बांडगूळ - ४

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
17 Oct 2009 - 3:27 pm

बांडगूळ - १
बांडगूळ – २
बांडगूळ – ३

मुळकांसोबत रावसाहेब टिकले ते आठ महिने. त्यानंतर लोकसेवा आयोगातही ते राहिले नाहीत. पण या दोन्ही घडामोडींआधी त्यांनी आपल्या पुढच्या रस्त्याची जणू आखणीच केली होती.

घटनांचा अन्वयार्थ रावासाहेबांना लावता येईलच असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांच्या कथनातून तरी तसा तो जाणवत नसायचा. मुळकांना त्यांच्या मतदार संघातील एकाची फौजदारपदी निवड करून हवी होती. ही अगदी त्यांच्याही कारकीर्दीची सुरवात. या निवडीसाठी समितीच्या सदस्यांकडं रावसाहेबांनी शब्द टाकला.

"गरजू आहे. हुशारही आहे. लेखी परीक्षेत थोडा मार खाल्ला आहे... थोडं डावं-उजवं करून त्याचं काम झालं तर बरं होईल..." रावसाहेबांनी केलेला युक्तिवाद असा साधा-सरळ होता. थोडं डावं-उजवं म्हणजे काय हा त्यांच्यासमोर आलेला प्रश्न होता. तेव्हा रावसाहेबांनी स्पष्ट सांगून टाकलं, "तुमच्यासमोर पार्श्वभूमी असते उमेदवारांची... गरज अधिक कोणाची हे ठरवता येतं, गुणवत्ता म्हणाल तर हा मुलगा त्यात बसेलच असं नाही, कारण लेखीत खाल्लेला मार. पण गुणवत्ता इतरही असते. एका परीक्षेवर ती ठरवू नका इतकंच माझं म्हणणं आहे. तोंडी परीक्षा थोडी चोख घ्या."

रावसाहेबांचा हा युक्तिवाद मान्य झाला किंवा कसे हे त्यांनाही सांगता येणार नाही. इतकं खरं की, हा उमेदवार - प्रकाश सावंत - निवड झाल्यानंतर रावसाहेबांकडं आला. पाया पडला आणि म्हणाला, "साहेब, तुमच्यामुळं आयुष्याची रांग लागली."

सुधाकर मुळकांना हे कळलं तेव्हा त्यांनी रावसाहेबांना विचारलं, की हे काम कसं झालं? रावसाहेबांच्या ध्यानी आलं, यातलं त्यांचं कौशल्य केवळ निवड समितीच्या सदस्यांना पटवण्याचं. इतर काही व्यवहार न करता हे झालं होतं हेही त्यांच्या लक्षात आलं.

रावसाहेबांना वाटलं होतं की मुळकांच्या या उमेदवाराची सोय झाली आणि प्रश्न सुटला. पण तसं नव्हतं. हा सावंत सहा महिन्यांनी नोकरीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर पुनश्च एकदा मुंबईत आला तेव्हा रावसाहेबांना भेटला. दोघांची रात्री एक छोटी बैठक झाली. त्या बैठकीत 'बोलता-बोलता'च त्याच्या तोंडून निघून गेलं,

"युक्तिवाद तुमचा. पण त्यासाठी मी किंमत मोजली रावसाहेब. आठ हजार रुपये..."

रावसाहेबांना कळेना. त्यांनी खोदकाम सुरू केलं आणि मग कळलं, मुळकांच्या निवडणूक लढवण्याच्या क्षमतेत त्या आठ हजारांनी भर पडली आहे. त्या एका क्षणी रावसाहेबांसमोर आणखी काही गोष्टी आल्या - आपल्या जगण्याची पद्धत या काळात बदलली आहे. आपण राहतो आमदार निवासातच, पण आता तिथं पक्के पाय रोवावे लागतील. गरजा बदलल्या आहेत. काही दिवसात आपलं घर असावं लागेल. गावाकडं शेतात पंप बसवायचा आहे. त्याशिवाय पाणी येणं शक्य नाही. जमल्यास बोअर करायची आहे. सरकारी योजनांत आपली जमीन बसत नाही म्हणजे हा खर्च आला.

आपलं काय? प्रश्नाच्या एकेका गुंत्यातून ते पुढं सरकले आणि स्वतःपाशीच येऊन थांबले. लग्न!!! करावं लागेल. बाप केव्हाचा मागं लागलाय. गावाकडं घर वाढवावं लागेलच. बायको तिकडचीच, इकडं येईल याची खात्री नाही...

आणि रावसाहेबांचे काही निर्णय झाले. त्यांच्यासमोरचे हे प्रश्न इतके मोठे की त्यापुढं बाकी सारं किरकोळ ठरलं... म्हणजे अशा भाषेत ते मागं वळून पाहताना बोलत इतकं नक्की. त्याक्षणी त्यांच्यालेखी ते प्रश्नही मोठे असतीलच का? तसंही सांगता येणार नाही. आठवणींचा प्रवास इथवर यायचा तोवर हे युक्तिवाद तयार होत जायचे.

आयोगाची यंत्रणा कधी त्यांच्या कब्जात आली हे त्यांनाही आता सांगता येत नाही. त्यांच्या 'प्रभावा'मुळं नोकरी लागलेल्यांची संख्याही त्यांना मोजता येत नसावी. सेवाश्रेणी वाढत गेली, तसा त्यांचा कारभार वाढत गेला. निवडपरीक्षांच्या काळात आमदार निवासातील गडबड वाढत गेली. एकट्याच्या हातून रावसाहेबांना सारं काही झेपेनासं झालं. मग त्यांच्या जोडीला एक टीम उभी राहिली. न सांगताच. काही न ठरवताच.
आयोगामार्फत होणारी भरती एवढं एकच क्षेत्र त्यांचं होतं. या आयोगातूनच शासकीय यंत्रणेच्या सगळ्या खात्यांमध्ये भरती होत असे. वेगवेगळ्या स्तरांवर ती असायची कारकूनापासून ते अगदी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत. सगळीकडं रावसाहेबांचं अस्तित्त्व होतं. थेट सीएमपर्यंत ते पोचायचे अगदी लीलया. सीएमची आणि आणखी दोघा-तिघांची नोकऱ्या लावण्यासाठीची ख्याती झाली ती याच काळात. नोकरीचा हा प्रश्न सीएमकडं गेला की निकाली निघतो अशी त्यांची प्रतिमा होती. रावसाहेबांच्या या व्यवहारांची मांडणीच तशी होती. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी मग सीएमचा निरोप यायचा, त्यांनी सांगितलेला आकडा रावसाहेबांनी पूर्ण करायचा इथकं सारं सुरळीत होत गेलं. मुळकही त्या व्यवस्थेत आले. पण कधी काळी रावसाहेबांचे बॉस होते ते, ते आता मात्र त्यांच्या बरोबरीचे आणि काही काळाने दुय्यम झाले. सीएमचा सपोर्ट मग रावसाहेबांच्या दिशेनं वळला.

आधुनिक काळात उद्योगांनी उदारीकरणानंतर आपापले कोअर एरियाज डिफाईन करून घेतले, त्याची रावसाहेब नंतर-नंतर खिल्ली उडवत. ते म्हणायचे, "त्याच काळात मी माझा कोअर एरिया ठरवला होता. मी फक्त भरतीचंच काम करायचो. मंत्रालयातील इतर सेटिंग्ज माझ्यासमोर व्हायची, पण मी त्यात कधीही पडलो नाही. नंतर-नंतर तेच इथलं महत्त्वाचं काम झालं... भरती हे काम दुय्यम होत गेलं..." हे सांगताना त्यांचा सूर बदलायचा. मग त्यावर छेडलं की ते समर्थनं करू लागत,

"मी नोकऱ्या लावल्या शेकडो लोकांना. सगळ्यांकडून पैसे थोडेच घेतले. पैसे घेतले आणि वाटले. माझा एक फ्लॅटही मुंबईत होऊ शकला नाही... शेतासाठी थोडं केलं... अनेकांना मी नोकरीला लावलंय त्यांच्याकडून काहीही न घेता..."

"तुमचीही टेन पर्सेंट स्कीम का?" एखादा विचारी. खोचकपणेच. प्रश्नाचं स्वरूप वेगळं. पण अर्थ असाच. कारण त्याच अर्थानं रावसाहेब बोलायचे मग,

"त्या टेन पर्सेंटमध्ये खरे किती, खोटे किती हे विचारू नकोस...'

काही आकडे एका बैठकीत रावसाहेबांच्या ग्रूपमधील एकानं सांगितले. किमान पन्नासावर उपजिल्हाधिकारी श्रेणीचे अधिकारी, शेकड्यांनी इन्स्पेक्टर, तहसीलदार, फौजदार... आकडे मोठे होते. पण समोरच्याला खरा रस असायचा तो त्या आकड्यात नव्हे. 'रेट' काय, हा त्यांचा कळीचा प्रश्न. या 'रेट'मधील स्थित्यंतरं रावसाहेब सांगायचे. आधी त्यांच्या आणि निवड समिती सदस्यांपुरती ही वाटणी असायची, मग लोकप्रतिनिधींचा रीतसर रेट ठरत गेला. वाटे पोचवण्याची एक व्यवस्था आली. पाहता-पाहता सातआकडी खेळ एकेका स्टेक होल्डरचा होत गेला. स्टेक होल्डर हा रावसाहेबांचाच शब्द.

एक ठरलेलं लग्न मोडल्यानंतर रावसाहेब पुन्हा त्या वाटेला गेले नाहीत. लग्न मोडण्याचं कारण त्यांचं आजवरचं जगणं हेच होतं हे मात्र त्यांना कधीही मान्य व्हायचं नाही.

"मी त्यांच्या उमेदवाराची वर्णी लावली नाही हा त्यांचा राग... त्यांनीच तिच्या घरी जाऊन सगळं काही उलटं-सुलटं सांगितलं."

ते सांगायचे. एका पुढाऱ्याचं नाव घेत. त्यानं मुलीच्या घरी जाऊन रावसाहेब काय उद्योग करतात हे सांगून टाकलं आणि त्यातून लग्न मोडलं असं त्यांचं म्हणणं असायचं.

"मीच वाल्या... म्हणा." रावसाहेब म्हणायचे, या भरतीचा आणि त्यातील व्यवहारांचा विषय आला की, त्यामागंही तेच कारण असावं. फक्त वेगळ्या संदर्भांच्या चौकटीत.

तेवढंच. त्यापलीकडे काही भावना नाहीत. कारण अशा जगण्याचा माज मात्र कायम होता. टॅक्सी, संध्याकाळी अंधारे, पण खूप काही असणारे बार, उंची सिगरेट, उंची कपडे, उंची अत्तरे. एक विषय न बोलण्याजोगा. मुंबईचं रात्रीचं जगणं आणि त्यातले रावसाहेब. हा एक प्रांत मात्र त्यांनी कटाक्षानं वैयक्तिक ठेवला होता. कळायचं. संध्याकाळी हा गृहस्थ अनेकदा टॅक्सीनं जायचं, मध्यरात्री यायचा. अनेकदा याला पोचवण्यासाठी नंतरच्या कालखंडात उंची गाड्या येत असत. एकूण हा सारा विरोधाभास आपल्यात आहे वगैरेची पर्वाही नसायची.

आमदार निवासातील ती खोली त्यांच्या कब्जात राहिली प्रदीर्घ काळ. तिचं भाडं ते भरायचे म्हणे. पण एकूणच त्यांचा वट असा की, ती शक्यता नसावीच. मग एकदा त्यांच्या तोंडून त्यांचंच एक वर्णन आलं,

"मी एक बांडगूळ आहे..."

हा गृहस्थ खरं बोलला असावा त्यावेळी.
***
मंत्रालय बीट कव्हर करताना निशांत भोसलेला कधी हे वाटलंही नव्हतं की एक काम करायला जाऊन आपल्या हातून काही वेगळंच घडणार आहे. तहसीलदार भरतीचं एक प्रकरण त्याच्याकडं चालत आलं. मराठवाड्यातील. त्या अपंग मुलाची भरती होत नव्हती. सदस्यांच्या काही मागण्या त्याला पूर्ण करता येत नव्हत्या. रखडलेल्या निवडीचं गाऱ्हाणं घेऊन मंत्रालयात पोचलेल्या या तरुणानं निशांतचं लक्ष वेधून घेतलं तेच मुळी आपल्या चेहऱ्यावरील वेदनेनं. सलग चार दिवस मंत्रालयात हा मुलगा दोन्ही खाकांमध्ये कुबड्या घेऊन त्या आधारे हळू गतीनं इकडं-तिकडं फिरत होता. पाचव्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी, त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना तीव्र झाल्या होत्या आणि ते पाहूनच निशांतनं ठरवलं, पहायचं काय आहे ते.

"साहेब, तहसीलदाराची परीक्षा पास झालोय, तोंडी परीक्षाही चांगली झाली आहे याची खात्री आहे. पण..."

निशांतनं त्याला पुढं बोलू न देताच विचारलं, "किती मागताहेत?"

"पाच."

"कुणाला भेटलास?"

"सामान्य प्रशासन राज्यमंत्र्यांकडं जायचा प्रयत्न करतोय, वेळच मिळत नाहीये..."

"तुझ्याकडं सगळ्या पात्रता आहेत?" निशांतनं विचारलं, संदर्भ अर्थातच त्याच्या अपंगत्वाचा.

तो कॉन्फिडण्ट होता. त्याच्या मते या श्रेणीत इतर पदं आहेत जिथं, दंडाधिकारी म्हणून काम करताना जसं त्याचं अपंगत्त्व अडचणीचं ठरेल तसं ठरणार नाही. त्याचा तो आत्मविश्वास चेहऱ्यावरच्या वेदनेच्या अगदी विरोधी होता. त्या संध्याकाळी निशांतच्या त्या स्कूपची बीजं रोवली गेली. या मुलाला घेऊन निशांत थेट राज्यमंत्र्यांकडं गेला. मंत्र्यांनी सांगितलं,

"रावसाहेबांना भेटा. माझं नाव सांगायचं. स्वच्छ सांगायचं. बाकी काही मिळणार नाही हेही स्पष्ट सांगायचं. काम होईल..."

आणि तिसऱ्याच दिवशी निशांतच्या बायलाईनची बातमी मंत्रालयात खळबळ उडवून गेली - "मंत्रालयाच्या बाहेरची सत्ता! - तहसीलदार भरतीत राज्यंमंत्र्यांना लागते एजंटांची मदत"

तपशीलवार वर्णनासह. आमदार निवासातील खोलीचा क्रमांक किंवा रावसाहेबांचं नाव नव्हतं बातमीत. पण संकेत पुरेसे. पुढच्या दोन दिवसातच गुन्हा नोंदला गेला, त्याची पुढची कार्यवाही सुरू झाली...

आणि त्या अपंग तरुणाची नियुक्ती झाली...
***
आझाद मैदान पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना इन्स्पेक्टर मिराशींच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण होता. एक पेच त्यांच्यासमोर होता: ज्यानं आपल्याला अन्नाला लावलं, त्याला बेड्या टाकायच्या. बेड्या टाकणं हे कर्तव्य आणि अन्नाला लावल्याबद्दलची कृतज्ञता हेही कर्तव्यच. बिन पैशात झालेली आपली भरती हे तिचं मूळ. गुन्ह्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या नावाखाली त्यांनी दीड तास काढला होता तो याच पेचाचे उत्तर शोधत. जित-हार हा प्रकार नव्हताच. दोन्हीकडं म्हटलं तर हारच होती, म्हटलं तर जित होती.

शेवटी निर्णय झाला त्यावेळी तो मात्र या दोन्ही मुद्यांवर नव्हताच. आपल्या उपजीविकेचं काय असा प्रश्न समोर येताच मिराशींनी निर्णय करून टाकला. जाऊन अटक करायची. त्या निर्णयाच्या पोटात आणखी एक निर्णय झाला होता. यापुढं या नोकरीत कुठंही जाण्याची तयारी ठेवायची. अगदी प्रसंगी चंद्रपूर-गडचिरोली किंवा धुळे-नंदुरबारदेखील!

आमदार निवासातील खोलीत रावसाहेब आरामात बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही ताण नव्हता. अगदी अपेक्षित आपणच ठरवलेल्या घडामोडी घडत असाव्यात असा त्यांचा चेहरा होता. आणि एका अर्थी ते खरंही होतं. रावसाहेबांसोबत दुसरं कोणीही नव्हतं. कोणी असणं शक्य नव्हतं. त्यांच्यासोबतच्या दोघांनाच आधी पोलिसांनी उचललं होतं आणि त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसारच गुन्हा नोंदवला होता. तक्रारदार म्हणून कोणी पुढं आलं नव्हतं. येणं शक्यही नव्हतं. कारण या गटानं कुणाला फसवलं नव्हतं. राजीखुशीचा मामला आणि त्यातही समाधान, असला प्रकार. तरीही गुन्हा नोंदवला होता तो अटक केलेल्यापैकी एकाकडे सापडलेल्या आयोगाच्या काही कागदपत्रांच्या आधारे. त्यामुळं त्यात किती दम होता हा प्रश्नच होता. तरीही गुन्हा नोंदवला गेला हे खरं.

"या मिराशी..." रावसाहेबांनी नेहमीच्या शैलीत त्यांचं स्वागत केलं. अर्थातच, पाण्याचा ग्लासही पुढं केला. मिराशींनी तो बाजूला केला.

"दुसरा काही पर्याय नाहीये रावसाहेब..."

"समजू शकतो. चला. बेड्यांची गरज नाही."

नाट्य नाही, काही नाही. ही कारवाई अशी उरकेल याचीही कल्पना कुणी केली नव्हतीच. मिराशींनी गाडीत घालून रावसाहेबांना आणलं आणि जिथं अशांची व्यवस्था केली जाते, तिथंच त्यांना बसायला सांगितलं.

'हाईंडसाईट इज परफेक्ट' असं कुणी म्हटलंय. रावसाहेबांना त्या खुर्चीत बसल्या-बसल्या पहिल्यांदा आठवलं ते हे. आणि त्यांचा हा प्रवास, त्यातील वळणांसकट त्यांच्यासमोर उभा रहात गेला. कोणत्याही विषादाशिवाय ते तो पहात राहिले...
***
-उपसंहार-
रावसाहेबांच्या अटकेनंतर साधारण दीडेक महिना वृत्तपत्रांमध्ये याच प्रकरणाचे मथळे होते. 'मुख्यमंत्र्यांकडे संशयाची सुई' इथंपर्यंत सारं काही झालं. प्रकरण हळुहळू आधी पान ३ वर गेलं, मग कधी तरी ते पान ६ वर आलं, त्यावेळी या केसचं चार्जशीट झालं होतं. पुढं रावसाहेब सुटले. आरोपी म्हणून ते आणि त्यांचे दोन साथीदारच होते. केस उभी राहणं मुश्कील होतंच. मिराशींनी तेवढं केलं होतं आणि ते नंतर थेट गडचिरोलीला पाठवले गेले.

रावसाहेब सुटले, पण मधल्या काळात व्हायचं ते होऊन गेलं होतं. नंतर आलेल्या दैन्याचं वर्णन करताना ते एकदा म्हणाले, "बांडगुळाचं नशीब हेच असतं. मी ज्यांच्या भरोशावर जगलो, ते इतरांच्या भरोशावर होते. त्यामुळं इतक्या वर्षांच्या या उद्योगातील एकही मंत्री, सीएम यात गुंतला नाही. इतरांनीही त्यांना भरोसा दिला, इतकंच. मुळकांच्या कँडिडेटच्या केसमध्ये चुकलो. चुकलो. संपलं."

आर. एस. बोरसे यांचा मृतदेह मिळाला त्यादिवशी आझाद मैदान पोलीस ठाण्यात रात्रीच्या ड्यूटीवर असलेल्या विजयसिंह देशमुखांनी त्याची जबाबदारी घेतली. रावसाहेबांच्या जोरावरच भरती झालेल्या आपल्याच काही मित्रांसह मृतदेह गावी नेला. या बाहेरच्या सहा माणसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले तेव्हा साहेबराव बोरसे, सत्तरीच्या उत्तरार्धात, निःशब्द होते.
-पूर्ण-

कथासमाजजीवनमानराजकारणअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

17 Oct 2009 - 3:34 pm | विजुभाऊ

सुंदर/उत्तम कथानक.
हे असे एका कथेतपुरते आटोपु नका.
एका दीर्घ कादंबरीची बीजे आहेत यात.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रसन्न केसकर's picture

17 Oct 2009 - 4:20 pm | प्रसन्न केसकर

या एका वाक्यात बोचणारं सगळं सत्य सांगीतलंत!

पण भारतातल्या राजकीय्/प्रशासकीय व्यवस्थेत रावसाहेब हेच एकमेव बांडगुळ नाहीये. खरतर अशी एव्हढी बांडगुळं फोफावलीयेत की मुळ वृक्षाचं अस्तित्वच नष्ट होत आलंय!

सही लिहिलत मोडक! दंडवत तुम्हाला.

चिरोटा's picture

17 Oct 2009 - 4:41 pm | चिरोटा

कथा आवडली.चित्रपटालाही एकदम योग्य आहे.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

सुनील's picture

17 Oct 2009 - 5:10 pm | सुनील

जबरदस्त दीर्घकथा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती२'s picture

17 Oct 2009 - 5:19 pm | स्वाती२

अपेक्षित पण तरीही सुन्न करणारा शेवट.

"बांडगूळ" सर्व साधारणपणे त्याला म्हंटले जाते जे मूळ झाडाचा (आधाराचा) रस शोषून वाढते आणि नंतर त्यालाच नष्ट करते, वरील कथेत असे झालेले दिसत नाही, उलट काम झाल्यावर ह्या कथित बांडगूळावरच संक्रांत आली. Am I missing something ?

संजय अभ्यंकर's picture

17 Oct 2009 - 7:12 pm | संजय अभ्यंकर

मोडकसाहेब, धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विंजिनेर's picture

17 Oct 2009 - 7:36 pm | विंजिनेर

मोडक, दिवाळीला एक उत्तम वाचनाची भेट दिलीत ह्याबद्दल मनापासून आभार.
पुनेरींनी मागच्या भागात म्हटलं तसं रावसाहेब अगदी खूप फुलवता आले असते - अर्थात हे वैयक्तिक मत. पण कथेचा बाज वेगळा आहे हे शेवटचा भाग वाचल्यावर कळाले.
असो. पुनश्च - आभार.

निखिल देशपांडे's picture

17 Oct 2009 - 10:24 pm | निखिल देशपांडे

मोडक मालक... मस्त लिहिले आहे तुम्ही...
अजुन खुलवता आले असते असे वाटले... पण कथा जबरदस्त आहे

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

अनिल हटेला's picture

17 Oct 2009 - 10:32 pm | अनिल हटेला

मोडकसाहेब कुर्नीसात घ्या आमचा !!
:-)

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

मदनबाण's picture

18 Oct 2009 - 8:49 am | मदनबाण

फारच सुंदर... :)

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

चीनशी युद्ध एक अविचार
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=166...

अवलिया's picture

18 Oct 2009 - 11:30 am | अवलिया

मालक, अजुन भर टाकुन एक कादंबरी बनवा. :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

18 Oct 2009 - 12:22 pm | दशानन

असेच म्हणतो... खरोखर विचार करा सेठ...

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

मी-सौरभ's picture

18 Oct 2009 - 11:42 pm | मी-सौरभ

सौरभ

सहज's picture

19 Oct 2009 - 8:10 am | सहज

लेखमाला छान.अर्थात वाचल्यावर त्रासच झाला.