भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४
भाग - ५
भाग - ६
भाग - ७
भाग - ८
भाग - ९
भाग- १०
मुसोलिनी, क्लॅरेट्टा आणि इतर १५ जणांची प्रेते त्यांनी त्याच गाडीत टाकून मिलान शहरात आणली आणि रात्रीच्या अंधाराचा फायद घेत त्यांनी ज्या चौकात त्यांच्या कॉम्रेडसना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते, त्याच चौकात, पिआत्झाले लोरेटोच्या चौकात आणून फेकली. खरंच फेकली.
दुसर्या दिवशी बाहेर पडलेल्या नागरिकांना तेथे थोड्याफार बघ्यांची गर्दी दिसली. कोणीतरी मुसोलिनीचा मानदंड त्याच्या हातात आडवा ठेवला होता आणि त्याचे मस्तक क्लॅरेट्टाच्या पांढर्या शुभ्र ब्लाऊजवर विसावले होते. बाजूला वार्ताहर त्याचे फोटो घेण्यात गुंग झाले होते. एका शहाण्याने मुसोलिनीच्या चेहर्यावर उजेड पडावा म्हणून त्याचे डोके जरा तिरपे केले आणि त्याच्या हनुवटीच्या खाली एका बंदूकीचा आधार दिला.
एका अमेरिकन वार्ताहराने तेथे हजर असलेल्या एका बंदूकधारी कम्युनिस्ट बंडखोराला विचारले “मुसोलिनीचा जर इटालियन्स एवढा तिरस्कार करत असतील तर त्याला त्याच्या प्रेयसीबरोबर शेवटची रात्र तरी कशाला घालवू दिली ?”
त्या माणसाने आपले हात हवेत फेकले आणि तो म्हणाला “शेवटी आम्ही सगळेव इटालियन्च आहोत ना !” याला संदर्भ होता इटालियन रंगेलपणाचा.
येथपर्यंत सगळे ठीक होते. लोक येत होते बघत होते कुजबुजत होते, काही जण तर रडतही होते. तेवढ्यात एका माणसाने एक अत्यंत घृणास्पद कृत्य केले. त्याने मुसोलिनीच्या प्रेताच्या मस्तकावर एक लाथ झाडली. या येथून इतिहासातील माणूसकीला काळिमा लावणारे एक काळे नाट्य चालू झाले आणि मुसोलिनीच्या शत्रूंनीही शरमेने मान खाली घातली. जमलेल्या लोकांनी त्या सगळ्या प्रेतांभोवती फेर धरून नाचायला सुरवात केली. एका स्त्रीने आपले पिस्तोल काढले आणि मुसोलिनीच्या त्या लोटांगण घातलेल्या प्रेतावर पाच गोळ्या झाडल्या. “लढाईत मृत्यू पावलेल्या माझ्या ५ मुलांच्या बदल्यात या पाच गोळ्या” असे म्हणत ती जमिनीवर थुंकली.
एका माणसाने मुसोलिनीचा शर्ट फाडला आणि त्याचा पेटता बोळा करून त्याने तो त्याच्या उघड्या तोंडात घालायचा प्रयत्न चालवला. सगळ्यात भीषण अशी घटना नंतर घडली, जी जगात आत्तापर्यंत कोणी बघितली नव्हती ना ऐकली होती. उपस्थित बायकांनी आपापले स्कर्ट मुसोलिनीच्या चेहर्यावर पसरले आणि त्याच्या तोंडात त्या चक्क मुतल्या.
तेथे हजर असलेल्या कम्युनिस्टांच्या तुकडीच्या प्रमुखाने त्याच्या सैनिकांना ती गर्दी हटविण्यासाठी हवेत गोळीबार करायला सांगितला पण त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही त्या हिंसक जमावाने त्या प्रेतांना तुडवले आणि विद्रूप केले. ३०० सैनिकांनाही हा जमाव आवरत नव्हता. जमावाने त्यांच्याच कपड्याच्या फाडून चिंध्या केल्यावर त्यांनी तातडीने माघार घेतली. त्यांनी आग विझवायच्या बंबाला बोलवून जमावावर पाण्याचा जोरदार मारा केला पण ती सुडाची व तिरस्काराची फडफडणारी ज्वाला काही ते पाणी विझवू शकले नाही. तो बंबही मागे नेण्यात आला.
एवढी विटंबना कमी होती की काय म्हणून त्यांनी ती सगळी प्रेते उलटी केली आणि तेथेच एक उध्वस्त झालेला पेट्रोलपंप होता त्याच्या तुळयांना टांगली. पहिल्यांदा वर गेला मुसोलिनी, त्यानंतर क्लॅरेट्टा. क्लॅरेट्टाचा स्कर्ट उलटा होऊन तिचे सर्व शरीर उघडे पडले. एकाला लाज वाटून त्याने तो स्कर्ट एका पट्ट्याने तिच्या पायाला बांधला. तिचे गोरेपान पाय बघून एकजण ओरडला “ काहीही म्हणा हिचे पाय मात्र सुंदर होते”.....
तेवढ्यात तेथे मुसोलिनीचा एक जुना सहकारी स्ट्रासी याला तेथे आणण्यात आले. तो बिचारा राजकारणातून दोन वर्षापूर्वीच बाहेर पडला होता. त्याला मुसोलिनीचे प्रेत दाखवल्यावर त्याने मोठ्या धैर्याने त्या प्रेताला सॅल्यूट केला. ते बघितल्यावर त्याची तेथेच हत्या करण्यात आली आणि त्याचे प्रेतही मुसोलिनीच्या शेजारी टांगण्यात आले.
मुसोलिनी मेला. ही बातमी मिलानमधून सार्या इटलीत पसरली आणि तेथून जगभर. मुसोलिनीची विटंबना झाली तेव्हा हिटलर त्याच्या शेवटच्या बंकरमधे इव्हा ब्राऊन बरोबर रहात होता त्यालाही ही बातमी कळालीच. रशियाचे रणगाडे फक्त अर्धा मैलावर आग ओकत होते. त्याचा विश्वासू साथीदार हिमलर दोस्तराष्ट्रांबरोबर बोलणी करतोय हीही धक्कदायक बातमी त्याला त्याच सुमारास समजली. त्याच रात्री त्याने सगळ्यांचा निरोप घेतला आणि आपली आणि इव्हा ब्राऊनची या जगातून प्रस्थान ठेवण्याची तयारी चालू केली.
चर्चिलला ही बातमी मिळाली तेव्हा तो क्लबमधे होता. ही बातमी कळताच तो त्याच्या आलेल्या पाहुण्यांकडे धावला आणि ओरडला “ते रानटी जनावर मेले ! मेले !” पण जेव्हा त्याला त्या विटंबनेची बातमी मिळाली तेव्हा त्याने त्या प्रकरणाच्या सखोल चौकशीचा आदेश दिला.
जनरल आयझेनहॉवर दोस्त राष्ट्रांच्या सेनेच्या एकत्रीत मुख्यालयात होते. त्यांना ही बातमी मिळाल्यावर ते उद्गारले “ भयंकर ! भयंकर शेवट”.
रॅशेल मुसोलिनीलाही अटक करण्यात येऊन तिला स्त्रियांच्या तुरुंगात डांबण्यात आले. तिला तिच्या दोन मुलांपासून तोडण्यात आले त्याचे तिला खूपच दु:ख झाले. तिचा तो दिवस फारच भयंकर गेला. बाहेर एक माणूस यादीतील नावे वाचत होता आणि एक नाव वाचून झाल्यावर बंदूकीची फैर झडत होती. तिला मुसोलिनीच्या हत्येची बातमी मिळाली होती पण आता ती सर्व सुखदु:खाच्या पलिकडे गेली होती.
दुपारी २ वाजता अमेरिकन कर्नल पोलेट्टीने इटलीच्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला संपर्क प्रस्थापित केला. इटालियन बंडखोरांचा कमांडर फेरूशिओ पारी याच्याशी ही भेट झाली. पहिले अभिवादन झाल्यावर त्याच्या मनात जे खदखदत होते ते बाहेर पडले. “फारच अमानूष आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य. याने आमच्या चळचळीचे कधीही न भरून येणारे नुकसानच होणार आहे.”
त्याचे सांत्वन करत पोलेट्टी म्हणाला” जे झाले ते झाले. पण मी येथे आलोय ते ती सगळी प्रेते ताबडतोब खाली उतरवा हे सांगण्यासाठी आणि मला हे परत दिसले नाही पाहिजे हा माझा हुकूम समज.”
“पण त्याला कुठे घेऊन जाऊ आता ?” पारीने विचारले.
“आमच्याकडे अमेरिकेत शवगृहे असतात असे काही नाही का तुमच्या येथे ?
“आहे एक बेवारस प्रेतांसाठीचे”
“ठीक आहे. ती प्रेते तिकडे नेऊन ठेवा आणि त्या प्रेतांना कोणीही हात लावू नका कारण युद्ध आता संपले आहे. त्याची कसलीही विटंबना करू नका, कसलीही”
मुसोलिनीची समाधी
समाप्त.
रॅशेल : ही नंतर तुरूंगातून सुटली आणि हिने एक आत्मचरित्र लिहिले. तिच्या मुळ गावात ती एक हॉटेल चालवत होती. ती तेथे स्वत: हाताने लोकांना पिझा बनवून द्यायची. हिला एक मुलगी व तीन मुले. हिनेच मुसोलिनीचे अवशेष दफनासाठी नंतर ताब्यात घेतले
व्हिट्टिरिओ : हा जेव्हा मुसोलिनीला पहिल्यांदा अटक झाली तेव्हा जर्मनीत पळून गेला होता. जेव्हा मुसोलिनीला सोडवून जर्मनीत आणले होते तेव्हा हा जर्मनीत होता पण बापाला भेटला नाही असे म्हणतात. युद्धा नंतर उत्तर इटलीमधे याने फॅसिस्ट पुढार्यां च्या शरणागती बाबत बरेच काम केले. हा त्यानंतर नाहीसा झाला.
रोमॅनो : हा राजकारणात कधीच नव्हता. याची मुलगी नंतर इटालियन राजकारणात आली. हा एक चांगला पिआनिस्ट होता.
एड्डा : ही नंतर काउंटेस म्हणून आरामात जगली.
बेलिनी : हाही इटलीच्या राजकारणात बराच पुढे गेला. त्यानेही एका पुस्तकात मुसोलिनीला पकडले त्याची हकीकत लिहिली आहे.
वॉल्टर : याने मुसोलिनीला मारले असे म्हणतात. पण यात मतभेद आहेत. हा नंतर इटलीच्या लिकसभेमधे निवडून गेला आणि एका तेल कंपनीतून मोठ्या अधिकाराच्या पदावरून निवृत्त झाला. काही वर्षापूर्वीच तो मेला.
स्कोर्झेनी : याला दोस्त सैन्याने पकडल्यावर त्याला अमेरिकन सैन्याने पळून जायला मदत केली. याला कारणे दोन. काही म्हणतात याच्याकडे चर्चीलने मुसोलिनीला लिहिलेली स्फोटक पत्रे होती आणि दुसरे कारण म्हणजे अमेरिकेने जी काही माणसे अमेरिकेला नेली त्यात एक जनरल गेलेन नावाचा होता. त्याने CIAच्या उभारणीस वाहून घेतले होते. या माणसाने याचा मध्यपूर्वेत वापर केला. स्कोर्झेनी इजीप्त, लिबीया, इराक या देशात सल्लागार म्हणून काम करत असे म्हणतात.
मित्रहो, या दहाव्या भागाबरोबर मुसोलिनीची हकीकत संपली. आपल्याला आवडली असेल असे गृहीत धरतो.
BBye !
जयंत कुलकर्णी.
ता.क. वल्ली आणि अन्या डॉन यांनी ही लेखमालिका संपल्याची कृपया नोंद घ्यावी आणि माझ्या पार्टीची तयारी करावी. :-)
प्रतिक्रिया
2 Mar 2012 - 7:22 pm | इरसाल
तुमचे लिखाण म्हणजेसुद्धा एक पर्वणीच आहे.
संपुर्ण लेखमाला अतिशय आवडली.
2 Mar 2012 - 7:28 pm | मी-सौरभ
या पार्टीरुपी कट्ट्याला हजेरी लावल्या जाईल.
ही मालिकाही वाचनीय होति हे नक्किच
2 Mar 2012 - 7:29 pm | यकु
लिखाण झपाटून केले आहे.
त्या झपाटलेपणास सलाम.
फोटो अंगावर येत आहेत.
विटंबना कुणाचीही, कधीही झालेली असो, ती पाहवत नाही.
3 Mar 2012 - 1:35 am | मोदक
>>>विटंबना कुणाचीही, कधीही झालेली असो, ती पाहवत नाही.
खरं आहे यशवंता.. मी वाचलेल्या एका लेखात क्लॅरेट्टाच्या देहाबरोबर काय काय प्रकार झाले ते ही लिहीले होते, त्यावेळी विश्वास बसला नव्हता पण आता हे सगळे वाचून अक्षरशः सुन्न झालोय.
कांही गोष्टी आपल्याला माहीत नसतात तेच किती बरे असते.. :-(
2 Mar 2012 - 7:55 pm | प्रास
एका वाचनीय लेखमालेचा हा अन्त नव्हे, ही तर सुरूवात आहे इतिहासाला योग्य प्रकारे जाणण्याची.
मरणान्ते वैराणि। हा विचार कित्येक वेळा भावनेच्या भरात विसरला जातो. सामान्य जनतेच्या भावनांचही एक आंदोलन असतं. ते एकदा का वरच्या मार्गाने जाऊ लागलं की सर्वोच्च बिंदूला प्राप्त केल्याशिवाय पुन्हा खाली येतंच नाही. मुसोलिनीबद्दलच्या तत्कालीन इटालियन जनतेच्या तिरस्काराची भावना अशीच सर्वोच्च बिंदूला टेकली आणि त्या दरम्यान अभूतपूर्व अशा विटंबनेच्या घटना घडल्या.
घडलं ते वाईटच घडलं आणि ते या लेखात ज्या छायाचित्रांच्याद्वारे समोर आलं त्याने त्या गोष्टीचं गांभीर्य आणखीच अधोरेखित केलं.
जयंतरावांचे या उत्कृष्ट लेखमालेबद्दल मानावे तितके आभार कमीच आहेत तरीही ते मानणं आवश्यक आहे.
2 Mar 2012 - 8:15 pm | मोदक
!!..स्टँडींग ओवेशन..!!
2 Mar 2012 - 9:22 pm | टिवटिव
होय...
!!..जयंतरावांना स्टँडींग ओवेशन..!!
2 Mar 2012 - 8:33 pm | प्रचेतस
अप्रतिम लेखमाला आणि भीषण शोकांतिका.
पर्ल हार्बरवरच्या विस्तृत लेखमालेची आता तुमच्याकडून अपेक्षा करत आहे.
पार्टीला कधी भेटायचं बोला. तयार आहोतच. :)
27 Apr 2013 - 6:58 pm | जयंत कुलकर्णी
वल्ली पर्ल हार्बर्वर लिहायला चालू करायच्या अगोदर वाटले तुला जरा आठवण द्यावी...........:-)
28 Apr 2013 - 6:36 am | प्रचेतस
धन्स काका.
आता पर्ल हार्बर लवकर येउ द्यात.
28 Apr 2013 - 6:57 am | जयंत कुलकर्णी
अरेपण पार्टीचे काय ......? ठीक आहे पर्ल हार्बरनंतर बघू..........:-)
2 Mar 2012 - 8:57 pm | इष्टुर फाकडा
पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि शतशः धन्यवाद.
2 Mar 2012 - 9:07 pm | मन१
पुन्हा वाचली.
अंगावर काटा आला.
असे होउ नये असेही वाटले.
2 Mar 2012 - 9:29 pm | प्राजु
अतिशय भयंकर विटंबना!
लेखमाला खूप आवडली.
अभिनंदन!!
2 Mar 2012 - 11:42 pm | अर्धवटराव
एक सुंदर लेखमाला वाचल्याचा आनंद आणि एका विक्षीप्त माणसाचा एव्हढा वाईट अंत बघुन आलेले औदास्य ..
तुफान लेखणी आहे जयंतरावांची.
अर्धवटराव
2 Mar 2012 - 11:59 pm | पिंगू
सुंदर लेखमाला.. पण इतकी भीषण विटंबना.
काका तुमच्या चर्चिलवरील लेखमालेची वाट बघतोय..
- पिंगू
3 Mar 2012 - 12:01 am | कवितानागेश
उत्तम लेखमाला.
पण हे असे सगळे बघवत नाही. :(
3 Mar 2012 - 12:57 am | सुहास झेले
निव्वळ अप्रतिम लेखमाला... तुम्ही ही लेखमाला पूर्ण केलीत, त्याबद्दल शतशः आभार जयंतकाका !!!
(पार्टीला यायला उत्सुक) सुझे :) :)
3 Mar 2012 - 8:37 am | ५० फक्त
उत्तम माहिती,
हा असा इतिहास अगदी थोडक्यात अन त्या व्यक्तीचे असे फोटो जर चौकात लावले तर सध्याच्या सत्ताधा-यांची हाव थोडी कमी होईल असा एक आशावाद मनात बळावतो आएह.
3 Mar 2012 - 10:10 am | मन१
आशावाद भाबडा आहे हे नम्रपणे सांगू इच्छितो.
सत्ताधार्याला हटवून विरोधक्/शत्रू हा जेव्हा खुर्चीवर येतो, तेव्हा तो काही कमी हरामखोर असतोच असे नाही.
किंबहुना reaction म्हणून तो अधिकच क्रूर असतो.
शोषित हा संधी मिळताच शोषक बनतो हे मानवी स्वभावाचे ढोबळ वर्णन.
रशियात २०व्या शतकात झारच्या अत्याचारांनी वैतागलेल्या लोकांनी कम्युनिस्ट क्रांतीला पाठिंबा दिला; तो केवळ झारलाही लाजवेल असा अनियंत्रित सत्तेचा क्खेळ पाह्ण्यासाठी.
"नाडलेल्यांचा प्रतिनिधी" बनलेल्या माओने तथाकथि दुष्ट चीनी सरंजामदार, आक्रमक जपानी ह्याहून कैक पट (अगदि काही कोटी) लोकांचे प्राण विनाकारण घेत रक्ताच्या सड्याचा नंगानाच घातला.
तस्मात्, काहीही झाले तरी मानवी मनाअचे मूळ काही सहजासहजी बदलत नाही ही फ्रॉइडची शिकवणची खरी.
3 Mar 2012 - 10:07 am | प्यारे१
हॅट्स ऑफ... जयंतराव!
फोटोज नका ठेवू ते प्लीज. बघवत नाहीत. (वैयक्तिक मत)
3 Mar 2012 - 1:25 pm | जयंत कुलकर्णी
मा़झ्याही मनत हा विचार आला होता पण मग मी ते मुद्दाम ठेवले. इतिहासात आपण काय ढवळाढवळ करायची ? आणि माझी "सही" हि वाचा फार महत्वाची आहे ती. आणि ती हे लिहिण्या अगोदरपासून आहे.
3 Mar 2012 - 1:53 pm | अन्या दातार
चला, संपली ब्वा एक लेखमाला. इतके सुंदर लेखन परत कधी वाचायला मिळणार हे माहिती नाही, पण तूर्तास तो विचार नाही करत.
इतिहास उलगडण्याची हातोटी वाखाणण्याजोगीच आहे. खरंच हिटलर, मुसोलिनी, स्पिअर, चर्चिल या सर्वांच्या लेखमाला एकत्र करुन जर पुस्तक निघत असेल तर बघाच जयंतराव. लोक क्रमिक पुस्तकं फेकून देतील कचर्यात.
6 Mar 2012 - 7:15 pm | तिमा
जयंतराव,
सर्व व्यक्तिमत्वे एका पुस्तकात आली तर फारच चांगले होईल.
लेखमाला अवर्णनीय! शेवट मात्र भयानक. शोषित आणि शोषक यांचा हा खेळ या पृथ्वीतलावर माणूस नांवाचा प्राणी आहे तोपर्यंत चालूच राहील.
3 Mar 2012 - 6:44 pm | चैतन्यकुलकर्णी
सावरकरांनी मुसोलिनीच्या चरित्रापासून प्रेरणा घेतली होती असे वाचल्याचे आठवते. सावरकरांना त्यावेळी मुसोलिनीबाबतची वस्तुस्थिती कळाली असती तर कदाचित त्यांनी त्याचे समर्थन केले नसते.
लेखमाला उत्तम झाली आहे. त्याप्रमाणेच 1857 च्या भारतीय स्वातंत्र्यसमराविषयी वाचण्यास उत्सुक आहे.
3 Mar 2012 - 6:48 pm | यकु
आँ?????
नक्की काय?
मॅझिनी हे नाव आठवून पहा बरं.
4 Mar 2012 - 10:41 am | llपुण्याचे पेशवेll
छान लेखमाला .. आवडली. फारच. शेवटच्या भागातले प्रेतांचे फोटो आणि विटंबनेचा वॄत्तांत भयानकच. शहारा आणणारी.
7 Mar 2012 - 3:21 pm | गणेशा
अतिषय सुंदर लेखन ...
शेवटचे ४ भाग आजच वाचले ..
निव्वळ अप्रतिम .
15 Jun 2012 - 4:47 pm | अन्तर्यामी
मि तुमचे सर्व भाग वाचले....
वाइट ह्या गोश्टिचे वाट्ले कि तुम्हि नान्याचि १ बाजु मान्डलि फक्त.. :(:(:(
15 Jun 2012 - 5:47 pm | जयंत कुलकर्णी
मी जे झाले ते लिहिले आहे. आपल्याला दुसरी बाजू माहीत असेल तर ती जरूर मांडावी. स्वागत आहे. आपल्या एका वाक्याच्या प्रतिक्रियेत काही समजत नाही.
27 Apr 2013 - 7:06 pm | विसोबा खेचर
केवळ संग्राह्य...!
28 Apr 2013 - 10:22 pm | मुक्त विहारि
आवडले..
28 Sep 2015 - 1:06 pm | स अर्जुन
जबरदस्त आणी तितकेच भयानक सुद्धा
खुप आवडले..... !!!१
8 Jan 2021 - 3:55 pm | टर्मीनेटर
सलग वाचून काढली आज हि मालिका. मुसोलिनी बद्दल मराठीत इतकी सविस्तर माहिती मला अजून पर्यंत वाचायला मिळाली नव्हती.
ह्या माहितीपूर्ण मालिकेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
18 Oct 2023 - 7:58 pm | diggi12
सर
इटलीच्या राजघराण्याचे पुढे काय झाले?