अण्णामामा.

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
29 May 2009 - 10:22 pm

३० मे २००८. मी ऑफिसला निघण्याची तयारी करत होतो. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली, नंबरात ९१ आकडा दिसत होता म्हणजे भारतातून फोन होता. शुक्रवारी सकाळी फोन? जरा चमत्कारिक वाटलं.
"दादा, अण्णामामा गेला!" पलीकडून बहीण बोलत होती.
"आं...कधी? कसा काय?"
"आजच. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर! हा फोन झाल्यावर आईला लग्गेच फोन कर. तिला खूप टेन्शन आलंय!" तिचा आवाज कापत होता.
ऐकत होतो. शेजारच्या खुर्चीत खचलो.
हार्ट ऍटॅक नंतर हॉस्पिटलमधे भरती केल्यावर एकेक सिस्टिम फेल होत गेली आणि शेवटी गेला. मुलगा स्वतःच डॉक्टर त्यामुळे काळजी घेण्याची परिसीमा असणार हे उघड होतं.
अमेरिकेतून मुलगीही आलेली होती. सगळे जवळ होते हे नशीबच म्हणायचं अशा वेळी. भाऊमामा (माझा दुसरा मामा), मामी, मामेभाऊ हेही त्याला भेटले. भाऊमामा म्हणाला की बोलू शकत नव्हता तो शेवटी, फक्त डबडबलेल्या डोळ्यांनीच बोलला!!
माझ्या आईची आणि त्याची भेट मात्र होऊ शकली नाही. आईला फोन केला तेव्हा तिचं रडू खळत नव्हतं. सहाजिकच होतं. पाच भावंडातले आण्णा आणि आई हे पाठोपाठचे भाऊ बहीण, ६४ वर्षाचं नातं असं संपावं आणि शेवटली भेटही होऊ नये ह्याचं दु:ख अपरंपार. (पण भेट नाही झाली ते माझ्या आईच्या दृष्टीनं बरं झालं का? तिला सोसली असती का ती शेवटली भेट? असंही मनात येऊन गेलं..)
************
अण्णामामा माझा धाकटा मामा. त्याचे अत्यंत पाणीदार, भेदक, निळसर घारे डोळे मला आठवतात. एका अतिशय बुद्धिमान शास्त्रज्ञाचे डोळे होते ते. तो बोलताना मिस्किल हसणारे त्याचे डोळे आपल्यातून आरपार कुठेतरी पलीकडे बघताहेत असा भास मला नेहेमीच होई!
तसा मला त्याचा सहवास म्हणाल तर फारसा नाहीच लाभला. 'संरक्षण संशोधन आणि विकास संगठन' (डीआरडीओ) मधला अतिशय वरच्या दर्जाचा शास्त्रज्ञ म्हणून काम करताना एकतर तो दिल्ली, हैद्राबाद, बंगलोर असा कुठेकुठे दूरवरच असे. क्वचित परदेशातही. शिवाय आमच्या शाळेच्या आणि त्याच्या सुट्ट्यांची वेळापत्रके जमणे कठिण. पण सगळ्या नातेवाईकांच्या लग्न, मुजींना मात्र आवर्जून हजेरी लावायचा तो, कुठेही असला तरी!
२००० साली मी हैद्राबादमधे काम करायला लागलो तेव्हा तो रिटायर झाला होता. त्यानं कंसल्टिंग सुरु केलं होतं. त्याच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा घेण्यासाठी कंपन्या तत्पर असत. ते असो. मूळ मुद्दा, त्यावेळी माझी त्याच्याशी अतिशय जवळून पुन्हा ओळख झाली असे मी म्हणेन. कारण लहान असताना केवळ मामा म्हणून बघणे आणि आपण स्वतः वयाने मोठे झाल्यावर एक अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे बघणे ही एक नव्याने झालेली ओळखच. माझ्या आयुष्यावर अतिशय प्रभाव टाकणार्‍या ज्या काही व्यक्ती आहेत त्यात अण्णामामा आहे. ह्या दुसर्‍या वेळच्या ओळखीनंतर मी त्याच्याकडे एक मेंटॉर म्हणून पहात आलो. नोकरी-व्यवसाया संदर्भातले, आपल्या वैयक्तिक आयुष्यातले, काही निर्णय घेताना गुंतागुंत होते, कोणीतरी सल्ला द्यावा, पाठीवर धीराचा हात ठेवावा असे आपल्याला वाटते. अशा वेळी मी हमखास मामाला फोन करीत असे. शांतपणे सगळे ऐकून घेऊन, मोजक्या शब्दात त्याने एखादी गोष्ट सांगितली आणि ती पटली नाही असं घडत नसे. कितीही गंभीर वाटणार्‍या समस्येवर एका त्रयस्थ नजरेने बघू शकण्याची विलक्षण किमया त्याच्याकडे होती, तो स्वतः त्या समस्येचा भाग असला तरीही! जाताजाता कोपरखळ्या देण्याचं आणि नर्म विनोदाचा शिडकावा करण्याचं देणंही त्याला लाभलं होतं. 'मी म्हणतो म्हणून असं कर' असं एकदाही न म्हणता समोरच्याला सहजगत्या योग्य पर्याय निवडण्याच्या दिशेने नेणं हे मला केवळ अनुभवानं आलेलं शहाणपण वाटत नाही तर अतिशय प्रखर बुद्धिमत्तेचं, संयमी विचारसरणीचं आणि एकूण जीवनाकडेच एक प्रश्न म्हणून न पहाता एक संधी म्हणून पहाणार्‍या सकारात्मक मानसिकतेचं प्रतीक वाटतं!
************
पूर्वी कधीतरी आईशी बोलताना त्याच्या लहानपणच्या हकीगती समजलेल्या. स्वतः सातवीत असताना हा चौथीच्या स्कॉलरशिपचे पेपर्स तपासायचा (त्याच्या शिक्षकांनीच त्याला दिले होते तपासायला)!
दिवाळीचा फराळ रात्रीही चाखता यावा म्हणून ह्यानं त्याच्या आणि मोठ्या मामाच्या पांघरुणांना आतून खिसे शिवलेन आणि दिवसाच त्यात शेव, चकली, लाडू भरुन ठेवायचा. रात्री सगळे झोपले की डोक्यावरुन पांघरुण घेऊन ह्यांचा 'कुडुम्कुडुम' आवाज करत फराळ चालू! इतके इरसाल!!
मिरजेसारख्या गावात वयाच्या दहाव्या वर्षापासून ते सोळाव्या वर्षापर्यंत दरवर्षी स्वतःच स्वतःचं नाव नवीन शाळेत दाखल करुन घेणारा मुलगा किती तयारीचा असेल? आजोबांना हे माहीतच नव्हतं की हा असं काहीतरी करतोय. त्यांना हे समजल्यावर ह्यानं सांगितलं "मॅट्रिकसाठी सगळ्यात चांगले शिक्षक कुठच्या शाळेत आहेत हे कसं समजणार? त्यामुळे आधीपासूनच सगळ्या शाळा फिरुन बघितलेल्या बर्‍या!" आणि हे 'संशोधन' त्यानं मॅट्रिकला पहिला येऊन सत्कारणी लावलं! पीडी (प्रीडिग्री) नंतर ह्याने जाहीर केले की मी फर्ग्युसनला बीएससी ला जाणार! मुलगा लांब जाणार म्हणून माझ्या आजीच्या डोळ्यांना पदर आणि आजोबा नाराज. पणजोबा आजोबांना म्हणाले "विनायका, ही आग आहे! त्याला जायचे आहे तिकडे जाऊदे. उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय तो रहायचा नाही!"
आईशी बोलताना एक गोष्ट जाणवली की तो जसा उच्च शिक्षणाला बाहेर पडला तसा एकप्रकारे सर्व भावंडांपासून दूरदूरच गेला. मग पुढे नोकरी निमित्ताने भेटीगाठी कमी कमी होत गेल्या. पण आईच्या प्रत्येक वाढदिवसाला त्याचा फोन न चुकता येई. दूर असूनही त्यानं प्रत्येकाच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं होतं आणि त्यासाठी त्यानं जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते असं लक्षात येतं!
एका मध्यमवर्गीय घरातून पुढे आलेला हा मुलगा सर्वसाधारण गाव, नातेवाईक, ह्यांच्या गोतावळ्यातून आपले वेगळेपण लक्षात घेऊन संपूर्णपणे स्वतःच स्वतःचा मार्ग आखतो आणि त्यात यशस्वी होतो हे अचंबित करणारे वाटते. एकाच घरातली पाच सख्खी भावंडे किती वेगवेगळ्या प्रकारे वाढत जातात आणि आयुष्याच्या वाटचालीत कुठेकुठे जाऊन पोचतात ह्याचा विचार करतो तेव्हा 'घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे' हे गदिमांचे शब्द किती सार्थ आहेत ह्याची प्रचिती येते.
************
बीएससी नंतर पुढच्या शिक्षणाचं क्षितिज त्याला खुणावत होतंच. आयायएस्सी, बंगलोर इथून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ची डिग्री घेऊन तो बाहेर पडला तेव्हा संरक्षण खात्यातल्या नोकर्‍या खुणावत होत्या. एकेक पायरी झपाट्याने चढत डायरेक्टर पदाला पोचला. मध्यंतरीच्या काळात कधीतरी त्यानं आयायटी दिल्लीहून एम टेक सुद्धा केलं होतंन! भारतीय हवाईदलात आणि पायदळात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या 'इंद्रा' (Indian Doppler RADAR) ह्या अत्याधुनिक रडारच्या संपूर्ण निर्मितीत त्याचे फार मोठे योगदान होतं! तसंच भारताच्या अत्याधुनिक इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम 'संयुक्त' च्या निर्मितीमधेही त्यानं मोलाची कामगिरी बजावली होती. आपले माजी राष्ट्रपती 'मिसाईलमॅन' डॉ.अब्दुल कलाम ह्यांच्याबरोबर नुसते काम करण्याचीच नव्हे तर त्यांचा वैयक्तिक स्नेह संपादन करण्याची भाग्यशाली कामगिरी त्याने केली होती! मामाचा दिल्ली हैद्राबाद असा प्रवास असला आणि कलामही जाणार असले तर ते स्वतःच्या झेड सिक्युरिटीतून खास मामाला स्वतःबरोबर नेत असत! इतकी त्यांची जवळची ओळख होती आणि ह्याचा मला नक्कीच अभिमान आहे!
************
कोणतीही नवीन कल्पना कशी सुचते? प्रतिभा काय असते? अशा संदर्भात एकदा आमचं बोलणं चाललं होतं तेव्हा तो म्हणाला की संपूर्ण आयुष्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच वेळा मेंदूत खर्‍या अर्थाने नवीन कल्पनेचा 'स्पार्क' पडत असतो. स्पार्क पडण्याआधीचा वेळ हा स्पार्कच्या तयारीसाठी आणि नंतरचा वेळ पहिल्या स्पार्कचं मूर्त रुप साकार करणे आणि दुसर्‍या स्पार्कची तयारी ह्यातच जातो. सतत काहीतरी नवीन निर्मिती असा ध्यास नसतो. तसं झालं तर त्यात कृत्रिमता येते. सर्जन नसतं. प्रत्येक गोष्टीला आवश्यक तेवढा वेळ देणं गरजेचंच आहे, इतकेच नव्हे तर योग्य प्रकारे होणारी गोष्ट निसर्गतःच तेवढा वेळ घेते.
त्याचं वाचन अफाट होतं. इंजिनियरिंगची पुस्तके, मासिके इथपासून टाईम, नॅशनल गिओग्राफिक, मराठी, इंग्लिश ग्रंथ सगळं सगळं. कुठले कुठले संदर्भ अचानक द्यायचा की आपण अवाक! "तुझ्या लक्षात कसं रहात?" ह्यावर त्याचं उत्तर "लक्षात ठेवावं लागतंच नाही, ते रहातंच. तुझ्याही राहील!" एकदा बोलताना म्हणाला "समज आता मला तुकारामांवर वाचायचं आहे. तर मी काय करतो महिना-दोन महिने फक्त पुस्तकं गोळा करतो. 'तुकारामाची गाथा', अभंग, तुकारामांनी लिहिलेली आणि त्यांच्यावर लिहिलेली अशी मिळतील तितकी सगळी पुस्तकं गोळा करतो. एकदा पुरेशी पुस्तकं झाली की मग रात्रंदिवस फक्त तुकाराम! उठता बसता, जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा तुकाराम! शेवटी एकवेळ अशी येते की सगळ्या डोक्यात फक्त तुकारामच गच्च भरलेले असतात आणि ते ओसंडून वाहू लागतात. तसं झालं की मग काहीही लक्षात ठेवावं लागत नाही!" मी फक्त ऐकत होतो.
************
माझ्या प्रत्येक भारतभेटीत मी अण्णामामाला हैद्राबादला आवर्जून भेटायला जायचो. एकतर मी पुण्याहून हैद्राबादला गेलेला त्यामुळे वेळ कमी, त्यात तोही बंगलोर, दिल्ली, कलकत्ता, चेन्नै असा फिरत असायचा त्यामुळे फार मोठी भेट नसायची. पण त्याही वेळात तो जे सांगायचा ते नेमकं, मोजकं, थेट आणि बहुमूल्य! त्याच्या एका भेटीतली एक आठवण. तो मला काही महत्त्वाचं सांगत होता बोलताबोलता आम्ही एका कॅफेत गेलो. आत शिरलो. ढाणढाण म्यूझिक लावलं होतं. आम्ही बसलो. मला वाटलं आता हा म्यूझिकमुळे बोलणं थांबवेल. पण त्याचं लक्षही नव्हतं. तो बोलत होता, मी ऐकत होतो. थोड्या वेळाने तिथे जोराचे म्यूझिक आहे हे मीही विसरून गेलो! सगळं बोलणं झालं आम्ही बाहेर पडलो त्यावेळी मला तिथे म्यूझिक आहे हा साक्षात्कार पुन्हा झाला! मी विचार करत होतो की क्षणस्थ होणं ह्यालाच म्हणतात का? आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आणि फक्त तेच ध्यानी मनी असेल तर बाकीच्या सगळ्याचा विसर पडतो! हीच ती सिद्धी असेल का?
त्यावेळी तो म्हणाला होता की एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की हल्ली असं होतं की आपोआप ती गोष्ट माझ्यासमोर येते. म्हणजे असं की एखाद्या कल्पनेवर विचार चालू आहे. त्यातली एखादी जटिल संकल्पना सुटसुटीत व्हायला मदत करणारा लेख असलेलं एखादं मासिक अचानक समोर येतं आणि माझा प्रश्न सुटतो. हा चमत्कार नाही विषयाशी झालेल्या एकतानतेतून येणारी ही अनुभूती आहे!
************
२००७ च्या जानेवारीत मी सहकुटुंब भेटायला गेलो होतो. मी, बायको आणि मुलगा तीघांना पाहून त्याला फार आनंद झाला. एखादा तासच असू आम्ही पण तो भरभरुन बोलत होता. आपुलकीनं सगळ्यांची चौकशी करत होता. त्याच्या घराबाहेर एक उंटवाला आला होता. माझ्या मुलानं, मुकुलनं, उंटावर बसायचं म्हणून हट्ट धरला त्याला घेऊन मी चक्कर मारुन आलो. मामा कौतुकानं बघत होता. आजोबा असल्याचं कौतुक त्याच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं. "मुकुल स्मार्ट आहे रे. त्याची काळजी घे." माझ्या पाठीवर थाप मारत मामा म्हणाला. त्याला टाटा करुन आम्ही निघालो ती शेवटली भेट ठरेल असं वाटलंच नव्हतं. आम्ही बर्‍याचदा फोनवरुनही बोलत असू. क्वचित कधी फोन फार दिवसांनी झाला की तो म्हणायचा "अरे फोन करत जा. बरं वाटतं."
************
मला तो २००० सालच्या आधीपासून मेंटॉर म्हणून लाभला असता तर काय झाले असते? माझ्या आयुष्याने आणखी वेगळे वळण घेतले असते का? आज मी आणखी कुठे असतो? आजही प्रश्न येत रहातात. मी उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो. कधी सापडतात, कधी नाही. कधी सापडूनही समाधान होत नाही. तो नाहीये हे विसरुन कधीतरी तीव्रतेनं असं वाटतं की फोन करावा. सेलफोन हातात घेतो, मामाचा नंबर काढतो आणि लक्षात येतं... त्याचा फोन आणी ईमेल आयडी मी डिलीट केलेला नाहीये तेवढाही मला आधार वाटतो.
************
३० मे २००९. आज त्याचा प्रथम स्मृतिदिन. मला रडायला येत नाहीये. काळजात खोल कुठेतरी दुखतं. सगळं रितं वाटतं, असून नसल्यासारखं.
माझ्या विचारांना आणि एकूण आयुष्यालाच एक वेगळा आयाम देणार्‍या अण्णामामाला ह्या लेखाद्वारे श्रद्धांजली!

चतुरंग

समाजजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

टारझन's picture

29 May 2009 - 11:56 pm | टारझन

माझी ही श्रद्धांजली !!! :( :( :(
लेखणाबद्दल आम्ही पामर काय बोलणार ? क्लासिक ... आणि हो भावणा बर्‍याच जुळल्या हो

भडकमकर मास्तर's picture

29 May 2009 - 11:57 pm | भडकमकर मास्तर

एका हुशार शास्त्रज्ञाचा आणि जवळच्या नातेवाईक आणि मार्गदर्शकाची स्मृती जागवणारा उत्तम लेख...
...
लक्षात ठेवण्यासाठीचे अफाट वाचन आणि क्षणस्थ होण्याचा प्रसंग खूप आवडला...
असा थोर माणूस मामा म्हणून आपल्याला लाभला , आपण खूप नशीबवान आहात ..असे म्हणतो.. _/\_

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

विनायक प्रभू's picture

30 May 2009 - 6:42 am | विनायक प्रभू

असेच बोल्तो.

सहज's picture

30 May 2009 - 9:25 am | सहज

केवळ क्लासीक.

भाग्यवान आहात तुम्ही.

चकली's picture

1 Jun 2009 - 10:16 pm | चकली

अतिशय सुंदर लेखन.
चकली
http://chakali.blogspot.com

बहुगुणी's picture

29 May 2009 - 11:58 pm | बहुगुणी

फार छान लिहिलंयत. इतक्या स्पष्ट जाणीवेचं आयुष्य जगणार्‍या, कुशाग्र बुद्धीमान व्यक्तीचा नातेवाईक म्हणून घेण्यात तुम्हाला वाटणारा अभिमान रास्तच आहे. जे लिहिलंय ते तुमच्या आईंपर्यंत पोचवा, त्यांच्या भाऊरायाने तुमच्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम केलाय याची जाणीव त्यांना नक्कीच आनंददायी ठरावी.

विकास's picture

30 May 2009 - 12:09 am | विकास

>>>जे लिहिलंय ते तुमच्या आईंपर्यंत पोचवा, त्यांच्या भाऊरायाने तुमच्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम केलाय याची जाणीव त्यांना नक्कीच आनंददायी ठरावी.

असेच म्हणावेसे वाटले. लेख छानच आहे.

स्वाती दिनेश's picture

1 Jun 2009 - 12:28 pm | स्वाती दिनेश

लिहिलंय ते तुमच्या आईंपर्यंत पोचवा, त्यांच्या भाऊरायाने तुमच्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम केलाय याची जाणीव त्यांना नक्कीच आनंददायी ठरावी.
असेच म्हणावेसे वाटले. लेख छानच आहे.
विकास आणि बहुगुणी यांच्याशी सहमत आहे.
मामांच्या स्मृती जागवणारा लेख आवडला,
स्वाती

चित्रा's picture

30 May 2009 - 12:13 am | चित्रा

भावना समजू शकतात. आपल्या आईवडिलांखेरीज कितीतरी लोक आपल्या घडण्यात सहभागी असतात. अशा बुद्धिमान मामाचा सहवास तुम्हाला कळत्या वयात लाभला हेही थोडे नाही.

मुक्तसुनीत's picture

30 May 2009 - 3:07 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो ! चटका लावणारे , त्याच बरोबर स्फूर्ती देणारे लिखाण.

एक उत्तम दर्जाचे व्यक्तिचित्र लिहिण्याचे १००% श्रेय चतुरंगांना जाते !

अवलिया's picture

30 May 2009 - 6:09 am | अवलिया

हेच म्हणतो ! चटका लावणारे , त्याच बरोबर स्फूर्ती देणारे लिखाण.

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2009 - 1:28 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत.
अगदी असेच म्हणतो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

30 May 2009 - 1:46 pm | निखिल देशपांडे

अगदी असेच म्हणतो

==निखिल

अनामिक's picture

30 May 2009 - 12:49 am | अनामिक

काय लिहू? अतिशय हृदयस्पर्शी लेखण.
अण्णामामाबद्दल असलेला अभिमान, त्यांचा तुमच्या आयुष्यावर असलेला प्रभाव शब्दाशब्दातून जाणवला.

-अनामिक

सुरेख!!!
तुम्हाला वाटणारा अभिमान प्रत्येक वाक्यातून जाणवतो आहे.
लेख आवडला. आण्णामामांना माझीही आदरांजली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

केशवसुमार's picture

30 May 2009 - 7:35 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
तुम्हाला वाटणारा अभिमान प्रत्येक वाक्यातून जाणवतो आहे.
लेख आवडला. आण्णामामांना माझीही आदरांजली.
केशवसुमार..

मदनबाण's picture

30 May 2009 - 1:21 am | मदनबाण

अत्यंत हृदयस्पर्शी लेख...

मदनबाण.....

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2009 - 2:29 am | बिपिन कार्यकर्ते

रंगा, तुझा मामा तू खूपच छान आणला आमच्या समोर. माझीही श्रध्दांजली. तुझ्या पणजोबांनी बरोबर जोखलं होतं पाणी. इतके चतुरस्त्र बहुश्रुत व्यक्तिमत्व तुला अधिक लाभले असते तर... खरंच, कधी कधी हे 'तर...' खूपच त्रास देतात.

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 2:46 pm | धमाल मुलगा

अण्णामामांसारख्या हुशार कर्तबगार शास्त्रज्ञाला माझीही श्रध्दांजली.
_/\_

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

संदीप चित्रे's picture

30 May 2009 - 2:34 am | संदीप चित्रे

तुझ्या मामांना माझीही विनम्र श्रद्धांजली.
>> माझ्या आयुष्यावर अतिशय प्रभाव टाकणार्‍या ज्या काही व्यक्ती आहेत त्यात आण्णामामा आहे.
आयुष्यात असं कुणीतरी 'मेन्टॉर' असलं की खूप आधार असतो.
स्पार्क पडण्याचा रेफरन्स वाचून वपुंच्या ओळी आठवल्या -- एक क्षण भाळण्याचा, बाकी सारे क्षण सांभाळण्याचे.

आण्णामामांबद्दलचा तुझा सार्थ अभिमान मनाला भिडला. पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 4:10 am | विसोबा खेचर

रंगा,

सु रे ख..!

मामासाहेबांना सलाम...!

तात्या.

स्वामि's picture

30 May 2009 - 8:05 am | स्वामि

आपण खरोखरच नशीबवान आहात.आपण लिहीलेल्या आठवणी मनात घर करुन रहातील.मामांना त्रिवार सलाम.

क्रान्ति's picture

30 May 2009 - 8:45 am | क्रान्ति

आणि हृदयस्पर्शी लेख खूप आवडला. आण्णामामांना सादर श्रद्धांजली.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

प्रमोद देव's picture

30 May 2009 - 9:32 am | प्रमोद देव

रंगाशेठ आपण आपल्या आण्णामामांना आम्हा सर्वांना भेटवलंत त्याबद्दल आपले आभार.
अतिशय परिणामकारक असे व्यक्तीमत्व आपण रंगवलंय.
माझा मामासाहेबांना प्रणाम!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

दशानन's picture

30 May 2009 - 9:50 am | दशानन

अतिशय हृदयस्पर्शी लेखन

थोडेसं नवीन !

यशोधरा's picture

30 May 2009 - 9:53 am | यशोधरा

सुरेख जमलं आहे आण्णामामांचे व्यक्तीचित्रण.

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2009 - 10:28 am | प्रकाश घाटपांडे

चतुरंगजी ,वाचता वाचता आम्हीही आण्णामामांचे भाचे बनुन गेलो. भावपुर्ण आदरांजली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पिवळा डांबिस's picture

30 May 2009 - 10:28 am | पिवळा डांबिस

संपूर्ण आयुष्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच वेळा मेंदूत खर्‍या अर्थाने नवीन कल्पनेचा 'स्पार्क' पडत असतो. स्पार्क पडण्याआधीचा वेळ हा स्पार्कच्या तयारीसाठी आणि नंतरचा वेळ पहिल्या स्पार्कचं मूर्त रुप साकार करणे आणि दुसर्‍या स्पार्कची तयारी ह्यातच जातो. सतत काहीतरी नवीन निर्मिती असा ध्यास नसतो. तसं झालं तर त्यात कृत्रिमता येते. सर्जन नसतं. प्रत्येक गोष्टीला आवश्यक तेवढा वेळ देणं गरजेचंच आहे, इतकेच नव्हे तर योग्य प्रकारे होणारी गोष्ट निसर्गतःच तेवढा वेळ घेते.
अगदी खरं आहे....
हॅटस ऑफ टू युवर अण्णामामा...

श्रावण मोडक's picture

30 May 2009 - 11:22 am | श्रावण मोडक

सलाम!!!

दिपक's picture

30 May 2009 - 11:33 am | दिपक

भावपुर्ण लिखाण. भावनिक पण शिकण्यासारखे.
अण्णामामाला माझीही आदराजंली !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2009 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हृदयस्पर्शी लेख , मामांना माझीही श्रद्धांजली !

-दिलीप बिरुटे

मीनल's picture

30 May 2009 - 7:40 pm | मीनल

+१
मीनल.

वेताळ's picture

30 May 2009 - 7:58 pm | वेताळ

मामा असावा तर असा....मामांना आदरांजली
एक विचारायचे होते रंगाशेट. आपल्या मामांचे नाव काय हो? जरा सांगितले तर बर होईल.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

मेघना भुस्कुटे's picture

30 May 2009 - 9:44 pm | मेघना भुस्कुटे

क्षणस्थ. काय सुंदर शब्द आहे हो!
आपल्या माणसांबद्दल लिहिताना भीती वाटते. एखाद्याकडे अलिप्तपणे बघण्यासाठी हवं असतं तितकं अंतर त्यांच्यात आणि आपल्यात नसतंच. शिवाय जिवाजवळच्या माणसांना असं शब्दात बसवणंही नको वाटतं. पण कुठल्यातरी टप्प्यावर तुमच्या मामानं म्हटलं आहे तसं ओसंडून जाऊन शब्द वापरण्याची वेळ येतेच.
फार सुरेख झाला आहे लेख.

नंदन's picture

2 Jun 2009 - 12:13 am | नंदन

आहे, लेख अतिशय आवडला. भावनिक पण कुठेही शब्दबंबाळ न होणारा, अतिशय संतुलित लेख.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

खरे तर अशा वैयक्तिक नातेसंबंधातल्या व्यक्तीवर लिहावे की नाही असा प्रश्न मला पडला होता; परंतु त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भता बघता ते केवळ माझ्यासाठीच नव्हे तर कदाचित इतरांसाठीही प्रेरणादायी ठरु शकेल अशा अंदाजाने/आशेने मी हे लिहायचे धाडस केले.
कोणाला ह्यात वैयक्तिक थोरवी गायली असल्याचा दोष वाटला तर मी तो नाकारत नाही, त्याचा माझ्यावरचा प्रभाव पहाता तसे घडू शकते. तरीही शक्यतोवर व्यक्तिपूजना पलीकडे जाऊन गुणांचा एक पट मांडण्याचा प्रयत्न होता.
(असा लेख लिहिताना आपले शब्दसामर्थ्य किती तोकडे आहे ह्यची वारंवार प्रचिती आली! )
पुनश्च एकवार सर्वांचे आभार! :)

(समाधानी)चतुरंग

एखाद्या असामान्य व्यक्तीच्या कर्तृत्वाचे विहंगावलोकन अत्यंत समर्पक शब्दात केलेत.
हा लेख कॉपी करून अनेकांना पाठवण्याचा विचार आहे.
आपली हरकत नसेल असे गृहित धरतो.

टीपः ह्या असामान्य असामीचे नांव गुप्त का ठेवलेत?
आपल्या महाराष्ट्रातले मोजकेच लोक DRDO, ISRO, HAL सारख्या संस्थात उच्चपदाला पोचतात.
आपल्या मामांचे नांव कळले तर आनंद होईल.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

31 May 2009 - 9:27 pm | चतुरंग

लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही लेख इतरांना नक्कीच पाठवू शकता.

मामांच्या नावाची विचारणा बर्‍याचजणांनी केली पण मी मामेबहिणीला दिलेल्या शब्दाने बांधला गेलोय की नाव न लिहिता मी लेख देईन, तिच्या भावना महत्त्वाच्या, त्यामुळे क्षमस्व.

चतुरंग

काळा डॉन's picture

1 Jun 2009 - 8:09 am | काळा डॉन

ज्यांना उत्सुकता असेल त्यांना व्यनितुन कळवा..शिंपल! वचनही पाळले जाईल आणि नावही कळेल.

बाकी लेख अगदी आतुन आला असला तरी बराचसा विस्कळीत वाटला.

प्राची's picture

31 May 2009 - 11:48 pm | प्राची

मामांबरोबरचे प्रत्येक प्रसंग काहितरी नवीन शिकवणारे आहेत.खरोखरच,लेख स्फूर्ती देणारा आहे.
अण्णमामांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अभिज्ञ's picture

1 Jun 2009 - 3:06 pm | अभिज्ञ

सुंदर लेख.
असा माणुस इतक्या जवळच्या नात्यात असणे म्हणजे खरोखर भाग्यवान आहात.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

भाग्यश्री's picture

2 Jun 2009 - 12:08 am | भाग्यश्री

लेख आवडला.. माझीही श्रद्धांजली.. अशी माणसं आपल्या आयुष्यात येणं हे भाग्याचंच असतं!

www.bhagyashree.co.cc

उपास's picture

3 Jun 2009 - 11:00 pm | उपास

रंगाशेठ, प्रचंड आवडलं व्यक्तिचित्रण.. अगदी संयत तसच व्यक्ति म्हणून मामांची ओळख करुन देणारं. प्रत्येक कुटुंबात असा एखादा मापदण्ड असतोच. तो असा टिपणं महत्त्वाचं. लेखातली काही वाक्ये विशेष आवडली, जसे की -
'मी म्हणतो म्हणून असं कर' असं एकदाही न म्हणता समोरच्याला सहजगत्या योग्य पर्याय निवडण्याच्या दिशेने नेणं हे मला केवळ अनुभवानं आलेलं शहाणपण वाटत नाही तर अतिशय प्रखर बुद्धिमत्तेचं, संयमी विचारसरणीचं आणि एकूण जीवनाकडेच एक प्रश्न म्हणून न पहाता एक संधी म्हणून पहाणार्‍या सकारात्मक मानसिकतेचं प्रतीक वाटतं!
छान!