मुसोलिनीचा उदयास्त भाग - ५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Feb 2012 - 6:40 am

भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४

१९३३ सालापर्यंत मुसोलिनीने अशी झेप घेतली होती की तो स्वत:ला जगातील सर्व नेत्यांपेक्षा श्रेष्ठ समाजायला लागला. एका मुलाखतीत म्हणाला “ फॅसिझम ही मी जगाला दिलेली एक देणगी आहे. एक दिवस तुम्ही बघाल हे तत्वज्ञान इतर सगळ्या तत्वज्ञानांना बाजूला सारेल. मी स्वत: हिटलर समोर अनेक कल्पना मांडल्या आहेत आणि तो त्या राबवतोय”.

हे खरे होते. हिटलरने मुसोलिनीकडून खूप कल्पना उचलल्या होत्या आणि त्यासाठी त्यानी त्याचे अनेक वेळा जाहीर आभारही मानले होते. सत्ता बळकावयचा मार्ग मुसोलिनी शिवाय कोण सांगणार ? त्याने स्वत:च तो मार्ग अवलंबून जगासमोर उदाहरण घालून दिले होते. दुर्दैवाने असे असतानाही त्यांची पहिली भेट ही फार काही आनंदायी नव्हती असेच म्हणावे लागेल. ही भेट झाली १४ जून १९३४ रोजी. ज्याप्रमाणे मुसिलिनीने फ्युमेमधे आपले ब्लॅकशर्ट घुसवले होते त्याच प्रमाणे हिटलरने आस्ट्रीयामधे नाझीपक्षाच्या सभासदांनी तेथील चॅन्सेलर डॉलफस याच्या विरूद्ध बंड पुकारले होते. मुसोलिनीला आस्ट्रीया हा एक स्वतंत्र देश म्हणून पाहिजे होता कारण जर्मनी आणि इटली मधे हा एक स्वतंत्र देश सगळ्याच दृष्टीने बरा होता. (बफर स्टेट). या भेटीच्या निमंत्रणाचे मुख्य कारण ईटलीची नाराजी प्रकट करायची हे होते. मुसोलिनीने हिटलरच्या या भेटीत त्याचा पदोपदी अपमान होईल अशी पुरेपूर काळजी घेतली होती. हिटलरला मानवंदना द्यायच्या कवायतीच्या वेळी त्याने हिटलरला स्वत:ची अर्धा तास वाट बघायला लावली. रागाने फणफणणार्‍या हिटलर समोर त्याने जे सैनिक कवायतीसाठी उतरवले होते त्यांनी चुरगाळलेले गणवेष परिधान केले होते आणि त्यांनी गेले कित्येक दिवस दाढ्या केलेल्या नव्हत्या. कवायत करण्याऐवजी ते नुसतेच चालत होते. हे सगळे मुसिलिनीच्या आज्ञेनुसार चालले होते. लिडो क्लबमधील दुपारच्या जेवणांनंतर या दोन हुकूमशहांनी तेथल्याच बागेत दोन तास फेरफटका मारला. त्यावेळी बोलताना हिटलरने मुसोलिनीला माईन कांफमधील अनेक उतारे म्हणुन दाखवले तर या गृहस्थाने जांभया देत त्याचे स्वागत केले. संध्याकाळच्या समारंभात तर कहरच झाला. तो समारंभ अर्धवट सोडून मुसोलिनी हिटलरचा निरोप न घेताच चालता झाला. सकाळी हिटलरचा विमानतळावर निरोप घेताना त्याच्या मनात खात्री होती की हिटलरला योग्य तो संदेश मिळाला असेल.

पण हिटलरच्या मनात काही वेगळेच होते. दुसर्‍याच महिन्यात हिटलरने व्हिएनामधे उठाव करून सत्ता ताब्यात घेतली आणि चॅन्सेलर डॉलफसला ताब्यात घेतले. मुसोलिनीच्या मनात त्याचे काय होणार याविषयी बिलकूल शंका नव्हती. कारण त्यांची भेट झाल्याच्या दुसर्‍याच आठवड्यात हिटलरने त्याला डोईजड झालेल्या स्टॉर्म ट्रूपर्सना कसे निर्दयपणे चिरडले होते याचे उदाहरण त्याच्या स्मोर होतेच. हे करताना ज्या सहकार्‍यांनी त्याला आत्तापर्यंत मदतच केली होती अशांनाही त्याने ज्या निष्ठूरतेने यमसदनास पाठविले होते, ते बघून मुसोलिनी त्याच्या बायकोला म्हणाला होता “अत्यंत क्रूर अशा अटिला हूणपेक्षाही हा माणूस निर्दय आहे”. अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी डॉलफसच्या हत्येची बातमी मुसोलिनीपर्यंत पोहोचलीच.

ही बातमी हाती आल्यावर मात्र मुसोलिनीने त्वरित पावले उचलली. सैन्याच्या चार डिव्हिजन्स त्याने ब्रेनेर खिंडीत हलवल्या. ऑस्ट्रिया आणि ईटलीच्या सीमेवरची ही खिंड फार महत्वाची होती. त्या रात्री जर्मन सैनिकांना रणगाड्यांचा आणि सैन्यदलांच्या हालचालींचा आवाज ऐकू येत असतानाच इटालियन सैन्याने मोर्चे बांधणी केली.
“त्यांना समजू देत की इटलीची खोडी काढणे एवढे सोपे नाही” मुसोलिनी गरजला.
तेवढी धमकी पुरेशी होती. हिटलरने माघार घेतली. आज त्याची वेळ नव्हती.

त्या दिवशी रात्री त्याच्या कुटुंबाबरोबर जेवण करताना मुसोलिनीने जे वाक्य अद्गारले ते त्याच्या मुलाच्या म्हणजे व्हिट्टोरिओच्या अजूनही लक्षात आहे. मुसोलिनी म्हणाला “ मला वाटते युरोपमधील शांततेचा आज अंत झाला असे समजायला हरकत नाही. आता भाषणबाजीला काही किंमत उरली नाही. आपल्याला आता उत्तम शस्त्रास्त्रेच लागतील”

३ ऑक्टोबर १९३५ रोजी जोव्हिनेझ्झा हे फॅसिस्ट स्फूर्तीगीत गात इटालियन सैन्याने इथोपियावर आक्रमण केले. हा नुसता विस्तारवाद नव्हता तर त्यामागे आर्थिक कारणही होते. त्यावेळी इटली मधील बेरोजगारांच्या समस्येने उग्र रुप धारण केले होते आणि मुसोलिनीला सकस जमिनीची इटलीसाठी आवश्यकता वाटत होती. याच बरोबर त्याला लिग ऑफ नेशन्सलाही त्यांची जागा दाखवून द्यायची होती. (१७९५ साली विचारवंत इमॅन्युएल कांट याने त्याच्या पर्पेचुअल पीस : ए फोलॉसॉफिकल स्केच या पुस्तकात या संघटनेची कल्पना मांडली. पहिल्या महायुद्धानंतर या संघटनेचे २२ सभासद झाले. असो.)

सात महिन्यातच इथोपियाचे हे युद्ध १६०० सैनिकांचे बलिदान देऊन मुसोलिनीने जिंकले. या युद्धाने त्याने एका दगडात अनेक पक्षी मारले होते. इथोपियावर कबजा, लिग ऑफ नेशन्सला इशारा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिटलरला एक ताकीद कारण जर्मनीने या युद्धात इथोपियाला १६००० रायफल्स आणि ६०० मशीनगन्स अशी भरघोस मदत केली होती. इटलीचा ऑस्ट्रियाच्या सिमेवरचा दबाव कमी व्हावा म्हणून हे पाऊल अचलले गेले होते. अर्थात हे सगळे उघडपणे नाही हे सांगायला नकोच.

या विजयानंतर मुसोलिनीच्या भाषणात बेलगाम व्यक्तव्यं ऐकू यायला लागली. उदा. एका भाषणात त्याने ठणकावून सांगितले “शांततेचा अंकूर हा ऐंशी लाख संगिनीच्या जमिनीतच उगवू शकतो”.
हळुहळू त्याच्या मनात हिटलरविषयी ज्या कल्पना होत्या त्या बदलायला लागल्या. हिटलर हा फॅसिस्ट आहे हे उमगताच त्याने हेरॉल्ड ट्रायबूनला मुलाखतीत सांगितले “ पुढच्या वर्षी हिटलरला ऑस्ट्रीयाचे जर्मनीकरण करण्यासाठी मी आमंत्रण देणार आहे”. याच मुलाखतीत जेव्हा त्या पत्रकाराने विचारले “जर याच प्रकारे जर्मनीची लष्करी ताकद वाढत राहिली तर जगातील सगळ्या राष्ट्रांपेक्षाही ते राष्ट्र ताकदवान होईल तेव्हा इटली कुठे असेल ?”
मुसोलिनीने उत्तर दिले “ जर्मनीच्या बाजूने” यावरून त्याच्या विचारांची दिशा स्पष्ट दिसून आली. मुसोलिनीचे हे उत्तर ऐकल्यावर जगभर खळबळ उडाली. कारण आत्तापर्यंतच्या इतिहासात इटलीने नेहमीच फ्रान्स आणि इंग्लंडची बाजू घेतली होती आणि इटली, जर्मनी या दोन देशांमधले संबंध शत्रूत्व आणि अविश्वासावरच उभे होते. गंमत म्हणजे ज्या इटालियन फॅसिस्ट आधिकार्‍याचा हिटलर सगळ्यात जास्त द्वेश करे, त्याच आधिकार्‍याने मुसिलिनीला हिटलरच्या प्रभावाखाली आणण्याचे सगळ्यात जास्त प्रयत्न केले. याचे नाव होते गॅलिआझ्झो सिआनो ( किंवा चानो). हा जर्मनांचा द्वेश करायचा. याला इंग्लीश आणि फ्रेंच जास्त जवळचे वाटायचे. याने जेवढे जर्मनांना दूर ठेवायचा प्रयत्न केला तेवढा मुसोलिनी जर्मनीच्या जास्त जवळ गेला. हा मुसोलिनीचा जावई होता. ( मुलगी : एड्डा) याला डुसेलिनो या नावानेही ओळखले जायचे. वरील मुलाखतीच्या अगोदर एक वर्षच या जावयाकडे परराष्ट्र खाते सुपुर्त करण्यात आले होते. त्यावेळी पक्षातील ढुड्डाचार्य म्हणाले “इटलीला बाकीच्या राष्ट्रांशी संबंध ठेवण्यासाठी एका मुलाची निवड करायला लागली या सारखे दूर्भाग्य ते काय ?” हाही अत्यंत शहाणा होता. त्याला एका पानापेक्षा जास्त मजकूर असलेले कागद वाचायला आवडत नसे. वेळेचा अपव्यय म्हणून तो तसल्या कागदांना सरळ केराची टोपली दाखवायचा. ( याला शेवटी देशद्रोहाच्या आरोपाखाली ठार करण्यात आले. देशद्रोह म्हणजे त्याने मुसोलिनीच्या विरुद्ध मत मांडले.)
हा मुळचाच राजघराण्यातील असल्यामुळे त्याला पैशाची ददात नव्हती आणि ऐषारामी जीवनाची त्याला सवय आणि आवड होती. या नवीन परराष्ट्रमंत्र्यांची नवी धोरणे व स्वप्ने रोमच्या प्रसिद्ध गोल्फक्लबवर ठरत. त्याच्या अवती भोवती खुषमस्कर्‍यांचा कायम गराडा पडलेला असायचा. घरी तो क्वचितच जायचा कारण एड्डाने आणि त्याने आपापली आयुष्ये आपापल्या मर्जीने जागायचे एकामेकात ठरवले होते, त्यामुळे ते लग्न टिकले असे म्हणायला हरकत नाही. एड्डा दिवसभर तिच्या मित्रांच्या गराड्यात असायची आणि रात्र जुगारात घालवायची.
रंगेल सिआनोची किर्ती हिटलरपर्यंत पोहोचली याचे मुख्य कारण म्हणजे हा पठ्ठ्या मेजवान्यांमधे जर्मन बायकांचीही छेड काढत असे. एकदा तर त्याने कुठल्या बायकांना मेजवानीला आमंत्रण द्यायचे याची यादीच जर्मनीतील त्याच्या वकिलातीला पाठवली होती. हिटलर वैतागून त्याचा उल्लेख किळसवाणा माणुस असा करायचा. पण त्याने स्पेनच्या यादवीमधे हिटलरचा पाठिंबा मिळवला. एवढेच नाही तर त्याने हिटलरबरोबर एकूण ७०००० फॅसिस्ट स्पेनमधे लढायला जातील यासाठी करार केला.

हे दोन्ही हुकुमशहा आता जवळ यायला लागले होते. १९३७ साली हिटलरने मुसोलिनीला जर्मनीच्या भेटीचे औपचारीक आमंत्रण दिले.
“आपण अस्सल प्रशियन दिसले पाहिजे” मुसोलिनीने जाहीर केले आणि तीन चार शिंपी कामाला लागले. खरे तर त्याची काही आवश्यकता नव्हतीच कारण आत्ताच तो दिवसातून पाच वेळा कपडे बदलायचा आणि त्याच्या छातीवर अधिक पदकांना जागा नव्हती. पण परत सगळे नव्याने तयार करण्यात आले.

त्या पाच दिवसाच्या भेटीत मुसोलिनी जर्मनीच्या लष्करी सामर्थ्याने थक्क झाला. आयुष्यभर एक दुबळा मुलगा, माणूस म्हणून त्याने आयुष्य व्यतीत केले होते. त्याला सामर्थ्यवान माणसांचा आणि सामर्थ्याचा कायमच हेवा आणि आकर्षण वाटत आले होते. जर्मनीच्या सामर्थ्याने त्याचे डोळे दिपून गेले नसते तर नवलच ! आपल्या सामर्थ्याविषयीच्या सार्‍या कल्पना कुठेतरी प्रत्यक्षात आलेल्या तो प्रथमच बघत होता. भारावून गेला.

शेवटच्या दिवशी रात्री १० लाख जर्मन जनता त्याचे भाषण ऐकायला जमली होती.

धो धो पावसात ही जनता मुसोलिनी काय बोलतोय आची वाट पहात होती. याच भाषणात मुसोलिनीने शेवटी भारावून प्रतिज्ञा केली “ फॅसिझमला जेव्हा खरा मित्र मिळतो तेव्हा तो त्या मित्राबरोबर शेवटपर्यंत असतो”.
याचा अर्थ मुसोलिनीला आणि सिआनो जो त्याच्या मागे सावलीसारखा असायचा, त्या दोघांनाही चांगला माहीत होता. ऑस्ट्रीया जर्मनीने घशात घालायला आता त्यांची हरकत नव्हती.

सहा महिन्याच्या आतच जर्मनीने ऑस्ट्रियावर आक्रमण केले आणि त्यातील ७० लाख जनता जर्मनीमधे सामील करून टाकली. मुसोलिनीने या वेळी या विरूद्ध कसलाही आवाज उठवला नाही की सैन्य सिमेवर पाठवले नाही. त्याच्या डोक्यात या परिस्थितीचा फायदा कसा उठवता येईल हाच विचार सतत चालला होता. जर्मनीने ऑस्ट्रिया गिळंकृत केल्यावर थोड्याच दिवसात मुसोलिनीला हिटलरची तार आली “मुसोलिनी मी हे कधीही विसरणार नाही. कधीही !”

१९३८ च्या मे महिन्यात हिटलरने इटलीला दुसरी भेट दिली.

मुसोलिनीने त्याची ही भेट अविस्मरणीय ठरवण्याचे ठरवले होते. या सहा दिवसाच्या भेटीचा खर्च त्या काळात २/३ कोटी रुपये आला होता. त्यासाठी एक खास नवीन रेल्वे स्टेशन उभारण्यात आले, ज्यात हिटलरची गाडी पाचच मिनीटे थांबणार होती. रोमवरच्या सर्व महत्वाच्या इमारतींवर विद्यूत रोषणाई करणण्यात आली. त्यात ज्या वायर्स वापरण्यात आल्या त्याची लांबी असे म्हणतात की १६० कि.मी भरली होती. नेपल्समधे तर समूद्रावर जहाजांची नेत्रदीपक कवायत झाल्यावर किनारा आणि आसपासच्या टेकड्या प्रकाशात उजळून निघाल्या आणि त्यातच “हाईल हिटलर” ही अक्षरे लालभडक अक्षरात चमकू लागली.

त्याच वर्षाच्या शेवटी मुसोलिनी हिटलरच्या वंशवादाकडे झुकू लागला व त्याने याबाबतीत स्वत:ची धोरणे जाहीर केली. त्यावेळेस अर्थातच त्याने एके काळी हिटलरच्या वंशभेद करणार्‍या धोरणांवर कडवट टीका केली होती हे तो सोयिस्करित्या विसरला. त्यावेळी तो म्हणाला होता “ हिटलरने ज्यूंच्या विरूद्ध जो हिंसाचार चालवला आहे तो मानवजातीला एक काळीमा आहे. सुसंस्कृत युरोपमधे हा देश आहे हे लाजिरवाणे आहे”. बर्लिनच्या भेटीनंतर मुसोलिनीने हस्तांदोलन हे बाद ठरवून आता एकामेकांना हाईल हिटलरच्या धर्तीवर “साल्यूटो एल् ड्युसे” असे संबोधित करायचे आता शिष्ठसंमत मानले जाऊ लागले. हे झाल्यावर पोपने मुसोलिनीवर “हिटलरच्या शाळेचा बेशरम विद्यार्थी” म्हणून संभावना केली. मुसोलिनीच्या जवळच्या वर्तूळातही थोडी खळबळ माजलीच.

इथोपिया आणि स्पेनच्या यादवीयुद्धानंर इटलिच्या गंगाजळची जी वाट लागली त्यामुळे मुसोलिनीची युरोपमधे कुठल्याही प्रकारच्या युद्धाची तयारी नव्हती. त्याच वर्षी जेव्हा हिटलरचा झेकॉस्लोव्हाकिया घशात घालायचा डाव लक्षात आला तेव्हा मुसोलिनिला मधे घालून एक बेशरम तह करण्यात आला. तो तह होता म्युनिचचा तह. या तहावर सही करणारे देश होते इटली, जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स. हा तह होता झेकॉस्लाव्हियाच्या भूमीबद्दल आणि या तहात तोच देश नव्हता. या तहानुसार या बिचार्‍या देशाची ३० लाख हेक्टर जमीन, ७०% उद्योग व ८६% रसायने आणि त्यांची संरक्षक फळी जर्मनीला देऊन टाकण्यात आले.

हे झाल्यावर मुसिलिनीने बढाई मारली की “मी युरोपला युद्धापासून वाचवले” पण सहा महिन्यातच हिटलरच्या सैन्याने झेकॉस्लाव्हियाच्या सीमा ओलंडल्या आणि तो आख्खा देश घशात घातला. मुसोलिनीच्या जावयाने मुसोलिनी त्यावेळी काय म्हणाला हे त्याच्या रोजनिशीमधे लिहून ठेवले आहे “इटालियन जनता माझी टर उडवत असेल. पण एक मान्य करायलाच पाहिजे की प्रत्येक वेळी एखादा देश घशात घातला की हिटलरकडून मला एक तार येतेच”. ( म्हणजे तो मला सांगतो). पण आतली गोष्ट सिआनोलाच माहीत होती. हिटलर त्याच्या झेकॉस्लाव्हिया पादाक्रांत करण्याच्या योजनेत इतका मग्न होता की मुसिलिनीला हे कळवावे हे त्याच्या लक्षातही आले नव्हते. योगायोगाने त्याचवेळी इटलीचे कायदा मंत्री, गोअरींग बरोबर रात्रीचे जेवण करत असताना त्याला या बातमीचा सुगावा लागला तेव्हा त्याने (सिआनोने) ही बातमी मुसोलिनीला कळवलीच पाहिजे असा आग्रह धरला होता.

सिआनोने झेकॉस्लाव्हीयामधे झालेले हसे भरून काढण्यासाठी मुसोलिनीला एक युक्ती सुचवली. ती म्हणजे अल्बेनिया काबीज करायचा.

१९३९च्या गूडफ्रायडेला इटलीच्या सेना या छोट्याशा राष्ट्रात घुसल्या. काही विशेष प्रतिकार न होता हा देश इटलिच्या कब्जात आला.

सुरवातीला मुसोलिनी म्हणाला होता “ जर्मनीशी सहयोग शक्यच नाही. ईटलीतील दगडसुद्धा त्याला विरोध करतील” पण आता त्याला जर्मनीशी सहयोग आकर्षक वाटू लागला. “आपला फायदा होत असेल तर काय हरकत आहे” असे तो उघडपणॆ त्याच्या सहकार्‍यांना विचारू लागला. मे २२, १९३९ रोजी याच विचारातून या दोन देशांनी एका करारावर सह्या केल्या त्याचे नाव पहिल्यांदा ठेवण्यात येणार होते “ट्रीटी ओफ़ ब्लड” पण हे जरा जास्तच होते आहे आणि इटालियन लोकांना आवडणार नाही म्हणून ते जरा सौम्य करण्यात आले “ट्रीटी ऑफ स्टील”.

यात नेहमीच्याच अटी होत्या जशा, एकामेकांवर आक्रमण न करणे, शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण, लष्करी सहाय्य, दुसर्‍या देशाशी युद्ध झाल्यास मदत.....इ.. या तहावर सह्या होत्या सिआनो आणि रिबेनट्रॉप यांच्या, पण स्वत: सिआनोच या विरुद्ध होता. पण त्याच्या विरोधाला न जुमानता मुसोलिनीने तो पुढे रेटला. तो हिटलरच्या लष्करी सामर्थ्याने एवढा प्रभावीत झाला होता की बस्स !. या तहावर सह्या झाल्यावर आठच दिवसांनी मुसोलिनीने हिटलरला एक खलिता पाठवला त्यात त्याने त्याला लष्करी व आर्थिक तयारीला अजून कमीतकमी तीन वर्षे लागतील, व तो पर्यंत हिटलरने काही मोठी हालचाल करू नये असे बजावले होते.

पण हिटलरकडे एवढा वेळ नव्हता आणि तशी त्याला थांबायची गरजही नव्हती. त्याचे पुढचे लक्ष ठरलेले होते “पोलंड”. ट्रीटी ओफ़ स्टीलमधील कलमांचा आधार घेत मुसोलिनीने त्याला बजावले की त्याला कच्चा माल आणि अर्थिक मदत मिळाल्याशिवाय त्याने इटलीची मदत गृहीत धरू नये. त्याने लगेचच आपल्या सेनाधिकार्‍यांना कशा कशाची गरज आहे याची यादी सादर करायला सांगितली.
सिआनोने मुसोलिनीला सल्ला दिला “जे काही आकडे तुम्हाला मिळतील ते सरळ दुप्पट करा.” जी मागणी करण्यात आली ती जवळजवळ १७० लाख टन युद्धसामग्री आणि इतर कच्च्यामालाची. हे एवढे सामान इटलीला पाठवण्यासाठीच एक वर्ष लागले असते. नाईलाजाने हिटलरने एकट्यानेच पुढे जायचे ठरवले. १ सप्टेंबरला त्याने पोलंडच्या विरूद्ध ब्लिट्झक्रीग आमलात आणले आणि दुसरे महायुद्ध चालू झाले.

जर्मन सैन्याने पोलंडची सीमा ओलांडली आणि सिआनोच्या टेबलावर मुसोलिनीची तार येऊन थडकली.
“इटली जर्मनीबरोबर या युद्धात उतरेल” हे वाचून सिआनो म्हणाला
संपलं सगळ”......................

क्रमशः.....

जयंत कुलकर्णी.

इतिहासकथासमाजलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

छान माहिती. इतकी डिट्टेलवार माहिती तर इतिहासाच्या शिक्षकांनी कधी सांगितली नाही आणि सांगण्याचे कष्टही घेतले नाहीत.

- पिंगू

प्रचेतस's picture

5 Feb 2012 - 12:57 pm | प्रचेतस

सहमत आहे. हिटलर बद्दल बरीचशी माहिती मिळत होती पण मुसोलिनी मुग्धच राहिला होता.

सुहास झेले's picture

5 Feb 2012 - 9:44 am | सुहास झेले

निव्वळ अप्रतिम....

मुसोलिनीबद्दल मराठीत इतकी डिटेलवार माहिती लिहिणारे आपण एकमेव यात काडीमात्र शंका नाही....पुढल्या भागाची वाट बघतोय, जास्त वेळ लावू नका :) :)

तिमा's picture

5 Feb 2012 - 10:51 am | तिमा

या लेखमालेचे एक पुस्तक होऊ द्या. सर्व लेख वाचतो आहे. जयंतराव, तुमची अभ्यासू वृत्ती कौतुकास्पद आहे.

राजघराणं's picture

6 Feb 2012 - 1:39 pm | राजघराणं

एक पुस्तक होऊ द्या

प्रास's picture

5 Feb 2012 - 11:36 am | प्रास

छान माहिती मिळतेय.

वरती पिंगू म्हणतोय तसं आमच्या इतिहासाच्या शिक्षकांनी असं माहितीपूर्ण शिकवलं असतं तर इतिहासाच्या अभ्यासातली गोडी वाढीला लागली असती.

पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

मन१'s picture

5 Feb 2012 - 12:25 pm | मन१

मालिका मस्त सुरु आहे. दरवेळी पुधला भाग कधी येइल ह्याची आम्ही वाट पहात असतो, हेच मालिकेचे यश.
पण ह्या महायुद्धाबाबत मला नेहमीच काही शंका पडतात त्या अशा:-

पहिल्या महायुद्धात कितीही नाही म्हटले तरी इटली हे विज्त्या देशांपैकी तर जर्मनी जित्/पराभूत देशांपैकी होते.
युद्धादरम्यान जे आर्थिक नुकसान, पायाभूत सुविधांची नासाडी व्हायची ती सगळ्यांचीच झाली. अगदि ब्रिटन्-फ्रान्स्-रशिया-इटाली-जर्मनी-तुर्कस्थान सगळ्यांचीच.
पण युद्धानंतरही जर्मनीवर जबरदस्त कर लावला गेला व आख्खी जर्मन व्यवस्थाच पंगू बनवली जाउ लागली.
अशा गलितगात्र देशात १९३३-३४ मध्ये हिटलरला सत्ता मिळाली. तरीही दुसर्‍या महायुद्धाला पुन्हा उभे राहण्याइतकी ताकद जर्मनी कडे कशी आली? तीही फक्त १९३३ ते १९३८ अशा चार-पाच वर्षात?

बरे, कार्यकाल म्हणावा तर मुसोलिनीलाही हिटलरहून ह्याच्या चुअपट तरी मिळाला होता. १९२० च्या दशकात तो सत्तेवर आलेला. मग इटालीची काहिच तयारी कशी काय झाली नाही? खुळखुळा झालेला जर्मनी एकाएकी उभा राहिला तरी ठिक्ठाक असणारे इटाली मात्र कधीच का प्रगती करु शकले नाही?

इथिओपिया आणि अ‍ॅबिसिनीया एकचा का? मी अ‍ॅबिसिनीयावर फॅसिस्ट इटालीने हल्ला केल्याचे ऐकले होते.
आणि त्यात त्याने विषारी वायूही वापरला होता.

इथोपियाला १६००० रायफल्स आणि ६०० मशीनगन्स
आंतरराष्ट्रिय राजकारण्यातल्या अशा बातम्या आणि किस्से भयंकर रंजक वाटतात. भांडण कुणाअचे, भांडताहेत कुथे, वाटाणी कशाची होती आहे, कशाचा कशाला पत्ता नाही. युरोपीय देशांच्या भाडनात फार मोठी युद्धे आफ्रिकन भूमीवर लढली गेली. भारतीय व आशियायी सैनिक घेउन!!

इटलीने नेहमीच फ्रान्स आणि इंग्लंडची बाजू घेतली होती
ह्याला भू-राजकिय कारणे होती.(geopolitical) फ्रान्स आणि इंग्लंडने जवळपास सगळ्याच खंडांट कुठे ना कुठे वसाहती व समृद्ध भाग ताब्यात घेउन त्यांच्या रक्तावर आपल्या समृद्धीचे पोषण करण्यास सुरुवात केली होती.

जर्मनी-इटाली ह्यांच्या एकीकरणाची प्रक्रिया, एक्-देश म्हणून उभे राहण्याची अस्मिता(identity) हीच मुळात १८५० च्या आसपास सुरु होती. १९ व्या शतकाच्या शेवटी कुठे ती पूर्णत्वास गेली. तोवर ते विभाजित्,विखुरलेल्या सामंतांचा भूभाग होते. एक राश्ट्र नाही.
जर्मनी(पूर्वीचा प्रशिया)-इटाली हे एकूणातच वसाहतवादाच्या स्पर्धेत इतक्या उशीरा उतरल्याने त्यांना बाहेरच्या खंडातील मोक्याच्या जागा इंग्लंड-फ्रान्स सारख्या प्रस्थापित सत्तांना तिथून उख्डून हाती घेणे शक्य नव्हते. मग करणार काय? स्वतः इटाली व जर्मनीचे शस्त्र सामर्थ्य तर सातत्याने १९व्य शतकाच्या शेवटपर्यंत वाढत आलेले होते.
प्रचंड हाती आलेले साअमर्थ्य तर गप्प बसू देत नाही. आजूबाजूच्या भूभागावर डोळा ठेवून होते. हा भाग बाल्कन देशांचा होता. दोघांचे हितसंबंध इथे आड आले. दोघांनाही बल्कन भूभागातील देशांवर सत्ता हवी होती.
जर्मनी तुलनेने बराच प्रबळ होता. असला मोक्याचा भाग इटालीपासून बळकावून बलाढ्य झालेला जर्मनी कुणाही बड्या देशांना नको, म्हणून त्यांनी तुलनेने दुबळ्या इटालीला छुपे समर्थन सुरु ठेवले. ह्या वादाबरोबरच इताअरही घटकांमुळे पहिले महायुद्ध पेटले. इटाली इंग्लंड्-फ्रान्स सोबत होती ती अशी.

स्पेनच्या यादवीत जनरल फ्रँकोला मदत करूनही हिटलर व मुसोलिनीला काहिच विशेष फाय्दा झाला नाही. ऐन युद्धात स्पेनचा फ्रँको तट्स्थ राहिला.

इथोपिया आणि स्पेनच्या यादवीयुद्धानंर
तेच ते. तीच शंका आहे, अशी गंगाजळीची वाट लागण्याची समस्या इटालीलाच का आली? पोलंडमध्ये युद्ध केल्यावर काही जर्मनव्यवस्था लगेच कोसळली नाही.

झेकॉस्लोव्हाकिया घशात घालायचा डाव
हा एक प्रसिद्ध किस्सा आहे. ह्या काळात हिटलरने नुसती दमबाजी करत ऑस्ट्रिया,झेकोस्लोवाकिया असे जे देश घशात घातले ते निव्वळ धमक्या देत. ह्यामुळे त्याने warfare politics ह्या एका नव्याच शास्त्रला जन्म दिला. आजही रजकारण्,युद्धशास्त्र अशा विषयातला एक आख्खा धडा केवळ ह्याच गोष्टीबद्द्ल असतो. प्रत्यक्ष हल्ला न करताच पूर्ण फायदा घ्यायचा.(खरोखर झेक्-जर्मनी अशी लढाइ जुंपली असती, तर जर्मनीला बरेच महागात पडले असते, कारण होते अभेद्य झेक तटबंदी. तिने न लढताच नांगी टाकली.)

या तहावर सही करणारे देश होते इटली, जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स.
ह्यामध्ये दुर्लक्षित करण्यात आल्याने कम्युनिस्ट रशिया प्रमुख स्टेलिन दुखावला गेला, व इंग्लंद्-फ्रान्स पाअसून अधिक्च दूर गेला. म्हणूनच त्याने पोलंडवरील हल्ल्याच्या वेळेस कुप्रसिद्ध अदृश्य मदत जर्मनीला केला, पोलंडचे जर्मनीपासून रक्षण करण्याच्या नावाखाली!

हा तह होता युगोस्लाव्हियाच्या भूमीबद्दल
युगोस्लाविया का झेकोस्लोवाकिया मालक? टायपो वाटतो आहे. युगोस्लावियावर नंतर दीड्-दोन वर्षांनी जर्मनीने प्रत्यक्ष हल्ला केला होता. तो काही तहात मिळालेला देश नव्हता.

जयंत कुलकर्णी's picture

6 Feb 2012 - 12:41 pm | जयंत कुलकर्णी

चूक दुरूस्त करत आहे. धन्यवाद ! एका दुसर्‍या लेखात सारखे युगोस्लाव्हिया लिहावे लागत होते त्यामुळे.........

डॉ.श्रीराम दिवटे's picture

5 Feb 2012 - 12:54 pm | डॉ.श्रीराम दिवटे

मन१ यांनी उपस्थित केलेल्या उपरोक्त शंकांची व प्रश्नांची उकल होऊ शकेल काय?

जयंत कुलकर्णी's picture

6 Feb 2012 - 1:22 pm | जयंत कुलकर्णी

सगळे भाग वाचलेत (एकदम) तर कदाचित आपल्याला उत्तर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही..

रणजित चितळे's picture

6 Feb 2012 - 10:53 am | रणजित चितळे

खूप छान माहिती दिलीत. मस्त वाटले लेख वाचून. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

जाई.'s picture

6 Feb 2012 - 12:17 pm | जाई.

माहितीप्रुर्ण लेखन

अन्या दातार's picture

6 Feb 2012 - 12:52 pm | अन्या दातार

चार्ली चाप्लिनच्या "द ग्रेट डिक्टेटर" मधील काही प्रसंग या भागात उलगडले. विशेषतः ऑस्ट्रियाबद्दल व मुसोलिनीची जर्मनी भेट.
आता पुन्हा एकदा पहायला हवा :)

वाहीदा's picture

6 Feb 2012 - 1:01 pm | वाहीदा

___/\____

वाचनखुण साठविली आहे

अप्रतिम ...

पुढील भागाच्या प्रतिक्षेत ..

लिहित रहा...वाचत आहे.

इष्टुर फाकडा's picture

6 Feb 2012 - 3:09 pm | इष्टुर फाकडा

भाग. आत्ता प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाल्यामुळे उत्कंठा वाढून राहिली आहे. लवकर येउद्या !

जयंत कुलकर्णी's picture

7 Feb 2012 - 8:42 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !