(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)
आधीचे भाग येथे वाचा :
भाग एक - http://misalpav.com/node/८१२७
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/८१४९
भाग चार - http://misalpav.com/node/८१७२
१ जुलै
आज पिसाळलोय मी! साला मुलाच्या जातीचे नशीबच भिकार! कुत्र्यासारखे जगणेच नशीबी आह्मा मध्यमवर्गीय मुलांच्या! बरोबरीच्या वयाची एखादी पोरगी आम्हाला आवडते, तिच्याशी छान मैत्री जुळते.... फक्त मैत्रीच बरं का! कारण तेव्हा तिच्याबरोबर सगळे आयुष्य घालवायचे वगैरे विचार डोक्यात आले तरी बोलून दाखवायची हिम्मत नसते. आपले स्थिर काहीच नसते... नोकरी वगैरे! अन बापाला असे काही विचार बोलायची सोय पण नसते. मग जरा स्थिरस्थावर झाल्यावर बघू म्हणुन इतर सगळ्या भावना दाबून फक्त मैत्रीवर समाधान मानायचे आणि एक दिवस ती मुलगी दुसर्या कुणाबरोबर लग्न करते _ तो साला कुणीतरी बुळ्या, फक्त आपल्यापेक्षा सगळ्या अर्थाने मोठा असतो, वयाने दोन-चार वर्षे सीनियर असतो आणि कुठेतरी अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर वगैरे असल्यामुळे पैशाने मालदार पण. मग सगली स्वप्ने कचर्यात लोटून त्या मुलीच्या लग्नाला जायचे, ती नवर्याबरोबर छान दिसत बसणार आणि आपली ओळख करून देणार - "हा माझा वर्गमित्र पम्या! मी सांगितले होते ना ह्याच्याबद्दल. आमची खूप छान मैत्री आहे." अशी. नंतर दोन-तीन वर्षानी ती परत कुठेतरी भेटणार रस्त्यात, खच्चून हवा भरलेल्या फुग्यासारखी दिसत असणार आणि कडेवरच्या एक-दीड वर्षाच्या लाळ गाळणार्या मुलाला सांगणार, "हा प्रमोद मामा बर का! आपल्या अनील मामा सारखा...."
तुम्ही म्हणत असाल पम्याला आज झाले काय? एव्हदा फिलोसोफिकल फंडा मारतो म्हणजे नक्की प्रेमभंग! अगदी तसा एकदम प्रेमभंग काय नाय पण आपली कवटी सरकलीय... सरीताच्या लग्नाची पत्रिका ऑफिसातल्या नोटीसबोर्डावर पाहिल्यापासून. दहा तारखेला लग्न आहे तिचे..... एका सिलि़कॉन व्हॅलितल्या सॉफ्टवेअर इंजीनीअर बरोबर... पण आपण काय गम करत नाही... गेली उडत, अरे आपण आता रिपोर्टर झालोय. तिच्यापेक्षा जबरा भारी डाव येतील आपल्यावर लाइन मारत. तशीही गल्लीतली कुलकर्ण्यांची सोनी गेला महिनाभर रोज जाता येता आपल्याकड़े बघून हसतेय... सरीता एव्हडी पॉलिश नसली म्हणून काय झाले? दिसायला गोरी आहे आणि अंगाने पण गच्च. आज कामात फार काही लक्ष दिले नाही.
७ जुलै
तोड़करवर गेम झाली. पोलिसानी धरला त्याला. साला एव्हडा सीनीअर क्राईम रिपोर्टर पण एकदम छटाक चोरासारखा बेड्या घालून कोर्टात उभा केला अन वर तीन दिवसांची रिमांड पण घेतली. लय माज करायचा, पोलिस म्हणजे बापाचे नोकर असल्यागत वागायचा... आता कळेल टायरात घालून पिसतील तेव्हा.
सकाळी स्थानीक कार्यक्रमांची यादी तयार करत होतो तर बाराथे साहेबांच्या टेबलवरचा फोन वाजला. कोणीतरी पोलिसवाला होता.... त्याने बाराथे साहेबाना सांगितले तोड़करला खंड्णी घेताना रंगे-हात पकडले म्हणून. कोण्या पोलिसाला म्हणे पाच हजार मागितले होते तर त्याने फिर्याद दिली अन पकडून दिला.... लम्बा गेला तोड़कर. बाराथे साहेबांचा चेहरा काळाठिक्कर पडला होता. खूप वेळ डोके धरून बसले होते.
पण तोड़कर तसा राजा माणूस, इन्टर्नशीप करताना आपल्याला खूप चांगले वागवले त्याने. दोन लहान मुले आहेत म्हणे त्याला. त्याचेच वाईट वाटते. दुपारी रिमांड करता त्याला कोर्टात आणले तेव्हा गेलो होतो तिथे. हळूच गर्दीचा फायदा घेऊन त्याच्या जवळ जावून उभा राहिलो. तो खाली मान घालून उभा होता. नंतर त्याने आपल्याला बघितले.... काय ती नजर.... अंगावर काटाच आला. रिमांड घेतल्यावर कोर्टातुन पोलिस बाहेर घेउन जात होते तेव्हा एका पोलिसाच्या हातात पन्नासाची पत्ती सरकवली. त्याने तोड़करला आड्बाजुला घेतले अन दिले आपल्याला त्याच्याशी बोलू थोडा वेळ. आपण ए क विल्स चे पाकिट त्याच्या हातात सरकवले. एकदम डोळ्यात पाणी आले त्याच्या. म्हणत होता, "मला विरोधात बातम्या देतो म्हणून लटकावले... तो पोलिसवाला माझा मित्र म्हणवायचा स्वत:ला पण गद्दार निघाला.... मी त्याला फ़क्त उसने पैसे मागितले होते तर खंडणीची खोटी फिर्याद केली...." आपण म्हटले काही लागले तर सांगा, आपली थोडी ओळख आहे डिपार्टमेंटमधे तर ढसाढसा रडायलाच लागला. फार वाईट वाटले. परत ऑफिसमधे आलो तर कळले तोड़करला कामावरून काढले म्हणून.
आज कामात कोणाचेच लक्ष नव्हते. कश्यातरी शिल्लक राहिलेल्या बातम्या लावून पाने बनवली.
८ जुलै
सकाली ऑफिस मधे पोचलो तर प्यूनने निरोप दिला संपादक आगलावे साहेब बोलावतात म्हणून. छातीचा ठोका चुकला एक मिनिट, म्हटले काही चूक झाली का? केबिनमधे गेलो तर बाराथे साहेब पण तिथे बसलेले.... संपादकानी सांगितले, "आत्तापर्यंत तुमचे काम चांगले आहे. आजपासून तुम्ही क्राईम आणि कोर्ट बीट कव्हर करा." मग परत एक लेक्चर - क्राईम रिपोर्टिंग कसे जबाबदारीचे काम आहे ... तिथे सर्व भान ठेवून कसे काम करावे लागते.... माझ्यामधे चांगला क्राईम रिपोर्टर बनन्यासाठी आवश्यक गुण कसे आहेत हे आणि ते...... साला सगळे खोटे.... सरळ बोला की आता तोड़कर नाही आम्हाला नवीन बकरा हवाय असे. पण आपल्याला काय, नोकरी करायची कशीतरी. हो म्हटले!
पम्या साल्या क्राईम रिपोर्टर झालायस.... आत्तापर्यंत पोलिस चा सम्बन्ध म्हणजे गणपती- नवरात्रीआधी चौकीतून बोलावणे यायचे "गड़बड़ नाय पायजे" असा दम भरायला किंवा काय राडा झाला तर पकडून नेवून दणके द्यायचे तेव्हडाच होता आता रोज वेगळ्या प्रकारे येणार. पण सावध रहा रे बाबा! तोड़करचे काय झाले लक्षात आहे ना? हे पोलिस कुणाचे कोण नसतात.... जपून!!!!!!
प्रतिक्रिया
15 Jun 2009 - 4:37 pm | श्रावण मोडक
चालू द्या. बीटवर आला आहात आता. सोर्सेस कसे डेव्हलप केले या पम्यानं, ते लिहा. तोडकर बाकी ओळखीचा वाटतोय. ;)
नावं-आडनावं अगदी शोधून काढली आहेच मस्त.
15 Jun 2009 - 4:52 pm | शार्दुल
भारीच!!!!!!!!!!
नेहा
15 Jun 2009 - 4:56 pm | शार्दुल
भारीच!!!!!!!!!!
नेहा
15 Jun 2009 - 6:34 pm | घाशीराम कोतवाल १.२
काय पम्या भाय तुम्ही तर पेज ३ मधले अतुल कुलकर्णी झालात राव
आता येउ द्या तोडपाणीच्या बातम्या !!!
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
15 Jun 2009 - 6:34 pm | घाशीराम कोतवाल १.२
काय पम्या भाय तुम्ही तर पेज ३ मधले अतुल कुलकर्णी झालात राव
आता येउ द्या तोडपाणीच्या बातम्या !!!
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
15 Jun 2009 - 6:35 pm | घाटावरचे भट
आयला, आता धमाल आहे...
15 Jun 2009 - 6:45 pm | धमाल मुलगा
:?
आपला नाय बा संबंध पत्रकारीतेशी!
असो,
पुणेरीशेठ,
बेष्ट लिवताय. मजा येतेय भौ वाचायला...
येऊद्या आणखी :)
पु.ले.शु. :)
-ध.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
16 Jun 2009 - 12:32 am | Nile
आयला! धमाल मुलगा आहे हा पम्या! ;)
तोडकरला तोडला! चालुद्या! वाचतोय!
15 Jun 2009 - 7:48 pm | संदीप चित्रे
वाचतोय उत्सुकतेने
15 Jun 2009 - 11:07 pm | chipatakhdumdum
आवडल...
5 Aug 2010 - 5:42 pm | घाशीराम कोतवाल १.२
हिकडे पण तेच जुण ते सोन राव