ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१९

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
22 Jul 2010 - 8:06 pm

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१८

कोर्टाची पायरी

एकदा दुपारच्या निवांत वेळी कोबे चा नकाशा पाहत होते. सुप्रियाला, ती पब्लिक प्रॉसिक्युटर आहे म्हणून, हे बघ इथलं कोर्ट असं म्हणत नकाशातला कोर्टाचा ठिपका दाखवला. लगेचच आपण जाऊन पाहू या का? असा विचार आला मनात! जपानमध्ये असताना तसेही आम्ही सकाळी सगळे आवरुन झाले , नवरे मंडळी कचेरीत गेली की आम्ही भटकायला (पक्षी उंडारायला)बाहेर पडत असू. आता नकाशा घेऊन कोर्ट कुठे आहे ते शोधून तर काढू आधी, असे म्हणत कोर्ट शोधत फिर फिर फिरलो..२/२.५ किमीची पायपीट झाली. कोर्ट काही दिसायला तयार नाही.एक १७/१८ मजली उंच 'सर्कारी' इमारत दिसली. (जापानचा झेंडा होता ना तिथे, त्यामुळे इमारत 'सर्कारी' आहे असे आम्हीच ठरवले.) तेथे सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन बावळटासारखी कोर्टाची चौकशी केली. तर आम्ही अगदीच विरुध्द दिशेला आलो होतो. तिथल्या भल्या माणसाने, काय बावळट बायका आहेत? असे भावही चेहर्‍यावर न आणता (मनातून त्याला वाटत असले तरी) आम्हाला कोर्टापर्यंत कसे जायचे ते समजावले आणि वर कागदावर नकाशाही काढून दिला. सुदैवाने त्याला इंग्रजी येत होते त्यामुळे भाषिक प्रश्न आडवा आला नाही.

झाले, आता आम्ही त्याने दिलेल्या नकाशाबरहुकुम कोर्टाकडे कूच केले. परत एकदा पायांना तीन एक किमी चालवले. परत एकदा झेंडावाली सर्कारी इमारत दिसली. हे नक्की कोर्टच आहे ना? ह्याची खात्री करुन तेथल्या स्वागतिकेकडे पब्लिक प्रॉसीक्युटर बद्दल विचारणा केली. आम्ही एकदम प. प्रॉ. ची चौकशी का करत आहोत असे भाव चेहर्‍यावर आणत ती चिंताक्रांत झाली. इथे परत भाषिक प्रश्न उद्भवला कारण तेवढ्या विचारणेनंतर आमचा जपानी स्टॉक संपला. इंग्लिश,इंग्लिश... पाणी, पाणी च्या थाटात आम्ही दोघी एका सुरात बोललो आणि सुप्रियाने तिचे ओळखपत्र दाखवले. ( नशिब,ते ती बरोबर घेऊन आली होती !) एकदम समजल्यासारखी मान हलवत काउंटरवरच्या बयेने एका दिशेला हात केला आणि आम्हाला तिकडे जायला सांगितले.

एका केबिनच्या दारावर टकटक केली तर चक्क 'कम इन्' असे इंग्लिशमधून उत्तर आले. आत गेलो तर एक मध्यमवयीन प्रसन्न गृहस्थ फायलींच्या ढिगार्‍यात बसलेला दिसला. आम्हाला वाटले हेच प. प्रॉ. साहेब! आम्ही कोन्निचिव्हा करुन लगेच लगबगीने राणीच्या भाषेवर आलो. हो, उगाच परत भाषिक प्रश्न नको. त्याने आपण प. प्रॉं चा सहाय्यक असल्याचा खुलासा केला आणि साहेब एका केसमध्ये बिझी असल्याने दुपार नंतरच भेटू शकतील हे सुध्दा सांगितले. आम्ही काही भेटीची वेळ ठरवून गेलो नव्हतो त्यामुळे हो म्हणण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हताच. त्याच्याशीच मग कोर्टाचे कामकाज कसे चालते वगैरे विचारणा करत राहिलो आणि फायलींच्या ढिगार्‍यातून वेळ काढत तोही जमेल तशी उत्तरे देत होता, मध्येमध्ये घड्याळ बघत होता. त्याचा वेळ आम्ही निष्कारणच घेत होतो. शेवटी आम्ही गप्प बसायचे ठरवले आणि आता इथवर पायपीट करत आलोच आहोत तर प. प्रॉ.ना नुसते ५मि. भेटून जायचे असे ठरवले. दोन पाच मिनिटे शांततेत गेली. त्या बाबाला एक ट्रायल कव्हर करायची होती म्हणून तो सारखे घड्याळ पाहत होता. आम्हाला आत येता येईल का? ट्रायल पाहता येईल का? आम्ही पिच्छाच पुरवला. तो अगदी आनंदाने तयार झाला. त्याला वाटत होते आमचे त्याच्या साहेबाकडे काही महत्त्वाचे काम आहे. तसे काहीच नसून आम्ही रिकामटेकड्या केवळ उत्सुकतेपोटी कोर्ट पहायला , जमलेच तर एखादी ट्रायल, एखाद्या वकिलाला भेटायला आलोत म्हटल्यावर अगदी खुशीतच तो आम्हाला ट्रायल रुममध्ये घेऊनजायला तयार झाला. एका चोरीच्या मामल्याची ती केस होती. थोडक्यात त्याने आम्हाला केस सांगितली. काही दम नव्हता तीत. चोराने गुन्हा अल्मोस्ट कबूल केलाच होता. आता फक्त शिक्कामोर्तबच व्हायचे बाकी होते असे त्याच्या एकंदर आर्विभावांवरुन वाटले. खरे तर त्याला त्या केसमध्ये रस नव्हता पण साहेबाचा हुकुम!

आम्ही आत गेलो. हिंदी सिनेमात दाखवतात तसे कटहरे कुठे दिसेनात. साधी मोठीशी खोली. वर्गात शिक्षकांसाठी असतो त्यापेक्षा थोडा मोठा प्लॅटफॉर्म,त्यावर जज्जसाहेबांची खुर्ची, तेथे थोडे मागल्या बाजूला डावीकडे एक दार होते, तेथून बहुदा जज्जसाहेबांची ये,जा असावी. खाली काही अंतरावर वकिलांच्या खुर्च्या, त्यांच्या कडेने अर्धवर्तुळाकार लावलेली बाकडी आणि अजून थोडे अंतर सोडून प्रेक्षकांसाठी थोड्या खुर्च्या! तेथेच आम्हीपण जाऊन बसलो. बाकी आत सामसुमच होती ! ४/५ डोकी फक्त होती, तीही बहुतेक त्या केसशी संबधितच असावीत.

जजसाहेब आल्यावर सारेजण उभे राहिले वगैरे तेच सगळे नेहमीचे सोपस्कार झाले. एकेक नावाचे पुकारे व्हायला लागले. मग दोन तीन साक्षी झाल्या. सारे कामकाज जपानीतच चालले होते. दोन साक्षीदारांच्या मधल्या वेळात अगदी हळू आवाजात, कोर्टाची अदब राखत, आमचा हा नवा मित्र आम्हाला झटकन संभाषणाचा गोषवारा भाषांतर करुन सांगत होता. अखेर जजसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. ते शिक्षा सुनावत असावेत, हिंदी सिनेमांचे कोर्ट सीन्स बघून बघून केलेला अंदाज सुप्रियाला सांगत असतानाच जपानी मित्राने गप्प रहायची खूण केली. हातोडा आपटून जजसाहेब उठले आणि आत जाण्यासाठी वळले, तसे सगळे उठून उभे राहिले. वकिलांनी एकमेकांना कमरेत वाकून अभिवादने सुरु केली. आमचा मित्र आम्हाला परत पहिल्या खोलीत घेऊन गेला. त्या चोराला ४ महिन्यांची शिक्षा झाली. त्याने माहिती पुरवली. गुन्हा काही फार 'संगीन' नसावा. आमचे बॉलिवूडी अंदाज सुरू! कुठे तरी फुटकळ चोरी केली होती. मुद्देमालासकट पकडला गेला. (मग कशाला कोर्टकचेर्‍या? असा एकदम अस्सल विचार आलाच मनात!) पण अस्मादिकांचे हे अगाध ज्ञान त्याच्यापुढे पाजळण्याऐवजी किती दिवस चालली आहे केस? असा प्रश्न त्याला विचारला आणि दोन/तीन आठवड्यात अशा फुटकळ केसींचे निकाल लागतात अशी ज्ञानप्राप्ती करुन घेत असतानाच तिथे प प्रॉ साहेबांचे आगमन झाले. आमच्या अगांतुक आगमनाची खबर त्यांच्यापर्यंत पोहोचली होतीच. त्यांनी अगदी छान गप्पा मारल्या,जपानी चहापान झाले. त्या दोघांबरोबर फोटो काढून घेऊन त्यांना परत परत अरिगातो गोझायमास करत कोर्टाची पायरी उतरलो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

रेवती's picture

22 Jul 2010 - 9:01 pm | रेवती

बर्‍याच दिवसांनी मालिकेतील पुढचा भाग आला.
कोर्टकचेरितील कामकाज वाचून वेगळे आणि बरे वाटले.
थोडे फार कुतुहल शमले.
फोटू फक्त मलाच दिसत नाहिये कि काय?

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jul 2010 - 12:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे आख्खंच वाचायचं बाकी आहे माझं. सावकाश एकेक वाचून काढते आता!

अदिती

प्रभो's picture

23 Jul 2010 - 12:27 am | प्रभो

अजून वाचलं नाही??कुठे फेडाल हे पाप??? ;)

काय करावं ? स्वातीताईचे धागे वाचून पण राकलेट विजा पण मिळेना....ना केक... :(

यशोधरा's picture

23 Jul 2010 - 12:34 am | यशोधरा

वाचलं. :)
दिसत आहेत की फोटो.

रेवती's picture

23 Jul 2010 - 1:37 am | रेवती

दिसले आता!:)

रेवती

विंजिनेर's picture

23 Jul 2010 - 6:52 am | विंजिनेर

कोबे म्ह्टल्यावर आम्हाला तोंडात विरघळणारं आणि खिश्याला भोक पाडणारं वाग्युच आठवणार. फार-फार तर ओकोनोमियाकी

सहज's picture

23 Jul 2010 - 12:56 pm | सहज

कौतुक आहे कोर्टाची पायरी हौसेकरता चढलात की :-)

हाही भाग जबरीच!

ऋषिकेश's picture

23 Jul 2010 - 2:22 pm | ऋषिकेश

फर्मास! बाकी पप्रॉ मात्र एकदम रात्री झोप झाली नसावी किंवा 'जरा जास्तच झाली असावी' असे दिसताहेत ;)

अदिती,
कुठे फेडशील हे पाप (अर्थात नाहि फेडलेस तरी चालेल.. न वाचता तुला राकलेट विजा मिळाला आहे :P )

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

नंदन's picture

25 Jul 2010 - 1:47 pm | नंदन

हाही भाग मस्तच. कटहरे, संगीन इ. शब्द वाचून गंमत वाटली :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी