मुसोलिनीचा उदयास्त भाग - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Jan 2012 - 3:36 pm

भाग - १
भाग - २
मुसोलिनीवर सगळ्याप्रकारचे गुन्हे दाखल होते. त्यातल्याच एका गुन्ह्याच्या वेळी काढलेला हा फोटो -

मुसोलिनीने भाषण चालू केले आणि गोंधळ अजूनच वाढला. ओरडता ओरडता ते वेडे लोक त्याच्या रक्ताची मागणी करू लागले. मुसोलिनीचे नशीब थोर म्हणून ते थोडावेळ थांबले.
“तुम्ही या बुर्ग्ज्वा न्यायाधिशांपेक्षाही नीच आहात. हे मला माझी बाजू मांडायला तरी संधी देत आहेत. तुमचे काय ? या लढाईत जर मी आपल्याला साथ देऊ शकत नाही......
“हो ! हो! नाहीच देऊ शकत !” जमावाने तेवढ्याच तिटकार्‍याने उत्तर दिले.
“तर मग मला तुम्ही तुमच्या पार्टीतून काढून का टाकत नाही ? पण मला माझी बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे पण त्या अगोदर माझ्यावरचे आरोप मला कळले पाहिजेत. मी असाच सुळावर चढणार नाही !’” मुसोलिनीने त्या हिंसक जमावाला ठणकावून सांगितले आणि तेथे शांतता पसरली.
“माझ्या नैतिक जबाबदारीबद्दल हे सगळे असेल तर मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.
तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही माझा नाश करू शकाल तर लक्षात घ्या, ते तुम्हाला शक्य नाही. तुम्ही माझा द्वेश करत आहात याचे कारण तुम्ही अजूनही माझ्यावर प्रेम करता..... तुमच्या हातून माझा नाश शक्य नाही. गेली बारा वर्षे मी सोशॅलिस्ट पार्टीसाठी जे काही केले आहे ते माझी समाजवादी तत्वावरची अढळ निष्ठा सिद्ध करण्यास पुरेशी आहे. ते माझ्या रक्तातच आहे. माझ्या आणि तुमच्यात जे मतभेद आहेत ते एवढे फालतू नाहीत. आपल्या पार्टीमधेच हे मतभेद आहेत आणि त्यामुळे त्याचे तुकडे पडण्याची वेळ आली आहे. अमिलकारे चिप्रिआनींनी तोंडी आणि लेखी प्रकटन प्रसिद्ध केले आहे की या सत्तराव्या वर्षी शक्य असेल तर ते युरोपियन सैनिकी प्रतिक्रांतीच्या विरुद्ध आत्ता एखाद्या आघाडीवर खंदकात राहणे जास्त पसंत करतील.
अमिलकारे चिप्रियानी

(अमिलकारे चिप्रियानी हा एक त्या काळातील अराजकवादी होता. या विचारसरणीच्या लोकांचे एक वैशिष्ठ्य असे की यांना सत्तेवर असलेला कुठलाही राजा, पक्ष हा शत्रू वाटतो. पण हे स्वत:शी अत्यंत प्रामाणिक असतात आणि त्यांचा हाच गुण सर्वसामान्य जनतेला आवडतो. उदा. हा माणूस सातवेळा निवडून आलेला असताना तो मंत्रीमंडळात सामिल होऊ शकला नाही कारण त्याने सातही वेळा राजाच्याप्रती निष्ठा वहायची शपथ घेण्याचे नाकारले होते. ) कारण त्यांचा (फ्रान्स आणि इंग्लंडचा) आपल्या क्रांतीला विरोध आहे. ते जाऊ देत, पण मी तुम्हाला सांगतो, जे लोक, सभासद, या गोंधळाला आणि गुंडगिरीला घाबरून त्यांच्या मनात काय आहे, हे उघड सांगत नाहीत त्यांना मी कधीच क्षमा करणार नाही. या भिडस्त आणि ढोंगी लोकांना माझ्या बाजूला कोणकोण आहेत हे लवकरच लक्षात येईल अर्थात तेव्हा फार उशीर झालेला असेल. तरीही तुम्ही माझे आहात हे मी कसे विसरु शकेन ? त्यांना (फ्रान्स आणि इंग्लंड) आपला हस्तक्षेप पाहिजे आहे यावर विश्वास ठेवायचे तुम्हाला काहीही कारण नाही. दातओठ चावत ते आपल्यावर अविचारी असण्याचा आरोप करताएत पण खरे तर त्यांना खरी भीती आहे ती आपल्या सशस्त्र क्रांतीची.
माझी सदस्यपत्रिका फाडून तुम्ही माझे सदस्यत्व रद्द करू शकाल पण माझा समाजवादावरील विश्वास कसा नष्ट करणार ? मला माझ्या लढाईपासून कसे रोखणार ?”

हे सगळे होऊन सुद्धा मुसोलिनीला पार्टीतून काढून टाकण्यात आले. दुसर्‍याच दिवशी मुसोलिनीच्या वर्तमानपत्रात मुसोलिनीच्या बडतर्फीबद्दल मोठमोठे लेख छापून आले. अर्थात यातील बरेचसे त्यानेच लिहिले होते. या सगळ्या प्रकारातून मुसोलिनीचा एक मोठा फायदा झाला तो म्हणजे देशातील त्याच्या चाहत्यांची संख्या अतोनात वाढली. लाखो लोकांना तो माहीत झाला आणि त्याच्याबद्दल जनतेला एक प्रकारची कीव वाटू लागली.

२३ मार्च १९१९ रोजी त्याने त्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने एक अत्यंत महत्वाचे पाऊल टाकले. त्याने त्या दिवशी सकाळी फसिस्ट पार्टीची स्थापना केली.

मुसोलिनीच्या पुढील कारकिर्दीकडे वळण्याअगोदर ज्या कारणाने त्याला सोशॅलिस्ट पार्टी सोडायला लागली ते पहिले महायुद्ध, त्यातील त्याची कामगिरी आणि त्याचा वर उल्लेख झालेला आहे त्या रोमवर केलेल्या चढाईपर्यंत तो कसा पोहोचला, याबद्दल थोडे लिहिले पाहिजे.

१९१५ साली इटलीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने उतरायचे ठरवले याचे मुख्य कारण म्हणजे फ्रान्स आणि इंग्लंडने इटलीमधील ना फक्त वर्तमानपत्रे विकत घेतली व जनमानस त्यांच्या बाजूने वळवले, पण त्यांनी युद्धानंतर इटलीला लूटीतील व पादाक्रांत केलेल्या जमिनीचा चांगला हिस्साही कबूल केला होता. थोडक्यात त्या देशाला लाच देण्यात आली. (मला वाटते आपल्याही देशातील वर्तमानपत्रांचे खरे मालक कोण आहेत याचा छडा एकदा लावायला हवा. हे एक जनमतावर कब्जा करण्याचे फार महत्वाचे हत्यार आहे. कारण लोकांसमोर जे सारखे ठेवले जाते तेच शेवटी लोकांना खरे वाटू लागते.उदा उद्या जर चीन आणि अमेरिकेचे युद्ध सुरू होणार असेल आणि जर बरीचशी वर्तमानपत्रे जर अमेरिकन मालकांची असतील तर काय होईल हे सांगायची गरज नाही.) हे अर्थात १९१७ साली रशियाने जी कागदपत्रे उघड केली त्यावेळेस उघडकीस आले. आंतरराष्ट्रीय राजकारण कसे पोहोचलेले असते बघा. १९१५ साली मुसोलिनीला सरकारच्या अलिप्त धोरणाला विरोध केला म्हणून तुरुंगात टाकले होते, त्याचाच नंतर युद्धाचा एक शूर नायक म्हणून उदो उदो करण्यात आला.

थोडेसे त्याच्या खाजगी आयुष्यातही डोकवायला हरकत नाही कारण त्यातून त्याच्या मुळ स्वभावावरही थोडाफार प्रकाश पडू शकतो. पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीच्या काळात समाजवस्त्राचे धागे उसवण्यास प्रारंभ झाला होता आणि बर्‍याच लोकांचे अनेक स्त्रियांशी केलेले शरीरसंबंध उघडकीस येऊ लागले. कारण फार साधे होते. अनेक स्त्रिया आता सैनिकांच्या, अधिकार्‍यांच्या मागे लागल्या की त्यांनी आता त्यांच्याबरोबर कायदेशीर विवाह करावा. जर ते रणांगणात मृत्यू पावले तर त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता होती. या विचित्र चक्रात मुसोलिनीही सापडला. बर्‍याच स्त्रिया त्याच्या मागे विवाहासाठी मागे लागल्या. अर्थात मुसोलिनीनी हे सर्व संबंध नाकारले पण दोन स्त्रिया – रॅशेल ग्विडी आणि इरिन डालसेर अल्बिनी या दोन स्त्रियांनी मुसोलिनीची मुलेच हजर केली तेव्हा मात्र साहेबांची पंचाईत झाली. अर्थात मुसोलिनी आता युद्धभुमीवर
जाणार असल्यामुळे व तो एक महत्वाचा माणूस असल्यामुळे ही सर्व प्रकरणे मिटवण्यात आली.

यातील इरिन डालसेरची हकीकत तर फारच ह्र्दयद्रावक आहे. या बाईला मुसोलिनीपासून एक मुलगा झाला होता. जेव्हा तिने लग्नाचा आग्रह धरला तेव्हा तो अर्थातच धुडकावण्यात आला. मुसोलिनीने या बाई विरुद्ध ती देशविघातक कामात गुंतली असल्याची खोटी माहिती मिलानच्या पोलीसप्रमुखाला दिली (हा त्याचा वैयक्तिक मित्र होता). तिची व तिच्या मुलाची फ्लॉरेन्स नजीकच्या एका छावणीत रवानगी करण्यात आली. अर्थात तिला येथे पाठविण्याआधी भरपूर मारहाण करण्यात आली हे तिच्या शेजार्‍यांनी नंतर सांगितलेच. तेथे तिने अर्थातच मुसोलिनीचे नाव, व तिचे मुसोलिनीशी लग्न झाल्याचे प्रतिज्ञापत्रक व तिचे अजून एक प्रतिज्ञापत्रक दाखवल्यावर तिच्या आजारी मुलाला तपासण्यासाठी एका डॉक्टरला पाठविण्यात आले. (ट्युरिन शहरातील एक नोटरी कॅमिल्लो टापाटी याच्या कार्यालयातील दस्ताऐवज क्र. ५१४१३. या प्रतिज्ञापत्रकात तिने मुसोलिनीला फ्रान्समधून कसे व किती पैसे मिळत याबद्दलही सविस्तर माहिती दिली आहे.)पण तो डॉक्टर तेथे पोहोचण्यापुर्वीच तिची तेथून उचलबांगडी करण्यात आली. नंतर त्या मुलाला त्याच्या वयाच्या २५ वर्षांपर्यंत एका वेड्यांच्या इस्पितळात डांबून ठेवण्यात आले. शेवटी तो तेथेच मृत्युमूखी पडला. ती दोघे परत कधीही दिसले नाहीत हेच सत्य काय ते उरले. विषय निघालाच आहे तर त्याच्या दुसर्‍या प्रेयसी व लग्नाच्या बाईबद्दलही सांगायला हरकत नाही. ही बाई जिवानिशी सुटली कारण तिने त्याच्या बाकीच्या भानगडींना कसलाही आक्षेप घेतला नाही आणि तिला कसलीही राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. १९०८ सालाच्या आसपास मुसोलिनी जेव्हा तात्पुरत्या मुक्कामानंतर आस्ट्रीयातून इटलीला परतला तेव्हा त्याचा बाप एक हॉटेल चालवत होता आणि त्यांच्याकडे दोन मायलेकी नोकरी करत होत्या. याच्यातील आईने मुसोलिनीच्या बापाशी संधान बांधले होते आणि तिच्या सुंदर मुलीने भांडी विसळता विसळता बेनिटोशी. हिचे नाव होते रॅशेल ग्विडी. हिने नंतर मुसोलिनीचे चरीत्रही लिहीले. मी ते वाचलेले नाही.
रॅशेल ग्विडी

यांना जी मुले झाली ती त्यांचे लग्न कायदेशीर नसल्यामुळे अनौरस ठरली. पण त्या काळात ही सगळी मंडळी प्रस्थापीत व्यवस्थेच्या विरूद्ध असल्यामुळे या गोष्टींचे त्यांना व समाजाला काही वाटत नसे. सगळा प्रकार एकंदरीत एखादे घोंगावणार्‍या वादळाप्रमाणे होता. सर्व प्रस्थापीत नितीमुल्ये पालापाचोळ्यासारखी उडून जात होती. पण बेनिटो मुसोलिनी हा स्त्रियांना नादी लावण्यात फारच वाकबगार होता. असे म्हणतात एकाच वेळी त्याची १४ स्त्रियांशी प्रेमप्रकरणे चालू होती. त्याने इटलीच्या राणीलाही सोडले नाही. हिचे नाव होते मारिया जोसे.
राणी मारीया जोसे

नंतरच्या काळात त्याने अनेक स्त्रियांशी संबंध ठेवले त्यातील एक होती एक सुंदर नटी – क्लारा पेटाच्ची.

हीच त्याच्या बरोबर मारली गेली आणि तिच्याही प्रेताची विटंबना झाली. हिची हकीकत नंतर येणारच आहे, पण हिचे छायाचित्र येथे देत आहे. हिच्यात, रॅशेल आणि मुसोलिनी यांच्यात जे तणावाचे संबंध निर्माण झाले त्यावर एक नाटकही इटलीमधे आले होते

या सगळ्या कटकटींतून स्वत:ची सुटका करून कॉर्पोरल मुसोलिनी युद्धाच्या आघाडीवर वार्तांकन करायला रवाना झाला.
तुलनेने ही आघाडी शांत होती आणि दोन्ही बाजूंनी युद्धाचे सभ्य नियम पाळायचे असे ठरवून त्याचा भंग होणार नाही याची काळजी घेतली जात होती. पहिल्या महायुद्धाला खंदकाचे युद्ध म्हणतात हे आपल्याला माहीतच असेल. समोरासमोर असलेले शेकडो मैल अजगरासारखे हे खंदक त्याच्या पोटात सर्व सैनिक आणि साहित्य घेऊन सुस्त पडले होते. कोणी डोके वर काढले की समोरून कधी गोळी येईल आणि हेल्मेटला भोक पडेल हे सांगता येत नव्हते. पण रोजचे व्यवहार कोणाला चुकलेत ? ते पाळण्यासाठी दोन्ही बाजूचे सैनिक दिवसातून काही काळ गोळीबार बंद ठ्वायचे. हा एक अलिखित करार होता. याचे एक उदाहरण – माझ्या वयाच्या काही वाचकांना आठवत असेल की एका काडीत तीन सिगारेट पेटवत नाहीत. याचे मुळ या खंदकातून चाललेल्या युद्धात आहे. एखादा सैनिक जर आपली सिगरेट पेटवून उरलेल्या दोघांच्या सिगरेटी त्याच काडीत पेटवायला गेला तर तेवढा वेळ पडणार प्रकाश हा शत्रूच्या सैनिकाला नेम धरून गोळी झाडायला पूरे पडायचा. हे कळल्यावर दोन्ही बाजूने सिगरेटच्या दिशेने गोळी झाडायला अघोषित बंदी घालण्यात आली. तसेच एका काडीत तीन सिगारेट पेटवायलाही बंदी घालण्यात आली. गंमत म्हणजे हे संशोधन झाले दोस्त राष्ट्रांच्या सेनेत पण याचा उपयोग केला गेला दोन्ही बाजूने. जगा आणि जगू द्या हे सुंदर तत्व एवढे चांगलेरित्या वापरले गेल्याचे हे कदाचित एकमेव उदाहरण असावे. असो. पण आपले मुसोलिनी महाराजांना हे मान्य नव्हते. त्यांनी गेल्या गेल्या ही आघाडी एवढी शांत का ? अशी चौकशी करत शेजारच्या सैनिकाचा हँडग्रेनेड घेऊन समोरच्या जर्मन खंदकावर युद्धबंदीच्या काळात एका काडीच्या प्रकाशाच्या दिशेने फेकला. यात कॉर्पोरल मुसोलिनी यांचा शूरपणा दिसला पण जर्मनांनी त्या नंतर जो हल्ला केला त्यात दोस्तांचे अनेक सैनिक मृत्यूमुखी पडले. या नंतर मुसोलिनीने आपला एक चांगला फोटो एका वरवंडीवर काढून घेतला आणि “आघाडीवरच्या एका खंदकात” असे नाव देऊन तो त्याच्या वर्तमानपत्रात छापायला पाठवला. एवढेच नाही तर जेव्हा एका सरावाच्या वेळी तो एका बाँबस्फोटात जखमी झाला आणि त्याला साधारणत: त्यातील छर्‍यामुळे चाळीस एक छोट्या जखमा झाल्या. या जखमांचाही वापर त्याने स्वत:चे महत्व वाढविण्यास केला. तसे मानवी स्वभावामुळे सगळेच थोड्या फार प्रमाणात करतात, पण मुसोलिनीनी या सगळ्याची हद्द ओलांडली. त्याची इस्पितळात असतानाची ही वर्णने बघा
-“जखमी मुसोलिनी इस्पितळात त्या बिछान्यावर पोटावर पडला होता आणि म्हणाला ’मी मरू शकत नाही कारण मला मरायचे नाही”
-सगळ्या डॉक्टरांनी राग व्यक्त केला तरीही मी येथेच राहणार आहे, मी मरणार नाही”
- वैद्यकीय शास्त्र भले म्हणो की मी जिवंत राहू शकत नाही पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो’
थोडक्यात असे कोण म्हणू शकतो ? फक्त ज्याचे भवितव्य उज्वल आहे, ज्याच्या ताब्यात इटलिचे भविष्य आहे तोच म्हणू शकतो. कुठलाही सामान्य सैनिक नाही. त्याचे असले कौतूक करण्यात दोस्त राष्ट्रेही मागे नव्हती. ते तर पक्के राजकारणी. बघा त्यांची मुक्ताफळे –
मुसोलिनी हा दोस्तांच्या सेनेतला सर्वात शूर सैनिक आहे. या एकाच युद्धात तो चाळीस वेळा जखमी झाला आहे. त्याच्या शरीरावरच्या खुणाच ते सांगतात....इ. इ.
कुठलाही पराक्रम न गाजवता त्या अपघातात झालेल्या जखमांचा फायदा घेत या शुरवीराने जो मिलानमधे मुक्कम ठोकला तो युद्ध संपेपर्यंत. पण आता इटालियन जनतेत तो एक शूर आदर्श सैनिक म्हणून ओळखू जाऊ लागला. एक अत्यंत भयानक विनोद वाचा. लंडन मॉर्निंग पोस्ट्च्या एका अंकात हे काय लिहून आले होते ते वाचा
– “युद्धाच्या भीषण इटालियन आघाडीवर मुसोलिनी जसा सिझर युद्धभुमीवर जखमी होऊन पडला तसा शरीरावर ४२ जखमा घेऊन पडला”.
त्याचे चरीत्र लिहीणारा लेखक गॉडेन काय म्हणतो बघा “तो शरीरावर अक्षरश: १०० जखमा घेऊन लढत होता”. इ. इ. इ....... मुसोलिनीची परतफेड चालली होती. या सगळ्या प्रसिद्धीचा मुसोलिनीला अतोनात फायदा झाला. अर्थात त्याच्या जखामांविषयी त्या आता बर्‍या होत आहेत या शिवाय काहीही जास्त खुलासा करण्यात आला नाही. इस्पितळात इटलीचा राजा त्याला भेटायला आल्यावर त्याने प्रथम स्वत:ला आघाडीवर परत न पाठविण्याची मागणी केली. त्याचे कारण त्याने त्याला त्याच्या वर्तमानपत्रात जास्त महत्वाचे काम पडते, असे होते. मिलानला परतताच त्याने मोठ्या मानभावीपणे लेख लिहीला “ मी माझ्या युद्धात परततोय !”

ओक्टोबर १७ १९१७ ला इटालियन सैन्याला कॅपेरेत्तोच्या युद्धात दारूण पराभव पत्करायला लागला. इटालियन सैन्य शौर्याने लढले खरे पण जर्मन सैन्याच्या विजेच्या गतीने होणार्‍या हालचालींना ते पूरे पडू शकले नाही. शिवाय जर्मनांनी विषारी वायुचाही अघोरी वापर केला. या पराभवामुळे इटलीमधे नैराश्याचे वारे वाहू लागले. त्या काळातील एक लोकप्रिय कलाकार, क्रांतिकारक, सैनिक, पुढारी गॅब्रिएले द नुंन्झिओ याने मुसोलिनीला इटालियन जनतेचे मानसिक धैर्य उंचावण्यासठी काही करता येईल का याचा विचार करायला सांगितला आणि फॅसिस्मो अर्थात फॅसिस्ट पार्टीचा उदय झाला असे म्हणायला हरकत नाही.
नुंन्झिओ....

फॅसिझम हा शब्द लॅटीन फॅसेस या शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ एल्मच्या काठ्यांची एक मोळी. त्याला एक कुर्‍हाड जोडल्यावर रोमन साम्राज्याच्या अधिकार्‍यांच्या सत्तेचे एक चिन्ह तयार झाले. त्याचा अर्थ कुठल्याही नागरिकाच्या जीवनावर व मृत्यूवर त्याचा आधिकार आहे.
पार्टीचे चिन्ह..

हेच चिन्ह व नाव नवीन पार्टीला देण्यात आले.......या माणसाला म्हणजे नुंन्झिओला मुसोलिनीने मातीत घातले ते कसे.................ते पुढच्या भागात......अर्थात
क्रमशः
:-)
जयंत कुलकर्णी.
हा भाग खरगपूरच्या एका डॉनला घाबरून लवकर टाकलेला आहे. त्यामुळे यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात यावे. त्यांना तेथे कंटाळा आलेला असल्यामुळे व येथे कट्टे चुकत असल्यामुळे सध्या त्यांच्या मनस्थितीची कल्पना येऊ शकते. :-)

इतिहासकथासमाजलेखमतमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

हाही भाग नेहमीप्रमाणेच मस्त आणि माहितीपूर्ण.
पुढच्या भाग येऊ द्यात लवकर.

बाकी हे इटालियन सत्ताधारी बरेच रंगेल दिसतात. हल्लीच पायउतार झालेले पंतप्रधान बर्लुस्कोनी पण जाम रंगेल होते.

अन्या दातार's picture

8 Jan 2012 - 4:01 pm | अन्या दातार

मस्त मस्त मस्त चालू आहे लेखमाला :)

वाटाड्या...'s picture

8 Jan 2012 - 4:10 pm | वाटाड्या...

छान, अप्रतिम माहिती समोर आणल्याबद्दल धन्यवाद.

बाकी वल्ली म्हणतात तसे हे इटालियन बरेच रंगेल आहेत. एका वेळेला इतक्या बायकांबरोबर प्रकरण म्हणजे मानलं पाहिजे. अर्थात हे इटालियन लोक जगभर वुमनायझर म्हणुन प्रसिद्ध आहेतच.

पुढचे भाग केव्हा..

- वा

सुनील's picture

9 Jan 2012 - 5:43 am | सुनील

अर्थात हे इटालियन लोक जगभर वुमनायझर म्हणुन प्रसिद्ध आहेतच.
फ्रेंचदेखिल फार मागे नसावेत!

सुहास झेले's picture

8 Jan 2012 - 4:14 pm | सुहास झेले

व्वा.. जयंतकाका, अजुन एक माहितीपूर्ण लेखमाला.

मुसोलिनीबद्दल अजुन वाचायला आवडेल. पुढचा भाग लवकर लवकर येऊ द्या :) :)

मन१'s picture

9 Jan 2012 - 12:04 am | मन१

पोचलेला होता म्हणायचं की मुसोलिनी...
खरगपूरच्या नवाबाचे जाहिर आभार. नुस्ता बंगाल भटकण्यापेक्षा असाच दबव टाकून इतरही उरलेल्या मालिका पूर्ण करून घे म्हणावं.

प्यारे१'s picture

9 Jan 2012 - 9:14 am | प्यारे१

खरगपूर डॉन्/नवाबाचे कट्टे असेच 'मिस' होत रहावेत ही खैराच्या झाडाखाली बसून प्रार्थना. ;)

मुसोलिनी काय आणि इतर हुकुमशहा काय. त्यांचे जीवन हे बहुतांशी खाजगी राहिल्याने जास्त माहिती झाले नाही.

या लेखमालेच्या निमित्ताने तरी नविन माहिती मिळत आहे आणि त्याबद्दल कुलकर्णीकाकांचे आभार..

- पिंगू

सुनील's picture

9 Jan 2012 - 5:42 am | सुनील

भाग लवकर टाकला असला तरी सुरेखच उतरला आहे! पुढील भागही असेच "लवकर" येउद्यात!

जयंत कुलकर्णी's picture

9 Jan 2012 - 3:55 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !