दोसतार - ४४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
4 May 2020 - 12:24 am

टंप्या असा काही बोलला असेल यावर विश्वास त्याचा स्वतःचाही बसणार नाही. पण मुख्याध्यापक सर सांगताहेत म्हणजे तो खरेच तसा बोलला असेल हे नक्की.

मागील दुवा : http://misalpav.com/node/46560
शिक्षक दिनाला बक्षीस मिळाले म्हणून आईला काय आनंद झाला. तीने मीठ मोहरी ने माझी दृष्टच काढली. मुद्दाम उतरवून टाकलेली मीठ मोहरी चुलीत टाकली. मीठ मोहरी उतरवून टाकणे म्हणजे काय ते कधीच समजत नाही. पण ती उतरून टाकल्या नंतर चुलीत मोहरी तडतडल्याचा जो मस्त वास येतो त्याची सर कशालाच नाही.

शिक्षक दिन होऊन गेला . पण तो तिथेच थांबला नाही. वर्गात सर नवा धडा शिकवताना हा धडा आपण कसा शिकवला असता असा विचार येतो. मलाच नाही तर प्रत्येकाला असे होत होते. त्यामुळे प्रत्येकजण शिक्षक झाला होता.
एखादी गोष्ट जर आपल्याला नीट येत नसेल तर ती समजण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे ती गोष्ट दुसर्‍याला शिकवायला घ्यायची. माझ्या साठी टम्प्या आणी एल्प्या हे दोघेही आदर्श विद्यार्थी होते. गम्मत म्हणजे मी शिकवायचो ते त्याना समजायचे.
शिक्षक दिनाच्या दिवशी एल्प्याने समांतर रेषा शिकवल्या होत्या. त्या साठी त्याने कसून अभ्यास केला होता. आता तो समांतर र्रेषांबद्दल कसलेही प्रमेय सहज सोडवायला लागला होता. शिक्षक दिनाच्या दिवशी टंप्याला विषेश बक्षीस मिळाले होते. मला तर पहिले बक्षीस मिळाले होते. या अगोदर असे बक्षीस कधीच मिळाले नव्हते. पण त्या दिवशी सोनसळे सरांनी पारितोषिकासाठी नाव पुकारले आणि अंगात वीज की काय ते चमकून गेले. शालाप्रमुख सरांनी आमच्या दोघांचेही खास कौतूक केले. सोनसळे सर तर म्हणालेही की तुम्ही तसे चांगलेआहात , हुशार आहात. लक्ष्मण पाटीलनेही तास खूप छान घेतला. मुलांना त्याने शिकवलेले खूप आवडले. तो एक चांगला शिक्षक होऊ शकेल. भूमिती इतक्या छान रितीने शिकवणे ही साधी सुधी गोष्ट नाहिय्ये. आम्हाला हे असे कोणी कधी म्हणालेच नव्हते.
पण वर्ग चालू असताना हे नेहमी आठवायचे.

सहामही परिक्षा जाहीर झाल्या वेळापत्रक ही लागले. सगळी पुस्तके जवळ जवळ निम्म्यापर्यंत शिकवून झाली होती. प्रत्येक विषयाची नाही म्हंटले तरी सात ते आठ धडे . मराठी हिंदी चे धडी कविता मिळून जरा जास्त . नागरीक शास्त्राचे जरा कमी. पण सगळे मिळुन सरासरी तेवढीच.
इतके सगळे एकदम अभ्यास करायचे म्हणजे जरा अस्ताव्यस्तच वाटायचं अस्तावस्त हा घाटे सरांचा शब्द.प्रयोगाची वही नीट लिहीली नाही की ती अस्ताव्यस्त, शर्ट चड्डीत नीट खोसला नाही की तो अस्ताव्यस्त , गृहपाठ नीट नसेल अर्धवट असेल की तो अस्ताव्यस्त.
आमचा अभ्यास अस्ताव्यस्त. मग ठरवलं की नीट करायचा.
शाळेत सहामाही परिक्षेचे वातावरण . जो तो आपला परिक्षेच्या तयारीत. सगळे खेळ बंद. अगदी मधल्या सुट्टीतही खेळायच्या ऐवजी मैदानात एखादी चक्कर मारून वर्गात अभ्यासाची पुस्तके काढून बसतोय. सगळी शाळा सहामाही परिक्षेच्या तयारीत. शाळेत येताना लागणारी दुकाने आणि त्यातली दुकानदाराची माणसे सोडली तर बाकीची सगळी सहामाही परिक्षेच्या तयारीत . संज्या तर येता जाताना चालतानाही हातात पुस्तक घेऊनच चालतो. अर्थात हातात पुस्तक घेऊन चालले काय किंवा ते पिशवीत ठेवून चालले जोवर ते वाचत नाही तोवर सगळे सारखेच. वाचले आणि वाचून समजले तर तो अभ्यास .
मागे एकदा आईबरोबर आळंदीला गेलो होतो. तिथे एक छोटे देऊळ होते. ते म्हणे वेदांचे देऊळ होते. त्या देवळात वेदांची पूजा व्हायची. त्यांना नैवेद्य आरती पण असायचे. जर वेद ही पुस्तके असतील तर ती वाचली पाहिजेत समजली पाहिजेत. त्यांची नुसती आरती नैवेद्य दाखवून काय होणार. मी हे आईला संगितले देखील होते.
ती म्हणाली असे बोलायचे नसते. तसे हे का हेही विचारायचे नसते. वेद बाप्पा रागावतात.
मला काही पटले नाही. मग तानू मामा म्हणाला की त्या पुस्तकात गोष्टी नसतात. त्यामुळी ते तसे असते. मग बरोबर आहे. ज्या पुस्तकात गोष्टी नाहीत ते पुस्तकच नाही.
गोष्टी असलेली पुस्तके लोक वाचतात. गोष्टी नसलेली पुस्तके ही कपाटात बंद करूनच ठेवायला पाहिजेत कुणी वाचू नयेत म्हणून
पुस्तकात गोष्ट असली की ते पुस्तक ती गोष्ट तुम्हाला सांगते. गप्पा मारत सांगते. मग ती गोष्ट तुमच्या लक्षात रहाते.तुम्ही हवी तेंव्हा आठवता येते. मित्राला सांगता येते.
शोधल्या की अभ्यासाच्या पुस्तकातही गोष्टी सापडतात. इतिहासाच्या पुस्तकात गोष्टीच गोष्टी असतात. भूगोलाच्या पुस्तकातही असतात. भूगोल शिकताना त्याला गोष्त जोडली की गम्मत येते. म्हणजे टुंड्रा प्रदेशात रहाणारा एखादा जॉन्सन आणि जेनीफर हे बर्फात अडकतात. आदल्या दिवशी खूप बर्फ पडल्यामुळे रस्ते दिसेनासे होतात ते वाट चुकतात. मग इग्लू सारख्या घरात रहातात. त्या घरात व्हेल माशाच्या चरबीचा दिवा असतो. बर्फाच्या घरात रहाताना ते याक च्या दुधाचे आईस्क्रीम खातात , कयाक नावाच्या बोटीतून इकडेतिकडे फिरतात.
इकडे बदाऊनी लोकांत एखाद अदील उंटावरून खजूर विकत फिरत असतो. मग तो खजूराच्या बदल्यात कापड विकत घेतो. ते भारतातून आलेले असते.
या असल्या गोष्टी गणीतात पण असतात. म्हणजे बघा एका वर्तुळाला कंटाळा आल्यामुळे त्याने पळायचे ठरवले. पण तोल गेल्यामुळे छेदीकेने त्याला छेदले.
मग वर्तुळाला कपडे शिवायचे होते म्हणून त्याच्या परीघाचे माप घेतले. परीघाचे माप घेण्यासाठी मोजायची टेप कमी पडली म्हणून फक्त त्रिज्येचे माप घेऊन परीघाचे माप काढले.
भौतीक शास्त्रातही हीच गम्मत आणता येते. ती आर्किमिडीजची गोष्ट नसती तर वस्तुमान आणि घनता लक्ष्यातच राहिले नसते.
हे असले काही अचाट डोक्यात आणले की लक्ष्यात रहाते हे आम्हाला समजले.
सहामाही परीक्षेचे पेपर तसे फारसे अवघड गेले नाहीत. मला तर पाटणच्या शाळेचे पेपर आणि इथले पेपर फार काही वेगळे वाटले नाहीत. शाळेत आलो होतो तेंव्हा या शाळेतली मुले आणि पाटणच्या शाळेतल्या मुलांपेक्षा थोडी हुशार असतील असे वाटले होते. पाटणहून आलो तेंव्हा गण्या म्हणाला होता " कुठबी जा. पोरं…. ही पोरच असतात. आपल्या इथे झाडे असतात म्हणून आपण झाडावरच्या कैर्‍या पाडतो . त्यांच्या तिकडे ती दुसर्‍या कशावरती मारत असतील. पण पोरं ही पोरंच. "
गण्याचं शास्त्र काही वेगळंच . एकदा तिकडे शाळेत कोणीतरी प्रमुख पाहुणे आले होते. इंग्रजी बोलण्याबद्दल ते सांगत होते. म्हणाले" इंग्लंड अमेरीकेतली लहान लहान पोरं सुद्धा थेट इंग्रजीत फाडफाड बोलतात. त्यांना जमते ते तुम्हाला ही जमायला हवं" गण्याने हात वर केला. प्रमुख पाहुण्याना वाटले की त्याला काही तरी शंका विचारायची आहे. ते म्हणाले " हं विचार रे बाळ"
गण्या उभा राहीला. म्हणाला" इंग्लंड अमेरीकेत बाळांच्या आया इंग्रजीत बोलतात म्हणून त्याना इंग्रजी येते. तुम्ही इथल्या मुलांच्या आयांना इंग्रजीत बोलायला शिकवा . मुले आपोआप इंग्रजीत बोलतील. मुले आईची नक्कल करतात"
मुले आईची नक्कल करतात हे बाकी खरे होते. कारण बोबड्या बोलणार्‍या सगळ्या मुलांच्याआयाच मुलांपेक्षाही जास्त बोबड्या बोलत असतात.
गण्याचे बोलणे ऐकून की काय त्या प्रमुख पाहुण्यांनी भाषण लगेचच संपवले.आणि त्या नंतर शालाप्रमुख सरांनीही गण्याला पुन्हा कधीच प्रमुख पाहुण्यांच्या समोर आणले नाही, शाळेत प्रमुख पाहुणे आले की ते गण्याला शाळेचे काहितरी काम सांगून बाहेर पाठवायचे.
शेवटचा नागरीकशास्त्राचा पेपर झाला आणि सहामाही परिक्षा संपली.
दिवाळीची सुट्टी जाहीर करायच्या अगोदर सर्वांना वर्गावर बोलावले. सोनसळे सरांनी भला मोठा गृहपाठ दिला. काय काय नव्हते त्यात! मराठीचे धडे, इंग्रजीच्या कविता, हिंदीचे धडे इतिहासाचे धडे. गणीत आणि शास्त्र सोडून सगळ्या विषयांचा ग्रुहपाठ दिला होता.
इतका सगळा ग्रुहपाठ पाहून टम्प्या म्हणाला " इतका सगळा ग्रुहपाठ सुट्टीत आपण करायचा ? हे म्हणजे आपल्यापेक्षा शिक्षकांनाच दिवाळीची सुट्टी आहे की.
टंप्याचे बोलणे फारसे कुणी ऐकले नसावे नाहीतर त्यावर तास सुटल्यावर घरी जाईपर्यंत चर्चा झाली असती.
पण घाटे सरांनी किल्ला स्पर्धा पण ठेवली होती. त्यामुळे मुलांचे लक्ष्य त्याकडे होते.
दिवाळी ची सुट्टी जाहीर केली. जवळ जवळ तीन आठवड्यांची.
इतक्या मोट्।या सुट्टीत काय काय करायचे हे प्रत्येकाने ठरवले होते. काहींचे ठरायचे होते पण प्रत्येकाने किल्ला करायचा हे नक्की ठरवले होते.
संज्या अज्या रवी मिळून रायगड करणार होते. , विजा , अंजी आणि आपी प्रतापगड , आणखी कोणीतरी रायरेश्वर , तर कोणी सुभानमंगळ करणार होते.
टम्प्या आणि एल्प्याचे ठरत नव्हते. "किल्ला कसलाही असो त्यात एक विहीर करायची त्यात मेणबत्ती लावल्यावर पट्रर्पटर आवाज करणारी आगबोट सोडायची. किल्ल्यात एक गुहा पण करायची आणि शेवटच्या दिवशी त्या भुयार करायला वापरलेल्या डबड्यात मोठ्ठा दंड्या फटाका लावायचा. धुडूम ... अख्खा किल्ला हादरून जातो. किल्ल्यातली माती उडते त्यावरच्या झाडाझुडपांसह. मस्त मजा येते रे" टंप्या.
हे असले काही पाटणला नसायचे. तिथल्या दिवाळीची गम्मत काही वेगळीच.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

4 May 2020 - 12:26 am | विजुभाऊ

मागील दुवा misalpav.com/node/46560

प्रचेतस's picture

4 May 2020 - 7:41 am | प्रचेतस

मस्त लिहिताय

वामन देशमुख's picture

4 May 2020 - 10:28 am | वामन देशमुख

वाचत आहेच, थोडं भरभर लिहित रहा, विजुभाऊ!
:)

king_of_net's picture

4 May 2020 - 10:58 am | king_of_net

भाग लवकर येउद्यात!!

मन्या ऽ's picture

5 May 2020 - 7:39 am | मन्या ऽ

वाचतेय!