जर्द काही जीवघेणे..!!

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
26 Jun 2021 - 4:31 pm

डोंगर-दऱ्या भटकायला सुरूवात केल्यापासून जवळपास एक तप होत आलंय. या ११-१२ वर्षांत, कित्येकदा गडकोटांवर पौर्णिमेला चांदण्या रात्रीपासून ते अमावस्येला चांदण्यानी गच्च भरलेल्या आभाळाखाली मुक्काम केला. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीच्या किर्र अंधारात कित्येकदा जंगलातून भटकलो. कित्येक अनवट जंगलवाटा धुंडाळल्या, परंतू आजतागयत जंगली श्वापदांचा सामना प्रत्यक्षात कधीही झाला नव्हता. नाही म्हणायला, रायगडावर नगारखान्यापासून वाघ दरवाज्याकडे जाणाऱ्या वाटेवर एका 'विशिष्ठ' पावलांचे ठसे पाह्यले होते, पण ते तेवढंच.!!

आजची सकाळ मात्र सगळ्या गोष्टींना अपवाद ठरली. रात्री अचानक ठरलं आणि पहाटे सहा वाजता घराजवळच्या संजय गांधी नॅशनल पार्काचा एक भाग असलेल्या, मामा-भाचे डोंगराच्या पायथ्याला पोचलो. पायथ्यापासून चढायला सुरूवात केल्यानंतर, जवळपास तासाभराने डोंगराच्या माथ्यावर पोचलो. वर पोचल्यानंतर डोंगराच्या धारेने उजवीकडे चालत गेल्यानंतर एका टेकडीवर 'हजरत बदरूद्दीन शाह कादरी उर्फ मामु सरकार' यांचा दर्गा होता. त्या टेकडीवर जाण्यासाठी परवानगी मिळण्याचा अनुभव फारच वाईट होता आणि त्याबद्दल इथे कथन न केलेलंच बरं. खरं तर टेकडीवरील दर्गा पाहण्यापेक्षा, तिथून संपूर्ण ठाणे शहराचा नजारा दिसेल या आशेने वर गेलो, पण डोंगरांच्या खालच्या बाजूला धुक्याची दाट चादर पसरली असल्यामुळे अगदी दहा फूटावरचेही काही दिसत नव्हते. तिथे निराशा झाल्याने पुन्हा खाली आल्यानंतर, तिथल्या ट्रस्टच्या आॅफीसमागील जंगलात जाणारी पायवाट पकडून आम्ही पाच जण चालू लागलो. पुढे अर्थातच मी होतो.

त्या वाटेने पुढे गेल्यानंतर, आणखी दोन वाटा समोर आल्या, त्यापैकी उजवीकडील वाट आणखी पुढे जंगलात गेली होती ती बहुधा येऊरच्या दिशेने खाली उतरत असावी, तर डावीकडची वाट एका छोटीश्या टेकडीकडे जात होती, जिथे शेवटपर्यंत कारवीचे रान माजलेले दिसत होते. कारवीची ती झाडेही जवळपास सात-आठ फूट उंच वाढलेली होती. उजवीकडे आत जंगलात जाण्यापेक्षा, डावीकडच्या टेकडीवर चढून पुढे बोरीवलीचा परिसर दिसेल या आशेने मी, कारवीच्या रानाखालून डावीकडची वाट पकडून चढू लागलो. वाट व्यवस्थित वर टेकडीवर जात असल्याचे पाहून इतर चौघांना हाका मारून बोलवून घेतले आणि पुढे वर जाऊ लागलो. माझ्या पाठी चुलत भाऊ नजरेच्या टप्प्यात मा्े होता आणि त्याच्याही बरंच पाठी इतर तिघे जण.

टेकडीच्या शेवटावर पोचलो अगदी तिथवर कारवीची झाडे माजली होती. डोक्यावर वाढलेल्या झांडामुळे काही दिसेना, म्हणून तिथल्या एका भल्या मोठ्या दगडावर पाय ठेवून पलीकडचे काही दिसते का ते बघायला गेलो, तो समोर पाच-दहा फूटावर एक पिवळं धम्मक 'धूड' लपून बसलं होतं. मी भावाशी संवाद साधत दगडावर पाय ठेवून खाली बघायला आणि माझ्या आवाजामुळे आणि दगडावर उभे राहण्यामुळे बिचकलेल्या त्या जनावरने माझ्याकडे बघत समोरच्या झाडीत झेप घ्यायला अगदी एक वेळ झाली.! बस्स !! तिथून आल्या पावली जो काही मागे पळालो, पुढे भावाच्या “अरे काय झालं?" प्रश्नाला उत्तर द्यायलाही तोंडातून शब्द फूटत नव्हते. पुन्हा त्याने विचारल्यानंतर, त्राण गेलेल्या पायातून पळता पळता, अगदी घाबरलेल्या स्थितीतून तोंडातून शब्द बाहेर पडला “बिबट्या!"

वावरसमाजजीवनमानअनुभवसल्लामाहिती

प्रतिक्रिया

बापरे.. साताठ ठोके चुकले असतील हृदयाचे.

चारेक असंसदीय शब्दही तोंडातून निसटले असू शकतात. ते कामकाजातून वगळलेले दिसतात. ;-)

बाकी मामाभाचे दर्शन सुंदरच असते. खालूनच पाहिला जातो नेहमी. वरुन फोटो काढले असतील तर टाक की.

छोटा अनुभव लिहीलायस किसनद्येवा. आटोपशीर पण धस्स करणारा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2021 - 4:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कशाला इकडे तिकडे भटकत असता राव.

बाकी अन्भव डेंजरच. लिहीते राहा.

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

26 Jun 2021 - 4:53 pm | कुमार१

भारी अनुभव !

गॉडजिला's picture

26 Jun 2021 - 5:03 pm | गॉडजिला

या घटनेतील बिबट्याची बाजू ऐकायलाही तितकेच आवडेल...

कपिलमुनी's picture

26 Jun 2021 - 5:37 pm | कपिलमुनी

सकाळी सकाळी जोरात कळं आली, कालचे वासरू बळेच संपवल्याचा परिणाम असावा. पण पावसाळ्यात जास्त दिवस ठेवून उपयोग नाही असा विचार करत एका आडोशाला बसलो होतो.

आजकाल जिथं-तिथं ही दोन पायाची माणसे गर्दी करतात. दर 5 रात्री नंतर 2 दिवस तर फारच !

तर मी काय सांगत होतो, कळ आली आणि आडोसा धरून बसलो.. दाट धुक्यामुळे कसलाच अंदाज येत नव्हता..

तेव्हढ्यात अचानक तेजस्वी प्रकाश उमटला आणि साक्षात किसनद्येव प्रकटले . त्यांना नमस्कार करण्याऐवजी मी लज्जा रक्षणार्थ धूम पळून गेलो..

तर मंडळी, त्ये राहिलेला नमस्कार किसन द्येवाना पोचवा

गुल्लू दादा's picture

26 Jun 2021 - 5:46 pm | गुल्लू दादा

हा हा...मस्त आवडलं. धन्यवाद.

गॉडजिला's picture

27 Jun 2021 - 12:11 am | गॉडजिला

_/\_

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2021 - 7:20 pm | टवाळ कार्टा

=))

गुल्लू दादा's picture

26 Jun 2021 - 5:47 pm | गुल्लू दादा

कल्पना आवडली. हा हा.

गुल्लू दादा's picture

26 Jun 2021 - 5:43 pm | गुल्लू दादा

धडकी भरली शेवटचं वाक्य वाचून. मस्त लिहिलंय. धन्यवाद. मला पण जंगलात प्राणी बघायचेत पण दिसत नाहीत. त्यांना आधीच आपली चाहूल लागते अन आपल्याला कळत पण नाही. मनुष्य खूपच मंद प्राणी हे तेव्हा कळलं. वाघाच्या घरात वाघ पहायची मजाच वेगळी.

हा अनुभव घेतलाय महाबळेश्वर ला पोलो ग्राउंड वर

तुषार काळभोर's picture

26 Jun 2021 - 6:05 pm | तुषार काळभोर

जर्द म्हणजे लाल ना?
मला वाटले ते गणेशराव नॉस्टेल्जिक आठवणी लिहित्यात तसलं कायतरी जीवघेणं असेल. हे तर अक्षरशः जीवघेणे निघाले!

इरसाल's picture

30 Jun 2021 - 9:37 am | इरसाल

जर्द म्हणजे लाल ना?
नाही
पिवळा- जर्द

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jul 2021 - 12:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

"जर्द" वेगळे आणि "जर्दा" वेगळा पैलवान भाऊ

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2021 - 8:29 pm | प्रसाद गोडबोले

आईशप्पथ !

एक नंबर किसना !

पाषाणभेद's picture

26 Jun 2021 - 10:37 pm | पाषाणभेद

किसनद्येव अन कपिलमुनी धन्य आहात दोघेही.

चौथा कोनाडा's picture

26 Jun 2021 - 10:47 pm | चौथा कोनाडा

बा ..... बौ !
🐆

कॉमी's picture

26 Jun 2021 - 11:06 pm | कॉमी

लेख आणि कपिलमुनींचा प्रतिसाद दोन्ही एकदम भारी !

कंजूस's picture

27 Jun 2021 - 6:26 am | कंजूस

भारी अनुभव!

बिबट्याचा माझा अनुभव हुकला.
( येऊर भटकंती-संजय गांधी उद्यान
22 Nov 2014 - 10:44 pm
http://misalpav.com/node/29543)
नंतर २०१६ ला मोठ्या तयारीने गेलो होतो छत्री घेऊन. छत्रीला बिबट्या घाबरतो. उपवनकडून आत जायचे आणि बोरिवलीला (१६ किमी) बाहेर पडायचे. पण भिंत बांधली आहे. प्रवेश खरंच बंद केलाय.

पण तिथल्या एरफोर्सच्या तळाच्या वरच्या डिशपर्यंत जायचा योग मात्र आला आहे सहकाऱ्याच्या मित्रामुळे. तो तिथे अधिकारी होता पण बारा किमी रस्त्यात चार वेळा चेकिंग झाले. ड्युटीवर असला तरी त्याचे कार्ड तपासले. फोर वील ड्राइव गाड्याच तो घाट चढू शकतात. हे वन अप्रतिम आहे. ऐन पावसाळ्यात गेलेलो.

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2021 - 8:55 am | श्रीरंग_जोशी

__/\__ .
भारी अनुभव.

सौन्दर्य's picture

30 Jun 2021 - 12:12 am | सौन्दर्य

माझे बालपण बोरिवलीत गेले. मे महिन्याच्या सुट्टीत नॅशनल पार्क मधील गांधी टेकडी, सतीबाग, जैन देरासर व कान्हेरी गुंफा बघायला जाणे एक प्रकारचे थ्रिल असायचे. सोसायटीला मुले पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे डबे घेऊन अगदी सकाळी निघून संध्याकाळपर्यंत परत येत असू. खूपच मजा यायची, पण त्या काळात (१९७० - १९८५) बिबट्याने हल्ला केला असे कधीही ऐकले नव्हते त्यामुळे आम्ही अगदी बिनधास्त जात असू.

असेच एकदा, बहुतेक १९७७चा मे महिना असावा. मी व माझ्या एक मित्राने सायकलवरून नॅशनल पार्कमधून गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत जाऊन परत यायचे ठरवले. त्यावेळी हा रस्ता रहदारीसाठी देखील उघडा होता, आता तो नाही असं ऐकून आहे. तर असेच भल्या पहाटे निघालो. तुलसी तलावापर्यंत लगेच पोहोचलो. तेथेच बसून डबा खाल्ला व पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला किर्र झाडी व उंच वृक्ष होते, रस्त्यावर भरगच्च सावली पसरली होती. थोडा वेळ गेला आणि झाडीतून आमच्या बरोबर कोणीतरी येतंय असा भास होऊ लागला. आम्ही थांबलो की तो आवाज थांबायचा व सायकल चालवू लागलो की पुन्हा पाठलाग केल्यासारखा बाजूच्या झाडीतून यायचा. आधी वाटलं एखादा कुत्रा असेल, खाण्याच्या आशेने आम्हाला फॉलो करतोय, पण तो सतत झाडीत लपून राहणार नाही, रस्त्यावर आला असता. नंतर वाटले की एखादे माकड असेल जे आमच्याकडे काही खाण्यासारखे मिळतंय का ह्याच्या शोधात असेल.

पण अचानक मनात 'त्याचा' विचार आला आणि आम्हा दोघांचे धाबे दणाणले. नक्कीच एखादा बिबळ्या आमच्या मागावर असणार व संधी साधून आमच्यापैकी एकावर झेप घेणार. मग काय विचारता जिवाच्या आकांताने आम्ही पॅडल मारू लागलो व मनात देवाचा जप सुरु केला. आम्ही दोघांनी काहीही झाले तरी एकत्र राहायचे ठरवले. मध्येच वाटले एखाद्या झाडाची फांदी तोडून घेऊ, पण सायकलवरून उतरायची हिम्मत काही झाली नाही. असेच पाचेक किलोमीटर सायकल दामटत राहिलो व बाजूच्या जाळीतून खसखस आवाज येत राहिला. अचानक मागून जीपचा आवाज आला, ती जीप फॉरेस्ट ऑफिसरची होती. त्याने जीप थांबवून आम्हाला संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. म्हणाला, "दुपारच्या वेळेला बिबटया भक्षाच्या शोधार्थ निघतो, सहसा तो माणसांवर हल्ला करीत नाही, पण नक्की काहीच सांगता येत नाही, त्यामुळे एकट्या-दुकट्याने जंगलात असणे धोकादायक आहे. त्यांनी मग आमच्या बाजूने त्याची जीप चालवली, दोन-चार वेळा हॉर्न वाजवले व फिल्मसिटी जवळ आल्यावर आम्हाला परत जाताना हायवेने जाण्यास बजावून निघून गेला. त्यांनी तसे सांगितले नसते तरी जंगलाच्या वाटेने परत जाण्याइतके आम्ही शूर शिपाई नव्हतो किंवा अति शहाणेही नव्हतो.

घरी आल्यावर ही गोष्ट सांगितल्यावर विविध विशेषणांचा आमच्यावर मारा झाला आणि ती विशेषणे येथे येथे लिहिण्यासारखी नाहीत हे सांगायला कोणी विद्वान नकोय.

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 12:47 am | गॉडजिला

जिम कॉर्बेटही म्हणतो ज्या नरभक्षकाच्या आपण मागावर आहोत तो आपला पाठलाग करतोय यासारखी भयानक गोष्ट दुसरी कोणतीही नाही...

आपण दोघे होता व सायकल सोबत होती म्हणुनच जनावराला तुमचा निटसा अंदाज घ्यायला वेळ गेला अन्यथा पाचशे मिटर अंतरही...

अर्थात काही टक्के लोकांना अजुनही नामस्मरणाची ताकत असे प्रसंग थोपवु शकते असे वाटु शकते त्याला इलाज नाही.

प्रसाद गोडबोले's picture

30 Jun 2021 - 2:19 am | प्रसाद गोडबोले

नामस्मरणाची ताकत

ख्या ख्या ख्या . नामस्मरणाची ताकत ही फक्त गट क्र. १ च्या लोकांना कळते आणि उपयोगाला येते, गट क्र. २ च्या लोकांना ती कळतच नाही त्यामुळे उपयोगी पडण्याचा प्रश्नच येत नाही !!

=))))

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 7:49 am | गॉडजिला

ख्या ख्या ख्या .

हे आवडले, बाकीचे ते गट वगैरे डोक्यावरून गेले जरा विस्तारून लिहा कि

अरेच्च्या , इतक्या लवकर विसरलात की काय ? तुम्ही गट क्र. २ मधील आहात .

https://misalpav.com/comment/1108044#comment-1108044

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 1:19 pm | गॉडजिला

आलं लक्षात, हे तुम्ही अजून लक्षात ठेवले आहे होय ? असो असो.

गट पाढणारे तुम्ही त्यात आम्हाला घालणारे तुम्ही म्हटल्यावर आम्ही अजून काय बोलणार ?

बाकी तुम्ही कुठल्याच गटाचे वाटत नाही असे का व्हावे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2021 - 8:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>अर्थात काही टक्के लोकांना अजुनही नामस्मरणाची ताकत असे प्रसंग थोपवु शकते असे वाटु शकते त्याला इलाज नाही.

हे राम ! =)) नामस्मरण की ताकद तुम क्या जानो गॉडी बाबू....! ;)

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

30 Jun 2021 - 2:13 pm | सोत्रि

बोलती बंद!

कसला डेंजर अनुभव आहे हा...

- (नुसत्या विचारानेच पँट 'जर्द' झालेला) सोकाजी

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 3:07 pm | गॉडजिला

अरेच्च्या , इतक्या लवकर विसरलात की काय ? तुम्ही गट क्र. २ मधील आहात .

मिपा व्यवस्थापक मंडळ अथवा टू हु इट मे कंसर्न मार्कस ओरेलिऍस हा सदस्य व्यक्तिगत स्तरावर सार्वजनिकरित्या मला विविध धाग्यानवर पिढीजात शोषित असे पुन्हा पुन्हा निर्लज्जपणे निर्देशित करत असून यातून त्याचे माझ्याबद्दल अज्ञान, आकस व सर्वात म्हत्वाचे म्हणजे त्याचे बीघडलेले मानसिक स्वास्थ्य याचेच तो प्रदर्शन करत आहे.

त्याने वैयक्तिक कमेंट टाळाव्यात यास्तव समज अथवा मला त्याच्याच भाषेत उत्तरे देण्याची विना जबाबदारी परवानगी यापैकी एखादी कृती भविष्यात येथील जबाबदार लोकांना करावी लागेल असे वाटते.

सदरील प्रतिसाद हि तक्रार नसून फक्त निरीक्षण असल्याने हा प्रतिसाद सार्वजनीक राहू द्यावा हि विनंती आहे.

सौन्दर्य's picture

30 Jun 2021 - 11:15 pm | सौन्दर्य

वरील काही प्रतिसादांत चर्चा भरकटलेली दिसतेय. किसन शिंदेंच्या इतक्या चांगल्या अनुभवाला, इतरांच्या अश्याच चांगल्या-वाईट अनुभवांची जोड मिळाली असती तर लेखाचे चीज झाले असते. मूळ लेखात आपल्याकडे व्हॅल्यू ऍडिशन करण्यासारखे असल्यास जरूर ते करावे, पण भलतेच फाटे न फोडल्यास उत्तम. बाकी सर्व सुद्न्य आणि समंजस आहेतच.

सुबोध खरे's picture

1 Jul 2021 - 12:05 pm | सुबोध खरे

आम्ही लहानपणी शाळेत असताना सोसायटीतील मुलेमुलेच एका रविवारी संजय गांधी उद्यानाच्या सिंह सफारीसाठी गेलो होतो.
त्यादिवशी तेथील वनराणी हि गाडी नादुरुस्त होती.
पण तेथल्या एका दयाळु वनरक्षकाने आम्हाला तेथे उपचारासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या सिंहाचे दर्शन घेऊ दिले.
हा पूर्ण वाढलेला आयाळ असलेला सिंह होता आणि आम्ही पिंजर्याच्या ४-५ फुट अंतरात जाताच त्याने गर्जना केली.
त्याचा आवाज इतका भीषण होता कि आम्ही अतिवेगाने ५० फूटतरी पळालो असू. अगदी तो सिंह पाऊण इंच जाड गजाच्या पिंजऱ्यात असला तरीही परत त्याच्या जवळ जाण्याची आमची काही हिंमत झाली नाही.
मुळात चार पाच इंच जाड असलेले त्याचे पंजे आणि त्यातील जाड नखे पाहिल्यावर एक लक्षात आले कि त्याने नुसता पंजा मारला तरी आपले मांस हाडापासून वेगळे होऊन लोम्बु लागेल. त्याचे डोळे हिरवे आणि भेदक होते की त्याच्या डोळ्याला डोळा देताना पण भीती वाटत होती.
असे १० -१२ मिनिटे १५-२० फुटांवरून तो सिंह पाहून मग आम्ही जंगलात फिरून परत आलो.