचं दर्शन अतिशय हृद्य आहे. 'अ‍ॅशेस अ‍ॅन्ड डायमंड्स' (१९५८) मध्ये दुसर्‍या महायुध्दाच्या अखेरची सत्तास्पर्धा दिसते. तर 'मॅन ऑफ मार्बल' (१९७६) मध्ये लेक वॉवेन्सा यांच्या सॉलिडॅरिटी चळवळीचा काळ दिसतो. वायदांच्या 'दॉन्तों'(१९८३) या चित्रपटात त्यांनी त्यांचे आस्थाविषय फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मांडून त्यांना वैश्विक परिमाण दिलं.

हे सर्व (आणि त्यांचे इतरही अनेक) चित्रपट पाहण्यासारखे आहेत. मी त्यांची गणना जगातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकांमध्ये करतो.

मराठमोळा's picture

15 Sep 2010 - 2:25 pm | मराठमोळा

मास्तरांचा लेख बर्‍याच दिवसांनी वाचला.. :)
लेख वाचुन डोक्यात झिणझिण्या आल्या.. काहीच समजेना..
सविस्तर प्रतिसाद.. वेळ मिळाल्यास..

मास्तरांनी खुप दिवसाने किबोर्ड वरची धुळ झटकली ते बर केलं.
या घटने बद्दल फार थोडी माहिती होती.
पुष्करिणीच्या प्रतिसादानेही माहितीत अजुन भर पडली.
शोधुन पाहातो मिळतो का हा चित्रपट.

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Sep 2010 - 3:39 pm | डॉ.प्रसाद दाढे

पोलंडवर अनन्वित अत्याचार झालेले आहेतच. परंतु नुकतेच मी गिरीश कुबेरांचे 'युद्ध जिवांचे' हे
रासायनिक व जैविक युद्धांवरचे पुस्तक वाचले आहे; त्यावरून एकंदरीत मानवजात ही अति; अतिशयच क्रूर
आहे (ज्यात कोणीही अपवाद नाहीतः अमेरिकन, रशियन, इंग्लिश, ज्यू, अरब, जर्मन, जपानी, चिनी कोणी कोणी
अपवाद नाहीत) अश्या निष्कर्षाला मी आलो आहे. त्या पुस्तकाचा एव्हढा सुन्न इफेक्ट माझ्यावर झाला
आहे की माझ्या संवेदनाच बधीर झाल्या आहेत..
खरं म्हणजे हे सगळे नरसंहार वाचून अजून मानवजातीचा कुठलाच प्रकार (उदा ज्यू वा पोलिश लोक)
संपूर्ण नष्ट कसा झाला नाही ह्याचेच आश्चर्य वाटू लागते. बिचारे माळढोक पक्षी किंवा चित्त्यासारखे प्राणीच
पूर्णपणे नाहीसे व्हायच्या मार्गावर आहेत..

गणेशा's picture

15 Sep 2010 - 5:06 pm | गणेशा

शहारा

गणेशा's picture

15 Sep 2010 - 5:06 pm | गणेशा

शहारा

गणेशा's picture

15 Sep 2010 - 5:06 pm | गणेशा

शहारा

युयुत्सु's picture

15 Sep 2010 - 5:51 pm | युयुत्सु

चित्रपट बघवेल की नाही हे माहित नाही पण ओळ्ख मात्र सुंदर

ऋषिकेश's picture

15 Sep 2010 - 11:48 pm | ऋषिकेश

बरेच दिवसांनी आलात पण एकदम धमाका केलात..
अतिशय छान लिहिले आहे.. आधी इतिहास समजावून मग चित्रपटाबद्दल माहिती देणं आवडलं..
पोलिश जनतेवर रशियाचे अत्याचार किंवा ज्यूंवरचे अत्याचार हे नृशंस शब्द छोटा म्हणावा असे आहेतच तसेच नाझींचे जिप्सी लोकांना संपवणे, विविध युरोपियनांनी रेड इंडियन्सना नामषेश करणे, ऑस्ट्रेलियातील स्टोलन जनरेशन्सचा इतिहास, तिबेटींवर लाल चायनाचा संहार हे सारे याच पठडीत मोडणारे
एक माणूस म्हणून आपली असहायता अधिक ठळक करणारी उदाहरणे.

ज्ञानेश...'s picture

15 Sep 2010 - 6:41 pm | ज्ञानेश...

पुष्करिणी यांचा प्रतिसादही आवडला.
चित्रपट नक्की बघणार.

वाटाड्या...'s picture

15 Sep 2010 - 8:44 pm | वाटाड्या...

कोण म्हणेल युद्धस्यः कथा रम्या...कदाचित आतापर्यंत फक्त.

मास्तर बर्‍याच दिवसांनी छान लेखन..धन्यवाद...विकीपिडीयावरची (mass grave) ची चित्रं अशीच जिवघेणी आहेत.

इच्छुकांसाठी....
१. असाच एक अजुन चित्रपट फक्त विषय वेगळा...अर्थात मनुष्याचाच तेही त्याच्या नॄशंस हत्यारी स्वभावाचा..(The Devil Came on Horseback) नावाचा.

२. Behind Enemy Lines (2001) - नक्की पहावा असा चित्रपट. ह्या मधे सुद्धा अशीच काही नॄशंस सीन्स आहेत.

- वाटाड्या...

परीक्षण वाचुन सुन्न झालो.

सिनेमा बघायचा म्हणजे मानसीक तयारी करूनच बसावे लागेल.

भ.मा. परीचयाबद्दल धन्यवाद.

धनंजय's picture

16 Sep 2010 - 2:29 am | धनंजय

वाचण्यालायक लेख आणि चर्चा. धन्यवाद.

हे हत्याकांड जितके मोठे आहे, त्या मानाने अप्रसिद्ध आहे. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या आंतरराष्ट्रीय राजकरणाचे वेगवेगळे पैलू वर प्रतिसादकांनी सांगितलेलेच आहेत.

("एनिग्मा" नावाच्या चित्रपटात या हत्याकांडाचा उल्लेख बघितला, तेव्हा याच्याबद्दल मी पहिल्यांदा ऐकले.)

नंदन's picture

17 Sep 2010 - 5:55 am | नंदन

लेख. पुष्करिणी यांचे प्रतिसादही आवडले. कॅझिन्स्कींच्या विमानाला झालेल्या अपघातावेळीच प्रथम ह्या हत्याकांडाबद्दल वाचलं होतं. तिथे श्रद्धांजली वाहून परत येत असताना अपघात होणे हा '...अकस्मात तोही पुढे जात आहे' चा दुर्दैवी पडताळाच.

वाचनिय लेख आणि चर्चा. चित्रपट बघायला धीर नाही होणार.

मास्तरांचे नेहमी प्रमाणे सुंदर परिक्षण!
पुष्करिणी, पवार्,म्रुत्युंजय, यांच्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आनंदयात्री's picture

18 Sep 2010 - 5:58 am | आनंदयात्री

हेच म्हणतो.

हिस्टरी चॅनल बघत दिवस काढल्याचा फील आला :)

रंगासेठ's picture

28 Oct 2010 - 9:09 am | रंगासेठ

मास्तर हा चित्रपट कालच पाहिला. सुन्न झालो. तुमच्या परिक्षणात दिल्याप्रमाणे रशियाचा नालायकपणा दिसून येतो.
चित्रपटात या हत्याकांडाचा जर्मनी व नंतर रशिया हे एकमेकांविरुध्द कसे करतात यातून त्यांच्या निगरगट्टपणाची जाणीव होते. या चित्रपटाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

मेघना भुस्कुटे's picture

30 Oct 2010 - 10:59 pm | मेघना भुस्कुटे

थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमधे आज 'कातिन' पाहिला.
तुमच्या अभ्यासपूर्ण पार्श्वभूमी-लेखनाचा प्रचंड उपयोग झाला, मास्तर. धन्यवाद.