तू मेरे रुबरु है

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
16 Aug 2019 - 4:12 pm

आजही विदर्भ मराठवाड्यात बुंग फिरणारी कालिपिली जिप असो की फाट्यावरची पानटपरी तिथे मोठ्या आवजात धडकन मधलं 'दुल्हे का चेहरा सुहाना लागता है' वाजतंच वाजतं. नुसरत ची पहिली वहिली ओळख हिच. धडकन पाहताना पहिल्यांदा तार स्वरात वाटणारं हे गाणं नंतर खूप आवडायला लागलं सोबत नुसरत ही. मग तो थेट भेटला ते 2015-16 मध्ये, आतशः नेट ची स्पीड पण वाढली होती आणि गाणी शोधणं फार फार सोप्पं झालं होतं, तू नळी वर तो पुन्हा भेटला 'साँसों की माला सिमरू' च्या रूपाने. त्यानंतर आजतागायत त्याने साथ सोडली नाही.

13 ऑक्टोबर 1948 ला पाकिस्तान च्या फैसलाबाद मध्ये जन्म झालेल्या नुसरतच मूळ गाव जालंधर जालंधर आणि त्याचं मुळ नाव परवेज,आपल्या कौटुंबिक सुफी गुरूंकडे तो गेला असताना त्यांनी त्याला "तु मोठा फनकार होशील."असा आशिर्वाद दिला आणि त्याचं जावं बदलून ठेवलं नुसरत, नुसरत म्हणजे प्रचंड विजय. गायकीत पतियाळा घराण्याचा असलेल्या नुसरतला संगीताचा वारसा वडील फतेह अली खान यांच्याकडून मिळाला आणि 600 वर्ष जुनीअसलेली कव्वालीची परंपरा समर्थपणे राखलीच नाही तर तिला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात स्थान मिळवून दिलं. त्यांच्या परिवारात कव्वाली पिढ्यानपिढ्या गायली जात होती, नुसरतच्या वडिलांची इच्छा होती कि त्याने डॉक्टर किंवा इंजिनियर बनावं पण नुसरतला गायक बनायचं होतं, सुदैवाने त्याच्या वडिलांनी त्याच्या इच्छेचा सन्मान करून त्याला गायक बनू दिलं आणि आपल्याला एक अविस्मरणीय गायक मिळाला. त्यांचं शिक्षण सुरु झालं १९६४ मध्ये वडीलांच्या मृत्यूनंतर त्याला काका सलामत अली खां आणि मुबारक अली खां यांनी शिकवलं, त्यांच्या तालमीत तयार झालेल्या नुसरत ने पहिला पब्लिक परफॉर्मन्स वयाच्या १६ व्य वर्षी वडिलांच्या चेहलूम मध्ये केला.

१९७५ साली पाकिस्तानच्या नॅशनल काउंसिल फॉर द आर्ट ने आमिर खुसरोच्या पुण्यतिथी निमित्त एका गायनाच्या कार्यक्रमाचं आयोज केलं होतं, नुसरतला आमंत्रण उशिरा मिळालं. नुसरत जेव्हा कार्यक्रमाच्या स्थळी पोचला तेव्हा बाकीच्या ग्रुप्स ने खुसरो चे प्रसिद्ध कलाम म्हणून टाकले होते. आता नुसरतला लोकांना असं काहीतरी वेगळं ऐकवायचं होतं लोकांनी आधी जास्त ऐकलं नसेल, म्हणून नुसरतने ‘मैं तो पिया से नैना मिलाई रे’ म्हंटलं आणि पाकिस्तानला नुसरत नावाची चीज काय आहे हे पहिल्यांदा कळलं. फैसलाबादच्या रहमत ग्रामोफोन हाऊस ने त्यांची पहिली कॅसेट काढली, त्यात त्याने आपल्या वडिलांनी गायलेल्या 'हक अली मौला' या कव्वालीला आपल्या ढंगात पेश केलं आणि त्याची पहिली कॅसेट तुफान हिट झाली. १९७९ साली राज कपूर ने ऋषी कपूर च्या लग्नाच्या संगीतात नुसरत ला बोलवलं आणि पहिल्यांदा तो पाकिस्तानातून बाहेर पडला, य लग्नाबद्दल त्यांचे तबला वादक असलेले दिलदार हुसेन सांगतात, त्या लग्नात बॉलिवूडमधले मोठमोठे स्टार आलेले होते, कोणत्याही सामान्य लग्नघरी असेल अशी लगबग तिथे होती पण नुसरत ने गाणं सुरु केलं आणि काही मिनिटांत पूर्ण वातावरण बदलून गेलं. यावेळी त्याने 'ये जो हलका हलका सुरूर' तब्बल अडीच तास रंगवलं. रात्री १० वाजता सुरु झालेली ती मैफिल सकाळी सात वाजता संपली. भारत दौऱ्यात त्याला ख्वाजा निजामुद्दीन च्या दर्ग्यावर सेवा सादर करण्याची संधी मिळाली आणि नुसरत नावाचा सुगंध पूर्ण जगभर दरवळू लागला. १९८७ मध्ये नुसरत ला प्रतिष्ठित रॉयल अल्बर्ट हॉल मध्ये कॉन्सर्टची संधी मिळाली होती. पुढे ओरिएंटल स्टार एजन्सी ने नुसरतला करारबद्ध करून जगभरात त्यांचे शोज आयोजित केले आणि त्यांचं रेकॉर्डिंग करून सिडी बनवल्या, आज तू नळी वर उपलब्ध असणाऱ्या रेकॉर्डिंग पैकी ८० टक्के व्हिडिओ एकट्या ओरिएंटल चे आहेत जे अगदी दुर्मिळ आहेत.

कव्वाली साठी पाहिजे असणारा दमसास आणि बैठक नुसरतमध्ये जन्मजातरित्या होती. सुरवातीला हलकं हलकं संगीत, मग एक शेर ऐकवला जाई , शेर झाल्यावर संगीत हळू हळू जोर पकडत जाई आणि मग भरदार आवाजात गाणं सुरु होई जे आपल्या हृदयाचा ठाव कधी घेतं हे आपल्याला हि कळत नाही आणि आपण पूर्ण नुसरतमय होतो. खोटं वाटत असेल तर तू नळी वर OSA या चॅनलवरचे व्हिडीओ एकदा पहा. नुसरत गायला लागला कि देव हि तिथे आसपास त्याचं गाणं ऐकायला नक्कीच येत असणार कारण त्याची अशी पूजा केलेली कोणाला आणि आवडणार. या महान गायकाचा बॉलिवूड ने फायदा घेतला नसता तर नवलच 'और प्यार हो गया' ' राजा हिंदुस्तानी' अश्या अनेक चित्रपटांत नुसरतची गाणी नदीम श्रावण , अनु मलिक सारख्यांनी उचलली आहेत. आजही त्याचा पुतण्या राहत अली खान आपल्या काकाची गाणी वापरून बॉलिवूड मध्ये तग धरून आहे.

१९९७ मध्ये किडनी फेल झाल्याने ट्रान्सप्लांट साठी लॉस एंजिलिस ला जात असतांना मध्येच नुसरतची तब्बेत खालावली झाली, त्याला तातडीने लंडन मधल्या क्रॉमवेल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं गेलं तिथेच हृदयविकाराच्या झटक्याने १६ ऑगस्ट १९९७ ला त्यांच निधन झालं आणि आपल्या आवाजाने मंदिर-मस्जिद एकत्र गुंफणारा नुसरत देवाकडे आपली सेवा करायला रुजू झाला. आज त्याला जाऊन २२ वर्ष झाली तरीही त्याच्या आवाजाने तो कायमच जवळ आहे.

नुसरत

चेहलूम : मुस्लिम समाजात व्यक्ती मरण पावल्यानंतर येणाऱ्या चाळीसाव्या दिवसाला चेहलूम असं म्हणतात.

कलासंगीतवाङ्मयगझलप्रकटनआस्वादलेख

प्रतिक्रिया

वगिश's picture

17 Aug 2019 - 1:32 pm | वगिश

आवडले

कुमार१'s picture

18 Aug 2019 - 9:19 am | कुमार१

छान परिचय.