मराठी कविता म्हटले की, बालकवीशिवाय पुढे जाता येणार नाही. बालकवींची कविता वाचून मन वेडावून जाते. त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी यांचे बालपण खेड्यात गेलेले. वडिलांची नौकरीनिमित होणार्या बदलीमुळे त्यांना वेगवेगळ्या गावात जाता आले. निसर्गाच्या सहवासातच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणीच पाने फुले गोळा करण्याचा नाद त्यांना निसर्ग विषयक लेखनाकडे असे ओढत गेला. गावाच्या बाहेर जाऊन सूर्यास्त निरखत राहणे, नदीला निरखत बसणे. असे निसर्गात रममाण होण्याची ऊर्मी बालकविंना लहानपणापासून होती. आणि कवितांच्या आद्याक्षरावर कवितांच्या भेंड्या अडल्या की, स्वतःच एखाद्या कवितेची निर्मिती करायचे. आणि खेळाला पुढे न्यायचे. त्यांच्या कवितेचे कौतुक हे त्यांच्या मोठ्या बहिणीनेच केले. बालकवींच्या पहिल्या कवितेची गोष्ट अशीच आहे. त्यांच्या बहिणीच्या दिराबरोबर कवी असाच वनात गेल्यावर त्यांना वनात दिसणाऱ्या झाडांवर कविता करण्याचा मोह आवरला नाही. कटाव खेळण्याचा नादात त्यांच्या कवितेला सुरुवात झाली.
निंब, जांब, जांभूळ, शेंदरीतुळशी बहुतची झाक मारी:जणू काय ती येत धावुनी,असेच वाटे पाहा साजणी,पुढे पाहिली खैरी झाडेजणू करिती ती हात वाकडे:यावर त्यांचे स्नेही म्हणाले की, इथे खैरीची झाडे कुठे आहेत. तेव्हा ते म्हणतात खैरांच्या झाडांशिवाय या वनातील झाडांचे वर्णन पूर्णं होणार नाही. म्हणजे जे दिसत नव्हते. त्याचे वर्णन बालकवींनी इथे केल्याचे दिसते. याच ओळींबरोबर पुढे त्यांनी कल्पना करून-
अशा वनी मी ऐकली मुरलीतिला ऐकुनी वृत्ती मुरालीकाय कथू त्या सुस्वर नादापुढे पाहिले रम्य मुकुंदा!पुढे या कवितेत बर्याच ओळी आहेत पण पहिली कवितेची कथा अशी सांगितल्या जाते. बालकवींना आपल्या अवतीभोवतीचे सामाजिक राजकीय वास्तवतेचे भान नव्हते का? असा प्रश्न नेहमी विचारल्या जातो. बालकवी केशवसूत संप्रदायातले होते का नव्हते तो भाग सोडून देऊ. पण निसर्गसानिध्य, जातिरचना, सुनितरचना, व काव्यातील काही कल्पना यावर केशवसुतांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. केशवसुंताच्या 'तुतारी' वरून त्यांनी 'धर्मवीर' कविता लिहिली. असे म्हटल्या जाते. धर्मवीर कवितेत उसना आवेश आहे. 'तेजाचा धर्म' काय याची तोंडओळख तरी बालकवींना होती का असा प्रश्न विचारल्या जातो. बालकवींची कल्पनाशक्ती जे दिसते ते मांडण्यापुरतीच होतीच असे वाटायला लागते. बालकवींचे काव्य म्हणजे चांदणे, मंद वार्याची झुळुक, हिरवळ अशा एका मर्यादेपर्यंत त्यांची कविता फुलतांना दिसते. कवीचे निसर्गविषयक निरीक्षण आणि त्याचे वर्णन याबाबतीत जरा त्यांना मर्यादाच पडते असेही वाटते. 'फुलराणी' आणि 'तारकांचे गाणे' यात कवी अतिशय तन्मय झालेला दिसतो. पण येणार्या उदासीनतेवर त्यांना काय करावे हे मात्र कळत नाही असे वाटते.
'कोठूनी येते मला कळेनाउदासिनता ही र्ह्दयालाकाय बोचते ते समजेनार्ह्दयाच्या अंतरर्दयाला....
त्याची शेवटची ओळ अशी आहे.
तीव्र वेदना करिती, परी तीदिव्य औषधी कसली त्याला.
किंवानिराशा कवितेत
रात्र संपली, दिवसही गेले,अंधपणा ये फिरुनि धरेला;खिन्न निराशा परि र्दयाला- या सोडित नाही. इथपर्यंत कवी निराशेला सहज व्यक्त करतांना दिसतो. पण जे काही आहे, ते निसर्गाच्या माध्यमातून व्यक्त झाले पाहिजे. त्यासाठी निसर्गाचा आधार घेत निसर्ग कसा आनंददायी आहे, आणि माझ्या वाटेला हे असे का येते. त्याच्यासाठी शब्दांची गुंफन कवी करतो-
नित्यापरी रविकिरणे देतीरंग मनोहर सांध्यमुखीं ती,खळबळ ओढा गुंगत गीती-राईतुनि वाहे.
सुंदर सगळें, मोहक सगळे,खिन्नपणा परि मनिंचा न गळेनुसती हुरहुर होय जिवाला- का न कळे काही...... (अपूर्ण कविता)
स्वतःच्या येणाऱ्या उदासपणाला त्यांच्याकडे कोणतीही औषधी नाही. बाल्य आणि तरुणपाच्या वाटेवरील स्वप्न आणि वास्तव यांच्यातल्या द्वंदात मात्र बालकवी गोंधळून जातात असे वाटते. बालकवींनी लहानमुलांसाठीही कविता लिहिल्या त्यातील 'चांदोबा मजला देई' 'रागोबा आला' 'माझा भाऊ, यासारख्या प्रसंगाच्या निमित्ताने काही कविता लिहिल्या आहेत. त्यांची संवादाच्या स्वरुपातील 'चिमणीचा घरटा चोरीस गेला. ' ही कविता मला आवडते.
चिव चिव चिवरे! तिकडे तू कोण रे!कावळे दादा, काव़ळे दादा, माझा घरटा नेलास बाबा?नाही ग बाई, चिमुताई, तुझा घरटा कोन नेई.चिमणी पुढे कपिला गाईकडे जाते, कोंबडीकडे जाते आणि नंतर पोपटाकडे जाते तोच प्रश्न त्यालाही विचारते.. तेव्हा तो म्हणतो माझ्या पिंजऱ्यात ये, माझा पिंजरा छान आहे. चिमनीचे उत्तर आणि बालकवीची कल्पना इथे अतिशय भावते.
'जळो तुझा पिंजरा मेला! त्याचे नाव नको मलाराहीन मी घरट्याविना! चिमणी उडून गेली राना.
मुक्त राहण्याची कल्पना अतिशय सुरेखपणे बालकवींनी मांडली आहे. बालकवींच्या या कविताही सुरेख असल्या तरी त्यावरही प्रभाव 'दत्त' कवीचा आहे. पुढे अनेक निसर्गकविता लिहिणार्या कवीने बालकांसाठीच्या कविता लिहिल्याच नाहीत त्याचे कारण इथेच सापडते असे वाटते. बालकवीच्या कवितांमधून निसर्गाचे वर्णन करता करता त्याच्यात रंगसंगती निर्माण करतांना आपल्याला दिसतात. बालकवींना वेगवेगळ्या रंगछटांचे खूपच आकर्षण दिसते. निसर्गवर्णन करणार्या कवितेत अशी रंगाची उधळण जागोजागी दिसून येते. 'हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमलीचे ' पांघरली जरतार जांभळी वनमाला शाल' 'रात्र काळी, आकाश कृष्णवर्ण' 'फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा' 'लाल लाल वन दिसूं लागले' 'सांज खुले सोन्याहुनी पिवळें हे पडले ऊन- चोहींकडे लसलशीत बहरल्या हिरवाळी छान' रंगाबरोबर बालकवी आपल्या लेखनीने प्रतिसृष्टी निर्माण करतांना दिसतात. निसर्गाचे नुसते रुप कवितेतून ते मांडत नाहीतर त्यात ते जीव ओततात. वेगवेगळ्या रंगछटांतून भोवतालच्या सृष्टीतील उल्हासाचा कवीला प्रत्यय येतो. रंगाच्या आकर्षणाबरोबर चित्रमय कविता उभी करणे हा बालकवींचा विशेष आहे. अनुप्रास प्रधान रचना, विशिष्ट शब्दांचा परिणाम होण्यासाठी शद्बांची द्विरुक्ती करणे हे त्यांच्या रचनेचे वैशिष्ट्ये. 'थवथवती, 'डोलडोलती, 'सळसळती, अशा अनेक शंब्दांचा नाद कविता वाचताना (ऐकायला येतो) दिसून येतो. त्याचबरोबर कवितेतून दुष्य डोळ्यासमोर उभे करणे त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहे. 'खेड्यातील रात्र' 'पारवा' या कवितेत गंभीर निराश करणारे वातावरणाची निर्मिती दिसून येते. विविध चित्रविचित्रभावना शब्दातून व्यक्त होताना दिसतात.. 'खेड्यातील रात्र' कवितेत कवी म्हणतो -
त्या उजाड माळावरतीबुरुजाच्या पडल्या भिंतीओसाड देवळापुढतीवडाचा पार-अंधार दाटला तेथ भरे भरपूर..
पुढे कवितेत, भालू ओरडती, वार्यात भुते बडबडती,डोहात सावल्या पडती, अशा त्या खेड्यातील रात्रीचे वर्णन येते. अगदी तशीच पारवा नावाची कविता-
भिंत खचली, कलथून खांब गेला,जुनी पडकी उद्वद्ध्स्त धर्मशाळी:तिच्या कौलारी बसुनि पारवा तोखिन्न नीरस एकांतगीत गातो. (अपूर्ण कविता)पुढे कवितेत तो पारवा मानवी व्यवहारापासून त्यांच्या दु:खापासून खूप वेगळे आहेत. आणि तो कोणते करुणगीत घुमवित आहे असा विचार कवितेत आहे. ' दु:खनिद्रे निद्रिस्त बुद्धराज, करुणगीते घुइमवीत जगी आज'' इथे जरा वेगळी कल्पना आहे का अशी शंका डोकावते. असो, असे असले तरी बालकवींच्या कवितेवर एक आरोप केला पाहिजे की, बालकवींची कविता निसर्गदृष्याचा विपर्यास करते. अवास्तव कल्पनांची करामत त्यांच्या कवितेत दिसते. ' औदुंबर' सारख्या कवितेवर कल्पनाशून्यतेचा आरोप केला जातो. ' ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो, बेटाबेटांतुन चार घरांचे गाव चिमुकले, पैल टेकडीकडे; शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी, पुढे पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे..इत्यादी इत्यादी. अर्थात समीक्षक अजूनही तिचा अर्थ लावतात म्हणे...! (?) वास्तव चित्र असूनही शब्दवर्णनामुळे त्या कवितेला किती श्रेष्ठ म्हणायचे (कल्पनेच्या अभावामुळे ) असा विचार डोकावतोच. तरिही तेव्हा लक्षात हे घ्यावे की, ते संपूर्ण चित्र एक प्रतिमा होऊन जाते. 'पाऊस, श्रावणमास, मेघांचा कापूस' या सारख्या कवितांमधून केवळ निसर्गनिरिक्षणच दिसून येते. त्यात कल्पनेला अधिक वाव नाही असे वाटते. 'मेघांचा कापूस' कविता मला तशीच वाटते.
फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा.वरुनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा:त्यातहि हसली मंदपणे ती चंद्रकला राणी:कडेकडेच्या मेघांवर ये मोत्याचे पाणी. निसर्गात रमणारा, सुंदर-सुंदर वर्णन करणारा कवी, आनंदाची पखरण करणारा कवी प्रेम कविताही करतो पण त्यालाही दु:खाची किनार दिसते. प्रीती हवी तर या कवितेत कवी म्हणतो-
प्रीती हवी तर जीव अधी कर अपुला कुरबान,प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान!किंवा'प्रीती व कर्तव' या कवितेत कवी म्हणतो
प्रीतीचा पथ हा भयाकुल दिसे सौंदर्य- सौदामिनीडोळ्यांना क्षण तेज दाखवुनी या अस्तंगता हो क्षणी:चित्तांमाजी विकारसिंधू खवळे चांचल्य जीवी भरे,नेत्रातून उदास तेज जगती वेड्यापरी वावरे, -
'कवीची इच्छा' या कवितेत शेवटच्या ओळीत कवी म्हणतो-
पुरे संबंध प्रेमाचा -नको हा खेळ प्रेमाचाखरा जो प्रीतिचा प्याला जगी प्याला, सुखी झाला...वर उल्लेखलेल्या कवितांमधून दिसते की, कवी प्रेमाच्या बाबतीत जरा काही अंतर राखून आहे, अर्थात कवीचे वैयक्तिक आयुष्य तितके सुखकारक नव्हते. त्यामुळे जे दु:ख वाट्याला आले तेच कवितेमधून व्यक्त होताना दिसते. प्रेम उत्कट आहे तर दुसर्या बाजूला ते काही अपेक्षा बाळगते. आपल्या मनातील प्रेमभावना ते निसर्गातूनच भरून काढतात. 'अरुण' याकवितेत दिवस हा प्रियकर तर रजनी प्रेयसी अशी कल्पना दिसून येते. 'फुलराणी' मध्ये फुलराणीच्या व किरणाच्या मिलनाचे वर्णन कवितेत येते. निसर्गाच्या माध्यमातून कवी आपले प्रेम व्यक्त करतो. पण ते प्रेम कोणावर आहे, याचा मात्र उलगडा होत नाही. बालकवींच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्ये हे की, शब्दांना ते एक वेगळेच रुप देतात. जसे 'कळी' ला 'फुलराणी' काजव्यांना 'इवल्याशा दिवल्या' म्हणतात. 'पक्षांना' 'सृष्टीचे भाट' म्हणतात. आणि मेघांना 'गगनातले व-हाडी' म्हणतात. बालकवींना मानवी व्यवहारातील भावना निसर्गात दिसतात. आणि भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणूनही ते निसर्गाशी एकरुप झालेले दिसतात. बालकवीच्या भाषेत अवीट गोडवा आहे. जसे चाखू तसा त्याचा गोडवा वाढत जातो. बालकवींच्या बर्याच कविता ह्या निसर्गविषयक आहेत. प्रेमपर, तात्त्विक, वैचारिक, असे विविध वर्गीकरण केले तरी त्यांची प्रमुख कविता ही निसर्गविषयकच आहे त्यात काही वाद नाही. कवितेमधील प्रतिमा या निसर्गविषयकच आहेत. त्यांच्या चरित्रात म्हटले आहे की, बालकवीं जेव्हा कविता करायचे तेव्हा एखादी कविता मनाजोगती उतरली नाही की, त्या कागदाचा चुरगाळा करून टाकायचे किंवा फाडून तरी टाकायचे. किंवा पुन्हा-पुन्हा लिहून काढायचे. त्यांच्या अशा कितीतरी कविता अपूर्ण आहेत. असे असले तरी निसर्गाशी एकरुप झाल्यामुळे त्या र्हदयस्पर्शी उतरतात. बालकवी जात्याच सौंदर्यवादी होते. सृष्टीतील चैतन्यावर त्यांचे प्रेम दिसून येते म्हणून तर ते म्हणतात-
सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावेचैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. बालकवी प्रसन्न वृत्तीचे तसे ते बालवृत्तीचे(च)आहेत. कधी-कधी खूप निराशही होतात. अर्थात त्यांचा बालस्वभाव हा बऱ्याचदा आडवा यायचा त्याबद्दल अनेकांनी तसे लिहिले आहेच. पण त्यांची निसर्गविषयक मराठी कविता कशी अजरामर झाली तिचे कारण प्रत्येकाला कवितेत वेगवेगळ्या अर्थांचे (प्रतिभेचे/ प्रतिमेच) पदर सापडतील. मला अजूनही त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या आनंदी-आनंद, अरुण, निर्झरास, संध्यारजनी, फुलराणी, तारकांचे गाणे, श्रावणमास, औदुंबर, खेड्यातील रात्र; पारवा,या कविता दरवेळेस वाचताना एक नवीन आनंद देतात. तेव्हा त्यांच्या कवितेचा कितीही आस्वाद घेतला तरी तो अपूर्णच वाटतो. मात्र शब्दांच्या साह्याने चित्र निर्माण करणारा एखादाच कवी जन्माला येतो. अनेक मोठ-मोठ्या कवींचा सहवास लाभलेला हा कवी आयुष्याच्या अठ्ठावीस वर्षात दिडेकशे कविता (पूर्ण-अपूर्ण) विविध विषयांवरच्या लिहितात. गद्यलेखनही भरपूर करतात. तेव्हा बालकवी एक सृष्टीतला चमत्कारच होता असे म्हणून त्यांच्या कवितेचा कितीही आस्वाद (सकारात्मक/ नकारात्मक) घेतला तरी तो कमीच पडतो असे म्हणून थांबावेसे वाटते.
संदर्भ : लेखनासाठी कविता 'समग्र बालकवी' संपादिका श्रीमती पार्वताबाई ठोमरे ; व्हीनस प्रकाशन पुणे (आवृत्ती पहिली सप्टेंबर १९६६) यातून घेतले आहेत. [चरित्राविषयक माहिती आणि लेखनावरील काही प्रभाव त्यातलाच आहे]
-अपूर्ण
टीपः मला बालकवींच्या कवीतेबद्दल जे वाटले ते लिहिलेच आहे. तरिही,बालकवींच्या कवीतेवर आस्वादत्मक किंवा इतर पैलुंवर प्रकाश टाकणार्या, लेखात भर घालणार्या प्रतिसादांचेही स्वागत आहे.
प्रतिक्रिया
13 May 2009 - 1:49 pm | अवलिया
वा ! दिलीपशेट !!
सुरेख लेख!
येवु द्या अजुन असेच सुंदर सुंदर लेख तुमच्या लेखणीतुन !!
वा !!
(दिलीपशेटचा पंखा) अवलिया
13 May 2009 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार
असेच म्हणतो.
कवितेच्या बाबतीत आम्ही दगडच पण तुमचा ओघवत्या भाषेतील लेख वाचायला मस्त वाटले. लेख आवडला.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
13 May 2009 - 2:02 pm | निखिल देशपांडे
येवु द्या अजुन असेच सुंदर सुंदर लेख तुमच्या लेखणीतुन !!
असेच म्हणतो हो प्रा.डॉ
==निखिल
13 May 2009 - 3:08 pm | क्लिंटन
प्राध्यापक साहेब,
कविता, ललित साहित्य यासारख्या विषयांपासून खरे सांगायचे तर मी अंतर राखून असतो .पण तरीही आपला लेख खूप आवडला तो आपल्या ओघावत्या भाषाशैलीमुळे आणि त्यातील ’कन्टेन्ट’ मुळे.अगदी आपल्या वर्गात बसल्यासारखे वाटले. असे इतर कवींविषयीही लेख येऊ द्यात.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
13 May 2009 - 2:36 pm | नंदन
सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
13 May 2009 - 2:14 pm | विसोबा खेचर
सुरेख लेखन...
सर, आपल्या व्यासंगाला प्रणाम...
तात्या.
13 May 2009 - 7:45 pm | बिपिन कार्यकर्ते
हेच बोल्तो.
बिपिन कार्यकर्ते
13 May 2009 - 2:19 pm | विजुभाऊ
सुंदर लिखाण.
इतकी छान समिक्षा बरेच दिवसानी वाचायला मिळाली.
13 May 2009 - 2:26 pm | वडापाव
आचार्य अत्रे यांच्या या आत्मचरित्रात बालकवींविषयी काही माहिती आली आहे. विशेषकरून त्यांच्या मृत्युच्या वादाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आपण वाचली असेल, तर उत्तमच ! पण माहितीवरून अत्रे हे बालकवींचे देखील भक्त होते असेच वाटते.
बाकी आपला लेख छान आहे. माझे सध्या कर्हेचे पाणी याचेच वाचन सुरू आहे. यात गोविंदाग्रजाबद्दल अत्र्यांनी केलेल्या मतप्रदर्शनामुळे त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यास मी उत्सुक आहे. आपणाला माहिती असल्यास पुढच्या लेखात जरूर प्रकाशित करावी, अशी विनंती.
आपला नम्र,
वडापाव
13 May 2009 - 2:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भादली स्टेशनावर (भुसावळ आणि जळगावच्या मधे ) रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या पटरीत ट्रॅक बदलतात तिथे पाय अडकून पडल्यामुळे मालगाडी अंगावरुन गेली इतकीच माहिती आहे. त्याव्यतिरिक्त कोणती माहिती आपल्याकडे आहे ? मला उत्सुकता आहे !
अवांतर : पुढे कोणतेही लेखन करणार नाही हो, हेच लेखन अपूर्ण वाटते म्हणून तसे लिहिले.
-दिलीप बिरुटे
13 May 2009 - 3:16 pm | चिरोटा
अशीच जरा वेगळी माहिती शाळेत शिक्षकानी सांगितली होती.मालगाडीला सिग्नल होता म्हणून थांबली होती.ट्रॅक च्या दुसर्या बाजुला त्याना जायचे होते.म्हणून ते डब्याखालून जावू लागले आणि गाडी चालु झाली.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
13 May 2009 - 4:19 pm | वडापाव
ही गोष्ट अत्रेंनी लिहीली आहे. यात मी फक्त वाचकाची भूमिका बजावली आहे :
५ मे १९१८ चा तो दिवस होता. खानदेशात भादली स्टेशनजवळ एका सकाळी तो अपघात झाला. स्टेशनपासून काही अंतरावर आगगाडीचे दोन फाटे फुटतात. यांपैकी एका फाट्यावर बालकवी उभे होते. कारण त्या फाट्यावरून जाणारी गाडी आधीच येऊन गेली पाहिजे अशी बालकवींची समजूत होती. पण, त्या दिवशी त्या गाडीला उशीर झाला होता. ती गाडी समोरून येताना बालकवीनी पाहिली. त्यांना वाटले, की ती गाडी दुसर्या फाट्यावरून जाणारी आहे.म्हणून डाव्या हातावर तंबाखू घेऊन तिला चुना चोळीत ते विमनस्कपणे त्या फाट्यावर तसेच उभे राहिले. एवढ्यात ती गाडी एकदम त्यांच्या अंगावर आली आणि तिच्याखाली सापडून त्यांचे तीन तुकडे झाले.
पुढे त्यांनी असेही लिहीले आहे की बालकवींना मृत्यु का आला ह्यासंबंधीची एक विलक्षण हकिकत 'बालकवी' चे चरित्रकार श्री. कृ. बा. मराठे यांनी आपल्या पुस्तकात दिलेली त्यांना आढळली.
ती येथे सांगितल्यास बालकवींचे चरित्र वाचताना त्याबद्दलची उत्सुकता राहणार नाही, म्हणून येथे मी देत नाही.
आपला विनम्र,
(अत्रेभक्त) वडापाव
13 May 2009 - 4:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मृत्यू त्यांचा आपण म्हणता तसेच झाला. त्याबाबतीत इतर हकीकत माहिती नाही, वाचनात ही नाही. पण कोणी ज्योतिषाने त्यांना 'चैत्रातली नवमी घाततिथी असे सांगितले होते 'बालकवी तसे त्या तिथींना डचकूनच असायचे. त्या संबधी एक आठवण वरील पुस्तकात आहेच. ''बालकवींचे पुण्याचे मित्र श्री. भा. नी. सहस्त्रबुद्धे लिहितात, 'बालकवींचा मृत्यू १९१८ साली पाण्यात बुडून किंवा आगगाडीखाली सापडून अपघाताने होईल असे भाकीत केले होते. बालकवींना ते प्रत्यक्ष माहीत नव्हते. मात्र दुर्दैवाने ते भविष्य खरे ठरले. '' ( समग्र बालकवीत पृ.क्र. ३३ वर याचा उल्लेख आहेच)
मात्र या नंतरच्या कथा असाव्यात बाकी योगायोगाच्या गोष्टी आहेत असे वाटते.
-दिलीप बिरुटे
13 May 2009 - 2:27 pm | सहज
अजुनही कवितेतले तितकेसे(बरेचसे सगळेच) समजत नसले तरी लेख आवडला.
बालकवींच्या आयुष्यावर अजुन काहीतरी लिहलेत तर आवडेल.
13 May 2009 - 3:48 pm | अरुण वडुलेकर
अप्रतिम काव्यपरिचय.
बालकवी माझेही काव्यदैवत.
खूप लहानपणी त्यांच्या आनंदी आनंद गडेने जे वेड लावले
ते गारुड पुढे घोंघावतच गेले. त्या कवितेतील,
स्वार्थाच्या बाजारांत
किती पामरें रडतात
त्यांना मोद कसा मिळतो
सोडुनी स्वार्था तो जातो
द्वेष संपला
मत्सर गेला
आतां उरला
इकडे तिकडे चोहिंकडे
आनंदी आनंद गडे!
या ओळीतर अविस्मरणीयच
13 May 2009 - 3:54 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,
स्वाती
13 May 2009 - 4:45 pm | यशोधरा
वा, मस्त लेख!
13 May 2009 - 6:06 pm | लिखाळ
वा ! सर,
लेख आवडला.
बालकवींच्या काही कविता एक्-कविता या अनुदिनीवर वाचता येतील.
त्यांची 'आनंदी पक्षी' ही कविता मला फार आवडते.
......
हासवितो लतिकाकुंजांना प्रेमे काढी सुंदर तना
आनंदाच्या गाऊनी गाना आनंदे रमतो
...
...
बा आनंदी पक्ष्या देई प्रसाद आपुला मजला काही
जेणे मन हे गुंगुनी जाई प्रेमाच्या डोही
...
-- लिखाळ.
13 May 2009 - 7:21 pm | आनंदयात्री
सुरेख !!
बालकवींच्या कविता फार आवडतात !!
13 May 2009 - 7:28 pm | विकास
खूप चांगला लेख आणि विषय. आपण अपूर्ण असे लिहीले असले तरी अजून यात तसेच अशा इतर वाडम्यीन विषयांवर लिहीले जावे ही मनापासून विनंती!
बालकवींच्या कवितेतील निसर्गाने माझ्या सारख्या शहरात राहून त्या निसर्गास न पाहणार्याला पण वेड लावले होते. त्यांचे शब्द आणि त्या शब्दांची ठेवण या मुळे प्रत्येक कविता ही आकर्षक झाली होती. ती आनंदी असोत अथवा दु:खी/उदास.
आपण वर दिलेल्या "रात्र संपली दिवसही गेले..." या नैराश्य ह्या कवितेत मला त्यांच्यातील लपलेले नैराश्य दिसले होते. त्याच्या उर्वरीत ओळी काहीशा अशा आहेत (आठवणीतून):
मात्र नंतर त्यांनी त्याच्या खाली अपूर्ण असे लिहून गणितातील फर्मॅटच्या सिद्धांतासारखे एक वलय तयार केले. कुठेतरी वाटते की त्यांना ही कविता नंतर "भोवर्यातून" सुटलेल्या नायकाप्रमाणे, ढग विरल्येल्या आणि परत शुभ्र चांदण्याने काळोख दूर करणार्या चंद्राप्रमाणे करायची असावी...
ती कविता जरी त्यांनी पूर्ण केली नाही तरी, वर अरूणरावांनी म्हणल्याप्रमाणे, त्यांनी "आनंदी आनंद गडे" लिहीले आणि स्वतःची गीते ही लक्षात राहताना आनंदच होवूदेत असे वाटून की काय त्यांनी शेवटी (?) लिहीले असावे असे वाटते:
13 May 2009 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अपूर्ण असे लिहून गणितातील फर्मॅटच्या सिद्धांतासारखे एक वलय तयार केले. कुठेतरी वाटते की त्यांना ही कविता नंतर "भोवर्यातून" सुटलेल्या नायकाप्रमाणे, ढग विरल्येल्या आणि परत शुभ्र चांदण्याने काळोख दूर करणार्या चंद्राप्रमाणे करायची असावी...
काय सांगावे तसेही असेल ! ज्या बर्याच अपूर्ण कविता आहेत त्यात असा विचार नक्की करता येऊ शकेल !
13 May 2009 - 7:45 pm | क्रान्ति
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. बालकवींबद्दल खूपच चांगली माहिती लेख आणि प्रतिसाद दोन्हीतून मिळाली.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
13 May 2009 - 8:10 pm | चतुरंग
ह्या बालकवींच्या निसर्गकवितेची मोहिनी अजूनही मनावर आहे. अत्यंत चित्रदर्शी आणि गेय कविता असे बालकवींच्या कवितांचे वर्णन करावे लागेल. निसर्गाशी तादात्म्य पावलेला कवीच असे काव्य करु शकेल.
प्राडॉ. तुमचे लिखाण अतिशय भावले. 'समग्र बालकवी' ह्यात बालकवींच्या कवितांबद्दल, एकूण आयुष्याबद्दल चिंतनात्मक असे काही लिखाण आहे का? पण हे पुस्तक जरुर मिळवायला हवे असे वाटते.
उत्तम, अभ्यासपूर्ण लेखाबद्दल तुमचे अनेक आभार आणि अभिनंदन!
त्यांच्या इतरही कविता वाचनात आल्या त्यातली 'प्रीती हवी तर' ही कविता बघा -
प्रीती हवी तर जीव आधी कर अपुला कुर्बान,
प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान !
तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत,
याद ठेव अंगार जगाला लावील निमिषांत !
प्रीती निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी?
प्रीतीदेवी जगदेकवीर जो जाय तयापाठी !
नव्हे प्रीतीला रंग लाविला लाल गुलाबांचा,
परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा.
गुल गुल बोले प्रीती काय ती? काय महालांत?
प्रीती बोलते काळ घालिता कलिजाला हात !
स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला
हीन जिवाने घेऊ नये त्या जहरी प्याल्याला !
सह्य जिवाला होय जाहला जरी विद्युत्पात,
परी प्रीतीचा घात भयंकर दुसरा कल्पांत !
जीवंतपणी मरण घेउनी फिरणे जगतात;
साठविली ब्रम्हांडदाहिनी दाहकता यांत !
बालकवींचा प्रेमभंग झाला होता का? त्याने त्यांना नैराश्य आले असावे का?
'पारवा' सारखी एकाकीपणाने/नैराश्याने भरलेली गीते लिहून ते त्यांच्या मनाची तगमग शांतवीत असतील का? अतिसंवेदनाशील आणि प्रतिभाशाली मनाचे व्यवहारिक जगात धिंडवडे निघत असतील का? आणि ह्यातून येणार्या खिन्नमनस्कतेचा परिणाम तो दुर्दैवी रेल्वे अपघात होण्यात झाला असेल का? असे असंख्य प्रश्न मनात पिंगा धरुन रहातात!
चतुरंग
13 May 2009 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>बालकवींचा प्रेमभंग झाला होता का?
नाही ! (तसे आढळत नाही )
>>त्याने त्यांना नैराश्य आले असावे का?
नैराश्याची वेगवेगळी कारणे असली तरी 'विमनस्क' मोड मधे जाण्याची त्यांना जरा सवयच होती. ( बालस्वभाव असल्यामुळे ते तर साहजिकच होते. ) अशा अवस्थेचे आणखी एक कारण घरगुती अशांत वातावरण, पोटापाण्यासाठी करावी लागणारी भटकंती, अस्थीर जीवन, काही पैसे जमा झाले की लहान भाऊ भांडन करुन ते पैसे घेऊन जायचा. त्यांची आर्थिक स्थिती कधीच सुधारली नाही. हे नैराश्येचे मूळ कारण असावे असे वाटते.
>>'समग्र बालकवी' ह्यात बालकवींच्या कवितांबद्दल, एकूण आयुष्याबद्दल चिंतनात्मक असे काही लिखाण आहे का?
समग्र बालकवी एकदा वाचाच. माणूस वेडा होतो. एकतर त्यांच्या कवीतेवर झालेले संस्कार वाचायला मिळतात. त्यांच्याविषयी वाचायला मिळते....त्यातले 'समालोचन' कवितांचे वेगवेगळे अंगण वाचकांना खूले करते. खूप असे काहे त्यात आहे !
-दिलीप बिरुटे
13 May 2009 - 8:20 pm | श्रीकृष्ण सामंत
डॉ.दिलीप,
लेख खूपच आवडला.बालकवींची खूपच माहिती वाचायला मिळाली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
13 May 2009 - 8:41 pm | प्राजु
सुंदर काव्य परिचय..
बालकवींचा जन्म १८९० साली खानदेशात झाला.
त्यांची निसर्गाशी असलेली जवळीक , निसर्गाशी नाजूक असे जुळलेले भावबंद .. यांमुळे त्यांना निसर्गकवी च म्हंटले जाते..
एका वक्तृत्व स्पर्धेत मी "बालकवी- एक निसर्गकवी" या विषयांवर बोलले होते. तेव्हा त्या भाषणांत आईने खालची कविता लिहिली होती..
तुझ्याच शब्दे डौल मिरवी, हिरवळ ही हिरवी
तुझ्याच स्पर्शी फुटते या ढगांना सोनेरी पालवी
तूच एकला फुलराणीला गोड गोड लाजवी
निसर्ग तुझा.. तू निसर्गाचा, बालकवी तू निसर्गकवी..!
बिरूटे सर.. उत्तम लेखन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 May 2009 - 8:59 pm | धनंजय
पुन्हापुन्हा वाचतो आहे.
14 May 2009 - 8:39 am | चित्रा
अतिशय सुंदर आणि विचार देणारा लेख. खूप आवडला.
14 May 2009 - 8:55 am | विनायक प्रभू
तुम्ही नेहेमी का लिहीत नाही हो?सुंदर लेख.
4 Feb 2011 - 6:37 pm | अवलिया
सर येउद्या अजुन असेच सुंदर लेखन !!