याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१४
मायानगरी
अमेरिकेतल्या डिस्नेलँडचे प्रतिबिंब तोक्योच्या डिस्नेलँडमध्ये आहे. (तसे पॅरिस आणि आता हाँगकाँगलाही डिस्ने च्या प्रतिकृती झाल्या आहेत.) तेव्हा तोक्योला गेल्यावर डिस्नेलँडला भेट देणे अपरिहार्य होते. येथे डिस्नेलँड आणि डिस्नेसी अशी दोन आकर्षणे आहेत. डिस्नेसीमध्ये मुख्यत्त्वे जलखेळांची मजा लुटता येते पण आमच्याकडे असलेल्या वेळात दोहोपैकी एकच कसेबसे बसवणे शक्य होते म्हणून मग सर्वानुमते आम्ही डिस्नेलँडची निवड केली. आत शिरताच दिसतात वॉल्ट डिस्ने आणि मिकीमाउसचा भव्य पुतळे आणि लक्षात येतं आपण आलो आहोत भूलभुल्लेयाच्या नगरीत! साठीत असूनही ताजं टवटवीत असलेलं,हसणारं , हसवणारं, आपलं वय विसरुन लहान होऊन बागडायला लावणारं हे कार्टून्स जगत् इथे साक्षात अवतरलेलं आहे. सन १९५४ मध्ये वॉल्ट डिस्नेने ऍनिमेटेड कार्टूनच्या स्वरुपात ऍलिस इन वंडरलँड सादर केले आणि १७ जुलै १९५५ रोजी कॅलिफोर्नियामध्ये डिस्नेलँडचा जन्म झाला. पुढे १९८३ च्या एप्रिल महिन्यात तोक्योजवळच्या उरायासु शिबा येथे त्याच धर्तीवर ही नगरी बांधण्यात आली. शेजारचे डिस्नेसी मात्र २००१ च्या सप्टेंबरात बांधले. अशी माहिती जापानी इंग्रजीत गोळा करत प्रवेशदाराशी आपलं वय ठेवून आम्ही आत शिरलो. हीऽ गर्दी.. पण ती गर्दी पोटात घेणारी भरपूर मोठ्ठी जागा आहे. कोणी घोड्यांवर स्वार झाले होते तर कोणाचं कार रेसिंग चाललेलं होतं,विमानातून कोणी भरार्या घेतं होते तर कोणी कार्टून शो पाहत होते.
आम्हालाही हे सगळं एकदम करावसं वाटू लागलं. तेवढ्यात एका फुलराणीसदृश्य गाडी सिटी बजाने लगी, हमे बुलाने लगी.
'वेस्टर्न रिव्हर रेल लँड' असं लांबलचक नाव घेतलेली ती चिमुकली फुलराणी आम्हाला सैर घडवू लागली. अमेरिकेतलं जुनं वन्य जीवन,तेथले अदिवासी रेड इंडियन्स, पक्षी,सांबरं .. सारं काही इतकं जिवंतपणे उभं केलं आहे की थक्क व्हायला होतं.मार्क ट्वेनच्या बोटीतूनही अशीच सफर घडते बरं.
स्प्लॅश माउंटनच्या बोटीतून फिरताना छोटे छोटे समुद्री प्राणी,बेडूक,साप,मासे पाहत असतानाच मध्येच अचानक आपल्या अंगावर येऊन घाबरवणारे,दचकवणारे अगदी खर्यासारखे दिसणारे खोटे डायनॉसोर्स आणि त्या दचकलेल्या अवस्थेत भीतीनं गारठत असतानाच आपण वेगाने जात ४०,५० फूटांवरुन आपल्या बोटीसकट खोल पाण्यात पडतो आणि पडता पडता एका लपवलेल्या कॅमेर्यात आपली भीती क्लिक केली जाते. राइड घेऊन बाहेर आल्यावर बाहेरच्या फलकावर लावलेला तो आपला फोटो पाहून परत एकदा आपला चेहरा फोटू काढण्यालायक होतो.
बिग थंडर माऊंटन हे नाव वाचूनच काहीतरी थरारक दिसतय असं एकमेकांना सांगत रांगेत उभे राहिलो. एका उघड्या टपाच्या रेलगाडीत आपल्याला बसवतात आणि गाडी सुसाटते की.. वेडीवाकडी वळणे घेत,उंचसखल धक्के देत ही बया अचानक एका मोठ्या बोगद्यात जाते. अंधारात उंच चढते आणि धप्पाकन खाली येते. खाली येताना पोटात गोळा असतो पण मनात मात्र थरार! आणखी एक थरार अनुभवायला स्पेस माउंटन मध्ये गेलो.परत एकदा उघड्या टपाच्या यानात बसून साधारण वेगाने तारांगणातून जाऊ लागलो.शनिची कडी,लालभडक मंगळ,तेजस्वी शुक्र तर धूमकेतूची शेपटी पाहत एकमेकांना ते नवल दाखवत चाललेली असते गाडी. एकदम एक उल्कापात होताना दिसतो आणि यान सुसाटतं की. अतिभयंकर वेगाने,वेडीवाकडी,उंचसखल वळणे घेत जाऊ लागतं. त्या वेगाची काही जणांना झिंग चढते तर काही भीतीने अर्धमेले होतात. मात्र ह्या सर्व खेळ्यांची सुरक्षितता चाचणी घेतलेली असते आणि हृद्रोगी,उच्चरक्तदाबाने पिडीत मंडळी,गर्भवती स्त्रिया आणि ३ वर्षाखालील बच्चेकंपनीला ह्या खेळांना प्रवेश नसतो. प्रत्येकाला आपण काहीतरी साहस करावं अशी सुप्त इच्छा असतेच आणि त्याला वाट मिळावी म्हणून ह्या असल्या रोलरकोस्टर खेळांच प्रयोजन असावं काय? असं वाटून गेलं.
पण डिस्नेनगरीत फक्त साहसी खेळच नाहीत तर ह्या टून टाउन मध्ये मिकी आणि मिनीची घरं आहेत. तेथे आपण पाहुणे म्हणून जातो,त्यांच्या घरात हिंडतो.बागेतली भाजी,फुलं ,फळं पाहतो.डोनाल्डडकचा तो प्रसिध्द पेंटब्रश,ते मिनी थिएटर, स्वयंपाकघर, तिथला फ्रिज,वॉशिंग मशिन.. सगळा भातुकलीचा चूलबोळक्यांचा खेळ आठवतो ते पाहताना! लाहान काय मोठ्यांनाही तेथून बाहेर पडावसं वाटत नाही कारण तेच मुळी लहान झालेले असतात. आणि जेव्हा मिकीशी भेट होते,मिकी सगळ्यांशी गप्पा मारतो, फोटो काढू देतो,शूटिंग करतो तेव्हा तर काय.. अजि मी ब्रह्म पाहिले असे भाव डोळ्यात घेऊन ती चिमुकली वावरत असतात.
ऍलिसच्या टीपार्टीच्या खेळात मोठाल्या कपबशांमध्ये आपण बसतो. मध्ये भलीमोठी किटली असते. संगीताच्या तालावर कपबशा गोलगोल फिरू लागल्या की नकळत 'गार्या गार्या भिंगोर्या' म्हणत त्या तालावर फिरण्याचा मोह होतोच.'चिमुकल्या जगात' बोटीने सफर करताना आपण चक्क पर्यांच्या देशात जातो. जगभरातल्या बाहुल्या तेथे नाचत,गात,वाद्य वाजवत, खेळत,झोके घेत बसलेल्या असतात. त्यांच्या सुरात सूर मिसळून,टाळ्या वाजवत बोटीतली सगळी चिमुकली आणि त्यांच्या माताही गाऊ लागतात. ते निष्पाप, सुंदर 'स्मॉल वर्ल्ड' आपलं बोट धरून बालपणात नेऊन सोडतं.
चिमुकले जग (आमचे मित्र तोक्यो डिस्ने मध्ये गेले असता त्यांनी घेतलेली ही चित्रफित)
'छोटा चेतन' मनात जागवत आपण 'हनी आय श्रंक द किडस' च्या ३ डी शोचे चष्मे चढवतो. थोड्याच वेळात खेळ सुरू होतो. पायाला काहीतरी हुळहुळायला लागतं, उंदीर खुर्चीखाली आलेत असे वाटून चटकन पाय वर घेतले जातात. शर्ट,ओढणी कोणीतरी ओढतय असं वाटतं,खुर्ची हादरते, एकदम धूर होऊन सगळे कोंदले जाते,आपल्या अंगावर पाणीसुध्दा पडतो. सिनेमाची गोष्ट पाहता पाहता आपणही त्याचाच एक भाग होऊन जातो.
येथलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे दुपारी ३ वाजता असणारी जादूई मिरवणूक, डिस्ने ऑन परेड! ह्या जादूनगरीतली सगळी मंडळी नटून,थटून,लवाजम्यासकट,वाजतगाजत नाचत,गात आपल्यालाही ठेका धरायला लावत सार्यांच्या भेटीला येतात. मिरवणुकीच्या रस्त्यावर मोक्याच्या जागा पकडून लोकं वाट पाहू लागतात. अनंतचतुर्दशीला जशी मिरवणूकीच्या रस्त्यावर गर्दी होते ना,तशीच गर्दी इथे होते. सार्या राइडस्,सारे खेळ ओस पडतात आणि सारे डिस्नेगाव ह्या रस्त्यावर लोटते. एवढी गर्दी असूनही अतिशय शिस्तबध्दतेने,आरडाओरड,भांडणतंटा न करता सारे परेडची प्रतीक्षा करतात. प्रत्येकाच्या ओठी एकच गाणे असते,डिस्ने ऑन परेड..
त्या विशाल नगरीत सारेच काही पाहता आले नाही. कितीतरी खेळ पहायचे राहिले, कितीतरी थरार अनुभवायला वेळ कमी पडला.पाय दमले होते पण मन मात्र ताजं,टवटवीत होतं आणि लहान मुलाचं आपार कुतुहल काठोकाठ भरलं होतं. "डिस्नेलँडमे रहूँगी मै..घर नही जाऊंगी मै.. " असं वाटत होतं , पण तिथले आनंदक्षण मनात आणि कॅमेर्यात जपून निघावंच लागलं.
प्रतिक्रिया
30 Mar 2009 - 12:24 am | रेवती
डिस्नेलँडची सफर आवडली.
चित्रे पाहून मजा वाटली.
३डी शो आपणही मुलांप्रमाणे एन्जॉय करतो.
नुकताच हा अनुभव छोट्या प्रमाणावर आम्ही घेतला,
हर्शीच्या चॉकलेट फॅक्टरीमधे.
बिगर थंडर माउंटन, मिकी व मिनीच्या घरांचे वर्णन
छान केले आहेस.
रेवती
30 Mar 2009 - 12:33 am | टारझन
स्पष्ट शब्दांत प्रांजळपणे कबुल करतो , स्वाती ताईंच्या णशिबाचा आणि लेखण कौशल्याचा हेवा (जळफळाट का काय ..) वाटतो .. साला .. क्या लाईफ है .. वा वा वा ... मजा आली ..
30 Mar 2009 - 2:50 am | प्राजु
टार्याशी १००% सहमत आहे.
खूपच छान...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Mar 2009 - 3:03 am | मदनबाण
टारझणाशी सहमत... :)
मदनबाण.....
जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...
30 Mar 2009 - 11:58 am | दशानन
खरोखर हेवा वाटतो आहे तुमच्या नशीबाचा ;)
टार्याशी सहमत होण्याचे भाग्य मला मिळाले ह्यात मी आनंदी =))
कुठल्यातरी स्थळाची / प्रवासाची माहीत कशी द्यावी ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुमची लेख माला !
सुंदर.
30 Mar 2009 - 5:43 am | ऋषिकेश
मिकी!!.. जगातील सुप्रसिद्ध दोन पायांचा उंदीर! याने भल्याभल्यांना भुरळ घातली आहे तेथे आपल्यासारख्यांची काय कथा. मला तर मिकी हा बाल्याच्या आनंदाला रिप्रेझेंट करणारा मॅस्कॉट वाटतो (विंग्रजी शब्दांबद्दल क्षमस्व).. निरागस, खोडकर, तितकाच खट्याळ.
त्याला स्वतःचा असा एक आनंददायी स्वभाव असल्याने तो केवळ कार्टुन कॅरेक्टर न राहता सतत मुलांशी रोज हितगुज करणारा त्यांचा मित्र बनतो.
असो.. अश्या मिकीच्या नगरीची सफर करु तितकी कमीच आहे. इथे त्याची झलक दाखवल्याबद्दल धन्यु!
- ऋषिकेश
30 Mar 2009 - 4:17 pm | शाल्मली
डिस्नेलँडची सफर मस्त होती. चित्रफीतही छान.
तू एखाद्या स्थळाचं किती किती सुंदर वर्णन करू शकतेस असं वाचताना परत एकदा जाणवलं.
तू अशीच ठिकठिकाणी फिरत राहोस.. आणि आम्हाला अशीच छान प्रवासवर्णनं वाचायला मिळोत..:)
--शाल्मली.
31 Mar 2009 - 12:31 am | विसोबा खेचर
नेहमीप्रमाणेच आल्हाददायक चित्रसफर! :)
संग्राह्य लेखमाला..
तात्या.
31 Mar 2009 - 12:38 am | भाग्यश्री
वाह काय सुंदर वर्णन केलंय. परत डिस्नेला जावंसं वाटतंय.. फुल्ल टू मज्जा येते तिथे ! :)
31 Mar 2009 - 11:59 am | सुनील
सुंदर वर्णन आणि फोटो.
कॅलिफोर्नियातील डिस्नेलॅन्ड तब्बल चार वेळा पाहुनही मन भरले नव्हते, त्याची आठवण झाली (होय चार वेळा, एक तर जेमतेम ३५ मिनिटांच्या अंतरावर शिवाय दक्षिण कॅलिफोर्नियाच्या रहिवाशांना तिकिटात सूट, मग कशाला सोडा!).
असो, एक शंका - आता डिस्नेलॅन्ड हे डिस्नेचे असल्यामुळे तिथे डिस्नेचीच कार्टून पात्रे असणार हे उघडच आहे. तरीही, काही जगप्रसिद्ध जपानी कार्टून पात्रे (उदा. मंगा) यांना तिथे काही स्थान आहे का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Mar 2009 - 12:19 pm | केदार_जपान
जपान मधे आलो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा डिस्ने लँड ला गेलो होतो...खुपच छान अनुभव :).. जगातले २ नंबर्चे आहे असे सांगतात..
धम्माल आली होती त्यावेळी...सगळ्यात जास्त मला ते स्प्लॅश माउंटन आवडले होते..५ वेळा बसलो होतो मी त्यात ;)
आणि पाण्यामधे जेव्हा ती बोट पडते, तेव्हा आपला एक फोटुही काढतात्...त्यावेळचे जे एक्स्प्रेशन्स येतात केवळ ते भन्नाट्च!!
-------------------
केदार जोशी
1 Apr 2009 - 10:10 pm | क्रान्ति
प्रत्यक्ष नाही तरी या प्रवासवर्णनाच्या आणि फोटोच्या माध्यमातून आमचीही मस्त सफर झाली स्वातिताई! खरच, इतकं सुरेख वर्णन केलय तुम्ही! अशीच आम्हाला वर्ल्ड टूर घडवत रहा आणि घरबसल्या आम्ही ती एन्जॉय करू!
न्ति {मी शतजन्मी मीरा!}
2 Apr 2009 - 11:17 am | स्वाती दिनेश
सर्वांना मनापासून धन्यवाद.
सुनील भाऊ, जपानचे डिस्ने अमेरिकेच्या डिस्नेचा रेप्लिका आहे त्यामुळे तेथे जपानी कार्टून नाहीत पण इतर ऍम्युझमेंट पार्क मध्ये (उदा- मियामी कोबे) जपानी कार्टून्स आहेत.
स्वाती
3 Apr 2009 - 12:35 pm | सुधीर कांदळकर
चित्रदर्शी, प्रवाही वर्णनाला सुंदर चित्रांची जोड. सुरेख.
धन्यवाद.
सुधीर कांदळकर.
3 Apr 2009 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रदर्शी, प्रवाही वर्णनाला सुंदर चित्रांची जोड. सुरेख.
नेहमीप्रमाणेच सुंदर सफर !!!
3 Apr 2009 - 7:41 pm | गणा मास्तर
स्वाती हेवा वाटतो तुझा....
माझ्या स्टेशनपासुन तिसरे स्टेशन उरायासु स्टेशन. एक वर्ष झालं इथ राहुन पण डिस्नेला जायला जमलं नाही.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
3 Apr 2009 - 10:34 pm | शितल
स्वातीताई,
सफत मस्त घडवुन आणलीस.
फोटो ही मस्त घेतले आहेस. :)
19 Apr 2010 - 6:26 am | अम्रुताविश्वेश
मी पण ह्या डिस्नेलैन्ड ला गेले आहे. पुन्हा एकदा सफर घडवल्या बद्दल धन्यवाद! :)