नाईलच्या देशात ७: आस्वानी निळाई

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
28 Jun 2010 - 12:20 am

गाडी सुटली. एका खोलीत दोनच आसने/ शायिका आणि नेमके चिरंजिव पलिकडील डब्यात. दोन व एक अशी तिकिटे भिन्न स्थानी विभागली गेली होती. चिरंजीवांना सहप्रवासी लाभला होता तो एक पर्यटन क्षेत्रातला - एका सहलचमूचा म्होरक्या. तोही आस्वानलाच उतरणार होता. चिरंजिव तिकडे स्थिरस्थावर झाल्याचे सांगुन आपल्या जागी गेले तोच आमच्या दारावर टकटक ऐकु आली. जेवण आले होते. सूप, उकडलेल्या भाज्या, पाव व आइस्क्रिम असा साधा पण झकास बेत होता. अर्थातच सवयीनुसार झोपण्याआधी कॉफी मागवलीच. रात्रीचा प्रवास त्यात गडद काचा त्यामुळे बाहेरचे काही दिसत नव्हते. आता दिवसभराचा शीण जाणवु लागला होता. पिरॅमिड्स, स्फिंक्स, अत्तरे, पॅपायरस, संग्रहालय, खान-इ-खलिली बाजार - सारेकाही दिसु लागले आणि आपण बऱ्याच वास्तव्यानंतर कैरो सोडत आहोत असे वाटु लागले. मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र चादरी अंथरुन अंगावर रजया ओढल्या. एव्हाना गाडी रंगात आली होती. धडाक धड धड च्या ठेक्यावर डोळे कधी मिटले ते समजलेच नाही.

सकाळी जाग आली तेव्हा बऱ्यापैकी उजडलेलं होतं. पडदा बाजुला सरकावुन डोके काचेला चिकटवुन बाहेर पाहिले आणि डोळ्यावर विश्वास बसेना! कालपर्यंत ज्याला वाळवंटाचा देश समजत होतो त्याच देशात गाडीच्या बाहेर नजर पोहोचेतोपर्यंत हिरवा गालिचा दिसत होता. ताड-खजुरा बरोबरच आंब्याची झाडे आणि चक्क उसाचे मळे बहरलेले होते. काचा गडद आहेत, त्यावर बाहेरुन धुळ आहे आणि गाडी पळत आहे हे लक्षात असतानाही चित्रे टिपण्याचा प्रयत्न केला.

खोलिबाहेर पडत डब्याच्या एका टोकापासुन ते दुसऱ्या टोकापर्यंत एक फेरी मारली. टोकाला सेवकवर्गाची खोली होती, येताना चहा सांगुन आलो. त्याशिवाय सकाळ होत नाही! आणि अचानक गाडी एका पुलावरुन पार झाली व आमच्या उजव्या अंगाला नाईल प्रकटली. मग तिपेडी वेणी वळावी तशी रस्ता, लोहमार्ग आणि नाईल अशी आलटापालट होत राहीली. कधी आमची गाडी डावीकडे, रस्ता उजवीकडे व नाईल रस्त्याच्या उजवीकडे तर कधी आम्ही मधे आणि नाईल एकीकडे तर रस्ता दुसरीकडे असा खेळ रंगला. लक्झर आले. आम्ही थेट आस्वानला जाणार होतो व आस्वान, अबु सिंबेल पाहुन झाल्यावर जलविहार करीत नाईलमधुन फिरत फिरत कॉम ऑम्बो, एडफु, एस्ना असे पाहत शेवटी लक्झर ला उतरणार होतो.लक्झर गेले म्हणजे तीनेक तासात आस्वान येणार. लक्झर सुटले आणि आम्ही ग्रामिण इजिप्त पाहत पुढे जाऊ लागलो. मळे, छोटे रस्ते, उंटगाड्या, सायकली, मालमोटारी अशी वर्दळ सुरू झाली होती. मधेच एखादी वाडी लागायची. बाहेरुन मातीने लिंपलेली घरे, शेजारी पुरुषभर उंचीचे कुंपण व त्यात शेळ्या मेंढ्या/ गाई गुरे वगैरे. राखणीला कुत्रीही हवीतच. मग मधेच ओसाड भाग. पुन्हा मळे. रस्ते मात्र तुळतुळीत होते. या भागात पुढे वाहकाच्या मागे आणखी एक प्रवासी आसनांची रांग सामावणाऱ्या व मागे मालवाहनासाठी हौदा असलेल्या पिजो गाड्या बाहुल्याने दिसत होत्या. एखाद्या खेड्यात कैरोच्या जुनाट भागासारख्याच एक दरवाजा कायमचा उघडा असलेल्या जुन्या पुराण्या फोक्स वागेन प्रवासी गाड्या तर जरा मोठ्या रस्त्यांवर पर्यटकांना नेणाऱ्या चकाचक टोयोटा व्हॅन्स. एकजात सगळ्या पांढऱ्या शुभ्र. बहुधा वाळवंटात उष्णता परावर्तित करुन आतील वातानुशितन सुकर करण्यासाठी असेल.

आस्वान कधी आले समजलेच नाही. सामान घेउन उतरलो, तर न शोधता आमचा शोध घेणारा सामोरा आला. आमचे सामान ढकलगाडीवर रवाना करीत त्याने आम्हाला भुयारी मार्गातुन स्थानकाबाहेर नेले. बाहेर नाना प्रकारची लहान मोठी वाहने आपापले पर्यटक सामावुन घेत वा त्यांची प्रतिक्षा करीत उभी होती. आमचे सामान आले आणि आम्ही गाडीत शिरलो. इथुन थेट नाईलकाठच्या धक्क्यावर. तिथुन आमच्या नौकेत. आंघोळी, जेवण, थोडा आराम व मग आस्वान पाहण्याचा कार्यक्रम होता. जेमतेम पाच मिनिटे प्रवास झाला नसेल तोच नाईल सामोरी आली. ती निळाई मन प्रसन्न करणारी होती.

रस्त्याच्या पलिकडे नाईल. निरनिराळ्या नौकांचे निरनिराळे धक्के. आजुबाजुला फेलुका बोटी व लहान मोठ्या होड्या-गलबतांचा गराडा पडला होता. अनेक होड्या आपले शीड तुडुंब भरुन संथपणे नाईलमध्ये विहरत होत्या. आम्ही आमच्या बोटीत आलो. एम एस नाईल फेस्टिवल हे तिचे नाव. सगळे सोपस्कार पुरे करुन, खोली तयार होइपर्यंत जरा कोचात कंटाळुन आम्ही अखेर आमच्या खोलीत शिरलो. खोली चांगली प्रशस्त होती. सर्वात काय आवडले तर टोकाला संपूर्ण काचा होत्या. सगळ्यात आधी आम्ही पटापट पडदे बाजुला सारुन भली मोठी काच सरकावली आणि नाईलवरुन तरंगणारी झुळुक रोमांचीत करुन गेली. लांबुन निळ्याशार व अगदी जवळुन हिरवट दिसणाऱ्या पाण्यावर पक्षी भिरभिरत होते, मधेच बुड्या मारीत होते. अचानक समोरच्या दृश्याला छेद देत एखादी आमच्यासारखी यंत्रनौका पाण्यावर दाट रेघा आखत जात होती.

मागे पाण्याचे पार्श्वसंगीत. मंद पण प्रसन्न. इतका सुरेख गार वारा अंगावर शिरशीरी आणत असता काचा बंद करुन कृत्रिम गारवा करण्याचा दळभद्री विचार मनात येणे शक्यच नव्हते. आता जर का आडवे झालो तर उठणे कठिण आहे हे समजुन चुकलो आणि मुकाट्याने आवरायला लागलो. जेवण व आंघोळी करुन बाहेर पडायचे होते. पटापट आवरुन, जेवण हाणून आम्ही आमच्या स्थलदर्शकाची वाट पाहू लागलो.

आम्ही बोटीच्या स्वागतक्षात दाखल होतो न होतो तोच आमचा आस्वान-लक्झर प्रवासा दरम्यानचा प्रभारी हजर झाला. नाही, अहमदही नाही आणि महमदही नाही; याचे नाव सैयद. नुबिया प्रांतातला हा तरुण आपले शिक्षण नुकतेच संपवुन आता पर्यटन क्षेत्रात सहल सहायक म्हणून कार्यरत होता. दुपार ते संध्याकाळ अशा या आस्वानच्या छोट्या सहलीत आम्ही ’अपूर्ण स्तंभ’ म्हणजे ’अनफ़िनिश्ड ओबेलिस्क’, आस्वानचे मूळचे धरण व नंतरचे महाधरण पाहणार होतो. अवघ्या दहा पंधरा मिनिटातच आम्ही स्तंभ स्थळी दाखल झालो. दहशतवाद्यांचा सुळसुळाट व त्यांच्याकडुन सांस्कृतिक व पर्यटनस्थळांना असलेला धोका पाहता प्रवेशाला सुरक्षा तपासणी होती. हातातले, अंगावरचे सामान सुमान शोधयंत्रातुन पार करायचे तर स्वत: धातुशोधकातुन पार व्हायचे. प्रवेशद्वार ओलांडुन आत शिरलो तर रणरणत्या उन्हात समोर एक छोटीशी टेकडी दिसली, पार ओसाड. सुकलेल्या ओढ्यासारखे रस्ते वर जायला होते.

एका अंगाने लाकडी फलाट व जीने केलेले होते. खरेतर ही ग्रॅनाइटची खाण. सर्वत्र ग्रॅनाईटच ग्रॅनाईट.
align=leftवळसे घालुन शिखरावर गेलो आणि तो सुप्रसिद्ध अधुरा राहिलेला प्रचण्ड स्तंभ दिसला. हा एकसलग असा हा एका शिळेतुन कोरलेला व खणुन काढायला लागलेला स्तंभ खरोखरच अजस्त्र होता.
align=leftआठ दहा फूट रुंद आणि पायाकडुन काहीसा निमुळता होत गेलेला तब्बल एकशे सदतीस फूट लांबीचा हा महास्तंभ. खरेतर हा कुठल्यातरी भव्य मंदिरात वा प्रासादात नेण्यासाठी कोरायला घेतलेला असावा, मात्र तो भंगला आणि सगळेच संपले. लक्झर व कर्नाक येथील अनेक स्तंभ हे आस्वानच्या ग्रॅनाईटच्या खाणींमधलेच. हा स्तंभ जर भंगला नसता तर सर्वात उंच हाच होता. वजन तब्बल बाराशे टनांच्या आसपास. कर्नाक मंदिरातला हॅट्शेप्सूटचा १०४ मिटर उंचीचा स्तंभ याच्या खालोखाल असावा. खाणीतून इतके अजस्त्र स्तंभ एकठेपी कसे काय काढले असतील? याची एक मेख आहे. जसा स्तंभ काढायचा असेल तशी रेघ आखुन घ्यायची. त्या रेषेवर साधारण चार इंच रुंदीच्या खाचा खणायच्या. मग त्या खाचांमध्ये लाकूड ठासायचे व त्या लाकडावर पाणी ओतायचे. लाकूड पाण्याने फुगले की खाचेच्या भिंतींवर प्रचंड दाब निर्माण होऊन एक सलग भेग पडत असे. त्या भेगेनुसार स्तंभ कापला जात असे. खादडखुदड वा ओबडधोबड भाग काढुन टाकायची युक्तिही सोपी पण खास म्हणावी लागेल. जो भाग तासायचा तिथे तापलेल्या विटांचे तुकडे ठेवायचे. दगड सणकुन तापला की त्यावर पाणी ओतायचे. पाणी टाकताच प्रसरण पावलेला दगड एकाएकी आकुंचित होत असे व त्याच्या पृष्ठावरच्या कपच्या पडुन जात असत व पृष्ठभाग सपाट होत असे. ग्रॅनाईटचे हे स्तंभ कोरण्यासाठी वा तासण्यासाठी डोलोमाईट वा डायोरईट्चे दगड वापरले
align=left
जात असत जे ग्रॅनाईटपेक्षा अधिक कठिण असल्याने ते तुलनत्मकत: नरम ग्रॅनाईटला सहज फोडत असत. अशा प्रकारे निर्मिलेले हे शेकडो टनांचे स्तंभ मग नाईलच्या पात्रामधुन सुमारे पावणेदोनशे किलोमिटर अंतर कापून कर्नाक वा लक्झर मंदिरात नेले जात असत. राजाच्या हुकुमाला सेवक व साधनांची कमी कधीच नसे. मात्र माणसे दिमतीला असली तरी अजस्त्र वस्तु उचलायचे व वाहुन न्यायचे तंत्रज्ञान त्या काळी अवगत होते हे खरे.

आम्ही आस्वान धरणाकडे निघालो. मूळ धरणाकडे जाताना डाव्या बाजुला एक झकास वास्तु दिसली. सैयदला विचारले असता ते सुप्रसिद्ध फिले मंदिर असल्याचे समजले. एका छोट्याश्या बेटावर बसलेले ते मंदिर सुरेख दिसत होते. मात्र आमच्या रूपरेषेत ते मंदिर पाहण्याचे नसल्याचे सैयदने सांगितले. काहीतरी घोटाळा झाला असावा. हरकत नाही, सैयदला मी परतीच्या प्रवासात ते मंदिर दाखविण्याची विनंती केली व जो काही अतिरिक्त खर्च असेल तो देऊ केला. हे त्याला मान्य झाले. आम्ही जुन्या धरणावरून जात असताना तिथे वाटेत थांबायची परवानगी नसल्याचे समजले. धरणाच्या भिंतीवरुन गाडी धावत होती, पलीकडे जलाशय दिसत होता. हे धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वीचे. नाईल हे इजिप्तला मिळालेले वरदान. संपूर्ण जीवन नाईलवर अवलंबुन. नाईल इजिप्तमध्ये येते ती सुदानमधुन. नाईलची उत्पती दोन नद्यांमधुन. रुआंडा, टांझानिया, युगांडा मार्गे सुदानला येणारी लहान पण अधिक लांबीची श्वेत नाईल व इथियोपिआच्या ताना तलावातुन उपजणारी नील नाईल जीचे पाणी अधिक आहे आणि जिचा इजिप्तच्या समृद्धीत मोठा वाटा आहे. इथिओपिआ मध्ये होणाऱ्या वृष्टीनुसार लोंढा पुढे इजिप्तमध्ये येतो. सहस्त्रो वर्षे पूराबरोबर येणाऱ्या गाळाने भूभाग समृद्धही होत होता आणि लोक बेघरही होते होते. विशेषत: नुबीया प्रांतातले. अनिश्चित तीव्रतेचे पर्जन्यमान म्हणजे दोन वेगवेगळ्या पावसाळ्यातला जलपात अनेक पटीच्या फरकाचा. तर या जवळपास ६७०० किमी लांबीच्या आणि जगातल्या सर्वात लांब मानल्या गेलेल्या नदीच्या पाण्यावर नियंत्रण करुन शेती, मत्सयपालन व विद्युतनिर्मिती या सर्वांसाठी गेल्या शतकाच्या सुरूवातीस धरणाची संकल्पना इजिप्तमध्ये आली आणि १९०७ ते १९१२ दरम्यान धरण बांधले गेले. अर्थात काही दशकांतच हे धरण अपुरे असल्याचे जाणवु लागले. पाचव्या दशकात जेव्हा पाण्याने वरची पतळी ओलांडायची वेळ आली तेव्हा नवे अधिक क्षमतेचे धरण बांधणे अत्यावश्यक झाले आणि १९५२ मध्ये नव्या महाधरणाची योजना आखली गेली. सुरुवातीला इजिप्तच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमेरिकेने सहाय्य देण्याचे मान्य केले पण ते मागे घेतले गेले. बहुधा राजकिय कारणामुळे असावे (इजिप्त ईस्रायल संबंध). यावेळेस रशियाने हात पुढे केला व रशियन सहाय्याने हे महाधरण १९६० ते १९७० या कालावधीत पूर्ण झाले. या धरणामुळे पूरनियंत्रण, शेती तसेच जलविद्युत निर्मिती साध्य झाली. आणि याच धरणामुळे जगातला सर्वात प्रचण्ड अस सव्वापाच हजार चौरस किमी व्याप्तीचा मानवनिर्मित तलाव निर्माण झाला. या तलावाला १९७० सालीच दिवंगत झालेले लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासर यांचे नाव देण्यात आले. अर्थात हे धरण बांधताना दोन मोठी आव्हाने उभी राहिली होती आणि ती म्हणजे लाखो नुबीयांचे पुनर्वसन आणि धरणामुळे पाण्याखाली जाणाऱ्या वास्तु ज्या मानवी संस्कृतिच्या महत्त्वाच्या साक्षीदार होत्या आणि राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा होत्या. इजिप्तने राष्ट्रसंघ तसेच जगभरातील पुरातत्त्व संशोधकांना पाचारण केले व भगिरथ प्रयत्नांती अबु सिंबेल मंदिरासारख्या अजस्त्र वास्तुंचे स्थलांतर करुन पुनर्वसन करण्यात आले. सुमारे एक लाख नुबीयन धरण्ग्रस्त म्हणुन पुनर्वसीत केले गेले. अर्थातच या धरणाचा सर्वाधिक लाभ इजिप्तला होणार असला तरी झळ शेजारी सुदानला बसणार होती. या दोन देशात करार झाला. नासर तलावाचा ८३% टक्के भाग इजिप्तमध्ये तर अवघा १७ टक्के भाग सुदानमध्ये आहे. अर्थातच सुदानच्या हद्दीतल्या तलावाला नुबीया तलाव असे नाव आहे. या धरणावर फिरताना नासर तलावाचा पसारा एखाद्या समुद्रासारखा भासत होता. धरणावरच्या जलविद्युत प्रकल्पात रशियन सहभाग असून अजुनही तिथे रशियन तंत्रज्ञ कार्यरत आहेत.

आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत रस्ता बदलुन आम्ही फिले मंदिराकडे निघालो. हे मंदिर एका बेटावर असल्याने यांत्रिक बोटीतुन जावे लागते. मात्र धक्क्याच्या अलिकडे मुख्य प्रवेशा अलिकडेच आम्हाला अडवले गेले. सुरक्षा रक्षकांनी वेळ संपत अल्याचे सांगितले. आम्ही त्याला पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने धक्क्यावर संपर्क साधुन आम्हाला सांगितले की गेलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी बोटी तयार आहेत, व त्यांची तिकिटविक्री बंद करण्यात आली आहे. नाईलाजाने आम्ही परत फिरलो. खरेतर सहल आयोजकाने थोडी कल्पकता दाखविली असती तर आम्ही धरण, मंदिर हे करुन मग अखेरीस ’अनफिनिश्ड ओबेलिस्क’ला येऊ शकलो असतो. असो. आम्ही आस्वान धक्क्याकडे परतलो.

बोटीवर जरा ताजेतवाने होऊन गरमा गरम चहा घेउन आम्ही परत धक्क्यावर आलो आणि नाईलच्या काठाने त्या रस्त्यावर जरा भटकलो. हळुहळू सर्वत्र शांतता पसरत होती. पर्यटक आपापल्या बोटीवर/ हॉटेलवर परतले होते. आम्हीही परतलो. जेवण उरकुन आम्ही बोटीच्या गच्चीवर गेलो. झोंबरा गारवा उपभोगायला अनेक पर्यटक तिथे आधीच आलेले होते. वर एक छोटा तरण तलाव, टेबल टेनीस टेबल तसेच खान पान सेवाही होती. जमिनीवर हिरवळीचा आभास निर्माण करणारा कृत्रिम गवताचा गालिचा अंथरलेला होता. मधल्या एका मोठ्या भागावर मांडव घातला होता आणि मुबलक टेबल-खुर्च्या मांडलेल्या होत्या. आजुबाजुला आमच्या सारख्या नांगरलेल्या बोटी व लहान होड्या बांधलेल्या होत्या. अनेक पर्यटन नौका धक्क्यावर एकमेकीला समांतर लावलेल्या होत्या.
सर्व बोटींची मुख्य द्वारे खुली होती, म्हणजे जर आपली नौका पलिकडे तिसरी असेल तर आपण पहिल्या दोन नौकांमधुन आरपार चालत जायचे. वरुन एकेमेकीला समांतर असलेल्या सर्व नौका व वरचे पर्यटक वावरताना दिसत होते. पलिकडे नाईल संथपणे पसरली होती. पलिकडच्या काठावरच्या ’नोबल्स टोंब’ चे दिवे दिसत होते तर उजवीकडे थोडे पुढे एका हॉटेलच्या झगमगाटाचे लखलखते प्रतिबिंब पाण्यात झुलत होते. वर आकाशात चंद्राची कोर प्रकाशमान होती.

असा निवांतपणा दुर्मिळच. तिथुन उठावेसे वाटत नव्हते पण उद्या ’अबु सिंबेल’ पाहायचे असल्याने पहाटे (पहाटे कसले, अपरात्री म्हणायला हवे) तिनला उठुन साडेतीनला बाहेर पडायचे होते. तेव्हा निघणे भाग होते. गच्चीला एक फेरी मारुन आम्ही खोलिवर परतलो.

हे ठिकाणआस्वादमाहिती

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

28 Jun 2010 - 1:21 am | प्रियाली

अरेरे! भेट चुकल्याने वाईट वाटले. बाहेरून फोटो वगैरे काढले का? असल्यास लावा.

बाकी, भाग नेहमीप्रमाणेच रोचक. अबु सिंबेलच्या प्रतीक्षेत. :)

नंदन's picture

28 Jun 2010 - 1:33 am | नंदन

सहमत आहे. हाही भाग मस्त, अबु सिंबेलच्या वर्णनाची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

रामदास's picture

28 Jun 2010 - 8:01 am | रामदास

चला लवकर चला अबू सिंबेलला.

सहज's picture

28 Jun 2010 - 8:03 am | सहज

ग्रॅनाईटचे स्तंभ बनवायच्या पद्धतीची, लेक नासेर माहीती छान.

नाईल क्रुझ मस्तच! पण नेमके फिले मंदीर राहीलेच, काही फोटो बघुन दुधाची तहान ताकावर भागवूया :-(

फार फार छान लेख

अबु सिंबेलच्या वर्णनाची मी ही वाट बघतो.एक मस्त सर्प्राईज आहे!!!

स्वाती दिनेश's picture

28 Jun 2010 - 11:54 am | स्वाती दिनेश

वर्णन मस्तच..
अबु सिंबेलची वाट पाहणार्‍यात मी ही आहे..:)
स्वाती

प्रभो's picture

28 Jun 2010 - 7:03 pm | प्रभो

मस्त!!

स्वप्निल..'s picture

29 Jun 2010 - 1:13 am | स्वप्निल..

मस्त!! मस्त!! पुर्ण लेखमालाच मस्त. अबु सिंबेल लवकर दाखवा :)

मला एकदातरी एजिप्तला जायचेच!!

संजा's picture

29 Jun 2010 - 5:33 pm | संजा

खुपच छान श्री.बळवंत पटवर्धन

संजा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2010 - 5:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लास, वर्णन आणि फोटोही! शेवटचा फोटो तर सुंदरच!!

अदिती