काही सिनेमे पुस्तकातल्या सुंदर कवितेसारखे असतात. असाच एक हिंदी सिनेमा. एका रुटीन आयुष्य जगणा-या मध्यमवर्गीय माणसाची कथा. आपला फ्लॅट आपली नौकरी. नव-याचा वेगवेगळ्या पॉलीसी विकण्याचा व्यवसाय. मुलगा इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी बाहेर गावी आहे.
Three of Us- चित्र सौजन्य जालावरुन.
|
अशा कुटुंबातल्या शैलजा ( शेफाली शहा) कुंटुंब न्यायालयात घटस्फोटाच्या विभागात काम करणारी आणि जीचा हळुहळु स्मृतीभ्रंशचा (डीमेंशियाचा आजार) आजार बळावतो आहे. आपल्या कामाच्या नोंदी तिला नोंदवहीत करुन ठेवाव्या लागतात. आपण कोण आहोत आपल्या आजुबाजुला काय चाललंय या रुटीन जीवनाचा कंटाळा म्हणूण ती आपल्या कोंकणातल्या एका गावी वेंगुर्ल्याला आपल्या नव-याबरोबर एका आठवड्यासाठी दीपांकर ( स्वानंद किरकिरे) बरोबर सुट्या घालवायला जायचं ठरवते, अर्थात आठवणी जपणे तिला महत्वाचे वाटते.
वेंगुर्ल्याला गेल्यावर तिथे आपल्या शाळा मित्र प्रदीप कामतचा (जयदीप आहलत)चा ती शोध घेते. बँकेत नौकरी करत असलेला प्रदीपशी तिच्या शाळा-परिसराच्या काही आठवणी आहेत. काही आठवणी आठवतात काही नाही. आठवणीबरोबर तीन पात्रांचं एक हळुवार कथानक सुरु होतं. दीपांकर शैलजाला म्हणतो की इतक्या वर्षात कधी तु शाळा मित्राबद्दल कधी बोलली नाही. तर, ती म्हणते कधी सांगावं वाटलं नाही. तिघांच्याही मनातली हळुवार कथा-स्पंदने. वेगवेगळय विचारांची मालिका संथपणे सुरु होते. आपलं बालपण सर्वांनाच हवंहवंस असतं. आठवणी हव्याशा आणि रुटीन आयुष्यात उत्साह भरवणा-या असतात. आपल्या आयुष्यातली काही अशी स्थाने असतात की, आपल्याला पुन्हा नव्याने आयुष्य तिथून सुरु करण्याचा केंद्रबिंदु ती वाटायला लागतात. 'उद्गम' शब्दाभोवती हा चित्रपट फिरत राहतो. प्रदीप लेखक-कवीही आहे. शाळेतली मैत्रीण इतक्या दिवसानंतर भेटल्यानंतर तो एक कविताही लिहितो. प्रदीपची बायको सारिका (कादंबरी कदम ) म्हणते, आपला इतक्या दिवसाचा संसार झाला, तुम्ही कधी माझ्यावर कविता नाही लिहिली. आज मैत्रीण भेटली आणि थेट 'उद्गमावर' कविता लिहिली. काही प्रश्न अडचणींचे आणि त्याचीही उत्तरं आपल्याला इतर प्रसंगातून मिळत जातात. सिनेमा एक सुंदर दीर्घ काव्यात्मक अनुभव आहे. एक सुंदर गजल आहे.
कोंकणातला अतिशय रम्य परिसर. घर-दारं वेली फुलं. समुद्र. ही सुद्धा सिनेमातली पात्र वाटायला लागतात. शैलजाचा स्मृतीलोपाचा आजार आणि तिचा तो ताकदीचा अभिनय. काहीही न बोलता डोळ्यातून व्यक्त होत राहणे. नंबर एक झालं आहे. सिनेमात एकूण पात्र चार ते पाच. शैलजाच्या नव-याचा दीपांकरचा अभिनयही तसाच अप्रतिम. आपण पती म्हणुन अपयशी ठरलो की काय असा न बोलता व्यक्त होणारा शब्दबद्ध अनुभव. प्रदीपचाही तसाच भारदस्त अनुभव. करारी वाटणारा पण हळवा. दोन मुली आहेत. पत्नीही अतिशय समजदार आणि पतीचे होणारे बदल ती सहज टीपते. संथ वाटणारा सिनेमा. आठ दिवसाच्या सुटीनंतर संपतो. शेफालीचा स्मृतीभ्रंश आणि बालपणीच्या मित्रामुळे तिच्यात काही बदल होतो ? पती सगळं स्विकारतो ? चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना बेचेन करतो ? की सिनेमा योग्य ठिकाणी संपलाय ? की आणखी काही ? त्यासाठी अविनाश अरुण निर्मित एक तास आणि चाळीस मिनिटांचा हा सिनेमा ओटीटीवर बघायलाच हवा.
प्रतिक्रिया
6 Jan 2024 - 11:43 pm | गवि
तुम्ही इतके भारावून गेले आहात म्हटल्यावर आता चित्रपट बघणे आले. काही वेळा चित्रपट बघून मनातून उत्स्फूर्त आणि कम्पल्सरी अभिप्राय येतो. म्हणजे त्यावर काहीतरी लिहिल्याशिवाय राहवत नाही अशी अवस्था होते. आणि असे होते तेव्हा ती कलाकृती निश्चित बघण्यासारखी असते.
7 Jan 2024 - 2:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> तुम्ही इतके भारावून गेले आहात...
खरंय ! सिनेमा पाहिल्यावर लैच आभाळ भरून आलं. कॉमी यांच्या लोकप्रिय सिनेमे या सिनेमांची उत्तम ओळख चाललेल्या धाग्यात दोन ओळी लिहून आलो. पण सालं समाधानच होईना. काही मित्र-मैत्रींणींना सांगायलो गेलो तर आम्हाला सिनेमा पाहू दे मग सांग म्हणे. लै वाईट असतं असं कोणाचा बोळा अडवून ठेवणं. नरकात जातील साले.
-दिलीप बिरुटे
7 Jan 2024 - 4:31 am | कंजूस
एखाद्या व्यक्तीशी नातेसंबंध आणि व्यवहार नसल्याने भावनांची धरणं फुटतात. पाणी खळखळ वाहते. (फार साहित्यिक झालं वाक्यं.)
नवरा बायको जेंव्हा एकमेकांच्या आवडीनिवडींत ढवळाढवळ करत नाहीत त्यांचं छान चालतं. पिच्चर न पाहताही समजला.
7 Jan 2024 - 2:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> नवरा बायको जेंव्हा एकमेकांच्या आवडीनिवडींत ढवळाढवळ करत नाहीत त्यांचं छान चालतं.
खरंय... पण कधी काही खरचटलं तर व्रण मरेपर्यन्त जाणे शक्यही नसतं.
-दिलीप बिरुटे
7 Jan 2024 - 6:33 am | सर टोबी
वैशिष्ठ्य म्हणजे हा कलाकारांखेरीज इतरांचा आणि खास करून दिग्दर्शकाचा सिनेमा आहे हे जाणवतं.
शैलू, प्रदीप कामतची साधी मध्यमवर्गीय जीवनशैली, थोडीशी कमी उजेडातली फोटोग्राफी, शैलूचं जुनं घर हे प्रॉडक्शन, कला दिग्दर्शन या डिपार्टमेंटच्या कलाकारांची समज आणि मेहनत दाखवते. काही निशब्द प्रसंगांमध्ये दीपांकर आणि प्रदीप यांचं अवघडलेपण स्पष्ट करते. हे सर्व अनुभवणं हा फार मोठा आनंद आहे.
7 Jan 2024 - 1:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दीपांकर आणि प्रदीप यांचं अवघडलेपण हे तर लैच भारी उतरलय पडद्यावर. प्रदीपला तरी खुप दिवसांनी मैत्रीण भेटलीय पण दीपांकरची घुसमट जसं काहीच वेगळं विशेष नाही. लैच भारी.
-दिलीप बिरुटे
7 Jan 2024 - 10:18 am | कॉमी
बघणार.
7 Jan 2024 - 8:15 pm | जेपी
आता पुन्हा कॅन्सल केलेलं Netfix चे सबस्क्रिप्शन घ्याव लागणारं.
8 Jan 2024 - 10:46 am | प्रचेतस
तुम्ही चित्रपट पाहिल्यावर खूप भारावून गेला आहात असे दिसते. परिचय थोडक्यात पण उत्तम आहे. मात्र अशा आशयाच्या चित्रपटांची आवड नसल्याने चित्रपट बघणार नाही.
8 Jan 2024 - 12:09 pm | गवि
तुम्हांस नेमकी आवड तरी कशा (आशयांची) आहे? हे आवडत नाही, ते बघत नाही, क्षमस्व वगैरे असलेच असते सदैव.
होय ना हो प्रा डॉ सर?
8 Jan 2024 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> तुम्हांस नेमकी आवड तरी कशा (आशयांची) आहे ?
भारंभार चुंबने आणि सारखं मिठ्या असलेले इंग्रजी सिनेमांवर भर असतो म्हणे त्यांचा. आजची पिढीच तशी आहे म्हणे... आपण पडलो प्रदीप आणि दीपांकरच्या जुन्या काळातले. आपल्याला सहन नै होत. आपल्याला अशा प्रसंगास डोळे मिटून घ्यावे लागतात किंवा खाली पाहावे लागतं. :/
-दिलीप बिरुटे
8 Jan 2024 - 12:36 pm | गवि
ऑ.. !! काय म्हणता काय ! ? अरेरे. एक प्रतिमा खळकन फुटली मनातली. असो. व्यक्ती तितक्या आवडी.
8 Jan 2024 - 12:38 pm | प्रचेतस
तुम्हा दोघा ज्येष्ठांची पिढी म्हणजे 'फूलाला फूल मिळते जिथे' वाली. तेव्हापासून कोंडलेल्या तुमच्या भावनांचा आता महापूर झाला वाटते.
8 Jan 2024 - 2:37 pm | भागो
अगदी मनातल बोललात!
8 Jan 2024 - 7:51 pm | अहिरावण
चला किमान लिहिते तर झाले... :)
8 Jan 2024 - 11:15 pm | नठ्यारा
अवांतर :
आवो प्राडॉ, त्ये बोळ्याचं वाचून लै म्हंजी लैच्च हास्लो पघा. उपमेत ज्यी धम्माल हाये त्यी उत्प्रेक्षेत न्हाई, आसं आमचं म्हराटीचं गुर्जी म्हणायचं. येकदम साक्षात प्रत्यय भ्येटला आज त्याचा.
-नान
9 Jan 2024 - 6:42 am | निमी
तुमचे वर्णन वाचून सिनेमा नक्की पाहणार..थोडा वेगळ्या विषयावरील सिनेमा असेल तर अवश्य पाहायला आवडतो.. नुकताच 'आम्ही दोघी' असा मराठी सिनेमापण पाहिला.. छान वाटला.
10 Jan 2024 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तोडक्या-मोडक्या लेखनावर प्रतिसाद लिहिणारे मिपाकर, अवांतर करणारे मित्र, वाचक मिपाकर. आपल्या प्रतिसादांनी लिहिण्याचा उत्साह वाढतो. तहेदिलसे शुक्रिया. :)
-दिलीप बिरुटे
(आभारी)