"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."
Newt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)
आज हे वरील वाक्य आठवायचे कारण जरा "स्पेश्शल" आहे. ज्या एका जाळ्यात गुंतत तुम्ही आम्ही आज केवळ मराठी संकेतस्थळांपुरतेच नाही तर दिवसातील अनेक गोष्टी करत असतो, त्याच्या शिवाय जगणे अशक्यच, ज्याने जगात वैचारीक मुक्तपणा (freedom)आणला... अशा एका तंत्रज्ञानाचा "औपचारीक" चाळीसावा वाढदिवस आहे. - २९ ऑक्टॉबर १९६९ ला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नियाच्या प्राध्यापक क्लेनरॉक आणि त्यांच्या चमूने स्टॅनफर्ड विद्यालयात एक Advanced Research Projects Agency Network (or ARPANET) नावाचे जाळे वापरून संदेश पाठवायचा प्रयत्न केला. ते लिहीत आणि पाठवत होते शब्दः "login" पण "lo" टंकले आणि संगणक पद्दती कोलमडली (सिस्टीम क्रॅश!). मग परत प्रयत्न केला आणि हुर्रे! "login" हा शब्द इकडून तिकडे पाठवला गेला. नील आर्मस्ट्राँगच्या वाक्यात बदल करून सांगायचे झाले तर "शास्त्रज्ञासाठीचा एक शब्द हा संपूर्ण मानवीसंस्कृतीसाठीचा नवीन अध्यायच काय सारे ज्ञानभांडार होऊन बसला". - इंटरनेटचा उगम या दिवशी झाला असे समजले जाते. त्या वर्षा अखेरीस युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया, सँटाबार्बरा आणि युनिव्हर्सिटी ऑफ उटाह मधे पण हे जाळे पोचले होते.
(साभार)
वर जरी गिन्ग्रिचच्या वाक्यात म्हणले असल्या प्रमाणे नोकरशहा काही संशोधन करत नसली तरी जगातील अनेक शोध हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नोकरशाहीच्या गरजेमुळे लागलेले आहेत. इंटरनेट हा त्याला अपवाद नाही. पन्नासच्या दशकात शीतयुद्धाच्या इरीशिरीत जे काही चांगले(पण) घडले त्यात सोव्हीएटने स्फुटनिक सोडला, त्यामुळे अमेरिकेस खडबडून जाग आली. त्यातून अनेक गोष्टी होत असताना साठच्या दशकाच्या सुरवातीस प्राध्यापक क्लेनरॉक यांनी लष्करीसंशोधनाचा भाग म्हणून एक जाळ्यांचे तंत्रज्ञान (नेटवर्क टेक्नॉलॉजी) कागदावर तयार केली. त्याचेच प्रत्यक्ष रूप हे २९ ऑक्टोबर १९६९ला दिसले. अर्थात त्यानंतर इ-मेल येयला १९७२ उजाडले. पहीली इमेल करणारा आणि पाठवणारा रे टॉमलिन्सन याच्या कळफळकावर @ ही संज्ञा उपल्ब्ध होती म्हणून त्याने ती वापरली आणि इमेल अॅड्रेस तयार झाला...
अर्थात अनेक लष्करी शोधांचे रुपांतर नंतर शांतीमय जीवनासाठीपण होऊ शकते. इंटरनेट हे केवळ शांतीमय जीवनालाच उपयुक्त आहे असे कोणीच म्हणणार नाही, पण आज त्याच्याच मुळे ज्ञानगंगा ही माहीतीच्या रूपाने का होईना सर्वत्र पसरली आहे. लोकशिक्षणापासून ते आपत्कालीन परीस्थितीत लोकसंपर्कापर्यंत, रस्तावर दिशा मिळवायला मदत घेण्यापासून ते वैद्यकीय उपचारांना दिशा देण्यापर्यंत, फोनपासून ते टिव्हीपर्यंत, तसेच समाजकारणापासून ते उद्योगधंदे तसेच राजकारणापर्यंत पसरलेले हे जाळे "हृदयी न ठावला ब्रम्हाकारे" असे झाले आहे. अर्थात तसे जनसामान्यांपर्यंत पोच्ण्याचे जे श्रेय आहे हे राजकीय विरोधक असूनही न्यूट गिन्ग्रीच मनमोकळे पणे देतात ते तत्कालीन काँग्रेसमन आणि नंतरचे उपराष्ट्राध्यक्ष, नोबेल विजेते अॅल गोअर ना. गोअर यांच्या वाक्याचा असंबद्ध संदर्भ लावून त्यांचे राजकीय हसे बुश विरुद्धच्या निवडणूकीत झाले खरे, पण १९७८ साली काँग्रेसमधे असताना अतीजलद दूरसंचार तंत्रज्ञानाचा उपयोग उद्योगधंद्यांची अर्थव्यवस्था तसेच शिक्षणप्रसाराला होवू शकतो असे म्हणत गोअर यांनी सुरवात केली आणि १९९१ साली सिनेटमधे असताना "गोअर बिल" आणले, संमत करून घेतले आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बूश यांनी ते सही करताना, यामुळे अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल होणार आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठा जवळ येणार असे म्हणले आणि तत्कालीन $६०० मिलीयन डॉल्सर्सनी पहीलीवहीले राष्ट्रीय जाळे (National Research and Education Network ) तयार करायला सुरवात केली...
आज आपण सर्वच त्याची फळे चाखत आहोत. गाडीतून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी आलो तर जसे त्यात आपले कर्तुत्व नसते, असले तर फार तर ती गाडी पकडली इतकेच काय ते... तेच कधी कधी इंटरनेटच्या संदर्भात वाटते. आज जगभर अनेक उद्योग नभुतो मोठे झालेत, बिल गेट्स पासून अनेक स्मार्ट धंदेवाईक तयार झालेत, स्टिव्ह जॉब्ज आणि नंतर गुगलने तर जगाला अजूनच पुढे नेले आणि जवळ आणले. ओपनसोअर्स सॉफ्टवेअर्समुळे जाळे स्वस्तही झाले आणि ड्रूपलसारख्या तंत्रज्ञानाने तसेच गमभनसाराख्या प्रणालीने आपण एरव्ही कधी संपर्कात आलो नसतो ते जालाच्या माध्यमातून जवळ आलो. मात्र या अनादी नाही, तरी अनंत प्रवासाच्या एक "औपचारीक" सुरवात ही केवळ "लॉगईन" या एका शब्दाने झाली...
आजची अवस्था बघता हे तंत्रज्ञान उत्तरोत्तर विकसीत होत राहील पण लॉगईन ने आत शिरलेल्या या अलीबाबाच्या गुहेतून आपण मानवी संस्कृती म्हणून किमान नजिकच्या भविष्यात तरी "लॉग आउट" होऊ शकू असे वाटत नाही!
प्रतिक्रिया
29 Oct 2009 - 11:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाहता-पाहता इंटरनेट आज चाळीस वर्षाचे झाले आणि आपण म्हणता तसे उत्तरोत्तर तंत्रज्ञान विकसीत होत राहील. अधिक उण्याची तयारी आपली झाली आहे, त्यामुळे लॉगआउट कधी होईल हे माहित नाही.
सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधे इंटरनेटचे जाळे पसरणार आहे. प्रत्येक गावातील लोकांची माहिती, राहणीमान,सुविधा...या आणि इतर माहिती आता यापुढे अपडेट राहणार आहेत. अधिकाधिक विकासासाठी या सुविधेचा उपयोगही होईल. पण ज्यांच्यामुळे हे होऊ शकले त्यांची आठवण नसेल कदाचित, आपण मात्र ज्ञानगंगेचा मुक्त विस्तार करणार्या मंडळींना धन्यवाद दिले पाहिजे....!
माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी...!
-दिलीप बिरुटे
30 Oct 2009 - 12:13 am | बहुगुणी
सी एन एन च्या संस्थळावर इथे मिळेल.
समांतरः ही मुलाखत वाचतांना एक गोष्ट लक्षात आली: क्लाईनरॉकचं संशोधन प्रसिद्ध झालं तेंव्हा (internet चा पहिला वापर नव्हे, तर त्याचं त्याविषयीचं संशोधन प्रसिद्ध झालं तेंव्हा), म्हणजे जुलै १९६९ मध्ये, दुसरी एक मानवी जग ढवळून काढणारी वैज्ञानिक घटनाही घडली: मानवाचं चंद्रावतरण. त्याच महिन्यात प्रसिद्ध झालेल्या क्लाईनरॉकचं क्रांतीकारक संशोधन मानवी इतिहासावर तितकाच दूरगामी परिणाम करील याची त्यावेळी शास्त्रज्ञांना कल्पना आली असेल का?
बाय द वे, नुकतीच पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या क्लाईनरॉकला 'आता सध्या आपण काय संशोधन करता आहात' असं विचारल्यावर त्याने खालील उत्तर दिलंयः
I'm working on what we call smart spaces, whereby the cyberspace comes out from behind the [computer] screen, where most people consider it residing, and moves out into your physical space so that there will be intelligence and embedded technology in the walls of your room, in your desk, in your fingernails, in your eyeglasses, in your automobile, in your hotel rooms all across the world as you move around.
Science fiction? नक्कीच नसावं.
30 Oct 2009 - 12:49 am | विकास
सीएनएनच्या दुव्याबद्दल धन्यवाद!
बाकी smart spaces हा प्रकार भितीदायक वाटला! आधीच जालामुळे नको इतके वैयक्तिकचे सार्वजनीक होत आहे त्यात असले स्मार्ट स्पेसेस आणणे म्हणजे "डिमॉलीशन मॅन", "मायनॉरीटी रिपोर्ट" अथवा तत्सम चित्रपटांप्रमाणेच जग घडण्याऐवजी बिघडू शकेल असे वाटते... :)
30 Oct 2009 - 4:11 am | विंजिनेर
चार्ली अँड चॉकोलेट फॅक्टरी.... :)
(विली वोंका) विंजिनेर
30 Oct 2009 - 12:43 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री विकास, लेखाबद्दल धन्यवाद. तुमचे 'लॉग इन' आणि आमचे 'लॉग इन' यांच्यात कितीतरी अधिकारांचे अंतर आहे तसेच अर्थांचेही. पण 'लॉग आउट'चा अर्थ एकच.
30 Oct 2009 - 2:16 am | संदीप चित्रे
लेखाबद्दम मनापासून धन्स रे मित्रा.
ह्या लेखा दुवा माझ्या मित्रांनाही पाठवीन.
30 Oct 2009 - 3:55 am | स्वाती२
लेख आवडला
30 Oct 2009 - 3:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
समयोचित लेख आवडला.
(विकास, कदाचित संदर्भ मागितले जातील. तुम्ही इंटरनेटवरून होऊ शकणार्या हल्ल्यासाठी तयार रहावे म्हणून पूर्वसूचना देत आहे.)
अदिती
30 Oct 2009 - 3:56 am | टुकुल
मस्त !!
--टुकुल
30 Oct 2009 - 8:20 am | अवलिया
उत्तम लेख ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Oct 2009 - 8:26 am | मदनबाण
लेख आवडला... :)
मदनबाण.....
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
30 Oct 2009 - 9:07 am | भडकमकर मास्तर
छान लेख..
लोकसत्तामध्य अतुल कहाते याच विषयावर छोटेखानी लेखमाला लिहितात ते लेखही छान असतात, त्यांची या निमित्ताने आठवण झाली...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
30 Oct 2009 - 9:20 am | महेश हतोळकर
छान लेख. परवाच म.टा. मध्ये एक महत्वाची बातमी वाचली. आजच्या सकाळमध्ये पण आली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5167497.cms
(विकासचा लेख - छान लेख हे द्विरुक्तीचे उत्तम उदाहरण आहे.)
30 Oct 2009 - 9:53 am | सुनील
चांगला लेख.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Oct 2009 - 10:22 am | अजय भागवत
विकास, तुमच्या लेखाने काही आठवणी जागृत झाल्या. ज्यांनी बिल गेटचे "स्पीड ऑफ थॉट" हे पुस्तक वाचले असेल त्यांना हा त्या पुस्तकातील प्रसंग आठवेल.
मायक्रोसॉफ्टच्या टेक्नॉलॉजी अग्रक्रमात इंटरनेटला १९९५ पर्यंत स्थान नव्हते. त्यांनी ह्या इंटरनेट टेक्नॉलॉजीला फार काही विषेश नाही असे ठरवून टाकल्यातच जमा होते.
त्यांच्या विचारसरणीत बदल घडला तो एका कर्मचार्याने पाठवलेल्या विरोपाने- त्या विरोपाचा विषय होता- "द स्काय इज फॉलिंग". त्या कर्मचार्याने कॉर्नेल विद्यापीठाला काही कारणाने भेट दिली व पाहिले की, ते संगणकाची अनेक कामे इंटरनेट वापरुन करत आहेत. ते पाहून त्याने परतल्यावर तो प्रसिद्ध विरोप पाठवला. अर्थातच तो विरोप त्याने आपल्या बॉसला पाठवला असेल. पण मायक्रोसॉफ्टच्या कामकाजाच्या वैशिठ्यामुळे तो विरोप मजल-दर्मजल करीत बिल गेट पर्यंत पोहोचला आणि त्याला जाणीव झाली हे नक्कीच "प्रोफॉउंड" आहे. त्याने लगेचच आपल्या बिझनेस प्लान मधे आवश्यक ते बदल करुन इटरनेटला १ अग्रक्र्म दिला व विंडोज ९८ मधे पहिल्यांदा इंटरनेट उपलब्ध झाले.
बिल गेटने हा किस्सा त्याच्या पुस्तकात अशा आशयाने सांगितला आहे की, त्याच्या कंपनीत महत्वाचे असे विरोप खालपासून त्याच्यापासून पोहोचू शकले हेच त्याच्या कंपनीचे वैशिठ्य आहे. अन्यथा हा विरोप जर "ह्या! हे काय काहितरीच" म्हणून रस्त्यातच कुठेतरी नामशेष झाला असता तर मायक्रोसॉफ्टला आज जी आघाडी मिळाली ती मिळाली असती का?
30 Oct 2009 - 8:24 pm | विकास
मायक्रोसॉफ्टच्या टेक्नॉलॉजी अग्रक्रमात इंटरनेटला १९९५ पर्यंत स्थान नव्हते. त्यांनी ह्या इंटरनेट टेक्नॉलॉजीला फार काही विषेश नाही असे ठरवून टाकल्यातच जमा होते.
रोचक माहीती.
या वरून गेल्या आठवड्यात (मला वाटते) बिझनेस वीक मधे वाचलेला एक लेख आठवला. त्यात गुगलला (प्रतिस्पर्धी म्हणून) कोणाकडून काळजी असू शकते यावर लिहीताना लेखकाने लिहीले होते की १९९५ साली बिल गेट्सने एक मोठ्ठा मेमो कर्मचार्यांसाठी लिहीला. कदाचीत त्याचे मूळ तुम्ही सांगितलेल्या गोष्टीत असेल. त्यात त्याने "आपल्याला" कोणापासून धोका आहे हे लिहीताना नॉर्टेल (नेटवर्क्स) आणि नेटस्केप (ब्राउजर) यांच्याकडून असे म्हणले होते. आज ह्या दोन्ही कंपन्या असूननसून सारख्या आहेत. पण खरा प्रतिस्पर्धी गुगल असू शकेल याचा विचारही झाला नाही कारण त्यानंतर तीन वर्षाने गुगल कॅलीफोर्नियातील कुठल्यातरी डॉर्म अथवा कारगराजमधे चालू झाले :)
तात्पर्यः प्रतिस्पर्ध्याचे भय हे माहीत असलेल्यांपेक्षा माहीत नसलेल्यांकडून अधिक असू शकते! :)
30 Oct 2009 - 2:32 pm | अतुलजी
लेख आवडला. :)
30 Oct 2009 - 8:12 pm | विकास
सर्व वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद.
थोडे अधिक (काल एनपीआर वर संध्याकाळी ऐकलेले): "एल ओ" आणि नंतर "लॉग इन" हे शब्द प्रा. क्लेनरॉकच्या २१ वर्षाच्या विद्यार्थ्याने डॉ. चार्ल्स क्लाईन याने वापरले.
पेंटॅगॉन मधील बॉब टेलर नावाच्या शास्त्रज्ञाला देशातील वेगवेगळ्या ठिकाणी संगणकीय संपर्क करण्यासाठी म्हणून तीन वेगवेगळे संगणक वापरावे लागत. त्यातून त्यांनी विविध शास्त्रज्ञांना एकत्र केले ज्यात प्रा. क्लेनरॉकची संकल्पना पुढे आली. ती योग्य वाटल्यानंतर पेंटॅगॉनने आयबीएम आणि एटीअँडटी या दोन मोठ्या कंपन्यांना त्याचा वापर करून "प्रोटोटाईप" बनवायला सांगितले. दोन्ही कंपन्यांनी,"it is useless" म्हणत नकार दिला! मग बीबीएन नामक एका छोट्याशा कंपनीने ते कंत्राट घेतले आणि "इंटरफेस मेसेज प्रोसेसर" ("इम्प") तयार केला जो त्या वेळेस दोन जीमलॉकर्स इतका मोठा होता...
... चार्ल्स क्लाईन या विद्यार्थ्याने "लॉग इन" असे रात्री उशीरा संदेश पाठवण्याचा यशस्वी प्रयोग केल्यावर, बाहेर जाऊन बर्गर खाल्ला आणि बीअर घेतली. मुलाखतकाराने विचारले ती तुझी यश मिळाले म्हणून पार्टी होती का? त्याने उत्तर दिले, नाही भूक लागली म्हणून खाल्ले आणि झोपायला गेलो! (थोडक्यात आपण इतिहास घडवला याची कल्पनाच नव्हती!)...
_____________
आता थोडे गोअर बील च्या अनुषंगाने: गोअर बील मुळे इंटरनेट हे एका अर्थी जागतिक झाले. कोणी असे म्हणेल की त्याने केले नसते तर इतर कोणीतरी केले असते. पण मुद्दा जरा वेगळा आहे. १९८७ ला गोअर डेमोक्रॅटीक प्रायमरी मधे राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मॅसेच्युसेट्सच्या मायकेल ड्युकॅकस विरुद्ध हरला होता. त्यानंतर त्याने सिनेट मधे जाऊन इतर अनेक कामा बरोबर हे "पॅशन" आणि "दूरदृष्टी" ठेवून घडवून आणले....
...आज जॉन मॅकेन हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरल्यावर पण राष्ट्रहीताच्याच गोष्टी करत आहे. तेच क्लिंटन, कार्टरचे निवृत्तीनंतर - बुश (दोन्ही) काही करत नसले तरी "किडे" करताना पण दिसत नाहीत...
कितीही तुलना करायची नाही, म्हणले तरी आपल्याकडील सर्वपक्षीय राजकारण्यांशी अशा वृत्तीची तुलना होतेच... जर पंतप्रधान्/मुख्यमंत्री/मंत्री/सहकारमंडळे यातील पद मिळाले नाही तर पुढील पाच वर्षे स्वत:ला नेते म्हणवून घेणारे स्वतःला आणि जनतेला कुठे नेतात हे पाहून अस्वस्थता येते.
असो.