बांडगूळ – २

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
15 Oct 2009 - 3:26 pm

बांडगुळ - १

दुष्काळाच्या गावी बसलेल्या झळा आणि मुंबईतील वास्तव्यात तुलनेनं आणलेलं सुख यातील नेमका फरक रामचंद्र बोरसे यांच्या ध्यानी यायला वेळ लागला नाही. एकाच राज्यातील ही दोन चित्रं त्यांच्या पटकन ध्यानी आली. गावाकडं दुष्काळामुळं डोक्याला हात लावून बसलेले, पोटात कधी काय जातंय याची प्रतीक्षा करणारे शेतकरी (रामचंद्र बोरसे यांच्या शब्दांत कष्टकरी) आणि त्याचे कुटुंबीय हे चित्र त्यांच्या मनात कोरलं गेलं होतं. मुंबईत त्या चित्राच्या शेजारीच आणखी एक चित्र तयार झालं. नोकरदार मंडळींचं. तुलनेनं समाधानी असणारं. अर्थात, ही सारी या मायापुरीतील पहिलीच प्रतिबिंबं होती. पुढं इतरांच्या मनात अशी अनेक प्रतिबिंबं खुद्द रामचंद्र बोरसे यांना मध्यवर्ती ठेवून उमटणार होती हे त्यावेळी कुणालाही सांगता आलं नसतं इतकं खरं.

आमदार निवासातील पहिला महिना गेला आणि रामचंद्र बोरसे यांच्या एक ध्यानी आलं की, या काळात आपल्याला रोजगार म्हणून काहीही मिळालेला नाही. गावाकडून येताना जे पैसे आणले होते तेही आता संपत आले आहेत आणि पुढं जगायचं असेल तर हात-पाय जोरातच मारावे लागणार आहेत.

"आपल्याकडं आहे ते कौशल्य केवळ लेखन-वाचन इतकंच. डोकं चालतंय, पण ते चालतंय हे दाखवण्याची संधी नाहीये..." स्वतःविषयीच विचार करीत बसलेल्या रामचंद्र बोरसे यांची त्याच मनस्थितीत तेव्हा आमदार असणाऱ्या बाळासाहेब जाधवांशी गाठ पडली ती अपघातानंच. ते त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं दुसरं वळण.

"हे निवेदन आपल्याला काहीही करून इंग्रजीत करून घ्यायचं आहे..." साडेसहाफुटी धिप्पाड असं ते व्यक्तिमत्त्व बरोबरच्या कोणाला तरी सांगत होतं. स्वच्छ पांढरं शुभ्र धोतर, झब्बा, डोक्यावर सरळ रेषेत असणारी गांधी टोपी. कपाळावर उभं गंध.

आमदार निवासाच्या कॅण्टिनमध्ये एका टेबलापाशी सुरू असलेला हा संवाद रामचंद्र बोरसे यांच्या कानी पडला, कारण त्यावेळी ते तेथे सकाळचा चहा घेण्यासाठी आले होते. गेल्या महिन्यात रीतसर नोकरीचे अर्ज वगैरे प्रयत्न करूनही पदरी काहीही येत नसल्याने थोडा वैताग आलेलाच होता. माणसं बऱ्याचदा अथक प्रयत्नांती यश न आल्यानं वैतागतात आणि अशा वैतागात काही तरी धाडस करतात. कधी ते अंगाशी येतं तर कधी फायद्यात पडलं. धाडस अंगाशी आलेली माणसं पुढं किरकिरी होत जातात, तर यशस्वी ठरलेली माणसं बहुतेकदा एखाद्या कळसावर जाऊन पोचतात. रामचंद्र बोरसे यांच्या संदर्भात दुसरा प्रकार झाला.

"मी इंग्रजी लिहू शकतो. तुमचं निवेदन तयार करून देऊ शकतो..." काहीही ओळख-देख न करता रामचंद्र बोरसे यांनी त्या माणसाकडं जाऊन थेट सांगितलं. त्या साडेसहाफुटी धिप्पाड व्यक्तीमत्त्वानं त्यांच्याकडं नजर वळवली तेव्हा यांनीही ताकदीनं त्या नजरेला नजर भिडवली. दहा-पंधरा सेकंदांची ती नजरानजर.

"काय नाव?" साडेसहाफुटी आवाज.

"रामचंद्र बोरसे. धुळ्याकडून आलोय. दुष्काळामुळं घरातून बाहेर पडलो. मॅट्रिक झालो आहे. नोकरीचा शोध सुरू आहे. पण काम होत नाहीये. तोवर आधार हवा आहे." एका दमात त्या व्यक्तीकडून येणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊनच रामचंद्र बोरसे थांबले. ते निश्चितपण त्यावेळी दमले असावेत. एक सुस्कारा हळूच सुटलादेखील.

"इंग्रजी येतं?"

"म्हणूनच म्हटलं की, निवेदन लिहून देईन. येतं मला." हे खरं होतं की रामचंद्र बोरसे यांना इंग्रजी वाक्यं नीट लिहिता यायची. व्याकरणाची चूक होत नसे. पण इंग्रजी येतं असा दावा करण्याइतपत काही ते कौशल्य मानलं जात नसतं हेही खरंच. पण इथं त्यांनी रेटून दिलं.

"कुठं राहतोस?"

रामचंद्र बोरसे यांनी तपशील पुरवला. मग पुढचं सगळं रीतसर झालं. त्या गृहस्थाचं नाव बाळासाहेब जाधव. आमदार. पक्ष अर्थातच कॉंग्रेसच. मातब्बर आसामी. तीन साखर कारखान्यापर्यंत पसरलेली सत्ता. इतर व्यापही मोठा. त्यांनी रामचंद्र बोरसे यांना आपल्या खोलीवर नेलं, निवेदनाचा मसुदा त्यांच्या हाती दिला. रामचंद्र बोरसे यांनी ते इंग्रजीत केलं. अगदी साधंच होतं. मतदार संघात एक मध्यम प्रकल्प होता. त्याच्या कालव्याच्या आखणीबाबतचं पत्र. ते करताना रामचंद्र बोरसे यांच्या तल्लख डोक्यातून किडा चमकून गेला होताच, हे निवेदन इंग्रजीत देण्याचं काहीही कारण नाही, मराठीतच हवं. पण त्यांनी आत्ताच डोकं चालवायचं नाही असं मनाशी ठरवून टाकलं होतं आणि तेच शहाणपणाचं ठरलं हे दुसऱ्या दिवशी त्यांच्या ध्यानी आलं.

"साहेबांनी बोलावलंय..." आदले दिवशी बाळासाहेबांसमवेत असलेला गृहस्थ रामचंद्र बोरसे यांना शोधत होता.

आदल्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला असावा असं समजून रामचंद्र बोरसे गेले.

"कालच्या कामावर आपण खुश आहोत. आपलं असंच काम असतं बरंच. करणार का?" बाळासाहेबांचा प्रश्न. या प्रश्नाचं एकच उत्तर सध्या तरी रामचंद्र बोरसे यांच्याकडं होतं. हो!

"पगार मिळेलच. पण चोवीस तास आपल्याशी बांधिलकी हवी." बाळासाहेबांनी कामाऐवजी व्यवस्थेची चौकट स्पष्ट केली. रामचंद्र बोरसे यांनी पुन्हा मान डोलावली.

दीडशे रुपये दरमहा. आमदार निवासात बाळासाहेबांच्या खोलीतच राहण्याची सोय, फिरती वगैरे करावी लागलीच तर त्यांच्याच गाडीतून. इतकं पुरेसं होतं रामचंद्र बोरसे यांना.

आणि त्यांच्या हातून खऱ्या अर्थानं पहिलं निवेदन गेलं ते कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना. राज्यातील परिस्थिती बिकट कशी आहे आणि ती हाताळण्याची क्षमता नेतृत्त्वात कशी नाही याचे पाढे वाचणारं निवेदन. आदले दिवशी बाळासाहेबांनी करून घेतलेलं कालव्यासंबंधीचं निवेदन एक चाचणी होती. एका सचिवाला ते निवेदन दाखवून त्यातल्या इंग्रजीची बाळासाहेबांनी खातरजमा करून घेतली होती हे पुढं काळाच्या ओघात उघड झालं खरं, पण रामचंद्र बोरसे यांना या दुसऱ्या निवेदनावेळीच ते समजून चुकलं होतं.

बाळासाहेबांनी अचानक उसळी घेण्याचं कारण पुढं स्पष्ट झालं. मुख्यमंत्र्यांच्याविरोधात पक्षांतर्गत लॉबी सक्रिय झाली होती. गाऱ्हाणी नेहमीचीच. दुष्काळामुळं त्यात भर पडली होती इतकंच. त्यामुळे नेतृत्त्वबदल होणार हे स्पष्ट झालं होतं. हीच वेळ होती, मंत्रीपद पदरात पाडून घेण्याची. भूमिका घेण्याची. बाळासाहेबांनी ती घेतली. आधीच्या मंत्रीमंडळात त्यांनी पद नाकारलं होतं, कारण त्यांच्या दुसऱ्या कारखान्याची उभारणी त्यावेळी जोरात सुरू होती आणि तिसऱ्या कारखान्याचा प्रस्ताव मंजुरीच्या वाटेवर होता. आतापर्यंत ही दोन्ही कामं मार्गी लागली होती आणि आता वेळ आली होती काही ठोस करण्याची. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील त्यांचं एक निवेदन तसं पुरेसं होतं हे ठोस काम दाखवण्यासाठी. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकच उमेदवार आणि त्यामुळं तेवढं पत्रच हवं होतं. पाठबळाचा आकडा ठरवणारं पत्र. बाळासाहेबांसोबत सहा आमदार होते.

पक्षाध्यक्षांना निवेदन गेलं. पुढं इतर हालचाली झाल्या, मुख्यमंत्री बदलले, बाळासाहेब नव्या मंत्रिमंडळात महसूल राज्यमंत्री झाले आणि अवघ्या महिन्यापूर्वी एक धाडस करून आमदार निवासाच्या कॅण्टिनमध्ये त्यांच्यासमोर गरजू म्हणून उभ्या राहिलेल्या रामचंद्र बोरसे यांच्या आयुष्यानं तिसरं वळण घेतलं. त्यांना रावसाहेब करणारं वळण ते हेच.
या तीन वळणांपर्यंतचा आपल्या आयुष्याचा रस्ता रावसाहेबांना अगदी स्पष्ट आठवतो. अगदी अर्ध्या रात्रीत त्यांना झोपेतून उठवलं तरी, या वर्णनात फरक पडलेला नाही. या सगळ्या घटना तब्बल बावीस-तेवीस वर्षांपूर्वीच्या. तरीही त्यांना त्या आठवतात. रावसाहेबांच्या संदर्भात केव्हाही कुणालाही ओळख करून दिली जाते ती फक्त त्यांचं बोरविहिरहून धुळेमार्गे मुंबई गाठणं एवढीच. त्यापुढं काही सांगण्याची गरज नसते. कारण तसा हा माणूस म्हणजे 'ऋषी'च. त्याचं हे कूळच एरवी नवख्यांना ठाऊक नसतं. रावसाहेब किंवा आरएस्स हे पुरेसं असतंच ‘मुंबई – ३२’ या इलाख्यात. मग अशा ओळखीतूनच जेव्हा पुढच्या वाटचालीचा प्रश्न येतो तेव्हा रावसाहेब ही वळणं सांगत जातात. वळणं, प्रत्येक वळणामागं असलेली एक निराशा आणि प्रत्येक वळणापर्यंत आपण कसा तग धरला होता या गोष्टी त्या वर्णनात येतातच. समोरच्यावर आवश्यक ती छाप पडते. ती छाप पाडणं हा काही रावसाहेबांचा हेतू कधीच नसतो. मागं वळून पहाताना रावसाहेब जेव्हा या गोष्टी सांगतात तेव्हा त्यात बराचसा तटस्थपणा असतो यामुळं अनेकांवर प्रभाव पडतो. काहींवर केवळ रावसाहेबांच्या संयमाचा पडतो. थोड्यांवर प्रभाव पडतो तो रावसाहेबांनी हे सगळं करताना दाखवलेल्या कौशल्याचा. फारच थोडे असे असतात की ज्यांना रावसाहेबांची ही वाटचाल नेहमीच रस्त्याच्या विरुद्ध बाजूनं झाली आहे हे कळतं. तसे रावसाहेब उमदे. कोणी ते दाखवून दिलं की मग ते त्यातील पोटवळणं सांगू लागत. मग या कहाणीला रंग लाभत...
क्रमश:

कथासमाजजीवनमानराजकारणअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

15 Oct 2009 - 3:32 pm | विजुभाऊ

व्वा अगदी दिगु टिपणीसच्या वळणाने चाललय हे लिखाण.

लगे रहो...........

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मदनबाण's picture

15 Oct 2009 - 3:39 pm | मदनबाण

हा भाग देखील सुंदरच.... :)

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

संजीव नाईक's picture

15 Oct 2009 - 3:42 pm | संजीव नाईक

श्रावण मोडक
वाचल्या नंतर माझ्या बालपणाची आठवण झाली. श्री बाबुराव काळे, श्री भापसे, श्री प्रभाकर कुंटे ह्या च्या सोबत माझे बालपण गेले, त्या वेळी श्री बाबुराव काळे माहीम येथे समर्थ सदन, येथे राहात होते. त्यांनी मला अनेक संधी दिल्या पण योग्य मार्गदर्शन न झाल्या मुळे मी संधीचा फायदा घेऊशकलो नाही.
संजीव

निखिल देशपांडे's picture

15 Oct 2009 - 3:44 pm | निखिल देशपांडे

मोडक वाचतोय..
येउद्या लवकरच....

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

प्रसन्न केसकर's picture

15 Oct 2009 - 4:03 pm | प्रसन्न केसकर

झालीये रावसाहेबांच्या. मस्त जमतेय भट्टी. येऊ द्या अजुन पोतडीतुन. राजकारण, समाजकारण... त्यांच्या छटा. मजा येतेय.

दशानन's picture

15 Oct 2009 - 4:56 pm | दशानन

असेच म्हणतो..

लिहा लिहा... लवकर लिहा...

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

स्वप्निल..'s picture

16 Oct 2009 - 3:06 am | स्वप्निल..

लवकर लवकर लिहा..

स्वप्निल

सुनील's picture

16 Oct 2009 - 5:06 am | सुनील

भट्टी मस्त जमतेय!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती२'s picture

15 Oct 2009 - 5:38 pm | स्वाती२

वाचत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2009 - 7:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढे?

अनिल हटेला's picture

15 Oct 2009 - 7:59 pm | अनिल हटेला

पूढे?

>

>

>

:-?

रावसाहेब चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Oct 2009 - 8:14 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म. छान लिहीलं आहे.
माणसं बऱ्याचदा अथक प्रयत्नांती यश न आल्यानं वैतागतात आणि अशा वैतागात काही तरी धाडस करतात. कधी ते अंगाशी येतं तर कधी फायद्यात पडलं. धाडस अंगाशी आलेली माणसं पुढं किरकिरी होत जातात, तर यशस्वी ठरलेली माणसं बहुतेकदा एखाद्या कळसावर जाऊन पोचतात.
चपखल वर्णन.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984