आज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आद्य महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे समाजसुधारक श्री ज्योतीबा फुले यांची जयंती. त्यांना शतशः नमन.
महाराष्ट्रात जेव्हा वाईट रूढींचा बोलबाला होता आणि सामाजिक कुरितींनी कळस गाठला होता तेव्हा त्या अंधारातून ज्योतीबांनीच महाराष्ट्राला व त्यायोगे संपूर्ण देशाला नवी दिशा दिली.
त्याकाळात त्यांनी सुरू केलेल्या अनेक कार्यांपैकी एकेक कार्य करीत पुढे लोक मोठे बनत गेले. त्या सर्व समाजसुधारणेचा पाया भक्कम करणे आणि आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत आपली भूमिका कणखरपणे मांडणे हे काम त्यांनी अखंड केलं.
११ एप्रिल १८२८ ला ज्योतीबांचा जन्म झाला व १८९१ ला त्यांचे निधन झाले.
त्यांच्या बद्दल अधिक माहिती ठळक मुद्द्यांच्या आधारे खाली देत आहे. हे लेखन या आधी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेले आहे.
१८२८ - जन्म कटगूण सातारा
१८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हाय स्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले
१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
१८४७ - थॉमस पेन यांच्या ‘राइट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास.
१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला
१८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
७ सप्टेंबर १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरवात.
१८५२ - पुना लायब्ररीची स्थापना.
१५ मार्च १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१६ नोहेंबर १९५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकार तर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
१८५३ - ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स’
१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली
१८५५ - रात्र शाळेची सुरवात केली
१८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
१८६० - विधवा विवाहास साहाय्य केले.
१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
१८६५ - विधवा केशवपणा विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
१८६४ - गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला.
१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
१८७३ - सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणा विरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
१८८२ - ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरवात केली
१८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते जनते तर्फे सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान करण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.
ज्योतीरावांची ग्रंथसंपदा
नाव साहित्यप्रकार लेखन काळ
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३) ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकऱ्यांचा आसूड १८८३
६)सत्सार१ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशीत )
९)अखंड काव्य रचना
‘गुलामगिरी‘ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला.
‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
मूळ गाव - कटगुण (सातारा)
गोऱ्हे हे मूळ आडनाव.
ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
सावित्रीबाईंना प्रशिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.
सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत.
स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
१८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना ‘मिल हॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
ज्यांना ज्योतीबांबद्दल अधिक वाचायचे आहे त्यांनी महाराष्ट्र टाईम्स मधील मराठी पर्व मध्ये ११ एप्रिलचे पान वाचावे. त्यापैकी खाली दोन दुवे देत आहे हे दोन लेख तर नक्की वाचाच.
1)महात्मा फुलेः एक निरीक्षण - दुर्गा भागवत
2)जोतीरावांची सत्यशोधक चळवळ - य. दि. फडके
नीलकांत
प्रतिक्रिया
11 Apr 2008 - 11:07 pm | प्रमोद देव
ह्या महात्म्याला माझी विनम्र आदरांजली!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
11 Apr 2008 - 11:17 pm | भाई
जोतिराव फुलेंनी हिन्दूंच्या देव-देवतांबद्दल किती हिडीस अणि घृणास्पद लिखाण केले आहे हे आपणास माहित आहे काय? महात्मा कशाबद्दल? त्यांच्याइतकेच कार्य करणारे ब्रह्मणही होते सावरकर, आगरकर, कर्वेंसारखे. त्यांनातर वैयक्तिक कारणही नव्हते फुल्यांसारखे.
ब्रिटिश राजवट ही ईश्वराने (त्यंच्या भाषेत 'निर्मिकाने') इथल्या शूद्रांस धूर्त आर्यांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी मुद्दाम पाठविले होते. त्यासाठी प्रत्येक गावात एक एक मिशनरी पाठवून त्याला जमीन देऊन त्याच्यावर उपदेशकाचे काम सोपवावे अशी विनंती ब्रिटिश सरकारला करणारे हे महत्मा कसे?
12 Apr 2008 - 5:19 am | विकास
तुम्हाला कोणी काही सरळ (डायरेक्ट) सामाजीक त्रास देत नाही. कदाचीत सध्याच्या सामाजीक अवस्थेत राजकारणी जातीव्यवस्थेचा वापर करतात म्हणून काही आलेल्या अनुभवाने गांजलेले देखील असाल. पण तरी इतका त्रागा होतो. परदेशातपण कधी कधी आपल्याला वांशिक अनुभव हलकेच का होईना पण कधीतरी येतात आणि आपण तात्काळा चिडतो (हे अर्थात मी माझ्या अनुभवावरून तसेच इतरांचे जे पाहीले आहे त्यावरून बोलतोय). अगदी गांधीजींचे पण असे झाले तर आपण किस झाड की पत्ती! कुजलेल्या राजकारणाची अथवा छुप्या वंशवादाची चिड येणे हे साहजीक आहे.
(शाहू महाराजांचे नाव घेत नाही कारण ते सुधारक असले तरी तथाकथीत अस्पृश्यवर्गातील नव्हते आणि काही झाले तरी राजे होते म्हणून गोष्ट वेगळी) पण मग फुले झाले, आंबेडकर झाले आणि तत्सम अनेक जे शतकानूशतकांच्या ह्या अक्षम्य बेड्यातून शिक्षणामुळे बाहेर पडले आणि स्वतःच्या पूर्वजांचे, स्वतःचे आणि तत्कालीन भाईबंदांचे हाल कळले. अशा वेळेस जर त्यांचा त्रागा झाला आणि काही गैर बोलले असले तरी त्याबद्दल आश्चर्य वाटायचे आणि त्यामुळे त्यांच्या इतर कार्याबद्द्लच्या महात्म्य कमी करण्याची गरज नाही.
सावरकर, आगरकर, कर्वे - आपण घेतलेली ही सर्व नावे महान नाहीत असे कोण म्हणतो? आज फुल्यांचा जन्मदीन म्हनून त्यांच्या बद्दल नीलकांतनी लिहीले. त्यात एकाला महान म्हणले म्हणून बाकीचे लहान होत नाहीत. पण जसे आंबेडकर-फुल्यांना केवळ उपेक्षितांचे आणि तेही विशिष्ठ जाती सोडून इतरांचे मानणारे हे त्यांचे कार्य आणि त्यांची महानता कमी करतात (ते या चर्चारंभात नाही हे स्पष्ट करतो), तसेच काहीसे आज सावरकर-आगरकर-कर्व्यांबद्द्ल झाले. त्यांचे कार्य बघण्यापेक्षा जातच आपण पाहीली. असे करणे निदान आता तरी सर्वांनी सोडले पाहीजे असे वाटते.
असो.
12 Apr 2008 - 5:50 am | चित्रा
त्यांचे कार्य बघण्यापेक्षा जातच आपण पाहीली. असे करणे निदान आता तरी सर्वांनी सोडले पाहीजे असे वाटते.
असेच.
16 Jul 2008 - 11:05 am | मेघना भुस्कुटे
असेच म्हणते. संपूर्ण सहमत.
11 Apr 2008 - 11:39 pm | नीलकांत
खरंय -
गेल्या कित्येक पिढ्यांपासून ज्यांना मानूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला होता त्यांना समान वागणूक मिळावी म्हणून लढणारा महात्मा कसा असू शकतो?
ज्या पानवठ्यावर जनावरांना पाणी प्यायची परवाणगी होती तेथे काही लोकांना पाणी पिण्याची बंदी होती, अशी बंदी मोडून घरचा हौद या लोकांसाठी खुला करणारा महात्मा कसा असू शकतो?
समानता ही केवळ लिहीण्याची - बोलण्याची बाब नाही तर ती कृतीत उतरली पाहिजे असं बोलून आपल्या पत्नीला लिहायला शिकवले, व तीच्या माध्यमातून पहिली भारतीय मुलींची शाळा काढली. शिक्षणाची गंगा जनसामाण्यांपर्यंत पोहोचवणारा , महात्मा कसा असू शकतो?
शेती करतांना नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास ती फायद्याची होते हे प्रत्यक्ष शेती करून (फक्त एवढ्यासाठी शेती केली) पटवून देणारा , महात्मा कसा असू शकतो?
त्याकाळी कमी वयात वैधव्य आल्यावर अड्यानिड्या वयात कुणी त्या विधवेचा गैर फायदा घेतल्यास त्यामुळे आलेल्या गर्भारपण आणि त्यापुढील समाजाने अनौरस मानलेल्या संततींना जगण्याचा हक्क मिळावा म्हणून झटनारा, महात्मा कसा असू शकतो?
समाजसेवा करतांना जातीच्या बंधनात न अडकता काम करणारा, आणि समाजसेवा करीत असतांना आपल्या चरितार्थासाठी वेगळा व्यवसाय करणारा व्यक्ती, महात्मा कसा असू शकतो?
महाराष्ट्राच्या लाडक्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यावर सर्वप्रथम फुले वाहणारा आणि सर्वप्रथम शिवजयंती उत्सव साजरा करणारा, शिवाजींवर पवाडा करणारा मानुस, महात्मा कसा असू शकतो?
खरंच असे एक ना अनेक प्रश्न मला पडताहेत. भाईंना एक विनंती आहे की आगरकर सोडले तर इतरांचा जो उल्लेख केला आहे त्यांचा आणि फुल्यांचा कालखंड पडताळून बघावा. आगरकरांना का सोडावं तर आगरकरांच काम वैचारीक होतं आणि संघटनात्मक बाजूला त्यांनी स्पर्श केला नव्हता. यामुळे आगरकरांच काम कमी होतं असं नाही. आगरकरांबद्दल स्वतंत्र लिहीनच. पण अशी जीभ उचलून काहीही बोलण्या आधी किमान एक वेळा फुलेंचं चरित्र वाचा. मग बोलूया की कुणाला आणि का महात्मा म्हणावेसे वाटते ते.
ह्या विषयावर चर्चा करायला आवडेल. पण मुद्दे असावेत. किमान लेखाच्या खाली दोन या विषयाच्या अधिकारी मानसांच्या लेखांचे दूवे दिले आहेत ते वाचण्याची तरी तसदी घ्या की राव.
नीलकांत
12 Apr 2008 - 12:22 am | भाई
तोच उद्देश आहे. सध्याच्या दिवसात फुले, आंबेडकर आणि शाहू याच्या कर्तृत्वाबद्दल तौलनिक अभ्यास न होता केवळ मतांसाठी उपयुक्त असल्याने जयघोष केला जातो. मलाही यानिमित्ताने फुल्यांचे महात्मापण समजले तर बरे होईल (निदान 'पुरोगामी'पणाचा शिक्का तरी बसेल).
आगरकरांनी संघटना बंधाली नाही म्हणून या संदर्भात त्यांना वगळण्याची कारणमीमांसा समजली नाही. विषय आहे महात्मा का? तत्कालीन परिस्थितीमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मी जर बंड केल्याने मी महत्मा ठरन असेन तर असे महात्मे बरेच आहेत. सारे देशभक्त याच भावनेने स्वातंत्र्य लढ्यात उतरले. पण त्यांपैकी कोणीच महात्मा नाही. फुलेंनी उघड उघड ब्रिटीश राज्याची बाजू घेऊन देशद्रोह केला. ब्रह्मणांचा टोकाचा तिरस्कार केला, इतरांच्या धर्मभावना दुखावण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला. ही सारी महात्म्याची लक्षणे? महात्मा याचा संत असा अर्थ होतो. फुलेचे आयुष्य संतासारखे होते का ते आपणही तपासावे.
विधवांच्या प्रश्नावर काम कराणारे फुले एकटेच नव्हते. कित्येक जण स्वतःला वैयक्तिकरीत्या त्रास न होऊनही केवळ सहानुभुतीतून खूप मोठी कार्ये करून गेले. त्यांना अनुल्लेखाने मारायचे. फुले एकटे मात्र महात्मा. हे न्याय्य नाही पण फायदेशीर आहे.
12 Apr 2008 - 2:11 am | धनंजय
ब्रिटिशांकडून आपले काम फत्ते करून घेण्याचे दुसरे एक उदाहरण आठवते.
सावरकरांनी भारतीय तरुणांना ब्रिटिश फौजेत रक्त सांडण्यासाठी पाठवले, ते अत्र्यांना सुरुवातीला देशद्रोही वाटले. (त्यावेळी सावरकरांनी ब्रिटिशांच्या बाजूने काही लिखाण केले होते.) पण हा डावपेच होता, जेणेकरून भारतीय तरुण प्रशिक्षित व्हावेत. ब्रिटिश सोडून गेल्यावर हा डावपेच होता हे सर्वांना कळले, आणि अत्र्यांनीही त्याचे महत्त्व मानले.
फुल्यांनी एक पूर्वापारची प्रथा बदलण्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली, आणि ब्रिटिशांचे माफक गुणगान केले, म्हणा. ब्रिटिश जाईपर्यंत ते हयात नव्हते. त्यामुळे त्यांना ब्रिटिशांचे ते गुणगान मागे घेणे कसे शक्य होणार?
तरी हा पाहुण्याकडून साप मारून घेण्याचा हा फुल्यांचा डावपेच मानावा.
12 Apr 2008 - 3:08 am | मुक्तसुनीत
भाई म्हणतात :
तत्कालीन परिस्थितीमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मी जर बंड केल्याने मी महत्मा ठरन असेन तर असे महात्मे बरेच आहेत.
नीलकांत यांनी तपशीलवार त्यांच्या कार्याची यादी देऊनही , "केवळ अमुक अमुक केल्याने" असे म्हणणे म्हणजे ऐकून न ऐकण्याचे , किंवा पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीचे निदर्शक आहे. बरे , बंड केले म्हणजे काय ? हिंसेचा मार्ग अनुसरला ? झुंडशाही केली ? शतकानुशतके काळोखात पडलेल्यांचे प्रबोधन केले.
सारे देशभक्त याच भावनेने स्वातंत्र्य लढ्यात उतरले. पण त्यांपैकी कोणीच महात्मा नाही.
गांधींना महात्मा ही पदवी दिली गेली होती हे तुम्हाला अज्ञात असावे. किंवा सोयीस्कररीत्या त्याचा विसर पडलेला असावा.
फुले नि आंबेडकर यांच्या नावाचा आज बाजार झाला असे कुणाला वाटत असेल तर त्यात या दिवंगत विभूतिंचा दोष नाही. साप साप म्हणून भुई धोपटणार्यानी हे लक्षात घ्यायला हवे.
12 Apr 2008 - 8:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्रातील आद्य कर्ते सुधारक, थोर विचारवंत,आणि 'सत्यशोधक समाजा'चे संस्थापक असणा-या म. फुले यांनी आयुष्यभर अस्पृश्य,स्त्रिया,शेतमजूर, इत्यांदींच्या जीवनासाठी वाहून घेतले होते. स्वातंत्र्य, समता,मानवता, विश्वबंधुता या जीवनमुल्यांची प्रत्यक्ष कृती आणि लेखनाद्वारे प्रचार त्यांनी केला. म्हणुनच जनसामान्यांनी त्यांना उत्स्फुर्तपणे 'महात्मा'म्हणुन संबोधले असावे.
भाइसाहेब, जोतिरावांचा विचार मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा होता.समतेकडे नेणारा होता. भारतातील परंपरागत समाजसंस्थाच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष जोतिबा असावेत. सामाजिक जन्मसिद्ध उच्चनीच भाव हे ईश्वरी संकेताने व माणसाच्या पुर्वकर्माने निर्माण झालेले आहेत, म्हणुन यांच्याविरुद्ध प्रयत्न करणे हे महापाप आहे, अशी समजूत येथील समाजमनात होती तेव्हा जोतिबांनी हजारोवर्षापासूनच्या या बंधनांना तोडण्याचे काम केले. शाश्वत नैतिक सत्य हा त्यांच्या विचारांचा पाया होता. सत्यशोधक आंदोलनाच्या मुळाशी विधायक स्वरुपाच्या ध्येयाचा विचार होता आणि तो म्हणजे मानवी हक्काचा विचार म्हणावा लागेल. समाजातील बहुसंख्य जनतेचे सामाजिक शोषण बंद करुन सर्व मानवांना मुक्तकरण्याचा विचार जोतिरावांनी दिला.
समाज परिवर्तनाच्या कितीतरी चळवळींचा पाया म. फुल्यांनी घातला. धर्मग्रंथाची चिकित्सा केली, जातिव्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला, ज्ञानाची महती समाजमनावर बिंबवली, शेतक-यांच्या दैन्यावस्थेला जवाबदार असणा-यांवर त्यांनी 'शेतक-यांचे असुड' मधे कोरडे ओढले. अहो, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे शिक्षणाची अमुलाग्र पुनर्चना हा विचार खूप काही शिकवणारा आहे.
भाइसाहेब, 'तृतीय रत्न' नाटक वाचा म्हणजे कळेल तेव्हाचा समाज काय गम्मत होती म्हणुन. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हा संदेश त्यांनी जेव्हा नाटकातून दिला तेव्हा येथील समाज वाचू-लिहू शकत नव्हता तेव्हा सामाजिक प्रबोधनाचा मंत्र फुल्यांनी नाटकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडला. मानव्याच्या विकासासाठी माणूस जागा करण्याचे काम जिवनवादी साहित्यातून म. फुल्यांनी केले. प्रश्नांचे मोहोळ जागे करण्यातच ज्ञानाचा उगम असतो, हे सुत्र फुल्यांनी लेखनातून उचलून धरले.
म्हणुन मला तरी म. फुले हे 'महात्माच' वाटतात. नीलकांतने एका महामानवाच्या विचारावर माहिती दिली, लेखनाचे दुवे दिले या निमित्ताने पुन्हा फुल्यांच्या विचारांची उजळणी होईल, चर्चा होईल, त्या बद्दल 'नील' ला धन्यवाद देतो. आणि या समाज क्रांतीच्या दुताला आम्ही विनम्र अभिवादन करतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
12 Apr 2008 - 8:52 am | विसोबा खेचर
बिरुटेसाहेबांचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला!
सुंदर प्रतिसाद...!
तात्या.
12 Apr 2008 - 11:37 pm | भाई
चर्चेची पातळी योग्य राखल्याबद्दल आधी सर्व प्रतिक्रिया देणार्यांचे आभार.
फुले हे बंड करण्याचे धाडस दाखविणार्यांपैकी एक होते. त्यांनी काही मैलाचा दगड ठरावीत अशी कामे केली. या बाबींबद्दल मी काहीच नाकारले नव्हते तर मग चर्चा त्यावरच केंद्रित का? सर्वसामान्य माणसाला अपमानास्पद वागणूक मिळाली की तो चिडतो. त्याच्या कुवतीप्रमाणे तो त्याविरूध्द प्रतिक्रिया देतो. ज्यांनी त्याला त्रास दिला त्यांच्याबद्दल त्रागा करणे (एका प्रतिक्रियेत हेच कारण दिले आहे), त्यांची निंदा नालस्ती करणे, सरसकट त्या समूहाला एकाच मापाने मोजणे, त्याचे गुणही नाकरणे इत्यादी मार्गांनी तो त्याचा सूड व्यक्त करतो. कुवत/ऐपत खूप जास्त असेल तर मग त्या लोकांना नष्ट करण्याचाही मार्ग अवलंबला जातो. फुल्यानी हिंसक मार्गाने त्याचे बंड केले नाही यात त्यावेळेस त्यांना तितके बळ तरी उपलब्ध होते का हा विचार करावयास हवा. त्यांची हिंसा ही शाब्दिक होतीच. जर सामर्थ्य असते तर ती कदाचित प्रत्यक्षही होऊ शकली असती का? यात सामान्य माणसापेक्षा वेगळे काय आहे? महात्मेपणासाठी येशूइतकी कणव असावी सर्वांबद्दल - फक्त माझ्या जातीबद्दल नव्हे. येशूचे नांव परिचित म्हणून घेतले. महाराष्ट्राला ज्ञानेश्वरही लाभले होतेच. इतका छळ सत्रागा''त्रागा' आणि घृणा कधीच दिली नाही. ते खरे संत - महात्मा.
स्वानुभुतीमुळे येणारी कणव आणि निव्वळ परानुभुती (एम्पथी) मुळे निर्माण होणारी कणव यात दुसरी अर्थातच श्रेष्ठ आहे. दुसर्याला होणारी पीडा जो दूर करायचा प्रयत्न करतो तो खरा सह्रदय - महात्मा.
मुसलमानांनी माझ्या पूर्वजांचा छळ केला म्हणून मी आज सर्व मुसलमानांना तिरस्कार केला तर मी संकुचित आणि जातियवादी; पण, मी ब्रह्मणांचा द्वेष केला तर मात्र मी संकुचित तर नाहीच उलट मी पुरोगामी (व जमलेच तर नंतर महात्मा - कल्पना करा - महात्मा मायावती, महात्मा कांशीराम).
विचार करा, सावरकर जर स्वतः ब्राह्मण नसते तर? आज त्यांच्या दलितोध्दारक कार्याचा केवढा गवगवा झाला असता? आगरकरांचेही तेच. राजा राम मोहन रॉय? र धों कर्वे (स्वतः विधवेशी लग्न करणारे) असे कित्येक. ज्या सर्व उच्चवर्णिय सुधारकांनी अशाप्रकारे केवळ परपीडेची कल्पना करून, वैयक्तिक स्वार्थ नसताना, स्वतःच्याच गणगोत/आप्तस्वकिय यांच्याशी वैर पत्करून हे काम केले ते खरे 'महात्मा' या शब्दास जास्त जवळ नाहीत? फुले जर ब्राह्मण असते तर आज बहुजन समाजाने त्याना असे डोक्यावर घेतले असते? इथे मी जात आणत नाहीये (संदर्भ- एक प्रतिक्रिया) तर मी फक्त या समाजातली वस्तुस्थिती दाखवतोय. हाच तर जातीवाद नाही का?
सावरकरांचे भारतीयांना ब्रिटीश फौजेत जाण्याचा सल्ला देणे हे अथपासून इतिपर्यंत भारताच्या फायद्यासाठीच होते. त्यांनी त्यांचा उद्देश कुठेही लपवला नव्हता. सांगतानाच त्यानी असे का करावे हे अतिशय स्प्ष्टपणे मांडले होते. आणि, सावरकरांची देशभक्ती तोपर्यंत सर्वज्ञात झालेली होती त्यामुळे त्यांच्या सुचनेचा फायदा झाला असता की नाही यावर वाद होऊ शकतो पण त्यामगच्या देशहिताच्या कळकळीबाबत संशय असू शकत नाही. फुल्यांच्या चरित्रात देशभक्तीचे स्थान ठळक नाही. त्यामुळे तुम्ही फुले फॅन असाल तरच तुम्हाला त्यांच्या ब्रिटीशधार्जिणेपणाची शंका येणार नाही. पाहुण्याचा हातून साप मारणे याला म्हणत नाहीत कारण पाहुण्याला घराचा ताबा घेण्याचाच आग्रह आहे हा.
जेव्हा मी, स्वत:चे निवांत आयुष्य सोडून समाजासाठी खडतर आयुष्य स्विकारणार्या कित्येक ज्ञात/अज्ञात व्यक्तींना सरसकट महात्मा म्हटले जात नाही असे म्हणतो तेव्हा गांधी हा अपवादच असतो. अशाप्रकारे बंड करणारे/लढणारे सर्व फुलेंच्याच दर्जाचे नाहीत का? मग एकटे फुले (आणि गांधी - माझ्या आठवणीबद्दल परत शंका नको) तेवढे 'महात्मा' का?
13 Apr 2008 - 4:30 am | मुक्तसुनीत
एकूण भाईंचा सगळा रोख आहे तो फुले यांच्यासारख्यांचे नाव घेऊन जो जातिविद्वेष पसरविला जातो त्याकडे आहे असे दिसते. मात्र त्या विद्वेषाकरता ते सरळ फुल्यांबद्द्ल कडवटपणा व्यक्त करतात. थोडक्यात फुले यांना ते , मायावती, कांशीराम (आणि त्यांच्यासारखे इतर) यांच्या रांगेत आणून बसवतात. गांधींबद्दलच्या एका टिपणामधे मी म्हण्टले होते : "गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार, त्यांची आंधळी व्यक्तिपूजा, आणि त्यांच्या नावाचा मतलबी वापर हे तीनही पर्याय त्याज्य आहेत. योग्य पर्याय म्हणजे त्या तत्वांना आजच्या संदर्भावर घासून पडताळून पाहणे." हेच विधान इथे लागू करायला हवे.
भाई म्हणतात :
फुल्यानी हिंसक मार्गाने त्याचे बंड केले नाही यात त्यावेळेस त्यांना तितके बळ तरी उपलब्ध होते का हा विचार करावयास हवा. त्यांची हिंसा ही शाब्दिक होतीच. जर सामर्थ्य असते तर ती कदाचित प्रत्यक्षही होऊ शकली असती का? यात सामान्य माणसापेक्षा वेगळे काय आहे?
फुल्यांच्या "हिंसे"बद्द्ल बोलताना थोडे संदर्भ , अवतरणे दिले असते तर फार बरे झाले असते. नीलकांत यांनी फुल्यांच्या कार्याबद्दल बोलताना कित्येक संदर्भ, विशेष खोलात जाऊन दिले आहेत. फुल्यांवर शब्दिक हिंसेचा आरोप माझ्या मताप्रमाणे थोडा अभिनव आहे. तेव्हा प्रतिवाद करताना - विशेषतः आतापर्यंतच्या रूढ विचारसरणीला तडा देताना - थोडी काळजी घ्यायला हवी. "जर सामर्थ्य असते तर फुले हिंसक बनले असते" हा मुद्दा मला वाटते , "आत्याबाईला मिशा असत्या तर ...." , "मला लाखाची लॉटरी फुटली तर ...." या दर्जाचा (आणि त्यातील आरोपामुळे गंभीर स्वरूपाचा) आहे. ज्या व्यक्तिने सर्व आयुष्य विधायक कार्याकरता वेचले त्यावर असले "जर ..तर" चे आरोप लावणे योग्य आहे काय ?
अशाप्रकारे बंड करणारे/लढणारे सर्व फुलेंच्याच दर्जाचे नाहीत का?
भाईंनी विकास यांचे म्हणणे वाचल्यास त्याना समजेल की त्याना हेच म्हणायचे आहे.
भाईंनी जो युक्तिवाद सांगितला आहे त्या न्यायाने, ज्याच्यावर जाति-वंश-वर्ण आदि गोष्टींवर आधारित अन्याय झालेला नाही, परंतु तरीही जो "उद्धार" करण्याचा क्रूस आपल्या खांद्यावर घेतो , केवळ तोच महात्मा ठरावा. या न्यायाने केवळ ख्रिस्त, बुद्ध हेच महात्मा ठरतात. असो. काही विशिष्ट घटकांचे राजकारण, समाजकारण हे निश्चित विद्वेषमूलक आहे ; त्यामधे फुले-आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून द्वेष फैलावला जातो हे अगदी खरे; परंतु या गोष्टींकरता त्या त्या माणासाबद्दलची कटुता बाळगणे चुकीचे आहे.
13 Apr 2008 - 9:01 am | भाई
अगदी नीलकांत यांनी दिलेला दुर्गाबाई भागवतांचा लेख तरी वाचू शकता. त्यात दिलेली वनगीदाखल अवतरणे शब्दिक हिंसेची कल्पना येण्यास पुरेशी आहेत. फुलेंचा स्वतःचा या विषयाचा अभ्यास नसताना हिंदूंच्या देवदेवतांबद्दल अपमानास्पद लिखाण ही शाब्दिक हिंसा नाही तर काय आहे? सामजिक रुढींचा प्रतिवाद तार्किक मांडणी करून करता येतो. त्याकरता हिंदूंच्या देवदेवतांना वेठीस धरायची आवश्यकता नाही. हिंदूंचे देव हे इस्लाम अथवा तत्सम 'पुस्तकाधारीत' धर्मांप्रमाणे रुढी स्वतः निर्माण करत नाहीत. असे असताना इतके तिरस्कारयुक्त आणि विनाधार लिखाण कराण्यामागे काही 'डावपेच' होता का?
मुळात तो लेख त्यांना लिहावा लागला याचे कारणही मुळात फुलेंचे लिखाण व बोलणे याबद्दल त्याकाळी (१९८९) निर्माण झालेला असंतोष हेच होते. (किंबहुना, त्या लेखाचा शेवटचा परिच्छेद तर केवळ बचावात्मक वाटतो. तो परीच्छेद नसता तर म.टा. ने तो लेख छापला नसता ना नीलकांत यांनी तो दुवा इथे दिला असता. आणि दुर्गाबाईंना त्याबद्दल काय काय सहन करावे लागले असते ते निराळेच. ). जर एखादी व्यक्ती शाब्दिक हिंसा वारंवार करू शकत असेल तर सामर्थ्य/सत्ता प्राप्त होताच ती प्रत्यक्ष हिंसा करू शकेल हे यथातर्क आहे.
फुलेंच्या बहुतेक कार्याबद्दल मला जो काही आदर निर्माण होतो तो त्यांच्या द्वेषमूलक लिखाणामुळे कमी होतो. इथे अनुयायांचा प्रश्न नाही तर मुळात त्या व्यक्तीचाच आहे. आजचे अनुयायी त्या थोर पुरुषांची हीच विचारसरणी उचलू पाहतात कारण त्याला त्यांच्या दृष्टीने नैतिक अधिष्ठान प्राप्त होते - "ब्राह्मणांना हाणा कारण फुलेबाबानी सांगितलया". एकदा त्या माणसाला 'महात्मा' बनविले की मग त्याच्या सर्वच गोष्टी योग्य ठरतात आणि आधार म्हणून घेतल्या जातात. थोर मात्र माणूसच अशी भूमिका असेल तर त्या माणसाची प्रत्येक बाब चिकित्सेला उपलब्ध राहते.
13 Apr 2008 - 10:57 pm | आजानुकर्ण
आदरणीय भाईसाहेब,
महात्मा फुल्यांनी केलेले लेखन हे तार्किक मांडणीच्या उद्देशाने केले असेल वा नसेल पण ज्या समाजाच्या उद्धारासाठी कार्य करायचे आहे त्या समाजाला समजेल, पटेल व आवडेल अशा भाषेत ते केले होते. हिंदूंचे देव रुढी निर्माण करीत नाहीत हे म्हणणे योग्य असले तरी हिंदूंच्या देवांच्या नावाने रुढी निर्माण करणार्यांनी स्वतःची पोटे जाळण्यासाठी देवतांचा वापर केला होता हे सत्य आहे. वरवर पाहता निरर्थक वाटणार्या मंदिरप्रवेशासाठी कित्येक उपोषणे झाली आहेत याचा इतिहास कुठेही सापडेल. मंदिरे व दैवते यांचे समाजातील महत्त्व आणि तत्कालीन समाजात (व आजकालही) असलेला देवभोळेपणा लक्षात घेता, मुळावर घाव घालण्याच्या उद्देशाने महात्मा फुल्यांनी देवतांबाबत केलेले लेखन योग्यच होते असे माझे मत आहे. समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा किंवा तथाकथित देवतांबाबत असलेला आदर उखडून टाकण्यासाठी असे जालीम इलाज करणे आवश्यक असते. असे इलाज करण्याचे धैर्य असणारे फुले प्रत्येक पिढीत जन्माला येत नाहीत. किंबहुना फुलेच नव्हे तर संत तुकाराम, ई.व्ही.रामस्वामी पेरियार यांसारख्या क्रांतीकारक समाजसुधारकांनीही सर्वांना समजेल अशीच परखड भाषा वापरण्याची पद्धत वापरली होती.
तुकारामांच्या अभंगांमध्ये वापरलेले शब्दही हिंसक किंवा अश्लील वाटू शकतात.
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
या अभंगात तुकारामांनी तोंडावरी थुंका असे सांगितले आहे म्हणजे ती 'शाब्दिक व शारीरिक हिंसा' झाली. शिवाय रुढार्थाने ते 'अनहायजिनिकही' आहे. पण ज्या काळात ही रचना केली गेली तिचा संदर्भ ध्यानात घेणे आवश्यक आहे.
अश्लीलता किंवा हिंसा ही केवळ शब्दात असते हा समज चुकीचा आहे. संस्कृतप्रचुर गोड शब्दांमध्ये गुंडाळलेली हिंसा दिसत नसली तरी ती तितकीच दाहक असते.
आपला,
(सविस्तर) आजानुकर्ण
एतद्देशीय पेशवे गेल्यानंतर इंग्रज राज्यकर्ते आले तेव्हा 'पुन्हा पेशवाई नको' असा समाजातील खूप मोठ्या वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला होता ही अवांतर माहिती द्यावीशी वाटते.
14 Apr 2008 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कर्णा,
प्रतिसाद आवडला !!!
अवांतर :) तुकारामाच्या अभंगांनी लै जोर धरलाय :)
14 Apr 2008 - 6:15 pm | मुक्तसुनीत
अजानुकर्णाच्या प्रतिसादाबद्दल हेच म्हणतो.
12 Apr 2008 - 12:39 am | विसोबा खेचर
ज्योतीरावांना माझेही विनम्र अभिवादन..!
तात्या.
अवांतर - ( ह घ्या)
१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
ज्योतीरावांनी हे मात्र करायला नको होते असे माझे वैयक्तिक मत आहे! ;)
तात्या.
12 Apr 2008 - 3:23 am | धनंजय
फुल्यांच्या जीवनातील घटनांचा आढावा दिल्याबद्दल धन्यवाद.
12 Apr 2008 - 7:41 am | सहज
महात्मा फुले यांच्या जीवनातील घटनांचा आढावा दिल्याबद्दल धन्यवाद.
असेच म्हणतो.
12 Apr 2008 - 8:31 am | आनंदयात्री
म्हणतो. फुल्यांना आदरांजली.
12 Apr 2008 - 3:34 am | पिवळा डांबिस
महात्मा जोतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ आदरांजली!
-पिवळा डांबिस
12 Apr 2008 - 9:03 am | आजानुकर्ण
महात्मा फुले यांना आदरांजली.
फुल्यांच्या जीवनकार्याचा आढावा येथे दिल्याबद्दल नीलकांतचा हार्दिक आभारी आहे.
(नतमस्तक) आजानुकर्ण
12 Apr 2008 - 10:37 am | इनोबा म्हणे
यांना आदरांजली.
माहितीपुर्ण दूवे दिल्याबद्दल निलकांत यांचे आभार.
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
12 Apr 2008 - 11:38 am | ऋषिकेश
महात्मा ज्योतिराव फुल्यांना विनम्र आदरांजली.
त्याच्या साहित्याचे वाचन आणि मनन सध्याच्या "दलित वोट बँकचे" राजकारण करणार्यांना वाचणे सक्तिचे करावेसे वाटते
नीलकांत यांचे देव्यांबद्दल आणि एकूण आयुस्यातील प्रमुख घटनांच्या धांदोळ्याबद्दल अनेक आभार!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
12 Apr 2008 - 12:37 pm | शरुबाबा
महात्मा जोतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ आदरांजली!
12 Apr 2008 - 2:33 pm | विदेश
कोणी काही म्हणो,
महात्मा ते महात्माच ! विनम्र वंदनांजली .
13 Apr 2008 - 1:16 pm | जितेंद्र शिंदे
माहितीपूण्र चच्रेबदल धन्यवाद.
13 Apr 2008 - 2:28 pm | आंबोळी
कुठलाही जातिय अभिनिवेश न बाळगता अत्यन्त समतोल चर्चा केल्याबद्दल निलकान्त्,धनंजय,मुक्तसुनीत,प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ,विकास ,भाई आणि इतरान्चे अभिनन्दन.
14 Apr 2008 - 4:36 pm | स्वाती राजेश
महात्मा जोतिबा फुले यांना आदरांजली!
14 Apr 2008 - 10:21 pm | वरदा
महात्मा फुले आणि त्यांची पत्नी यांनी एवढे प्रयत्न केले म्हणून आम्ही मुली हे स्वातंत्र्याचे दिवस पाहातोय...
15 Apr 2008 - 12:14 am | llपुण्याचे पेशवेll
जोतिराव फुले यांनी स्रीशिक्षणाचे बीजारोपण केले. जोतिराव फुले याना भावपूर्ण आदरांजली.
पुण्याचे पेशवे