मित्रहो यांनी एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.त्याला प्रतिसाद द्यावा म्हणून लिहीत असताना शब्द भरकटत गेले व खुप मोठा प्रतिसाद झाला. तसेही आज तीस जुलै, कलर्स वर दिवसभरात दोन वेळेस पं वसंतराव हा चित्रपट दाखवला गेला. इतरत्र सुद्धां पं वसंतराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या रसीकांनी कार्यक्रम केले असतील. वाटले वेगळा धागा डकवावा.
पं वसंतराव यांना जवळून बघण्याचा,बोलण्याचा योग आला होता. काही मखमली आठवणीं पैकी एक. मी सतरा वर्षाचा नुकतीच शाळा संपवलेला तर पंडितजी पन्नाशीचे.
३० जुलै १९८३,चाळीस वर्षां पुर्वी,आजच्याच दिवशी पं वसंतराव 'या भवनातील गीत पुराणे,मवाळ हळवे सुर जाऊ द्यात', म्हणत 'स्वताच हे भुवन अवघ्या ६३ व्या वर्षीच सोडून गेले. मागे वळून पाहताना असे दिसते, काय एका पेक्षा एक सरस गाणी रसिकांसाठी मागे ठेवून गेलाय हा आवलिया.
पंडितजींची गायकी पन्नास वर्षांहून जास्त वयाची, पण ती 'गुलजार नार, मधुबाला' खोडकर मृगनयना आजही गोड गोड गाऊन रसीकांच्या हृदयाला ओढ लावते. एखादी गुलजार नार भ्रू-धनु सज्ज करून नयनांची शरमाला सोडते व जशी ती चंचल नैना रसीकांच्या हृदयाला सहज विंधिते, त्या प्रमाणेच आज सुद्धा पंडितजींचा आवाज रसीकांच्या हृदयाची तार छेडण्यास सक्षम आहे. ('ही कुणी छेडली तार).
जेंव्हा जेव्हां तो "तराणा",(सुरत पिया की) किंवा "घेई छंद ' सुरवातीचा आलाप ऐकतो तेव्हां तेव्हां नुकतीच कात टाकलेली, सळसळती, डौलदार,चपळ नागीण डोळ्यासमोर येते.
आजही कट्यार मधील, जिंकूनही हरलेल्या खाॅ साहेबांची सुरत नजरे समोर येते व अप्रतिम गायकी बरोबरच त्यांचा अप्रतिम अभिनय आठवतो.
माझ्या मुलींच्या लग्नात,पंडितजींचे अष्टविनायक मधले गाणे डोक्यात एखाद्या आडकलेल्या टेप सारखे सतत वाजत होते.
'दाटून कंठ येतो ओठात येई गाणे'
आमच्या गावची नात,शांताबाई शेळके यांचे शब्द व पंडितजींचा स्वर्गीय आवाज, डोळ्यातून गंगा जमाना न वाहातील तर नवलच म्हणावे लागेल. नुसते शब्द वाचून बघा,कंठ दाटून येईल.
शांताबाईनीं अबोल बापाच्या हृदयाचे हृद्य शब्दचित्र रेखाटले आहे तर वसंतरावानी ते अजरामर केले आहे. जोपर्यंत बाप आणी मुलगी हे नाते जीवंत आहे तोपर्यंत हे गाणे, गीतकार, संगीतकार व गायक अजरामर आहेत.
दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो
ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू
जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो
हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरिवत श्री गणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनि मी, जातो सुखावुनि मी
या गोड आठवाने
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो
बोलात बोबडीच्या संगीत जागविले
बोलात बोबडीच्या संगीत जागविले
लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले
एकेक सूर यावा, एकेक सूर यावा
न्हाऊन अमृताने
अवघ्याच जीवनाचे, अवघ्याच जीवनाचे
व्हावे सुरेलगाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो
घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, परक्या परी आता मी
येथे फिरुनी येणे
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो
दाटून कंठ येतो
किती लिहायचं याला काही सीमा नाही. खुप काही ....
पंडितजींची काही गाणी जी माझ्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब,पेन ड्राईव्ह वर आहेत. कारण कधीही,कुठेही ऐकावी वाटली तर ......
गुलजार नार ही मधुबाला
कर हा करी
घेई छंद
शत जन्म शोधिताना
कानडा राजा पंढरीचा
मृगनयना रसीक मोहीनी
बगळ्यांची माळ फुले
दाटून कंठ येतो
ही कुणी छेडली तार
छेडियल्या तारांनी
राहीले ओठातल्या ओठात
वाटेवर काटे
कुणी जाल का
कानडा राजा....
ध्रुवां सारखं अढळ स्थान निर्माण केलेल्या माझ्या आवडत्या गायकाला माझे शतं शतं प्रणाम.
प्रतिक्रिया
31 Jul 2023 - 4:47 am | nutanm
वरील प्रतयेक शब्दाशी सहमत या मनीचे त्या मनीने उतरविले सही सही सहमत व गाणीही खूप आवडीची.
31 Jul 2023 - 9:27 am | कंजूस
तुमचा संग्रह,आवड,छंद भारी आहे.
31 Jul 2023 - 10:24 am | Bhakti
छान!
31 Jul 2023 - 11:31 am | मित्रहो
खूप छान लेख
मलाही ही गाणी आवडतात. मला स्वतःला तरी वसंतराव देशपांडे यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचा कधी अनुभव आला नाही. मी जे ऐकले ते फक्त विडियोच्या माध्यमातून. मला सर्वच गाणी आवडतात पण शतजन्म शोधिताना, मृगनयना, बगळ्याची माळफुले, दाटूनी कंठ येतो ही गाणी विशेष आवडतात.
माझ्या लेखामुळे तुम्हाला लिहावेसे वाटले खूप आनंद झाला. मला वसंतरावांचा प्रवास माहित नव्हता तो चित्रपटात बघितला. मी लिहिले. खूप धन्यवाद
31 Jul 2023 - 5:45 pm | कर्नलतपस्वी
नशीबवान समजतो. सर्वात प्रथम हिराबाई बडोदेकर यांना ऐकले. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त त्या देवळात नेमाने यायच्या. पुढे मान्यवर दिग्गज प्रसाद सावकार, राम मराठे,रामदास कामत,शिलेदार कुटुंब, बकुळ पंडित, फैय्याज अभिषेकीबुवा इ. या ना त्या निमित्ताने ऐकावयास मिळाले. त्यामुळेच नाट्यसंगीत आवडते. कळत नाही पण कानांना सुख देते.
31 Jul 2023 - 11:57 am | राजेंद्र मेहेंदळे
हा घ्या त्यांच्या गाण्यांचा खजिना
https://www.aathavanitli-gani.com/Swar/Vasantrao_Deshpande
31 Jul 2023 - 3:35 pm | चित्रगुप्त
अगदी सहजतेने लिहील्यासारखा वाटणारा लेख खूप आवडला.
'दाटून कंठ येतो' हे पद प्रथमच वाचले/ऐकले. यूट्यूबवर याचे तीन-चार विडियो आहेत ते बघितले. त्यातला 'अष्टविनायक' मधील वसंतरावांचा गातानाचा बघताना डोळे पाणावले (यात 'बोलात बोबडीच्या' हे कडवे कसे नाही कुणास ठाऊक) :
https://www.youtube.com/watch?v=43YytYS9G_8
'बोलात बोबडीच्या' सहित असलेला (फक्त आडियो) विडियो:
https://www.youtube.com/watch?v=yzMxuCiuyGE
-- हल्ली काही लोक मूळ गाणे पाश्वसंगीत म्हणून वापरत विडियोत कैच्याकै भलतीभलती दृष्ये टाकतात तो प्रकार मलातरी बीभत्स वाटतो. (तसला एक विडियो पण आहे):
https://www.youtube.com/watch?v=R96yUlQt4Hs
1 Aug 2023 - 9:03 pm | सिरुसेरि
छान लेख . कै. वसन्तराव देशपांडे यांची गीत संगीताच्या अनेक शैलींवर हुकुमत होती . त्यामुळे त्यांनी गायलेली अनेक नाट्यगीते , भावगीते , भक्तीगीते ,लोकगीते ही जनमानसात लोकप्रिय झाली . संगीत क्षेत्रात कुण्या एका गायन शैलीचा , घराण्याचा शिक्का नसल्यामुळे , आपले गाणे , आपली गायकी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी बरीच वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला . या संघर्षामुळेच त्यांची गायकी ही अधिकाधिक आक्रमक , धारदार होत गेली . "कट्यार काळजात घुसली" मधील खांसाहेबांच्या भुमिकेला त्यांची ही गायकी बरोबर शोभुन दिसली . सदाशिवच्या गायकीबद्दल असलेली आवड पण त्याच वेळी आपल्या घराण्याच्या गायकीशी अखेरपर्यंत तडजोड न करणारा खांसाहेब हे पात्र त्यांनी जिवंत उभे केले .
"मी वसंतराव" चित्रपटाची सुरुवातही त्यांनी साकारलेले , जिवंत केलेले खांसाहेब हे पात्र आपल्या साकारकर्त्याचे मनोगत , जीवन प्रवास जाणुन घेत आहे या कल्पनेवर बेतलेले आहे .
"मराठी संगीत नाटकाची वाटचाल" या विषयावर श्री. व. पु. काळे यांनी श्री. वसंतराव यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा संगीतमय कार्यक्रमही ऐकण्याजोगा आहे .
2 Aug 2023 - 12:14 am | रामचंद्र
त्यांचे परममित्र पुलंनी वसंतराव गेल्यावर आपल्या मित्राच्या आठवणी लिहिलेला लेख अतिशय हृद्य आहे.
2 Aug 2023 - 12:15 am | रामचंद्र
त्यांचे परममित्र पुलंनी वसंतराव गेल्यावर आपल्या मित्राच्या आठवणी लिहिलेला लेख अतिशय हृद्य आहे.
2 Aug 2023 - 9:42 am | सुबोध खरे
पंडितजींचे कट्यार काळजात घुसली हे नाटक प्रत्यक्ष पाहिल्याचे मला भाग्य लाभले आहे.
श्री प्रकाश घांग्रेकर (सदाशिव) सौ फैयाज, श्री भार्गवराम आचरेकर या संचासह असलेला हा प्रयोग शिवाजी मंदिरात पाहिला होता.
आजही त्यातील कोणतेही गाणे लागले तरी त्यांचा खां साहेब डोळ्यापुढे स्पष्ट उभा राहतो.
बाकी पंडितजींबद्दल मी काही बोलावे अशी माझि काय लायकी आहे?
त्यांना साष्टांग वंदन.
2 Aug 2023 - 10:12 am | कर्नलतपस्वी
धन्यवाद.
संगीत क्षेत्रात कुण्या एका गायन शैलीचा , घराण्याचा शिक्का नसल्यामुळे , आपले गाणे , आपली गायकी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी बरीच वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला . या संघर्षामुळेच त्यांची गायकी ही अधिकाधिक आक्रमक , धारदार होत गेली .
काही अंशी सहमत. पंडितजींनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. भालजी पेंढारकर यांनीच त्यानां आपल्या कालच्या मर्दन या चित्रपटात भुमीका १९३५ साली दिली होती.
2 Aug 2023 - 1:56 pm | मित्रहो
वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याचा संघर्ष या भवनातील गीत पुराणे या कट्यारमधील गाण्यात जसा सांगितला आहे तसाच आहे.
या भवनातील गीत पुराणे
मवाळ हळवे सूर
जाऊ द्या येथूनी दूर
भावभक्तिची भावुक गाथा
पराभूत होईल नमविल माथा
नवे सूर आणि नवे तराणे
हवा नवा तो नूर
जाऊ द्या दूर जुने ते सूर
वर लेखात सांगितल्याप्रमाणे या गाण्याच्या वेळीच त्यांचा देहान्त झाला असेल तर त्याला काय म्हणायचे कळत नाही.