ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.
परवशता पाश दैवे... भाग १ , भाग २ , भाग ३
*************
किती वेळ गाडी धावत होती कोणास ठाऊक. गाडी सरळ एका रेषेत भरधाव चालली होती. पण अचानक गाडीचा वेग बराच मंदावला, गाडीने एक वळण घेतले आणि याची तंद्री भंगली. अंग आंबून गेलं होतं. दोन्ही बाजूला माडाची झाडं दिसत होती. आणि त्या झाडांच्या गर्दीतून निळ्या पाण्यावर नाचणार्या शुभ्र फेसाळ लाटा दिसायला लागल्या होत्या. अटलांटिकचे पहिले दर्शन सुखावून गेले. एकदम पिक्चर पर्फेक्ट. आपण कुठे चाललो आहोत याचे पूर्ण विस्मरण झालेले. गाडी तशीच एका गावात शिरली. गाव अगदी आपल्या गोव्यात असल्यासारखे. माणसांचे दिसणे सोडले तर अगदी गोव्यात असल्याची अनुभूती. कोळ्यांची वस्ती प्रामुख्याने असल्याच्या खुणा आणि वास, अगदी जागोजागी.
गावातून जाताजाता गाडीने एकदम एक वळण घेतले, अगदी छोट्याशा खाडीवरचा चिमुकला पूल ओलांडला आणि धाडकन समोर एक महाकाय, प्रचंड पांढरी इमारत उभी राहिली. बघणार्याला दडपून टाकेल अशी....
"हिअर वुई आर!!! एल्मिना कॅसल!!!" ड्रायव्हर म्हणाला. एका मोठ्या मैदानात गाडी उभी राहिली आणि सगळे बाहेर पडले.
एल्मिना (एल मिना, El Mina in Portuguese language) ... मानवी इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट आणि महत्वाच्या कालखंडाचा मूक साक्षीदार. अगदी भव्य अशी पांढरी, लालसर कौलं असलेली, अगदी युरोपियन वळणाची इमारत.
पंधराव्या शतकाच्या मध्यावर, उत्तर अटलांटिक महासागरात पोर्तुगिज दर्याचे राजे होते. बलाढ्य आरमाराच्या आणि नौकानयनाच्या वारशाच्या जोरावर ते जग पादाक्रांत करायला नुकतेच बाहेर पडत होते. आफ्रिका आणि भारतातून निघणारा सोन्याचा धूर त्यांना खुणावत होता. धर्मप्रसाराचं अधिकृत आणि पवित्र कर्तव्यही अंगावर होतंच. आफ्रिकेच्या किनार्या-किनार्याने त्यांची समुद्री भटकंती चालू होती. अशातच त्यांची जहाजं आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावर, एल्मिनाच्या जवळपास, साधारण इ.स. १४७१ च्या सुमारास येऊन थडकली. सुरूवातीला बरीच वर्षं जम बसवण्यात आणि स्थानिक लोकांशी मैत्री करण्यात गेला. हळूहळू व्यापार वाढला. कायम स्वरूपी तळ उभारण्याची गरज पडू लागली आणि एल्मिना कॅसल इ.स. १४८२च्या सुमारास बांधून झाला, तो अजून उभा आहे. काळाच्या ओघात मालक बदलले... पोर्तुगिज गेले डच आले, डच गेले इंग्रज आले, आता तर गोरेच गेले आणि स्थानिक लोकांची मालकी आहे... व्यापाराचेही स्वरूप बदलले... सोन्याचे साठे जाऊन माणसांचे साठे आले... तब्बल चारशे वर्षे करोडो अभागी जीव दास्यात ढकलले गेले... सध्या टुरिझम नामक व्यापार जोरात आहे.
एल्मिनाने सगळे बघितले आणि अजूनही शांतपणे उभा आहे... पुढे येणार्या बदलांची वाट बघत.
किल्ल्यामधे शिरण्यासाठी फक्त एकच दार आहे. किल्ल्याच्या चारही बाजूला एका आत एक असे दोन खंदक आहेत. खंदक बरेच खोल आणि भरपूर रूंद आहेत. या खंदकात पाणी सोडलेले असे.
खंदकावरील एकमेव लाकडी पूलाची उघडबंद हालचाल यंत्राच्या सहाय्याने होत असे. पूल बंद झाला की आत शिरणे अशक्य.
आत शिरल्या शिरल्या एक छोटेसे स्वागतकक्ष आहे. माफक किंमतीत सर्व परिसर फिरायचे तिकीट घ्यायचे. सगळा किल्ला हिंडून फिरायला गाईड्स नेमलेले आहेत. हे गाईड्स इतर कोणत्याही ऐतिहासिक स्थळांच्या गाईड्ससारखे एक नंबर बोलबच्चन असतात. पण त्यांच्या बरोबरच आत फिरावे... त्याशिवाय तिथल्या जागांचे वैशिष्ट्य कळत नाही.
आत शिरल्याशिरल्या एक मोकळे पटांगण आहे. पटांगणाच्या चारही बाजूला किल्ल्याच्या इमारती आणि तटबंदी आहे. या पटांगणाच्या एका बाजूला दिसते आहे ती इमारत मुख्य इमारत. तिथे किल्ल्याच्या गव्हर्नराचे कार्यालय आणि खाजगी निवास इत्यादी होते.
पटांगणाचे दुसर्या बाजूने दृष्य. समोर दिसत असलेली इमारत पोर्तुगिज काळात कॅथलिक चर्च होती. पुढे डच आले... ते कट्टर कॅथलिकविरोधी. त्यांनी त्या इमारतीत वाचनालय आणि इतर काही कार्यालये थाटली.
किल्ल्यामधे स्त्री आणि पुरूष बंद्यांसाठी वेगवेगळ्या कोठड्या होत्या. एकावेळी साधारणपणे चारशे ते पाचशे माणसं या कोठड्यातून ठेवली जात.
एका अंधार्या, भुयारासारख्या बोळकांडीतून किल्ल्याची सफर सुरू होते. या वाटेवर मिट्ट काळोख. दिवसाउजेडी सुद्धा काही दिसणार नाही. कॅमेर्याच्या फ्लॅशमुळे उजेड वाटतोय. अन्यथा सगळे अंदाजाने पाऊल टाकत, बिचकत चालले होते.
बायकांसाठीची कोठडी. आणि त्याआधीच्या छायचित्रात त्या कोठडीचे प्रवेशद्वार. या कोठडीत सर्व वयाच्या बायका आणि मुली ठेवलेल्या असत. मोठ्या मुशिलीने साठ सत्तर बायका मावतील, तिथे साधारण दोन-अडिचशे बायका अगदी सहजी कोंडल्या जात!!! कायम अंधार... समुद्राच्या सान्निध्यामुळे दमट खारी हवा... कुबट वास... आजही त्या कोठडीत पाच मिनिटे उभे राहणे मुश्किल होते. कैदी इथे साधारण दीड दोन महिने राहत असत... जहाज येई पर्यंत.
कोठडीतून एवढे एकच दृष्य दिसते.
गाईड विचारतो, "हे काय आहे? कोणी ओळखणार का? प्रयत्न करा." सगळे विचार करत असतात. कोणालाच नीट ओळखता येत नाही. गाईड सांगतो... "मेहेरबान गोर्या लोकांनी आतल्या बायका मरू नयेत म्हणुन बनवलेले हे एक व्हेंटिलेटर आहे. वरची मोकळी हवा खाली कोठडीत यावी म्हणून. फक्त एकच लोचा आहे. हे व्हेंटिलेटर वर दारूगोळा ठेवायच्या खोलीत उघडते. त्यामुळे कायम तिथली दूषित हवा इथे खाली येत असे."
बायकांच्या कोठडीबाहेरचे छोटे पटांगण. मोकळी जागा. रोज संध्याकाळी बायकांना इथे जमवले जात असे. हे छायाचित्र जिथून काढले आहे तिथे गव्हर्नर उभा राहत असे आणि निवड करत असे. मग त्या निवडलेल्या स्त्रीला इतर खास गुलाम बायका छान आंघोळ वगैरे घालून, सजवून गव्हर्नराच्या खोलीत पाठवत असत. औटघटकेची राणी. घटका संपली की राणीची परत दासी.
निवडलेल्या स्त्रीला इतरांपासून वेगळे करून वर न्यायचा मार्ग.
आज हे ऐकायला भयंकर वाटते. पण तेव्हा या अमानुष यातनांमधून सुटायचा हा एकमेव मार्ग असायचा या स्त्रियांसाठी. अशा गोर्या लोकांनी उपभोगलेल्या स्त्रिया जर का गरोदर राहिल्या तर त्यांचे नशिबच पालटून जायचे. अशा गरोदर स्त्रिया वेगळ्या काढून त्यांना गावात दुसरीकडे चांगल्या व्यवस्थेत ठेवत. त्यांच्यासाठी खास सोयी असत. त्यांच्या मुलांना गोरे लोक आपले नाव देत. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण वगैरे मिळत असे. आजही एल्मिना परिसरात डच / इंग्लिश / स्कँडिनेव्हियन आडनावे असलेली आणि रंगाने खूप उजळ असलेली खूप मोठी प्रजा सुखेनैव नांदत आहे.
नाठाळपणा करणार्या बायकांना पायात असे जड लोखंडी गोळे बांधून दिवस दिवस उभे करत असत.
या सगळ्या प्रकारात बरेच बंदी दगावत असत. साहजिकच असा प्रश्न पडतो की ज्या लोकांना विकून पैसा कमवायचा त्यांना असे मारून नुकसानच ना? मग तरीही असे का व्हायचे?
या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत. मुख्य उत्तर हे की या कैद्यांचं मनोधैर्य खच्ची करणे. त्यांच्यामधून बंडाची भावना कायमची हद्दपार करणे, मानसिक दृष्ट्या त्यांना पूर्णपणे निर्बल करणे हा एक फार मोठा महत्वाचा भाग असे. दुसरे असे की, या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेले बंदी अगदी चिवट आणि उत्तम प्रतीचे असत. अशा गुलामांना जास्त भाव येत असे.
या सगळ्या प्रकाराला 'ब्रेकिंग डाऊन' म्हणत. रानटी घोड्यांना माणसाळवायच्या प्रकाराला पण 'ब्रेकिंग डाऊन'च म्हणतात !!!!!
अशा रितीने पूर्णपणे खच्ची झालेले कैदी संपूर्णपणे 'मवाळ' होऊन आता पुढे काय वाढून ठेवले आहे याची वाट बघत शांत बसून असत. एक दिवस जहाज येई. मग लगेच 'सामान' जहाजात भरायची लगबग सुरू होई. या दरवाज्यातून त्यांचा अखेरचा प्रवास सुरू होई... कधीही न परतण्यासाठी. या दरवाजातून गेल्यावर एक खोली आहे. बंदी निमूटपणे एकामागोमाग चालत राहत.
दुसरा दरवाजा. मग अजून एक लहान अंधारी खोली.
तिसरा दरवाजा. मग शेवटची खोली. शेवटचा दरवाजा.
शेवटचा दरवाजा. डोअर ऑफ नो रिटर्न. इथून बंद्यांना लहान होड्यांमधे बसवून जहाजापर्यंत नेले जाई.
इथे येई पर्यंत बहुतेक कैद्यांना आपले भवितव्य समजलेले असे. इथेच त्यांचा आफ्रिकेच्या भूमीला शेवटचा स्पर्श. कित्येकदा आख्खी कुटुंबच्या कुटुंब पकडली गेली असत. इथे शेवटची ताटातूट, शेवटची भेट. या नंतर स्त्रिया आणि पुरूष परत वेगळे वेगळे 'स्टोअर' केले जात जहाजात. आणि मग जहाज अमेरिकेत पोचले की थेट विक्रीच. कायमची ताटातूटच. शिवाय, कित्येक लोकांना जहाज, समुद्र वगैरे माहितच नसत. असे लोक समुद्राच्या इतक्या जवळून दर्शनाने आणि होडीच्या हलण्याने बिथरून जात.
अमेरिका खंडातील कृष्णवर्णिय लोकांच्या दृष्टीने आज या स्थळाला, विशेषत: या शेवटच्या खोलीला एका तिर्थस्थळाचे स्वरूप आले आहे. खास करून या शेवटच्या दालनात वातावरण अगदी गंभीर असते... कोणी फारसे बोलत नाही. सगळेच नि:शब्द असतात. प्रत्येकजण त्या वेळच्या परिस्थितीची कल्पना करायच्या प्रयत्नात असतो. भेट देणारे कृष्णवर्णिय, आपल्या न बघितलेल्या पूर्वजांच्या स्मृतीने, त्यांच्या अनाम वेदनेने व्यथित होऊन रडत असतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करत असतात. फार वेळ उभे राहवत नाही तिथे. खायला उठते... गर्दी असूनही. कधी तिथून बाहेर पडतो असे होते.
या चार खांबांवर धक्का होता... तिथे जहाजं नांगरून पडत. छायाचित्र शेवटच्या दारात उभे राहून काढले आहे. त्या काळी पाणी या दारापर्यंत होते. तिथे बोटीत बसवून बंदी जहाजाकडे रवाना केले जात. गेल्या पाच सहाशे वर्षात समुद्र मागे हटला आहे आणि शेवटच्या दारापासून धक्क्यापर्यंत आता वाळू आहे नुसती.
याच छायाचित्रात अगदी मागे एक जमिनीचा सुळका दिसतो आहे. त्या जमिनीच्या टोकावर केप कोस्ट नावाचा इंग्रजांनी वसवलेला स्लेव्ह कॅसल आहे. डचांची आणि इंग्रजांची जबर दुश्मनी होती इथे.
एकदा इथून बाहेर पडलं की बाकीचा किल्ला अगदी यंत्रवत फिरून होतो. कोणताही संवेदनक्षम माणूस त्या कोठड्या आणि ती शेवटची खोली बघून आल्यावर बाकीचे काही बघण्याच्या अवस्थेत असू शकत नाही. तरीही गाईडच्या मागे मागे फिरतोच हा.
इथे एका गव्हर्नराला पुरले आहे. त्याचा मृत्यू इथेच झाला. त्याच्या स्मरणार्थ लिहिलेला हा लेख. त्यात त्याचे वर्णन 'दयाळू, न्यायी आणि पापभीरू' (काइंड, जस्ट अँड गॉडफिअरिंग) असे केले आहे !!!!!!!!!!!
गव्हर्नराचे निवासस्थान / शयनकक्ष... रंगल्या रात्री अशा...
***
युरोपियन आले. स्थिरस्थावर झाले. त्यांनी हळूहळू व्यापार वाढवला. अगदी माणसांचा व्यापार मांडला. एक नाही दोन नाही... तब्बल चार शतके हा व्यापार अव्याहत चालू होता. हा व्यापार त्रिकोणीय होता. युरोपातून तयार सामान आफ्रिकेत येई. हा फर्स्ट पॅसेज. ते सामान स्थानिक राजे घेत आणि त्याबदल्यात पकडलेले युध्दकैदी आणि पळवून आणलेले इतर बंदी युरोपियनांना देत. हा व्यापार बार्टर पध्दतीचा होता. हे गुलाम मग अमेरिकेत नेले जात असत, या आफ्रिका ते अमेरिका प्रवासाला मिडल पॅसेज म्हणत. गुलामांची विक्री करून त्या जागी वसाहतींमधे तयार झालेला कच्चा माल म्हणजे कापूस आणि साखर इत्यादी युरोपात नेले जात असे. हा फायनल पॅसेज.
सुरूवातीला या सामानाच्या बदल्यात आफ्रिकेतून सोने घेत असत गोरे लोक. पण पुढे अमेरिकेत वसाहती उभ्या राहिल्या. आधी पोर्तुगिज / स्पॅनिश लोकांनी प्रचंड मोठे भूभाग पादाक्रांत केले, मागोमाग इंग्रज आणि फ्रेंच आले. या नवीन वसाहतींमधे कापसाचे, उसाचे मोठमोठे मळे उभे राहिले. त्यासाठी मनुष्यबळ लागायला लागले. सुरूवातीला अमेरिकेतील स्थानिक लोकांना गुलाम बनवून काम करून घेणे सुरू झाले, पण हे स्थानिक लोक अतिश्रमामुळे आणि नवीन आलेल्या रोगराईमुळे लवकरच जवळपास नष्ट झाले. तेव्हा हा आफ्रिकेतून गुलाम आणायचा व्यापार फोफावला. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत हा व्यापार अधिकृतरित्या चालू होता. आधी पोर्तुगिज मग डच आणि नंतर इंग्रजांनी या व्यापारावर वर्चस्व गाजवले. गुलामांचा व्यापार बंद व्हायची दोन मुख्य कारणे सांगितली जातात.
एक, मध्ययुगात युरोपात झालेल्या ज्ञानक्रांती (रेनेसां) मुळे एकोणिसावे शतक उजाडता उजाडता अनेक समाजशास्त्रज्ञांनी / सुधारकांनी, या अमानुष व्यापाराला विरोध सुरू केला. ब्रिटनमधे अॅबॉलिशनची मोठी चळवळ उभी राहिली. दुसरे असे की, याच सुमारास युरोपात झालेल्या औद्योगिक आणि यंत्र क्रांतीमुळे शेती यंत्रांच्या सहाय्याने होऊ लागली. मोठमोठे मळे पिकवण्यासाठी माणसांची तितकीशी गरज नाही राहिली. त्यामुळे गुलामांची मागणी हळूहळू कमी होत गेली. या दोन महत्वाच्या कारणांमुळे हा व्यापार हळूहळू बंद झाला. अर्थात हे सगळे पूर्णपणे बंद होण्यास एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला.
ढोबळमानाने, असा अंदाज केला जातो की एकूण ६ कोटी आफ्रिकन या व्यापाराकरिता पकडले गेले. त्यातले अंदाजे २ करोड लोक जहाजात चाढायच्या आधीच छळामुळे मृत्यू पावले. अंदाजे २ करोड लोक जहाजांवर, मिडल पॅसेज (अवधी साधारण अडिच महिने) मधे, मरण पावले. त्यांचे मृतदेह समुद्रात फेकून देण्यात येत. आणि फक्त २ करोड लोक अमेरिकेत पोचले. या २ करोडमधील एक फार मोठा हिस्सा, एल्मिना आणि केप कोस्ट मधून पाठवला गेला आहे. त्या दृष्टीने या दोन स्थळांचे महत्व जास्त आहे.
अजून एक समजूत अशी की हा व्यापार प्रामुख्याने गोर्या लोकांनी केला. पण वस्तुस्थिती अशी आहे की यात गोर्यांबरोबर स्थानिक काळे लोकही बरोबरीने सहभागी होते. स्थानिक टोळ्यांचे म्होरके / राजे (यांना आज 'चीफ' असे संबोधले जाते.) आपापसात सतत लढत आणि युध्दकैदी गुलाम म्हणून आणत. पुढे हे युध्दकैदी गोर्यांना विकले जाऊ लागले. किंबहुना गोर्यांना विकायला कैदी हवेत म्हणूनच युद्धं व्हायला लागली. त्यात, युरोपियन लोकांनी आफ्रिकेत बंदूक हे एक नवीन शस्त्र आणले. ते स्थानिक चीफ्सना विकले. आज असे म्हणतात की बंदूक हा एक खूप मोठा घटक ठरला या व्यापारात.
खरं तर आफ्रिकेत गुलामगिरीची प्रथा पूर्वापार होती. पण हे गुलाम काही झाले तरी आफ्रिकेत, बहुतेक वेळा आपल्याच गावात किंवा आजूबाजूच्या गावात राहत. त्यांना काही प्राथमिक असे अधिकारही असत. हुशारीच्या जोरावर ते आयुष्यात पुढे येऊ शकत. पण अॅटलांटिक गुलाम व्यापारामुळे हे गुलाम आपल्या भूमीपासून, संस्कृतींपासून, कुटुंबांपासून समूळ 'तुटले'. आणि हेच तुटलेपण हा या व्यापारातील अमानुषपणाचा कळस आहे. थोडक्यात म्हणजे, त्यांचे माणूसपण पूर्णपणे नाकारले गेले आणि त्यांना पशूंच्या पातळीवर आणले गेले.
या व्यापाराचे अनेकविध आणि अतिशय दूरगामी परिणाम आफ्रिकेवरच नव्हे तर आख्ख्या जगावरच झाले.
पहिला परिणाम म्हणजे, आफ्रिकेतून जे लोक गुलाम म्हणून पाठवले गेले ते सगळेच्या सगळे तरूण अथवा वाढत्या वयातली मुलं असे होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर असे लोक बाहेर पाठवले गेले त्यामुळे स्थानिक शेती अथवा उद्योगधंद्यांवर अतोनात वाईट परिणाम झाले. या लोकांत बरेचसे कुशल कारागिर होते, कलाकार होते. हे सगळे थांबलेच.
दुसरे म्हणजे, आफ्रिकेचा हा भाग सोन्यासाठी प्रसिध्द होता. युरोपियनांनी या भागावर कब्जा केला आणि सोने अक्षरशः लुटले. 'बार्टर सिस्टिम' प्रमाणे इतर माल देऊन टनावारी सोने लंपास केले. त्यायोगे तत्कालिन युरोपियन राजसत्ता गब्बर झाल्या. त्यांची अर्थव्यवस्था वाढली. त्या जोरावर जागतिक वसाहतवाद अजून जोमाने फोफावला. आफ्रिकेतले सोने नसते मिळाले तर या राजसत्तांना एवढे वर येणे तितकेसे सोपे गेले नसते. आजही बरेच वेळा आफ्रिकन राजकारणी लोक या दोन्ही नुकसानांची भरपाई प्रगत आणि समृध्द राष्ट्रांनी करावी अशी मागणी करताना दिसतात.
तिसरा परिणाम असा की साधारण गेल्या पाचेकशे वर्षांपासून आफ्रिकेबाहेरच्या जगाला आफ्रिका म्हणजे रानटी, असुसंस्कृत, राक्षसी लोकांचा प्रदेश अशीच ओळख आहे. याला कारणीभूत म्हणजे तत्कालिन प्रगत जगात काळे लोक फक्त गुलामांच्या स्वरूपातच आले होते. त्यामुळे तीच ओळख होती. गोर्या लोकांनी जसजसे जग पादाक्रांत केले त्यांनी त्यांची संस्कृती / विचार / शिक्षणपध्दती सगळीकडे पोचवली. त्यामुळे आपल्यासारख्या आशियाई देशांना प्रामुख्याने आफ्रिका तशीच वाटायला लागली. पण वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. युरोपियन लोकांच्या आगमना पूर्वी आफ्रिकेतही मोठमोठी साम्राज्ये होती. त्यांचे अनुशासन, शासनपध्दती इत्यादी अगदी प्रगत होती. स्थानिक कारागिर होते आणि त्यांच्या कला होत्या. आफ्रिकन्स म्हणजे फक्त रानटी टोळ्या वगैरे समजुती निखालस खोट्या आहेत.
विसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा आफ्रिका हळूहळू पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊ लागली तसतशी या अमानवी व्यापाराबद्दल नुकसानभरपाईची मागणी व्हायला लागली. या व्यापारावर संशोधन होऊ लागले. साहजिकच या व्यापारात गोर्यांच्या बरोबरीने स्थानिक काळ्या लोकांच्या टोळ्यांनी बजावलेली भूमिका उठून दिसायला लागली. या सगळ्याचे प्रायश्चित्त म्हणून आणि जबाबदारीची स्विकृती म्हणून स्थानिक लोकांनी ही पाटी तिथे बसवली आहे.
***
मनोगत
मेन्साह, अगोसी, अनानी, आकोसिवा यांचं पुढे काय झालं?
सोप्पंय हो, इतर करोडो मेन्साह, अगोसी, अनानी आणि आकोसिवा यांचं पुढे जे झालं तेच... एक तर मिडल पॅसेजचा प्रवास सहन न झाल्याने माशांचं खाद्य बनणे किंवा मृत्यूची कृपा होऊन जीवनाच्या शापातून सुटका होई पर्यंत तो शाप भोगत राहणे. तिसरा काही पर्याय नव्हताच. नियतीची पकड चिरेबंदी होती.
या सर्व प्रकारात गुलामांचे माणसातून पशूत रूपांतर केले गेले असे म्हणले जाते, पण मला तर वाटते की माणसातून पशूत रूपांतर खरे तर हा व्यापार करणार्यांचेच झाले होते. अन्यथा खाली जिथे शे-दीडशे माणसे अशी जेरबंद करून ठेवली होती तिथे बरोब्बर त्याच्याचवरच्या खोलीत चर्च बनवून प्रभूची आळवणी करण्याची हिंमत माणुसकी जरातरी शिल्लक असणार्यांची होऊच शकत नाही.
हा सर्व परिसर फिरताना मी सतत अस्वस्थ होतो. लहानपणापासून या विषयावर वाचलेली सगळी माहिती सतत आठवत होती. गाईड कडून नविन तपशिल कळत होते. अस्वस्थतेत भर पडत होती. 'शेवटच्या खोलीत' मात्र क्षणभर डोळे मिटून उभा राहिलो, त्या असंख्य अनाम आत्म्यांना श्रध्दांजली वाहिली. राक्षसी अत्याचारांच्या, जिवंत माणसांना पशूंना डागतात तसे डागण्याच्या कथा ऐकल्या. राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले. तसे नसते तर हा व्यापार शेकडो वर्षे चाललाच नसता. एखाद्या व्यक्तिच्या नृशंसपणामुळे चाललेला प्रकार त्या व्यक्तिनंतर बंद पडेल, पण इथे तसे नाही. देवीच्या पुराणांमधून एक गोष्ट आहे... एक राक्षस असतो, लढाईत त्याच्या रक्ताचे जितके थेंब जमिनीला लागतील तितक्या थेंबांपासून त्याची एक एक प्रतिकृती तयार होते. तसेच, वर्षानुवर्षे... एक गोरा गेला की दुसरा आला असे चक्र चालू राहिले.
साधारणपणे नविन ठिकाण बघितल्यावर जालावर फोटो टाकणे, प्रवासवर्णन वगैरे लिहिणे असे प्रकार आपण करतो. तसं (म्हणजे तेवढंच) खरं तर इथेही करता आलं असतं. पण मला नुसते फोटोच टाकायचे नव्हते तर हा सगळा 'अनुभव'च तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. आणि तुम्हाला वाचताना आलेली अस्वस्थता बरोबर घेऊन फोटो बघितल्याशिवाय तो अनुभव येणार नाही असे वाटल्याने आधीचे दोन भाग टाकले आहेत. त्यात वापरलेली नावं, व्यक्तिरेखा आणि त्यांचे अनुभव काल्पनिक तर नाहीत, पण प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. म्हणूनच सुरूवातीलाच लिहिले आहे की ही कथा नाही.
जाता जाता एवढंच...
सर्वे जना: सुखिनो भवन्तु ... तथास्तु |
सर्वे जना: सुखिनो भवन्तु ... तथास्तु |
सर्वे जना: सुखिनो भवन्तु ... तथास्तु |
ॐ शांति: शांति: शांति: |
प्रतिक्रिया
13 Nov 2009 - 1:37 am | तात्या विंचु
मानसंच मानसाशी असा का वागतात हेच कळत नाही. :-(
13 Nov 2009 - 1:45 am | नाटक्या
फक्त मोठ्याने रडायचा बाकी होतो. संगणकाचा पडदा दिसेनासा झाला तेव्हा लक्षात आले की डोळे भरून आलेत. बराच वेळ काही न बोलता शुन्यात बघत बसून होतो.
बिका साहेब काळजात हात घालून ओढून काढलेत आपण.
असेच लिहीत रहा असा म्हणण्याचा मोह टाळू शकत नाही पण असे लिहू नका.
- नाटक्या
13 Nov 2009 - 1:58 am | चतुरंग
एका ऐतिहासिक घटनाक्रमाचा आणि त्यातल्या एका महत्त्वाच्या स्थळाचा इतका उत्तम शैलीत वेध घेतल्याबद्दल बिपिनदा तुझे प्रथमतः अभिनंदन! मिसळपावच्या साहित्यसंपदेला एक अमूल्य भेट असं मी ह्या लेखमालेचं वर्णन करेन!
एकतर अशा स्थळांच्या भेटीत आपण सुन्न होऊन दु:खी होतो आणि काही दिवसात ते विसरुन जातो पण तू तुझा अनुभव इथे मांडल्यामुळे त्याला सहसंवेदनेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
करोडो अभागी जीवांनी शेकडो वर्षे जे अत्याचार भोगले त्यातून संपूर्ण जागतिक समाजाचा एक मोठा भाग कायमचा बदलून गेला ह्याच्या एवढी भीषण शोकांतिका असूच शकत नाही! ह्यातून आपण काय शिकणार हे प्रत्येकाने आपापल्या मनाशी ताडून ठरवावे असे वाटते.
(अंतर्मुख)चतुरंग
13 Nov 2009 - 4:18 am | प्रभो
एका ऐतिहासिक घटनाक्रमाचा आणि त्यातल्या एका महत्त्वाच्या स्थळाचा इतका उत्तम शैलीत वेध घेतल्याबद्दल बिपिनदा तुझे प्रथमतः अभिनंदन!
बिका, सुंदर लिहिलंयस .....वाचता वाचता वाचणारा मनाने पोहोचतोय तिथे....लेखनासोबत फोटो असल्याने लेखास अजूनच बहार आलीय......लिहित रहा
(वाचक)प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
13 Nov 2009 - 7:02 pm | चित्रा
मिसळपावच्या साहित्यसंपदेला एक अमूल्य भेट असं मी ह्या लेखमालेचं वर्णन करेन!
अगदी बरोबर.
अतिशय हेलावून टाकणारा अनुभव. नुसत्या फोटोंवरून काहीच कळले नसते.
13 Nov 2009 - 2:11 am | अनिल हटेला
नो कॉमेंट्स...
वरील सर्वाशी सहमत...................:-(
बैलोबा चायनीजकर !!!
13 Nov 2009 - 2:23 am | गणपा
बिपिन गुलामांच्या व्यापरा बद्दल खुप वरवरची माहीती होती. हा काळा इतिहास खुप प्रभावी पण मांडला आहेस.
तुझ शब्द सामर्थ्य तर आहेच पण जोडीला प्रकाश चित्रांची संगत असल्याने फार परिणामकारक झालाय संपुर्ण लेख.
हा मिपावरच्या आजवरच्या लेखांमध्ये एक उत्कृष्ट लेख गणला जाईल यात तिळमात्र शंका नाही.
13 Nov 2009 - 2:53 am | शेखर
सहमत....
मिपा सदाबहार राहण्याचे एकमेव कारण म्हणजे तुमच्या सारखे सिद्धहस्त लेखक...
13 Nov 2009 - 3:27 am | निमीत्त मात्र
फोटो आणि माहिती आवडली. हे एल्मिना घाना मधे आहे का?
पूर्वी कुठेतरी वाचलेले हे वर्णन आठवले..
गुलामांना बोटीतुन नेताना कमीत कमी खर्चात जास्तित जास्त नेता यावेत म्हणून जहाजात एकमेकावर रचून नेत असत. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त. एकमेकावर रचलेले मानवी देह सर्व शरीरधर्म तिथेच उरकत असल्याने ते कमी व्हावेत म्हणून अन्नपाणी मिळत नसे. त्यातुन काहीजण तिथेच भुकेने दगावले तरी बाकिचा 'माल' सुखरुप पोहचत असे.
13 Nov 2009 - 3:34 am | स्वाती२
>>हे एल्मिना घाना मधे आहे का?
बरोबर!
13 Nov 2009 - 3:29 am | नंदन
लेखमाला. पहिला आणि शेवटचा भाग विशेष.
-- सहमत आहे, अशी भीषण उदाहरणं मुळापासून हादरवतात.
दुर्दैवाने रेड इंडियन्स असोत वा पश्चिम आफ्रिकेतले हे शोषित देश; गेल्या पाचशे वर्षांत त्यांचं इतकं खच्चीकरण झालं आहे, प्रगतीचे इतके कमी पर्याय उपलब्ध आहेत की अजूनही गाईड बनून आपल्या इतिहासाबद्दल लोकांना माहिती देणे हे काम मोजक्या भरवशाच्या उत्पन्न देणार्या कामांत मोडते.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
13 Nov 2009 - 3:41 am | स्वाती२
बिपिनदा, ' अनुभव' अगदी काळजात रुतला.
13 Nov 2009 - 3:56 am | sujay
नि:शब्द !!!
_/\_
सुजय
13 Nov 2009 - 4:35 am | टुकुल
एकदम सुन्न करनार लेखन.
जस तु अनुभवल तसच लिखाणात उतरवल आहेस. मानल ब्वा !!
--टुकुल
13 Nov 2009 - 6:13 am | प्राजु
अगदी खरंय!!
नुसतेच फोटो टाकून वर्णन लिहिलं असतंस तर भावनांची तितकी तीव्रता जाणवली नसती. पण आधीचे दोन भाग टाकल्यामुळे एकप्रकारे त्या घटनांमध्ये गुंतायला झालं होतं. या भागांत फोटो सहीत वर्णन टाकून तू तुझ्या अनुभवांतून आम्हाला जायला भाग पाडलंस... हे नक्कीच तुझ्या लेखणीचे श्रेय आहे.
जे लिहिलं आहेस ते विलक्षण आहे. या लेख मालेमुळे मिपाला एका वेगळ्याच उंचीवर तू नेऊन ठेवलं आहेस. अभिनंदन!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
13 Nov 2009 - 7:03 am | हर्षद आनंदी
राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले
वाचता वाचता मनाने कधी शेवटच्या खोलीत पोचलो कळलेच नाही. त्या असंख्य पीडीतांना श्रध्दांजली मनोमन वाहिली गेली.
अत्यंत नीच पध्दतीचा व्यापार \ व्यवहार गोर्या माकडांनी मनापासुन केला, त्याचा कुठलाही प्रकारचा पश्चात्ताप ह्यांना झालेला दिसत नाही.
आपल्या भारतात सुध्दा अश्या प्रकारचा व्यापार चांगला फोफावला होता.
बिपिनदा, तोडलंत तुम्ही. तुम्ही ती जागा फक्त प्रेक्षणीय स्थळ म्हणून न बघता, ती जागा जगलात, अनुभवलीत. फार कमी लोकांना हे जमतं.. तुम्हाला सलाम.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
13 Nov 2009 - 7:07 am | सहज
एल मिना चे फक्त फोटो टाकून विशेष परिणाम झाला नसता जितक्या ह्या तीन भागाच्या मालीकेमुळे झाला आहे. आता हे एक साधारण प्रवासवर्णन न रहाता भावविश्व समृद्ध करणारे अनुभववर्णन झाले आहे.
आपले आयुष्य किती सुखी आहे व समाजासाठी आपण अजुन काही तरी भरीव कार्य करावे असे वाटायला लावणारे लेखन.
बिका बोलतात जितके उत्तम, त्यांचे लेखन देखील तितकेच कसदार. खरोखर एक सिद्धहस्त लेखक आहेत.
बिकांशी ओळख असल्याचा आता अतिशय "गर्व" वाटतो आहे :-)
13 Nov 2009 - 4:58 pm | परिकथेतील राजकुमार
आता हे एक साधारण प्रवासवर्णन न रहाता भावविश्व समृद्ध करणारे अनुभववर्णन झाले आहे.
अगदी हेच म्हणतो बिका.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Nov 2009 - 7:14 am | रेवती
दोनवेळा धाग्यावर येऊन प्रतिक्रिया न देताच गेले.
तुझ्याबरोबर वाचकही म्हणून मीही वेदनेच्या प्रांतातून फिरून आले. लेखनशैली अप्रतीम!
तुझ्या लेखनानुसार पहायचे झाले तर 'तुटलेपण', 'नाकारले जाणे '(मानवजातीकडून) हा अमानुषपणाचा कळस होता. जे जहाजातून वाहून नेले गेले ते जर परत मूळ भूमीवर काही काळानंतर आले असते तरी त्यांचा अंत हा ठरलेलाच होता असे वाटले. स्वतःच्याच भूमीत काही काळानंतर बस्तान बसवताना नाकारले जाण्याची प्रथा अजूनही आहे.......वेगळ्याप्रकारे असेल, वेगळ्या नावाने असेल्.....पण आहे..... असे बर्याच वेळा मनात येऊन जाते. त्यासाठी एखाद्या घरकाम करणार्या मोलकरणीचे उदाहरण द्यायची गरज नाही तर घरातील एखादी व्यक्ती नोकरीसाठी परदेशी/परगावी असताना बाकीचे सदस्य त्याच्या/तिच्याशिवाय जगणे शिकतात इतकेच नाही तर अशीही उदाहरणे वाचनात आलेली आहेत की वीसेक वर्षांनी परत आल्यावर घरातून तेव्हढा स्विकार होत नाही आणि ते साहजिक वाटते. मानसिक गुलामी हा विषय अवांतर होइल म्हणून इथेच थांबते.
रेवती
13 Nov 2009 - 8:13 am | घाटावरचे भट
म हा न!!
13 Nov 2009 - 1:35 pm | मदनबाण
एक वेगळीच लेख माला...
पहिला भाग वाचुन मला कथेचा नीट अंदाज आला नव्हता...
असं काही वाचलं की मन अतिशय सुन्न होऊन जातं... :(
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
13 Nov 2009 - 9:44 am | नितीनमहाजन
माणसा कधी होणार तू माणूस??
नितीन
13 Nov 2009 - 9:59 am | निखिल देशपांडे
बिपिनदा लेखमाला विशेष आहे...
राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले. तसे नसते तर हा व्यापार शेकडो वर्षे चाललाच नसता. एखाद्या व्यक्तिच्या नृशंसपणामुळे चाललेला प्रकार त्या व्यक्तिनंतर बंद पडेल
सहमत आहे...
बिका संदर लिहिले आहे... तुमच्या सोबत त्या शेवटच्या खोलीत कधी पोहचलो कळलेच नाही.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
13 Nov 2009 - 10:01 am | बकुळफुले
नि:शब्द ..........
नरेची केला नर किती हीन......
गुलामांचा व्यापार ही अरबांची ची देणगी.
असेच एक वर्णन संभाजीच्या चरित्रात आहे. मराठी तरुणाना गुलाम म्हणून विक्रीसाठी एका जहाजात पकडून ठेवले होते.
संभाजीने त्यांच्या सोडवणुकीसाठी दिलेरखानाकडे दरखास्त केली तेंव्हा त्या सर्व तरुणांचे हात तोडून त्याना स्वतंत्र करण्यात आले
13 Nov 2009 - 10:32 am | वैशाली हसमनीस
वाचून सुन्न व्हायला झाले.'नरेचि केला हीन नरे किती बरे'असेच म्हणावेसे वाटते.
13 Nov 2009 - 11:42 am | विशाल कुलकर्णी
बिकाभौ रडवलत आज . :-(
असाच सुन्न करणारा अनुभव अंदमानचे सेल्युलर जेल पाहताना आला होता. आठ दिवस अंदमान अंदमानमधे होतो कंपनीच्या कामासाठी. शेवटचे तीन दिवस मिळाले होते फिरायला. पण सेल्युलर जेल पाहील्यावर बाकी कुठे फिरायची इच्छाच राहीली नव्हती. :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Nov 2009 - 12:00 pm | सुमीत भातखंडे
प्रतिक्रियेसाठी खरतर शब्द नाहीत.
तरीपण एक अत्युच्च लेखमालेबद्दल तुमचं अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद.
13 Nov 2009 - 12:09 pm | sneharani
खरचं समानुभुतीचा दाखला मिळाला तुमच्या लेखातुन.
असं म्हणतात, एखाद्याच्या वेदना 'समजल्या' की मनात सहानभुती निर्माण होते, अन् त्या वेदना 'जाणवल्या' की समानुभुती.
खरचं, लेखन इतकं प्रभावी झालयं, कशा सहन केल्या असतील त्या मरणाच्या यातना..... साधा विचार आला तरी सुन्न होतं
आधीच्या दोन भागांमुळे लेखमाला जबरदस्त... झाली.
13 Nov 2009 - 12:56 pm | विनायक प्रभू
_\/_
13 Nov 2009 - 1:00 pm | दिपाली पाटिल
काय प्रतिक्रिया द्यायची तेच सुचत नाहीये...ज्या लोकांना पकडून नेलं त्यांना तर अतिशय क्रुर-निष्ठूर जीवन जगावं लागलं पण त्यांच्या मागल्यांचंही तेच झालं... :(
दिपाली :)
13 Nov 2009 - 1:06 pm | टारझन
डेडली !!
13 Nov 2009 - 1:17 pm | यशोधरा
बिपिनदा, अतिशय उत्तम लिहिलं आहेत, पण तितकच सुन्न करणारं हे कथन आहे... वाचणं कठीण होत जात...
13 Nov 2009 - 1:20 pm | दिपक
प्रभावी लिखाण.. सुन्न करणारा अनुभव.
13 Nov 2009 - 1:27 pm | प्रसन्न केसकर
मधे बसल्याचा अनुभव दिलास बिपिनदा. वेगळ्या काळात, वेगळ्या खंडात, वेगळ्या देशात नेऊन आणलंस अन तेव्हाच्या त्या माणसांच्या वेदना काळजाला भिडवल्यास.
_/\_
गुलामी ही नेहमीच वाईट मग ती अफ्रिकेतल्या लोकांची असो वा भारतातली दासी, बटकिणी, कुळंबिणी अश्या नावांनी झाकलेली असो. अन गुलामांच आयुष्यही तसंच - अमानवीय अत्याचारांनी भरलेलं. हे जिणं कुणाच्याही नशीबी कधीही न येवो.
13 Nov 2009 - 2:08 pm | मनिष
अंगावर सरसरून काटा आलाय, आणि डोळे पाणावलेत. बिपिनदा...अनुभव जिवंत करण्याच्या शैलीबद्द्ल तुला सलाम!!!
14 Nov 2009 - 8:02 am | लवंगी
फार प्रभाविपणे मांडलय सारं..
13 Nov 2009 - 2:13 pm | श्रावण मोडक
असे कसे म्हणू? तरीही म्हणतो.
लेखमाला अजून प्रभावी झाली असती का?
अर्थातच, यातच असलेल्या एक प्रकारच्या जंपकट्स तंत्राच्या आधारे ती अजून प्रभावी करता आली असती का?
हे आणि असे प्रश्न ज्या अर्थी डोक्यात निर्माण होताहेत, त्या अर्थी लेखमाला पोचली.
13 Nov 2009 - 3:25 pm | शुभान्कर
हा सर्व परिसर फिरताना मी सतत अस्वस्थ होतो. लहानपणापासून या विषयावर वाचलेली सगळी माहिती सतत आठवत होती. गाईड कडून नविन तपशिल कळत होते. अस्वस्थतेत भर पडत होती. 'शेवटच्या खोलीत' मात्र क्षणभर डोळे मिटून उभा राहिलो, त्या असंख्य अनाम आत्म्यांना श्रध्दांजली वाहिली. राक्षसी अत्याचारांच्या, जिवंत माणसांना पशूंना डागतात तसे डागण्याच्या कथा ऐकल्या. राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले.
नि:शब्द .....
13 Nov 2009 - 3:50 pm | सन्जोप राव
जबरदस्त लेखन....
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
13 Nov 2009 - 4:02 pm | आनंदयात्री
आता काय लिहावे सुचत नाही.
पण आधी दिलेल्या कथांमुळे हे सगळे पोचले.
हे अफ्रिकन्स तिथे अमेरिकेत नंतर कसे एस्टाब्लिश झाले हे वाचायला आवडेल.
13 Nov 2009 - 7:14 pm | झकासराव
काय बोलु? बोलण्यासारख काहि नाहिये भाउ.
:(
13 Nov 2009 - 7:25 pm | पिवळा डांबिस
_/\_
14 Nov 2009 - 6:34 am | प्रियाली
लेखन प्रभावी झाले आहे. आणखी काही लिहावेसे वाटत नाही.
१९ व्या शतकात भारतातूनही वेस्ट इंडिज बेटांपर्यंत भारतीयांना अगदी गुलाम म्हणून नाही पण मजूर म्हणून (म्हणजे तेच ते ) नेण्यात आले होते. हे कार्य डचांचे होते असे वाटते. त्यांच्याविषयी विशेष वाचायला मिळत नाही.
14 Nov 2009 - 9:01 am | क्रान्ति
बिपिनदा, तुझ्या अप्रतिम लेखनशैलीला दंडवत! इतका विलक्षण अनुभव अगदी जीवंत केलास, एकेका पात्रात गुंतून गेलं होतं मन. खरंच नुसतं प्रवासवर्णन किंवा फोटो टाकून हे साधलं नसतं. कमालीचं लिखाण आहे!
क्रान्ति
अग्निसखा
16 Jun 2011 - 7:07 pm | स्मिता.
बाप रे!! काय वाचलं मी हे, असं झालंय. पहिला भाग वाचून काही अंदाजच नाही आला म्हणून पुढे वाचलं तर वाचवतही नव्हतं आणि सोडूनही देता येत नव्हतं.
हे सर्व अंगावर काटा, डोळ्यात पाणी याच्या पलिकडचं आहे. स्वतःच्या शिष्टाचार-सभ्यतेची शेखि मिरवणार्या या गोर्यांना त्यांच्यातच असलेला रानटी पशू कधी दिसलाच नसेल का? :(
बिकांनी असा विषयही इतक्या प्रभावीपणे आणि संयत शब्दात मांडलाय हे विशेष. तिन्ही भाग झपाटल्यासारखे वाचून १० मिनीट शांत बसूनही काही लिहायला शब्दच सुचत नाहित.
16 Jun 2011 - 11:16 pm | आनंदयात्री
पुन्हा वाचले आणि सुन्न पुन्हा झालो ..
17 Jun 2011 - 10:57 am | योगप्रभू
बिका,
तुझ्या लेखनात जबरदस्त ताकद आहे.
लेखणीला शांत बसू देऊ नकोस.
17 Jun 2011 - 11:37 am | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद! धागा अवचित वर आला आणि मी पण त्या आठवणीत हरवलो... परत.
17 Jun 2011 - 11:41 am | अभिज्ञ
अतिशय उत्कृष्ट लिखाण,
अप्रतिम लेखनशैलीला दंडवत.
अभिज्ञ
17 Jun 2011 - 11:53 am | ऋषिकेश
..
....
.............
17 Jun 2011 - 4:15 pm | स्वाती दिनेश
बिपिन, ह्या मालेतला एकही लेख सलग वाचू शकले नाही, वाचवलेच नाही,
किती भयानक, पाशवी प्रवृत्ती होत्या याची कल्पनाच करवत नाही, आज धीर करुन सगळे पूर्ण केले आणि काय लिहू? ह्या संभ्रमात सुन्न झाले आहे.
स्वाती
28 Mar 2014 - 12:06 am | सुहास झेले
बिका... __/|\__
प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाय.... :(
28 Mar 2014 - 12:15 am | बॅटमॅन
याबद्दल थोडे वाचले होते पण इतक्या डीटेलवारी अन प्रत्ययकारी रूपात पहिल्यांदा वाचतोय. निव्वळ अप्रतिम :(