शेअर बाजारात फेरफटका.

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
2 Apr 2008 - 10:33 am

राम राम मंडळी,

नाना चेंगट, शरूबाबा यांच्याप्रमाणे आज जरा आम्हालाही शेअर बाजारात फेरफटका मारायचा मूड आला म्हणून हे चार शब्द!

तांत्रिक विश्लेषण -

कालचा बंद १५६००.

वरची पातळी साधारण १८२०० च्या आसपास आणि खाली साधारण पहिली पातळी १५३०० (कालच्या बंदच्या जवळ) व दुसरी १४७०० च्या आसपास निर्देशांक फिरतो आहे असे दिसते. ही रेंज गेल्या महिन्या सव्वा महिन्यांच्या कालावधीतील आहे. म्हणजे साधारण ३२०० ची उलथापालथ! बाजाराच्या दृष्टीने महिन्याभराच्या कालावधीत ३२०० अंकांची उलथापालथ ठीक नव्हे!

मंडळी, आजचा १५६०० निर्देशांक पाहता, इथून फक्त १८०० अंक दूर असलेली दिनांक १७ ऑगस्ट २००७ रोजीची १३७८० ही पातळी तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने मला महत्वाची वाटते. १३७८० या पातळीवरून बाजाराने खूप मोठी झेप घेतली आणि या दिवसापासून बाजाराने पुन्हा कधीही मागे वळून हा आकडा बघितला नाही आणि दिनांक १० जानेवारी २००८ रोजी थेट २१२०० ची पातळी गाठली! म्हणजे साधारणत: ५ महिन्यांच्या कालावधीत ७२०० अंकांची भयानक तेजी!

या कालावधीतील माझ्या सर्व प्रतिसादांत, 'हे जे काही चाललं आहे ते मला कळत नाही, मी बाजारापासून सध्या दूर कोपर्‍यात हातात पैशे घेऊन चुपचाप बसलो आहे' असंच म्हटलं आहे. तेव्हा अगदी मोजक्याच १० ते १२ कंपन्या माझ्या मते पैसे गुंतवण्यालायक होत्या. शेवटी व्हायचं तेच झालं आणि ५ महिन्यात ७२०० अंक चढलेला निर्देशांक पुढे अवघ्या सव्वा दोन महिन्यांत (१० जानेवारी ते १८ मार्च) २१२०० च्या उच्चांकावरून सणसणीत ६५०० अंकांनी आपटला व दिनांक १८ मार्च रोजी १४७०० ला बंद झाला! आणि आज तो १५६०० इतका आहे.

म्हणजे आता बघा हां मंडळी गंमत कशी आहे ती!

दिनांक - १७ ऑगस्ट २००७ - १३७८०.
दिनांक - ०१ एप्रिल २००८ १५६००.

म्हणजे वरील साडे सात महिन्यांच्या कालावधीतील खरी तेजी ही फक्त १५६०० वजा १३७८० = १८२० अंकांची आहे आणि ह्या तेजीला अधिक रिऍलिस्टिक म्हणता येईल! आणि म्हणूनच मी ५ महिन्यांतील ७२०० अंकांच्या तेजीला "भयानक तेजी" असे शब्द वापरले आहेत!

काय मंडळी, मी म्हणतोय ते पटतंय का? पटलं तर घ्या, नायतर द्या सोडून!

सांगायचा मुद्दा इतकाच की कंपन्यांची नेहमी फंडामेन्टल तब्येत तपासूनच पैसे गुंतवावेत. उदाहरणार्थ, प्रति समभाग उत्पन्न, किंमत/मिळकत गुणोत्तर, लाभांश, वार्षिक आणि तिमाही नफ्यांचे आकडे इत्यादी निकषात जर कंपनी बसत असेल तरच पैसे गुंतवावेत अन्यथा गुंतवू नयेत! माझ्या निरिक्षणानुसार २१२०० च्या पातळीवर बाजारातील जवळ जवळ ९० टक्के समभाग हे यापैकी 'किंमत/मिळकत गुणोत्तर' या निकषात बसत नव्हते आणि त्याच वेळेस नेमके सगळेजण आता बाजार २४००० जाणार, २५००० जाणार असे मांडे खात बाजारात पैसे गुंतवत होते. शेवटी व्हायचं तेच झालं!

असो..

तांत्रिक दृष्ट्या बोलायचं झालं तर वर म्हटल्याप्रमाणे १७ ऑगस्ट २००७ ची १३७८० ही पातळी आणि अलिकडच्या काळातील २७ फेब्रुवारीची १८१०० ही पातळी, या दोन्ही पातळ्यांचं आता निरिक्षण करावं लागेल. त्यानंतर भले तेजी आली तरी १८१०० हा पहिला महत्वाचा टप्पा मानावा लागेल, त्यानंतर पूर्वीचा १० जानेवारीचा २१२०० चा दुसरा टप्पा,

आणि त्यानंतर मग काय बघायलाच नको, २५००० काय अन् ३०००० काय! मज्जाच मज्जा! :)**

माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी सध्या माझ्याकरता आणि माझ्या अशिलांकरता हळूहळू खरेदी करत आहे. कारण आत्ता नेमक्या बर्‍याचश्या कंपन्या वरील सर्व निकषांत बसत असून येत्या एक ते तीन वर्षांचा कालावधी गृहीत धरल्यास ह्या कंपन्या अतिशय चांगला परतावा देतील असं माझा अनुभव सांगतो..! आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून घ्या! पुढे मग २५००० ला किंवा ३०००० हजाराला गाडीत पुन्हा बरीच गर्दी होईल आणि मग दारात लोंबकाळत उभं रहावं लागेल! शिवाय डोकं बाहेर असल्यामुळे बाहेरच्या खांबाला डोकं आपटून धावत्या गाडीतून खाली पडण्याची भिती! :))

काय मंडळी, पटतंय का माझं म्हणणं?!

नजिकच्या काळातले काही मुद्दे -

१) आता येत्या महिन्याभरात सर्व कंपन्यांचे वार्षिक निकाल जाहीर होतील. ते आकडे काय आहेत, कसे आहेत ते पाहिले पाहिजे. कुठल्या कंपनीनी कशी प्रगती केली आहे हे पाहून मी खास मिपाच्या सदस्यांकरता खरेदीयोग्य कंपन्यांची काही नांवे सुचवीन. बाजाराच्या भाषेत सांगायचं तर "माल लेके बैठ जाओ!" :))

मला पोष्टकार्ड पाठवून, विचारणा करून माझी सशुल्क सेवा घ्यायलाही हरकत नाही. अहो एका मराठी माणसाला तरी चार पैशे मिळतील! :)

२) मान्सून.

३) सरकार - बाजाराच्या दृष्टीने मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांचा उपयोग आता संपलेला आहे. कारण त्यांच्या सरकारने शेवटचे पाचवे बजेट जाहीर केले आहे. तेव्हा आता येणारे सरकार कसे आहे, यावर पुढची लॉग टर्म तेजी बरीचशी अवलंबून आहे असं मला वाटतं! येणारं सरकार कसं आहे? स्पष्ट बहुमतातलं आहे की मिलिजुली सरकार आहे? की निवडणुकांचा निकाल त्रिशंकू लागतो, इत्यादी अनेक गोष्टींचा विचार बाजार करेल!

असो, मी काही कुणी ज्ञानी/तज्ञ नाही, तेव्हा आता निर्देशांक २४ हजार जाईल, २५ हजार जाईल असं अंतर्ज्ञानही मला नाही! अर्थात तो जाऊही शकतो आणि गेला तर माझ्याकरता आणि माझ्या अशिलांकरता ते चांगलंच आहे! कारण मी तरी येत्या ३ वर्षांचा कालावधी गृहीत धरून खरेदी सुरू केली आहे!

आपला,
(मुंबईतले बरेचसे बाजार हिंडून अखेर शेअर बाजारात स्थिरावलेला!)

-- तात्या अभ्यंकर.
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

अर्थव्यवहारगुंतवणूकमतसंदर्भप्रश्नोत्तरेमाहिती

प्रतिक्रिया

माझी दुनिया's picture

2 Apr 2008 - 11:15 am | माझी दुनिया

सांगायचा मुद्दा इतकाच की कंपन्यांची नेहमी फंडामेन्टल तब्येत तपासूनच पैसे गुंतवावेत. उदाहरणार्थ, प्रति समभाग उत्पन्न, किंमत/मिळकत गुणोत्तर, लाभांश, वार्षिक आणि तिमाही नफ्यांचे आकडे इत्यादी निकषात जर कंपनी बसत असेल तरच पैसे गुंतवावेत अन्यथा गुंतवू नयेत!

हे निकष कुठे, कसे तपासता येतील ? म्हणजे कंपन्या शॉर्टलिस्ट करण्याकरता नेमके निकष काय असावेत (फंडामेन्टल्स) हे जरा विषद करून सांगा ना तात्या ! थोडक्यात या वर उल्लेखलेल्या गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट केलात तर शेअरबाजारात लुडबुडणा-या समस्त मिसळपावकरांना मौलिक मार्गदर्शन होईल.

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

श्रेया,

http://www.religareonline.com/ या संकेतस्थळावर तुम्हाला प्रत्येक कंपनीची वरील सर्व आणि इतरही अनेक माहिती पहावयास मिळेल... खास करुन प्रत्येक वर्षाचा नफा येथे दिलेला आहे त्यामुळे निर्णय घेणे सोपे आहे.....

(शेअर्स खरेदी विक्री प्रेमी)सागर

अवलिया's picture

2 Apr 2008 - 11:22 am | अवलिया

बरोबर आहे तात्या तुमचे विश्लेषण
पण.....

साला हा पण फार वाईट आहे हो...

मे महिन्यापर्यंत अजुन दोलायमानच राहील.
कदाचित अमेरिकेत बैंकाचे राष्ट्रीयीकरण करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल
पण २००५ च्या घरांच्या किंमती आज २०-४० टक्के उतरल्याने सगळा घोळ झालेला आहे तो अनेकांना कफल्लक करुनच शांत होईल

साला भारतात पण स्थावर बाजार असाच गडगडेल काय असे वाटत आहे...
तसे झाले तर हे राम

(किंमती कमी झाल्यावर स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पहाणारा) नाना

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2008 - 8:14 am | पिवळा डांबिस

तुम्हाला खरंच वाटते की अमेरिकेत बॅकांचे राष्ट्रियीकरण होईल?
तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर तुम्हाला काही अधिक माहिती आहे जे आम्हाला इथे अमेरिकेत राहूनही माहिती नाही. कृपया अधिक स्पष्टीकरण कराल काय?

अवलिया's picture

3 Apr 2008 - 6:24 pm | अवलिया

जे आम्हाला इथे अमेरिकेत राहूनही माहिती नाही

अमेरिकेत रहाणे म्हणजे सगळे माहित असणे असे नाही

काळ उत्तर देइल

विसुनाना's picture

2 Apr 2008 - 12:37 pm | विसुनाना

निर्देशांक इतका वर पोचेल असे तुम्हाला खरोखरच वाटते का?
गेलाच तर त्याला किती काळ लागेल?

सहज's picture

2 Apr 2008 - 12:55 pm | सहज

समभाग बाजाराबद्दल आवर्जुन लेख लिहल्याबद्दल धन्यवाद.

>>तेव्हा अगदी मोजक्याच १० ते १२ कंपन्या माझ्या मते पैसे गुंतवण्यालायक होत्या.......कारण आत्ता नेमक्या बर्‍याचश्या कंपन्या वरील सर्व निकषांत बसत असून ....आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून रहा! ...

जरा ह्या मोकळ्या गाड्यांचे नंबर द्या की..[निशुल्क] अगदी १२ च्या १२ नको ४ ते ५ सांगा. :-)

शरुबाबा's picture

2 Apr 2008 - 1:15 pm | शरुबाबा

समभाग बाजाराबद्दल आवर्जुन लेख लिहल्याबद्दल धन्यवाद.

तात्यासाहेब , सहाव्या वेतन आयोगामुळे जे भाडवल बाजारात येइल त्यामुळे काहि फरक होईल का .

विसोबा खेचर's picture

2 Apr 2008 - 1:27 pm | विसोबा खेचर

आणि त्यानंतर मग काय बघायलाच नको, २५००० काय अन् ३०००० काय! मज्जाच मज्जा! :)**

**हे वाक्य उपहासाने लिहिले आहे! :)

जन्म, मृत्यू आणि शेअरबाजार या तीन गोष्टींची निश्चितता कुणीही सांगू शकत नाही! :)

विसुनाना's picture

2 Apr 2008 - 2:17 pm | विसुनाना

>>आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून घ्या! पुढे मग २५००० ला किंवा ३०००० हजाराला गाडीत पुन्हा बरीच गर्दी होईल आणि मग दारात लोंबकाळत उभं रहावं लागेल!
हे वाचल्यामुळे २५०००-३०००० शक्य आहे असे तुम्ही म्हणताहात असा (गैर) समज झाला होता.

शरुबाबा's picture

2 Apr 2008 - 6:17 pm | शरुबाबा

तात्यासाहेब , आजच्या पोझिशन मधे रिलायन्स पावर खरेदि फायदेशिर आहे का

डॉ.प्रसाद दाढे's picture

2 Apr 2008 - 10:17 pm | डॉ.प्रसाद दाढे

सहावा वेतन आयोग राज्यसरकार कधी राबवेल??

ajitpimputkar's picture

3 Apr 2008 - 8:31 am | ajitpimputkar

sir
pl send email to on
ajitpimputkar@yahoo.com
for paid service
any book recommandation for p/e ratio or othrt ratio anayalasis

thank you

ajit

सागर's picture

3 Apr 2008 - 8:08 pm | सागर

तात्या,

एकदम मस्त लेख लिहिलेला आहे. शेअरबाजारात कोठेही गुंतवणूक करुन मोठ्या कमाईचे स्वप्न पाहणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम तुमच्या लेखाने केले आहे यात शंका नाही....
लवकरच तुमचे फेवरेट समभाग आम्हाला सांगा, म्हणजे तुमच्याबरोबर आम्हालाही वाहत्या गंगेत स्नान केल्याचे पुण्य मिळेल

(लोभी? असे समजू नका...)सागर