मन्याचे लॉकडाऊन
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कोरोना व्हायरस जगभर पसरू लागल्याच्या बातम्या मन्याने पेपरमध्ये वाचल्या होत्या. ऑफिसमध्येही दबक्या आवाजात या विषयावर चर्चा सुरु झाली होती. मन्या तिकडे दुर्लक्ष करायचा. कारण ऑफिसमधल्या लोकांना चर्चेसाठी कायमच विषय हवा असतो. आणि एकंदरीत चर्चा,बातम्या वगैरे बघता, कोरोना हा श्रीमंतांचा रोग आहे अशी मन्याची समजूत झाली होती. साधारण परदेशवारी वगैरे केलेल्या लोकांना हा रोग होतोय अशी चर्चा होती. आता मन्याने उभ्या आयुष्यात विमानतळसुद्धा एकदा आणि तेही बाहेरून बघितलं होतं. त्यामुळे कोरोना काही आपल्यापर्यंत पोहोचत नाही असे म्हणून मन्या बऱ्यापैकी बिनधास्त होतं.