राम राम मंडळी,
मूळ लेखाआधीच एक अवांतर मुद्दा - (ही वाटल्यास प्रस्तावना समजा परंतु या मुद्द्यावरदेखील अवश्य विचार व्हावा, चर्चा व्हावी अशी इच्छा आहे!)
मंडळी, इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं. का? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या-बोलण्याला बंदी का असावी बरं? किंवा त्या व्यक्तिच्या साहित्याबद्दलचा एखादा उल्लेख असलेला लेख, केवळ तो एक सभासद आहे या एकाच कारणास्तव 'आपापसात' सारखा गावाच्या वेशीबाहेर का असावा, किंवा वैयक्तिक, व्यक्तिगत मध्ये का मोडावा बरं? जणू काही संबंधित लेखकाने त्या संकेतस्थळाचे सभासदत्व घेऊन काही गुन्हाच केला आहे!
पुलं, कुसुमाग्रज, दळवी, पाडगावकर यांच्याबद्दल आपण लिहितोच ना? ही मंडळी खरंच खूप मोठी आहेत हे मान्य. आम्हीही या सगळ्यांचे भक्त आहोत, चाहते आहोत. परंतु आपल्यातीलच काही मंडळी जर चांगलं लेखन करत असतील तर त्यांच्या साहित्याचा उलेख त्याच संकेतस्थळावर करायला 'व्यक्तिगत', वैयक्तिक, 'सभासद' हे शब्द आड येऊ नयेत असे वाटते! सगळ्यांनाच काही पुस्तके काढणे, किंवा मौजसारख्या दिवाळी अंकात आपले साहित्य पाठवायला जमते असे नव्हे. काहींना आपले विचार व्यक्त करायला आंतरजाल हे माध्यमच सोयीचे वाटते! आणि कालांतराने, भविष्यात हेच माध्यम अधिक प्रभावी ठरेल असाही अंदाज आहे!
=============================================
राम राम मडळी,
आज मी येथे मला आवडलेल्या काही मराठी आंतरजालीय लेखकांबद्दल दोन शब्द लिहिणार आहे. मी गेले काही काळ मराठी आंतरजालावर वावरत असून बर्यापैकी बदनाम आहे आणि बर्यापैकी लोकप्रियही आहे! :)
मी कामधंद्याच्या निमित्ताने आंतरजालावर वावरू लागलो आणि अशातच एके दिवशी माझा मित्र सुभाषचंद्र आपटे, ऊर्फ अगस्ती याने मला मनोगत या संकेतस्थळाबद्दल सांगितले. मी मनोगतवर वावरू लागलो, हळूहळू मराठी आंतरजालाशी फॅमिलियर व्हायला लागलो. मनोगतावर मला अनेक मित्र भेटले, अनेकांचं गद्य/पद्य साहित्य वाचावयास मिळालं. मीही तिथे लिहू लागलो, इतरांचंही साहित्य वाचू लागलो. ते वाचताना मला काही सकस लेखन वाचावयास मिळालं, ज्याची चांगल्या साहित्यात गणना होऊ शकेल. आज मी त्यापैकीच काही लेखकांच्या साहित्याबद्दल इथे दोन शब्द लिहिणार आहे. हे लेखन करताना माझी भूमिका केवळ एका आस्वादकाची आणि रसिकाची असेल. या लेखात मी काही मंडळींची नांवे जरूर घेणार आहे. परंतु यात व्यक्तिगत किंवा वैयक्तिक असं काहीही नसेल व ते केवळ एक लेखक आणि वाचक याच संदर्भात मांडलं गेलं असेल/तसा माझा प्रयत्न असेल.
संजोप राव
यांचे लेखन मला अतिशय आवडते. भाषेवर यांचे अतिशय चांगले प्रभुत्व असल्यामुळे याचे लेखन अत्यंत सकस व दर्जेदार वाटते. याचं स्वतःचं वाचनही खूप असल्यामुळे यांच्या लेखनात बहुश्रुतता जाणवते. चित्रपट व त्याचे आस्वादक समिक्षण, त्यातील गीतकार, अभिनेते यांच्यावरही ते खूप चांगले लेखन करतात. भविष्यातदेखील यांच्याकडून उत्तमोत्तम लेखन वाचावयास मिळेल अशी आशा आहे.
अनु
यांच्या लेखनातील विनोदाची पातळी अत्यंत सकस आहे असे मला वाटते. साधारणपणे स्वतःमधली विसंगती शोधून त्यावर नर्मविनोदी टिपणी करण्यात यांचा हातखंडा आहे. मला त्यांना एवढंच सुचवावासं वाटतं की केवळ स्वतःवरच नव्हे, तर आपल्या आजुबाजूला वावरणार्या व्यक्तिंमध्ये, आपल्या आजुबाजुला घडणार्या घटनांमध्येही पुष्कळदा विनोदी विसंगती आढळते/असते. सुदैवाने ती विसंगती शोधण्याची हातोटी यांच्यात आहे, आणि ती हातोटी अधिकाधिक डेव्हलप करून व तिचा वापर करून यांनी अधिकाधिक लेखन केले पाहिजे असे वाटते.
नंदन
हा माणूस स्वतः फार कमी लिहितो. पण माझ्या मते याला उतम साहित्याची अतिशय चांगली जाण आहे. एखाद्या लेखकाची किंवा एखाद्या उत्तम पुस्तकाची अगदी सर्वांगसुंदर ओळख करून देण्याची हातोटी याच्यात आहे. परंतु माझ्या मते त्याने स्वतःही अधिकाधिक लिहावंन. ते लेखनही अतिशय दर्जेदार असेल अशी माझी खात्री आहे.
प्रमोद देव
यांच्याकडे कदाचित आपलं लेखन इतरांना कसं आवडेल हे पाहायची टॅक्ट नसेल. आणि खरं तर तेच चांगलं आहे. त्यामुळेच यांचं लेखन अधिक प्रांजळ वाटतं, मनापासून वाटतं. यांनी खूप पाहिलं आहे, अनुभवलं आहे त्यामुळे यांचं जे काही लेखन आहे ते स्वानुभवातून आलेलं आहे. मला व्यक्तिशः स्वानुभवावर आधारित लेखन वाचायला अधिक आवडतं. आंतरजालावर अगदी सहजी आणि सराईतपणे वावरणार्या मंडळींचं सरासरी वय पाहिलं तर वास्तविक यांचं वय थोडं अधिक आहे. हे वयाने थोडे सिनियर आहेत. (माफ करा देवकाका, मी तुम्हाला म्हातारं वगैरे म्हटलेलं नाहीये! दिलसे आप आजभी जवान है! :) माझा मुद्दा इतकाच की हल्लीच्या सरासरी २५ ते ३० वयोगटातील मंडळी ज्या सफाईने आंतरजालावर वावरतील त्या तुलनेत ही सिनियर मंडळी वावरणार नाहीत. असे असूनदेखील ह्या आंतजालीय विश्वाशी देवकाकांनी जी हातमिळवणी केले आहे ती मला तरी निश्चित कौतुकास्पद वाटते. In fact, त्यांच्याच पिढीतल्या इतरही काही मंडळींनी आंतरजाल विश्वावर अधिकाधिक वावरून लेखन केले पाहिजे असेही वाटते!
डॉ दिलिप बिरुटे, प्रकाश घाटपांडे, प्रियाली, -
मंडळी, खरं तर इथे नांव घेऊन लिहिण्याइतपत यांचं लेखन मी वाचलेलं नाही. परंतु ही मंडळी छुपे रुस्तम आहेत असं मला वाटतं. यांच्या एखाददोन लेखांतून, प्रतिसादातून यांच्या नर्मविनोदी शैलीची आणि दुसर्याला हळूच चिमटे काढण्याची लेखनपद्धती माझ्या पाहण्यात आहे. खरं पाहता यांनी अधिकाधिक लेखन करायला हवे, लिहीत राहायला हवे. ही मंडळी निश्चितपणे काही एक दर्जा असलेले लेखन करू शकतील अशी माझी खात्री आहे! :)
सर्वसाक्षी आणि प्रभाकर पेठकरांकडूनही मला खूप आशा आहेत. अर्थात, साक्षी ऐतिहासिक जास्त लिहितो परंतु ललितही तो छान लिहू शकेल आणि लिहितोही. प्रभाकर पेठकरांची शैलीही मला सहजसुंदर वाटते. हल्ली आंतरजालावर कोहम, दाभोळकर, चौकस ही मंडळीदेखील अतिशय चांगलं लेखन करताना आढळतात.
आता पद्य साहित्याबद्दल -
प्रसिद्ध गझलकार चित्तोबा म्हणतात त्याप्रमाणे मला काव्याची समज खूपच कमी आहे आणि ते खरंही आहे! :) परंतु मला चित्तोबांच्या गझला, प्रसाद शिरगावकरच्या गझला मनापासून आवडतात. जयश्री अंबासकर, अभिजित पापळकरांच्या कवितांचाही मी चाहता आहे. अदितीच्या कविताही मला आवडतात. अदितीला अतिशय उत्तम भाषावैभव लाभले आहे आणि तिने गद्य लेखनही अधिकाधिक करावे असे वाटते. आंतरजालावरील माझा सर्वात आवडणारा जर कुणी गझलाकार असेल तर तो माफीचा साक्षिदार! या माणसाचा मी डायहार्ड चाहता आहे! :)
असो! हा लेख म्हणजे मराठी आंतजालावर लिहिणार्या मंडळींचा मी माझ्या परिने घेतलेला एक धावता लेखाजोखा आहे. यात काही त्रुटीही असू शकतील, कदाचित यातले विचार इतरांना पटणारही नाहीत. असो, 'मराठी आंतरजालीय साहित्यविश्व' दिवसेंदिवस अत्यंत समृद्ध होवो, उच्च दर्जाचं होवो, एवढीच इच्छा जाता जाता व्यक्त कराविशी वाटते!
-- तात्या अभ्यंकर.
आगामी -
अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.)
ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.)
अवांतर - वरील सगळ्या मंडळींचं बोट धरून चालणारा मराठी आंतरजालावरचा मीदेखील एक लिंबुटिंबू साहित्यिक आहे! :))
प्रतिक्रिया
16 Sep 2007 - 1:33 pm | सहज
हं तात्या छान आहे. त्या निमित्ताने येथे वाचक त्यांना आवडत्या लेखकाचे नाव टाकू शकतील. म्हणून हीट लिस्ट म्हणालो हा. हीट लेखकांची लिस्ट, गैरसमज नको ;-)
बाकी मला देखील जरा वैयक्तिक उल्लेख जर का आला तर काय बिघडले असे वाटते. मिसळपाव वर तशी संधी मिळावी व ते ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट बनावे की इतर संकेतस्थळे जरा "लुजन अप" व्हावी व तसे झाले तर मिसळपाव एकदम हीट झाले / पावले म्हणा. हे माझे मत.
बाकी नको कोणाचे नाव घेऊन कोणाला चढवायला नको. मला फक्त लेख जमला की नाही तेवढेच पुरेसे आहे. कारण कोणीही सदा सर्वच काही लिहतो ते चांगले असे मला वाटत नाही. (किंवा सदासर्वदा जे चांगले त्यालाच कदाचीत संत साहीत्य (संत वांगमय - जमत नाही हो टाइप करायला. म्हणूनच मी लिहीत नाही) म्हणत असतील. हो त्या कोणाच्या धार्मीक लिखाणा विरुध्द लिहायची आपली हिम्मत नाय. काही लिहले तर मात्र आम्हालाच जाळून टाकण्यात येईल हो. त्यामुळे बाकीचे साहित्य आवडते, कुणाला ना कुणाला तरी आवडतेच कोणीही काहीही लिहले तरी.
-----------------------------------------------------------------------
वैचारीक व वैयक्तिक मुद्दे संपले की मनुष्य शुद्धलेखनाच्या पातळीवर उतरतो.
16 Sep 2007 - 1:45 pm | गुंडोपंत
वैचारीक व वैयक्तिक मुद्दे संपले की मनुष्य शुद्धलेखनाच्या पातळीवर उतरतो.
जबरी टाकलात सहजराव!
झकास ;)))
आपला
गुंडोपंत
16 Sep 2007 - 5:04 pm | आजानुकर्ण
हा शब्द अशुद्ध आहे. योग्य शब्द वैचारिक असा आहे.
;०)
16 Sep 2007 - 1:44 pm | गुंडोपंत
छान! वेगळा
लेखक हाच लेखाचा विषय!?
लेखक म्हणजे मिसळीचे मुख्य मसाले.
असो,
अजूनही खरं तर अनेक लेखक आहेत.
अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक!
पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;))
(पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!)
असणार, असेल नसेलही, पण
बाकी कांदे कोथिंबीरी असतातच प्रतिसाद नि वाद विवाद घालायला ;))
त्याशिवाय मिसळ कशी पुर्ण होणार तात्या?
आपला
कच्चा
कांदोपंत
16 Sep 2007 - 2:09 pm | विसोबा खेचर
>>अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक!
खरं आहे. मी मुख्यत्वेकरून ललित साहित्याचा विचार केला आहे.. अर्थात, ललितसाहित्याच्या बाबतील लिखाळरावांचा आणि शैलेशरावांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला. आणिही काही मंडळींचा उल्लेख अनवधानाने करायचा राहिला असण्याची शक्यता आहे.
>>पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;))
(पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!)
नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :)
असो..
तात्या.
16 Sep 2007 - 2:46 pm | गुंडोपंत
नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :)
वा मग उत्तम आहे बरं का!
आम्ही आपले उगाच छेडून पाहतो आहोत निश्चयापासून ढळला तर नाही ना! ;))
आपला
खुंटे हलवून घट्ट आहेत की नाही पाहणारा
गुंडोपंत
16 Sep 2007 - 1:47 pm | आजानुकर्ण
असेच आठवलेले.
१. चौकस
२. संजोप राव
३. गायत्री
४. मी मराठी (हिंदी नको इंग्रजी हवी वाले)
५. जी.एस.
६. दिनेश शिंदे. (मायबोलीवर दिनेशव्हीएस नावाने लिहितात. त्यांची रंगीबेरंगी विभागातील अनुदिनी अप्रतिम आहे. याशिवाय पाककृतींचे ज्ञानही)
७. प्रदीप
८. टग्या
९. धनंजय
१०. वाचक्नवी
११. यनावाला
१२. सर्वसाक्षी. (हवाई सुंदरी सकट ;) )
१३. अनु
१४. प्रियाली
१५. नंदन
१६. महेश वेलणकर (यांच्या "माझी अडगळ" ह्या अनुदिनीवरच्या कविता व लेख सुरेख आहेत.)
१७. तात्या
१८. मिलिंद
१९. प्रकाश घाटपांडे
२०. प्रा. बिरुटे सर
16 Sep 2007 - 2:11 pm | विसोबा खेचर
धन्यवाद रे कर्णा!
वरील साहित्यिकांच्या मांदियाळीत आमचंही नांव आठवणीने घेतलंस या बद्दल! :)
16 Sep 2007 - 2:17 pm | नंदन
धन्यवाद तात्या/आजानुकर्ण :). मराठी अनुदिनीविश्वाचा विचार केला तर ट्युलिप, अभिजित बाठे, मेघना भुसकुटे, कोहम, योगेश, अर्चना , सुमेधा, अजित ओक, आनंद घारे या नावांची भर या यादीत घालावीशी वाटते.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
16 Sep 2007 - 3:25 pm | प्रमोद देव
माझ्या मनातले बहुधा तात्याने जाणले असावे.
आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांवरील व्यक्ती आणि वल्ली( जशा मला दिसल्या,भावल्या,समजल्या तशा) अशा तर्हेचे काही तरी लिखाण करावे असे बरेच दिवस मनात आहे. अर्थात मला त्यात कितपत यश येईल ही प्रामाणिक शंका असल्यामुळे मी तो विचार दूर ढकलत होतो. माझ्यामते ह्या विषयावर समर्थपणे जर कुणी लिहू शकेल तर ते म्हणजे स्वत: तात्या आणि दुसरे म्हणजे आमचे रावसाहेब(संजोपजी)!
तात्याचा व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा आहे. ह्या बाबतीत कुणाचा विरोध होईल असे मला वाटत नाही. तात्यावर जाणता/अजाणता पुलंचा प्रभाव आहेच आणि तो त्याच्या लिखाणातही वारंवार दिसत असतो.
रावसाहेबांना लोकांच्यातील गुणदोषांचे नेमके भान असावे असे वाटते . कारण त्यांच्या लेखनात ते वारंवार प्रकट झालेय. जीए हा त्यांचा ’हळवा’ विषय आहे.
आता अजून काही आवडत्या लेखकासंबंधी!
अरूण वडुलेकरांना मी कसा विसरू शकेन? त्यांच्या आखाती मुशाफिरीतून त्यांनी मानवी स्वभावाचे दाखवलेले विविध पैलू आणि निर्धाराच्या जोरावर अवघड परिस्थितीवर मात कशी करता येते ह्या बद्दलचे त्यांचे अनुभव ज्या सहजसुंदर भाषेत मांडलेत त्याला तोड नाही.
अनु ही अशीच एक समर्थ लेखिका आहे. अतिशय मार्मिक निरीक्षण आणि ते तितक्याच समर्थपणे मांडण्यात तिचा हातखंडा आहे. खरे तर स्वत:वर विनोद करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.पण तीच गोष्ट ती लीलया करते जे भल्याभल्यांना जमत नाही.
अजून कितीतरी असे लेखक आहेत की ज्यांच्या वैशिष्ठ्यांबद्द्ल बोलायचे झाले तर कदाचित काही प्रकरणे लिहावी लागतील.
चटकन आठवणारी नावे म्हणजे जयश्री अंबासकर,प्रियाली,मीरा फाटक,अदिती,वेदश्री,साती,सुवर्णमयी,अनमिक,राधिका,स्वाती दिनेश,प्राजु,जीवन जिज्ञासा ,ऐहिक सारख्या समर्थ लेखिका/कवियत्री (अजून बर्याच आहेत) आणि लेखकांमध्ये चौकस,सर्वसाक्षी,प्रभाकर पेठकर,नंदन,अभिजित पापळकर,यनावाला,धनंजय,धोंडोपंत,विकास,वाचक्नवी,आनंदघन,योगेश,कोहम अशी किती बरे नावे घ्यावीत?
कवी मंडळीतही भरपूर दिग्गज आहेत. चित्तरंजन,वैभव जोशी,प्रसाद शिरगावकर,प्रदिप कुलकर्णी,मिलिंद फणसे,जयंतराव कुलकर्णी,खोडसाळ,केशवसुमार,माफीचा साक्षीदार(आणि असे कितीतरी) अशी किती नावे घ्यावीत.
ह्या महाजालावर अजून असंख्य लेखक/लेखिका आहेत ह्याची नम्र जाणीव आहे. मात्र मी आजवर ज्यांचे काही वाचलेले आहे आणि त्यातही जे चटकन आठवले त्यांचीच नावे इथे घेतलेत ह्याची कृपया नोंद घ्यावी.
ह्या सर्वांच्या लेखन आणि स्वभावाविषयी एक एक लेख लिहायचा म्हटले तर किती साहित्य निर्माण होईल? माणसांचे किती नवनवे नमुने बघायला मिळतील कोण जाणे? पण हे करण्यासाठी तसाच समर्थ लेख हवा! आमचे ते काम नाही.
16 Sep 2007 - 4:59 pm | आजानुकर्ण
तुमचेही लेखन वाचायला आवडते. अनवधानाने नाव राहून गेले.
याशिवाय केशवसुमार व मिल्या यांची विडंबने मस्त. विनायक आणि नीलकांत यांचे प्रतिसाद अभ्यासू असतात.
कवितांमधले फारसे कळत नाही पण बैरागी यांची "गाजला किती पाऊस" ही कविता आवडली होती. गमभनकार ओंकारच्या गझलही मस्त. :)
16 Sep 2007 - 6:09 pm | प्रमोद देव
अरे योगेश नावात काय आहे? सहज तोंडावर आले त्यांची नावे घेतली म्हणजे ज्यांचा उल्लेख राहून जातो ते कमी दर्जाचे असा अर्थ नसतोच मुळी.माझे नाव नाही घेतले म्हणून मी नाखूष होणार नाही आणि घेतले म्हणून खूषही होणार नाही. कारण इथे लिहिणारे किती समर्थ लोक आहेत ह्याची जाणीव मला आहे आणि मी स्वतःला तरी अजून बाळबोध-लेखक समजतो. म्हणजे लिहितो म्हणून लेखक! बस्स! बाकी ते कुणाला आवडते हे कळले की बरे वाटते(खोटं कशाला बोला)हे देखील तितकेच खरे आहे. पण त्यात प्रगती व्हावी अशी इच्छा आहे आणि ते केवळ त्यात चूका काढणार्या आणि वर्मावर बोट ठेवणार्या प्रतिसादातूनच साध्य होऊ शकेल.पण दूर्दैवाने तसे प्रतिसाद देणे लोक टाळतात. मग प्रगती कशी होणार!
शैलेश खांडेकर,मिल्या,विनायक,रोहिणी,नीलकांत अशा सारख्या अजून बर्याच जणांची नावे राहिलीत हे बाकी खरे आहे पण त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही.
17 Sep 2007 - 8:58 am | आजानुकर्ण
तुमचे म्हणणे बरोबर आहे.
माफीचा साक्षीदार, शैलेश, रोहिणी, अरुण वडुलेकर यांचीही नावे माझ्या यादीत आहेत. :)
16 Sep 2007 - 4:34 pm | प्रियाली
लेखात आणि प्रतिसादांत ज्यांची नावे आली आणि ज्यांची नावे राहून गेली त्यापैकी जे सर्व लेखनाचा प्रामाणिक प्रयत्न करतात ते सर्वच चांगले लेखक असावेत. प्रत्येकाची शैली आणि आवड वेगळी.
अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.)
ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.)
रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका.
अवांतरः पोष्टहापिस हे नाव मस्त आहे.
16 Sep 2007 - 7:08 pm | विसोबा खेचर
प्रियाली,
अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.)
ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.)
रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका
तू सांगितल्याप्रमाणे सध्या रौशनीचा प्रथम व द्वितीय भाग इथेही टाकत आहे. तिसरा भाग बराचसा लिहून पूर्ण आहे तो ही आजउद्याकडे इथे प्रसिद्ध करीन.
तात्या.
16 Sep 2007 - 5:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या,
अभ्यासासाठी एक मस्त विषय आहे.( आमचे नाव आपण घेतले म्हणून नव्हे,त्याबाबत आपण जरा घाई केली,असे वाटते.)उपक्रमच्या आमच्या पहिल्यावहिल्या 'या दशकातील साहित्य'या लेखात या दशकाचा लेखक आणि साहित्यविषयक विचार चाललेला होता, तेव्हा त्यात मराठी संकेतस्थळावरील लेखकाचा आणि त्यांच्या साहित्यविषयक एक ओझरता उल्लेख केला होता.तो याच साठी केला होता की,संकेतस्थळावर अनेक दर्जेदार लेखक आहेत.पण त्यांच्या लेखनाची नोंद घेतली गेलेली नाही .संकेतस्थळावर उत्तम लेखन करणारे लेखक कोण ? याचा शोध घेतांना कविता,कथा,वैचारिक लेख,संशोधनपर लेख,भाषाविषयक लेख त्यांची संख्या त्याच बरोबर कोणत्या वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन लेखक लेखन करतो हेही तपासले पाहिजे. चारशे मराठी अनुदिन्या आहेत म्हणजे चारशे लेखक आहेत.साहित्यविषयक त्यांचे स्वत:चे साहित्य कोणते त्याचा स्वतंत्र अभ्यास करुन संकेतस्थळावरील लेखक निवडले पाहिजेत असे वाटते.असा प्रयत्न भविष्यात एखादे दोन वर्षात आमचाच विद्यार्थी करेल असे वाटते,आता अनेक नावे ओठावर आहेत त्यांच्याविषयी भरभरुन बोलावे वाटते पण ते इथे आता तरी टाळतो आहे.
16 Sep 2007 - 10:23 pm | सन्जोप राव
'तो' चे लिखाण अभ्यासपूर्ण -क्वचित कोरडे असले तरीही - असते. 'ही माहिती त्याला नवीन आहे' ही 'त्याची' शैलीही वेगळी आहे. प्रदीप (कुलकर्णी नव्हे, तेही चांगले लिहितात, पण हे नुसतेच प्रदीप) यांनी स्वतंत्र लिहिलेला एकच लेख मला आठवतो तो म्हणजे दत्ताराम यांच्यावरचा. उत्तम लेख. तेही खूप छान लिहू शकतील. त्यांचे वाचन दांडगे आहे.रोहिणी यांनी पाककृतींनी मजा आणली आहेच, पण ललित लेखनासाठीही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. प्रकाश घाटपांडेंच्या साहित्यीक आयुष्यातील फलज्योतिष आणि दुर्मिळ पुस्तकांचा बोळा निघाला (माफ करा, प्रकाशराव) ( आणि सर्वसाक्षी व द्वारकानाथ कलंत्रींच्या साहित्यीक आयुष्यातील इतिहास / मराठीप्रेम यांचा) तर तेही उत्तम लिहू शकतील. विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. अरुण वडुलेकरांचा उल्लेख कसा राहिला असे वाटत होते, पण तो वर झालाच आहे. तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. आजानुकर्णाने आता स्वतंत्र गद्य आणि केशवसुमाराने अधिक स्वतंत्र पद्य लेखन सुरु करावे असे वाटते. चित्तरंजनकडे एक 'सटायरिकल व्हेन' आहे, त्यातून चांगले विनोदी लेखनही उत्पन्न होऊ शकेल असे वाटते. जीवन जिज्ञासा आणि प्रियाली यांचा व्यासंग दांडगा आहे, पण तो कधीकधी रंजकतेला पूर्ण गिळून टाकतो. जी. एस. मोजके पण चांगले लिहितात. अत्त्यानंदांचे लेखन प्रामाणिक आणि अभिनिवेशरहित असते. मीरा फाटक आणि अदिती यांचे लिखाणही वाचनीय असते. मीराताई, अदिती आणि अनु या तीघींनी केलेल्या होम्सकथांचे अनुवाद अफलातून. आणि दिगम्भांना कसे काय विसरलो आपण? (आठवा 'मारे गये गुलफाम') खोडसाळ यांची विडंबने बरी असली तरी त्यांच्या अतिरिक्त टीकावृत्तीमुळे रसभंग होतो. ( 'खोडसाळ ज्या दिवशी स्वतःहून कुणाला चांगले म्हणतील त्या दिवशी सन्जोप राव सत्यनारायणाची पूजा घालून स्वतः सोवळे नेसून पूजेला बसतील' असे कुणीसे म्हटल्याचे स्मरते!) टवाळ आणि नरेंद्र गोळे यांच्या हिंदी गाण्याच्या भाषांतराबद्दल बाकी काही न लिहिलेले बरे!
माफ करा, मूळ चर्चाविषय 'आवडते लेखक' असा होता, पण आतापर्यंत विषयांतर किंवा वाद उत्पन्न झालेला नाही ( कोण रे तो 'कारण अद्यापि सर्किट येथे आलेले नाहीत म्हणून...'म्हणाला तो?) म्हणून हा प्रतिसाद.
सन्जोप राव
16 Sep 2007 - 10:55 pm | विसोबा खेचर
वा रावसाहेब, आमच्याकडून आणि इतरांकडून अनवधानाने राहिलेल्या बर्याच मंडळींना आपण कव्हर केलेत याचे समाधान वाटले! :)
विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे.
सहमत आहे. परंतु विनायकराव आता येथे मात्र प्रतिसादमात्र धाटणीत राहणार नाहीत, आणि
विनायक म्हणे,
'आता उरलो प्रतिसादापुरता'
अशी ओवीही गाणार नाहीत! :) कारण हे संकेतस्थळ आता त्यांचेच आहे, तुम्हा सर्वांचे आहे. आता तुम्ही आणि विनयाकराव दोघे मिळून इथे हिंदी चित्रपटातील सुवर्णयुगीन गाण्यांची, त्याच्या आस्वादाची छानशी रांगोळी घाला! आम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ!
बाय द वे, मी आपल्याला वणकुद्रेअण्णांच्या 'पिंजरा' वर लिहा असं अजून नक्की किती वेळा विनवायचं तेही सांगून ठेवा! :)
तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल.
वडिलकीच्या नात्याने कुठली पथ्ये पाळायची हे सांगणारं एखादं पोष्टकार्ड पाठवलंत तर अधिक आवडेल. किंवा वाटल्यास जेव्हा एखाददा पुण्यात 'बसू' तेव्हा सांगा! :)
बाय द वे, मिसळपाववर 'व्यक्तिगत निरोप' या भारी शब्दाऐवजी 'पोष्टकार्ड' हा आपला साधासुधा मराठी शब्द वापरायचं आम्ही ठरवलं आहे, तश्या तांत्रिक दुरुस्त्या सुरू आहेत! :)
असो! प्रतिसादाबद्दल आभार रावसाहेब.. सर्कीटच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे, कसाही असला तरी साला दोस्त आहे आपला! :))
तात्या.
16 Sep 2007 - 11:49 pm | विसोबा खेचर
अनवधानाने घ्यायचे राहिले. तिने त्सुनामी, वीज पडणे यासरखे काही अभ्यासपूर्ण शास्त्रीय लेख अत्यंत मेहनत घेऊन लिहिले आहेत..
राधिकाही संस्कृत नाटकांचे रसग्रहण छान करते..मात्र तिच्या वर्ण, स्वर विषयक लेखात तिचा व्यासंग दिसतो पण त्यातलं आपल्याला काय कळत नाय बा! ते कळायला धन्याशेठ, वाचन्कवी यांच्यासारखीच मंडळी हवीत..:)
आणि हो, आमचे प्रवासीही राहिलेच! त्यांच्याही गझला आणि प्रतिसाद मला फार आवडत! :)
तात्या.
18 Sep 2007 - 12:45 am | रंजन
खुप्च चान्गलि माहितिइ दिलि आहे. हि सगलि जण कुथे लिहितात?
इथे दिसलअ नाहि. मअला मायबोलि आनि मराथि वर्ड्ल माहित आहे.
17 Sep 2007 - 12:47 am | कोलबेर
इथं हे नाव जरी कमी वेळा आलं असलं तरी आपण तर एकदम ज्याम फ्यान आहोत. जालावरचे साहित्य हा पूर्णपणे वेगळा प्रकार असून आणि त्यामध्ये ह्यांचा नंबर निश्चितच खूपच वरचा आहे. (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!!
- कोलबेर
17 Sep 2007 - 1:05 am | विसोबा खेचर
वरूणदेवा,
(आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!!
तुझ्याशी सहमत आहे! :)
आपला,
(सर्कीटवाचून सुकलेला) तात्या.
17 Sep 2007 - 6:34 am | उग्रसेन
तेला आवतनं देलं का ? म्हून फुगला आसन ? जरशीग फूगीर बी है म्हणा ते.
राग नका येऊन देऊ भौ जरशीक फटकन बोलतू पर लोक म्हणतेत खरं बोलतू बाबूराव.
17 Sep 2007 - 7:36 am | कोलबेर
म्हणजे काय ते समजले नाही :-(
... आवतन = आमंत्रण ?
17 Sep 2007 - 8:37 am | आजानुकर्ण
यांच्या लेखनाचे आम्हीही फ्यान आहोत. :)
17 Sep 2007 - 11:01 am | सर्किट (not verified)
येथे सर्किट ह्यांच्याविषयी अनुकूल प्रतिक्रिया देणार्या कोलबेर, विसोबा खेचर आणि आजानुकर्ण ह्यांना आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही (कर्णा, पुणे विद्यापीठात तुला आणि नीलकांतला भेटलो तेव्हा चहाचे पैसे नीलकांतने दिल्याचे आठवते, आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.)
अरे लेको, मला इथे बोलवायला तुम्हाला माझी तारीफ करण्याची काहीही गरज नाही रे. हे तर आपल्या घरचं कार्य !
इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलु गेला गगनावेरी
अशी आमची मनस्थिती सध्या आहे. (वेलु, म्हणजे वेल.. शक्ती वेलु कोण म्हणतंय रे तिकडे विंगेत ?)
आलोच...
- सर्किट
17 Sep 2007 - 9:52 pm | विसोबा खेचर
आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही
आपण आमचे ग्लेनफिडिच विसरलात आणि आम्ही आपली रघुनाथराव कर्व्यांवरील चित्रपटाची सीडी विसरलो! :) आता पुढच्या वेळेला मात्र नक्की! च्यामारी आम्ही तरी केव्हा भांडारकरांच्या पैशांनी फुकट दारू पिणार! :)
आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.)
अहो मालक, ती गाडी आमची नव्हती बरं का! आमच्या एका क्लाएंटची होती! नाहीतर हा तात्या साला मालदार माणूस आहे असा लोकांचा फुक्कटचा गैरसमज व्हायचा!
असो, व्यक्तिगत होतंय का फार? परंतु आपण व्यक्तिगत वर उतरलात त्यामुळे आम्हालादेखील एक दारुचा लहानसा ड्रम आपल्यावर फेकावा लागला! पिंपे आम्ही राखीव ठेवली असून लहान लहान ड्रमावरच सध्या काम भागवतो...:))
तात्या.
17 Sep 2007 - 10:29 pm | सर्किट (not verified)
असो, व्यक्तिगत होतंय का फार?
नाही, फार नाही. :-) पण संजोपरावांनी अद्याप विषयांतर झालं नाही, म्हणून हळहळ व्यक्त केली होती. म्हणून माझे कर्तव्य पार पाडणे मला आवश्यक होते.
पुन्हा चर्चा मूळपदावर आणतो. वरील सर्व उल्लेखित लेखक मलाही आवडतात. ह्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा एक लेख मीही लिहायला घेतला आहे.
परंतु, वरील लेखकांत माझे परममित्र माधव कुळकर्णी ह्यांचे नाव आलेले नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या अनुदिनीवर आणि माझे शब्द वर त्यांनी उत्तम लिखाण केले होते. माझे शब्द च्या चालकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती, त्यात त्यांना बरीच मते मिळाली होते, हे स्मरते.
- सर्किट
17 Sep 2007 - 11:05 am | आजानुकर्ण
पुणे विद्यापीठात चहा प्यायल्याचा उल्लेख वाचल्यानंतर हा प्रतिसाद सर्किट यांनीच दिला आहे याविषयी खात्री पटली. इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती.
म्ह. हा आयडी सर्किट यांचाच आहे हे.
स्वागत आहे.
17 Sep 2007 - 11:08 am | सर्किट (not verified)
इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती.
म्हणजे, आमचे कार्यालयीन मित्र आमच्या नावाने प्रतिसाद देत आहेत असे वाटत होते की काय रे, कर्णा ?
असो.. त्याबद्दल नंतर कधीतरी...
पण बाकी आपल्या नीलकांताने मिसळपाव जबरा बनवले आहे बरं का ! त्याला माझ्या वतीने अनिकेत मध्ये चा पाज आणखी एकदा..
- सर्किट
17 Sep 2007 - 11:11 am | आजानुकर्ण
नीलकांताला मानलं. विशेषतः संगणकशास्त्राचे पुस्तकी ज्ञान नसूनही त्याचा या विषयातील रस व अभ्यास उल्लेखनीय आहे.
17 Sep 2007 - 5:34 pm | धनंजय
मनोगत, उपक्रम हे मराठी जालविश्व आहे हे मला कळून अवघा एक महिना झालेला आहे. आणि उद्याचे (आजचेसुद्धा) कसदार मराठी लेखन वाचायला मला ठिकाण सापडले. पण संमेलनात उशीरा पोचल्यामुळे कुठे काय चालू आहे माहीत नाही, काय रटाळ आणि काय रसाळ आहे, ती इथल्या साहित्यिकांशी हळूहळू ओळख करून घेतो आहे.
आवडला चर्चाप्रपंच. थोड्याथोड्या लेखकांचा उल्लेख करून सुरुवात केली ते चांगले. या ठिकाणी मला सुरुवातीचा क्रॅशकोर्स हवाच होता. तर या चर्चेत आलेल्या लेखकांपासून सुरू करेन. आतापर्यंत मनोगतावर "नवीन गद्य" आणि "नवीन कविता" अशा प्रकारे शोध करत होतो. एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात!
17 Sep 2007 - 5:43 pm | विसोबा खेचर
एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात!
क्या बात है धन्या! सुंदर वाक्य..:)
आपला,
(नर्मदेतला गोटा!) तात्या.
17 Sep 2007 - 5:54 pm | टिकाकार
माणसाला प्रसिद्धिची हाव सुटत नाही हेच खरे!
टिकाकार
17 Sep 2007 - 6:36 pm | विसोबा खेचर
आपले आज दिवसभरातले ठिकठिकाणचे प्रतिसाद पाहिले की हे अगदी पटते! :)
अहो पण प्रसिद्धीची हाव असलेल्यांनी नावानिशी, ठावठिकाण्यासहीत प्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करावा एवढंच आमचं म्हणणं!
तात्या.
17 Sep 2007 - 8:51 pm | प्रकाश घाटपांडे
घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभरोहणम।
येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत॥।
(मड्की फोडावीत, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे काहीही करुन प्रसिद्ध पुरुष व्हावे)
अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात.
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 8:57 pm | विसोबा खेचर
अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात.
हा हा हा! :)
च्यामारी सक्काळपासून बघतोय, जिथ्थे तिथ्थे हा टीकाकार कडमडतोय! :)
18 Sep 2007 - 12:11 am | राज जैन (not verified)
तात्यानू !
लिस्ट मध्ये माझे नाव नाय !
लई वंगाळ वाटलं बघा !
लवकरच तुम्हा सर्वांना एक नवाच जैनाचे कार्टे पाहावयास मिळेल.........च्या मायला काय काय विषय डोक्यात नाहीत तेच बघतो !
लवकरच तुम्हाला व सर्व मराठी संकेतस्थळानां राज जैन नावाचा विभाग चालू करायला लावतो की नाही बघाच !
;)
अता येथे मिसळपाव व देखील ह.घ्या. हे लिवायला लागले म्हणजे ........ नवरीला सांगण्यासारखे की बाई हळद ही पिवळी असते ;)) जोक्य आहे !
राज जैन !
"आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)"
18 Sep 2007 - 5:38 pm | प्रकाश घाटपांडे
"आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)"
राजौ, अस लिवु नको बाबा! जो देवाला आवडतोय त्येला तो उचलून नेतोय. आता प्रमोद देवांना आवल्डं तर ठीक आहे.
प्रकाश घाटपांडे
19 Sep 2007 - 8:33 am | राज जैन (not verified)
हा हा ! अरे लिहताना मी ह्या बाजूचा तर विचारच केला नव्हता,
मी ती ओळ लिहण्यामागचे कारण हे होते की जिवंत असताना लोक अनेक नावे ठेवतात, शिव्या देतात पण अचानक मानूस गच्चकला की तो किती चांगला होता व त्याचे गुण किती आफाट होते हे सांगण्याची लोकांमध्ये रस्सीखेच लागते ! असा त्या ओळीचा भावार्थ आहे.
राज जैन
18 Sep 2007 - 10:15 am | दिगम्भा
मला यादगार यांच्या जुन्या गजला व जी.एस. यांच्या कथा फार आवडतात.
विशेषतः जी एस यांच्या भूलपाखरू व (नाव न आठवणारी) पॉटहोलला मध्यवर्ती पात्र करून लिहिलेली कथा या अप्रतिम. पॉटहोलवरची इतकी सुंदर व अचाट कल्पक कथा दुसरी असणे अशक्य असे माझे मत.
आता हे दोघे (पूर्वीसारखे) का लिहीत माहीत देव जाणे. "माफीचा साक्षीदार" हे सुद्धा पूर्वीच्या ऍटिट्यूड् ने लिहीत नाहीत असे वाटते, खूप मोठी कैद भोगल्यानंतर जसा जन्मठेपेचा कैदी अध्यात्माला लागतो तसे काहीसे.
- दिगम्भा
18 Sep 2007 - 10:27 am | कोलबेर
यादगार ह्यांचे जे काय थोडे फार लिखाण मनोगतावर वाचू शकलो हतो ते जबरदस्त आवडले होते..
18 Sep 2007 - 10:20 am | जुना अभिजित
वर आलेली बरीच नावे सर्वाना परिचित असतीलच असे नाही. तेव्हा नावाबरोबरच या लेखकांच काही लिखाण किंवा अनुदिनीचा पत्ता दिला तर अत्युत्तम.
कसं म्हणजे लगोलग वाचून त्यांना आप्ल्या हिट लिष्ट मध्ये टाकता येईल.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
5 Mar 2009 - 12:30 pm | कवटी
सर्किट विषयी अवघ्या सव्वा वर्षापूर्वी मान्यवरानी काढलेले उद्गार वाचून अंमळ गंमत वाटली.
कवटी