(दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा!)
तो भीषण दुष्काळ पडला नसता तर खान्देशातल्या बोरविहिरच्या रामचंद्र साहेबराव बोरसे यांच्या आयुष्याचं दान वेगळंच पडत गेलं असतं. म्हणजे तो दुष्काळ पडला नसता तर बोरविहिरमध्ये शेती नीट चालली असती. मग पोटाचा प्रश्र्न निर्माण झाला नसता आणि रामचंद्र साहेबराव बोरसे गावातल्या इतर शेतकऱ्यांमध्ये मिसळून गेले असते. वयात येताच त्यांचं लग्न झालं असतं. संसार फुलला असता, पुढं-मागं गावातल्या राजकारणात ते शिरले असते, कदाचित सरपंच किंवा तत्सम पदापर्यंत पोचले असते. मुलं झाली असती, त्यांची लग्नं झाली असती, रामचंद्र साहेबराव बोरसे यांच्या अंगा-खांद्यावर नातवंडं खेळली असती, विठ्ठलाचं नाव घेत रामचंद्र साहेबराव बोरसे यांनी आयुष्याची नाव पैलतीरी नेली असती.
पण जगणं इतकं सरळ नसतं. ते एक आडमुठं साल रामचंद्र साहेबराव बोरसे यांच्या आयुष्यात येणार होतं आणि ते आलं. त्या सालानं दुष्काळही आणला.
हा दुष्काळ पडला नसता तर साहेबराव बोरसे यांच्यापुढं कसलाही प्रश्न निर्माण झाला नसता. त्यांच्यापुढं प्रश्न नाही याचाच अर्थ त्याआधीच काही वर्षं मॅट्रिक झालेल्या रामचंद्र बोरसे यांच्यापुढंही प्रश्न निर्माण झाला नसता. अर्थातच, प्रश्न नसल्यानं उत्तराच्या शोधात बोरविहिरहून धुळे आणि तिथून पुढं मुंबई हा त्यांचा प्रवास झाला नसता. हा प्रवास झाला नसता, तर पुढं मुंबईत बाळासाहेब जाधवांशी त्यांची गाठ पडली नसती. ही गाठ नाही म्हणजे मंत्रालय आणि सरकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू यथास्थित मॅनेज करण्याची हिकमत रामचंद्र बोरसे यांना दाखवावी लागली नसती. त्याचाच अर्थ पुढं आर. एस. बोरसे उर्फ आरेस किंवा रावसाहेब अशा नावानं प्रसिद्ध पावण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. ही प्रसिद्धी मिळाली नसती, तर पुढं त्यातूनच आलेलं संकट त्यांच्यावर आलं नसतं. ते आलं नसतं तर आजची ही वेळ रावसाहेबांवर कधीही आली नसती...
***
"मॅट्रिक झाला आहेस, आता शेतावर निभावणं मुश्कील. तू बघ कायतरी..." साहेबराव बोरसे यांचे हे शब्द अनपेक्षित नव्हते. आधीच्या तीन वर्षांतील परिस्थिती स्वतः रामचंद्र बोरसे यांनी अनुभवलेलीच होती. बापानं काढलेले कष्ट, वर्षानुवर्षे त्यानंच पेरून ठेवलेल्या पैशाचा आत्ता होत असलेला उपयोग हे सारं त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे, आता पाऊस पडणार नाही आणि पेरा वाया गेला आहे हे त्या वर्षी जेव्हा पक्कं झालं तेव्हा 'पुढं काय' हा भारतीय शेतकऱ्यासाठी चिरंतन असलेला प्रश्न उराशी घेऊन बाप-लेक बसले होते.
"मी धुळ्याला जातो. तिथं पाहू. कदाचित नानासाहेबांकडं काही मार्ग निघेल," रामचंद्र बोरसे यांनी वडिलांना सांगितलं होतं. त्यानुसारच पुढं फारसं काही नाट्य न घडता ते धुळ्याला गेले. तेथे त्यांनी नानासाहेबांची गाठ घ्यायचं ठरवलं होतं. नानासाहेबांच्याच संस्थेच्या शाळेतून रामचंद्र बोरसे यांनी मॅट्रिक केली होती. तिथं त्यांनी आपल्या वक्तृत्त्वाच्या जोरावर नानासाहेबांचं लक्ष एकदा वेधून घेतलं होतं आणि त्यातून ते त्यांचे आवडते विद्यार्थीही झाले होते. त्या जोरावर आता नानासाहेब काही पर्याय आपल्यासमोर ठेवतील असं वाटून रामचंद्र बोरसे यांनी नानासाहेबांना भेटण्यासाठी धुळे गाठलं खरं, पण तिथं त्याच्या पदरी पहिली निराशा येणार होती.
रामचंद्र बोरसे यांनी मॅट्रिक होणं ते आता धुळ्यात येणं या मधल्या काळात झालेल्या उलथापालथीत नानासाहेबांचा संस्थेवरील ताबा सुटला होता. सुटला होता म्हणजे तो हिसकावून घेण्यात आला होता. नानासाहेब शेतकरी कामगार पक्षाशी बांधिलकी मानणारे, आता संस्था ज्यांच्या ताब्यात होती ती मंडळी कॉंग्रेसची. म्हणजे ७० च्या दशकाची कल्पना असलेल्यांसाठी राजकीय पक्षांची ही दोन नावंच नेमकं काय घडलं होतं याची कल्पना येण्यास पुरेशी ठरावीत, रामचंद्र बोरसे यांनाही त्यातून सारं काही समजून गेलं. नानासाहेब सत्तेत नाहीत म्हणजे ते काही करू शकणार नाहीत, हे पक्कं ध्यानी आल्यानं रामचंद्र बोरसे यांनी सरळ मुंबईची वाट धरली. आधी चाळीसगाव आणि तिथून मुंबई. अर्थात, त्याआधी त्यांनी एक केलं. धुळ्यातच ते कॉम्रेड बाबा भदाणेंना यांना भेटले. मिल कामगार संघटनेच्या ऑफिसात. बाबा भदाणे हे रामचंद्र बोरसे यांच्या वडिलांचे मित्र. "मुंबईत आमदार निवासात जा, तिथं कारमपुरींच्या खोलीत तुझी राहण्याची सोय करतो. पण जेवणा-खाण्याचं तुझा तुला पहावं लागेल," हे बाबा भदाणेंचे शब्द रामचंद्र बोरसे यांना आशीर्वादच वाटले. कारमपुरी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार. भदाणेंचे समकालीक. त्यामुळं त्यांच्या शब्दाचं तिथं वजन होतं.
त्या ऑक्टोबर महिन्यात रामचंद्र बोरसे मुंबईत व्ही.टी.वर उतरले तेव्हा त्यांचं वय होतं २० वर्षे आणि वर चार महिने. हो, त्यांची जन्मतारीख १ जून हीच होती. गावा-गावांतल्या मास्तरांच्या सोयीची. मास्तरांबरोबरच या अशा मुलांचं हितही साधणारी... तर रामचंद्र बोरसे यांनी त्या दिवशी व्ही.टी.च्या बाहेर पाऊल टाकलं आणि रस्त्यांची भव्यता पाहूनच ते चक्रावून गेले. येताना दिसून आलेली या महानगरीची भयंकर लांबी त्यांना घेरून टाकणारी ठरली होतीच. आता हे असं दर्शन. आमदार निवास गाठायचं कसं हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता. एखाद्याला विचारावं हे उमजण्याइतकंही धैर्य त्यांच्यात त्या वेळी राहिलं नव्हतं.
गर्दी थोडी कमी होईल अशा आशेनं रामचंद्र बोरसे काही वेळ एक कोपरा धरून थांबले. पण अर्धा तास गेला तशी गर्दी तेवढीच आहे किंवा वाढते आहे हे त्यांच्या ध्यानी आलं. त्या एका क्षणानं त्यांच्या जगण्यात एक मोठा बदल घडवून टाकला.
"इथं ही गर्दी अशीच वाढत जाणार असेल तर थांबूनही उपयोग नाही. दोनच रस्ते आहेत - पुढं सरकून आमदार निवास गाठणं किंवा माघारी बोरविहिर. आत्ताच्या घडीला तर दोन्हीकडं उपासच दिसतोय. तिथं इतरही काही नाही. इथं किमान इतक्या गर्दीत काही करता तरी येईल..."
रामचंद्र बोरसे यांचा निर्णय झाला आणि त्यांनी पाऊल पुढं टाकलं. रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसालाच त्यांनी गाठलं आणि आमदार निवासाचा पत्ता विचारला. गबाळ्या अवतारातील अशी काही मंडळी आमदार निवासात येत असतातच, त्यामुळं त्या पोलीसानं हातानं खूण करून रस्ता दाखवला. पहिलं वळण, दुसरं वळण सांगितलं आणि त्यानं लक्ष फिरवलं.
पोलीसानं हात केलेल्या दिशेनं रामचंद्र बोरसे यांनी लक्ष वळवलं आणि पहिलं पाऊल टाकलं, ते प्रथमच एका विश्वासानं. आमदार निवासाच्या दिशेनं. ती वळणं समजून घेत त्यांनी टाकलेलं पाऊल हे त्यांच्या आयुष्यातील पहिलं वळण.
क्रमश:
प्रतिक्रिया
14 Oct 2009 - 7:12 pm | मदनबाण
मस्त... :)
पुढचा भाग लवकर टाका...
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो
14 Oct 2009 - 7:15 pm | प्रसन्न केसकर
कथेची.
"आता शेतावर निभावणं मुश्कील. तू बघ कायतरी..." हे वाक्य मी भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेलीतल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणांवर लेखमाला केली तेव्हाच्या आठवणी जाग्या करुन गेलं. तो तरी पश्चीम महाराष्ट्र होता इथं तर धुळे आहे.
रामचंद्र बोरसे यांनी त्या दिवशी व्ही.टी.च्या बाहेर पाऊल टाकलं आणि रस्त्यांची भव्यता पाहूनच ते चक्रावून गेले. येताना दिसून आलेली या महानगरीची भयंकर लांबी त्यांना घेरून टाकणारी ठरली होतीच. हे पण पुर्वी एकदा एक हिट अॅन्ड रन कव्हर करताना पाहिलंय.
एकुणच चांगली वाचन मेजवानी मिळणारसं दिसतंय. येऊ दे पटापट!
14 Oct 2009 - 8:14 pm | दशानन
असेच म्हणतो.....
पुढील भाग कधी ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
14 Oct 2009 - 7:21 pm | निखिल देशपांडे
पु ढ चा भा ग क धी ? ? ?
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
14 Oct 2009 - 7:28 pm | स्वाती२
मस्त सुरुवात!
14 Oct 2009 - 8:06 pm | सूहास (not verified)
पहिला भाग छानच...संपुर्ण कथानकाचा सार आधी सांगुन , कथा फुलविण्याची शैली झकास आणी तसे करण्यात लागणार्या हिमतीस सलाम ....
सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
14 Oct 2009 - 8:07 pm | अनिल हटेला
सुरुवात एकदम दमदार !!
पु ढ चा भा ग क धी ? ? ? :-(
क्रमशःबद्दल वाढदिवसाच्या आपलं ते दिपावलीच्या आगाउ शुभेच्छा !! :-)
(आमदार) चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
15 Oct 2009 - 11:35 am | टुकुल
सुरुवात एकदम मस्त.. येवु द्या पुढचे भाग लवकर लवकर..
अवांतर विनंती: माती नका करु हो चांगल्या कथेची. ;-)
--टुकुल
14 Oct 2009 - 10:43 pm | अवलिया
वाचतोय..
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
15 Oct 2009 - 9:56 am | ब्रिटिश टिंग्या
मी पण!
15 Oct 2009 - 6:06 am | सुनील
सुरुवात मस्तच. पुढचा भाग लवकर लिहा.
अवांतर - बहात्तरचा दुष्काळ होताच भयंकर. खानदेश, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रातून कुटुंबेच्या कुटुंबे मुंबईच्या दिशेने आली. याचा एक दृश्य परिणाम म्हणजे, अगदी साठाच्या दशकापर्यंत मुंबईत घरकाम करणारा बाणकोटी रामा गडी जाऊन, त्याची जागा देशावरील गंगूबाईने घेतली हा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Oct 2009 - 8:16 am | llपुण्याचे पेशवेll
वा च तो आ हे.
ल व क र ल व क र लि हा पु ढी ल भा ग.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
15 Oct 2009 - 8:22 am | सहज
कृपया शीर्षक बांडगूळ भाग १ करावे.
*/*&^%
15 Oct 2009 - 9:02 am | विंजिनेर
नेटकी घट्ट मांडणी, छान सुरुवात.
पटापट पुढचे भाग टाका म्हणजे झालं
पुढील प्रतिक्रिया मालिका संपताना..
15 Oct 2009 - 12:35 pm | sneharani
सुरुवात मस्तच. पुढचा भाग लवकर लिहा.