संपादकांच्या फुलक्या भाजायचे ठरले तर टोपलंभरुन तरी हमखास जमतील. त्या टम्म फुगलेल्या फुलक्या मार्मिक टिचकी मारून फोडल्या की पचायला हलक्या होतील व त्या खाल्ल्यानंतर मस्त मेजवानीच्या डुलक्याही लागतील...
त्यावेळी आम्ही लेखन क्षेत्रातले उमेद्वार होतो. अजूनही आहोतच, परंतु तेव्हा फारच नवखे होतो. पेपर चाळायचे, 'निवेदने' कॉलम भरारा वाचायचा, पटतील ते विषय पत्त्यांसह उतरवून घ्यायचे. अन् कागद पेन घेऊन लेखनसमाधी लावून घ्यायची. एकेका लेखासाठी चार पाच खर्डे होत. शेवटी हे लिहू की ते करता करता सगळेच उतरुन पाठवून द्यायचो. काय जे लागेल ते त्यांनीच वेचावे असा हवाला टाकून लेख प्रकाशित होण्याची वाट पहात रहायचं. संबंधित विशेषांक किंवा मासिक प्रकाशनाची तारीख जवळ येऊनही आपल्याला निरोप तो कसा नाही म्हणून आम्हीच फोन लावायचो.
'अच्छा, तो लेख होय? अहो त्यातील बरेच लिखाण गाळले असते तर बरं झालं असतं. गाळू का?' अर्थात ती कापाकापी अगोदरच झालेली असायची. लेखकाला फोन करुन आणखी फोनबील का वाढवा? असा व्यवहारिक विचार करुन संपादकमजकूर आम्ही संपर्क साधल्यावरच कोणता मजकूर कापला (त्यांच्या शब्दांत ठेवून घेतला) ते सांगत. अशाप्रकारे चार पाच पुस्तके अभ्यासून चार पाच दिवस खपून तयार केलेला अभ्यासपूर्ण लेख अपूर्ण वाटावा असा छापला जाई.
षोडशवर्षीय भासणारे भर'टंच' लिखाण संपादक महोदय पंचवार्षिक मुलीत बदलून टाकीत.
लिहायला मिळतेय म्हटल्यावर आम्ही शंभरच्या स्पीडने सुटायचो. कागदांचे डब्यावर डबे जोडायचो, आणि त्यातील एकेकाला रेल्वे फाट्यावर गाठून काडी लावायचं काम संपा.महाशय करायचे. धारधार तळपती तलवार उपसून आम्ही शब्दांसह लढू पहायचो तर सं.महोदय ती तलवार तासून तासून इतकी थोकटी करीत की जणू बारीक सुरीच!
आमचा एकही लेख त्यांच्या संपादकीय सदरा सारखा भरजरी सदरा लेवून बसल्याचं आठवत नाही. आमच्या लेखाचं मुंडण हमेशा व्हायचंच. एकूण काय तर आमच्या लेखाची मेखच उडवली जायची. आमच्या लेखनातलं माखन चोरलं जातंय की काय असं वाटत रहायचं. अर्थात संपादकांच्या दृष्टीने जबरा, फंटूश, ढीशँव, लढ बाप्पू अशा शब्दांना अर्थ नसायचा. परंतु असे शब्द आमच्या चिरतरुण लिखाणाचे आत्मे असत. त्यांनाच केराची टोपली दाखवली तर काय उरणार? नुसता कचरा!
नाही म्हणायला एका कौटुंबिक मासिकाचे संपादक आम्हांला कौटुंबिक वातावरणात वाढीस लावायचे. आमचे लिखाण आशयासह जसेच्या तसे छापायचे. परंतु त्याला कौटुंबिक वाचकांकडून कितीसा प्रतिसाद मिळणार? म्हणून आम्ही खट्टू असायचो.
आणखी एक संपादक तर चिडून ओरडत, 'अरे तुम्हां पोट्ट्यांना व्याकरण व शुद्धलेखन पुन्हा शिकायला हवंय रे. त्याशिवाय तुमची आर्टिकल्स घेता येणार नाहीत रे. किमान शुद्ध शब्दांचं तूप तरी तुमच्या या आकर्षक व्यंजनावर येऊ देत.'
हं. हे मात्र खरं होतं बरं का. आम्ही जरा भेसळीचंच तूप सर्रास वाढत जायचो. जाहीर, माहीत असे शब्द बरोबर लिहायचो मात्र जाहीरात, माहीती अशा चुका आपोआप व्हायच्या. एक मात्र शेवटपर्यंत कळायचं नाही की 'पुण्यात' हा शब्द पापपुण्याशी संबंधित लिहितांना 'पुण्ण्यात' असा उच्चारानुरुप का लिहू नये, किंवा 'लावण्यामुळे' हा शब्द सौंदर्यवाचक विशेषण याअर्थी वापरतांना 'लावण्ण्यामुळे' अशा योग्य रुपात का नसावा? असे अनेक प्रश्न त्यांच्याशी वादविवाद करतांना आम्ही उपस्थित करायचो. 'ते तसेच लिहायचे असतात' असा निर्णय देऊन ते गप्प बसत. अखेर ते आमचे गॉडफादर असल्याने आम्हांला चाकोरी सोडून चालता आलेच नाही.
एक मात्र खरं हे संपादकीय काम भलतंच किचकट व कटकट वाढवणारं असायचं. एखाद्या नामांकित लेखकाचं लिखाण जसंच्या तसं छापावं लागायचं. त्यातील शुद्धलेखनाच्या चुका काढल्या तर त्यांना राग येऊन ते लेखक म्हणत, 'आहे तेच छापा. ती कथेची गरज आहे.' मग आमच्यावर ओरडणाऱ्या संपादकांचं तोंड पाहण्यालायक होई. कारण अंक वाचून अनेक चोखंदळ वाचकांची (बहुदा पुणेरी) पत्रे येत- 'कथेतील 'नुपूर' हा शब्द चुकीचा छापला गेलाय. जरा शुद्धिचिकित्सकाला झापा.' ते पत्र वाचून आम्ही हसत असू. कारण त्या काळी खिळे निवडण्यापासून बसविणे, चेक प्रिंट काढणे, पुन्हा बदलणे ही कामे खुद्द संपादकांना किंवा आम्हांसारख्या उमेद्वारांनाच करावी लागत!
आम्हांला भेटलेल्या संपादकांमुळेच आम्ही घडलो, बिघडलो नाहीत. आमच्या गुरुवर्यांनी डुलक्या न मारता आमच्यासाठी छानशा फुलक्या भाजल्या हे मात्र नक्की...
प्रतिक्रिया
28 Aug 2010 - 8:35 am | डॉ.श्रीराम दिवटे
राजेशभाऊंच्या धाग्यामुळे या लेखाची प्रेरणा मिळाली, त्यांचे आभार...
28 Aug 2010 - 4:06 pm | मी-सौरभ
'पुण्ण्यात'
'लावण्ण्यामुळे'
या शब्दांबद्दल बि. का. सारखे अनुभवी लोक मत प्रदर्शन करतील का?