हुर्घाडा विमानतळ ओसाड वाळवंटात वसलेला. इथे मला इग्लुच्या आकारचे अनेक आडोसे दिसले. बहुधा वाळुच्या वादळाप्रसंगी सुरक्षित राहायचा तो आसरा असावा. आमचे विमान थांबले. अलिकडे पलिकडे जन्मात कधीही नाव न ऐकलेल्या विमानसेवांची विमाने उभी होती. समोर विमानतळाच्या छोटेखानी ईमारती होत्या. आम्हाला खाली उतरण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.(आता इथे मरायला कोण गुपचुप आत सटकणार होत?). प्रत्येकजण कर्मचार्यांना एकच प्रश्न विचारीत होता, आणि तो म्हणजे आम्हाला कैरोला कधी पोहोचविणार? मुख्य सेवकाने स्पष्ट केले की ते आम्हाला इथे नक्कीच ठेवणार नाहीत, ते कैरोला नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. आता हाती केवळ वाट बघणे होते. आणि अचानक माझ्या खिडकीतुन मला एक इंधनाची गाडी आमच्या विमानाच्या रोखाने येताना दिसली. ही बातमी मी आंत देताच जरा गारवा आला आणि सुकलेले चेहरे खुले लागले.ती गाडी खरोखरीच आमच्या पंखाखाली येउन स्थिरावली. नळकांडी बाहेर निघाली, विमानाच्या पोटात खुपसली गेली आणि जीव भांड्यात पडला. लगोलग उदघोषणा झाली की लवकरच विमान कैरोला रवाना होत आहे. उशीरा तर उशीरा. बघता बघता आम्ही सगळा हिशेब मांडला. मूळ वेळ तिथल्या २.३० ची. रखडपट्टीत गेला एक तास. इथुन पुढे प्रवास आणखी एक तास. मग बाहेर पडुन सोपस्कार, सामान ताब्यात घेणे व आणायला आलेल्या यजमान पर्यटन संस्थेच्या प्रतिनिधींना शोधुन काढणे याला अणखी एक तास. तरीही आम्ही साडेपाचला विमानतळाच्या बाहेर पडु शकत होतो! आमच्या आशा पल्लवित झाल्या. इतक्या लांबुन आलो तर काही राहुन गेले असे नको. मूळ कार्यक्रमानुसार आम्ही अडीच ला उतरुन साडेतीन पर्यंत बाहेर पडुन साडेचार पर्यंत हॉटेलवर जाणार. दोन-अडीच तास आराम करुन साडेसहाच्या सुमारास निघुन सायंकाळचा पिरॅमिड्सच्या पायथ्याशी असलेल्या उद्याना वजा खुल्या प्रेक्षागारात होणाऱ्या दृक-श्राव्य कार्यक्रमास जाणार...
असो. आता यातली दोन अडीच तासांची विश्रांती घटवली तर गणित जमण्यासारख होतं. अखेर विमान उडालं आणि आम्ही पुन्हा खुषीत आलो. वाटेत सर्वत्र डोंगर, वाळुच्या टेकड्या व मैलोगणती मानवी अस्तित्वाचा कुठलाही पुरावा न देणारा प्रदेश. मध्येच मनगटा एवढा जाडा एखादा रस्ता दिसायचा. वाटेतले धूसर हवामान व अपुरी दृश्यता सहज सांगुन जात होते की या आधी विमान कैरोला का येउ दिलं गेलं नाही. विमान उतरताना विमनतळाच्या अगदी जवळ व बऱ्यापैकी खाली आल्यावर एक मजेशीर रस्ताअ पाहावयास मिळाला. हा बहुधा एखादा प्रमुख महामार्ग असावा. दोहो बाजुंनी रस्ता आणि मधोमध भरपूर रुंदीचा दुभाजक. पटकन एखादा लोहमार्ग असल्याचा भास झाला.
अखेर एकदाची विमानाची चाके टेकली, बराच वेळ गरागरा फिरुन अखेर हक्काच्या स्थानावर आलं आणि मानवंदना दिल्यागत सर्व प्रवासी उठुन उभे राहिले. सवयीने खिशातला हस्तसंच बाहेर काढुन चालु केला आणि काही क्षणातच वोडाफोन इजिप्तचा स्वागतसंदेश झळकला आणि जरा हायसे वाटले. हो, उशीर झाला होता, आमच्या यजमानांना शोधणे अगत्याचे होते. तसे हे पर्यटन वाले कितीही उशीर झाला तरी आपल्या पाहुण्याला घेतल्याशिवाय जात नाहीत म्हणा पण समजा चुकामुक झालीच तर संपर्क साधन हातात होते हे उत्तम झाले.
आता शिताफिने चाल करुन गर्दी व्हायच्या आत सीमाधीकार्यांचे दालन गाठुन आपल्या पारपत्रावर देशागमनाचा इजिप्ती ठसा उमटवुन घेणे हे आद्य कर्तव्य होते. आणि ते बर्यापैकी जमलेही. पुढचं गोरं जोडपं पार पडताच आमचा क्रमांक. सहसा कुठेही गेलं तरी गोर्या कातडीला झुकतं माप मिळतं खरं. जो फरक देवाने निर्माण केला तो अद्यापही मानव विसरु शकला नाही की नजरेआड करू शकला नाही. इथे मात्र वेगळाच अनुभव आला! आधीच्या गोर्यांशी जितक्यास तितकं बोलत निर्विकार चेहेर्याने छाप उठवणार्या त्या सरकारी अधिकार्याच्या चेहर्यावर आमची पारपत्रे हाती येताच एकदम स्नेहार्द्र भाव उमटले. 'ईंडिया! अमिताभ बच्चनस कंट्री' - "ओ के ईंडिया, वेलकम टु इजिप्त! आमिताभ आम्हाला खूप खूप आवडतो आणि आम्ही त्याचे सर्व चित्रपट आवडीने पाहतो " असे म्हणत त्याने प्रेमाने हस्तांदोलन करत झटपट शिक्के मारत आमची पारपत्रे आमच्या सुपुर्द केली व बरोबर इजिप्त मधील वास्तव्य सुखाचे होवो अशा शुभेच्छाही दिल्या. त्या अधिकार्याचे आभार मानत आम्ही बाहेर पडलो. आजपर्यंत ज्याला आपण केवळ एक लोकप्रिय अभिनेता समजत होतो तो आपल्या देशाचा अशा प्रकारे राष्ट्रदूत आहे हे मला नव्यानेच उमगले. पुढे असा अनुभव अनेकदा येणार होता.
लगोलग खर्चापुरते डॉलर,' एल ई' म्हणजे इजिप्शियन पौंडात (लिरे इजिप्शियन म्हणुन एल ई असे लघुरूप)परिवर्तित करुन घेतले आणि आम्ही सामान पट्ट्याकडे घावलो. विनाविलंब आणि विनाघोळ सर्व नग पोहोचले होते. सामान उचलुन आम्ही बाहेर आलो तर विशीतले दोन तरतरीत युवक आमच्या नावाचा फलक घेऊन उभे असलेले दिसले. आम्ही हाक मारताच त्यांनी जवळ येत ओळख पटवुन घेतली व अदबिने खास इजिप्तच्या औपचारिक शब्दांत आमचे स्वगत केले " आपल्या या दुसऱ्या घरात अपले स्वागत असो"! ऐकायला खूप बरे वाटले. पुढे संपूर्ण प्रवासात हे वाक्य आम्हाला अनेकवेळा ऐकायला मिळालं. आमच्या सहलनायकांची नावे होती अहमद आणि महमद. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा, पुढील प्रवासाची तिकिटे, संकेतचिट्ठ्या वगैरे बाड आमच्या सुपुर्द करताना आपल्या मालक व व्यवस्थापक यांची परिचयपत्रेही दिली. मालकाचे नाव अब्दुल अहमद तर व्यवस्थापकाचे नाव होते महमद गमाल. अरेच्च्चा! पुन्हा अहमद महमद ही जोडी आहेच की:)
एव्हाना सव्वापाच वाजुन गेले होते. म्हणजे हॉटेलवर जायला किमान सव्वासहा. विमनतळाच्या बाहेर आलो, हवा मळभट झाली होती. आमच्या सहलनायकांनी आम्हाला आमच्या सर्व नगांसह गाडीत बसवलं आणि आम्ही हॉटेलकडे निघालो. अचानक नजर वर गेली तर काय! सूर्य सोनेरी न दिसता चक्क रुपेरी दिसत होता. जणु 'दिवसपाळीला आलेला चंद्र'. कॅमेरा पेटी मागे सामान कप्प्यात गेल्याने तो रुपेरी सूर्य टिपता आला नाही. विमानतळाचा परिसर सोडुन आम्ही गावाकडे निघालो आणि वाहतुक, गर्दी, खणलेले रस्ते, अपुरे राहीलेले उड्डाणपूल, बाहेरच्या भिंतींना गिलावा न केलेली घरे हे सगळे दृश्य निश्चितच उत्साहावर पाणी फिरवीणारे होते. एकतर अनिश्चितता, उशीर, त्यात पुन्हा गेल्यावर सामान टाकुन जेमेतेम तोंड धुवुन पुन्हा बाहेर पडायचे आहे हा धोशा. बरे कार्यक्रम नको म्हणायची सोय नाही कारण हातात मोजका वेळ त्यामुळे थोडी चिडचीड होऊ लागली होती; त्यात गर्दी आणि वाहतुकीच्या रांगा. एका ऊड्डाणपूलाखालुन उजवीकडे वळताना आमचे सहलनायक दिलासा देत म्हणाले की आता वळल्यावर पाच मिनिटात आपण हॉटेलवर! वळलो आणि बघतो तर काय? समोर चक्क 'हमारा बजाज!' चक्क बजाजच्या ऑटोरिक्षा, त्याही काळ्या पिवळ्या हो! आणि बजाज मंडळींनी नुसत्या रिक्षाच नव्हेत तर त्या चालवायची विद्याही इकडे धाडली असावी. तेच झपकन वळणे, तेच अचानक थांबणे. एकुण दुस़र्या घरात आलो हे खरेच होते तर:)
हॉटेलवर सोपस्कार पूर्ण करून खोली ताब्यात घेतली, मस्त गरम कॉफी ढोसली, गरम कपड्यांचा थैला उघडुन थोडे कपडे घेतले आणि खाली उतरलो. सुदैवाने हॉटेल गिझा परिसरात अगदी हमरस्त्यावर असल्याने पिरॅमिड च्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रकाशाचा कार्यक्रम सादर होणारे प्रेक्षागृह बर्यापैकी जवळ होते. अवघ्या १०-१५ मिनिटात आम्ही त्या स्थळी पोहोचलो. आमच्या हातात तिकिटे देत अहमद-महमद द्वयिने "खेळ संपवल्यावर बाहेर या, आम्ही हे इथे उभे असू" असे एका दुकानाकडे बोट दाखवित सांगितले व आम्हाला आत सोडले. आम्ही आंत जाऊन बाकड्यांवर बसलो. साला या वाळवंटात अंधाराबरोबर थंडीही इतक्या बेमालूमपणे पसरत असेल याची कल्पना नव्हती. आम्ही समोरचे लेसर किरणांनी साकार होणारे कार्यक्रम पाहत होतो खरे, पण सकाळी साडेचार पासून उठणे, मग ताटकळणे, मग दिर्घ प्रवास या सर्वाचा परिणाम म्हणजे विलक्षण थकवा जाणवु लागला होता. पोटात भूकही बोलु लागली होती. समोर खरेतर एकुण इतिहास, राजघराणी, पिरॅमिड्स मागचा उद्देश, ते कसे बांधले, त्याला काय व किती बांधकाम साहित्य लागले, रितीरिवाज कसे होते, मृत्युनंतरचे जीवन हे चिरंतन व त्यामुळे अधिक महत्वाचे कसे वगैरे रंजक प्रकारे दाखविले/ ऐकविले जात होते. मात्र अगदी प्रामाणीकपणे सांगायचे तर खेळ संपला व बरे वाटले. एकदा कंटाळा आला की सगळेच नकारात्मक दिसु लागले. खालुन झोत टाकलेले ते पिरॅमिड्स पाहताना अगदी क्षूद्रपणे विचार आला की इतक्या लांबवरुन जीवाचा आटापीटा करुन जगातले आश्चर्य म्हणून जे पाहायला आलो ते बस एवढेसेच? तेव्हा माहित नव्हते की उद्या सकाळी आपण कान पकडुन शन्नांचे वाक्य म्हणणार आहोत.
खेळ संपताच दिवे लागले. लोक दुसऱ्या बाजुने परतीच्या रांगा धरुन हलु लागले. बघतो तर आम्ही आत शिरलो त्या दरवाज्यालगत लोकांना उबेसाठी कांबळी ठेवलेली होती, खेळ संपला की परत करायची. आमचा पोपट झाला होता. आधी माहित असते तर कानावर वारा घेत कुडकुडावे लागले नसते ना! बाहेर आलो. अहमद-महमद हजर होतेच. गाडी सरळ सगळे छोटे रस्ते सारुन मोठ्या रस्त्याला लागली व नदीकिनारी एका उपाहारगृहापुढे थांबली. पाटीवर मत्स्यवर्णन व मत्स्यचित्र पाहताच आम्ही शाकाहारी असल्याची चिंता आम्ही बोलुन दाखविली. मात्र त्या द्वयीने इथे शाकाहारी जेवणही मिळत असल्याची ग्वाही दिली. उपाहारगृह परदेशी पर्यटकांनी गजबजलेले होते. आम्ही जे काही भोजन लावलेले होते त्यापैकी काय काय घेता येईल याचा अंदाज घेत बशा भरल्या आणि स्थानापन्न झालो. समोर अहमद-महमदच्या बशीवर नजर पडताच चिरंजीवांनी बशीतल्या मत्स्याची चौकशी केली व आपण 'सर्वभक्षी' असल्याचे सांगत त्या स्थानिक माशाची फर्माईश केली. अहमद-महमदांनी ती आनंदाने पुरी केली. जेवण झाल्यावर आम्ही शिरशीरी आणणार्या वातावरणात गरम कॉफी मागवली. इजिप्तच्या कडक कॉफीविषयी बरेच ऐकुन होतो. बघतो तर समोर कप बशा, कॉफीच्या थैल्या, साखरेच्या पुड्या आणि उकळत्या पाण्याची किटली आली होती! एकूण आजचा दिवस हा पोपट होण्याचा दिवस होता. आम्ही हॉटेलकडे निघालो.
वर खोलीत शिरताच आठवणीने खिडकीत गेलो व पडदा सारला. हॉटेलचे आरक्षण करताना आवर्जुन पिरॅमिड्स दिसणारी खोली मागितली होती व मिळालीही होती. मात्र आता पिरॅमिड्सच्या परिसरातली रोषणाई संपल्याने ते दिसत नव्हते. एकदा सामानाची जमवाजमव केली. उद्या सकाळी निघताना सामान घेउनच निघायचे होते. सर्व आवराआवर व जमवाजमव करून आम्ही अखेर बिछान्यात शिरलो. पहिला डाव देवाला असे म्हणत आम्ही आता पुढचा प्रवास मजेचा आणि अविस्मरणीय होईल अशी आशा व्यक्त केली. सहसा कुठल्याही प्रवासाचा पहिला दिवस हा फारसा रंजक नसतो असा माझा अनुभव आहे. असो. इजिप्तमधला पहिला दिवस संपला, मध्यरात्र येऊ घातली होती, उद्या लवकर नाही तरी निदान सात-साडेसातला उठायचे होते. मऊ मुलायम बिछान्यावर उबदार पांघरुणात शिरताच डोळे कधी मिटले ते समजलेच नाही.
क्रमशः
प्रतिक्रिया
25 May 2010 - 2:27 pm | श्रावण मोडक
पुढे? वाचतो आहे. लेखन सौष्ठवपूर्ण.
25 May 2010 - 2:54 pm | भाग्येश
<<<त्या दरवाज्यालगत लोकांना उबेसाठी कांबळी ठेवलेली होती >>>
समजलो नाही..
बा़की एकदम झक्कास लेख आहे..
वाचतो आहे .. पुढे येउ द्या...
-भाग्येश
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ||
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः ||
25 May 2010 - 2:55 pm | स्वाती दिनेश
लगेचच २रा भाग टाकलात ते उत्तम!:)
फार छान रंगते आहे वर्णन, पुढे वाचायला उत्सुक,
स्वाती
25 May 2010 - 3:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच ... पुढे काय काय पाहिलंत? पुढच्या भागात तरी पिरॅमिड दाखवणार ना?
अदिती
25 May 2010 - 3:20 pm | सहज
पण खर सांगू का तुम्ही सर्वभक्षी असाल ना तर खरच जिथे जाल तिथे मस्त लुत्फ लुटता येतो तिथल्या उत्तमोत्तम अन्नपदार्थांचा. पर्यटनाची मजा खरच वाढते.
वाचतोय.
25 May 2010 - 3:22 pm | प्रमोद्_पुणे
एकदम झकास.. पुढील भाग वाचायला उत्सुक..
25 May 2010 - 3:29 pm | इरसाल
भाग्येश कांबळी म्हणजे ब्लान्केत्टचा एक प्रकार आहे.थंडी साठी उबदार म्हणून ह्याचा वापर करतात
26 May 2010 - 5:46 am | सन्जोप राव
भाग्येश कांबळी म्हणजे ब्लान्केत्टचा एक प्रकार आहे
कांबळी म्हणजे ब्लँकेटसच. सर्वसाक्षींचे लिखाण असल्यामुळे ते असे माशातले काटे काढत काढत वाचायचे असते! (सॉरी बळवंतराव!)
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह
25 May 2010 - 3:33 pm | टारझन
__/\__ अफलातुन !!! अफ्रिका प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या !
- सर्वभक्षी
25 May 2010 - 6:38 pm | ऋषिकेश
चांगले चालु आहे.
देवाच्या डावानंतर आता पुढे काय याबद्दल उत्सूकता आहे.
खरं तर तूम्ही तो शो थकव्याने ऐकला नसेल मात्र त्याचं एखादं पामप्लेट असेल / घरातील कोणी नीट ऐकलं असेल तर त्या आधारे माहिती दिलीत (प्रतिसादात दिली तरी चालेल) तर अधिक आवडेल. आंतरजालावर अशी माहिती इंग्रजीत असते/आहे, पण ती आंतरजालावर मराठीतूनही असावी म्हणून ही सुचवणी
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
25 May 2010 - 7:18 pm | अरुण मनोहर
रंजक स्टाईल आहे तुमची.
25 May 2010 - 8:15 pm | अरुंधती
छान लिहिता आहात.... नेहमी मराठी लिखाणातून आढळणार्या इंग्रजीतील शब्दांना मराठी प्रतिशब्द देणेही आवडले! बजाज, अमिताभ मस्तच! आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
25 May 2010 - 9:52 pm | मदनबाण
हेच म्हणतो... :)
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
25 May 2010 - 11:15 pm | शिल्पा ब
छान लेखमाला...हवे तर फोटोची लिन्क टाका म्हणजे सगळे फोटो बघता येतील.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
26 May 2010 - 5:49 am | सन्जोप राव
प्रवासवर्णन असूनही लेखन रंजक झाले आहे. सामाजिक भान ठेवून केलेल्या अवांतर टिप्पण्याही आवडल्या. चहा (किंवा बीअर) पिता पिता मित्राशी गप्पा माराव्या तसे वाटले.
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह
26 May 2010 - 8:44 am | पाषाणभेद
>>> नुसत्या रिक्षाच नव्हेत तर त्या चालवायची विद्याही इकडे धाडली असावी. तेच झपकन वळणे, तेच अचानक थांबणे. एकुण दुस़र्या घरात आलो हे खरेच होते तर:)
हे वाक्य काळजाला भिडले.
लिखाणशैली पहाता तुम्ही नेहमी पर्यटनच करत रहावे अन आम्ही ते अनूभव चाचत रहावे असे वाटते.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
26 May 2010 - 9:02 am | भाग्यश्री
मस्त लिहीले आहे !!
अहमद - महमद जोडीबद्दल मीना प्रभुंनी लिहून ठेवले आहे. इजिप्तमध्ये कुठेही जा नावं हीच असतात! :)
अवांतर : 'सहलनायक' हा शब्द पन्नास वेळा परत वाचून सुद्धा मी 'सहनालायक' असाच वाचला! :(
26 May 2010 - 12:46 pm | शाल्मली
दोन्ही लेख आत्ता एकत्रच वाचले.
पुढे काय झालं याची उत्सुकता वाढली आहे..
--शाल्मली.
26 May 2010 - 12:52 pm | नील_गंधार
दोन्ही भाग फर्मास झाले आहेत.
नील.