नक्को नक्को रे!

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
29 Aug 2010 - 5:59 pm

"केतन, नाकात बोटं नको घालू.... "

"केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? "

"अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... "

एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते.

खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का? थोडा वेळ ऐकल्याचे दाखवतील कदाचित! पण जरा तुमचे लक्ष दुसरीकडे वळले की पुन्हा आपले ह्यांचे उद्योग सुरुच! मग तरीही आपण त्यांना सारखे सारखे का हटकत राहतो? त्या ऐवजी त्याला एखाद्या खेळात, गाण्यात गुंतवता आले तर? उदाहरणार्थ, तिथे ती माता तिच्या मुलाचे लक्ष रस्त्यावरच्या विविध गोष्टींकडे वेधू शकली असती.... जसे, तुला रस्त्यात किती दिव्याचे खांब दिसतात? आपण रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा मोजूयात. किंवा समोरच्या फळवाल्याकडे कोणती फळे दिसत आहेत रे? इत्यादी इत्यादी. पण ती स्वतःच दमलेली असल्यामुळे तसे करु शकत नसेल कदाचित!

आपण मुलांशी अनेकदा संवाद साधायचे विसरून जातो. आणि ती बोअर झाल्यावर जे काही करतात त्यावर नकारात्मक शेरे ओढत राहातो. माझ्या मैत्रिणींच्या, परिचितांच्या अनेक मुलांमध्ये मी हीच गोष्ट पुन्हा पुन्हा पाहिली आहे. मोठ्यांना जेव्हा लहान मुलांकडे लक्ष द्यायला फुरसत नसते, ते आपल्या गप्पा-कार्यक्रमांत मश्गुल असतात तेव्हा ही मुले आपल्या आईवडीलांचे लक्ष वेधून घ्यायला असेच काहीबाही उद्योग करत असतात. कधी पाणीच सांडून ठेव, कधी पसारा कर, कधी कोणा दुसऱ्या पोराला त्रास दे, कधी मांजरीची शेपटीच ओढ.... त्यात त्या मुलांचा तरी काय दोष असतो म्हणा! त्यांच्यातली अपार ऊर्जा त्यांना स्वस्थ थोडीच बसू देणार? त्यांना तुम्हाला काही तरी इंटरेस्टिंग दाखवायचे असते.... अगदी रस्त्यात पडलेल्या चॉकलेटच्या चांदीपासून ते त्यांच्या मोज्याला पडलेल्या भोकापर्यंत! पण आपल्यालाच त्यांच्याकडे पहायला वेळ नसतो. रोजच्या रामरगाड्यात दमछाक होईपर्यंत धावताना त्यांच्या चिमुकल्या विश्वाचा आपल्यालाच अनेकदा विसर पडतो. ती मात्र सदैव आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जायला उत्सुक असतात. आपल्यालाच त्यांच्या विश्वात डोकावायची सवड नसते. आणि त्यातून कित्येक वेळा आपला धीर संपुष्टात येतो....

एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर एकदाची बस आली. केतनचे बखोट पकडून केतनची आई बसमध्ये चढली. चढतानाही सूचनांचा सपाटा आणि तोंडाचा पट्टा चालूच होता. "नीट चढ. तिथे हात लावू नकोस - हात खराब होतील. पुढे धावू नकोस. खिडकीतून हात बाहेर काढू नकोस. तोंडात बोटं घालू नकोस.... " नकोस, नकोस, नकोस आणि पुन्हा नकोस! मान्य आहे, सर्व काही त्याच्याच भल्यासाठी आहे. पण सारखा 'नको' चा पाढा लावणे टाळून हेच वेगळ्या पद्धतीने समजावता आले असते. आजकालच्या पद्धतीप्रमाणे पालक हल्ली एकाच मुलाला जन्म देणे पसंत करतात....त्याच्यावर सर्व वस्तूंचा वर्षाव करतात, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवितात आणि मग त्याचबरोबर त्या मुलाची प्रत्येक कृती स्कॅनरखाली येते. त्यातून असा 'ना' चा पाढा असेल तर अजूनच आनंद!

चिमुकला केतन थोड्याच वेळात बसच्या खिडकीतून रस्त्याकडे पाहत रमून गेला व त्याच्या आईने हुश्श करीत आपले लक्ष इतरत्र वळवले. आतापुरता तरी तो स्थिरावला होता. सगळीकडे टकामका डोळ्यांनी पाहत होता. पण त्याची ही स्थिती फार काळ टिकणारी नव्हती. हे बहुधा त्याच्या आईला देखील माहित असावे. म्हणूनच ती डोके मागे टेकवून, डोळे मिटून थकलेल्या बॅटरीज रीचार्ज करत असावी. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरून एक उंट जाताना केतनला दिसला. तो लगेच, "मम्मा, उंट बघ" म्हणून किंचाळत खिडकीतून हात बाहेर काढू लागला. "केतन, किती वेळा सांगितलंय असला वेडेपणा करायचा नाही म्हणून! आधी हात आत घे.... पुन्हा हात बाहेर काढायचा नाही.... आणि असा उसळ्या मारू नकोस रे, माझा ड्रेस खराब होतोय.... " तेवढ्यात त्यांचा स्टॉप आला. मायलेक दोघेही खाली उतरले.... लेक आईच्या हाताला लोंबकळत होता. "अरे, असा लोंबकळू नको रे.... ", ''आता हट्ट करू नको रे!'' बसचा थांबा आला, प्रवास संपला पण केतनच्या आईचा 'नको' प्रवास अद्याप जारीच होता.....

--- अरुंधती.

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

वावरमुक्तकसमाजजीवनमानप्रकटनमतविरंगुळा

प्रतिक्रिया

हम्म!
असं होतं खरं!
छोटे लेखन मुद्देसूद आहे, आवडले.

विलासराव's picture

29 Aug 2010 - 6:07 pm | विलासराव

नकोचा पाढा वाचण्यापेक्षा वेगळ्या पध्दतीने नक्कीच समजावता येईल असे वाटते.

आळश्यांचा राजा's picture

29 Aug 2010 - 8:15 pm | आळश्यांचा राजा

नकोचा पाढा वाचण्यापेक्षा वेगळ्या पध्दतीने नक्कीच समजावता येईल असे वाटते

आम्हाला आमचा ''केतन'' मिळेपर्यंत असंच वाटत होतं! ;-) नंतर आमची पण केतनची आई झाली!

विलासराव's picture

29 Aug 2010 - 9:24 pm | विलासराव

आपली माघार आहे बुवा.
मला वाटलं ते लिहिले आहे.
आम्हाला काय केतन नाही आहे.

घरघर की कहानी..!
हे असंच होत असतं. लेख आवडला.

jaypal's picture

29 Aug 2010 - 6:13 pm | jaypal

nose लेख आवडला

मला अगदी १००% नाही पटलं. कुठेतरी आईला वाईटपणा घेऊन, शिस्त ही लावावीच लागते. तू म्हणतेस - नकारात्मक शेरे कमी नाही का करता येणार? पण या जगात अनंत धोके आहेत, खाचखळगे आहेत ते नन्नाचा पाढा म्हणूनच दाखवणं जरूरी आहे. हां आता अगदी मायक्रोमॅनेज करायला जाऊ नये पण मुलांना मार्गदर्शन जरूर अगदी १०१% केलच्च्च्च पाहीजे.
आई हा पहीला गुरु असते. मग गुरुनी काय फक्त सकारात्मक , गोड गोड शेरे द्यायचे का?

जर प्रसंगातल्या आईनी केतनला सांगीतलं असतं बाळा जरा त्या फुटाणेवाल्याकडे बघ वगैरे तर तो रमला असता पण पुढे कधीतरी "नाकात बोट घालू नको" हे तिला सांगावं लागलंच असतं एनीवे.

आता लेखाबद्दल - इवलासा खसखशीच्या दाण्यासारखा विषय घेऊन तो फुलविण्याची तुझी हातोटी काही औरच ग अरु. फार सुरेख लिहीतेस. प्लीज कीप इट अप.

लेख खूप छान आहे. पण शुचिने लिहिल्याप्रमाणे कधी कधी शिस्त लावणे आवश्यक असतेच. ती आई सुद्धा परिस्थितीचा बळी असावी. मुलांना एकसारखे ओरडू नये हे मनातून माहित असतं,आपलं चुकतंय हेही कळतं पण दिवसभर ऑफिसातून हमाली करून, बाजारहाट करून नंतर असल्या अवखळ मुलाला सांभाळणं खरंच खूप कठीण वाटतं. मग "नको" चा शॉर्टकट बरा वाटतो.

अर्धवट's picture

29 Aug 2010 - 8:59 pm | अर्धवट

लेख आवडला..

शिल्पा ब's picture

29 Aug 2010 - 9:44 pm | शिल्पा ब

हम्म...मलाही आधी असंच वाटायचं...मी असं करेन वगैरे...
पण मग मी आई झाले अन माझी पोरगी प्रचंड उद्योगी अन प्रचंड उर्जा असलेली आहे...
प्रेमाने सांगून ऐकत नाही, रागावले तर नाहीच नाही...रडत बसते...डोळ्यात थेंब नसतो पण आवाज ठणाणा..
आमचं संपूर्ण घर क्रेयॉनने रंगवलेलं आहे...patio सुद्धा...काही विचारू नका..
बाहेर गेलं कि इथं धपाटे घालता येत नाहीत अन फार जोरात ओरडता येत नाही हे तिला आता माहिती झाल्यामुळे जिकडे तिकडे पळत सुटते...
प्रत्येक दुकानातून भसकन वस्तू बाहेर घेऊन येते...इतकं प्रचंड दमायला होतं

शेवटी वैतागून तिला शाळेत टाकलंय..

हा हा सहीच. :)
गोड दिसते ग तुझी छकुली.

रेवती's picture

29 Aug 2010 - 10:34 pm | रेवती

आमचाही छकुला अस्साच गोड आहे!;)
शुचितै, जातीयेस का घेउन चार दिवस तुझ्याकडे?;)
काही तासात साभार परत!

शुचि's picture

29 Aug 2010 - 10:51 pm | शुचि

हा हा ...... दे पाठवून. :)

शिल्पा ब's picture

29 Aug 2010 - 10:53 pm | शिल्पा ब

अगं इतका सोस असेल तर माझी पण घेऊन जा चार दिवस.. ;)
तेवढीच मला सुट्टी.. :-)

ए काय हे :)
तुझी छकुलीही पाठव. पाऊस पडतोय माझ्यावर. गोकुळ झालय माझं घर :)

अरुंधती's picture

30 Aug 2010 - 6:23 pm | अरुंधती

काय गं, सगळ्याजणी ''यशोदा'' होण्याची एकमेकींना गळ घालत आहात!!! :-)

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

आपल्याला वाटतं की सध्याची मुलं फारच उसळणारी, प्रचंड ऊर्जेची आहेत वगैरे.... कदाचित सध्याच्या जगात त्यांना टिकण्यासाठी त्याची गरज असेल.... मुलांना वळण लावायलाच हवे, पण ते करताना आपण ''अमुक करू नकोस'', ''तमुक करू नकोस'', ''इकडे जाऊ नकोस'', वगैरे सांगण्याऐवजी काय कर, किंवा कसे वाग हे नक्कीच सुचवू शकतो. तीच गोष्ट सकारात्मकतेने सुचवू शकतो. मात्र ते करताना भरपूर पेशन्स हवा!
कल्पना करा, आपण जसं मुलांना ''अमुक करु नकोस'' वगैरे दिवसातून कैक वेळा सांगतो, तसं आपल्याला उठता-बसता, जाता-येता कोणी सांगितलं तर?????!! काय अवस्था होईल नाही आपली? :D

मुलांमधली अफाट ऊर्जा सकारात्मकतेने वापरायचे उपाय आपणच शोधून काढायला हवेत! :-)

अरुंधती तुझे म्हणणे बरोबर आहे. तशी सकारात्मक वागणारी एकमेव आई माझ्या बघण्यात आहे. पण एकूणच तिचा पेशन्स फारच भयंकर वरच्या दर्जाचा आहे. ज्या व्यक्ती मुलांना चांगल्या रितीने सांभाळू शकतात त्या जगातली बरीचशी कामे लिलया करू शकत असावीत. त्या मैत्रिणीच्या घरी ती आणि तिचा नवराच नाही तर कोणतेही आजी आजोबा चिडलेले कधीही बघण्यात आले नाहीत. (अर्थात ते माझ्यासमोर कशाला चिडतील म्हणा!). सगळेजण शांतपणे आपापली कामे सतत करत असतात, साहजिकच मुलांना तीच सवय लागते.

कवितानागेश's picture

30 Aug 2010 - 6:53 pm | कवितानागेश

सध्याची मुलं फारच उसळणारी, प्रचंड ऊर्जेची आहेत वगैरे..
...हा अती 'लसीकरणाचा' साईड इफेक्ट असतो.
हल्लीचे आई-वडील देखिल आपापल्या जगात बुडालेले, गांजलेले वगरै असतात, त्यामूळे आपोआपच लहान मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेले चाळे तीव्र होतात.
अर्थात, हा माझा २०-२५ भाचे-भाच्यांवरुन केलेला 'थेअरेटिकल सर्व्हे' झाला.....
माझ्यावर वेळ येइल तेंव्हा मी बहुतेक कौल टाकेन,

तुम्ही मुलाना कसे गप्प बसवता?

..डोळे वटारून,
धमकावून,
त्यांच्यापेक्षा वरच्या पट्टीत आरदाओरडा करून,
हातानीच धपाटे घलून,
पट्टीनी मारुन,
ऑफिसमध्ये पळून जाउन,
स्वत:च्याच आईकडे तक्रार करून

तोत्तोचान पुस्तक वाचायला हवे केत्तनच्या आईने

असुर's picture

31 Aug 2010 - 4:47 am | असुर

पोरांनी दंगा नाय करायचा तर काय आपण करायचा का??
माझी भाची आहे, वय वर्षे ४, पण मेजर दंगेखोर आहे. तिची आई तिच्यामागे धावून पार दमून जाते.
ती माझ्याकडे खेळायला आली की रन्-टाईम गोष्टी बनवणे हा माझा उद्योग, आणि या सगळ्या गोष्टी डोळे मोठ्ठे करुन ऐकणे तिचा उद्योग! त्यामुळे मामा-भाचीचे दिवस सुखात होते! :-)
आता परत गेलो पुण्यात की परत सुरु हेच!

-- असुर

इंटरनेटस्नेही's picture

3 Sep 2010 - 3:37 am | इंटरनेटस्नेही

छान!

(मिसळपाव वरचा केतन)

अरुंधती's picture

3 Sep 2010 - 3:54 pm | अरुंधती

प्रतिसादाबद्दल धन्स सर्वांचे! :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2010 - 4:20 pm | बिपिन कार्यकर्ते

हे असेच चालायचे हो. खरं तर ती बोलणारी व्यक्ती एका 'आईबाप' या वैश्विक भूमिकेतून बोलत असते. तो केतन पण मोठा झाला की हेच करेल केतन२ ला. आणि तेव्हा तो केतन२ पण आत्ताच्या केतन सारखाच वागेल. :)

तेव्हा 'केतनची आई' आणि 'केतन' या वृत्ती आहेत.

आजूनही मी नुसतं मुंबईहून पुण्याला यायचं म्हणलं तरी माझे बाबा हज्जार सूचना करतात. नीट जा, हळू जा, पोचलास की फोन कर, पाऊस असेल तर थांब कुठे तरी. (परदेश प्रवास असला तर अजूनच काळजी करतात.) मी पण हो हो करत असतो. कधी तरी वैतागतो पण. मग पुण्याला पोचलो की फोन करायचा विसरतो. मग त्यांचा फोन येतो. मी पोचलो आहे हे ऐकले की ते रागवतही नाहीत की मी पोचलो तरी फोन का नाही केला. त्यांना माहित आहे की केतन कधीच फोन वगैरे करत नाही कारण ते स्वतःही कधी तरी केतन असतात. फोन वगैरे होतो, तेवढ्यात माझी मुलगी ट्युशनला किंवा कॉलनीत कोणाकडे तरी खेळायला जायला निघते...

मग मी सुरू होतो... नीट जा. रस्त्यावर खेळू नका. वाहनांकडे लक्ष ठेवा. अंधार पडायच्या आत घरी ये.........

मग आमचा केतन लक्ष न देताच धाडकन दर लोटून खेळायला जातो. :)

चतुरंग's picture

3 Sep 2010 - 4:59 pm | चतुरंग

आमची आणि आमच्या केतनची हल्ली सायकलवर बसताना हेल्मेट घालत नाहीस म्हणून भांडणे होतात. त्याला लागेल म्हणून काळजी वाटते पण मी केतन असताना कशी सायकल चालवायचो वगैरे आठवले की मी भांडण थांबवतो! ;)

असो. मुलांना सतत नकारात्मक प्रकारे शिकवू नये ह्या मुद्द्याशी सहमत आहे. परंतु सतत होकारात्मक राहणेही अवघडच!

रंगा