ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१७

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
24 Jun 2009 - 11:07 pm

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१६

सूर्योदय आणि कावागुची सरोवर

१२ वाजून गेले तरी पाऊस आणि वादळी वार्‍याचा धिंगाणा आणि जोडीला विजांचा बॅले चालूच होता. इथवर आलोत आता शिखरापर्यंत जायला मिळणार की नाही? सार्‍यांच्या मनात एकच प्रश्न होता. शेवटी १.३० वाजता पावसाचा जोर थोडा कमी झाला आणि आम्हाला शिखरावर जायची अनुमती मिळाली. आम्ही पुढे कूच करायला सुरुवात केली. आठव्या टप्प्यापर्यंतचा अनुभव लक्षात घेता परत एकदा ससाकी आणि सुझुकीसानने मला तेथेच आराम करायला सांगितले पण मी अर्थातच ते न मानता सगळ्यांच्या पुढे रांगेत जाऊन उभी राहिले. मंद हसत ससाकीसान आमच्याबरोबर राहिला आणि इतरही सगळ्यांनी सहकार्य केले. रात्रीच्या त्या किर्र अंधारात आणि पावसाच्या भुरभुरीत एका हाताने विजेरी धरुन काय प्रकाश पडणार? आमच्या बरोबरच्या जपानी मंडळींनी मात्र सावधगिरी बाळगून खाणकामगारांसारख्या डोक्यावर बांधायच्या विजेर्‍या आणल्या होत्या, त्याने दोन्ही हात मोकळे राहत होते. आता चढ आणखी कठिण होता त्यामुळे आमच्या केविलवाण्या टॉर्चांना बंद करुन त्या प्रकाशात चढण्याची सूचना ससाकीसानने केली. काही जणांनी आधाराला काठ्याही आणल्या होत्या. झाले, आम्ही सारे चढू लागलो, दिड दोन तासात वर पोहोचून ओचा पिऊन फ्रेश व्हायचे आणि सूर्योदय पहायचा असा बेत होता. तसे फुजीसानची वारी करणे म्हणजे शिखरावरुन सूर्योदय पाहणे मस्टच! (आणि मस्तही!) वरचा चढ अजून स्टिप होता , त्यात गारा पडू लागल्या. आम्ही रेनकोट घातले खरे पण ते काही पावसाच्या आणि गारांच्या मार्‍याला पुरे पडेनात. वारा तर रेनकोटातून आणि गरम कपड्यातून पार अगदी हाडांपर्यंत जात होता. हातावर हात चोळूनही उब कशी ती वाटतच नव्हती, तसेच चढणे सुरु होते आणि ती तोरीइ कमान दिसू लागली. आम्ही शिखरावर पोहोचल्याचेच ती कमान आम्हाला सांगत होती.

एव्हाना ३ वाजून गेले होते. पावसाने आपला खेळ आवरता घेतला तरी आकाशात 'काले काले बादल' होतेच. अशा वातावरणात कसा सुंदर सूर्योदय दिसणार? ही चिंता आता सारे करु लागले पण अजून आहे अर्धापाऊण तास असा दिलासा एकमेकांना देत तेथल्याच एका ढाब्यावर झटपट ओचा पिऊन सगळे वज्रासनात बसून प्रार्थना करु लागले . ते पाहून दिनेश आणि अविनाशने सूर्याची नावे घेत सूर्यनमस्कार घातले आणि आम्ही 'कराग्रे वसते लक्ष्मी.. ' म्हटले. पहाटे ३.४५ वाजता सूर्योदयाची वेळ होती. एव्हाना पूर्वेकडे तांबडी नक्षी दिसू लागली. उगवत्या सूर्याच्या देशात सूर्यजन्माचा तो उत्सव पाहण्यासाठी सारेच आतुरले होते, आपसूकच सगळे बोलायचे बंद झाले. समोर क्षितिजावर सूर्यजन्म होत असताना त्याच उंचीवरुन आम्ही तो सोहळा पाहताना वाटलं याचसाठी केला होता अट्टहास.. जेव्हा पहिले कंकण दिसू लागले तेव्हा लोकांनी उस्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.

शिखराच्या मध्यभागी असलेल्या नाइन म्हणजे क्रेटर भोवती साधारण ३.५ किमीची प्रदक्षिणा घालता येते. आत डोकावून पाहिले तर खोऽल दरी आणि कडांना बर्फ ! स्तिमित होऊन पाहत राहिलो. ह्या क्रेटरला असलेली ८ पिक्स केनगामाइन, हाकुसान, कुसुशी, दाइनिची, इझु, जोजु,कोसागाताके आणि मिशीमादाके! या शिखरावर जपानमधले सर्वात उंच पोस्ट हापिस आहे आणि तेथून भेटकार्डे पाठवू शकतो पण ते पोस्ट हापिस उघडेपर्यंत थांबायला लागले असते आणि तेवढा वेळही नव्हता.

पाच साडेपाचलाच लख्ख ,स्वच्छ प्रकाश पसरला होता. खाली पाहिलं तर कालच्या तांडवाचा कुठे मागमूसही नव्हता. अगदी नाटकातल्या ट्रान्सफर सीन सारखा बदल झाला होता रात्रीत! काल रात्रीच्या अंधारत, विजांच्या चमचमाटात, ढगांच्या गडगडाटात आणि पावसाच्या मार्‍यात वर चढताना इतरत्र लक्ष देताच आलं नव्हतं , आता उतरताना मात्र स्वच्छ प्रकाशात निसर्गाचं ते देणं मनसोक्त पाहत उतरु लागलो. उतरताना कालचं चढणं मनोमन आठवलं, उतरतानाही आधाराला काही नाही, पाय घसरला तर थेट खोल खोल दरीतच.. 'जपून टाक पाऊल' म्हणत उतरु लागलो. ससाकी सान आणि सुझुकीसान दोघांचंही सर्व नीट उतरत आहेत ना, उत्साहाच्या भरात कोणाला खोल दरीचा विसर पडत नाही ना.. याची काळजी घेत होते.

आम्ही खाली उतरताना चढणार्‍यांना प्रोत्साहित करत होतो. सहाव्या टप्प्यावर आम्हाला एक ग्रुप भेटला, त्यात एक बया पाठीवर ३,४ महिन्यांचं गाठोडं बांधून फुजी हेंगायला आली होती. आपल्याकडे ३ महिन्यांचं पोरगं घेऊन एकटीला प्रवास सुध्दा करु देत नाहीत आया,काकवा.. इथे तर ही ... "धन्य ग बाई तुझी.." असं न राहवून चक्क मराठीत म्हटलं तर गोड हसली. तिला शुभेच्छा देऊन पुढे उतरु लागलो.

पाचव्या टप्प्यापर्यंत म्हणजेच बेस कँपपर्यंत खाली उतरलो आणि तेथल्या हॉलमध्ये न जाता लगेचच बशीत भरुन आम्हाला एके ठिकाणी नेण्यात आलं.जरा हातपाय तरी धुवायला वेळ द्यायचा अशी माझी थोडी कुरकुर झाली , पण माझ्याकडे कोण लक्ष देणार होतं? पाच/दहा मिनिटातच आम्हाला एके ठिकाणी उतरवलं . हे होते स्प्रिंग शॉवर बाथ! इथेही २ मोठ्ठी दालनं होती. एक बायांचा आणि दुसरा बाप्यांचा, आत गेले तर आत लहान लहान हौद होते त्यात गरम पाणी सोडले होते आणि एका बाजूला शॉवर्स होते. शांपू, साबणाचे बुधलेही तेथे ठेवलेले होते. पण बाहेरचा दरवाजा सोडला तर एकही आडोसा नाही. एवढ्या सगळ्या बाया मुक्तपणे निसर्गावस्थेत नि:संकोच डुंबत होत्या,काहीजणी तुषारस्नान घेत होत्या."हमाममे सब नंगे.." असले तरी तिथेच इतक्या बायांच्यात आपण आंघोळ करायची? हा विचारच सहन होईना.. मग इकडे तिकडे बघितले आणि बाहेरच्या पॅसेजमध्ये येणार तेवढ्यात आकीसानने हाक मारली आणि हौदात डुंबायला नेले. एकदा पाण्यात उतरल्यावर मग सगळा संकोच पाण्यातच विरघळला. डोळे मिटून पाण्यात पडून राहिले,गरम पाण्यात अंग मुरवलं अक्षरशः सगळा शीण निघाला. बाहेरच यावेसे वाटत नव्हते पण तासभराचा वेळच आम्हाला स्नानासाठी दिला होता त्यामुळे आकीसानने त्या समाधीतून बाहेर काढलं आणि तयार होऊन आम्ही बाहेर आलो. दिनेशला विचारलं तर पुरुषांच्या हॉलात पण अशीच व्यवस्था असल्याचं समजलं.

आता आम्हाला कावागुची सरोवर पहायला जायचं होतं. ह्या सरोवरात फुजीसानचं प्रतिबिंब दिसतं. अशी पाच सरोवरे फुजियामाच्या परिसरात आहेत. कावागुची,यामानाका, साई,मोनोसु आणि शोजी! पूर्वी ती पाचही सरोवरे म्हणजे एकच मोठ्ठा जलाशय होता पण जेव्हा हा ज्वालामुखीचा फुजीपर्वत तयार झाला तेव्हा त्या एका जलाशयाची ५ सरोवरे झाली. ही पाचही सरोवरे खालून एकमेकांना जोडलेली आहेत असे तेथील अभ्यासकांना संशोधनाअंती समजले आहे. संशोधन म्हणजे चक्क पाणबुडे आणि लहान पाणबुड्या आत नेऊन पाहणी करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

संथ जलाशयात पडलेले ते फुजीसानचे प्रतिबिंब पाहताना 'प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर 'चा प्रत्यय आला. पाण्याच्या हलक्या तरंगांबरोबर प्रतिबिंबातला फुजीसानही हेलकावे खायचा ते पहायला मोठी मौज वाटत होती. त्या सरोवरात नौकाविहाराचीही सोय आहे पण त्या दिवशी मात्र नौकानयन बंद होते.त्यामुळे आम्ही काठावर बसून फुजीसानचे प्रतिबिंब निरखित कितीतरी वेळ बसलो , आकीसान आणि योशिकोसान बरोबर गप्पा मारत ,'इसापचं बोचकं' हलकं केलं.

पोट आणि मन दोन्हीही भरलं होतं, त्याच तंद्रीत परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. फुजीसानने आम्हाला अतिशय रोमांचकारी अनुभव तर दिलाच पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे दोन छान, गोड मैत्रिणी दिल्या.

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

24 Jun 2009 - 11:21 pm | श्रावण मोडक

सूर्योदयाची छायाचित्रे (इथे रात्री अकरा वाजता, दिवसभराच्या उद्योगांनी दमल्यानंतरही) पाहून एकदम प्रसन्न वाटू लागले. लेखनही तसेच. सु रे ख!!!

पर्नल नेने मराठे's picture

25 Jun 2009 - 11:39 am | पर्नल नेने मराठे

चुचु

चतुरंग's picture

24 Jun 2009 - 11:29 pm | चतुरंग

स्वाती-दिनेश सूर्योदयाचे फोटू केवळ उच्च आहेत!!
दुसर्‍या फोटोतलं सूर्यबिंब तर अवर्णनीयच!!

ह्याचसाठी केला होता अट्टाहास
हे मात्र अगदी खरं असतं अशा वेळी!

(माउंट)चतुरंग

रेवती's picture

24 Jun 2009 - 11:34 pm | रेवती

तू केलेल्या वर्णनानेच फुजीसान बघून झाल्यासारखे वाटले. खरच मस्त लिहिलयस! स्थळांची नावे मात्र प्रश्न विचारल्यासारखी किंवा अळूचं फदफदं असल्यासारखी वाटतात. :)

रेवती

टारझन's picture

24 Jun 2009 - 11:55 pm | टारझन

वा वा वा !!! त्रिवार वा !!! हा सतरावा भाग आहे .. तरीही एक्कंही भाग असा नाही.. जिथं लेखणीनं क्वालिटी डाऊन केलीये !! फोटू तर जबरा आहेतंच .. जगात असंख्य जागाही पहाण्यासारख्या आहेत... पण आपल्या लेखणीने वाचकांना त्या जागांची सफर घडवून आणन्याच्या स्वाती तैंच्या कौशल्यास आमचा प्रणाम !!

क्लासिक वन !!

(आख्ख जग पायदळी तुडवण्याची महत्वकांक्षा असलेला) -टारझन वाटसरू

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2009 - 12:05 am | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम... अतिअतिसुंदर... ते सूर्योदयाचे दोन्ही फोटो अतिशय सुंदर. इतकी छान सफर आणि असे छान दृष्य दाखवल्याबद्दल शतशः आभार.

बिपिन कार्यकर्ते

शाल्मली's picture

25 Jun 2009 - 1:39 am | शाल्मली

>> अप्रतिम... अतिअतिसुंदर... ते सूर्योदयाचे दोन्ही फोटो अतिशय सुंदर. इतकी छान सफर आणि असे छान दृष्य दाखवल्याबद्दल शतशः आभार.>>
अगदी असंच म्हणते. आणि त्यात भर म्हणजे तुझी प्रवासवर्णनाची सहज सुंदर शैली! फारच छान :)

समोर क्षितिजावर सूर्यजन्म होत असताना त्याच उंचीवरुन आम्ही तो सोहळा पाहताना वाटलं याचसाठी केला होता अट्टहास..

खरंच! किती रोमांचकारी अनुभव असेल तो.. !

--शाल्मली.

सहज's picture

25 Jun 2009 - 6:41 am | सहज

अप्रतिम... अतिअतिसुंदर...

पहीले दोन फोटो देखील अशक्य आहेत!!!!

प्राजु's picture

2 Jul 2009 - 2:41 am | प्राजु

अफाट आहेत सुर्योदयाची चित्रे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

25 Jun 2009 - 6:51 am | क्रान्ति

स्वातीताई, तुझी प्रवासवर्णनाची शैली इतकी जबरदस्त आहे, की तुझ्यासोबत आम्हाला पण फुजीसानची सफर केल्याचा अनुभव घरी बसून घेता आला! सोबत फोटोची मेजवानी! मग काय पहावं?

आम्ही खाली उतरताना चढणार्‍यांना प्रोत्साहित करत होतो. सहाव्या टप्प्यावर आम्हाला एक ग्रुप भेटला, त्यात एक बया पाठीवर ३,४ महिन्यांचं गाठोडं बांधून फुजी हेंगायला आली होती. आपल्याकडे ३ महिन्यांचं पोरगं घेऊन एकटीला प्रवास सुध्दा करु देत नाहीत आया,काकवा.. इथे तर ही ... "धन्य ग बाई तुझी.." असं न राहवून चक्क मराठीत म्हटलं तर गोड हसली. तिला शुभेच्छा देऊन पुढे उतरु लागलो.
हे तर खासच!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

यशोधरा's picture

25 Jun 2009 - 8:59 am | यशोधरा

स्वातीताई, मस्त गं मस्त! तू लिहिलेल्या सगळ्या प्रवासवर्णनांचं एक पुस्तक काढ आता. :)

श्रीयुत संतोष जोशी's picture

25 Jun 2009 - 11:18 am | श्रीयुत संतोष जोशी

आईशप्पथ
फोटो बघून खल्लास !!!!!!!!!!!!!!!!

आणि वर्णन तर अप्रतिम.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

स्मिता श्रीपाद's picture

25 Jun 2009 - 2:01 pm | स्मिता श्रीपाद

स्वातीताई,

तु फार्फार ग्रेट आहेस गं....
इतक जबरदस्त वर्णन केलयस ना....मी तुझ्या लिखाणाच्या फुल्ल प्रेमात बरका...ते फ्यान,एसी वगैरे वगैरे जे काही म्हणतात ना..तेच..

उगवत्या सूर्याच्या देशात सूर्यजन्माचा तो उत्सव पाहण्यासाठी सारेच आतुरले होते, आपसूकच सगळे बोलायचे बंद झाले. समोर क्षितिजावर सूर्यजन्म होत असताना त्याच उंचीवरुन आम्ही तो सोहळा पाहताना वाटलं याचसाठी केला होता अट्टहास..

हे वाचुन काटा आला अंगावर्...कसलं मस्त वाटलं असेल ना तो सोहळा पाहताना :-)

सुंदर लेखन =D> =D>

-स्मिता

सुनील's picture

25 Jun 2009 - 2:18 pm | सुनील

(नेहेमीप्रमाणेच) सुंदर, ओघवते वर्णन आणि झकास फोटो. भल्या पहाटे उठून सुर्योदय पहायचा म्हणजे खरे तर दिव्यच (इतक्या वेळा माथेरानला जाऊनही मला ते अद्याप जमलेले नाही!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

26 Jun 2009 - 9:02 am | दशानन

सुंदर लेखन व फोटो !

अजून लिहा वाचतो आहे... !

थोडेसं नवीन !

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 12:15 pm | विसोबा खेचर

चित्रांकरता खरंच शब्द नाहीत..!

खल्लास...

तात्या.

स्वाती दिनेश's picture

28 Jun 2009 - 6:22 pm | स्वाती दिनेश

सर्वांना मनापासून धन्यवाद,
स्वाती

ऋषिकेश's picture

28 Jun 2009 - 7:02 pm | ऋषिकेश

वा वा वा! त्रिवार वा!!! (प्रताधिकार: टारझन ;) )

फूजीसान इतकेच दिनेशसानचे फोटोही सान सान आय मिन छान छान!! :) लै भारी.. फोटो बघून वाटलं साला लाईफमधे कधीतरी सूर्योदय बघावा तर असा ! (प्रतिक्रीयेतील 'साला' बद्द्ल क्षमस्व. पण तो हवं तर बायकोचा भाऊ अश्या (सोज्वळ?)अर्थाने घ्यावा ;) )

(नेहेमीप्रमाणे) उशीरा लेख वाचला, आणि तो नेहेमीप्रमाणे प्र चं ड आवडला..

उगवत्या सूर्याच्या देशात सूर्यजन्माचा तो उत्सव पाहण्यासाठी सारेच आतुरले होते, आपसूकच सगळे बोलायचे बंद झाले.

ही अशी वाक्यं तर स्वातीतैची खासियतच.. एकदम चित्रदर्शी!

काय गं तै.. शेवटच्या फोटुत मला प्रतिबिंब दिसतच नाहि आहे.. त्याचा फोटु कुठाय?

ऋषिकेश(सान)
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2009 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा ! अप्रतिम फोटो, अप्रतिम वर्णन.
प्रवास वर्णनाचे, एक पुस्तक प्रकाशित कराच तुम्ही....!

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2009 - 11:44 am | स्वाती दिनेश

डॉ.साहेब,ऋषिकेश,
मनापासून धन्यवाद.
ऋषिकेश, अरे फुजीच्या प्रतिबिंबाचे फोटो काढायचा प्रयत्न केला पण मनासारखे जमले नाही, :(
स्वाती

नंदन's picture

1 Jul 2009 - 1:09 pm | नंदन

शेवटच्या टप्प्याचं वर्णन आणि सोबतचे फोटो सुरेखच. ढगांच्या पायघड्यांवरून येणार्‍या उगवतीच्या सूर्यमहाराजांचे दोन फोटोज तर क्लासच!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

2 Jul 2009 - 8:22 am | मदनबाण

फोटो केवळ अप्रतिम आहेत...आणि आपलं लेखन तर जबरदस्तच !!! :)
प्रवास वर्णनाचे, एक पुस्तक प्रकाशित कराच तुम्ही....!
>>> प्रा.डॉ. शी १००% सहमत.

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

स्वाती दिनेश's picture

3 Jul 2009 - 1:40 pm | स्वाती दिनेश

प्राजु,नंदन, बाणा
अभिप्रायाबद्दल आभार,
स्वाती

चित्तरंजन भट's picture

5 Jul 2009 - 1:37 pm | चित्तरंजन भट

स्वाती, दिनेश तुम्ही चक्क ढगात पोचला होता तर. हा फुजीचा परिसर अद्भुतच असावा एकंदर. अगदी कुबला खानच्या झनाडूप्रमाणे.

बाय द वे, हा भागही नेहमीप्रमाणे छान झाला आहे.

अभिज्ञ's picture

5 Jul 2009 - 3:12 pm | अभिज्ञ

उत्कृष्ट लेख व अप्रतिम छायाचित्रे.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

सुधीर कांदळकर's picture

5 Jul 2009 - 9:00 pm | सुधीर कांदळकर

प्रतिसाद देतांना शब्द खुंटले. हा भाग चांगला कीं अगोदरचा जास्त चांगला असें होतें.
खरेंच पुस्तक छापा आणि प्रकाशकाचें नांव कळवा. म्हणजे विकत घेतां येईल.

सुधीर कांदळकर.