राम राम मंडळी,
आपले मिपाकर अन्वयराव ह्यांच्या छोटेखानी लेखाला हे आमचे छोटेखानी उत्तर! हे उत्तर ह्या स्वतंत्र लेखातून आणि वेगळेपणाने द्यायची कारणे तीन!
१) आज बर्याच दिवसांनी एखाद्या लेखाला चार ओळींचे उत्तर देण्यास टाईम भेटला. एरवी, 'वा!', 'सुंदर!', 'छान!' या पलिकडे काही उत्तर द्यायला इच्छा असूनही टाईम भेटत नाही.
२) अन्वयरावांनी एका बापाच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. आम्ही ह्या उत्तराद्वारे एका लेकाच्या भावना मांडत आहोत!
३) ह्या उत्तराला साहित्यिक मूल्य वगैरे आहे असा आमचा (गैर) समज आहे म्हणून हे स्वतंत्र 'जनातलं, मनातलं!' :)
प्रिय अन्वयराव,
आपला छोटेखानी परंतु नितात सुंदर लेख आवडला.
त्याचं हसणं, शांत राहाणं आणि रडणं सारंच मला आंतर्बाह्य हलवून टाकतंय. त्याच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे होणारा आनंद,
मूर्त तू मानव्य का रे?
बालकाचे हास्य का?
या इथे अन् त्या तिथे रे
सांग तू आहेस का
त्या फुलांच्या गंधकोषी
सांग तू आहेस का?!
अन्वयराव, आपल्या चिरंजिवांच्या रुपाने साक्षात ईश्वराचाच वास आपल्या घरात आहे. त्याच्या निरागस हास्याइतकं मौल्यवान, या जगात दुसरं काही नाही. निरागस आणि निष्पाप! तीच ईश्वरी अस्तित्वाची खूण!
पिता ह्या नात्याने मनापासून व्यक्त केलेल्या भावना आवडल्या. आपल्या उभयतांचे अभिनंदन..!
अजून आपले चिरंजीव अर्थातच खूप लहान आहेत, परंतु एक गोष्ट मात्र आत्ताच नमूद करून ठेवाविशी वाटते. ती अशी की आज एक बाप म्हणून लेकाबद्दल वाटणार्या प्रेमळ भावना जशा आपल्या मनात आहेत, तश्याच त्या आजपासून २५-३० वर्षांनतर आणि त्या पुढेही,
'तात चरण ते वंदनीय रे
शत तिर्थांचे धाम...!'
या स्वरुपात आपल्याबद्दल आपल्या लेकाच्या मनातही हव्यात..!
तरच आपल्या पितृत्वाचं सार्थक होईल...!
आमचा आणि आमच्या बापात फारसा संवाद नव्हता. उलट बाप आम्हाला मार मार मारायचाच. तरीही दोघांच्यात एकमेकांबद्दल कुठेतरी ओलावा होता. तो जरी आम्हाला झोडत असला तरी खूप जीव होता त्याचा आमच्यावर, ही गोष्ट आम्ही जाणत होतो! त्याच्या अस्थी गिरगावच्या समुद्रात टाकल्या आम्ही. तो खपला त्याला झाली आता १०-१२ वर्ष. तरी अधनंमधनं गिरगाव चौपाटीवरून जातायेता नकळतपणे हात जोडले जातात!
बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं!
ओलावा आजही कायम आहे...!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
23 Jun 2009 - 9:39 am | बहुगुणी
"तरीही दोघांच्यात एकमेकांबद्दल कुठेतरी ओलावा होता. तो जरी आम्हाला झोडत असला तरी खूप जीव होता त्याचा आमच्यावर, ही गोष्ट आम्ही जाणत होतो!"
हा 'तेंव्हा अव्यक्त राहिलेला' ओलावा चार-चौघात तुम्ही आता व्यक्त करणं हे फार भावलं; 'गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्राचे देणे, माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने' या खानोलकरांच्या ओळींची आठवण झाली.
पण उशीरा का होईना, अशा या भावना व्यक्त करण्यामागे खरा माणूस-पणा आहे, संस्कार आहेत, हेच जाणवतं!
23 Jun 2009 - 9:52 am | विनायक प्रभू
तात्या एकदम मस्त
23 Jun 2009 - 9:53 am | सहज
अनुभवावरुन सांगतो की निदान जवळच्या वयस्कर लोकांशी बोलताना आपण कायम नमत घ्यावं. देव न करो पण नेमक्या आपल्या शेवटच्या आठवणी बोलाचालीच्या / कटू असायच्या.
असाच एका रविवारी आईला जरा नंतर फोन लावू या, नेहमीचे तर बोलायचे आहे फारसे विशेष नाही असे विचार करुन फोन लावला नाही . मलाच उलटा फोन आला ताबडतोब निघा.
23 Jun 2009 - 10:02 am | विसोबा खेचर
असाच एका रविवारी आईला जरा नंतर फोन लावू या, नेहमीचे तर बोलायचे आहे फारसे विशेष नाही असे विचार करुन फोन लावला नाही . मलाच उलटा फोन आला ताबडतोब निघा.
......!
नि:शब्द...
(मातृभक्त) तात्या.
23 Jun 2009 - 11:08 am | स्वाती दिनेश
असाच एका रविवारी आईला जरा नंतर फोन लावू या, नेहमीचे तर बोलायचे आहे फारसे विशेष नाही असे विचार करुन फोन लावला नाही . मलाच उलटा फोन आला ताबडतोब निघा.
सहजराव, भावना पोहोचल्या.. बहुदा घरापासून लांब राहणार्या प्रत्येकाच्याच भावना थोड्याफार फरकाने अशाच असणार..
तात्या, अन्वयरावांना दिलेले उत्तर नि:शब्द करुन गेले.
स्वाती
23 Jun 2009 - 1:30 pm | पक्या
>>अनुभवावरुन सांगतो की निदान जवळच्या वयस्कर लोकांशी बोलताना आपण कायम नमत घ्यावं. देव न करो पण नेमक्या आपल्या शेवटच्या आठवणी बोलाचालीच्या / कटू असायच्या.
सहजराव , एकदम परफेक्ट बोललात. पटतंय.
23 Jun 2009 - 7:01 pm | रेवती
बापरे!
अंगावर सर्रकन काटा आला.
तात्यांचे लेखनही मनाला भिडणारे!
रेवती
23 Jun 2009 - 10:14 am | विकास
मूळ लेखाइतकाच हा प्रतिसाद-लेख पण भावना उलगडून दाखवत आहे...
23 Jun 2009 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मूळ लेखाइतकाच हा प्रतिसाद-लेख पण भावना उलगडून दाखवत आहे...
23 Jun 2009 - 9:02 pm | प्राजु
हेच म्हणते..
दुसरी प्रतिक्रियाच नाही सुचली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Jun 2009 - 9:55 pm | अन्वय
हे आमचं लेकरू
23 Jun 2009 - 9:57 pm | रेवती
अगदी गोड!
रेवती
23 Jun 2009 - 10:01 pm | चतुरंग
थेट काळजात जाणारं अतिशय प्रसन्न हास्य! :)
भाग्यवान आहात!!
(काका)चतुरंग
23 Jun 2009 - 10:20 pm | यशोधरा
कसलं गोड आहे पिल्लू! :)
किती निरागस हसणं आहे! मार डाला!
अन्वय, घरी तुझ्या बायकोला आणि आईंना छोटूची दृष्ट काढायला सांग नक्की :)
23 Jun 2009 - 10:42 am | अवलिया
सुरेख !
--अवलिया
23 Jun 2009 - 10:51 am | गणा मास्तर
तात्या खुप दिवसांनी लिहिले आहे आणि खुप छान लिहिलेत.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
23 Jun 2009 - 1:51 pm | जागु
तात्या खुप छान लिहीलेत.
23 Jun 2009 - 2:30 pm | सूहास (not verified)
<<<बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं!>>>
पुर्वी-सारख बाप हक्क दाखवित नाही आता..ऊगाच कारण नसताना मोठ झाल्यासारख वाटत्...काल-परवा लाज बाजुला ठेवुन १०० ची नोट मागुन पाहिली..म्हटल एखादा डॉयलॉग एकायला मिळेल...काही नाही...गुपचुप हातात दिली...
सुहास
23 Jun 2009 - 6:44 pm | अन्वय
प्रिय, तात्या
आपल्या भावना पोचल्या. माझ्या लेखावर स्वतंत्र प्रतिक्रिया दिलीत. त्याबद्दल धन्यवाद.
सर्वसाधारणपणे प्रत्येक बाप आणि मुलामध्ये सख्य नसतेच कधी. बाप कायम मारझोड करणारा, शिस्तीत वागवून घेणारा अशीच प्रतिमा बहुतांश मुलांच्या मनामध्ये असते. त्याला तुम्ही आणि मीही अपवाद नाही. पण बाप वरकरणी कठोर वाटत असला, तरी त्याचे हृदय किती मऊ असते. हे बाप झाल्यावर मला कळलंय. त्याच्या मारण्यातही आपलं हितच होतं, हे आज कळतंय.
पण आई आणि मुलांत जसे भावबंध असतात, तसे बाप मुलांत का निर्माण होत नाहीत. बापाबद्दल कायम भीती का वाटत राहाते, हा प्रश्न अजून सतावतो आहे.
असं होऊ नये म्हणून मुलाने मला ए बाबा म्हणावं, असं मी ठरवून टाकलंय. आई इतकाच बाबा त्याला जवळचा आणि मायाळू वाटावा हा त्यामागचा उद्देश.
स्वतंत्र प्रतिक्रियेबद्दल पुनश्च धन्यवाद!
23 Jun 2009 - 6:48 pm | llपुण्याचे पेशवेll
तात्या,
मनातले लिहीलेस अगदी... माझे आई-बाबा पण मला लहान असताना शिस्तीच्या लावण्यासाठी फार मारायचे.. पण त्यानी लावलेली शिस्त कशी उपयोगी आहे हे आता कळते रे..आईचा जोश अजून कायम आहे (म्हणजे मारत बिरत नाही पण तोंडाचा दांडपट्टा चालू असतो) पण आजकाल बाबा मात्र 'आता मुले मोठी झाली' म्हणून फार शांत शांत असतात. पूर्वी एखाद्या गोष्टीत मतभेद झाले तर 'मूर्खा तुला काडीची अक्कल नाही! मी सांगतो ते कर' असे म्हणायचे पण आता म्हणतात 'बर तुला पाहीजे तसं कर पण जपून कर' आणि अशा वेळेस हमखास तोंडावर आपटायला होते. आणि तेव्हा म्हणावसं वाटतं "बाबा! मला काडीचीही अक्कल नाहीये हे तुम्हाला माहीत आहे तरी तुम्ही मला आधी का नाही सांगितलंत."
कसेतरीच होते रे!
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
23 Jun 2009 - 8:04 pm | संदीप चित्रे
अन्वयरावांचा लेख आणि तुझा लेख ह्याच्या अनुषंगाने नुकताच 'लोकसत्ता'मधे वाचलेला लेख इथे द्यावासा वाटला.
http://www.loksatta.com/daily/20090620/chchou.htm
23 Jun 2009 - 8:21 pm | चतुरंग
तात्या, तुझ्या मनातली बापाच्या प्रेमळ सहवासाची अधुरी राहिलेली भूक बोलून गेली लेखातून! खरं आहे. हे नातं तलवारीच्या धारेवरचं असतं. वापरलं नाही तर शिस्त लागणार नाही आणि जरा जोर जास्त पडला तर कापून रक्त निघणार!
माझ्या मुलाला अतिरेकी दंगा केल्याबद्दल मी काहीवेळा फटके मारलेत पण नंतर मुस्मुसून झोपी गेलेला मुलगा बघून मीच रडलोय रात्री! हल्ली मी खोटाखोटाही हात उचलत नाही. शब्दही फारच जपून वापरायचा प्रयत्न असतो, बर्याचवेळा जमतं कधी नाही जमत, शेवटी माणूस आहे.
माझ्या बाबांचं आणि माझं नातं असंच आहे. त्यांनी मला शिस्त लावण्यासाठी मार दिलाय, बोललेही आहेत. पण बर्याचदा ते म्हणायचे ते बरोबर असायचं. गेली काही वर्ष आग्रहीपणा सोडलाय त्यांनी. तुला सोयिस्कर तसे कर, मला काहीही चालेल. अशी समंजस भूमिका घेताना पाहून कसेतरीच होते. हेच का ते आपले आग्रही बाबा? असं वाटून जातं. हा वयाचा परिणाम म्हणायला हवा.
मुलाच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने चार शब्द बोललात तर ओरडून शिस्त लावण्यापेक्षा जास्त चांगला परिणाम दिसतो हा अनुभव सध्या घेतोय. पुढचं माहीत नाही.
(प्रयोगशील)चतुरंग
23 Jun 2009 - 11:32 pm | शाहरुख
अन्वय,पुण्याचे पेशवे आणि चतुरंग,
इंग्रजीमधे एक वाक्य आहे.
By the time you realize your father was right, you have a child who thinks otherwise.
हे ज्यांना आधी कळाले ते पिता-पुत्र नशीबवान !!
मुळ लेख आणि प्रतिसादात्मक लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे.
23 Jun 2009 - 8:31 pm | रामदास
नावाची एक जुनी भाषांतरीत कादंबरी वाचली होती लहानपणी.या कादंबरीत शेवटच्या दोन पानात पा आणि ज्योडीचा संवाद आहे.त्याचा अर्थ कळायला मात्र बाप व्हायला लागलं.
तात्या ,आपल्या आणि अन्वय यांच्या लेखामुळे फार अस्वस्थ केलं जुन्या आठवणी पुन्हा मनात फेर धरून नाचायला लागल्या.
धन्यवाद.
23 Jun 2009 - 8:36 pm | धनंजय
असेच अधूनमधून टंकायची बोटे मोकळी करा, तात्या!
23 Jun 2009 - 10:06 pm | मराठमोळा
नि:शब्द!!!!!!!!!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
23 Jun 2009 - 11:17 pm | स्वाती२
तात्या, अगदी मनाला भिडले . बाप-लेकाचे नातेच वेगळे.
अन्वय, खूप गोड आहे तुमचं पिल्लू. काय छान हसतय. मन अगदी प्रसन्न झाले.
सहज, तुमच्यासारखा अनुभव आम्हीही घेतला ३ वर्षापूर्वी. आम्हाला तर जाताही आले नाही.
23 Jun 2009 - 11:53 pm | श्रीकृष्ण सामंत
"बापसान मारल्यान आणि पावसान भिजवल्यान मगे तक्रार खंय करूची?"
असं मालवणीत म्हणतात.
"ती तात्या अभ्यंकराची भयंकर ओळ"
हा माझा लेख मिपात अवश्य वाचा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
24 Jun 2009 - 12:21 am | शाहरुख
मी "नवर्यान मारल्यान आणि पावसान भिजवल्यान मगे तक्रार खंय करूची?" ही म्हण मराठीत ऐकली होती..पण ती जरा "मेल शोविनेस्टीक" असल्याने बदलली गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही ;-)
24 Jun 2009 - 12:30 am | चित्रा
मुलांशी संवाद हवा, आणि ओलावाही जाणवायला हवा याच्याशी सहमत.
24 Jun 2009 - 12:37 am | ऋषिकेश
हा छान लेख तितक्याच मनस्वी प्रतिक्रीया घेऊन आला आहे.
मस्त!
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
24 Jun 2009 - 1:54 am | लवंगी
बाबांच चुक केल्यावर ओरडण हे आता किती हवहवस वाटत.. मुलींच्या बाबतीत बाबा वाढत्या वयाबरोबर हळवे होत जातात तर मुलासोबत शांत-समजुतदार..
24 Jun 2009 - 7:43 am | क्रान्ति
लेख आणि प्रतिक्रियाही.
मी अवघ्या १२-१५ तासांच्या अंतरावर असून आणि निरोप मिळाल्याबरोबर निघूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे बाबांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाही! अर्थात त्याचा परिणाम असा, की माझ्या लेखी बाबा गेलेच नाहीत! तसेही त्यांचे संस्कार, शिकवण, आशिर्वाद या रूपात ते नेहमीच जवळ असतात.
आठवणींना उजाळा मिळाला.
अन्वय, पिलू खूपच गोड आहे. दृष्ट काढायला सांगा!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
25 Jun 2009 - 7:59 pm | टायगर
लहानपणी वडिलांनी दिलेले पैशातून काही पैसे वाचून ते साठविण्याचा मला छंद होता. याची फक्त आईलाच माहिती होती. ती माझा डबा कुणाच्या नजरेस येऊ देत नसे. (त्या वयात तरी तसचे वाटायचे.) माझ्या बचतीलाही तिचे प्रोत्साहन असे. माझ्या डब्यासाठी तीही कधी कधी आपणहून रुपया देत असे.
एकदा वडिलांनी काही तरी वस्तू आणण्यासाठी माझ्याकडे पन्नासची नोट दिली होती. त्यातून दहा रुपये मागे राहिले होते. मी काही ते वडिलांना परत दिले नाहीत. घरी आल्यावर वस्तू आईकडे दिली. वडिल काही त्यावेळी घरात नव्हते. ते आल्यानंतर त्यांनी हिशेब मागितला. तुम्ही दिलेल्या पैशातून दहा रुपये उरलेत. एवढेच मी त्यांना सांगितले. ते पैसे कुठे आहेत. या विषयी काही सांगितले नाही.
ते पैसे कुठे आहेत, या प्रश्नावर मी गप्प राहिलो. त्यामुळे त्यांचा पारा चढला.
तू चोर आहेस वैगरे ते मला बोलले. तरीही मी गप्प. मग माझे छोटे छोटे मित्र आले. त्यांच्या समोरही ते मला बोलले. हा चोर आहे, याला चिडवा, असेही त्यांनी मित्रांना सांगितले. मी काहीच बोलले नाही. माझी बाजू घ्यायला आईदेखील घरात नव्हती.
मी तसाच मित्रांबरोबर बाहेर पडलो. घरी आल्यानंतर वडिलांनी मला बोलावून घेतले आणि बराच वेळ जवळ घेऊन बसले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते, अस; अजूनही मला आठवते.
नंतर म्हंजे बऱ्याच वर्षांनी मला आईने सांगितले की, ती घरी परतल्यानंतर वडिला आईवरही चिडले होते. मुलाला वळण नाही वगैरे त्यांनी तिला सुनावले. त्यावेळी आईने माझा डबा आणून त्यातील नोट वडिलांना दाखविली होती. त्यामुळे त्यांचा गैरसमज दूर झाला होता.
25 Jun 2009 - 11:46 pm | घोडीवाले वैद्य
तारे जमींपर आठवला.
बऱ्याचवेळा आपल्या मुलाचा हुनर बापाकडून पाहिला जात नाही. त्यातूनच मुलांच्या आई वडिलांविषयीच्या भावना बदलत जातात. पण एक अनुभव असा आहे की लहानपणी आई बापांचे फार प्रेम न मिळालेला मूलच त्यांच्या उतारवयात पालकांची जास्त काळजी करते.
आमच्या आई बापाचाही आमच्यावर विश्वास नव्हता. पोरगं उनाड निघतंय की काय असंत त्यांना वाटायचं. सुदैवाने तसे काही झाले नाही.
सदा तुमने ऐब देखा, हुनर को न देखा