नोक्रशाईचे रंग या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेले एक मुक्तचिंतन.
''नोकरशाही व्यवस्था'' नाव घेतल्यावरच दचकलात ना!" आता कोणती नवी गडबड! "अशीच तुमचा प्रतिक्रिया असणार, अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यांना नको वाटणारी अशीच ही व्यवस्था . ती सरकारी ऑफिसेस, गर्दी, ते कधीतरीच भेटणारे साहेबलोक! चहापाणी ,अग आई ग!आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेबलाखालची देवाण-घेवाण. थोडक्यात काय, तर लोकांना त्राही त्राही करून सोडणारी एक व्यवस्था आणि त्याचबरोबर मेंदूत अगदी नकळतपणे कुठेतरी उमटणारा 'नको रे बाबा!' चा सूर! खरे ना? सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात साधारणत: हेच चित्र उभे राहणार, आणि राहिलेच पाहिजे म्हणा! त्याच्या अनुभवातून हे चित्र उभे राहिले आहे. त्या व्यवस्थेचे परिणाम त्यांनी भोगलेले आहे. अगदी माझ्या घरात देखील ''नॉन स्मोकर, नॉन ड्रिंकर, नॉन करप्टेड'' हे गुण दोष झाल्याने स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी बसलेले नातेवाईक आहेत. पण दुर्देवाची गोष्ट अशी की, ही चौकट मोडण्यासाठी, निदान लवचिक करण्यासाठी करावयाचे उपाय मात्र कोणाकडेच नाहीत.किंवा असे म्हणता येईल की त्या अंगाने फार विचारच झालेला नाही.आपण फार खोलात जायचा प्रयत्नही केलेला नाही. फक्त चर्चा करण्यापुरते, नावे ठेवण्यापुरतेच आपण लिमिटेड राहिलो आहोत.
आता एक प्रश्न पडू शकतो, की लोकांच्या मनात या व्यवस्थेविषयी इतका रोष असताना ती बदलण्यासाठी क्रांती गेला बाजार संप, मोर्चे तरी का झाले नाहीत? याचे कारण, म्हणजे या दलदलीत उमललेली काही कमळे. ज्यांनी आपल्या कार्याने, कर्तुत्वाने अशा सेवेचे नाव उज्वल केले.या सेवेसाठी असणारा आदर कायम ठेवण्याचा देखील आपल्या परीने प्रयत्न केला. अविनाश धर्माधिकारी, किरण बेदी, टी. एन.शेषन, आमोद कंठ, ज्ञानेश्वर मुळे ही त्यातलीच काही उदाहरणे. यामुळेच एका बाजुला नितांत आदर तर दुसर्या बाजूला द्वेष अशा काहिश्या वेगळ्या अवस्थेत आजचा समाज आहे. पण, प्रत्यक्षात ही 'नोकरशाही' आहे कशी, ते कोणालाच माहित नाही. आणि अशा अवस्थेला हेच नसलेले सर्वांगीण ज्ञान हे एक महत्वाचे कारण आहे असे म्हणायला हरकत नाही.
आणि, इथे समोर येते ते 'नोकरशाईचे रंग' हे पुस्तक. प्रत्यक्षात नोकरशाई आहे कशी ते सांगणारे पुस्तक.लेखक- ज्ञानेश्वर मुळे, आयएफएस सारख्या रूक्ष सेवेत असूनही लिहिता राहिलेला माणूस, ''बदलते विश्व, बदलता भारत'' सारख्या सदरातुन स्वतःला व्यक्त करणारा माणूस. सगळचं वेगळं! माझ्या आजोबांच्याच शब्दात सांगायच तरं 'पुर्वजन्मीचे संचित' असणारा माणूस. अशा या सिस्टिममधल्या 'माणसाने' सिस्टिमबद्दल लिहलेले पुस्तक, पुस्तक नव्हे एक मूल्यवान दस्तऐवज म्हणा हव तर.
वाचकाला काय देतं हे पुस्तक? थोडक्यात सांगायच तर ही आपल्या कर्तृत्वाने विश्वनागरीक झालेल्या पण मनाने मात्र मायभुमीशी नाते टिकवून असलेल्या माणसाची कथा आहे. अवघ्या सहा प्रकरणातुन ते त्यांची जडणघडण, त्यांचे अनुभव,वेगवेगळ्या देशातील संस्कृती,भाषा आणि, नोकरशाही म्हणजे काय ते स्पष्ट करत जातात. पहिल्याच प्रकरणात ते या नोकरशाही बद्दलच्या सामान्य जनतेच्या भावना लिहितात. आणि त्याचवेळी
विचाराधीन कागदासारखा मी फाइलीत पडून
उडावे तर उडू कसा, पंख गेले झडून
असे म्हणत आपल्याही नकारात्मक भावनांना वाट करून देतात. पण, इथे मी २५ वर्षे आनंदाने घालविली. असे धाडसी वाक्य लगेच लिहितात आणि या व्यवस्थेतले गुण सांगु लागतात. व्यवस्थेत राहून काय, आणि किती चांगले काम करता येते. ते सोदाहरण स्पष्ट करतात. काही Unsung stories लिहितात ,काही Unsung Heroes ना पुढे आणतात,आणि Indian Foreign Services या नोकरशाहीच्या एका भागाबद्दल आपले संवादात्मक मत तयार करतात.
यानंतर सुरू होतो एक प्रवास कोल्हापूर ते रशिया व्हाया जपान, दिल्ली आणि मॉरिशस. या सर्व कालावधीत घडलेल्या सगळया बर्यावाईट घटना, अनुभव, त्यांची मते, सगळे ते बिनधास्त लिहीतात. मग ते साध्या स्पर्धेचा निकाल देतानाही परराष्ट्र संबंधांचा विचार करणारे जपान असो,वा एका पाठ्यपुस्तकात समावेश झालेला त्यांचा धडा असो,किंवा मग ते दिल्लीत आयत्यावेळी बदललेली नोट असो,सगळे ते जाम खुलेपणाने सांगतात, जणू काही आपल्या सोबत वाचकांना या सगळया देशांचा आणि नोकरशाहीचा प्रवास घडवून आणतात. म्हणूनच ते पुस्तक वाचून झाल्यानंतर एवढे अनुभवसंपन्न विश्व जगण्यासाठी अरे यार, आपणही आयएएस, आयएफएस व्हायला पाहिजे, असे वाटते. या सेवेविषयी एक ओढ तयार होते आणि हेच पुस्तकाचे खरे यश आहे.
हे पुस्तक मला का आवडले याची कारणे सरळ आणि साधे आहेत. लेखकाचा पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश स्पष्ट आहे. या पुस्तकातून लेखकाला लोकांपर्यंत ही व्यवस्था पोहोचवायची आहे.आणि स्वतःलाही व्यक्त व्हायचे आहे. आणि त्या ठराविक मार्गावरून हे लेखन सहज वाटचाल करते.क्वचित प्रसंग सोडल्यास त्यात कोठेही रुक्षपणा वा कृत्रीमता येत नाही. प्रशासनातील सौंदर्य तर त्यांना दाखवून द्यायचेच आहे, पण पाय घसरू नये म्हणून चिखल कोठे आहे, तेही दाखवायचे आहे. ध्येय ठरल्याने लेखक कोठेही भरकटलेला नाही. महत्वाचे म्हणजे, लेखकाजवळ आपल्याच वागण्याकडे त्रयस्थपणे वागण्याची स्थितप्रज्ञ वृत्ती आहे. सामाजिक गोष्टींनी भावनाप्रधान व्हावयाची संवेदनशीलता आहे. आपल्याकडच्या अनुभवाचा खजिना रिता करायची अनिवार इच्छा आहे. म्हणूनच हे पुस्तक बोजड झालेले नाही. त्यातुन पाझरणारा आत्मियतेचा ओलावा सहज स्पष्ट होतो व त्यामुळे हे लेखक अगदी आपल्यातले वाटतात. इथेच लेखकांचा निम्मा विजय होत असतो म्हणा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवेच्या या काळात लेखकाने इतर अधिकार्यांप्रमाणे वेगळेपण पत्करले नाही. त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या समाजात सामावुन घेतले,त्यातील चांगले गुण घ्यायचा प्रयत्न केला ,या सर्व गोष्टीचे वर्णन त्यांनी केल्याने त्यांच्यातला माणूस कसा घडला हे देखील समजायला मदत होते. त्यामुळेच,थोडक्यात उत्तर आणी पुर्वरंगातुन प्रवास करताना त्यांचे बाहय आणि अंतरंग कसे बदलले तेदेखील समजते. याशिवाय, माझया पिढीला जे आत्ता १६,१७ वर्षाचे आहेत त्यांना ९०-९१ साली देशात आणि जगात जो बदल घडला त्याचेही फारसे ज्ञान नाही. दैवयोगाने ते त्यावेळी ते दिल्लीच्या नोकरशाहीत असल्याने तो बदलही त्यांनी स्पष्ट केला आहे. थोडक्यात काय, तर चौकटीत दडलेल्या माणसाचे हे मनोगत आहे. ''नोकरशाहीत काम करणारीही माणसेच असतात. त्यांनाही भावना असतात, तेही चिडतात, हसतात, दु:खी होतात.'', या एकाच वाक्यातून ते त्या अधिकाऱ्यांचे वेगळेपण सांगून मोकळे होतात. आणि नोकरशाहीची ओळख ते आपल्या अनुभवातुन करुन देतात.
पण मूळ सांगण्याजोगा मुद्दा आहे तो वेगळाच! या पुस्तकाकडे फक्त पुस्तक म्हणून बघणे योग्य ठरणार नाही. पण या पुस्तकाकडे एक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे.कारण लेखकाने आपल्या अनुभवातुन अख्खी नोकरशाही उलघडली आहे. आज, नोकरशाही आरोपीच्या पिंजर्यात उभी आहे आणि तिला तिथून बाहेर काढणे गरजेचे आहे. अर्थातच, त्यासाठी समाज, सरकार आणि नोकरशाही या तिघांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे सामान्य माणूस त्या फाईलींच्या ढिगार्यात असते तरी काय ?हे जाणून घ्यायला प्रचंड उत्सुक आहे. त्यासाठी विविध अधिकार्यांनी लेखणी हातात धरणे आवश्यक आहे असे मला वाटते .त्याची ही सुरवात आहे.आणी हो यामुळे मार्गदर्शक तत्त्वातील 'लोकाभिमुख प्रशासन' हे ध्येय साध्य होई हे वेगळे सांगणे न लागे.मुळात म्हणजे ही जी दरी तयार झाली आहे ती बुजवली जाईल, आज देशाला याचीच गरज आहे असे तुम्हाला वाटत नाही काय?
अजुन एक गोष्ट सांगायची अशी, आजकाल 10वी -12 वी झालेली, नंबरात आलेली आम्ही मुले एकच ठराविक साच्याचे उत्तर देतो की ''मी पुढे आयएएस, आयपीएस होणार'' मात्र वर्षाभरातच आम्हा सगळ्यांच्या या कल्पना हवेतच विरतात. का? खरंतर, योग्य मार्गदर्शनाचा अभाव हे महत्वाचे कारण पण, अनेकांना या खात्यांची धास्ती वाटते. फक्त फॅड आलय म्हणून ही अशी उत्तरे आम्ही देतो पण आमच्यातल्या काहीना साधा यु.पी .एस.सी चा लॉग फॉर्म पण माहित नसतो.हे अज्ञान आणि ही धास्ती अशी पुस्तके कमी करू शकतात,हे पुस्त॑क कमी करेल. महत्वाचे म्हणजे, त्यांना त्या पदाबरोबर येणार्या जबाबदारीची जाणीव नसते. ''मला आयएएस व्हायचयं'' अशी फक्त इच्छा असुन काही उपयोग नाही.त्यासाठी लागणारे डोळस निरिक्षण आज बहुतेकांच्यात नाही. म्हणूनच अंतिम निकालात ही मुले मागे दिसतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन सजगतेने परिक्षा द्यायला लावणे हे काम ही पुस्तके करतात, त्यानी ते केले पाहिजे. ज्ञानेश्वर मुळे आजही निर्व्यसनी आहेत्,आसपास सर्व सुखसोयींची गंगा वाहत असताना ते स्वच्छ राहिले आहेत्,आणि या पुस्तकात अशी अनेक उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत.याशिवाय असे प्रसंग आहेत ज्याद्वारे या व्यवस्थेतही आपली प्रतिमा स्वच्छ राखता येते, चुकीच्या गोष्टींना विरोध करता येतो आणि नवनिर्मिती करता येते, हे लोकांना सागितले आहे. मुलांना या प्रकारे संस्कारित करणे हे काम ही पुस्तके करू शकतात किंबुहना केले पाहिजे. यासाठी ही चळवळ वाढीला लागणे गरजेचे आहे. ''नोकरशाई'' तर फक्त सुरूवात आहे. तुर्तास, जेंव्हा या पुस्तकामुळे चार जरी मुले उत्तम, कर्तुत्ववान प्रशासकीय अधिकारी होतील. तेंव्हा ज्ञानेश्वर मुळेंनी रंगविलेल्या सहा रंगात यशाच्या सातव्या रंगाची भर पडून इंद्रधनुष्य तयार होईल, असचं म्हणता येईल.असो, निदान तेवढे तरी होवु दे आणि एक दिवस आय .ए.एस च्या यादीत सिंग गुप्तांप्रमाणे पाटील ,कुलकर्णीही दिसोत अशी सदिच्छा करायची.
प्रतिक्रिया
26 Sep 2009 - 10:31 pm | मिहिर
चांगले वाटते आहे. वाचुन बघेन. तुझ्याकडे आहे?
यापूर्वी त्यांचे 'माती, पंख आणि आकाश' वाचले होते.
तू दहावी झाल्यावर आयएस होणार असे ठराविक साच्याचे उत्तर दिले होतेस?
27 Sep 2009 - 11:19 am | JAGOMOHANPYARE
वाचायला पाहिजे.... त्यान्चे आणखी एक पुस्तक ' ग्यानबाची मेख.' सध्या ते मालदीव मध्ये आहेत.... बघू , भेटायचा योग कधी येतो ते.... :) ....
27 Sep 2009 - 10:17 pm | विनायक पाचलग
प्रतिसादाबद्दल आभार
हा आपला टारझन वाला प्रतिसाद
मुद्दामच दिला......
आपला
(प्रतिसाद प्रेमी आणि मिपावरचे सगळे लेख फक्त वाचणारा) विनायक
27 Sep 2009 - 12:21 pm | अवलिया
चांगला लेख.
साप्ताहिक सकाळला पाठव, नक्की बक्षीस मिळेल
आणि हो, ते पण पहिले !
गुड, किप इट अप.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
27 Sep 2009 - 10:25 pm | वेताळ
पहिले एक दोन पॅरेग्राफ वाचले,पण खुपच वैचारिक परिक्षण आहे म्हणुन हळु हळु वाचायचे ठरवले आहे.
प्रशासनातील सौंदर्य तर त्यांना दाखवून द्यायचेच आहे, पण पाय घसरू नये म्हणून चिखल कोठे आहे, तेही दाखवायचे आहे. ध्येय ठरल्याने लेखक कोठेही भरकटलेला नाही. महत्वाचे म्हणजे, लेखकाजवळ आपल्याच वागण्याकडे त्रयस्थपणे वागण्याची स्थितप्रज्ञ वृत्ती आहे. सामाजिक गोष्टींनी भावनाप्रधान व्हावयाची
असल्या वाक्याचा अर्थ पण कंसात लिहित चल. तेवढच समजायला मदत होईल.
बारावीच्या परिक्षेला अगोदरच शुभेच्छा.
वेताळ