मुसोलिनीचा उदयास्त....भाग - ४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
20 Jan 2012 - 9:43 pm

भाग - १
भाग - २
भाग - ३


मुसोलिनी, नुंन्झिओ आणि रोसेत्ती या त्रिकूटाने इटलीमधे त्याकाळात अनेक मानसन्मान मिळवले. यातील पहिल्याने राजकारणात आपला येनकेन प्रकारेण चांगलाच दबदबा निर्माण केला होता, दुसर्‍याने इटलीला जागे करण्यासाठी काव्ये रचली तर तिसरा जो व्यवसायाने इंजिनियर होता आणि त्याने जर्मनीची एक नौका एका टॉरपेडोने बुडवली होती. थोडक्यात काय हे त्रिकूट इटलीचे हिरो होते असे म्हणायला हरकत नाही. या तिघांनीही फ्युमेच्या तथाकथीत स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. या लढ्याचे नेतृत्व केले नुन्झिओने, त्यासाठी पैसे गोळा केले मुसोलिनीने आणि त्यासाठी मुसोलिनी जे त्याच्या वर्तमानपत्रात स्तंभ लिहायचा त्याने भारावून रोसेत्तीने एक दिवस पोपोलोच्या कार्यालयात जाऊन आपली सगळी संपत्ती त्या कारणासाठी दान केली. फ्युमे हा युगोस्लाव्हियातील एक असा भाग आहे जेथे इटालियन वंशाच्या लोकांची संख्या इतरांपेक्षा खूपच जास्त आहे.

या भागावर वर्चस्व मिळवायचा प्रयत्न इटालियन आणि इतर सगळे वंश इतिहासात करत आले आहेत. १९१९ मधे ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने या भागाचा ताबा घेऊन तेथे सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन नुन्झिओने फ्युमेवर चाल केली. वर म्हटल्याप्रमाणे आता मुसोलिनीने त्याच्या भोवती अनेक लोक जमवेले होतेच. यात प्रमूखत: भरणा होता इटलिच्या सैन्यदलातील अडिती नावाच्या रेजिमेंटच्या सैनिकांचा.
अडिती रेजिमेंट :

हे सैनिक शूर आणि गनिमीकाव्याने युद्ध करण्यात पटाईत होते. त्यावेळी फ्युमेचा ताबा दोस्त राष्ट्रांकडे होता आणि त्यांच्या सेनेचा प्रमुख होता एक इटालियन सेनापती जनरल पित्तालुगा. नुन्झिओच्या स्वातंत्र्यसैनिकांना जेव्हा त्याने अडवले तेव्हा या दोघांची समोरासमोर गाठ पडली आणि नुंन्झिओच्या आवाहनाला बळी पडून या जनरलने नुन्झिओच्या हातात हात घालून त्या शहरावर चाल केली. आताच्या काळात हे सगळे आपल्याला विनोदी वाटू शकेल. पण त्या काळात रोममधे मुसोलिनीला या सगळ्याचा अत्यंत फायदा झाला. नुन्झिओच्या अडितिंनी फ्युमेमधे धुमाकूळ घातला. त्यांनी लुटायचे काहीही शिल्लक ठेवले नाही. त्याच्या भाषणात अत्यंत उत्तेजक, चिथावणीखोर प्रश्न असत आणि त्याला ते काळे शर्ट घातलेले पार्टीचे सदस्य आपल्या तलवारी, बंदूका, सुर्‍या उंचावून साद देत. फ्युमेचा ताबा आल्यावर त्याची रोमवर ताबा मिळवायची योजना होती आणि त्यासाठी मुसोलिनीने रोम मधे मुक्काम ठोकला होता. नुकतेच त्याने ३० लाख लिराही देणगीच्या स्वरुपात मिळवले होते. फ्युमेमधे रोज सभा, मिरवणूका यांना उत आला होता. दररोज शौर्यपदके दिली जात होती आणि प्रत्येक लुटीनंतर आनंद व्यक्त केला जात होता. थोडक्यात नुन्झिओने असा उत्सव भरवला होता ज्याचा अंत रक्तपातात होणार होता. आता काय होणार याची सर्व चिंतित होऊन वाट बघत होते. हे सगळे करून नुन्झिओला दारूण पराभव पत्करावा लागला व त्याच्या अडितींची कत्तल झाली. याला जबाबदार होता मुसोलिनी. इटालियन सरकारने मुसोलिनीला हाताशी धरून या फ्युमेच्या स्वातंत्र्यसैनिकांची मदत रोखली. एवढेच नाहीतर त्यांचा नैतिक पाठिंबाही काढायला लावला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जो पैशाचा पुरवठा होत होता तो बंद पाडला. या मदतीत महत्वाचा सहभाग होता अमेरिकेतील इटालियन वंशाच्या नागरिकांचा. फ्युमेच्या सैनिकांची उपासमार रोखण्यासाठी केलेल्या मुसोलिनीच्या आवाहनाला पहिल्या तीन महिन्यात प्रतिसाद म्हणून जवळजवळ ५०००० डॉलर्स अमेरिकेतून मुसोलिनीकडे आले हा सगळा पैसा मुसोलिनीने त्याच्या निवडणूकीत वापरला. जेव्हा त्याच्यावर यासाठी खटला चालवला गेला तेव्हा त्याने त्याची टोपी फिरवली आणि जाहीर केले की फ्युमेचा लढा हा मुर्खपणा आहे...इ.इ. शेवटी फ्युमेमधे त्याच्या सैन्याचे काय हाल चालले आहेत हे बघायला नुन्झिओने मुसोलिनीला आमंत्रण दिले पण मुसोलिनीने त्याला चक्क नकार दिला.

अशा रीतीने मुसोलिनीने नुंझिओचा काटा काढला. याबद्दल अजून बरेच लिहिता येईल पण मग आपण दुसर्‍या महायुद्धापर्यंत पोहोचायला फार वेळ लागेल. हे सगळे लिहिले त्यातून मुसोलिनीच्या कुटील कारस्थाने करण्याच्या स्वभावावर माझ्या मते भरपूर प्रकाश पडला आहे.
शेवटी ब्लॅकशर्टसनी कायदा हातात घेतल्यावर परिस्थिती मुसोलिनीच्याही ताब्यात राहिली नाही. त्याने या लोकांना काबूत आणण्याचा बराच प्रयत्न केला. १९२१च्या निवडणुकीत त्याने समाजवादी पक्षाबरोबर युतीही करायचा प्रयत्न केला पण त्याने प्रश्न सुटला नाही. समाजवाद राहिला बाजूला. मुसोलिनीला कळून चुकले होते की यांना समाजवाद नकोय, लोकशाही नकोय यांना हुकूमशाहीच पाहिजे आहे. हे उमगल्यावर मुसोलिनीने त्यांचे पुढारीपण स्विकारले. मुसोलिनीच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य असे होते की तो सगळ्यात जास्त पराभवाला घाबरायचा आणि त्याला फॅसिझमच्या चळवळीत कायम अग्रस्थानीच रहायचे होते. असो. तर अशा रीतीने मुसोलिनी राज्यावर आला. त्यावेळेचे वर्णन आपण सुरवातीला पाहिलेच.
थोडक्यात पहिले महायुद्ध जरा गुंडाळूया.....

सत्तेचे पहिले वर्ष.
रोममधील गृहमंत्रालयाच्या समोर त्या दिवशी एक गाडी करकचून ब्रेक दाबून एकदम थांबली. त्यातून मुसोलिनी चपळाईने बाहेर पडला आणि तेथेच घाईघाईने जिना चढणार्‍या एका सचिवाला आडवा गेला. त्या सचिवाला थांबवून मुसोलिनी म्हणाला “ महाशय, आपल्याला बरे नाही हे कळून मला फारच वाईट वाटले.”
तो गोंधळला आणि अलगद मुसोलिनीच्या जाळ्यात सापडला.
“साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय ! माझी तब्येत ठणठणीत आहे” त्याने हसून उत्तर दिले. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताची मूठ आपटत मुसोलिनीने मग त्या सचिवाच्या अंगावर आपल्या शब्दाचे आसूड ओढले.
“तब्येत चांगली आहे ना ? मग कार्यालयाची सुरू व्हायची वेळ नऊ असताना आपण ११ वाजता येताय याचे दुसरे काही स्पष्टीकरण ?” आपल्या मदतनिसाकडे वळून तो म्हणाला “ यांचे नाव लिहून घ्या ! येथे बरीच बांडगूळं नष्ट करावी लागणार असं दिसतय !”
फॅसिस्ट राजवटीच्या पहिल्या वर्षात प्रत्येक सरकारी कागादावर सगळया टिपण्यांच्या तारखा दिसू लागल्या. मंत्री जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध होऊ लागले. दुपारी एखादा मंत्री जागेवर सापडला नाही तर मुसोलिनी लगेच त्याला फोन करून विचारे “ दुपारी जेवायला जायची ही कुठली सरंजामी पद्धत ? सोडा ते सगळे आणि कामाला लागा “.

सत्तेच्या पहिल्या तीन महिन्यात त्याने त्याच्या कॅबिनेटच्या ३२ बैठका घेतल्या आणि त्यापैकी एकही पाच तासापेक्षा कमी वेळ चालली नाही. तो स्वत: सकाळच्या ८च्या ठोक्याला कार्यालयात पोहोचायचा आणि क्वचितच रात्री ९च्या अगोदर तो ते कार्यालय सोडे. त्याच्या कामाचा उरक प्रचंड होता. सगळ्या कागद्पत्रावर त्याचा निळ्या पेन्सीलने लिहिलेला “एम” आता सगळ्यांच्या चांगल्याच परिचयाचा झाला आणि या एम ला कारकून, अधिकारी, मंत्री संत्री घाबरायलाही लागले. कारण ज्या कागदावर “एम” हे चिन्ह असायचे त्या कागदाचा मुसोलिनीचा अभ्यास पूर्ण झालेला असायचा आणि त्याच्या प्रश्नांना योग्य उत्तरे द्यावी लागायची. तेथे थातूरमातूर उत्तरे चालत नसत.

अवांतर : ( सामान्य जनतेला हेच हवे असते. बघा म्हणजे एखाद्या वाईट माणसाने जनतेला हवे ते दिले की जनता त्यालाही निवडून देते. हे खरे आहे म्हणून ज्यांना जनतेने लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे त्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी अजूनच वाढते. त्यांनी जर काम केले नाही तर जनता दुसरा पर्याय शोधायला लागते. त्यात फॅसिझम हाही असू शकतो. मला वाटते जनतेने अण्णांच्या आडून लोकप्रतिनिधींना एक इशार दिला आहे. त्यातून त्यांनी बोध घ्यावा.) या ठिकाणी मला इन्फोसिसचे संस्थापकांचे विचार नमूद करावेसे वाटते. ते एका मुलाखतीत म्हणाले “ माझा भांडवलशाहीवर पूर्ण विश्वास आहे. भारतासमोरचे जे काही प्रश्न आहेत ते संपत्ती निर्माण करूनच सोडवता येतील यावर माझा विश्वास आहे. पण मग सामान्य जनतेने या तत्वाची कास धरावी यासाठी मी काय करायला पाहिजे ? अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे मी माझ्या संपत्तीचे उथळ दर्शन थांबवायला पाहिजे जेणे करून त्यांना माझा द्वेश वाटणार नाही व ते समाजवादाचा मार्ग चोखाळणार नाहीत, कारण त्यात काय होते ते आपण बघितले आहे” ते स्वत: एका चार खोल्यांच्या फ्लॅटमधे राहतात अणि त्यांच्याकडे म्हणे नोकरही नाही. म्हणजे काय या सुक्ष्म थरावार जाऊनही विचार करावा लागतो.

मुसोलिनीला इटलीची नोकरशाही सुधरवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले आणि काही कठोर निर्णयही घ्यावे लागले. त्याने जवळजवळ ३५००० अकार्यक्षम सरकारी जावयांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने देशाच्या अंदाजपत्रकात बराचसा मेळ घातला आणि इटलीमधे प्रथमच रेल्वेगाड्या वेळेवर धावू लागल्या व पोहोचूही लागल्या.

मुसोलिनीच्या काळात अंधश्रद्धेला (शुभाशूभ) उत आला होता. तो स्वत: कुबड्यांना, लंगड्यांना, उघड्या छत्र्यांना घाबरायचा. एवढेच काय दाढी असलेली माणसे महत्वाच्या कामावर निघताना समोर येऊ नयेत याचीही तो काळजी घ्यायचा. १३ आणि १७ तारखा या अशुभ असल्यामुळे त्याच्या कॅलेंडरवरून हटवण्यात आल्या. म्हणजे ते आकडे हटविण्यात आले. त्याच्या टेबलावर एका विशिष्ट जागेवर एक घोड्याचा नाल शुभ म्हणून ठेवण्यात आला होता आणि तो एक मि.मि.ही न हलवण्याची सख्त ताकीद होती. तुतान्खामेनची कबर खणल्यानंतर ज्या शापाच्या दंतकथा पसरल्या होत्या त्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. गंमत म्हणजे त्याच्या कार्यालयाच्या तळघरात एक भेट म्हणून मिळालेली ममी होती. ते कळल्यावर त्याने गोंधळ घालून ती ताबडतोब तेथून हलवायचे आदेश जारी केले. ती ममी तेथून निघेतोपर्यंत त्याने त्याचे कार्यालयही सोडले नव्हते.

मुसोलिनीला आपल्या रांगड्या पार्श्वभुमीचीही फार लाज वाटायची. हे त्याने त्याच्या मित्राजवळ कबूल केले आहे. एकदा त्याला ब्रिटनच्या लेडी सिबील ग्रॅहॅम यांनी जेवायला बोलावले होते. हे त्याचे पहिलेच आमंत्रण होते ज्यात सर्व शिष्टाचार काटेकोरपणे पाळायचे होते. काय करायचे हे न कळल्यामुळे मुसोलिनी अत्यंत अस्वस्थ होता. शेवटी त्याला सांगण्यात आले की त्याने लेडी सिबील जेजे करेल ते करावे. त्यात त्याची काहीतरी फजिती झालीच पण ती आता माझ्या लक्षात नाही. ज्या पुस्तकात मी वाचली होती तेही आता माझ्याजवळ नाही.

त्याची काही प्रेम प्रकरणे आपण सुरवातीलाच पाहीली. ही प्रेमप्रकरणे मात्र सुरवातीपासून शेवटपर्यंत त्याने सोडली नाहीत. या काळात सुद्धा मार्गारिटा सारफत्ती नावाच्या एका स्त्रिशी त्याचे गुफ्तगू चालू होतेच.
मार्गारिटा :

ही एका धनाड्य ज्यू वकिलाची मुलगी होती आणि हिनेच मुसोलिनीला फॅसीस्ट पार्टीची अनेक धोरणे ठरवायला मदत केली. अर्थात मुसोलिनीने जेव्हा हिटलरचा वंशवाद स्विकारला तेव्हा हिचा काटा काढण्यात आला. या काळात त्याची बायको रॅशेल ही त्याच्या मुलांसोबत मिलानमधे रहात होती. जेव्हा मार्गारिटा नसायची तेव्हा अनेक इतर स्त्रिया त्याच्या छोट्याशा फ्लॅटवर जाण्यासठी धडपडत असायच्या. मुसोलिनी हा अत्यंत शिघ्रकोपी माणूस असल्यामुळे त्या स्त्रियांना शेवटी मारहाण होऊन तेथून हाकलले जायचे. त्याला या मारहाणींची त्याचा पुरूषी अहंकार जोपासण्यासाठी गरज भासायची. हा त्याच्या ढोंगी व्यक्तिमत्वाचाच भाग होता.

१९२५ साला पर्यंत मुसोलिनीने इटलीवर आपला पंजा रोवला. नवीन कायद्याप्रमाणे ब्लॅकशर्ट सोडून इतर सगळ्यांचे पारपत्र रद्द करण्यात आले आणि त्याहून भयानक कायदा करण्यात आला तो म्हणजे सरकारी नोकर्‍या फक्त ब्लॅकशर्टसनाच देण्यात येतील. या कायद्याने मुसोलिनीचा इटलीवर संपुर्ण कबजा झाला. मुसोलिनीची एकाधिकारशाही प्रस्थापीत झाली.

सर्व शंकास्पद संघटनांवर, त्यांच्या जमण्याच्या जागांवर बंदी घालण्यात आली. मॅसॉनिक लॉज बंद करण्यात आले. (हे काय आहे याच्यावर एक लेख लिहिणार आहे). कागदोपत्री सरकारी आदेश नसताना छापे घालणे, संशयास्पद म्हणून तुरुंगात डांबणे या गोष्टी सर्रास होऊ लागल्या.

१९२६ साली मुसोलिनीने सहीच्या एका फटकार्‍याने इटलीमधे फॅसिस्ट पार्टी सोडून सगळ्या पक्षांवर बंदी घातली. फॅसिस्ट पार्टीच्या विरूद्ध असणार्यां ना कोकेन विकणार्‍यांविरूद्ध असणारा कायदा लावण्याची परवानगी देण्यात आली. फॅसिझमच्या विरूद्ध असणार्‍यांपैकी १०,००० लोक फ्रान्स आणि अमेरिकेत पळून गेले ते नशिबाने वाचले. इतरांचे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. हळुहळू संप करण्याचा अधिकार, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य या गोष्टी इतिहास जमा झाल्या. नवीन ओळखपत्रे जारी करण्यात आली आणि ती तपासण्यात पोलिसांचा वेळ जाऊ लागला. अनेक नागरीक या नवीन ओळखपत्रांमुळे तुरुंगात खितपत पडले. फॅसिस्ट पार्टीचे विशेष अधिकार असलेले अधिकारी सर्रास फोन टॅप करून लोकांना अटक करू लागले, त्यांना तुरुंगात पाठवू लागले. ज्यांना ज्यांना परदेशाहून पत्रे येत होती त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. थोड्याच काळात ज्युरीची पद्धातही रद्द करण्यात आली आणि तिची जागा घेतली खास न्यायालयांनी, ज्यात वर अपील करण्याचे अधिकार काढून घेतले गेले होते. एवढेच नाही तर आरोपीला साक्षीसाठी साक्षीदार बोलावण्याचा अधिकारही नाकारण्यात आला. या सगळ्याला कंटाळून मुसोलिनीच्या हत्येचेही प्रयत्न झाले. त्यातला एक प्रयत्न झोबीनी नावाच्या एका लहान मुलाने केला. त्याला ब्लॅकशर्टसने ठेचून ठार मारले.


हे सगळे प्रयत्न फसल्यावर मुसिलिनीने लिहिले “ बंदूकीच्या गोळया गेल्या पण मी चालतोच आहे.”
१९२५ सालापासून १२ वर्षे मुसोलिनी आपला देश सोडून कुठेही गेला नाही. त्या काळात त्याने ६०,००० भेटी घेतल्या. त्याच काळात त्याचे वागणे सत्ताधिशासारखे होत चालले होते. त्याने स्वत:चे कार्यालय पालॅझो व्हेनेझियामधे हलवले. तेथे त्याचे कार्यालय एका मोठ्या खोलीत होते. त्याची लांबी होती ५९ फूट आणि रुंदी होती ३९ फूट. या खोलीत त्याला व त्याच्या सहाय्यकांना एकामेंकाशी खूणांनी बोलावयाचे लागायचे. उदा. पसरलेले हात म्हणजे वर्तमानपत्र आण किंवा हवेत हाताचे वार केल्यासारख्या खुणा म्हणजे आता भेटणार्‍यांना बंदी ! ही खूण आता तो वारंवार वापरायला लागला होता. त्याला भेटायला येणार्‍यांसाठी तर हे वारंवार व्हायचे पण आता त्याच्या मित्रांना, त्याच्या पार्टीतील सदस्यांनाही तो भेट नाकारत असे.

आपल्या देशात जशी “गरिबी हटाव “ ही घोषणा लोकप्रिय करण्यात राजकारण्यांना यश मिळाले तसेच “मुसोलिनी नेहमीच बरोबर असतो” अशा अर्थाच्या घोषणा लोकप्रिय करण्यात आल्या. रोमवरच्या चढाईत ज्यांनी त्याच्या हातात हात घालून साथ दिली त्या सर्वांना अशा जागा देण्यात आल्या की त्यांचे पद दिसायला तर मोठे दिसे पण निर्णयप्रक्रियेत त्यांना काही मत नसे. त्यातील एक जूना सहकारी म्हणाला “ मुसोलिनीला आता सल्ला नको असतो, त्याला हव्या असतात टाळ्या !”

त्याला जनता २०व्या शतकातील सिझर असे म्हणायला लागली तेव्हा स्वारी भलतीच खूष झाली. आणि जनता तसे का नाही म्हणणार ? त्याने त्या छोट्या काळात ४०० नवीन पूल बांधले, अगणित रस्ते आणि ७००० कि.मि लांबीचे कालवे बांधले जे अपूलिया सारख्या दुर्गम दुष्काळी भागात पाणी पुरवू लागले.

“आपण मुसोलिनीच्या काळात इटलीमधे राहताय याचा अभिमान बाळगा “ असे मोठमोठे फलक सगळ्या इटलीमधे झळकू लागले. त्यातील मजकूर बघा –
तुमच्या मुलामुलींसाठी १७०० रिसॉर्टस कोणी बांधले ?
कामाचे ८ तास कोणी ठरवून दिले ?
कामगारांचा विमा कोणी चालू केला ?
म्हातार्‍या माणसांना, अपंग माणसांना सरकारी मदत कोणी चालू केली ?
इटलीला ताकदवान कोण बनवू शकतो ?
अर्थातच मुसोलिनी ! मुसोलिनी ! मुसोलिनी !

हळूहळू मुसोलिनीच्या भोवती एक असामान्य माणसाचे किंवा एखाद्या प्रेषिताचे वलय निर्माण झाले. आया मुलांची नावे मुसोलिनी ठेवायला लागल्या तर ज्यांना मुले होणार होती अशा स्त्रिया आपल्या खोलीत उशाशी मुसोलिनीचे छायाचित्र ठेवू लागल्या. रेस्टरॉमधे ज्या खुर्चीवर मुसोलिनी बसायचा त्या खुर्चीसाठी मारामार्‍या होऊ लागल्या व त्याला लिलावात चांगली किंमतही यायला लागली. ज्या १६,००० प्राथमिक शाळा मुसोलिनीने काढल्या तेथे फॅसिझमचे बाळकडू पाजण्यात येत होते. प्रत्येक वर्गात येशूच्या क्रॉस शेजारी त्याचे छायाचित्र दिमाखाने झळकायला लागले. प्रार्थनेत “मी ज्याने ब्लॅकशर्टची स्थापना केली त्या आमच्या सर्वोच्च नेत्यावर आणि त्याचे संरक्षण करणार्‍या येशूवर विश्वास ठेवतो” अशा तर्‍हेची वाक्ये सर्रास घुसडण्यात आली.
हे सगळे बघत असताना त्यावेळचा पोप म्हणाला “त्याने स्वत:ला या प्रकारे जनमानसावर स्वत:ला बिंबवण्याचे थांबवले तर बरे ! केव्हातरी अशा प्रतिकांना जनता पायदळी तुडवते हा इतिहास आहे !”

पण मुसोलिनी कामाला लागला होता. त्याला इटलीला रोम साम्राज्याची प्रतिष्ठा मिळवून द्यायची होती आणि नेत्रदीपक काम करून आपली खुशामत होती आहे हे बघून तो अधिक चेव येऊन काम करायला लागला. मोठमोठ्या सभा,
मिरवणूका आणि मुसोलिनीचा जयघोष हे नेहमीचे दृष्य झाले.

विशाल जनसमूदायासमोर एखाद्या इमारतीच्या बाल्कनीमधून आपल्या कमरेवर हात ठेवून तावातावाने भाषण द्यायचा आणि तो समुदाय त्याला हात उंचावून, मुठी आवळून प्रतिसाद द्यायचा. हे बघून मुसोलिनी म्हणाला “ या जनसमुदायाला कणखर नेत्रूत्व आवडते, कणखर माणूस आवडतो........स्त्रियांसारखेच.............

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

इतिहासकथासमाजराजकारणलेख

प्रतिक्रिया

हा भाग पण अतिशय छान जमला आहे. मुसोलिनीच्या कटकारस्थानांची चांगलीच माहिती मिळते आहे.

- पिंगू

मन१'s picture

20 Jan 2012 - 10:30 pm | मन१

रंजक पण पहिले दोन परिच्छेद थोडे विस्कळित वाटले. म्हणजे नक्की तो सत्तेवर कसा आला व कोणत्या सालात आला ह्याची गडबड वाटते आहे. नंतर मात्र वेग चांगला घेतला आहे.

त्याला रोखायला एकही शक्ती इटलीत जन्माला आलि नाहि? आश्चर्य आहे.
मग.. पुढे काय झालं ??

अर्धवटराव

अन्या दातार's picture

21 Jan 2012 - 8:11 am | अन्या दातार

खिळवून ठेवणारा लेख. पुढे काय होणार?? याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

प्रचेतस's picture

21 Jan 2012 - 8:30 am | प्रचेतस

हेच म्हणतो.
अप्रतिम लिखाण.

प्रभाकर पेठकर's picture

21 Jan 2012 - 1:49 pm | प्रभाकर पेठकर

बेनिटो मुसोलिनीचे आक्रमक व्यक्तिमत्त्व, कमी शब्दात पण, फार प्रभावीपणे मांडले आहे. वाचनात रस वाढून पुढील भागांची उत्सुकता शीगेस पोहोचली आहे.

जयंत कुलकर्णी's picture

22 Jan 2012 - 5:49 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

सुहास झेले's picture

23 Jan 2012 - 12:53 am | सुहास झेले

हा ही लेख उत्तम... पुढच्या भागाची वाट बघतोय. :) :)