काही दिवसांपूर्वी हे कोडे लिहिल्यावर "का रे अजून चांदोबा वाचतोस का?" असं कुणीतरी मला विचारलं होतं. त्यावेळी उगाचच चांदोबाची आठवण येऊन पिसं उधळल्याप्रमाणं झालं. खरंच लहानपणी एका वेगळ्याच दुनियेत नेणार्या या अद्भुत पुस्तकाबद्दल अजून कोणी कसं बरं लिहिलं नाही?
"चांदोबा" ची ओळख करुन द्यायची खरं तर आवश्यकता नाही. माझ्या लहानपणी लहान मुलांच्या मासिकांचे पर्याय फारच मर्यादित होते आणि आता टीव्हीच्या धुमाकुळामुळे कोणी वाचतही नसेल. चांदोबा, किशोर, कुमार, ठकठक, चंपक आणि ज्ञान प्रबोधिनीचे "छात्र प्रबोधन" ही मासिके मला माहिती होती. त्यातही किशोर सारखे मासिक दिवाळी अंक वगळता कधी मिळालेच नाही. बहुतेक फक्त दिवाळी अंकच काढत असावेत. त्यांचे दिवाळी अंकात येणारे किल्ले करायला मजा यायची. ठकठक आणि चंपक वाचायला सुरुवातीला मजा वाटली. पण नंतर त्याचा प्रभाव फारसा टिकून राहिला नाही. चांदोबाचं मात्र तसं नव्हतं. चांदोबा वाचताना कधी कंटाळा आला नाही.
चांदोबाच्या गोष्टींमध्ये डावे-उजवे करणे शक्य नाही असे आता वाटते. पण त्यात सर्वाधिक आवडणारा भाग कोणता? असं विचारलं तर या प्रश्नाला "विक्रम आणि वेताळ" हे उत्तर सगळेच जण देतील. वेताळ पंचविशी नावाचं एक दुसरं पुस्तक त्यावेळी मिळायचं पण त्यात "चांदोबा"ची मजा नव्हती. साहस, अद्भुतरम्यता, गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण करून नंतर विक्रमाला बोलायला भाग पाडणारा वेताळाचा प्रश्न, कथेतील पात्रांची संस्कृतप्रचुर नावं हे सगळं एका वेगळ्याच जगात घेऊन जायचं.
आधी वाचलेल्या रामायण, महाभारतातल्या गोष्टी, ग्रीक कथा, लोककथा या पुन्हा पुन्हा वाचायलाही मजा येत असे.याचं महत्त्वाचं कारण कदाचित चांदोबातली लाल-पिवळ्या-हिरव्या-निळ्या अशा गडद रंगातली, पिळदार स्नायू असलेले हीरो आणि टपोर्या डोळ्यांच्या नायिका यांची रेखीव चित्रं हे असावं. चित्रांमध्ये जमिनीवर सरपटणारे नाग, निवडुंगाची झाडं, झाडावर बसलेले पक्षी आणि फांद्यावर अडकलेल्या मानवी कवट्या अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद असायची."क्रमश:" असणार्या कथामालिकेतील एखादा भाग वाचला की त्याच्या आधीचे आणि नंतरचे भाग वाचण्यासाठी उरलेले चांदोबा मिळवण्यासाठी खूप धडपड करायचो. चांदोबात २५-३० वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पुन्हा वाचताना ती तितकीच ताजी वाटायची. या कथांचे मराठी अनुवाद कोण करतो देव जाणे. अगदी सुरेख अनुवाद असतात.
चांदोबाला जुलैमध्ये ६० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने चांदोबाचा जीवनप्रवास वाचनात आला. तोदेखील चांदोबातील गोष्टींइतकाच सुरस आहे. तो इथं देणे म्हणजे जीएंच्या भाषेत दुसर्याने बनवलेला स्वयंपाक आपण गरम करून वाढण्यासारखा आहे. पण तो देण्याचा मोह आवरत नाही.
जुलै १९४७ मध्ये सुरू झालेल्या चांदोबाची स्थापना नागीरेड्डी आणि चक्रपाणि यांनी केली. सुरुवातीला चांदोबा तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रकाशित होत होता. ६ आणे इतक्या किमतीच्या चांदोबाच्या सुमारे ६००० प्रती सुरुवातीला विकल्या जात होत्या.
चक्रपाणि आणि नागीरेड्डी यांनी चांदोबा सोबतच तेलुगू चित्रपटांच्या निर्मितीचेही काम सुरू ठेवले. चक्रपाणि यांचे १९७५ मध्ये निधन झाल्यानंतर विश्वनाथ रेड्डी यांनी चांदोबाचे काम पाहण्यास सुरुवात केली. विश्वम या नावाने ते अजूनही चांदोबाचे संपादकीय काम पाहतात. हळूहळू १२ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलेला चांदोबा लोकप्रिय होत होता. १९८० मध्ये चांदोबाच्या सर्व भाषा मिळून सुमारे ९ लाख प्रती विकल्या गेल्या. नागीरेड्डी तोपर्यंत एक यशस्वी चित्रपट निर्माते म्हणूनही गणले जाऊ लागले होते. त्यांचे "राम और श्याम", "ज्युली" वगैरे चित्रपट हिट झाले होते.
१९८० मध्ये नागीरेड्डी यांच्या थोरल्या मुलाचे - प्रसादचे - निधन झाल्यावर नागीरेड्डींना नैराश्याचा झटका आला. त्यावेळी चित्रपट अभिनेते संजीव कुमार यांनी त्यांना मदत करून "श्रीमान श्रीमती" या नव्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा पाठपुरावा केला आणि नागीरेड्डींना नैराश्यातून बाहेर काढलं. मात्र नव्वदाव्या दशकात कामगारांच्या अडचणींमुळे काही कौटुंबिक तंट्यामुळे चांदोबाचे प्रकाशन काही काळ बंद करावे लागले. त्यावेळी चांदोबाची विक्री होती सहा लाख प्रतींची. नोव्हेंबर १९९९ मध्ये विश्वम यांनी पुन्हा प्रकाशन सुरु केले आणि तेव्हापासून सर्व भाषांतील चांदोबाची प्रतिवर्षी २ लाख प्रतींची विक्री होते. इन्फोसिस, प्रथम अशासारख्या संस्थांकडून मिळणारी मदत आणि वॉल्ट डिस्ने कंपनीबरोबर सहकार्यामुळे चांदोबाची आजची वाटचाल कमी अडथळ्य़ांची झाली आहे. विश्वम यांना चांदोबा ही मुलांवर भारतीय संस्कार करणारी एक विनालाभ संस्था बनवायची आहे.
चांदोबाला साठ वर्षं पूर्ण झाल्याच्या बातम्यांमुळे लहानपणी निर्भेळ आनंद देणार्या या दर्जेदार मासिकाची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आणि एका दुकानातून सप्टेंबर महिन्याचा चांदोबा घेऊन आलो. मुखपृष्ठावरच अशोकवनातल्या सीतेचं चित्र होतं. मिथिला नगरीतली सीता दक्षिण भारतीय पद्धतीप्रमाणे अगदी मीनाक्षी :). जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क अशा नावांमध्ये पुन्हा गुंग होऊन गेलो. चांदोबा उगाचच इतके दिवस बंद केला. परत वाचायला सुरुवात केली पाहिजे.
हाच लेख येथेही वाचता येईल.
प्रतिक्रिया
29 Sep 2007 - 8:11 pm | कोलबेर
>>जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क
हा हा सहीच!! मला मात्र लहानपणी ठक ठक सगळ्यात जास्त आवडायचे कारण ते जास्त मराठमोळे वाटायचे..(अजुन ठक ठक येते का?) चांदोबा दाक्षिणात्य आणि चंपक (बहुदा) बरेचसे हिंदी अनुवादित असायचे.
29 Sep 2007 - 9:20 pm | धनंजय
काय मस्त आठवण करून दिलीत कर्ण! दर महिन्याला आमच्या घरी आईबाबा चांदोबा आणि किशोर एकाच दिवशी विकत घेऊन येत.
(म्हणजे दोघा मुलांमध्ये "मी आधी वाचणार" असे भांडण होऊ नये. पण ज्याच्या हाती येत, म्हणजे माझा भाऊ किंवा मी, दोन्ही अंक लंपास करून ठेवत. मग भांडणे होतच. आमचे आईबाबा बालमानसशास्त्राच्या बाबतीत तसे तज्ज्ञ नव्हते असे माझे प्रांजळ मत आहे.)
त्या धूमकेतूचे शेवटी काय झाले कोणास ठाऊक...
30 Sep 2007 - 7:59 am | बेसनलाडू
खरंच त्या धूमकेतूचे काय झाले याची उत्सुकता आहेच! एकाक्ष, चतुराक्ष ... :)
16 May 2008 - 1:49 am | भडकमकर मास्तर
आंघोळीनन्तर ओले केस पिंजारून मी आणि माझा भाऊ एकमेकांना भल्लूक मान्त्रिक म्हणत काठीने खेळत असू...
धुमकेतू...
29 Sep 2007 - 10:12 pm | प्राजु
जाग्या केल्यात आपण. लहानपणी हा चांदोबा तेव्हा अक्षर ओळख नसल्यामुळे मी आजोबांकडून वाचून घ्यायचे. त्यामधील रंगीत चित्रांमुळे मला त्या पुस्तकाबद्दल विलक्षण आकर्षण वाटायचे. आणि मग सगळी कामं आटोपून माझे आजोबा मला त्यातील गोष्टी वाचून दाखवायचे..
आज आजोबा हयात नाहीत.. पण या गोड आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत...
धन्यवाद.
- प्राजु.
30 Sep 2007 - 1:05 am | प्रियाली
>>का रे अजून चांदोबा वाचतोस का?
असे प्रश्न आणि कोण विचारणार? ;-)
चांदोबाची आठवण पुन्हा करून दिल्याबद्दल धन्यवाद. चांदोबा अद्याप निघतो हे ही माहित नव्हते.
आमच्या घरात किशोर येई. चांदोबा पिताश्रींना आवडत नसे. काय त्यात जादू बिदूच्या गोष्टी असतात म्हणून ते उडवून लावत. त्यामानाने चंपक आणून देणे त्यांना आवडे. शेजार्यांकडे चांदोबा वाचून आम्ही क्षुधाशांती करत असू.
30 Sep 2007 - 9:41 am | आजानुकर्ण
असे प्रश्न आणि कोण विचारणार? ;-)
हाच प्रश्न मला पडला होता. :)
30 Sep 2007 - 7:56 am | प्रकाश घाटपांडे
<<जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क अशा नावांमध्ये पुन्हा गुंग होऊन गेलो. चांदोबा उगाचच इतके दिवस बंद केला. परत वाचायला सुरुवात केली पाहिजे.>>
मला विरुपाक्ष ची आठवण येते. त्याच्या कानातून बाहेर येणारे केस मनावर कोरले आहेत. आमच्या विभागातील ३०२ जाधवला ( ३०२ कलमाने बायकोच्या खुनाचा गुन्हा ज्यावर दाखल झाला आहे असा तो एक स्टोअरमन) त्याच्या कानातील केसामुळे मी आमच्या वर्तुळात 'विरुपाक्ष' हे नाव पाडले होते.
प्रकाश घाटपांडे
30 Sep 2007 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांदोबाची आठवण करुन दिली आणि जून्या आठवणी चाळवायला लागल्या !
कर्णा, चांदोबा ज्याच्या घरात त्यांना जरा प्रतिष्ठीचे वाटायचे,
आमच्या घरी मुलांसाठी चांदोबा घेतो ही कधीतरी अभिमानाचीही गोष्ट होती.
काहीतरी हटके विषय घेऊन येणार नाही तो कर्ण कसा ! :) असेच वाचायला येऊ दे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
30 Sep 2007 - 8:36 am | चित्रा
छान आठवणी आल्या. अर्थात चांदोबा मासिकाबद्दल एवढी माहिती नव्हती.
>>चांदोबात २५-३० वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पुन्हा वाचताना ती तितकीच ताजी वाटायची. या कथांचे मराठी अनुवाद कोण करतो देव जाणे.
अगदी असेच. माझ्या एका चुलत आजोबांच्या घरी चांदोबा येई. त्यांच्या लहानशा घरात त्यांनी असंख्य पुस्तके (त्यात जुनी पंचांगे पण असत) ठेवली होती. चांदोबाचे गठ्ठयाने अंक असत. त्यांच्याकडे असलेले खूप जुने म्हणजे माझ्या आत्यांच्या लहानपणचे अंकही मी त्यांच्याकडे गेले की वाचत असे.
30 Sep 2007 - 9:11 am | विसोबा खेचर
तेव्हापासून अगदी आवडीने वाचतो आहे. आजही मध्येच अधनंमधनं विकत घेऊन वाचतो..
वा कर्णा, चांदोबाच्या सुखद आठवणी चाळवल्यास त्याबदल तुला चांदोबाचा एक अंक बक्षिस देईन हो! :)
आपला,
(चांदोबाप्रेमी) तात्या.
30 Sep 2007 - 9:47 am | आजानुकर्ण
अरे वा! इतके सगळे चांदोबाप्रेमी पाहून फार आनंद वाटला.
लेखाच्या मस्त जेवणानंतर आता माहितीची बडीशेप चावा.
चांदोबाची वार्षिक फी आता १५० वरून १८० रुपये केले आहे. आणि त्याबदल्यात ८ रंगीत पाने प्रत्येक अंकात जास्तीची. :))
सप्टेंबरच्या अंकात जगपाल साहू नावाच्या एका वाचकाचे पत्र आले आहे. त्यांच्याकडे १९७५ वर्षापासूनचे चांदोबाचे सगळे अंक आहेत. :) याशिवाय दीपांकर दत्त नावाचे एक वाचक चांदोबाचे गेली ५० वर्षं वाचक आहेत. :))
तात्या, चांदोबाचा अंक घेण्यासाठी पुणे-ठाणे प्रवास गृहीत धरला तर पुण्यात चांदोबा स्वस्त मिळेल ;).
30 Sep 2007 - 1:47 pm | स्वाती दिनेश
काय मस्त आठवण काढली? चांदोबा,किशोर आणि कुमार माझ्या जास्त आवडीची मासिके होती.त्यामानाने चंपक आणि ठकठक मी विशेष वाचत नसे.किशोर आणि कुमार आमच्या घरी येत असत्,चांदोबा शैलाताई कडे.मी ३रीत असतानाच आईने शैलाताई बेडेकरच्या मनोरंजन वाचनालयात माझे नाव लहान मुलांच्या विभागात घातले होते,आणि तिच्याकडून पुस्तक घेऊन घरी येतानाच वाचत वाचत येत असे, आणि ते कोणीतरी घरी सांगितल्यावर ओरडाही मिळाला होता.
शाळेत असताना ९ वीत बहुदा, किशोरच्या दिवाळी अंकात माझा एक लेख प्रसिध्द झाला होता आणि त्याचे मानधन म्हणून २५ रु चा चेक ही मिळाला होता, काय त्याचं अप्रूप तेव्हा वाटलं होतं!
आता परत एकदा चांदोबा,किशोर,कुमार चाळली पाहिजेत.
स्वाती
30 Sep 2007 - 2:23 pm | प्रमोद देव
चांदोबा वाचण्यासाठी आम्ही भावंडे देखिल खूप धडपडत असायचो. स्वत: खरेदी करून वाचण्याची क्षमता नसल्यामुळे आम्ही ती वाचनालयात जाऊनच वाचत असू. नवी-जूनी जी हाताला लागतील ती वाचून काढत असू.
तसेच किशोर,कुमार आणि अमृत,विचित्र-विश्व वगैरे मासिकेही वाचत असू.
चांदोबातील चित्रे तर खासच असायची. त्यांची रंगसंगती देखिल विलक्षण आकर्षक असायची.
मात्र चांदोबा मध्ये एकदा बंद पडल्यानंतर पुन्हा जेव्हा सुरु झाला तेव्हापासून त्यातले आकर्षण कमी झाले. त्याला कारण त्याचा पूर्वीचा रूबाब राहिला नाही असे मला मनापासून वाटते. तसेच आता अमरचित्रकथा आणि अशाच प्रकारचे नवे प्रकार बाजारात आल्यामुळे देखिल चांदोबाचे महत्व कमी झालेय असे वाटते.
तरी देखिल चांदोबा ही जून्या पिढीतील लोकांची "मर्मबंधातली ठेव" आहे असे खात्रीने म्हणता येईल.
2 Oct 2007 - 10:03 pm | यनावाला
मासिकासंबंधीचा श्री. आजानुकर्ण यांचा सचित्र सुंदर लेख आणि त्यावरील अनेक सदस्यांच्या प्रतिक्रिया वाचून मला वैषम्य वाटले. सर्वांचा हेवा वाटला. कारण ज्या खेडेगावात माझे लहानपण गेले, तिथल्या शाळेत पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक मला वाचायला मिळाले नाही. शाळेला वाचनालय नव्हतेच. ते असते हे पुण्यात आल्यावर समजले. तोवर चांदोबा वाचायचे दिवस निघून गेले होते. घरी चांदोबा किंवा दुसरे कोणतेच नियतकालिक मागवण्याचा प्रश्नच नव्हता. असो. पुढे थोडे फार वाचले. पण त्या वयात वाचायला मिळाले नाही याची खंत वाटते.(विशेषतः हा लेख वाचून आपण अशा वाचनापासून वंचित राहिलो हे प्रकर्षाने जाणवले.)
30 Oct 2007 - 11:13 pm | देवदत्त
मस्त वाटले वाचून. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद :)
विक्रम वेताळ हे तर छानच होते. त्याचबरोबर इतर कथाही छान होत्या.
तुम्ही फक्त चांदोबाबद्दल लिहिले आहे परंतु त्याचबरोबर इतरही लिहावेसे वाटते.
मी ही लहानपणी चांदोबा, किशोर, चंपक, ठकठक भरपूर वाचायचो. तसेच हिंदीमधील सुमन सौरभ ही.
ह्या सर्वांत चांदोबा उठून दिसत असावा त्यातील रंगीत पानांमुळे. आणि चांदोबा हे पुस्तक असे की सर्व वयोगटात कोणीही घेऊन वाचू शकतो.
आणखी ही पुस्तके होती बहुधा आता आठवत नाही. सर्व वाचायला मजा यायची. शिवाय डायमंड कॉमिक्स ही भरपूर.
आमच्याकडे एवढी पुस्तके झाली होती की ३ मित्रांनी मिळून मग आमच्या कॉलनीत वाचनालयच सुरू केले होते. २ २१/२ वर्षे चालविले ते. :)
गेल्या वर्षी बंगळूर मध्ये एका मित्रा सोबत ह्याच पुस्तकांबद्दल चर्चा झाली होती. मग काय लगेच गेलो बुक स्टॉल वर आणि विचारले चांदोबा, चंदामामा आहे का? नव्हते. पण चंपक मिळाले.
(ह्या सर्व पुस्तकांच्या शोधात) देवदत्त
1 Nov 2007 - 6:25 pm | आजानुकर्ण
त्या पुस्तकाला चंदमावा किंवा चंदामावा असे म्हणत असावेत
1 Nov 2007 - 8:55 pm | देवदत्त
तो अंदाज नाही परंतु तिकडे ते मिळत होते एवढे नक्की. मराठी किंवा हिंदीतील नाही मिळाले.
15 May 2008 - 10:47 pm | देवदत्त
:) नुकत्याच आलेल्या विपत्रातून चंदामामाच्या संकेतस्थळाचा पत्ता मिळाला.
:( इथे सध्या नवीन कथा इंग्रजी, तमिळ व तेलूगू ह्याच भाषेत आहेत
:) परंतु जुने अंक ( जुने म्हणजे किती जुने हो ? हिंदी: १९४९ ते १९६१, इंग्रजी: १९५५ ते १९८५ इत्यादी इत्यादी) उपलब्ध आहेत.
:( मराठी नाहीत हीच खंत.
:) मी सप्टे. १९६१ ची प्रत डाऊनलोड केली आहे. पाहीन वाचून
15 May 2008 - 11:26 pm | छोटा डॉन
आजानुकर्णा, काय आठवण काढलीस रे चांदोबाची , एकदम लहानपण आठवले ...
साधारणाता आमचे लहानपण हे "चांदोबा, ठकठक, चाचा चौधरी" वाचण्यात, गोट्या / आंब्याच्या कोया [ उच्चारी कुया ] खेळण्यात, झालच तर आईचा मार खाण्यात गेले ...
आईचा मार खायचे मेन कारण असायचे चांदोबा, कारण पुस्तक एक आणि वाचणारे ३ जण, त्यात मोठा मी आणि माझ्या २ लहान बहिणी. मग मी पुस्तक बळकावयाचो आणि बहिणी तक्रार घेऊन आईकडे जायचा व मला मग पडती बाजू घ्याय्ला लागायची. मग ती गेल्याव्र पुन्हा चांदोबावर माझा कब्जा [ सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल की माझी "डॉनगिरी " ही तेव्हापासूनची बरं का ! ]
माझा एक आत्तेभाऊ होता, त्याच्याकडे "ठकठक" यायचे. मग २-३ महिन्यात आमची जेव्हा एकमेकाकडे चक्कार व्हायची तेव्हा "चांदोबा आणि ठकठक" ची अदलाबदल हमखास . ...
तेव्हा "एका चांदोबामागे २ ठकठक " असा रेट पडायचा ...
आजही जर कुठे मिळाले तर वाचायला जरूर आवडेल ...
चांदोबाचा व्यवहार करणारा छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 May 2008 - 4:45 am | मदनबाण
मलाही चांदोबा वाचायला फार आवडत असे.....विक्रम-वेताळाची गोष्ट तर मला फार आवडत असे.....
चंपक आणि ठकठक पण वाचायचो...ठकठक मधील दिपू दी ग्रेट या व्यक्तीरेखेचा मी जबरदस्त पंखा होतो.....
(बालपणीच्या रम्य आठवणीत रमलेला)
मदनबाण.....
16 May 2008 - 12:06 am | ईश्वरी
वा, वा मस्त आठवण करून दिलीत. विक्रम वेताळ माझ्याही आवडीची गोष्ट असायची. त्यातल्या त्यात वेताळाचा कूट प्रश्न आणि त्याचे विक्रमाने चतुराईने दिलेले उत्तर हे वाचायला छान वाटायचे. किशोर ही माझ्या खास आवडीचे पुस्तक होते.
तुम्ही ते विक्रम वेताळ चे चित्र टाकून लेखाची रंजकता वाढवली आहे. चांदोबाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
एक प्रश्नः तमीळ / तेलगू भाषेतील चांदोबाचे नाव काय होते?
ईश्वरी
16 May 2008 - 1:41 am | ॐकार
चांदोबा, ठकठक, चंपक, किशोर याचबरोबर अबब हाती, छावा चे अंकही वाचायचो. आम्ही ३-४ मित्र मिळून प्रत्येक जण एकेक अंक विकत घेत असे( म्हणजे आई वडील आणून द्यायचे) आणि मग आम्ही अदलाबदल करून वाचत असू. राजू आणि छोटी खार अजूनही आठवते!
16 May 2008 - 1:54 pm | मनस्वी
दिवाळीला "टॉनिक" म्हणूनपण अंक निघायचा लहात मुलांसाठी.
16 May 2008 - 1:55 am | मुक्तसुनीत
"हे राजा ....या प्रश्नांची उत्तरे ठाऊक असूनही .........शकले उडतील !"
- पंचतंत्र (कृतप्रणाश , अकृतागम वगैरे शब्द इथे पहिल्यांदा वाचले)
-तिळ्या बहिणी
चांदोबांच्या अर्कचित्रांची एक शैली होती. सर्व राजे मिशीवाले , ब्राम्हण लांबच लांब शेंडीवाले असायचे ....
16 May 2008 - 1:01 pm | विजुभाऊ
कृतप्रणाश हा शब्द असा नसुन तो लब्धप्रणाश असा आहे. पंच तंत्रापैकी एका तंत्राचे हे नाव आहे.
विष्णुशर्मा ने मित्र लाभ , मित्र भेद , काकोलुकीय , लब्धप्रणाश ,( पाचवे नाव आठवत नाही) अशी एकुणपाच तंत्रे लिहीली आहेत.
करटक ,हिडींबक , दमनक अशी नावे या प्रकारणात येतात.
16 May 2008 - 5:31 pm | मुक्तसुनीत
:-)
16 May 2008 - 8:20 pm | कलंत्री
यनावालांच्या लिखाणात लिहिल्याप्रमाणे आजही खेड्यात वाचनाचे सूख मिळत नाही. त्यासाठी आपण आपल्या / कुटुंबियांच्या वाढदिवसाला या अंकाची भेट गरिबमुलांना वार्षिक अंकाच्या निमित्त्याने नक्कीच देऊ शकतो.
बाकी लेख अप्रतिमच आहे आणि सचित्र असल्यामूळे रंगत काही वेगळीच झाली आहे.
मित्रा आजानुकर्णा : असे लेख वर्तमानपत्रात आले पाहिजे.