सकाळी जाग येताच माझी पावले आपसूकच खिडकीकडे वळली. आकाश स्वच्छ होते, मात्र धुक्यामुळे वातावरणात थोडी धूसरता पसरली होती. मी खिडकीतुन पिरॅमिड्सचा शोध घेउ लागलो. अखेर बारकाईने पाहिल्यावर सरळ रेषेत मला दोन धूसर आकृति दिसल्या आणि आनंद झाला. आज पहिला कार्यक्रम पिरॅमिड्स भ्रमंती हाच होता.
बाहेर बघत असताना नजर अनिवर्यपणे आजुबाजुच्या बिनगिलाव्याच्या घरांवर व दूरवाहिन्यांच्या ग्रहणतबकड्यांनी भरलेल्या गच्च्यांवर जात होती. भिंतींना गिलावा का बरे नसावा? आपल्याकडे देखिल दिल्ली परिसरात अशी बिन गिलाव्याची भिंतींच्या विटा दाखविणारी घरे दिसतात खरी. बहुधा अत्यल्प पर्जन्यमानामुळे भिंतींना ओल येण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे कदाचित गिलावा केला जात नसावा. पण पुन्हा किडा वळवळला. पाणी झिरपत नसले म्हणुन काय भिंती अशा घराला विद्रुप करणाऱ्या असाव्यात? काल सायंकाळी अहमद-महमदांना विचारले असता ’नुकतीच बांधलेली असावित, त्यामुळे काम चालु असेल, करतील पुढे मागे’ असा खुलासा त्यांनी दिला. मला ते काही पटले नव्हते. त्या ईमारती काही नव्या कोऱ्या वा आधुनिक वाटत नव्हत्या. पुढील प्रवासात मात्र हा रहस्यभेद झाला. भिंतींना गिलावा बाकी म्हणजे बांधकाम अपूर्ण; आणि घर बांधुन पूर्ण झाले की मग घरपट्टी आकारली जाते असा स्थानिक कायदा असल्याने अनेक साळसूद घराला गिलावा न करता खुशाल करमुक्त राहत होते. हं. जावे त्यांच्या देशा तेव्हा कळे हेच खरे. गच्चीतल्या तबकड्या पाहता समजले की लोक दूरदर्शनचे गुलाम आहेत आणि इथे तारजालसेवा नसावी. असो. शहरात वर्दळ सुरू झाली होती. आम्ही देखिल आवरुन नाश्ता करुन अहमद-महमदची हाक येण्याआधीच खाली उतरलो. हवा छान गार होती आणि आम्ही भक्कम जाकिटे, टोप्या वगैरे घेऊन सज्ज होतो. बरोबर कॅमेरा आणि खाउची पिशवी होतीच!
कालचीच रुपेरी रंगाची हुंडाई वॅगन हॉटेलच्या बाहेरील रस्त्यावर अगदी स्वागतकक्षासमोर समोर येउन ठाकली आणि त्यातुन तिघेजण बाहेर आले. अहमद, महमद आणि आणखी एक रुबाबदार युवक. महमदाने अभिवादन करीत आम्हाला त्या नवीन युवकाची माहिती करुन दिली. ईतिहास, संस्कृति व शहरातील सर्व पुरातन वास्तुंचा उत्तम अभ्यास असलेला तो युवक आज दिवसभर आम्हाला स्थलदर्शन घडविणार होता. जीन्स, पांढरा सदरा, वर कृत्रिम चामड्याचे जाकिट व गळ्यात पांढरा दुपट्टा घातलेल्या व प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या त्या युवकाचे नाव होते ’अहमद’. मला डोळ्यापुढे साक्षात ’जॉनी मेरा नाम’ ची श्रेयनामावली दिसु लागली...
आय एस जोहर
आय एस जोहर
आय एस जोहर
बहुधा या देशाच्या कायद्यानुसार मुलाचे नाव अहमद वा महमद खेरीज अन्य काही ठेवल्यास सरकार गलेलठ्ठ कर आकारीत असावे.
एकुण वातावरण निर्मिती तर उत्तम झाली होती. ’संध्याकाळी भेटु पुन्हा, दिवस मजेत घालवा आणि आमच कैरो मनसोक्त बघा’ असे सांगत अहमद महमद निघाले आणि नव्या अहमदासह आम्ही पिरॅमिड्सकडे कूच केले. पिरॅमिड संकुलाच्या आवारात शिरताच गाडी आम्हाला घेऊन थेट प्रवेशद्वाराकडे आली. आमच्या प्रवेशपत्रिका अगोदरच घेउन ठेवलेल्या होत्या. अहमदने आम्हाला समजावले की पिरॅमिड्च्या अंतर्भागात जायला दिवसाला फक्त १०० प्रवेश दिले जातात व शिवाय आता पिरॅमिड्सच्या गाभ्यात पोकळी व मार्गिकांखेरीज बघण्यासारखे काहीही नाही. एखादा प्राच्यविद्या अभ्यासक असेल तर त्याने अवश्य जावे, आम्हाला आपले बाह्यरुपच बरे. पिरॅमिड्सची होणारी झीज व हानी थांबविण्यासाठी सरकारने मोजक्या प्रवेशाचा नियम केला होता. तिथे गेल्यावर असे दिसुन आले की कुणी पिरॅमिड्सवर चढु नये म्हणुन पर्यटन पोलिस तसेच पहारेकरी लक्ष ठेवुन असतात.
आमच्या पिशव्या, कॅमेरापेटी वगैरे साहित्य क्ष किरण यंत्रातुन पार केल्यावर आम्ही प्रवेशद्वाराची तटबंदी ओलांडुन पिरॅमिड्सकडे जाणाऱ्या चढणीवर चालु लागलो. आमची गाडी परतीच्या मार्गावरील दरवाज्यावर जाउन थांबणार होती, मधली सफर आम्हाला पायी करायची होती. उजवीकडे कड्यासारखी भिंत, डावीकडे खोलवर पसरलेला शहराचा विस्तार पाहत आम्ही चढण चढत होतो. समोर चढण संपते तेथे काही गाड्या व बस लावलेल्या दिसल्या. चढण पार केली, आणि आता क्षणभर दम घेऊ असा विचार सगळे करीत असतानाच लक्ष उजवीकडे गेलं आणि आम्ही आपोआप खेचल्यासारखे उजवीकडे जाउ लागलो. समोरच्या अंगाला एकामागे एक दोन विशाल पिरॅमिड्स दिमाखात उभे होते.
अलिकडे पिरॅमिड, पलिकडे पिरॅमिड आणि नजर पोचेपर्यंत खाली पांढुरकी-उदी वाळु आणि वर आकाशात निळ्या रंगाच्या असंख्य छटा.
काल रात्रीच्या अंधारात मी ध्वनी-प्रकाशाचा खेळ अलिकडच्या अंगाने प्रत्यक्ष पिरॅमिड्स पासून बऱ्याच अंतरावरुन पाहिला आणि मूर्खासारखे वैतागलो व म्हणालो ’हे एव्हढेसे मनोरे पाहायला आम्ही इथे इतके लांब आलो?’ मला माझ्या उथळपणाचं हसू आलं. लेका, सकाळ उजाडयची तर वाट पाहायचीस? शन्नांनी सांगितलाय ते विसरलास? "रात्र वेडी असते, सकाळ शहाणी असते" वेगळ्या अर्थाने ते इथे लागु पडत होते.
अहमद आम्हाला माहिती द्यायला उत्सुक होता. मात्र तो संयमी होता. मी त्याला सुरुवातीलाच विनंती केली की दोस्ता अहमदा, पिरॅमिड्स विषयी मलाही उत्सुकता आहे, मलाही सर्व माहिती ऐकायला आवडेल मात्र ते काम आपण जेवताना व प्रवासात करु शकतो; इथे याक्षणी मला फक्त मनसोक्त पिरॅमिड्स पाहायची आहेत, टिपायची आहेत कारण इथे मी असा पुन्हा येणार नाही. माहिती भले पुस्तकात वा जालावरही वाचता येईल. स्मितहास्य करीत अहमद म्हणाला, नक्कीच आपण आपल्या चित्रणाचा आनंद लुटा. फक्त आधी थोडी महत्वाची माहिती व सूचना ऐकुन घ्या व मग तुम्हाला हवे तेवढे भटका. इथे मी आयोजित सहलीबरोबर न येता स्वतंत्र आलो तो याच साठी. एकतर लोकांच्या आवडी निरनिराळ्या असतात. दुर्दैवाने अनेकजण भोज्ज्याला हात लावायला आलेले. उत्साह काय तो ’आम्ही हे बघितले’ हे सांगण्याइतकाच. पुढाच्यच क्षणी ’चला, आता या रणरणत्या उन्हात हा ओसाड किल्ला काय पाहायचाय?’ असे म्हणत पुढे सरणारे. दुसरा उच्छादी प्रकार म्हणजे ’पुरावाचित्रे’ टिपणारे. समोरच्या भव्य दरवज्यावरील कमानीवरचा मोराचा पिसारा पाहायचा सोडुन वा टिपायचा सोडुन लोक खुशाल इथे ठिय्या देतात आणि दात विचकुन ’अहो इथे माझा फोटो काढा’ अशी फर्माइश करतात. एखाद्या अप्रतिम वास्तूच्या पुढ्यात आपले चित्र काढल्याने आपले सौंदर्य वाढत नसून त्या वास्तूचे सौंदर्य नष्ट होते हे यांच्या गावीच नसते. ताजच्या मुख्यदरवाजातुन आंत शिरताच समोरचे बाक आठवते का? साक्षात ताजमहाल समोर असताना त्याच्याकडे पाठ फिरवुन आपले फोटु काढुन घेणाऱ्यांच्या रसिकतेला काय म्हणावे? बिचारा ताज. बरे आपण सुंदर असा वास्तुकलेचा नमुना आपल्यामुळे झाकुन इतरांना त्यापासून वंचित करत आहोत हे भानही नसते. सहल आयोजकांचा आणखीच वेगळा खाक्या. कुठल्याही ठिकाणी पोहोचताच सर्वात पहिली घोषणा ’ इथे आपण ४५ मिनिटे थांबणार आहोत. कृपया उशीर करु नका, वेळेवर आपापल्या बस/ गाडीवर या. दुसरी घोषणा’ इकडे लक्ष द्या, इकडे तिकडे फिरु नका. पुढे धावु नका. इथेच थांबा. आपल्याबरोबर इथले स्थलदर्शक आहेत ते अपल्याला इथली सविस्तर माहिती देतील’ झाले. मग तो स्थलदर्शक ती वास्तू कुणी, कधी, का, कशी, किती माणसे, किती सामान वापरुन बांधली वगैरे सुरू करतो. माहिती ही आवश्यकच पण एकतर ती प्रवासात त्या स्थळी जाताना द्यावी वा उद्या काय पाहायचे आहे त्याचे पत्रके छापून लोकांना आदल्या रात्रीच्या भोजनानंतर द्यावित. जिथे आपल्याकडे मर्यादित वेळ असतो तेव्हा तो सगळा वेळ ती वास्तू आपल्या मनात, डोळ्यात साठविण्यात आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात कारणी लावावा. तिथे ग्रहण केलेले एक एक दृश्य हा भविष्यातला आपल्यासाठीचा बहुमोल खजिना असतो. मंडळी, जरा विषयांतर झाले त्याबद्दल क्षमस्व.
तिथल्या परिसरातील एकुण पिरॅमिड्सची संख्या, रचना, पिरॅमिडच्या पुढ्यातील अंत्यसंस्कार मंदिर, पिरॅमिड्च्या आसपास वावरताना घेण्याची काळजी इत्यादी सूचना देत त्याने आम्हाला जायला सांगितले. तो बरोबर होताच. पहिला मुक्काम जमविला तो खुफु व चिऑप्सच्या पिरॅमिडकडे. हे सर्वात मोठे पिरॅमिड, १३८ मिटर उंचीचे. त्याची मूळ उंची बरीच अधिक होती मात्र हजारो वर्षे होत असलेल्या हवा व वालुकाकण यांच्या घर्षणामुळे सर्वात बाहेरच्या तुकतुकीत गिलाव्याच्या थराची झीज होऊन एकुण उंची घटली. त्यापलिकडल्या पिरॅमिडच्या कळसावर काही भागात असा तुळ्तुळीत गिलाव्याचा स्तर अजुनही शाबुत आहे. या पिरॅमिडचा एकेके चिरा सरासरी एक ते सव्वा टन वजनाचा! पिरॅमिडमागची संकल्पना मोठी सुरस आहे. जगाचा अधिपती म्हणजे सर्वोच्च स्थानावर असणारा सूर्यनारायण. इथल्या प्राचिन संस्कृतित त्याचे अनन्यसाधारण स्थान. मृत्यु झाला म्हणजे त्या माणसाचे इथले वास्तव्य संपले आता यापुढचे आयुष्य तो स्वर्गलोकात काढणार. पण स्वर्गलोकात जाणार कसा? तर पिरॅमिडमधून! का बरे? जेव्हा ढगा आडुन सूर्याचे किरण येतात तेव्हा त्या किरणांनी पिरॅमिडचा आकार धारण केल्याचा भास होतो. तेव्हा भूतलाकडून वर स्वर्गाकडे उर्ध्वगमन करायचे ते पिरॅमिडमधुन. एकेकाळी अफाट खजिना पोटात सामावणारी पिरॅमिड्स पुढे आक्रमणे व चोऱ्यांमुळे रिती झाली. पुढे तर पिरॅमिड म्हणजे अनमोल खजिना ही खूणगाठ ठरली आणि संपत्तीसाठी पिरॅमिड्स वर नाश ओढवले तेव्हा अनेक राजे लोकांनी डोंगरात शंक्वाकृती भागाच्या आत गुहा खणुन तिथे अंत्यस्थान बनविले. पुढे लक्झर येथे व्हॅली ऑफ किंग्ज मध्ये अशी असंख्य स्मारके पाहावयास मिळाली.
पिरॅमिड्स च्या सान्निध्यातले ते क्षण हा एक काहीतरी वेगळाच अनुभव होता. कसली हुरहुर मनात उमटली होती ते सांगता येत नाही पण आपण कुठल्यातरी अगदी वेगळ्याच विश्वात असल्याचा भास होत होता. आम्ही गेल्या गेल्या समोर उभे असताना आम्ही स्वच्छ निळे आकाश व सूर्यप्रकाश यावर खुष होतो. कालचे ढगाळलेले उदासवाणे कैरो ते हेच का असा प्रश्न पडत होता. काल वादळ आणि आज आल्हाद दायक गार झुळुक. मात्र हे कौतुक करत असतानाच अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आम्ही उभ्या उभ्या भेलकांडलो! एकमेकाचे हात धरुन व पाय जमिनेवर घट्ट रोवुन उभे असतानाही आम्ही अक्षरशः शिडात वारा भरलेल्या गलबतागत भरकटु लागलो. वर आकाश, खाली वाळु, शेजारी अजस्त्र वास्तु आणि भिरकावुन देणारा बेफाम वारा हा खरोखरच थरारक अनुभव होता. एरवी वाऱ्याने उडालो असे कुणी म्हणाले असते तर विश्वास बसला नसता. या वाऱ्याबरोबर अंगावर सपासप वाळुचे सपकारे बसत होते. चेहऱ्यावर, केसात व कानात तर कुणीतरी मुठीत घेउन फेकुन मारावी अशी वाळु बसत होती. सुदैवाने तो प्रकार फार काळ टिकला नाही.(वारा वाहेल तशी पाठ फिरवावी ही म्हण त्यानिमित्ताने अनुभवायला मिळाली)
चित्रात बघताना दोन पिरॅमिड्स शेजारी शेजारी दिसत असली तरी प्रत्यक्षात ते अंतर किलोमिटरहूनही जास्त आहे.
एकुण नऊ पिरॅमिड्स त्या भूमिवर आहेत. एका विशिष्ठ बाजुने जरा उंच अशा पठारावर गेले असता सर्व पिरॅमिड्स दिसतात. अर्थात यापैकी दोन खूप भव्य आहेत तर अन्य लहान आहेत, काही तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. इथे पर्यटकांचा कायम राबता असतो. पिरॅमिड्च्या परिसरात काही ठिकाणी मूळ आकारानुसार पडलेल्या पिरॅमिड्सचे जोते रचुन ठेवलेले आहेत ज्यायोगे चिरे कसे रचले असतील याची कल्पना यावी. इथे लबाडीचा एक नमुना पाहावयास मिळाला. मी मागील बाजुला जाऊन प्रतिमा टिपत असताना एका स्थानिकाने मला एका जोत्याकडे बोट दाखवित ’इथुन टिपा’ असा सल्ला दिला. मात्र ते पाहत असलेल्या अहमदने मला वेळीच सावधतेचा इशारा दिला. आपण अनवधानाने का असेना, पण जर संरक्षित वास्तुवर पाय दिला/ चढुन गेलो वा प्रवेश केला तर दंड होतो! कदाचित हे लोक पर्यटकांना तिथे जायला सांगुन दुसरीकडे पर्यटन पोलिस/ पहरेकऱ्यांना संगनमताने त्यांच्या कडुन दंड वसूलायला सांगत असावेत. अहमदने आणखी एक इशारा देउन ठेवला होता. स्थानिक लोक थोडेफार इंग्रजी बोलत जवळीक साधत वस्तू वा पैशाची मागणी करतील तेव्हा असे कुणी जवळ येत असल्यास वा वाटाड्या हवा का असे विचारत असल्यास त्याला अजिबात दाद देऊ नये. मनसोक्त पिरॅमिड दर्शन झाल्यावर आम्ही वरच्या अंगाच्या पिरॅमिडकडे निघालो. जे पिरॅमिड तिथुन लहान दिसते होते ते जवळ जाताच मोठे दिसुन मूळचे मोठे त्यापेक्षा लहान दिसत होते. वेगवेगळ्या अंगाने पिरॅमिड्सची वेगवेगळी रुपे व रचना पाहायला मिळत होत्या. त्या डोळे भरून पाहिल्या व जमतिल तशा टिपल्याही. कुठे शिखर टिप तर कुठे एखादा ढासळलेला पोइरॅमिड टिप, कुठे मागे वावटळ आलेले एखाद पिरॅमिड टिप तर कुठे समुह टिप. हावरटागत कितीही टिपले तरी समाधान होत नव्हते.
इथे त्या उंचावरल्या पठारावर घोडागाड्या मनसोक्त फिरत होत्या. घोडागाडी ठरवली की ति आपल्याला सर्व पिरॅमिड भोवती फिरवुन आणते. इथे आलो आहोत तर ही मजा घेतलीच पाहिजे असे म्हणत आम्ही अहमदकडे वळलो, तर म्हणाला "अगदी निर्धास्त जा, मीच आता तुम्हाला सुचविणार होतो" मग त्यानेच पुढाकार घेऊन एक घोडागाडी आणली. पैशाची बोली होताच मालकाने गाडी हाक्याच्या ताब्यात दिली व आम्ही गाडीत बसलो. त्या गाडीवानाचे नाव.. बरोब्बर ओळखलेत! ’महम्मद.’ महम्मद मोठा रसिक आणि त्याच्या कामात चोख. पुढे जाताच त्याने एका जागी गाडी थांबवली व आम्हाला बसवुन खाली उतरत त्याने कॅमेरा मागुन गेतला व आमचे चित्र टिपले. तिथे चित्र टिपले तर पार्श्वभूमीवर पिरॅमिड्स बरोबर चौकटीत बसतात. मग मीही त्याची छबी टिपली. मग थोडा आचरटपणा केला. मागे दूरवर दोन बाजुंना दोन पिरॅमिड्स व मधोमध आमच्या कुटुंबाचे पिरॅमिड अशी चौकट घेउन मी किरण व कोन साधला आणि महम्मदला कळ दाबयला पचारण केले. महम्मदबाबाने काम चोख बजावले. माणुस मोठा उमदा. हौसेहौसेने फिरवत होता, मध्येच घोड्याला काही गाणी म्हणत होता, गप्पा तर अखंड सुरूच होत्या. तुम्ही भारतिय आहात होय? मला तर चेहेऱ्यावरून इजिप्तचेच वाटलात असा विनोदही त्याने केला. परतीच्या मार्गावर चढण लागताच तो पाय उतार झाला. रस्त्याला वर्दळ बऱ्यापैकी होती, आम्हीही उतरायची तयारी केली. मात्र माझा चॉंद तुम्हाला सहज घेउन जाईल असे म्हणत त्याने आम्हाला उतरू दिले नाही. एक मस्त सफर करुन आम्ही परत गाडीपाशी आलो. खरेतर अहमदच्या वेळापत्रकानुसार थोडा उशीरच झाला होता कारण अजुन खालच्या अंगाला जाऊन स्फींक्स पाहायचे होते.
क्रमशः
प्रतिक्रिया
27 May 2010 - 2:18 am | भडकमकर मास्तर
फार सुंदर वर्णन आणि उत्तम फोटो ...
27 May 2010 - 2:57 am | बेसनलाडू
इतकी भटकंती करायला मिळाल्याबद्दल तुमचा हेवा वाटतो, सर्वसाक्षीसाहेब! असेच सुंदर वर्णन आणि फोटोज येऊद्यात. त्या माध्यमातून आम्हालाही जगाची सफर घडत असते.
(भटका)बेसनलाडू
27 May 2010 - 5:40 am | सन्जोप राव
अगदी असेच म्हणतो.
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह
27 May 2010 - 9:21 am | मनिष
सहमत. असेच म्हणतो मी पण! :)
27 May 2010 - 3:13 am | मदनबाण
सुंदर वर्णन आणि झकास फोटु... :)
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
27 May 2010 - 6:03 pm | जे.पी.मॉर्गन
याकदम झकास जमतिया भट्टी... आमी हाउत बसलेले ट्येबलावर... येऊद्या
जे पी
27 May 2010 - 5:14 am | प्राजु
सुरेख!
छान वर्णन!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
27 May 2010 - 8:27 am | सहज
पिरॅमिडचे आतून दर्शन घेतलेल्यांनी आपला अनुभव लिहावा.
बाह्य पिरॅमिडचे फोटो बघताना मात्र हॉलीवूडपट ममी, ट्रान्सफॉर्मर २, १०००० बी सी सिनेमांची आठवण झाली. :-)
१०००० बी सी सिनेमातील हे काल्पनिक दृश्य भव्य पिरॅमिडस कशी बांधली गेली.
पहीला फोटो बघीतल्यावर क्वालालंपूरमधे शहरात दुरवरुन पाहीले असता जसे पेट्रोनास ट्विन टॉवर दिसतात त्याची आठवण झाली. पिरॅमीड व पेट्रोनॉस टॉवरची तुलना अजिबात नाही पण जसे राहून राहून नजर पिरॅमिडवर जाते अगदी तसेच क्वालालंपूर मधे फिरताना मस्त चमकणार्या ट्विन टॉवर्सवर.
वर्णन भारीच! पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
सर्वसाक्षी तुम्हाला एक स्थळ सुचवतो आहे, "अंकोर वाट" तुमच्या शैलीत आभासी सफर करुन यायला फार आवडेल. :-)
27 May 2010 - 10:56 am | सर्वसाक्षी
सहजराव,
<<<सर्वसाक्षी तुम्हाला एक स्थळ सुचवतो आ>>>>
अहो अशा गोष्टी जाहिरपणे लिहितात का? हीनं वाचला तर लेखमाला संपलीच समजा:))
पेट्रोनासची आठवण मलाही झाली होती. ती अशासाठी की तुम्ही म्हणालात तसे के एल मधून कुठेही असा, पेट्रोनास दिसतातच आणि दुसरे असे की जसजस आपल स्थान बदलत तसे कधी के एल टॉवर डावीकडे व पेट्रोनास टॉवर उजवीकडे दिसतात तर कधी पेट्रोनास टॉवर डावीकडे व के एल टॉवर उजवीकडे दिसतात. इथे पिरॅमिड्सचे असेच होत होते.
27 May 2010 - 8:39 am | नंदन
हाही भाग आवडला. बाकी पुरावाचित्रे, आयोजित सहली इ. च्या वैतागाबद्दल सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 May 2010 - 9:32 am | स्पंदना
अप्रतिम! मागचे दोन्ही भाग " हावरटागत" वाचत ( ? वाचन कमी. पहाण जास्त! ते ही निरखुन निरखुन!!) असल्याने प्रतिक्रिया द्यायची राहुन गेली.
हा कॅमेरा आणि कॅमेरामन या दोघांचे फोटु पाठवा दादा...__/\__
बाकी ते समोर उभ राहुन फोटो १००% सत्य B)
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
27 May 2010 - 9:59 am | ऋषिकेश
_/\_
हा भाग आणि फोटोही मस्त.. वाचतो आहोत..
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
27 May 2010 - 11:18 am | झकासराव
_/\_
सुपर्ब :)
27 May 2010 - 11:24 am | सुमीत भातखंडे
...
27 May 2010 - 11:57 am | स्वाती दिनेश
'तिसर्या डोळ्याची' कमाल आणि वर्णनही अप्रतिम..
फार छान गतीने इजिप्तची सफर चालली आहे,
स्वाती
27 May 2010 - 12:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
झक्कास!
तुम्ही इजिप्त सरकारकडून जाहिरातींचेही पैसे घेतले पाहिजेत. :-D
अदिती
27 May 2010 - 2:56 pm | भोचक
इजिप्तायन मस्त सुरू आहे. वाचतोय. मजा वाटतेय. शिवाय माहितीपरही.
(भोचक)
जाणे अज मी अजर
27 May 2010 - 6:23 pm | प्रभो
मस्त मस्त मस्त!!
27 May 2010 - 6:59 pm | चेतन
लेख मस्तच झालायं. फोटो तर अप्रतिम
तेव्हढी मागच्या भागांची लिंक पुढच्या भागात द्या
हे पहिले भाग
नाईलच्या देशात - १ : "निघालो होतो कैरोला....."
नाईलच्या देशात - २ : 'पहिला डांव देवाला'
चेतन
28 May 2010 - 2:43 am | मिसळभोक्ता
सध्या फोटोंसाठी छान म्हणतो.
वाचून छान नंतर म्हणीन.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
28 May 2010 - 5:32 pm | भडकमकर मास्तर
काही लोकांना पिरॅमिडपुढे उभे राहून प्रेमग्रस्त /कामुक जिव्हाळ्यचे हावभाव करायची सवय असते , असे या फोटोवरून दिसून येते.
28 May 2010 - 5:37 pm | प्रियाली
उत्तम वर्णन. वाचते आहे, पुढला भाग लवकर येऊ द्या.
28 May 2010 - 5:39 pm | स्वाती२
व्वा! फोटो आणि वर्णन दोन्ही मस्त!
29 May 2010 - 6:08 pm | अमोल खरे
मस्तच वर्णन.
29 May 2010 - 11:33 pm | अनिल हटेला
आपल्या लेखणीला आणी कॅमेर्याला सलाम.....
आपणास साष्टांग दंडवत..:)
तीन्ही भाग पून्हा-पून्हा वाचले..
बसल्या जागी पिरॅमीडस ची सहल घडवत आहात त्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे..:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА
उपाध्यक्ष..
(फार-जण मित्र मंडळ,
गुडघी तालीम पुणे
ओडेसा शाखा ,उक्रेन !!)
:D