भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४
भाग - ५
भाग – ६
ग्रीस
तुम्हाला वाटले असेल आता काय होणार. पण मुसोलिनी हे एक अजब रसायन होते. सिआनोच्या सहाय्यकाने त्याला सबुरीचा सल्ला दिला. “आपण जेवायला जाऊन येऊया. नाहीतरी तो निरोप सांकेतिक भाषेत लिहावा लागेल. त्याला वेळ लागेलच”.
ते जेवून परत आले तेव्हा त्यांना कळाले की मुसोलिनीने त्या तारेचे काय केले हे विचारण्यासाठी दोन वेळा फोन केला होता. सिआनोने त्याला फोन लावला तेव्हा मुसोलिनीने त्याला परत तेच विचारले “ त्या तारेचे काय केले आहेस तू ? जर्मनीला कळवले आहे का नाही ?
“तो सांकेतीक भाषेत लिहायचे काम चालू आहे. जाईल ती तार थोड्याच वेळात “ सिआनो म्हणाला. मुसोलिनीच्या रागाची त्याला कल्पना होती. आता काय होते आहे याची धास्ती वाटून त्याने गप्प रहायचेच पसंत केले.
“पाठवली नाही अजून?” मुसोलिनीने बेफिकीरीने विचारले.
“मग राहू देत. नको पाठवूस” सिआनो उडालाच. इतक्या महत्वाच्या बाबतीत एवढा बेफिकीरपणा फक्त मुसोलिनीलाच जमू शकला असता. खरे तर ही भुमिका स्विकारून मुसिलिनीने स्वत:चा कमकुवतपणाच दाखवून दिला होता. त्याच्या प्रतिमेला हे आजिबात शोभणारे नव्हते. दररोज कशाला, प्रत्येक तासाला इतिहासाला आव्हान देत तो धरसोडीचे धोरण स्विकारत असे. म्हणजे इतिहास आठवला की त्याला काहीतरी भव्यदिव्य करावे असे वाटत असे. त्यातून बाहेर आला की तो दिलेला निर्णय फिरवत असे. कारण त्याचे नेतृत्व कणाहीन होते हेच खरे. सिआनोने त्याच्या रोजनिशीत लिहून ठेवलेले आहे “ कधी कधी त्याला असे वाटायचे की अगोदर आर्थिक बाजू सांभाळावी, लष्करी ताकद वाढवावी पण दुसर्याच क्षणी इतिहास घडवायची संधी हातातून जाईल की काय असे वाटून तो जर्मनीबरोबर जायचा विचार बोलून दाखवायचा.”
या सगळ्या परिस्थितीचा व अपेक्षांचा प्रचंड दबाव त्याच्या मनावर होता. वेल्स नावाचा अमेरिकेचा एक सेक्रेटरी इटलीला मुसोलिनीला अलिप्ततेचे धोरण कसे इटलीच्या फायद्याचे आहे हे पटवायला आला होता तेव्हा त्याने म्हटले “मुसोलिनीचे वय आज ५६ आहे पण मला तो अजून १५ वर्षांनी म्हातारा भासला. कंटाळवाणा, जाड्या, दुर्बल आणि पांढर्या केसांचा”.
एप्रिल ९ ला जर्मनांनी नॉर्वे व डेनमार्कवर हल्ला चढवला. मे १० ला फ्रान्सचा क्रमांक लागला. मुसोलिनीला वाटले की फ्रान्स जर्मनीला धडा शिकवेल म्हणून तो हाताची घडी बांधून स्वस्थ बसला. अर्थात तसे काही झाले नाहीच. त्याने तातडीने त्याच्या हवाईदलाचा प्रमुख मार्शल बाल्बो आणि मार्शल बाडोग्लिओ ज्याने त्याला इथोपिया जिंकून दिला होता, या दोघांना बोलाविणे पाठवले आणि तो युद्ध घोषीत करायच्या बेतात आहे याची कल्पना त्यांना दिली.
धक्का बसून बोडोग्लिओने जीव तोडून सांगितले “ एक्सेलंसी, आपली काहीच तयारी झालेली नाही. दर आठवड्याला आपल्याला आम्ही या तयारीचे अहवाल पाठवत होतो.” त्याने हताशपणे त्या अहवालात काय होते ते थोडक्यात सांगायला सुरवात केली “ २० डिव्हिजन्सकडे फक्त ५०% युद्धसामग्री होती. जे काही युद्धसाहीत्य होते ते तर भंगारात टाकायच्या लायकीचे होते. काही रणगाडे तर इतक्या नाजूक अवस्थेत होते की त्यांना युद्धभूमीवर कसे हलवायचे हा प्रश्न होता. गारिबाल्डिच्या काळातील तोफा आणि पाण्याने गार करायच्या मशीन गन्स असली युद्ध सामग्री अजूनही वापरात होती.
पण मुसोलिनीला आता इटलीच्या भव्य इतिहासाचा ध्यास लागला होता. इटलीचा भाग्यविधाता व्हायचे होते त्याला. बर्याच काळानंतर म्हणजे जवळजवळ ९ महिन्यानंतर तो जून १०ला पॅलॅझोच्या सज्जात अवतरला आणि त्याने जाहीर केले “ आपल्या देशाच्या क्षितिजावर हा तास इटलिचे भविष्य घडवणारा म्हणून सुवर्णांच्या किरणांनी लिहिला जाईल. आत्ताच फ्रान्स आणि ब्रिटनच्या राजदूतांकडे त्यांच्या विरूद्ध युद्ध पुकारल्याचा खलिता सुपुर्त करण्यात आलेला आहे”. इटालियन जनतेला काहीतरी भयंकर घडणार आहे याची कल्पना आली. ट्युरीनमधे स्मशान शांतता पसरली तर खुद्द मिलानच्या मुख्य चौकात लोक रडताना आढळून आली.
इथोपिया आणि अल्बेनियामधे इटलीच्या सैन्याला तुलनेने खुपच कमकुवत सैन्याशी सामना करायला लागला होता. आणि आता तर फ्रान्सने युद्धबंदीची जर्मनीकडे मागणी केल्यावर म्हणजे जून २१, १९४० रोजी इटली युद्धात उतरली. पण ऑक्टोबरमधे इटलीने ग्रीसवर आक्रमण केले.
मार्शल बोडोग्लिओने मुसोलिनीला समजवण्याचा बराच प्रयत्न केला की इटलीकडे फक्त चारच डिव्हिजन सैन्य या युद्धासाठी आहेत पण स्वत:च्या न्युनगंडातून मुसोलिनीने हे युद्ध इटलीवर लादलेच.
“हिटलर नेहमी मला आश्चर्याचे धक्के देत असातो. आता माझी वेळ आहे. उद्या तो वर्तमानपत्रातच ग्रीसबद्दल वाचेल तेव्हाच फिटांफीट होईल”.
खरे तर इटलीची सेना या आघाडीवर मार खात होती. डुराझो आणि व्हालोना या बंदरामधे वेढले गेल्यावर ते माघार घेत समुद्राला टेकले होते. य़ा सैन्याला वाचवण्यासाठी हिटलरला त्याचे ६८०,००० सैनिक या विभागात पाठवावे लागले. यामुळे फार महत्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे रशियावरचे आक्रमण (ऑपरेशन बार्बारोसा) एक महिना पुढे ढकलावे लागले. रशियामधे त्यानंतर त्या भीषण थंडीत काय झाले हे सगळ्यांना माहितीच आहे.
हिटलरचे आपल्या मित्राची अब्रू वाचावायचे प्रयत्न कमी पडले. इटलीचे ग्रीसच्या युद्धभुमीवर २०,००० सैनिक ठार झाले, ४०,००० जखमी झाले तर १८००० हे फ्रॉस्ट बाईटने निकामी झाले. यापुढचे महिने मुसोलिनीवर सर्व युद्धभुमीवर काही ना काही तरी संकटे कोसळत राहिली.
मुसोलिनी ब्रूनो बरोबर
त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही हेच झाले. त्याची दोन्हीही मुलं इटलिच्या हवाईदलात होते. ७ ऑगस्टला पॅलॅझो व्हेनेझियाच्या लिफ्टमधे शिरताना एक अधिकारी त्याच्याकडे घाईघाईने आला आणि म्हणाला “ पिसा येथे एक विमान कोसळले आहे. तुमचा मुलगा ब्रूनो हा अत्यावस्थ आहे”
डोळे मिटून मुसोलिनी त्या लिफ्टच्या दरवाजाला टेकला आणि त्याने विचारले
“त्याचा मृत्यू झालाय का ?”
“हो !”
त्या अधिकार्याने नंतर मुलाखतीत सांगितले. मी हो असे उत्तर दिल्यावर मुसोलिनीच्या डोळ्यात एखादी ज्योत विजावी तसा थंडपणा उतरला. आणि ती ज्योत परत कधीच पेटली नाही.
ब्रूनोचा अपघात.
या दिवसापासून मुसोलिनीच्या लहरीचा कोणी भरवसा देऊ शकत नसे. ब्रूनोचा वरिष्ठ अधिकारी मुसोलिनीला भेटायला आला तेव्हा मुसोलिनीने खुर्चीत आपले शरीर आक्रसून घेतले आणि तो त्या अधिकार्यावर खेकसला “तू येथे का आला आहेस मला चांगले माहीत आहे. तुम्हाला सगळ्यांना ब्रूनोच्या मृत्यूने आनंद झाला आहे. मला काहीही ऐकायचे नाही. चालता हो येथून.” तो त्याचे निर्णयही वेडेवाकडे घेऊ लागला. एका जनरलने आठवणीत सांगितले की त्याचे वस्तुस्थितीचे भान सुटले होते. त्याने हिटलरला शक्य नसताना रशियावर आक्रमणासाठी चार डिव्हिजन सैन्य द्यायचे कबूल केले आणि चाळीस विमाने. पण या विमानाला थंडीत इंधन गोठू नये म्हणून जी यंत्रणा असते तीच नव्हती. हे सैन्य तेथे गेले असते तर तेथील उणे ३६ डिग्री तापमानात मुसोलिनीला शाप देत मेले असते. हे असे असले तरीही मुसोलिनीला जनमानस त्याच्या बाजूनेच आहे आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा फक्त तोच पुर्या करू शकतो असा भ्रम होता. त्याचा एक जुना सहकारी गोव्हचिनो फरझानो याने त्याचा हा भ्रम दूर करण्याचा एकदा प्रयत्न केला. पण मुसोलिनीने त्यावेळेस कसा आकांततांडव केले याची आठवण सांगताना तो म्हणतो –
“जनतेचे त्यांच्या पुढार्यावरचे प्रेम हे सगळे सुरळीत चाललेले असते तेव्हाच असते. आत्ता जर राजाने तुला अटक करायला त्याचे सैनिक पाठवले तर त्याच्या विरूद्ध एक बोटही उठणार नाही हे लक्षात ठेव.” हे मी त्याला ऐकवल्यावर
मुसोलिनी एखाद्या हिंस्र श्वापदासारखा पिसाळून उठला. टेबलावर त्याची मुठ आपटून तो किंचाळला “मला माझ्या जनतेची खात्री आहे. मी तुला सांगतो खात्री आहे...खात्री आहे....खात्री......”
शेवटी किंचाळून त्याच्या तोंडाला जवळजवळ फेस आला तेव्हा तो त्याच्या खुर्चीत मटकन बसला. त्याच्या काळ्याशार डोळ्यात वेडसरपणाची झाक दिसत होती. फरझानो द्विमुढ होऊन त्याचा तो रागाचा झटका बघत तसाच उभा राहिला. जगात फक्त एकच माणूस होता ज्याला खात्री होती की मुसलोलिनी त्याच्या ४ कोटी इटालियन देशबांधवांचा प्रवक्ता आहे.
तो माणूस म्हणजे खूद्द मुसोलिनीच होय !
जुलै १९४३ पर्यंत इटलीला दुसर्या महायुद्धात कोणी वाली उरला नाही. आख्ख्या इटालियन द्विपकल्पाच्या संरक्षणासाठी फक्त ७ पायदळाच्या डिव्हिजन्स उपलब्ध होत्या. सहा युद्ध्नौकांपैकी फक्त तीनच लढण्यासाठी तंदरूस्त होत्या आणि नोव्हेंबर पासून ते आत्तापर्यंत २१९० विमाने नष्ट झाली होती. म्हणजे आता विमानदल अस्तित्वातच नव्हते असे म्हटले तरी चालले असते.
जुलै ९ च्या रात्री सिसिलीच्या किनार्यावर दोस्त राष्ट्रांचे १६०,००० सैनिक उतरले. अशा वेळेस राष्ट्रप्रमुखांचे काम जनतेला, राष्ट्राला धीर देणे, पण मुसोलिनीच्या मनातील गोंधळ त्याला काहीच करू देईना. तो अशा प्रश्नांपासून स्वत: लपून राहिला. मे १३ ला जेव्हा आफ्रिकामधे इटालियन फौजांचा पराभव झाला तेव्हा तो असाच त्याच्या घरात लपून बसला. अशा वेळी त्याच्याकडून कुठलाही निर्णय यायचा नाही, आणि जरी आला तरी इतक्या उशीरा यायचा की त्याचा उपयोग व्हायचा नाही.
या भीषण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी फॅसिस्ट पार्टीचे काही वरीष्ठ नेते मुसोलिनीला पॅलॅझिओ व्हेनेशियावर भेटले आणि त्यांनी त्याला ग्रॅंड कौन्सिलची बैठक बोलवायची विनंती केली. या समितीमधे एकूण २८ लोक होते. ८ वरीष्ठ मंत्री, सर्व प्रांतीय सरकारांचे प्रमुख, काही फॅसिस्ट पार्टीचे नेते आणि काही मुसिलोनीने नेमनूक केलेले प्रतिष्ठीत नागरीक अशी त्याची रचना होती. अर्थात ही समिती आता नावालाच उरली होती. उदाहरणार्थ मुसोलिनीने युद्धाची घोषणा केली तेव्हा या समितीला विचारलेही नव्हते. पण कागदोपत्री तिचे कायदेशीर अस्तित्व होतेच आणि त्यांना वापरायचे असतील तर ते त्यांचे अधिकार वापरुही शकलेही असते. यांना सहजच गारद करू शकू या अत्मविश्वासाने त्याने त्या भेटीला आलेल्या सदस्यांना सांगितले “ तुम्हाला ग्रॅंड कौन्सीलच पाहिजे ना, होईल, तीही बैठक होईल”
ही विनंती ज्यांनी केली त्यांच्या मागे होता एक बुजुर्ग मंत्री आणि या कौन्सीलचा सभासद. त्याचे नाव होते डिनो ग्रांडी. त्याच्या पुढे दोन उद्दिष्टे होती. पहिले म्हणजे ईटलीचा या युद्धातून काढायचे आणि त्यासाठी मुसोलिनीला सत्तेवरू हटवावे लागले तर तेही करायचे. त्यासाठी त्याने ठराव लिहायचे काम पहिल्यांदा हाती घेतले. हा ठराव पास झाला असतातर मुसोलिनीच्या हातातील सत्ता जाणार होती.
ग्रांदी.
इटलीच्या राजालाही या नाटकात महत्वाची भुमिका बजवायची होती. व्हिट्टोरिओ इमान्युएलने मुसोलिनीच्या विरूद्ध उभे रहायचा बरेच प्रयत्न पूर्वी केला होते पण तसा तो मनाचा खंबीर नसल्यामुळे प्रत्येक वेळी त्याने कच खाल्ली. इथोपियाच्या विजयानंतर जेव्हा त्याला सावधानतेची सुचना देण्यात आली तेव्हा तो म्हणाला “मी मुसोलिनीबरोबर जातो याचे कारण त्याचे बरोबर असते हे नसून तो नशिबवान आहे हे आहे”. या युद्धाच्या काळात हा राजा कोणाच्या खिजगणतीतही नव्हता असे म्हणायला हरकत नाही. त्याच्या गावी तो एकांतवासात, आर्थिक विवंचनेत, शांतपणे जीवन व्यतीत करत होता. ७३ व्या वर्षीच तो नव्व्दीचा दिसायला लागला होता. त्याला काही वयोमानाप्रमाणे व्याधीही जडल्या होत्या. या वयात आता त्याला केलेल्या चुकांची दुरूस्ती करायची संधी प्राप्त झाली होती. आज त्याच्या राजवाड्यातून स्फोटांचे आवाज ऐकू येत कारण आता रोमवर बाँबवर्षाव होत होता. रेल्वे, रस्ते, घरे उध्वस्त होत होती. १९ जुलैच्या दुपारी व्हिट्टिरीओने उध्वस्त झालेल्या भागांची पहाणी करायला जायचे ठरवले. जागेवर गेल्यावर एखाददुसर्या माणसाने त्याला ओळखले असेल पण एका एन्जला फिओरावांती नावाच्या स्त्रीने मात्र त्याच्याकडे धाव घेतली. या बाईचे घरदार बाँबहल्ल्यात उध्वस्त झाले होत आणि तिची मुले त्या ढिगार्याखाली अडकली होती. संतापाने ती व्हिट्टिरिओला शिव्याशाप देत म्हणाली “जा मर जा. तुम्ही का नाही मरत ?” राजाच्या एका शरिररक्षकाने तिच्या तोंडावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला पण तिने तो झिडकारला. “ तुम्हीच आम्हाला या परिस्थितीत आणून सोडले आहे. आमच्या मुलांचा जर्मनांशी संबंध काय ?” थोड्याच वेळात तेथे बराच जमाव जमा झाला आणि तोही या शिव्याशापात सामील झाला. राजाच्या सहाय्यकांनी जेव्हा त्या गर्दीत पैसे वाटायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी त्या नोटा चुरगाळून त्यांच्या अंगावर फेकल्या आणि त्यांना बजावले “ आम्हाला पैसे नकोत. आम्हाला आता शांतता पाहिजे आहे”. तेथून पळ काढताना त्या मोटारीत राजाच्या मनात विचार येत होते ”माझ्या १००० वर्षाचा इतिहास असणार्या घराण्याचची प्रतिष्ठा आज मातीत मिळाली. हे सगळे या मुसोलिनीमुळे झाले.”
“हे असे चालू ठेवणे धोक्याचे आहे. ही सत्ता बदललीच पाहिजे” त्याने स्वत:ला बजावले.
ठरल्याप्रमाणे २४ जुलै ला संध्याकाळी बरोबर ५ वाजता ही बैठक पॅलॅझिओच्या दुसर्या मजल्यावर साला द पापागॅलो नावाच्या सभागृहात सुरू झाली. सगळ्या सदस्यांच्यात अस्वस्थतता पसरली होती कारण ग्रॅंडीने सगळ्यांना या ठरावाच्या प्रती वाटल्या होत्या, त्यामुळे सगळ्यांना ही बैठक कशासाठी होणार आहे आणि ती वादळी होणार याची खात्री होतीच. ग्रँडी स्वत: जे काही वाईट होईल त्याची तयारी करून आला होता. त्याच्या उजव्या मांडीला त्याने एक हातबाँब बांधला होता. जर त्या बैठकीत मुसोलिनीने त्याला अटक करायचा प्रयत्न केला असता तर तो सगळ्यांना उडवून लावणार होता.
“सॅल्युतो अल ड्युसे” अशा घोषणेबरोबर लष्करी वेषात मुसिलिनीचे त्या सभागृहात आगमन झाले. सवयीनुसार सगळ्या उपस्थितांनी त्याला रोमन सॅल्युट करताच मुसोलिनीच्या चेहर्यावर स्मितहास्य पसरले. परिस्थिती एवढी काही वाईट दिसत नाही, तो मनात म्हणाला. सगळ्यांनी त्या गोलाकार आकाराच्या भल्या मोठ्या मेजाभोवती जागा घेतल्यावर बैठक चालू झाली.....
गेले कित्येक दिवस मुसोलिनीचे हितचिंतक त्याला संभाव्य उठावाची कल्पना देत होते. आदल्याच दिवशीही त्याच्या पोलिस प्रमुखाने त्याला यासंबंधीत एक कागदपत्रांचे बाड पाठवले होते. ते बाजूला सारून मुसोलिनीने मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिले होते “मी आहे म्हणून हे लोक आहेत. ही सगळी मंडळी माझ्या वलयाची प्रतिबिंबे आहेत. माझ्या एकाच भाषणाने ते सगळे वठणीवर येतील. काळजी करू नका.”
या बैठकीत मुसोलिनीने दोन तास त्याची धोरणे कशी बरोबर होती हे त्याच्या खास ओघवत्या, भावनांनी ओतप्रोत भरलेल्या शैलीत सादर केले. मग अचानकपणे तो त्यांच्या अल-अलमीनच्या पराभवाकडे वळला. “मी त्यांच्या हल्ल्याची तारीख अगोदरच वर्तवली होती – ऑक्टोबर २३, १९४२. ही तारीख का ? त्यांना ज्या दिवशी या चळवळीत आपण रोम वर चालून गेलो होतो त्याच्या २०व्या वाढदिवसालाच त्या चळवळीचा अपमान करायचा होता”.
हा माणूस काय बोलतोय अशा अर्थाने त्या टेबला भोवती कुजबुज वाढली.ग्रॅंडी अस्वस्थपणे त्याच्या भाषणाची वाट बघत होता. २८ सदस्यांपैकी फक्त १४ सदस्यांनीच त्याच्या ठरावाला मान्यता दिली होती. उरलेल्यांच्यात त्याला आता त्याच्या भाषणाने परिवर्तन घडवून आणायचे होते. तो उभा राहिला. सगळ्यांनी श्वास रोखून धरले होते. काही अघटीत घडले तर ? सगळे तयारीत बसले होते. पण मुसोलिनीने त्या दिवशी फाजिल आत्मविश्वासाने ग्रॅंडीला बोलायला परवानगी दिली.
आपले बोट मुसोलिनीवर रोखून अत्यंत तणावाखाली ग्रॅंडीने आपले मत मांडायला सुरवात केली. आत्ताच ! नाहीतर परत नाही हे त्याला चांगलेच माहीत होते. “इटालियन जनतेचा मुसोलिनीने विश्वासघात केला आहे. ज्या दिवसापासून त्याने इटलीचे जर्मनीकरण चालू केले त्या दिवसापासून. आपल्याला त्याने इटलीच्या सगळ्या परंपरा, फायदा, हिताच्या विरुद्ध असलेल्या युद्धात खेचले आहे........”
त्या सभागृहात स्मशान शांतता पसरली होती. मुसोलिनीला विश्वासघातकी म्हणणारा माणूस अजून जिवंत कसा याचेच त्यांना आश्चर्य वाटत होते. मुसोलिनी स्वत: खुर्चीत अस्ताव्यस्त बेफिकिरीने बसला होता आणि त्याने हाताने त्याचे डोळे झाकले होते. तिरस्काराने भरलेल्या शब्दात ग्रॅंडी पूढे म्हणाला “ मी तुम्हाला सांगतो, इटलीचा पराभव त्याच दिवशी झाला ज्या दिवशी मुसोलिनीने त्याच्या टोपीत मार्शलचे चिन्ह अडकवले. ती सगळी आभुषणे काढून परत मुसोलिनी म्हणून जगायची तयारी त्याने आता केली पाहिजे.”
ग्रॅंडी तासभर बोलून खाली बसला. त्यानंतर इतर जण बोलायला उठले. बोट्टाई नंतर सिआनो बोलायला उठला.त्याने शांतपणे हिटलरने तहानंतर अनेक वेळा इटलीचा कसा विश्वासघात केला हे स्पष्ट करून सांगितले. “आपल्या देशाचा जो विश्वासघात झाला आहे त्यापेक्षा कुठलाही विश्वासघात सौम्य ठरेल” याचा अर्थ न कळण्या इतका मुसोलिनी मूर्ख नव्हता. त्याने थंड नजरेने त्याच्या जावयाकडे बघितले.
“मला माहीत आहे खरे विश्वासघातकी कोठे आहेत ते !” तो खुनशीपणे म्हणाला.
सात तासांच्या वादळी चर्चेनंतर मध्यरात्र उलटून गेल्यावर मुसोलिनीने ही बैठक दुसर्या दिवशी चालू ठेवण्याची सुचना केली. ग्रॅंडीला याची कल्पना होतीच. त्याने पटकन उत्तर दिले “ नाही नाही, कितीही वेळ लागला तरी चालेल. आपण या ठरावावर आत्ताच मतदान घेतले पाहिजे”. मांडीला बांधलेल्या हातबाँबच्या पिनेवर हात ठेवून ग्रॅंडीने मतदान सुरू केले. जर हे आपल्या विरूद्ध जाते आहे हे कळाल्यावर तो सगळ्यांना केव्हाही अटक करायचा हुकूम देऊ शकला असता म्हणून ही खबरदारी त्याने घेतली होती. निकाल जाहीर करण्यात आला “ १९ ठरावाच्या बाजूने, ७ विरुद्ध आणि एक मत नाही.” एकाने त्याच्या योजनेच्या बाजूने मत टाकले होते.
टेबलावरचे कागद गोळा करून मुसोलिनी उठला आणि आपली नजर ग्रॅंडीवर रोखून तो हताशपणे म्हणला “तू, तू फॅसिझमची हत्या केली आहेस”. तो उठल्यावर एका सदस्याने सवयीनुसार सॅल्युतो अल द्युसे “ म्हनून त्याला सलाम केला. त्याच्याकडे पहात मुसोलिनी कुत्सितपणे म्हणाला “ त्याची आता गरज नाही. त्या पासून मी तुम्हाला मुक्त करतो”.....................
त्या दिवशी दुपारी त्याच्या सचिवाबरोबर, निकोलो सिझर बरोबर मुसोलिनी आरामात व्हिला साव्होइया येथे चालला होता. राजाचा हा प्रासाद रोमच्या बाहेर पण अगदी जवळ होता. कालच्या प्रकरणानंतर बसलेल्या धक्क्यातून तो आता पूर्णपणे सावरला होता आणि त्याचा आत्मविश्वास जो थोडा डळमळीत झाला होता तो परत आला होता. निघताना त्याने जनरल गालिबिआतीला खात्री दिली होती “ राजा नेहमीच माझ्या मागे ठामपणे उभा राहिला आहे. यावेळीही तेच होईल याची मला खात्री आहे. काळजी करू नका.” त्याने त्याच आत्मविश्वासाच्या भ्रमातच जनरलने सल्ला देऊन सुद्धा अटकसत्राची परवानगी नाकारली. त्याने ग्रांडीच्या एका पाठिराख्याला सांगितले “तुमच्या मताला काडिचीही किंमत नाही. ही समिती फक्त राजाला सल्ला देण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. मी त्या समितीची घटना आत्ताच वाचली आहे. राजा आता या सल्ल्यानुसार वागायचे का नाही हे ठरवेल”.
राजाच्या सुचनेनुसार मुसोलिनीने लष्करी पोषाख परिधान न करता साधा पोषाख घातला होता. त्या प्रासादाच्या बाहेर पोहोचताच मुसोलिनीच्या चालकाने नेहमीप्रमाणे गाडीचा हॉर्न दोनदा वाजवला. गाडीमधे मागच्या बाजूला बसलेले त्याचे अंगरक्षक नियमानुसार बाहेरच थांबणार होते. त्याच प्रासादात त्या दरवाजापासून ४०० मीटरवर कॅरॅबिनिएरीच्या एका तुकडीचा कॅप्टन पावलो व्हिग्नेरीच्या मनावरचे दडपण तो हॉर्न ऐकून अजूनच वाढले. याच खुणेची तो वाट बघत होता. दुपारी निघताना त्यांना प्रासादाच्या बागेत लपलेल्या अमेरिकन छत्रीधारी सैनिकांना पकडायला जायचे आहे असे सांगण्यात आले होते. त्या प्रासादाच्या बागेत एक रुग्णवाहीकाही लपवण्यात आली होती. आता त्यांना कळाले होते की त्यांची खरी कामगिरी काय आहे ती.
तळमजल्यावरच्या दिवाणखान्यात आत्म्विश्वासाने पाऊले टाकत राजाला बघताच मुसोलिनी म्हणाला “ महाराज आपण कालच्या पोरखेळाबद्दल ऐकलेच असेल”
“तो पोरखेळ नव्हता” राजाने तुटक उत्तर दिले. त्याच वेली मुसोलिनीला हेही उमगले की राजाने आज नेहमीप्रमाणे त्याला बसायला सांगितले नाही आहे. तो तसाच उभा राहिला आणि राजाने त्या दालनात येऱझार्या घालायला चालू केले. मुसोलिनीने कालच्या बैठकीचा वृत्तांत त्यांना देण्यासाठी बाहेर काढला आणि म्हणाला “ अर्थात त्यांच्या मताला काहीच अर्थ नाही म्हणा.”
“त्याची काही गरज नाही. मला सर्व माहीत आहे. आणि त्यांचे मत हेच या देशातील जनतेचे मत नाही असे समजायचे काही कारण नाही. इटालियन जनता आज सगळ्यात जास्त तिरस्कार मुसोलिनीचा करते हे उघड गुपीत आहे. माझ्या शिवाय तुला एकही मित्र उरला नाही हे सत्य स्विकार !”
“आपण म्हणता हे खरे असेल तर मी राजिनामा द्यायला पाहिजे” मुसोलिनी चाचपडत म्हणाला.
“आणि तो विनाअट स्विकारला गेला आहे याची खात्री बाळग” राजा पटकन म्हणाला. ते ऐकल्यावर मुसोलिनीने खुर्चीचा आधार घेतला आणि तो म्हणाला
“चला संपले सगळे”................
क्रमशः.....
जयंत कुलकर्णी.
पुढच्या भागात मुसोलिनीची हिटलरने केलेली सुटका...........
प्रतिक्रिया
20 Feb 2012 - 8:54 pm | पैसा
खिळवून टाकणारे लिहीत आहात. हा भाग फार आवडला. जगभरचे सगळे हुकूमशहा एकाच पद्धतीने कसं वागतात हेही पाहणं मनोरंजक वाटतंय!
20 Feb 2012 - 8:59 pm | llपुण्याचे पेशवेll
वाचतोय.
20 Feb 2012 - 9:13 pm | निशदे
फारच छान लिहित आहात....... अजून येऊ देत....... :)
20 Feb 2012 - 11:23 pm | मन१
येतोय म्हणायचा गोत्यात आता मुसोलिनी.
21 Feb 2012 - 12:25 am | अन्या दातार
इतका विक्षिप्तपणा दिसत असताना कुठल्याही अधिकार्याने त्याचा खून कसा काय केला नाही याचेच आश्चर्य वाटतेय.
21 Feb 2012 - 11:47 am | यकु
खूपच उत्कंठावर्धक आणि नाट्यमय झाला आहे हा भाग.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
22 Feb 2012 - 2:47 pm | गणेशा
हा भाग खुप आवडला ..
एक जबरदस्त लेखन आहे हे ...
पुस्तक प्रकाशित कधी करत आहात ?