दोसतार - ४३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
24 Apr 2020 - 7:40 am

अरे हे काय . अज्या का उभा आहे वर्गासमोर, असा मधेच .
का रे काय झाले.
काय झाले. अरे तिसरा तास संपून छोटी सुट्टीही संपली. आता चौथा तास सुरू झालाय.
सस्स्स्स्स्स… श्शीशी… मुलांनी नाराजी व्यक्त केली. ऑफ तास संपला होता.

मागील दुवा : http://misalpav.com/node/46227

शिक्षक दिन येवून गेला . संध्याकाळी घरी जाताना रस्त्यात कोणाच्या तासाला काय गम्मत झाली हेच बोलत बोलत गेलो. सगळेच तसे बोलत गेले. मज्जा तर प्रत्येक तासाला झाली होती. प्रत्येल्काला काहीतरी नवीन सापडले होते. कविता अजिबात न आवडणारा रघु कविता चालीवर गुणगुणत होता. अपीला तर तीच्या तासाला वर्गातल्या मुली चोरून डबा खाताना सापडल्या होत्या , संजय ला टुंड्रा प्रदेशातल्या एस्किमोना भेटायची उत्सुकता लागली होती. मोठा झाल्यावर तो ते करणार होता. अव्या , राजा , प्रशांत अंजी , संगीता प्रत्येकाकडे साम्गण्यासारखी काही ना काही गम्मत होती.
दुसर्‍या दिवशी मुख्याध्यापकांनी आठवीच्या वाचनालयाच्या हॉलमधे सगळ्या मुलांना बोलावले. सोनसळे सरांनी . सरांनी सगळ्यांना बोलावले म्हणजे काहितरी चांगलेच असते हे आता माहीत झाले होते.
सोनसळे सर उभे राहिले. मुलांनो शांत रहा हे असले काही सांगायचे आज गरजच पडली नाही. सर काय बोलताहेत याचीच आम्हाला उत्सुकता.
मुलांनो काल आपण शिक्षक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तुम्हाला प्रत्येकालाच वेगळे अनुभव आला असेल. शाळेनेही विद्यार्थी आणि शिक्षकांचे मिळून असे एक निरीक्षक पथक नेमले होते. जे काय पर्यवेक्षक सर करतात ते निरीक्षक पथकाने केले.
निरीक्षक पथकाने कोण कसे शिकवतेय कोणत्या वर्गात काय चालले आहे याची पहाणी केली आणि त्या नुसार क्रमांक काढले.
तृतीय क्रमांक विभागून अमर आणि संध्याला मिळाला होता.
द्वितीय क्रमांक क तुकडीतल्या प्रशांतला मिळाला होता. त्याने शारीरीक शिक्षणाचा तास घेतला होता. मुलांना सूर्यनमस्कार शिकवले होते ते शिकवताना नमस्कार घालताना केल्या जाणार्‍या आसनांमुळे शरीराच्या कोणत्या भागाला ताण बसतो त्याचा उपयोग कसा होतो ते समजावून दिले होते. सहावी ब च्या मुलांनी रोज सूर्य नमस्कार घालायचे ठरवले होते.
पहिला क्रमांक कोणाला मिळणार याची उत्सुकता होती. ह ही विभागून दिले होते.सोनसळे सरांनी नाव पुकारले इंदूमती खडके आणि विनय..... माझेच नाव पुकारताहेत
भास झाला असेल. कदाचित तो ड मधला विनय केंजळकर असेल . आपल्याला कशाला असेल बक्षीस आणि ते ही ऑफ तास घेतला म्हणून! छॅ शक्यच नाही. माझ्या पाठीवर एक दण्णकन धपाटा पडला. हा एल्प्याचाच हात. त्याच्याशिवाय इतक्या दमदार धपाटा कोणी नाही घालणार. पहिले बक्षीस मलाच मिळाले होते.
एक जोरदार उडीच मारावीशी वाटली पण समोर मुख्याध्यापक सर होते म्हणून शांत होतो बसलो . बक्षीस मिळाल्याचा आनंद हा उडी मारून साजरा नाही करायचा तर मग कसा करायचा. पाटणला असतो तर तस्सा तरात पळत जाऊन तानू मामाला सांगितले असते. मला खांद्यावर घेऊन तोही नाचला असता.
पण मला कशाला बक्षीस दिले तेच कळत नव्हते. ऑफ तासाला कसले बक्षीस. शिवाय मी काहीच शिकवले नव्हते. जे काही केले होते ते मुलांनीच केले होते.
सोनसळे सरांनी सांगितले की अजून एक पारितोषीक जाहीर करतोय.
विशेष पारितोषीक तुशार पाटील. आठवी ब.
तुषार पाटील ! ... आपल्या वर्गात तुषार पाटील कोण आहे? कोण आहे रे…. अरे हा.... टंप्या … टंप्याला बक्षीस तेही विशेष पारितोषीक?
"कसलीही स्पर्धा नसलेल्या एका वेगळ्या उपक्रमाचे आपण आयोजन केले." मुख्याध्यापक सर बोलताहेत. सगळे कान देऊन ऐकताहेत.
आत्ता मुलांना शांत बसा , हे पहा , गप्प बसा सांगायची गरजच नव्हती. टंप्याला विशेष पारितोषिक हाच धक्का खूप मोठा होता.

काल आपण शिक्षक दिन साजरा केला. काही जण शिक्षक बनले काही जणांनी इतर कार्यालयीन कामे केली.
काल तुम्हाला एक वेगळा अनुभव आला असेल. काही जणांना शिकवायला जमले काहीना थोडे अवघड गेले . पण एक लक्षात आले का की आपण एखादी गोष्ट शिकवायला घेतो त्या वेळेस ती गोष्ट आपल्याला नीट समजते. काल निरीक्षक पथकाने शाळेत फिरून प्रत्यक्ष पाहिले मुलाना विचारून माहितीही घेतली.
सर्वांनीच छान कष्ट घेतले होते. छान तयारी केली होती. त्यात उणे अधीक करायला जागाच नव्हती पण ही पारितोषके दिली त्याल अकाही निकष लावले. सर्वात महत्वाचा निकष होता तो म्हणजे तुम्ही शिकवताना मुलांना त्यात किती गुंगवून ठेवता.
विनय ने घेतलेला तास हा ऑफ तास होता. मुलांनी त्याला भूमिती शिकवायची विनंती केली. त्याने त्यांच्या शंकांवर मुलांनाकडूनच उत्तरे घेतली.
शिकण्यात मुले इतकी गुंग झाली होती की त्यांना तास संपून लागून असलेली छोटी सुट्टी ही संपल्याचे समजले नाही. अर्थातच मुलांना त्याचे शिकवणे खूप आवडले.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विशेष पारितोषीक जे तुषार पाटील ला दिले आहे , शाळा ही एक संस्था आहे. यात शिक्षक जेवढे महत्वाचे आहेत तितकेच शिक्षकेतर कर्मचारीही महत्वाचे आहेत. तुषारने स्वतः होऊन शिपाई मामांची जबाबदारी घेतली. त्याने शिपाईमामांची सर्व कामे व्यवस्थित माहीत करून घेतली. सर्व टाईम टेबल वेळेवर सांभाळले. पण त्याचे खास कौतूक म्हणजे त्याने केलेली शाळेची स्वच्छता . शाळेच्या भिंतींवर काढलेले गिरगोटे त्याने स्वच्छ करून दिले.
त्याला याबद्दल विचारले तर तो म्हणाला. " सर आपण आपल्या घरात कचरा करतो पसारा करतो आई ते आवरते. घर नीट ठेवायला आईला किती कष्ट पडतात हे आज समजले.
शाळा हे आपले एक घरच आहे. आम्ही मुले कचरा करतो , भिंती गिरगटवून ठेवतो. ते स्वच्छ करायला शिपाईमामाना कष्ट पडतात. आम्ही कचरा करायचा तो त्यानी आवरायचा. हे कशासाठी, चिटोरे नीट कचरा पेटीत टाकले. तर त्यांचे कष्ट कमी होतील . आपल्या दोन चार चिटोर्‍यांच्या कचर्‍याने काय होणार आहे असा विचार आपण करतो पण पंधराशे मुलांनी टाकलेले चिटोरे मोजले तर ते सहा हजार होता. आपण आपल्या पुरती स्वछ्ता आणि शिस्त पाळली, कचरा हा थेट कचरा पेटीत टाकला तरी हे सहाहजार चिटोरे उचलायचे कष्ट वाचतील." टंप्या असा काही बोलला असेल यावर विश्वास त्याचा स्वतःचाही बसणार नाही. पण मुख्याध्यापक सर सांगताहेत म्हणजे तो खरेच तसा बोलला असेल हे नक्की.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

3 May 2020 - 11:43 pm | विजुभाऊ

_/\_

विजुभाऊ's picture

4 May 2020 - 12:26 am | विजुभाऊ

पुढील दुवा http://misalpav.com/node/46671