इंटरनाशनाले चे गीत. हे मागे हाळू आवाजात लावल्यास वाचण्यासाठी वातावरणनिर्मितीची शक्यता आहे. :-)
पहिल्या महायुद्धात मुसोलिनी.
तीनच वर्षं अगोदर फॅसीस्ट पार्टीला निवडणूकीत फक्त ५००० मते मिळाली होती. ही राजकीय विचारधारा व पक्ष सत्तेवर येईल असे इटलीमधील जनतेला वाटलेही नव्हते. पण मुसोलिनीच्या खर्या करिष्म्याची त्यांना कल्पना नव्हती.
बेनिटो मुसोलिनी ! जन्म तारीख जुलै २९ १८८३. एका टेकडीवर असलेल्या व्हारानो डी कोस्टा नावाच्या एका छोट्याशा वस्तीवर हा माणूस जन्माला आला.
जन्मस्थळ.
दगडी भिंती असलेली टुमदार घरे हे गावाचे वैशिष्ट्य. या टेकडीवरून खाली दिसते ते डोव्हिया नावाचे खेडे. (डोव्हिया हेच मुसोलिनीचे जन्मस्थळ म्हणून मानले जाते पण ते खरे नाही.) स्वच्छ हवा, मुबलक सूर्यप्रकाश आणि जमिनीचा पाणी न साठणारा पोत यामुळे या प्रदेशात उत्कृष्ट द्राक्षं पिकतात आणि अर्थातच त्यापासून बनणारी वाईनही अप्रतीम असते. मुसोलिनी या गावाबद्दल म्हणतो “ माझे या माझ्या गावावर अत्यंत प्रेम आहे. खरेच, वंश आणि जमीन याचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर किती परिणाम होतो !”.
मुसोलिनीने ज्या घराण्यात जन्म घेतला त्याबद्दल इतिहासात थोडी फार माहिती उपलब्ध आहे. बोलोनिया नावाच्या गावात जी काही युद्धखोर, भांडकुदळ घरे/घराणी होती त्यात मुसोलिनीच्या घराचा बराच वर क्रमांक लागतो. १३ व्या शतकात म्हणजे बघा १२७० साली जोव्हानी मुसोलिनी नावाचा या जमातीचा एक पुढारी होऊन गेला आणि तो त्या काळात या भागावर अधिपत्य गाजवत असे. या गावात या माणसाच्या नावाने एक रस्ता व एक टॉवरही उभा होता आणि आत्ताही तो कदाचित असेल. त्या काळातील एका लढाईत मुसोलिनींची वाताहात झाली आणि ही जमात इतरस्त्र पांगली. यातील काही घरे डोव्हियाच्या आसपास स्थायीक झाली. त्यानंतर मुसोलिनी हे नाव विशेष ऐकू आले नाही. १८०० सालात लंडनमधे एक मुसोलिनी नावाचा व्हायोलीनवादक व संगीतकार होऊन गेला तेवढेच काय ते नाव ऐकू आले.
या नवीन बालकाचे नाव अलेक्झांड्रा मुसोलिनीने ठेवले बेनिटो. हे ठेवले मेक्सीकोचा तारणहार बेनिटो वारेज याच्या नावावरून. हा एक चर्चच्या विरोधात उभा ठकणारा बंडखोर होता. बेनिटोच्या वडिलांनी त्याला दोन गोष्टी आयुष्यभर शिकवल्या त्या म्हणजे म्हणजे चर्चचा आणि राजेशाही यांचा द्वेश. त्यांच्या मते या दोन संस्था सामान्य माणसावर होणार्या सर्व अन्यायाच्या मुळाशी आहेत.
मुसोलिनीचे आई-वडील
बेनिटोचे वडील एक लोहार होते. त्यांच्या व्यवसायाला शोभेल असे त्यांचे व्यक्तिमत्व छाप पाडून जात असे. सहामजली हास्य आणि ठाम करडी नजर ही त्यांची ओळख होती. छोटा बेनिटो हा एकलकोंडा व अबोल होता. त्याच्या या स्वभावाची काळजी वाटून त्याला एका डॉक्टरला दाखवण्यात आले. काही काळजी करायचे कारण नाही, हेही दिवस जातील व तो बोलायला लागेल अशी खात्री देताना ते म्हणाले “ कदाचित नंतरच्या काळात हा इतका बोलेल की त्याला आवरावे लागेल”. बेनिटोचे वडील एक कट्टर समाजवादी आणि नास्तीक आणि गंमत म्हणजे बेनिटोची आई ’रोसा’ ही देवभोळी होती. तिला बेनिटोने स्वत:ला चर्चच्या सेवेत वाहून घ्यावे असे वाटे. या दोघांच्या वैचारिक घर्षणात छोट्या बिचार्या बेनिटोची नेहमीच फरफट व्हायची. त्या काळात तो कसा होता याबद्दल बेनिटोने लिहून ठेवले आहे. तो म्हणतो “लहानपनी मी सारखा अस्वस्थ असे. अर्थात मी आजही अस्वस्थच असतो. एखादी कृती करायच्या अगोदर माणसे एवढा कसला विचार करतात असे मला वाटे. मी मात्र मनात विचार यायचा अवकाश तो ताबडतोब कृतीत उतरवत असे.”
वडीलांची चढेल अहंमान्यता आणि आईची कायम अपराधीपणाची भावना यांच्यामधे बेनिटोच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत होते. साहजिकच स्वत:कडे सगळ्यांचे लक्ष कसे राहील या प्रयत्नात तो सारखा असायचा. येनकेनप्रकारेण आपण कुठल्याही घटनेच्या केंद्रस्थानी असावे हीच मनिषा सतत मनात धरून त्याचे वागणे असायचे. पण त्याच्या मनात जे चालायचे त्याचा थांगपत्ता बाहेरच्यांना लागणे महामुष्कील असायचे. एकदा त्याच्या आईला तो एका खोलीत स्वत:शीच मोठमोठ्याने बडबडतांना आढळला. विचित्र वाटून तिने विचारले “ काय वेडा आहेस की काय तू ? काय बडबडतो आहेस एकटा येथे ?” बेनिटोने उत्तर दिले “एक दिवस इटलीचा माझ्या शब्दांनी थरकाप उडेल, त्यादिवशीच्या भाषणाची मी रंगीततालीम करतोय”.
त्याचे मातृप्रेम सच्चे आणि सगळ्याच्या पलिकडे होते. जेव्हा तो शाळेत होता, त्यावेळेस मित्रांबरोबर झालेल्या मारामार्यांमधे झालेल्या जखमा तिला वाईट वाटेल म्हणून लपवतांना त्याची फार तारांबळ होत असे. तरूण वयात झालेल्या घटना आपल्याला आयुष्यभर साथ करतात. भिती, विश्वासघात, फितूरी, सूड, मारामार्या , रक्तपात, या सर्व घटना माणसाच्या लक्षात राहतात. बेनिटोही या सगळ्यातून गेला. त्याला सुधारण्यासाठी अखेरीस त्याच्या आईने त्याला चर्चच्या मठात ठेवले. तेथे त्या पवीत्र आणि करूणेने भारलेल्या वातावरणात त्याचा हिंसकपणा जरा कमी होईल अशी त्या बिचारीला आशा होती. पण झाले उलटेच. मुसोलिनीमुळे त्या मठातील मुले मारामारी करायला शिकली आणि एक दिवस त्या मठाचे प्रमूख त्याला म्हणाले “बेनिटो मुसोलिनी, वाईट कृत्यांमुळे माणूस नरकात जातो पण तुझ्या ह्रदयातच नरक आहे. तू बर्या बोलाने परमेश्वराची क्षमा माग, नाहीतर आम्ही तुला काढून टाकू” दुसर्याच दिवशी मुसोलिनी तेथून पळाला.
बेनिटो जसा जसा मोठा होऊ लागला तसा आईच्या प्रभावापासून मूक्त होऊ लागला. त्याला आता पुरषांचे जग खुणवू लागले होते. वडिलांना त्यांच्या कामात मदत करताना त्याला त्याच्या मानसिक आणि शारीरिक ताकदीची जाणीव होऊ लागली आणि तो वडिलांच्या जास्त जवळ गेला. खरे तर अलेक्झांड्रो म्हणजे त्याचे वडील यांचा मार खाल्यावाचून बेनिटोचा एकही दिवस गेला नाही. त्यांचा पट्टा, त्यांचे हात आणि बेनिटो यांची गाठ दररोज पडायचीच. असे असूनसुद्धा त्यांना त्यांच्या कामात मदत करायला जाण्याचे अजून एक कारण होते ते म्हणजे त्याचे वडील आणि त्यांचे मित्र ज्या गप्पा मारायचे त्या. त्या ऐकायला बेनिटोला मजा वाटायची. त्यांचे कधी मोठ्यांनी, तावातावाने चालणारे तर कधी कुजबुजत चालणारे समाजवादी वाद याचे त्याला सूप्त आकर्षण होते. पोलिस या गप्पांवर का लक्ष ठेवायचे हे त्याला नीटसे उमगत नसे पण तेथे हजर रहायला त्याला आवडत असे. एक दिवस त्याच्या भवितव्याबद्दल चर्चा करताना त्याच्या आईवडिलांनी ठरवले की बेनिटोला भाता चालवायला सांगणे हा त्याच्या क्षमतेचा गैरवापर आहे. त्याला पुढे शिकवायला पाहिजे. आई म्हणाली “ तो कोणीतरी होणार आहे असे मला सारखे वाटते” आणि बेनिटो मुसोलिनीची पुढच्या शिक्षणासाठी त्या गावातून उचलबांगडी झाली.
मुसोलिनीने त्याच्या वडिलांबद्दल लिहून ठेवले आहे –
“माझ्या वडिलांचा जन्म १८५४ साली प्रेडाप्पिओ येथे झाला. डोव्हाडोला या गावी त्यांनी एका लोहाराच्या हाताखाली उमेदवारी केली आणि शेवटी त्यांनी स्वत:ची भट्टी डोव्हिया येथे टाकली. ते इंटरनॅशनाले या कामगारांच्या जागतिक संघटनेशी केंव्हा संपर्कात आले याची मला कल्पना नाही. पण जेव्हा ते डोव्हियाला आले तेव्हा ते त्या तत्वज्ञानाने भारले गेले होते आणि त्यांनी इटलीमधे ही संघटना स्थापन केली होती. त्यांना ताबडतोब तुरुंगात डांबण्यात आले. त्यानंतर त्यांना जवळजवळ एक वर्षं पोलिसांच्या देखरेखीखाली रहावे लागले. त्यांचे घर, ज्या कार्यकर्त्यांच्या मागे पोलिस लागायचे त्यांच्यासाठी नेहमीच खुले असायचे. नंतर जेव्हा समाजवाद्यांनी नगरपालिकांच्या निवडणूकात भाग घ्यायला सुरवात केली तेव्हा ते प्रेडाप्पिओचे नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. १९०२ साली त्यांना परत अटक करण्यात आली. त्यांच्या मागे कायमच पोलिस, न्यायालये, चर्च आणि उदारमतवाद्यांचा ससेमिरा असायचा.
त्यांनी माझ्यासाठी ना जमीनजुमला सोडला ना संपत्ती. त्यांनी माझ्यासाठी सोडला तो एक विचार, एक तत्वज्ञान !”
मुसोलिनी जेव्हा जेव्हा आपल्या वडिलांच्या आयुष्यात डोकावून बघायचा तेव्हा त्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायची ती म्हणजे जगात ज्यांच्याकडे विचार होता आणि हे जग बदलायची ताकद ज्या विचारात होती ते नेहमी पराभूत होत होते. याचे कारण त्याच्या दृष्टीने एकच होते ते म्हणजे विचारांचे कृतीत परिवर्तन न होणे हे. ही उणीव त्याने आपल्या आयुष्यातून प्रयत्नपूर्वक दूर केली. विचार कमी आणि कृतीवर भर हेच त्याने आपल्या आयुष्याचे तत्व ठरवले. याच्यात भर पडली ती इटालियन रक्तातील खुनशीपणाची. हे सगळे लिहायचे कारण म्हणजे मुसोलिनी हे रसायन या सगळ्यांचा परिपाक होता. सुरवातीची बरीच वर्षे त्याने समाजवादी पक्षाचा एक कार्यशील कार्यकर्ता म्हनून घालवली. त्या पक्षासाठी माणसे जमवणे, भाषणे देणे, मारामार्या करणे, संप घडवून आणणे इ... कामात त्याचा वेळ जात असे.
एका मुलाखतीत जेव्हा त्याला विचारण्यात आले की तुमचे गुरू कोण आहेत ? मुसोलिनीने उत्तर दिले “भूक हा माझा सगळ्यात मोठ्ठा गुरू आहे. त्यानंतर तुरूंग आणि अर्थात माझे शत्रू”. या दुसर्या गुरूकडे तो तब्बल ११ वेळा शिकायला गेला. अर्थात हे सगळे राजकीय गुन्हे होते.
ज्या सोशॅलिस्ट पार्टीसाठी त्याने आपल्या आयुष्यातील एवढी वर्षे खर्ची घातली त्या पार्टीने शेवटी त्याला पार्टीतून काढून टाकले. कारण होते पहिले महायुद्ध. इटालियन सोशॅलिस्ट पार्टी ही या युद्धाच्या विरूद्ध होती त्याचे कारण त्यांच्या तत्वज्ञानात दडलेले होते. हे युद्ध भांडवलदारांनी त्यांच्या फायद्यासाठी चालू केलेले असून त्यात सैनिक आणि कामगार व गरीब जनता भरडली जात आहे असे त्यांचे स्पष्ट म्हणणे होते. या पार्टीचे एक मुखपत्र होते – त्याचे नाव अवांती (मराठीत याचे स्वैर भाषांतर केले तर ते असे होऊ शकते – सदैव पुढे किंवा आगेकूच इ...). या वर्तमानपत्राच्या संपादकपदी होता मुसोलिनी. मुसोलिनीने पहिले महायुद्ध सुरू व्हायच्या अगोदर सैनिकी प्रशिक्षण घ्यायला नकार दिला म्हणून त्याला तुरूंगात जावे लागले असते, तो तुरुंगवास चुकावा म्हणून तो स्विझरलॅंड्मधे पळून गेला होता. मुसोलिनीला ज्या स्त्रीने त्याच्या स्विझरलॅंडमधील मुक्कामात जगायला मदत केली होती ती बाई या वर्तमानपत्राच्या उपसंपादकपदी होती. या बाईचे नाव होते “डॉ. बॅलाबॅनहॉफ.”
ही बाई अत्यंत हुषार, विद्वान आणि कम्युनिस्ट/समाजवादी विचारसरणीची होती. समाजवादासाठी तिने स्वत:चे आयुष्य वाहिलेले होते. तिच्या खास वर्तुळातील माणसांची नावे वाचलीत तर आपल्याला कळते की ती कुठल्या स्तरावर काम करत होती ते. उदा. लेनिन, ट्रॉट्स्की इ...या बाईने मुसोलिनीला घडवले असे म्हटले तरी हरकत नाही. असो. अवांतीमधे इटलीने अलिप्त का राहिले पाहिजे यावर मोठमोठे लेख येऊ लागले. पण एक दिवस हे सगळे एकदम बदलले. एका बैठकीत मुसोलिनीने आपली टोपी बदलली आणि त्याने या युद्धात इटलीने बेल्जियम व फ्रान्सच्या बाजूने भाग घ्यायला पाहिजे असे प्रतिपादन केले. मुसोलिनीचे खरोखरच मत परिवर्तन झाले होते, का ही पलटी खायला त्याला अजून काही कारण होते ? एक मात्र खरे आहे. अवान्तीच्या संपादकपदाचा राजिनामा द्यायला सांगितल्यावर चारच दिवसात त्याने स्वत:चे वर्तमानपत्र काढले “पोपोलो द इटालिया”. ( अवांतीचे कार्यालय नंतर मुसोलिनीच्या ब्लॅकशर्ट्सने जाळले.) मुसोलिनीने आपली टोपी फिरवल्यावर आता सोशॅलिस्ट पार्टीकडून काही त्रास होणार नाही असे गृहीत धरून इटालियन सरकारने फ्रान्सच्या बाजूने युद्धात उतरायचा निर्णय घेतला. यातील खरी गोम अशी होती की जर्मनी आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी इटलीला आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न चालावले होते. त्यासाठी जनमत आपल्या बाजूला वळविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून इटलीमधील वर्तमानपत्रे ताब्यात घ्यायचा प्रयत्न दोन्ही देशांनी केले त्यात मुसोलिनीचे वर्तमानपत्र फ्रान्सच्या दावणीस बांधण्यात त्यांना यश आले एवढाच त्याचा अर्थ. मुसोलिनीला यासाठी किती पैसे मिळाले याची नोंद नंतर प्रकाशात आलीच. त्या काळातही या विरूद्ध कुजबुज चालू झाली आणि एक प्रसिद्ध वाक्य जगाला माहीत झाले “ची पागा” पागा याचा अर्थ पैसे देणे. “ची पागा?” याचा स्वैर भाषांतर “यासाठी कोणी पैसे दिले?” असा होऊ शकतो. जनता विचारू लागली “ची पागा?” या वर्तमानपत्रासाठी कोणी पैसे दिले ?
मुसोलिनीचा गुरू आणि मित्र सेराटी याच्या मार्गदर्शनाखाली मुसोलिनीला धडा शिकवायचा व पक्षातून काढायच्या योजना तातडीने आखल्या गेल्या. बोलोनियामधे पार्टीची सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली. अवांतीच्या उरलेल्या सभासदांनी लगेचच मुसोलिनीचा राजिनामा मागितला. हे एवढ्यावरच थांबते तर काही प्रश्न नव्हता पण त्यांना मुसोलिनीचा राजकीय खूनच करायचा होता. मुसोलिनीने त्या सभागृहात पाऊल टाकले आणि त्याच्या विरूद्ध दिलेल्या घोषणांनी ते सभागृह दुमदुमले. हजारो आवाज त्याला जाब विचारत होते “ची पागा? ची पागा?” तर इतर त्याला शिव्याशाप देत होते “विश्वासघातकी ! हरामखोर !” एकंदरीत ते वातावरण बघून त्या सभेचे अध्यक्षस्थान स्विकारायला कोणी तयार होईना. मुसोलिनीला त्याची बाजू मांडायची तर त्या सभागृहात शांतता प्रस्थापित करण्याची गरज होती. शेवटी सेराटीने स्वत: उठून त्या सभागृहाला हात जोडून विनंती केल्यावर तेथे थोडी शांतता प्रस्थापित झाली आणि मुसोलिनीला व्यासपिठावर त्याची बाजू मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले. मुसोलिनीने बोलायला सुरवात केली.......................
जयंत कुलकर्णी.
त्याच्या पार्टीचा लोगो.
प्रतिक्रिया
3 Jan 2012 - 1:39 am | मोदक
छान लेख.. वाचतो आहे..
मोदक.
3 Jan 2012 - 4:14 am | अर्धवटराव
ऐकण्यास उत्सुक.
अर्धवटराव
3 Jan 2012 - 10:22 am | मन१
मग काय झालं?
3 Jan 2012 - 7:45 am | जोशी 'ले'
3 Jan 2012 - 8:40 am | प्रचेतस
हा भागही मस्तच, खूपच छान माहिती मिळत आहे.
3 Jan 2012 - 9:24 am | अन्या दातार
ते वरचे गाणे ऐकत निम्मा लेख वाचला. खरंच जी काही वातावरणनिर्मिती होते त्याला तोड नाही.
पुढे??
3 Jan 2012 - 9:58 am | कुसुमिता१
खुप सुरेख लेख! पुढच्या भागांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे!
3 Jan 2012 - 10:28 am | प्रभाकर पेठकर
दुसर्या महायुद्धा संबंधी (नाझी भस्मासुराचा उदयास्त) वाचताना मुसोलिनीची पुसटशी ओळख झाली होती.
ह्या लेखमालेच्या निमित्ताने बेनिटो मुसोलिनी ह्या व्यक्तीमत्त्वाची जडण-घडण कशी झाली हे वाचताना लेखाच्या प्रत्येक पुढील भागाची उत्सुकता वाढतच आहे.
प्रतिक्षेत.
3 Jan 2012 - 1:21 pm | सुहास..
काय म्हणाला मुसोलिनी
वाचण्यास उत्सुक !!
3 Jan 2012 - 6:45 pm | स्वाती२
मस्त झालाय हा भागही!
5 Jan 2012 - 4:43 pm | गणेशा
अप्रतिम ... निव्वळ अप्रतिम...
पुढिल भागाची चातका सारखी वाट पाहत आहे ...
5 Jan 2012 - 5:04 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
7 Jan 2012 - 9:41 pm | पैसा
मुसोलिनीची जडणघडण कशी झाली याबद्दलचं हे फारच इंटरेस्टिंग प्रकरण आहे. पुढच्या भागाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
8 Jan 2012 - 4:12 am | मराठमोळा
अतिशय माहितीपुर्ण आणि वेगळा विषय.. वाचतो आहे..
जयंत कुलकर्णींचे आभार.