ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१४

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
27 Mar 2009 - 12:13 am

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१३

राजधानी

टोकिओला जाण्याचा बेत ठरला तोही बुलेट ट्रेनने... बुलेट ट्रेन नाही म्हणायचं,' शिनकानसेन' म्हणायचं बरं.. शिन कोबे हे टर्मिनल फक्त शिनकानसेन साठीचे आहे. तेथे आदल्या दिवशी संध्याकाळी जाऊन पाहून येऊ या असा विचार केला आणि सगळी फय्यर निघाली शिनकानसेन आणि शिन कोबे पहायला.. आम्ही स्टेशनात शिरत असतानाच समोरुन तीही आत येत होती. माशाच्या तोंडासारखा निमुळता पुढचा भाग आणि माशासारखीच सुळक्कन आली की. डोळे भरुन तिला पाहताना कॅमेर्‍याच्या डोळ्यात तिला साठवण्याचा मोह अर्थातच आवरला नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी ८.१६ ची आमची गाडी होती. आम्ही ८ च्याही आधीच स्टेशनात आमचा ११ नं.चा डबा जेथे येईल असे बोर्डावर लिहिले होते तेथे जाऊन उभे होतो. बरोब्बर ८.१५ वाजता उद्घोषणा झाली आणि त्यापाठोपाठ आमची मासोळी आली आणि प्लॅटफॉर्मची ऍटोमॅटिक दारे उघडली. त्यापाठोपाठ गाडीचीही दारे उघडली आणि आम्ही आत शिरलो. आपल्या शताब्दी किवा राजधानीसारखा दिमाख, पण खाणे पिणे तुमचे तुम्ही आणायचं बरं का,नाहीतर रेल्वेच्या पँट्रीतून विकत घ्यायचं.(मनात विचार आला मग आमची राजधानी मस्त की, जेवण बिवण तरी देते,) पण फरक असा की राजधानी दिवसाला एक आहे तर दर १५ मिनिटाला एक प्रमाणे हिकारी लाईन वरची शिनकानसेन हिमेजी -तोक्यो धावते.६४० किमीचे अंतर तीन तासात पार करते. ह्या गाडीत,खरंतर जपानमधल्या अगदी लोकल ट्रेनमध्ये सुध्दा आपल्या सीटा फिरवून समोरासमोर तोंडे करून बसता येते हे एक विशेषच!

शिनकानसेनमध्ये आपल्या आसनासमोर एक चार्ट असतो. त्या चार्ट मध्ये डब्यात असलेल्या सोयी आकृतीसकट लिहिलेल्या असतात त्यामुळे भाषा जरी समजली नाही तरी काम चालून जाते. गाडीत असलेल्या इलेक्ट्रॉनिक बोर्डावर येत असलेल्या फिरत्या सूचना जपानी व इंग्रजीत असल्याने तेथेही भाषिक प्रश्न आड येत नाही. तोक्योला जाताना वाटेत फुजीसान आपल्याला दर्शन देतो. डाव्या बाजूच्या खिडकीतून फुजीसान दिसेल अशी जपानी घोषणा झाली आणि डब्यातले सगळे लोकं आपापले कॅमेरे घेऊन डाव्या बाजूला धावले. आम्ही बावळटासारखे त्यांच्याकडे पाहत राहिलो. आमच्या चेहर्‍यावरचा गोंधळ रेल क्रूच्या लक्षात आला. त्यांच्यातल्याच एका ललनेने सायबाच्या भाषेत आम्हाला डाव्या बाजूच्या खिडकीतून काही वेळाने फुजीसान दिसेल तेव्हा त्या बाजूला पाहिलेत तर तुम्हाला तो पाहता येईल आणि फोटो सुध्दा काढता येईल असा बहुमोल सल्ला दिला. फुजी स्टेशनात गाडी थांबते, आणि त्या मिनिटभरात शेकडो कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट होतो.

जपानमधील सगळीच स्टेशनं इतकी स्वच्छ आणि आकर्षक आहेत! स्टेशनात ठिकठिकाणी माहितीच्या पाट्या लावलेल्या असतात. "मे आय हेल्प यू?" च्या पाटीखाली हेल्प करायला कोणीतरी असते. त्या पाट्यांवर स्वतःचे वाड्मय आणि चित्रकला दाखवण्याचा सोस तेथील जनतेला नाही ,खर्‍या अर्थाने ती 'जनताकी संपत्ती' आहे. एक वैशिष्ठ्य जाणवलं ते म्हणजे स्टेशनात जागोजागी ठेवलेले त्यात्या गावचे नकाशे! जपानी आणि इंग्रजी भाषेतले ते नकाशे वापरायला सहज,सोपे. टूरिस्ट गाइडची गरजच नाही. कोणाला विचारायला सुध्दा लागत नाही. तिकिट काढण्यासाठी कुठून कुठे जायचे ते टाइप करुन मशिनच्या खाचेतून नोट सरकवली की बोर्डावर ते दिसणार आणि उरलेले पैसे व तिकिट दुसर्‍या खाचेतून बाहेर येणार असे जवळजवळ सर्वच प्रगत देशात आहे पण त्यावेळी आमचा तो पहिलाच अनुभव होता. मशिनने पैसे खाल्ले तर.., ते ऑपरेटच झालं नाही तर..तिकिटावर नीट शिक्काच उमटला नाही तर.. असे विचार कायम माझ्या शंकाखोर मनात येत पण सुदैवाने तसं कधीच झालं नाही.जपानमध्ये तुम्ही तिकिट पंच केलं की प्लॅटफॉर्मकडे जाणारे दार उघडते आणि तुम्ही आत/बाहेर करू शकता. टीसी नसतोच,असतो तो फेअर ऍडजस्ट करणारा.थोडक्यात आपल्या एक्सटेंशन काऊंटरचं काम तो करतो. गाडीत बसल्यावर मध्येच तुमचा विचार बदलला आणि तुम्ही दुसरीकडेच जायचं ठरवलंत किवा चुकीच्याच गाडीत बसलात.(दुसरी गोष्ट घडायचीच शक्यता आमच्या बाबतीत जास्त!) तर परत बाहेर जाऊन तिकिट काढायची गरज नाही तर त्याच्याकडून पुढचे तिकिट घ्यायचे. येथे लोकांनी टीसीला फसवण्याची वृत्ती दिसली नाही आणि रेलकर्मचारीही तुमच्यावर अविश्वास दाखवताना दिसले नाहीत.

तीनसव्वातीन तासात आम्ही तोक्योला पोहोचलो. प्रवासाचा शीण नव्हताच आणि बरोबर सामानही फार नव्हते त्यामुळे टोकिओ टॉवर पाहून मग हाटेलावर सामान टाकायचे ठरले. आयफेल टॉवरच्या धर्तीवर बांधलेला तोक्यो टॉवर दिमाखात उभा आहे. १५० मीटर उंचीवरुन आपल्याला तोक्योचे विहंगम दर्शन होते. तिकिटाबरोबरच नकाशा मिळतो. लिफ्टने टॉवरच्या माथ्यावर नेऊन सोडतात. तेथे सर्व बाजूंनी काचा लावलेले मोठे दालन आहे. काचेवर दिशा लिहिल्या आहेत आणि जागोजागी दुर्बिणीही ठेवलेल्या आहेत. हातात असलेल्या नकाशाच्या आधारे आणि दुर्बिणीच्या सहाय्याने आपण नेमके काय पाहत आहोत हे समजून पाहिले जाते. एक जण जर दुर्बिणीतून पाहत असेल तर बाकीचे रांगेत शांतपणे आपला नंबर यायची वाट पाहत नुसत्या डोळ्यांनी जेवढा नजारा दिसतो तो पाहत किवा माहिती वाचत उभे राहतात. "ओ भाऊ,चलाकी आता..कितीवेळ लावता?.. आम्हाला पण बघू द्या की.." असले प्रेमळ संवाद नाहीतच पण आरडाओरडा,गोंधळ तर अजिबातच नाही. खूप वेळ तोक्योचे विहंगम दर्शन घेऊन मग आम्ही इंपिरिअल पॅलेस पाशी आलो.जपानी सम्राटाचे ते भव्य निवासस्थान त्याच्या समोर असलेली तितकीच भव्य आणि सुंदर उद्याने पाहिली. ह्या राजवाड्याच्या सभोवतीची भक्कम तटबंदी आणि पाण्याचे खंदक आजही सुस्थितीत आहेत. ह्या पाण्यात विहरणारे लाल गुंजेच्या डोळ्यांचे काळे डौलदार राजहंस प्रथमच पाहत होतो.(पुढे असाच काळा राजहंस म्युनस्टरच्या आसे मध्ये पाहिला.)

नंतर आम्ही डायट ऑफ जपान अर्थात पार्लमेंट हाउस पाहिले. लोअर हाउस म्हणजे हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि अप्पर हाउस म्हणजे हाउस ऑफ काउंन्सेलर्स.सर्वप्रथम इंपिरिअल डायट नावाने मेइजी कॉन्स्टीट्यूशन जापान्यांनी १८८९ पासून अनुसरली. संसदभवनाला डायट ऑफ जपान का म्हणत असावेत? हा प्रश्न साहजिकच आमच्या मनात आला. जपानी राजकारण्यांचा उच्चस्तरीय भ्रष्टाचार तर सर्वश्रुत आहेच, त्यावर त्यांनी सामुहिक डायट करण्याचे हे केंद्र तर नव्हे? असा एक खोडकर विचार मनात आला.

त्यानंतर रेंकोजी टेंपलपाशी आलो. नेताजींचा अस्थीकलश येथे ठेवलेला आहे. तसेच त्यांचा अर्धपुतळाही तेथे आहे. एका वेगळ्याच अनामिक भावनेने सगळे भारून गेलो होतो पण आमच्या दुर्देवाने टेंपल काही दिवसांसाठी बंद होते. कळसाला नमस्कार करून नाइलाजाने मग आम्ही पुढे निघालो.

जगातलं महाग शहर तोक्यो आणि तेथले महाग मार्केट गिंझा बझार! विंडो शॉपिंग करायलाही घाबरावं अशा किमती ! उंच उंच इमारतीतील सुपरमार्केटं आणि त्यातील वस्तूंच्या किमती पाहूनच जीव दडपतो. खरेदी तर दूरची गोष्ट. तेथील सोनीची अतिभव्य इमारत पाहून वासलेला आ कितीवेळ बंदच होईना.

आता आम्हाला जायचे होते रेनबो ब्रिज पहायला, पहायचा होता चमचमणारा तोक्यो टॉवर आणि तोक्योचा लखलखाटही ! पाय दमले होते तरी मनातला अमाप उत्साहच पायांना चालवित होता. पॅसिफिक महासागरावर बांधलेल्या अनेक अजस्त्र पूलांपैकी हा एक रेनबो ब्रिज, सप्तरंगी दिव्यांच्या लक्षलक्ष दीपमालांच्या लखलखाटाने आपलं नाव सार्थ करत आत्ममग्न असा तो सेतु आपल्याच प्रतिबिंबाच्या प्रेमात पडलेला वाटतो. सागरातलं ते सप्तरंगी प्रतिबिंब पाहताना तर प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर वाटत होती. तेथे असलेला स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आजच्या जपानी पिढीच्या अमेरिकावेडाची साक्ष आहे. तेथून उठावसं वाटत नव्हतंच, मात्र नाइलाजाने तेथून निघालो कारण तोक्यो टॉवरचा दीपोत्सव खुणावत होता.

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

27 Mar 2009 - 12:20 am | सर्वसाक्षी

स्वाती,

नेहेमीप्रमाणेच अगदी तपशिलवार वर्णन आणि पूरक अशी चित्रे आहेत.

प्राजु's picture

27 Mar 2009 - 12:25 am | प्राजु

लाजवाब आहेत सगळेच फोटो.
नेताजींचा पुतळा पाहून खूप बरं वाटलं.
आणि डायट हौस बद्दल तुझे विचार अगदी पटले.
मस्त लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

27 Mar 2009 - 12:31 am | रेवती

नेहमीप्रमाणे ग्रेट लिहिलयस.
सगळ्या स्थळांची माहीती थोडक्यात पण छान!
बर्‍याच दिवसांनी हा भाग वाचायला मिळाला.
धन्यवाद!

रेवती

विसोबा खेचर's picture

27 Mar 2009 - 12:38 am | विसोबा खेचर

सु रे ख ले ख मा ला ...!

अन्य शब्द नाहीत!

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Mar 2009 - 12:41 am | बिपिन कार्यकर्ते

खूऽऽऽप उशिर झाला पण मस्तच लेख झालाय. अप्रतिम फोटो. आणि मस्त ओळख. जपानी राजकारण्यांचे डायट मस्तच....

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

27 Mar 2009 - 12:44 am | प्राजु

बिपिनदाने माझ्या प्रतिसादाची चोरी केली आहे..त्यावर कारवाई व्हावी. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Mar 2009 - 12:55 am | बिपिन कार्यकर्ते

सहमत...

(अरेरे, प्राजुने काय लिहिलंय हे न वाचताच चुकून सवयीने सहमत लिहिलं गेलं.) ;)

(कंपूबाज) बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

27 Mar 2009 - 12:57 am | प्राजु

=)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

27 Mar 2009 - 2:15 am | भाग्यश्री

मस्तच!! देर आये दुरुस्त आये! :)

चतुरंग's picture

27 Mar 2009 - 2:37 am | चतुरंग

स्वातीसान, आलीस ती एकदम बुलेटट्रेन घेऊनच!! झक्कास! नेहेमीच्या स्वातीटच शैलीतला फर्मास लेख.
चित्रेही सुबक, नेटकी! :)
शेवटून दुसर्‍या चित्रजोडीत, टॉवरबाहेरच्या काचांवर बहिर्गोल आरशात दिसाव्यात तशा दिसणार्‍या शेजारच्या आणि समोरच्या टॉवरच्या प्रतिमा लाजवाब आल्यात. सगळ्याच आभासी प्रतिमा एखाद्या द्रव पदार्थातून आकार घेताहेत असे वाटते!

चतुरंग

दशानन's picture

27 Mar 2009 - 11:31 am | दशानन

हेच म्हणतो !

सहज's picture

27 Mar 2009 - 11:55 am | सहज

आहाहा! आठवणी ताज्या झाल्या........फोटो वर्णन मस्तच मस्त.

एका उच्च लेखमालेतील अजुन एक उच्च लेख!

आता बुलेट ट्रेन मधे तुमच्या सिटा वळवुन घेता येतात उदा वरच्या चित्रात दाखवलेल्या २ बाय २ आणी तुम्ही चौघेजण प्रवास करत असाल तर समोरासमोर अशी आसनव्यवस्था करु शकता. गाडी शेवटच्या स्टेशनमधे आली की एक माणुस पटकन आत शिरुन आतल्या सगळ्या सीटस परतीच्या प्रवासाच्या दिशेने करतो. ते बघायला पण मजा येते. गार्डदेखील गाडी सोडताना विशिष्ट लयीत झेंडे फिरवतो. शिवाय ज्याकाही १५ - २० बुलेटट्रेन पाहील्या सगळ्याच्या इंजीनाच्या डब्याचे आकार वेगवेगळे होते.

राजवाड्या भोवतालच्या पाण्यातील हंस व मोठे मासे ऐकमेकांशी ब्रेडचे तुकडे बळकवताना झुंजत होते ते बघताना मौज वाटली.

शिबुया क्रॉसींग - शिबुया चौकातील रस्ता ओलांडणे हा प्रकार देखील मस्त!

टोकीयो मधील जाणवण्यासारखी अजुन एक महत्वाची गोष्ट प्रचंड म्हणजे जवळजवळ प्रत्येक रस्त्यावर अतिशय प्रचंड संख्येने असलेली शीतपेयाची व्हेंडींग मशीनस. नव्या व्हेडींग मशीनवरचा हा एक छोटा व्हिडीओ

ही लेखमाला माझ्या जपान सहलीला काही अंशी नक्कीच कारणीभूत होती.

अवांतर - जपान वाटते तितके महाग नाही आहे :-)

अजय भागवत's picture

27 Mar 2009 - 8:18 am | अजय भागवत

आम्हालाही लेखन्ट्रेनने जपानवारी घडवलीत.

पार्लमेंट हाऊसच्या समोरची एकसारखी झाडांची छाटणी पाहून आपल्या "जगप्रसिद्ध" ताजमहालाच्या समोरच्या खुंटलेल्या, खुरटलेल्या, एकाच रेषेत नसलेल्या, कमी-जास्त उंची असलेल्या झाडांची आठवण आली.

बुलेटट्रेन माशासारखी सुळ्ळकन आली हे विषेशण चपखल बसते. TGV ने प्रवास केलाय पण बुलेटट्रेनचा दिमाख काही औरच आहे असे ऐकुन आहे. विश मी लक.

स्वाती दिनेश's picture

29 Mar 2009 - 6:10 pm | स्वाती दिनेश

अजय, टॉवरवर जाऊ देतात तर.. तेथूनच तर तोक्योचे विहंगन दर्शन घेतले आणि टीजीव्ही अपनी जगह,शिनकानसेन अपनी जगह.. तिचा दिमाख काही और हेच खरे. आय विश यू लक.
स्वाती

यशोधरा's picture

27 Mar 2009 - 9:08 am | यशोधरा

मस्तच लेख गं स्वातीताई.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2009 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुन्हा एक सुंदर लेख ! सुंदर छायाचित्रे !

>>"मे आय हेल्प यू?" च्या पाटीखाली हेल्प करायला कोणीतरी असते.
हा हा हा :)

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

27 Mar 2009 - 12:46 pm | श्रावण मोडक

यावे. चांगल्या लेखाने पुनरागमन (प्रवासाचे). छायाचित्रे छानच.
डायटवरची टिपणी आवडली. ती अगदी पाककृतीतज्ज्ञाला शोभेशीच.

क्रान्ति's picture

27 Mar 2009 - 1:15 pm | क्रान्ति

खूप मस्त लेख आणि खूप छान फोटो.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

गणा मास्तर's picture

27 Mar 2009 - 2:54 pm | गणा मास्तर

よこそ日本 म्हणजे जपानमध्ये स्वागत.
स्वातीताई लेख भारीच जमला आहे. माझे पण दोन येन टाकतो.
शिनकानसेन म्हणजे बुलेट ट्रेन ३ प्रकारच्या असतात. नोझोमि म्हणजे 'आशा', हिकारी म्हणजे 'प्रकाश' आणि कोदामा म्हणजे 'प्रतिध्वनी'.
अर्थात त्यांचा वेगही त्यांच्या नावाप्रमाणेच असतो.नोझोमि सर्वात फास्ट तर कोदामा सर्वात स्लो.

तोक्यो टॉवर काय आणि फुजीसान काय दोन्ही पण दुरुनच चांगले दिसतात. हा तोक्यो टॉवर.

आणि हा जपानी लोकांचा लाडका फुजीसान. हे प्रकाशचित्र शिनकानसेन मधुनच काढले आहे.

इंप्मिरियल पॅलेस आणि तोक्यो रेल्वे स्टेशन याच्यामधला 'मारुनोचि' नावाचा भाग जगातला सर्वात महाग व्यापारी भाग आहे.
आणि गिंझाच्या झगमागाटाची कहाणी औरच. हे स्वातीताईने उल्लेख केलेल्या आणि छायाचित्र डकवलेल्या सोनिच्या इमारतीचे रात्री काढलेले छायाचित्र.

आणि हा गिंझाचाच अजुन एक फोटो

आणि हे ओदाईबावरुन घेतलेले रेनबो ब्रिजचे छायाचित्र. मागे तोक्यो टॉवर दिसतो आहे.

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

दशानन's picture

27 Mar 2009 - 3:07 pm | दशानन

सुंदर, फोटो व माहीती !

अजय भागवत's picture

27 Mar 2009 - 4:02 pm | अजय भागवत

शिनकानसेनबद्दलची नवीन माहिती खजिन्यात टाकली! तोक्यो टॉवरवर पर्य्टकांना जाऊ देतात का?

गणा मास्तर's picture

27 Mar 2009 - 5:11 pm | गणा मास्तर

हो जाउ देतात तर.
दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्यावर दुसर्‍या टप्प्याचे ति़किट मिळते.
पहिल्या टप्प्यावर कॉफी शॉप , दुर्बिणी आहेत.
दुसर्‍या टप्प्यावर ऑब्जर्वेटरी आहे.

खाली पहिल्या मजल्यावर वॅक्स म्युझिअम आहे. आणि बॅन्ड असतात कधी कधी

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

स्वाती दिनेश's picture

29 Mar 2009 - 6:12 pm | स्वाती दिनेश

गणामास्तर,
२ येन काय? बरेच येन झालेत की हे,:)
माहिती आणि चित्रांसाठी अरिगातो गोझायमास.
स्वाती.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Mar 2009 - 3:05 pm | बिपिन कार्यकर्ते

नोझोमि म्हणजे 'आशा', हिकारी म्हणजे 'प्रकाश' आणि कोदामा म्हणजे 'प्रतिध्वनी'.
अर्थात त्यांचा वेगही त्यांच्या नावाप्रमाणेच असतो.नोझोमि सर्वात फास्ट तर कोदामा सर्वात स्लो.

यातली प्रतिकात्मकता अतिशय आवडली. 'आशा' सगळ्यात जास्त वेगवान असते.... 'आशाणाम् मनुष्यानाम्....' हे आठवले.

बिपिन कार्यकर्ते

सन्दिप नारायन's picture

27 Mar 2009 - 3:25 pm | सन्दिप नारायन

स्वाती, तु चार पाच वर्शापुर्वीचे तपशिलवार वर्णन कसे काय करु शकतेस कुठे लीहुन ठेवले आहेस की काय?

सन्दीप

शाल्मली's picture

27 Mar 2009 - 4:08 pm | शाल्मली

स्वातीताई,
नेहमीप्रमाणेच खुमासदार वर्णन.
छान माहितीपूर्ण लेख.
तू टाकलेले आणि गणा मास्तरांनी टाकलेले फोटोही छानच!

--शाल्मली.

प्रमोद देव's picture

27 Mar 2009 - 4:51 pm | प्रमोद देव

नेहमीप्रमाणे मस्त!!!!!!!!!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

शितल's picture

27 Mar 2009 - 6:09 pm | शितल

स्वातीताई,
किती सुंदर, सहज प्रवास वर्णन करतेस तु खुप आवडते.
फोटो ही सुरेख आहेत. :)

मदनबाण's picture

28 Mar 2009 - 12:58 am | मदनबाण

सहमत... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

आळश्यांचा राजा's picture

28 Mar 2009 - 1:37 am | आळश्यांचा राजा

सुरेख लिखाण आणि मांडणी!

आळश्यांचा राजा

सुधीर कांदळकर's picture

28 Mar 2009 - 9:55 am | सुधीर कांदळकर

फोटो अप्रतिम. सहजरावांनीं आणि गणा मास्तरांनीं आनंद वृद्धिंगत केला.

स्वातीताईंबरोबर दोघांनाहि धन्यवाद.

सोनीच्या संस्थापकांनीं, नांव विसरलों आतां मेड इन जपान म्हणून पुस्तक लिहिलें आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर बाँबफेकीनें उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या अवशेषांत थाटलेलें कार्यालय आतां एवढें दिमाखदार झालेलें पाहून मनोमन कौतुक वाटलें.

सुधीर कांदळकर.

हरकाम्या's picture

28 Mar 2009 - 11:42 am | हरकाम्या

झकास>

स्वाती दिनेश's picture

29 Mar 2009 - 6:14 pm | स्वाती दिनेश

सर्वांना मनापासून धन्यवाद.
स्वाती

ऋषिकेश's picture

29 Mar 2009 - 9:45 pm | ऋषिकेश

वा!.. पुनरागमन झोकात आहे!
वर्णन नेहेमीप्रमाणे भन्नाट! गाडीला मासोळीची उपमा विषेश आवडली... पहिला आणि शेवटचे दोन फोटु तर आयसिंगवरील चेरी! :)

दुसर्‍या फोटुतल्या इंडीकेटरवर बाकी जपानी अक्षरे असताना आकडे विंग्रजी का? का जपानी लिपिमधे आकडेच नाहित?

बाकी जगाला वेड लाऊ शकणारी स्वतःची अशी संस्कृती असणार्‍या देशातील जनता अमेरीकेमागे इतकी वेडी कशी हे मात्र कळत नाहि

--ऋषिसान