यामागील भाग:
http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १
http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २
http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३
परिणाम
ध्वनी, आवाज, गोंगाट तसेच ध्वनी प्रदूषण आदींबद्दल वर आपण चर्चा केली. आपली इच्छा असो वा नसो, अनावश्यक आवाज आपल्याला ऐकावेच लागतात. एखादी गोष्ट आपल्याला पहायची नसल्यास आपण आपले डोळे जसे आपण बंद करू शकतो तसेच अनावश्यक गोष्टी न ऐकण्यासाठी जर आपले कान बंद करता आले असते तर! पण ते शक्य नाही.
ध्वनी प्रदूषणाचे मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर विविध परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बहिरेपणा, संभाषणात व्यत्यय, मानसिक तणाव, थकवा असे दैनंदीन जीवनावर विशेषकरून आरोग्यावर परिणाम दिसून येतात. अमेरिकेत ध्वनी प्रदूषणामुळे सुमारे ४०% लोकांना निद्रानाशाचा त्रास जाणवतो असे एका निरीक्षणाअंती दिसून आले आहे. आवाजाच्या प्रदूषणाच्या दुष्परिणामांचे अनेक व्यक्ती शिकार होत आहेत. कित्येकांना आपल्या अंगी असणारे विकार हे आवाजामुळे देखील अधीक बळावतात हेच लक्षात येत नाही.
ध्वनीप्रदूषण हा आरोग्याला गंभीर धोका आहे आणि यामुळे चिडचिड आणि आक्रमकता, उच्च रक्तदाब, उच्च तणावाची पातळी, टिनिटस (कानात बारीक आवाज येत वारंवार राहणे), श्रवणशक्ती कमी होणे, बहिरेपणा, श्रवणदोष, झोपेचा त्रास, हृदयरोग, पक्षाघात मानसिक आजार आणि शारीरिक आघात, मेंदूभोवती रक्तस्त्राव होणे आणि इतर अनेक गुंतागुंत अशा अनेक मार्गांनी लोकांच्या आरोग्यावर आणि वागणुकीवर परिणाम होतो. नजीकच्या काळात ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम अधिक धोकादायक आणि चिंताजनक असू शकतात.
ध्वनीप्रदूषणाचा दररोज लाखो लोकांवर परिणाम होतो. आरोग्याची सर्वात सामान्य समस्या म्हणजे ध्वनी प्रेरित श्रवणदोष (Noise Induced Hearing Loss (NIHL)). मोठ्या आवाज ऐकल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, झोपेचा त्रास, कायमची बधीरता आणि तणाव ही उद्भवू शकते. या आरोग्याच्या समस्या सर्व वयोगटांवर, विशेषत: मुले आणि वृद्ध व्यक्तींवर परिणाम करतात. विमानतळांजवळ किंवा गोंगाट करणाऱ्या रस्त्यांजवळ राहणाऱ्या अनेक मुलांना तणाव आणि इतर समस्या जसे की स्मरणशक्ती, एकाग्रता आणि वाचन कौशल्य यांचा अभाव आदींना तोंड द्यावे लागत असल्याचे आढळून आले आहे.
२०११ मध्ये सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने (सीएसई) डेसिबल सर्वेक्षण केले ज्यात दिल्लीत भारतातील सर्वात गोंगाटाचे रस्ते असल्याचे दिसून आले. २०११ च्या डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, झोपेचा त्रास आणि चिडचिडेपणा हे आरोग्यावर आवाजामुळे परीणाम होणारे प्रमुख घटक होते.
भारतातील घोषित केलेली शांतता क्षेत्र किती शांत आहेत?
एका अभ्यासात दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद आणि लखनऊ येथील १७ शांतता क्षेत्र तपासली असता त्यापैकी कोणतेही क्षेत्र राष्ट्रीय मानकानुसार नव्हते.
ध्वनी प्रदूषण इतके धोकादायक झाले आहे की याची तुलना कर्करोगासारख्या इतर सर्वात घातक रोगांशी केली जाऊ शकते. ध्वनी प्रदूषण हा आधुनिक जीवनशैलीचा परीणामआहे. शहरीकरण, आर्थिक विकास आणि वाहतूक, यांत्रिक प्रगती हे पर्यावरणीय ध्वनी प्रदूषण आणि आरोग्यावर करणारे घटक आहेत. जर नियमित आणि प्रभावी उपाययोजनेद्वारे ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवले गेले नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी ही बाब फार गंभीर असू शकते.
उच्च पातळीच्या आवाजाने बर्याच लोकांना विशेषतः आजारी, वृद्ध आणि गर्भवती महिलांना त्रास होतो. अनावश्यक आवाजामुळे बहिरेपणाची समस्या, कान दुखणे, कानांना इतर गंभीर समस्या निर्माण होतात. संगीत श्रोत्यांना आवडते परंतु इतर लोकांना त्रास देतो. ६० डीबीचा आवाज सामान्य आवाज म्हणून समजला जातो. परंतु ८० डीबी किंवा त्यापेक्षा जास्त आवाज शारीरिकदृष्ट्या वेदनादायक आणि आरोग्यास हानिकारक असतो. दिल्ली (८० डीबी), कोलकाता (८७ डीबी), मुंबई(८५ डीबी), चेन्नई (८९ डीबी) इत्यादी शहरे ध्वनी प्रदूषीत आहेत. जीवनासाठी सुरक्षित असलेल्या पातळीवर आवाज मर्यादित करणे आवश्यक आहे. अनावश्यक आवाज मनुष्य आणि प्राणी यांच्या आरोग्यावर परिणाम करतो.
आवाजाच्या पातळीत अलीकडच्या शतकात वाढ दिसून येते. अंदाजे ३० टक्के युरोपीय लोकसंख्येला रात्रीच्या वेळी ५५डीबी (डेसिबल) पेक्षा जास्त रस्ते वाहतुकीच्या आवाजाला सामोरे जावे लागते. दुर्गम, नैसर्गिक भागदेखील मानवनिर्मित आवाजापासून सुटत नाहीत. अमेरिकेच्या २२ राष्ट्रीय उद्यानांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले की आवाजाचा गोंगाट सरासरीपेक्षा २८% जास्त होता.
ध्वनीप्रदूषणामुळे होणारे इतर सजीवांवर परिणाम:-
ध्वनीप्रदूषण केवळ जमिनीवरील सजीवच नव्हे तर वन्यजीव आणि समुद्रातील जीवांच्याही आरोग्याच्या तसेच वर्तनाच्या समस्येचे कारण ठरत आहे.
वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे पक्ष्यांच्या जीवनावर प्रचंड परिणाम होत आहे. त्यांच्या प्रजननची शक्ती कमी होते आणि त्यांचे वर्तनही बदलत आहे. जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर ऑर्निथॉलॉजीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. त्यांनी झेब्रा फिंच नावाच्या पक्ष्याचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळून आले की, वाहतुकीमुळे होणार्या गोंगाटामुळे त्या पक्षांच्या रक्तातील नेहमीचे ग्लॅकोकोरॉइड प्रोफाइल कमी झाले आहे आणि पक्ष्यांच्या पिल्लांचा आकारही सामान्य पिल्लांपेक्षा लहान होता. वाहतुकीच्या आवाजामुळे पक्ष्यांच्या साद घालण्यातही फरक पडतो असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.
उत्क्रांतीच्या दृष्टीने मानवनिर्मित आवाज ही एक तुलनेने अलीकडील घटना आहे. वैज्ञानिक अभ्यासांवरून हे दिसून आले आहे की वर्तणुकीत फेरबदल करण्याची, शरीरशास्त्रात बदल करण्याची आणि समुदायांची पुनर्रचना करण्याची क्षमता प्राण्यांमध्ये आहे. त्यानुसार आवाजाच्या प्रदूषणामुळे काही पक्षांनी आपली जीवनशैली बदलली आहे. काही प्राणी आणि पक्षी खोल जंगलात गेले आहेत. काही पक्षांनी आपली संवाद साधण्याची शैली तसेच आवाज बदलले आहेत.
ध्वनी प्रदूषण वन्यजीवांच्या देखील आरोग्यावर परिणाम करते असे अभ्यासानुसार असे दिसून आले आहे . मोठ्या आवाजामुळे सुरवंटांच्या हृदयाचे ठोके वाढतात. ब्लूबर्ड्स कमी पिल्लांना जन्म देतात. जंगलात भटकणे, अन्न शोधणे, जोडीदारांना आकर्षित करणे आणि भक्षकांपासून दूर जाणे यासारख्या विविध कारणांसाठी प्राणी ध्वनीचा वापर करतात. ध्वनी प्रदूषणामुळे त्यांना ही कार्ये पूर्ण करणे अवघड झाले आहे. एकुणच, आवाजामुळे प्राणी तसेच पक्षांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे अभ्यासाअंती दिसून आलेले आहे.
वाढत्या आवाजाचा केवळ जमिनीवरील प्राण्यांवरच परिणाम होत नाही, तर समुद्रात राहणाऱ्या जलचरांसाठीही वाढती समस्या आहे. परंतु औद्योगिक युगाच्या उदयामुळे, जहाजे, सोनार (पाणबुडी मध्ये वापरतात ते) , नैसर्गिक तेल उत्खनन, युद्धनौकांचा अभ्यास आणि मासेमारी यासह इतर अनेक मानवी हालचालींमधून पाण्याखालच्या आवाजाची पातळी नाट्यमयरित्या वाढली आहे.
सर्वच आवाज एकसमान निर्माण होत नाहीत. आवाजाचे गुणधर्म अनेक प्रकारे वेगवेगळे असतात, जसे की ते किती जोरात असतात (तीव्रता, डेसिबलमध्ये मोजले जातात), ते किती काळ टिकतात (सेकंदाचे अंश) आणि त्यांचा पिच किंवा स्वर (फ्रिक्वेन्सी, हर्ट्झमध्ये मोजले जातात). उदाहरणार्थ, पियानोवरील स्वरांच्या खालच्या पट्टीतील जी वारंवारता (frequency)असते ती वारंवारता बहुतेक मोठ्या देवमाशाच्या प्रजाती तसेच मोठ्या संख्येने माशांच्या प्रजाती संवाद साधण्यासाठी वापरतात.
समुद्राच्या वाढत्या आवाजाचा सागरी प्राण्यांवर आणि अधिवासावर गुंतागुंतीच्या पद्धतीने परिणाम होतो. एक तर पृष्ठभागाखालचे आवाज लाटांपेक्षा वेगळे असतात. हवेपेक्षा पाण्यात किंवा पाण्याखाली, आवाज अधिक दूरवर प्रवास करतो हा मुद्दा महत्वाचा आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धातील एका प्रयोगात, संशोधकांनी अंटार्क्टिकाजवळ एक स्पीकर ठेवला, काही कमी वारंवारतेचे किंवा खोल आवाज त्यावर प्रसारण केले आणि बर्म्युडाजवळ ते ऐकल्या जाऊ शकले. या प्रयोगाने सिद्ध झाले की आवाज समुद्रातून अक्षरशः अर्ध्या जगभरात जाऊ शकतो.
समुद्रात आपल्याला सोनार प्रणाली (२०० ते २५० डीबी), पाणबुडी, हायड्रोफोन, टँकर, लष्करी जहाजे इत्यादी अनेक ध्वनी उत्पादन प्रणाली सापडू शकतात. क्रृपया दोन मुद्दे लक्षात असू द्या की, १००-१२५ डीबी दरम्यान असणारा ध्वनीं सजिवांना अस्वस्थ करतो आणि पाण्यात आवाज अधिक दूरवर प्रवास करतो. ध्वनी समुद्राच्या पाण्यात सुमारे १५०० मीटर प्रति सेकंद प्रवास करतो तर आवाज हवेत हवेत सुमारे ३४० मीटर प्रति सेकंद म्हणजेच पाण्याच्या तुलनेने हळू प्रवास करतो. म्हणजेच एखादी सोनार प्रणाली असणारी बोट किंवा पाणबुडी भारताच्या पुर्व किनार्यावर उभी असेल तर त्यातून निघणारा आवाज अगदी दुरवर असलेल्या आग्नेय आशियातल्या समुद्रात असणार्या देवमाशांना किंवा इतर पाण्यातल्या सजीवांना तितकाच हानीकारक ठरू शकतो.
सागरी जीव पाण्याखालील ध्वनीचा उपयोग अनेक महत्त्वपूर्ण कामासाठी करतात. ज्याप्रमाणे लोक एकमेकांशी बोलतात त्याचप्रमाणे सागरी प्राणी संवाद साधण्यासाठी आवाजाचा वापर करतात. तथापि, सागरी प्रजाती बोलण्यापेक्षा जास्त ऐकतात. सागरी प्रजाती आपल्या श्रवणाचा उपयोग अन्न आणि जोडीदार शोधण्यासाठी, प्राणभक्ष्यांना टाळण्यासाठी आणि पाण्यात प्रवास करण्यासाठी करतात. अनेक सागरी प्रजातींच्या अस्तित्वासाठी ध्वनी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचमुळे समुद्रात जहाजांमधून आणि मानवी हालचालींमुळे निर्माण होणारा अवास्तव आवाज, जिवंत राहण्यासाठी प्रतिध्वनीवर अवलंबून असलेल्या सागरी जीव, देवमासे आणि डॉल्फिनसाठी हानिकारक आहे.
सागरी प्राण्यांना ध्वनी तरंगासोबत वातावरणात विकसित होण्यासाठी ४० ते ५ ० दशलक्ष वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे लागली. परंतु औद्योगिक युगाच्या आगमनामुळे केवळ शंभर वर्षांच्या कालावधीत मानवाने पाण्याखालील आवाजात आमूलाग्र बदल केला आहे. मानवाच्या समुद्रातील हस्तक्षेपामुळे सागरी वातावरण गढूळ होत असून ध्वनी प्रदूषणामुळे सागरी प्रजातींच्या दैनंदिन जीवनावर आणि कार्यांवर परिणाम होऊ घातलेला आहे.
दुर्दैवाने अनेक देवमासे, डॉल्फिन आणि इतर सागरी जीवांसाठी, पाण्याच्या पृष्ठभागाखालील सोनार प्रणालीचा (Sound Navigation and Ranging)वापर केल्याने इजा होऊ शकते आणि मृत्यूही होऊ शकतो. पाण्यात 'पाहण्यासाठी' सोनार प्रणाली ध्वनी लहरींचा वापर करते.
शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी अमेरिकन नौदलाने सर्वप्रथम विकसित केलेल्या सोनार प्रणालींमध्ये सुमारे २३५ डेसिबलच्या ताकदीच्या मंद गतीने पुढे जाणार्या, फिरत्या ध्वनी लहरी तयार होतात. या ध्वनी लहरी पाण्याखाली शेकडो किलोमिटरपर्यंत प्रवास करू शकतात आणि त्यांच्या उगमाच्या स्रोतापासून ४८२ किलोमिटरपर्यंत १४० डेसिबलची तीव्रता टिकवून ठेवू शकतात. या आवाजाची तुलनाच करायची झाल्यास जगातील सर्वात मोठा रॉक बँडचा आवाज १३० डीबी आहे. म्हणजेच सोनार यंत्रांमधून निघणारा आवाज समुद्री जीवांसाठी किती हानिकारक ठरू शकतो याचा तुम्हीच विचार करा.
सोनार यंत्रणेतून निघणार्या ध्वनीच्या लाटांचा जलचरांवर होणार्या थेट शारीरिक परिणामांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली, तरी पुराव्यांवरून असे दिसून येते की देवमासे अशा ध्वनीपासून दूर जाण्यासाठी शेकडो मैल लांब पोहत जातात किंवा पाण्यात अगदी खोलवर जात राहतात. यामुळे त्यांच्या कान आणि डोळ्यातून रक्तस्त्राव होतो. कधीकधी आत्मघात करण्यासाठी देवमासे समुद्रकिनाराही जवळ करतात. (समुद्रकिनार्यावर आल्यामुळे त्यांना प्राणवायू मिळत नाही आणि त्यात त्यांचा म्रृत्यू होतो.)
जागतिक अंदाजानुसार, जहाजांच्या आकार आणि संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यात अजून जास्त ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता आहे.
भविष्यातील पिढ्यांसाठी सागरी संसाधने शाश्वत उपलब्ध करून देण्याचे ध्येय राखण्याचे तसेच मानवनिर्मित सागरी आवाजाच्या प्रदूषणाचा प्रश्न सर्वसमावेशक पद्धतीने हाताळण्याची आवश्यकता आजघडीला आहे. समुद्रातील आवाजाची गुंतागुंत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, नवीन साधने विकसित करण्यासाठी जगभरातील सामाजिक संस्था, देश आणि उद्योगांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी, मदत करणारी धोरणे विकसित केली पाहिजे. मानवनिर्मित आवाजाच्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी अधीक संशोधन करून आतापर्यंत वापरलेल्या साधनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्धार संस्थांनी केला पाहिजे. प्रदूषणाच्या पातळीची वेळोवेळी नोंद घेवून त्या बदलाचा मागोवा घेणे. आवाजात जे बदल होत आहेत ते का होत आहेत, तसेच त्यावर काय उपाय योजना आहेत ते समजावून घेतले पाहिजे.
सागरी हालचालींचे नकाशे तयार करणे. जलचर प्राणी कोठे आहेत, कोणत्या देशाजवळ, कोणत्या घनतेत आहेत, मानवी हालचालींमधून पाण्याखालच्या आवाजाच्या पातळीचा अंदाज वर्तवण्यासाठी, पाण्याखाली काय चालले आहे, सागरी सस्तन प्राण्यांबरोबर मानवनिर्मित आवाजाची उच्च पातळी कोठे वाढते हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ या नकाशांचा वापर करू शकतात. सागरी आवाजाच्या परिणामांबाबत दीर्घकालीन दूरदर्शी योजना आखण्यात याव्या.
सर्व देशांच्या सरकारांनी सागरी आवाजाबाबतीत एकसमान धोरण आखणे, आवाजाच्या परिणामांचे अधिक व्यापक आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी एक समीती नेमून योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करणे, जे देश, संस्था, उद्योग या उद्देशांविरूद्ध कामे करतील त्यांना दंड करणे आदी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. जलचरांवर आवाजाचे परीणाम अभ्यासण्यासाठी नवे नवे तंत्रज्ञान वापरणे, मासेमारी, उत्खनन आदींसाठी नेहमीचे यंत्र साधने असलेल्या बोटी, जहाजे यात सुधारणा करणे आदी पर्यांयांचा वापर करणे शक्य आहे.
काही सामाजीक तसेच पर्यावरणवादी संघटना अमेरिकेच्या नौदलाला लष्करी प्रशिक्षणासाठी सोनाराचा वापर थांबवण्याचे किंवा कमी करण्याचे आवाहन करत आहेत. आपल्या भारतातदेखील आवाजाप्रती अशी जाणीव नागरीकांमध्ये आणण्याची गरज आहे.
खोल समुद्रातील तेल किंवा वायूसाठा शोधणारी जहाजे एअर गन्स नावाचे उपकरण वापरून खोल समुद्रात ध्वनी सोडतात. त्या ध्वनींमुळे भूकंपासारखा आवाज सागरात निर्माण होतो. या असल्या ध्वनींच्या स्फोटांमुळे सागरी प्राण्यांच्या कानाला हानी होवून गंभीर दुखापत होऊ शकते. या आवाजामुळे देवमाशांच्या वर्तन बदलले असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवलेली आहे.
ध्वनीप्रदूषणाच्या दुष्परिणामांवर संशोधन करणाऱ्यांमध्ये स्पेनमधील संशोधक मिशेल आंद्रे यांचा समावेश आहे. ते हायड्रोफोन नावाच्या उपकरणांचा वापर करून सागरी ध्वनी रेकॉर्ड करत आहेत. त्या प्रकल्पात ते निरनिराळ्या ठिकाणांमधून माहिती संकलीत करतात. पाण्याखालच्या आवाजाचा या प्राण्यांवर काय परिणाम होत आहे हे ठरवणे हा या माहितीच्या विश्लेषणाचा उद्देश आहे. समुद्राच्या आवाजाच्या धोक्यांपासून सागरी प्राण्यांचे संरक्षण करण्याचे मार्ग अशा प्रकल्पातून सापडण्याची आशा भावी काळात मिळणार असल्याने अशा संशोधन प्रकल्पांना सरकार तसेच बड्या उद्योगांनी साथ दिली पाहिजे.
भाग ४ समाप्त. (हा भाग अजून विस्तृतरित्या लिहायचा आहे. माझ्या आठवणीत राहण्यासाठी ही सुचना येथे लिहीली आहे.)
(क्रमश:)
प्रतिक्रिया
16 Apr 2021 - 5:48 pm | मुक्त विहारि
वाखूसा
16 Apr 2021 - 5:51 pm | कुमार१
सहमत.
16 Apr 2021 - 9:21 pm | गॉडजिला
विचारात पाडणारे दर्जेदार लिखाण.
16 Apr 2021 - 9:43 pm | अभिजीत अवलिया
उत्तम माहिती.
17 Apr 2021 - 2:25 pm | ज्ञानोबाचे पैजार
आता पर्यंतचे सर्व भाग वाचनिय आणि विचार करायला लावणारे झाले आहेत.
बर्याच नव्या गोष्टी समजल्या.
पुभाप्र
पैजारबुवा,
18 Apr 2021 - 12:03 pm | चौथा कोनाडा
समुद्रपाण्याखालील वाढते आवाज या विषयावरील हा धागा आवडला.
ध्वनी प्रदुषणाचे गांभिर्य समजायला या मालिकेमु़ळे चांगली मदत होते आहे.
26 Apr 2021 - 4:39 pm | मुक्त विहारि
पुणे: मोठ्या आवाजात टीव्ही लावल्याचा विचारला जाब, तरुणावर जीवघेणा हल्ला.....
https://maharashtratimes.com/crime-news/pune-man-attacked-with-sickle-in...
---------