नाईलच्या देशात -१
नाईलच्या देशात -२
नाईलच्या देशात - ३
नाईलच्या देशात - ४
नाइलच्या देशात - ५
नाईलच्या देशात - ६
नाईलच्या देशात - ७
पहाटे तीनला उठुन जायचे तेही आराम करायला गेलो असता; ही कल्पना फारशी मानवणारी नव्हती. मात्र समजले की जर साडेतीनला निघुन साडे-सहा सात पर्यंत पोचले तरच शक्य आहे. तिथे नऊ म्हणजे रखरखाट होईल आणि काही बघणे दूर, तिथे उभे राहणे त्रसाचे होईल. मग ठरवले, कधीही निघायचे असो, अबू सिंबेल हे पाहायचेच. बहुधा बोटीवरच्या सर्वांचा ठरलेला कार्यक्रम असावा. फक्त एकत्र न जाता प्रत्येक जण आपापल्या पर्यटन संस्थेच्या माणसांबरोबर वा केलेल्या आरक्षणानुसार जात होते. अर्थातच सगळे पर्यटक पहाटे तीनला निघणार असे माहित असल्याने बोटीवर भल्या पहाटे चहा/ फळांचे रस वगैरेची व्यवस्था चोख होती (मात्र ती तळातल्या भोजनगृहात नसून आमच्या मजल्यावरच्या मद्यागारात करण्यात आली होती:)). खाली उतरलो तो प्रत्येकाच्या हाती बोटीचा सेवकवर्ग पर्यटकांना खोली क्रमांक विचारुन ते ते क्रमांक घातलेल्या नाश्त्याच्या भल्या मोठ्या कागदी पिशव्या आग्रहाने देत होता. पिशवीचा आकार पाहता ’आपण जेवणही अबू सिंबेललाच करणार काय’ असे सैयदला विचारले. गाडी निघाली आणि कालच्या ग्रॅनाईटच्या खाणीबाहेर प्रवेशद्वारा बाहेर येऊन ठाकली. अबू सिंबेलला जाणाऱ्या सर्व बसेस, व्हॅन व गाड्यांचा ताफा पोलिसांच्या वाहनाच्या देखरेखीत एकत्रित जाणार होता असे समजले. सैयदने सांगितल्यनुसार पहाटेच्या अंधारात मोकळ्या रस्त्यावर काही बेदरकार चालक बेफाम गाड्या चालवुन अपघाताला निमंत्रण देतात त्यामुळे सर्व ताफा शिस्तीत व नियंत्रणाखाली नेला जातो. मात्र जवळपास पावणे तीनशे किमी प्रवास अवेळी अंधारात व तोही निर्मनुष्य वाळवंटातुन असल्याने लुट्मारीच्या भयास्तवही असा बंदोबस्त असावा. दहा मिनिटात सर्व वाहने रांगेत उभी करुन नोंदणी झाली आणि ताफा सुटला.
पहिली पोलिसांची गाडी, मागे एक काळी गाडी मग पाठोपाठ आमची गाडी. एकदम आपण कुणी खासे असल्यासारखे वाटले आणि एकमेकाकडे पाहत आम्ही हसलो. साधारण पावणे चार झाले होते. आम्ही तिघे, सैयद व चालक असे अवघे पाच जण आणि दिमतीला १४ आसनी टोयोटा हायेस, तेव्हा गाडी सुटली की मस्त ताणुन द्यायची असा विचार बळावला. आस्वान शहर सोडले आणि गाडी वेगात आली. पुढे पुढच्या वाहनाच्या मागचे लाल दिवे, मागच्या काचेतुन आत घुसणारा मागच्या वाहनाच्या दिव्यांचा झोत तर मधेच समोरुन येणाऱ्या वाहनाचे दिवे, खाली तुळतुळीत रस्ता, आजुबाजुला मिट्ट काळोख आणि जोडीला यंत्राचा सुरेल घरघराट असा लयबद्ध प्रवास सुरु झाला. झोंबरा गारवा असलल्याने वातानुशितन चालु न करता वर गपचुप काचा लावुन निमूट बसलो होतो. हळुच डोळा लागला. आणि अचानक हलक्याश्या धक्क्यामागुन अर्चनाचा आवाज आला, ’लवकर उठ’. खडबडुन जागा झालो. गाडी तर सुरळीत चालली होती, कुठे काही गडबड नाही, सर्वत्र नि:शब्द शांतता होती. मग कशाला उठवले असावे म्हणुन मी खिडकीत बसलेल्या अर्चनाकडे पाहिले तर तिने आपला चेहरा न वळवता फक्त उजव्या तर्जनीने बाहेर इशारा केला. एव्हाना मी पूर्ण जागा झालो होतो. खिडकीतुन बाहेर नजर गेली आणि नजर क्षितीजावर खिळुन राहिली. मी नकळत आपोआप मागच्या खिडकीत जाऊन बसलो आणि मंत्रमुग्ध होऊन एकटक आकाश आणि क्षितिजाच्या संगमाकडे पाहत राहिलो. कुबेराने पहाटे पहाटे दान म्हणुन अगणित हिरे स्वर्गातुन पृथ्वीकडे भिरकावावेत तदवत संपूर्ण आकाश लक्षावधी लुकलुकत्या तारे नक्षत्रांनी सजले होते. डोळ्यांवर विश्वास तरी कसा बसावा? हे दृश्य आयुष्यात प्रथमच दिसत होते. कुठे अगदी दृष्ट लागण्यापुरतादेखिल ढग नाही, कुठे विद्रुप प्रकाशझोत नाही, मधे एकही इमारतीचा अडथळा नाही, सर्वत्र निरव शांतता आणि वर डोळे दिपविणारे ते स्वर्गिय ऐश्वर्य! डोळ्यापुढे नकळत कुसुमाग्रजांचे शब्द तरळले
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरती तारकादळे जणू नगरात
विजेचे असंख्य दिप आणि त्यांचा तो झगमगाट आतापर्यंत कैकवेळा पाहिला होता, मात्र तारकादळे अवतरताना पाहण्याचा हा एकमेव प्रसंग. सर्वत्र दूरवर सपाट वाळवंट, कुठे कसलेही बांधकाम नाही, झाडे नाहीत, धुरळा नाही. होते ते फक्त निरभ्र दाट आकाश आणि ते लखलखते लाखो तारे. दोन्ही हातांचे पंजे काचेवर ठेवुन मी कितितरी वेळ एकटक पाहत होतो.
हळुहळु आकाशाने रंग बदलायला सुरुवात केली. एकेक दिवा मंदावु लागल. बघता बघता आकाश निळे झाले. सर्वत्र पसरलेल्या वाळुतुन पुढे सरताना मधेच सुरक्षानाके आणि त्या आसपासची हिरवळ दिसु लागली. अबू सिंबेलच्या विमानतळाला मागे टाकत आम्ही अबू सिंबेलमध्ये प्रवेश केला. मोहक बागबगिच्याने सजवलेल्या रस्त्याने जात आम्ही एका मोठ्या मैदानात थांबलो. कॅमेरा सरसावत मी अधिरतेने उठलो. सैयदने एका बगिचातुन नेत सरळ मुख्य प्रवेशद्वाराकडे नेले. तिकिटे हातात होतीच. तपासणी पार पाडुन आम्ही आत शिरलो. नुकतेच उजाडले होते. समोर एक टेकडी होती. डाव्या अंगाला गाव दिसत होते. टेकडीच्या मध्यभागी एक प्रवेशद्वार व जीना होता. सैयदने आम्हाला उजव्या अंगाने चलायला सांगितले. समोर काही पावलातच नासर तलाव लागला. कपारीदार कड्यांच्या अंगाने पसरलेला अजस्त्र जलाशय. समुद्रासारख्या लाटा वागवणारे ते हिरवट निळसर पाणी बघत बघत आम्ही रेताड पायवाटेने टेकडीच्या जवळुन चालु लागलो. एव्हाना बरेच अंतर चालुन झाले होते. आणि प्रदक्षिणा अर्धी होताच डोळे दिपविणारे दृश्य दिसले. अलिकडुन मातीची दिसणारी टेकडी समोरुन सोनेरी झाली होती. निळ्याशार आकाशाखाली ती नरिंगी सोनेरी टेकडी म्हणजेच अबू सिंबेलचे जगप्रसिद्ध मंदिर होते!
गर्दी गोळा व्हायच्या आत पोचायच्या हेतूने मी झपाझप पावले टाकित पुढे गेलो आणि मंदिर समोर आले. दुसऱ्या रॅमसिसचे चारांपैकी डावीकडचे दोन भव्य पुतळे सूर्याच्या पहिल्या किरणात न्हाऊन निघाले होते. धापा टाकत आल्याचे चीज झाले आणि मधे कुणीही पर्यटक चौकटीत घुसायच्या आत मी ते दृश्य टिपले.
एकदा का गर्दी जमली की हवे त्या कोनातुन हवे ते दृश्य टिपायचे स्वातंत्र्य संपले. हे मंदिर अमुन रा, हेरखेर्त व टा या देवांचे आणि सम्राट दुसरा रॅमसिसचे. सातसुद्धा वाजताच समोरचा सूर्य अत्यंत प्रखर जाणवत होता. मंदिराच्या पुढे उजव्या अंगाला दुसरे देऊळ होते ते हॅथोरचे. दोन्ही मंदिरे एकाच पद्धतिने डोंगराच्या विशाल खडकात कोरलेली. एका मंदिरात समोरचे खांब म्हणजे दुसऱ्या रॅमसिसचे चार पुतळे तर दुसऱ्या मंदिराच्या खांबावर दुसरा रॅमसिस, त्याची प्रिय राणी नेफेर्टरी आणि देवता. भव्यता म्हणजे अबू सिंबेल.
ही मंदिरे ख्रिस्तपूर्व १३व्या शतकातली. सुमारे वीस वर्षे लागली ही मंदिरे पूर्ण व्हायला. सलग एकठेपी डोंगराच्या एखाच खडकातुन कोरलेली ही अप्रतिम देखणी मंदिरे. पहिले मंदिर हे अधिक भव्य. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला सम्राट दुसऱ्या रॅमसिसचे देखणे प्रचंड पुतळे. पासष्ठ फूट उंचीचे हे पुतळे खालचा इजिप्त आणि वरचा इजिप्त अशा दुहेरी सत्तेचे स्वामित्व दाखविणाऱ्या दुहेरी मुहुटाने भूषविलेले. एकुण सगळेच अति भव्य. दर्शनी भागच मुळी शंभर फूट उंच आणि सव्वाशे फूट रुंद. हे चारही पुतळे सिंहासनस्थ मुद्रेत.
प्रसन्न व विजेत्याचा दिमाख मिरविणाऱ्या चेहेऱ्यावर सम्राटपद व देवत्व दर्शक कृत्रिम दाढी.
या चारही पुतळ्यांच्या पायाशी जेमतेम गुडघ्याखालच्या पातळीचे अनेक पुतळे - सम्राज्ञी व पट्टराणी नेफेर्तारी, आई राणी मुतु तुय, दोन पुत्र आमुन हर खेपेशेप व रॅमसिस; आणि सहा मुली बिंतनथ, बकेतमुत, नेफेर्तरी, मेरितामेन, नेबेत्तावी आणि इसेत्नोफर्त. प्रवेशद्वाराच्या बरोबर वर शिरोभागी मध्यभागी डोक्यावर सूर्यगोल धारण करणाऱ्या व ससाण्याचा चेहरा असलेल्या रा हराख्थी ची मूर्ती आणि दोन्ही बाजुंना त्याचे पूजन करणाऱ्या राजाच्या कोरलेल्या मूर्ती.
वरच्या सरळ रेषेत असलेल्या कमानीवर उगवत्या सूर्याला वंदन करणारी २२ बबून माकडे.
त्याच्या बरोब्बर खाली एका समांतर रेषेत अनेक आकृति कोरलेल्या मात्र प्रामुख्याने त्यात होते फणा काढलेले नाग अणि त्यांच्या मस्तकावर सूर्यनारायण.
एकुणच पुढे अनेक प्राच्य वास्तुंमध्ये नाग व सूर्य तसेच गाय देखिल वैपुल्याने आढळुन आली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पहारेकरी आहे जो फोटो काढायला मनाई असल्याचे सांगतो. याच्या हातात एक सणसणीत व वजनदार पितळी चावी - ’आंख’ म्हणजे अमरत्वाचे प्रतिक. आतमध्ये एकात एक अशी विस्तिर्ण दालने व दोहो बाजुंना खोल्या. मुख्य गाभाऱ्यात रा होराख्तीस, दुसरा रॅमसिस, अमुन रा व टा यांचे आसनस्थ पुतळे. आश्चर्य म्हणजे त्या खोलवर गाभाऱ्यातल्या मूर्तींवर वर्षातुन दोन दिवस म्हणजे २२ ऑक्टोबर व २२ फेब्रुवारी रोजी सकाळच्या उगवत्या सूर्याचे किरण थेट आतवर प्रवेश करुन या पुतळ्यांच्या चेहऱ्यावर पडतात व जवळपास वीस मिनिटे असतात. मात्र फक्त तीनच मूर्ती प्रकाशमान होतात, टा हा पाताळातला देव तो अंधारवासी त्यामुळे त्याला मात्र या किरणांचा स्पर्श होत नाही. एव्हढ्या अजस्त्र मंदिराच्या साठ सत्तर फूट खोल गभाऱ्यातल्या मूर्तींवर अचूक सूर्यकिरण देणारे बांधकाम त्या काळातल्या इजिप्त मधल्या तज्ज्ञांचा खगोलशास्त्राचा अभ्यास किती अफाट असावा हे सांगुन जाते. बरे नेमके हेच दोन दिवस का? हा योगायोग नव्हे तर हे दिवस दुसऱ्या रॅमसिसचे अनुक्रमे जन्मदिवस व राज्यारोहण दिवस आहेत. ह्या मंदिराची निर्मिती झाली तीच दुसऱ्या रॅमसिसच्या कडीश युद्धात नुबीय राजा हिट्टीटीस याच्या वरील विजयाचे स्मारक म्हणुन. पुढे याच राजाची कन्या रॅमसिसची पत्नी झाली.
या मुख्य देवळाच्या नैऋत्येला जरा लहान असे दुसरे मंदिर आहे. हे मंदिर आहे हॅथोर या देवतेचे आणि रॅमसिसची प्रिय राणी नेफेर्तरी हीचे. या मंदिराच्या दर्शनी भागात सहा कोनातले खांब एकसंध असे कोरुन काढलेले आहेत. अर्थातच मधोमध मंदिराचे प्रवेशद्वार आहे. या खांबांमधोमध राजा व राण्यांचे पुतळे आहेत. सर्व मूर्ती या जवळपास ३५-४० फूट उंचीच्या. हे मंदिर अनेक वशिष्ठ्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि एक प्रमुख आणि एकेमेकाद्वितिय अशी गोष्ट म्हणजे प्राचिन इजिप्तच्या वारशात राजा आणि राणी यांच्या मूर्ती फक्त इथे या मंदिरातच समान आकाराच्या आहेत आणि हे एक आश्चर्य मानले जाते कारण इजिप्तच्या संस्कृतिनुसार वा रिवाजानुसार राणिची मूर्ती ही फारतर राज्याच्या मूर्तीच्या गुडघ्याईतपतच असते.
निर्मिती नंतर काळाच्या ओघात हे मंदिर हळुहळु दुर्लक्षित झाले व इथे फारसा वावर उरला नाही. ते काळाच्या विस्मृतीत गेले.हजारो वर्षे वाळुत गाडले गेलेली हे मंदिर १८१३ मध्ये अचानक स्वीस अभ्यासक बुकहार्ड याला सापडले. त्याने बेलेझोनी या समकालिन ईटालीयाच्या सहायाने प्रयत्न केले पण त्याला मंदिराचा प्रवेशरस्ता मात्र सापडु शकला नाही. मात्र १८१७ मध्ये बेलझोनी याने पुन्हा प्रयत्न केले व त्याला यश आले, त्याने नेता येण्यासारखे सर्व नेले. या संशोधनात अबु सिंबेल या स्थानिक मुलाची मदत झाली ज्याने वाळुच्या उदरात हे मंदिर लुप्त होताना व पुन्हा दृश्य होताना पाहिलेले होते. यामुळेच या संकुलाला अबू सिंबेल हे नाव पडले असे इथले काही स्थलदर्शक सांगतात.या मंदिराचे त्याहुनही मोठे वैशिष्ठ्य म्हणजे या मंदिराचे पुनर्वसन! जेव्हा आस्वानचे महाधरण बांधायचे ठरले तेव्हा पाणलोटात नुबीया प्रांतातले काही भूभाग जलगत होणार होते त्यात या मंदिराचाही समावेश होता. एकुण अठरा वास्तु पाण्यात जाणार होत्या. अखेर युनेस्को तसेच जगभरतील कलाप्रेमी, पुरातत्त्व संशोधक संस्था व अनेक स्थापत्यतज्ञ यांनी कम्बर कसली आणि अबू सिंबेल वाचवायचे ठरवले. हा एक चमत्कारच होता. शास्त्रोक्तपणे नियोजन करुन या मंदिराचे अनेक भाग ठोकळ्यांच्या स्वरुपात कापण्यात आले. मग मूळ जागेच्या जवळ नदीच्या काठीच साठ फूट उंचीचे कृत्रिम टेकाड निर्माण करुन त्या सुरक्षित उंच स्थळी ते कापलेले ठोकळे पुन्हा मूळ आकाराबरहुम बेमालूमपणे एकत्र जोडले गेले व तंत्रज्ञानाच्या वापराने डागडुजी व साधकाम करुन असे काही जोडले की सांगुन विश्वास बसु नये.
एकीकडे सैयद कडुन माहिती ऐकताना माझा कॅमेरा सातत्याने समोरचे दृश्य टिपत होता. अर्थात तोच उद्योग महत्त्वाचा, माहिती नंतरही समजते. मात्र किमान जिथे जात आहोत त्या स्थळाचा आराखडा समजला पाहिजे आणि महत्वाचे काय ते माहित पाहिजे. ते समजले की कुठे काय टिपायचे ते ठरते, कसे ते त्या स्थळी पोचल्यावर ठरते. नुकत्याच उगवलेल्या सूर्यनारायणाच्या कोवळ्या किरणामध्ये ती सोनेरी वास्तू स्वर्गिय भासत होती आणि कितीही वेळी टिपली तरी समाधान होत नव्हते. इथे एक खास गोष्ट नजरेस आली ती म्हणजे प्रचण्ड लांब सावल्या. सर्वसामान्य माणसाची सावली वीस पंचवीस फूट सहज पडत होती. त्या ६५ फूटी मुर्तीच्या मापात समोर पडलेल्या पर्यटकांच्या सावल्यांची लांबी लक्षात येत होती.
त्या संपूर्ण परिसराचे भरपूर चित्रण केले. रॅमसिस मंदिराकडुन ते हॅथोर मंदिराकडे कधी हॅथोर मंदिराकडुन रॅमसिस मंदिराकडे, कधी दोहोंच्या समोर सायंकाळच्या दृक्श्राव्य कार्यक्रमासाठी केलेल्या प्रेक्षागारातुन, कधी मंदिरासमोरच्या अथांग जलाशयाचे. मंदिराची रचना, त्यावरचे कोरीव काम, मूर्ती, चिन्हे, देवदेवता, असंख्य विषय समोर होते. या मंदिरांसमोर पसरलेल्या जरा भरडश्या टपोऱ्या वाळुत काही झुडुपे उगवलेली होती. त्यावर चिमण्यांचे थवे होते. भराभर झेप घेत चिमण्या खाली येत धिटाईने वाळुत काहीतरी टिपत होत्या. त्या वाळुत त्यांना काय खायला मिळत होते ते देव जाणे. ते पाहुन मला ’ज्याने चोच दिली तोच चाराही देतो’ हा वाक्प्रचार आठवला. समोर पाण्याच्या पलिकडे टेकाड वजा डोंगर दिसत होते. मधेच एखादी पर्यटन नौका जात होती. काठावर उभे राहुन पाहिले असता एक नैसर्गिक धक्का दिसला ज्यावर होड्या बांधायची व्यवस्था केलेली होती. सर्वत्र पर्यटक वास्तुंचे आणि एकमेकाचे फोटो टिपण्यात मश्गुल होते. नऊ नाही वाजले तर सूर्य तळपायला लागला होता. सकाळी साडेतीनला निघुन सातच्या आत पोचायला का हवे ते समजत होते. मात्र डोळ्यापुढे असे अद्भुत चित्र साकार झाल्यावर आपण अतिपहाटे पावणे तीनला उठलो आहोत याचा कुठे ही शीण जाणवत नव्हता. उलट आता जायची वेळ झाली याची रुखरुख लागली होती.
परत कधी आलो तर एक संपूर्ण दिवस इथे घालवायचा, एकेक कोपरा फुरसतीने बघायचा असा विचार सर्वांच्याच मनात आला. पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहत व जाताजाता पटकन काहीतरी टिपत आम्ही बाहेर आलो. वाहनतळावर गाडी उभीच होती. त्या मस्त शिरशिरी आणणाऱ्या वातावरणात भरपूर भटकंती झाल्यामुळे आता परत आल्यावर भूक जाणवु लागली. आम्ही पाचजणांनी थैले उघडुन ताव मारला. निघताना आवर्जुन निर्वातीत बाटलीत भरुन घेतलेले कडकडीत पाणी सत्कारणी लागले. कॉफीचे/ दुध भुकटीचे ससे, साखरेच्या कागदी नळ्या आणि कागदी पेले आणले होते ते सार्थकी लावत गरमागरम कॉफी घेतली. गाडी निघाली. लवकरच गाव मागे पडला आणि सर्वत्र दूरवर पसरलेले वाळवंट आणि मधेच उगवलेले काळेभोर दगड व दगडांच्या टेकड्या. मधोमध सरळसोट टोकाला जाणारा काळाकुळकुळीत डांबरी रस्ता. येताना वरची शोभा पाहिली आता जाताना खालची जमीन पाहत होतो. आपल्याकडे मुंबई पुणे प्रवासात मधेच एखाद्या खडकावरुन बारिकसा ओहळ वाहताना दिसावा तसे काळ्या फत्तरांतुन मधेच मऊसूत बारीक वाळु वाहत आलेली दिसत होती. आणि अचानक उजव्या अंगाला एक विलक्षण दृश्य दिसले. अथांग वाळु, क्षितिजाला स्पर्श केलेले आकाश यांच्या संगमावर चक्क पाणी दिसत होते. चौपाटीच म्हणा ना. आणि लख्खन डोक्यात प्रकाश पडला, हे तर मृगजळ! मृगजळ आहे ही माहित असतानाही मूर्खागत आशा वाटत होती की जरा पुढे गेलो तर अधिक मस्त फोटो येईल. अखेर ते मृगजळ आहे मान्य करुन मुकाट्याने गाडी सोयीच्या जागी क्षणभर थांबवायला सांगितली आणि पटापट मृगजळ टिपायचा प्रयत्न केला.
हाही एक सुरेख अनुभव. डोक्यावरच्या सूर्याचा विसर पाडणारा. आयुष्यातला तो सोनेरी दिवस मनात साठवत आम्ही बोटीवर परतलो.
प्रतिक्रिया
4 Jul 2010 - 5:46 pm | वेताळ
:(
वेताळ
4 Jul 2010 - 5:55 pm | स्वाती दिनेश
सुंदर वर्णन,
पण फोटो दिसत नाहीयेत, :(
त्यामुळे रसभंग झाला,
स्वाती
4 Jul 2010 - 5:58 pm | सुनील
हेच म्हणतो.
तारकादळांचा फोटो पहाण्यास उत्सुक!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Jul 2010 - 6:02 pm | सर्वसाक्षी
असावी असे वाटते.
मालक-चालक-पालक वर्गास विनंती - लेखन/प्रसिद्धी प्रक्रियेत काही त्रुटी नाही ना? प्रयोग म्हणुन दुसर्या ठिकाणी दुसरे चित्र फ्लिकर दुवा स्वरुपात टाकले पण तिथेही चित्राची जागा फुलीने घेतलेली दिसले
(फ्लिकरपीडीत) साक्षी
4 Jul 2010 - 6:20 pm | चित्रा
फ्लिकरवरचे फोटो देताना -
१. ऑल सायजेस असे लिहीलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
२. हव्या त्या साईझमध्ये फोटो निवडा, आणि मग त्या फोटोच्याच पानावर खाली असा मजकूर दिसेल
To link to this photo on other websites you can either:
1. Copy and paste this HTML into your webpage:
त्यातील पहिल्या पर्यायाखाली दिलेला एचटीएमएलचा पूर्ण दुवा कॉपी करून मिपावरील चित्रांचे दुवे देण्याचा दुवा वापरून "इन्सर्ट/एडिट इमेज" मधील "इमेज यूआरएल" समोरील मोकळ्या जागेत चिकटवा.
उदा. हे असे.
काही अडचण येत असली तर कळवावे.
4 Jul 2010 - 6:47 pm | सर्वसाक्षी
पण आज चालत नाही. आणि फ्लिकर दुवा जर ब्राउजरवर चिकटवला तर मूळ चित्र व्यवस्थित दिसत आहे.
फ्लिकरवर नुकतेच काही बदल झाले असावेत. आता फोटोच्या वर अनेक पर्याय पूर्वी असायचे ज्यातला एक 'ऑल सईजेस' ते आता दिसत नाहीत. आता चित्राला 'अॅक्शन' आणि शेअर धिस' असे दोन पर्याय आहेत. शेअर धिस मध्ये ग्रॅब द युआरेल व ग्रॅब द लिंक असे पर्याय आहेत आणि तेच वापरले आहेत.
4 Jul 2010 - 7:01 pm | चतुरंग
फ्लिकरवर फोटू उघडला.
ऑल साईजेसवर क्लिक केला.
चित्र उघडलं (नेहेमीचा Copy URL पर्याय दिसत नाही)
म्हणून मग चित्रावर राईट क्लिक करुन प्रॉपर्टीजमधे गेलो
तिथे यूआरेल दिसतो तो कॉपी करुन टाकला.
चतुरंग
4 Jul 2010 - 7:06 pm | सर्वसाक्षी
तरीच म्हणतोय की मी एक चित्र संपादीत करेपर्यंत सगळी दिसु कशी लागली
4 Jul 2010 - 7:23 pm | सहज
या मंदीराच्या पुनर्वसनावर एक तूनळी फीत
लुटा लुत्फ अबु सिंबेलचा. पेनोरॅमीक व्हु. तसेच आजवर सर्वसाक्षी यांनी वर्णन केलेल्या नाईल क्रुझ सफरीचा.
4 Jul 2010 - 7:53 pm | शिल्पा ब
छान लिहिले आहे...फोटो मस्तच !!
वॉटरमार्क तेव्हढा जरा छोटा करून एका कोपऱ्यात टाका म्हणजे फोटोचे सौंदर्य कमी होणार नाही.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
4 Jul 2010 - 7:53 pm | स्वाती दिनेश
आता चित्रं दिसत आहेत, नेहमीप्रमाणेच फोटोंबाबत " क्या कहने? "
स्वाती
4 Jul 2010 - 8:03 pm | रामदास
एक परीपूर्ण प्रवस वर्णन वाचल्याचे समाधान मिळाले.ह्या भागात थोडेसे कवी झाल्याचा भास झाला .विषेशकरून कुबेराने
पहाटे पहाटे दान म्हणुन अगणित हिरे स्वर्गातुन पृथ्वीकडे भिरकावावेत तदवत संपूर्ण आकाश लक्षावधी लुकलुकत्या तारे नक्षत्रांनी सजले होते. अशा ओळी वाचताना.
तुमच्या फोटोंचे रसपान करावे. रसग्रहण करू नये हेच खरे.
एक विनंती : फारसे खाजगी नसेल तर एकूण खर्च/विमानाचा खर्च/ ट्रॅवल कंपनी कोणती ते सांगाल का ?
5 Jul 2010 - 1:32 pm | सर्वसाक्षी
रामदासशेठ,
धन्यवाद.
<एक विनंती : फारसे खाजगी नसेल तर एकूण खर्च/विमानाचा खर्च/ ट्रॅवल कंपनी कोणती ते सांगाल का >
अवश्य सांगेन की, पण त्या निमित्ताने घरी या. येताना मास्तरांना आणा; की एखाद्या शनिवारी ठाण्यात मिपा चा 'इजिप्त कट्टा' करु या? सवडीने सगळे फोटुही बघता येथील, इथे सगळे देणे शक्य नसते.
जमवायच मनावर घ्या, मी प्रक्षेपकाची व्यवस्था करतो, मोठ्या पडद्यावर पाहु.
4 Jul 2010 - 8:50 pm | अभिज्ञ
सर्व भाग वाचले.
लेखमालिका उच्च झालीय.
अभिज्ञ
5 Jul 2010 - 1:39 pm | ऋषिकेश
शेवटचा फोटो मस्त आलाय
येऊदेत पुढचे भाग
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
6 Jul 2010 - 12:17 pm | समंजस
छायाचित्रे आणि प्रवासवर्णन/स्थळवर्णन/वास्तुवर्णन दोन्हीही..
6 Jul 2010 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर ... इजिप्तच्या पर्यटन विभागाकडून तुम्ही काही टक्के मागितले पाहिजेत ... आणि लिखाणही उच्च दर्जाचं!
अदिती