कटाक्ष-
लेखक: प्रसाद कुमठेकर
प्रकाशन: पार पब्लिकेशन्स
पहिली आवृत्ती: २०१६
पृष्ठे: १५८
किंमत: ₹३००
ओळख-
चिंतामणप्रसाद पुरुषोत्तम सरदेशमुख, पाचवी 'क'. या कलंदर पोराची त्याच्या बिलंदर आणि दिलदार मित्रांनी, सगळ्यांचे असतात अशा घरच्यांनी आणि एका संवेदनशील मास्तरांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे 'बगळा'. क्रिकेट खेळताना झालेल्या एका चुकीचे प्रायश्चित्त चिंतामणप्रसाद उर्फ चिंतूला बगळ्यात दिसू लागते आणि बगळा हेच चिंतूच्या आयुष्याचे एकमेव ध्येय होते. विविध पात्रांच्या निवेदनातून चिंतूचे जग उलगडताना लेखकाने मानवी स्वभावाच्या विविध नाजूक बाजूंची सुंदर रांगोळी काढली आहे. कादंबरीत सगळीकडे बालपणातल्या अस्सल आणि निरागस तसेच गावाकडे सहज जाणवतो अशा सडेतोड विनोदाचा जबरदस्त तडका आहे. त्यामुळे चिंतूचा बगळा कधी ओठांवर स्मितहास्य आणतो तर कधी खळखळून हसल्याने डोळ्यात पाणी. चिंतूच आपला नायक आहे ही धारणा कादंबरीच्या पहिल्या प्रकरणापासून बळकट होत असताना शेवटाकडे जाताना मात्र अचानक एक पात्र चिंतूच्या तोडीसतोड कादंबरीच्या नायकत्वावर दावा करते. तो दावा खोडायचा की मान्य करायचा हे वाचकावर अवलंबून. नायक एकच असावा असा नियम तरी कुठे आहे? बहुतांश कादंबरी उदगीरच्या (जि. लातूर) च्या बोलीत आहे. निवेदकानुसार ती कधी प्रमाणभाषा ते बोली भाषा अशा कलाने बदलत राहते. त्यामुळे १५८ पाने असूनही कादंबरी त्यावेगाने वाचून उरकत नाही (कथा रंगतदार असल्याने ही अडचण नाही). एकदा वाचली तरी कायम लक्षात राहीली अशी तुमची यादी असेल तर त्यात 'बगळा' अगदी सहज जागा पटकाविल. निखळ मनोरंजन, वास्तववादी चित्रण, सभोवतालचे सजग भान, आणि चिंतूचं "बरं" यासाठी नक्की वाचा 'बगळा'.
शिल्लक -
खुप जास्त. जाणतेपणा वाढेल तसा निरागसपणा हरवण्याचा जगरहाटीचा नियम मोडायची हिम्मत कदाचित आपल्यात येईल. मनमोकळं हसून होईल. तुम्ही शिक्षक किंवा पालक असाल तर हे पुस्तक तुमच्या जीवनातील भुमिकेचे एक 'गाईड' म्हणून वापरू शकता. एका वेगळ्या धाटणीचे पुस्तक वाचायला मिळाले हा आनंद वेगळाच.
प्रतिक्रिया
27 Sep 2023 - 10:08 pm | चौथा कोनाडा
खूप सुंदर पुस्तक परिचय !
व्वा, स्थानिक भाषेची मेजवानी !
शिल्लक : खुप छान लिहिलीय !
अवांतर : चित्र दिसत नाहीय ! त्यामुळे चुकचुकल्या सारखे झाले. कृपया शेअरिंग तपासून पहा !
27 Sep 2023 - 11:09 pm | अनुस्वार