आणखी एक तळीराम: श्री. वि. रा.भाटकर यांचा

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
26 Aug 2010 - 9:20 pm

मी लहान असताना आमच्याकडे अपूर्व नावाचं डायजेस्ट (रीडर्स डायजेस्ट सारखं) येत असे. तेव्हा एकदा त्यात “मला दारू चढत नाही” अशी एक अफलातून कविता आली होती. काळाबरोबर ती विस्मृतीत गेली. पण हल्लीच आणखी कसलातरी संदर्भ शोधताना महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर ती दिसली आणि परमानंद जाहला.

कविता मुळात खूप जुनी, म्हणजे 1961 ची. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे कवि श्री. वि रा भाटकर यांच्याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता नव्हतीच. पण “अपूर्व” मध्ये ही कविता छापताना असा उल्लेख दिला होता की कवि: वि. रा. भाटकर (आधारित चित्रे : दीनानाथ दलाल) ( ' दीपावली '- जानेवारी 1961 मधून साभार) पुढे म.टा च्या पानाचा दुवा देत आहे. ज्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी या पृष्ठाला जरूर भेट द्यावी. नंतरच्या पिढीतील वाचकांनी एका मजेदार अनुभवासाठी वाचायला हरकत नाही. (कवितेचा दुवा).

कवितेत एका “तळीरामाचं” कथन आहे. तो सुरुवातीला म्हणतो की,

“मला दारू चढत नाही
दारूबंदी असूनही
मी दारू खूप पितो पण मला दारू
कधी चढत नाही.
याचं एक कारण आहे.
दारू पिण्याची माझी एक
स्पेशल सिस्टीम आहे. “

पुढे तो आपल्या दारू पिण्याच्या स्टाईलचं वर्णन करतो, ते आमच्यासारख्या “दारु म्हणजे काय रे भाऊ?” वाल्या लोकांनाही गार करणारं आहे. दारू पिऊन हे महाशय हळूच बायकोच्या खोलीत डोकावून बघतात , “बायको गाढ झोपलेली असते आणि या कानाचा त्या कानाला पत्ता नाही”

पण प्रत्येक कडव्याबरोबर (पेल्याबरोबर?) या तळीरामाच्या सांगण्यात थोडा थोडा बदल होत जातो, आणि शेवटी गाडी ज्या स्टेशनावर येऊन थांबते ते म्हणजे,

“या बायकोचा त्या बायकोला
पट्टा नाही
आणि मी इटकी
दारू प्यायलो
पण अजून मला
च्यढली णाही खर्र ना ?”

हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

पण ही कविता अचानक समोर आली, तेव्हापासून मला छळणारा एक प्रश्न म्हणजे, एवढं विनोदी लिहू शकणारा कवी/लेखक, आणि त्याच्या नावावर आणखी काही साहित्य कसं नाही? मी लहान असल्यापासून पुस्तकं वाळवीसारखी खाते. पण या लेखकाचं कोणतेही पुस्तक मी वाचलेलं नाही, एवढंच नाही तर एखाद्या दिवाळी अंकात सुद्धा यांचं काही लेखन वाचल्याचं आठवत नाही.

1960-61 च्या काळात मराठी पुस्तकांना चांगले दिवस होते. “दीपावली” सारख्या प्रतिष्ठित अंकात ज्या अर्थी श्री भाटकर यांची कविता प्रसिद्ध झाली होती, त्या अर्थी ते निदान काही लोकांच्या माहितीचे असणार.

“मिसळपाव” म्हणजे सर्व ठिकाणचे आणि सर्व वयांचे लेखक वाचक यांचा भेटण्याचा अड्डा! तेव्हा, जर कुणाला श्री वि. रा भाटकर यांच्याबद्दल, त्यांच्या इतर लेखनाबद्दल् काही माहिती असेल, तर कृपया कळवावी. म्हणजे, सर्वांनाच त्यांच्या लेखनाचा आस्वाद घेता येईल. आपल्याला अमेरिकन लेखकांबद्दल सगळी माहिती असते, पण आपल्याच मराठी लेखकांबद्दल फारसं काही माहित नसतं. फक्त कुतुहल म्हणून विचारते, कोणाला काही माहित आहे का? माहिती असेल तर जरूर सांगा, कारण हसायला सगळ्यांनाच आवडतं!

कविताविनोदवाङ्मयसाहित्यिकप्रकटनसंदर्भआस्वाद

प्रतिक्रिया

उपेन्द्र's picture

26 Aug 2010 - 11:20 pm | उपेन्द्र

ही कविता मी ही त्या जुन्या मासिकात वाचली. बेहद्द आवडली. उत्स्फुर्तपणे मित्रान्च्या मैफिलीत, सहलीत तिचे साभिनय वाचन केले. त्यावेळी झालेला हास्यकल्लोळ अजुनही लक्षात आहे.

निखिल देशपांडे's picture

26 Aug 2010 - 11:25 pm | निखिल देशपांडे

जालावर हीच कविता विकास यांचा प्रतिसादात आढळली. त्यांचा कडे अधिक माहिती असु शकते.

विकास's picture

27 Aug 2010 - 3:37 am | विकास

तो प्रतिसाद २००७ चा आहे. तीन वर्षांनी वय वाढल्याने आठवत नाही ;) मी देखील ती कदाचीत म.टा. मधेच वाचली असावी. :(

सुनील's picture

27 Aug 2010 - 1:11 am | सुनील

ह्या कवितेवर आधारीत "मी रिस्क कधीच घेत नाही" ही कविता गेली अनेक वर्षे ढकलपत्रांतून फिरते आहे. दोन्हींची मूळ कल्पना एकच (आणि झक्कास) आहे. मांडणी तर केवळ अफलातून!