मुसोलिनीचा उदयास्त. भाग - ७

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Feb 2012 - 4:18 pm

भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४
भाग - ५
भाग - ६
इटालियन सैनिकांचा डॅगर.

त्या प्रासादाच्या उत्तरेला उभ्या केलेल्या रुग्णवाहीकेत कॅ.व्हिग्नेरी चढला आणि त्याने त्या उतारावरून त्या प्रासादाच्या पोर्चमधे ते वाहन वाहनाचा मागचा दरवाजा अगदी महालाच्या दरवाजाला चिकटेल असे उभे केले. प्रासादात मुसोलिनीला अटक करायला राजाचा कडवा विरोध होता. “मी जिवंत असे पर्यंत मी हे करू देणार नाही” त्याने म्हटले होते. पण बाहेर मुसोलिनिचे शरीररक्षक उभे होते व तेथे अटक करणे म्हणजे रक्तपाताला निमंत्रण देण्यासारखे होते आणि त्यातून इटलीभर हिंसाचार उफाळला असता आणि कदाचित यादवी युद्धही पेटले असते. हे ऐकल्यावर राजाने नेहमीप्रमाणे नरोवा कुंजरोवा अशी भुमिका घेतली. शेवटी ही अटक सफाईदारपणे अमलात आणली गेली. मुसोलिनी पायर्‍या उतरत असतानाच कॅ. व्हिग्नेरी त्याच्याकडे लगबगीने गेला आणि म्हणाला “ड्युसे, राजाने मला आपल्याला संरक्षण देऊन आपली काळजी घ्यायला सांगितले आहे.”
“त्याची काही गरज नाही “ मुसोलिनीने त्याला झिडकारले आणि तो त्याच्या गाडीकडे जाण्यासाठी वळला.
“मला मिळालेला हुकूम पाळणे भाग आहे” कॅ. व्हिग्नेरी म्हणाला.

त्याने पूढे जाऊन मुसोलिनीला अडविले आणि त्याला त्याने जबरदस्तीने त्या रुग्णवाहिकेत बसविले.
मुसोलिनीचा सचिवालाही त्यात बसविण्यात आले. ते आत बसताच काही साध्या पोषाखातील सैनिकही त्यात बसले. त्यांना थांबवून मुसोलिनी ओरडला “ हे कशाला आणखी ?” पण कॅ. व्हिग्नेरीने त्यांना आत बसायचा हुकूम केल्यावर मुसोलिनीला काय चालले आहे हे उमगले. काहीच मिनिटातच ती कार कॅरॅबिनिएरीच्या बरॅक्सच्या लोखंडी दरवाजातून आत गेली आणि ब्रेक्सचे आवाज करत थांबली. त्या दरवाजाच्या आत एक लष्करी अधिकारी ले. कर्नल लिन्फोझी उभा होता. गाडीतील माणसे उतरताना बघून त्याने धक्का बसल्याचे नाटक करत सिगरेट मुद्दामहून खाली टाकली आणि म्हणाला “ अहो अश्चर्यम ! स्वत: ड्युसे.... बहुमानच म्हणायचा हा !”
ते ऐकून कॅ. व्हिग्नेरी म्हणाला “कर्नल सर हे आपले सन्मानीय पाहूणे आहेत. यांच्यासाठी ऑफिसर्स मेस उघडून त्यांना खास खोली देता येईल का ?”

मुसोलिनीला त्यानंतर ती खोली तयार होण्याअगोदर तेथे लाऊंजमधे बसवण्यात आले. मुसोलिनीनीने एक चकार शब्द तोंडातून आत्तापर्यंत काढला नव्हता. आत्ताही तो शून्यात नजर लावून बसला होता पण त्याच्या सचिवाने मात्र कॅ. व्हिग्नेरीला दरडावून विचारले “ याचा अर्थ काय ? आम्हाला येथून जायचे असेल तर ?”
व्हिग्नेरीने शांतपणे उत्तर दिले “ त्यांना येथून जाता येणार नाही”
“आणि त्यांना फोन करायचा असेल तर ?”
“नाही ते ही शक्य नाही”. तेवढ्यात एक माणूस चाकू घेऊन आला आणि त्याने सफाईदारपणे त्या टेलिफोनच्या तारा कापून टाकल्या.

मुसोलिनीच्या अटकेची बातमी त्या रात्रीत इटलीमधे वणव्यासारखी पसरली. फोन यंत्रणा बंद पडण्याची वेळ आली. काही ठिकाणी तर लोकं खिडक्या उघडून त्यातून डोकी बाहेर काढून नुसतेच ओरडत होते. थोड्याच वेळात नागरीक असेतील त्या कपड्यात निर्भयपणे रस्त्यांवर उतरले. एकामेकांना मिठ्या मारत, शिट्ट्या वाजवत, गाणी म्हणत ते आनंदोत्स्व साजरा करू लागले...काहींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्याही दिसत होत्या.

गेल्या वीस वर्षात दाबलेला त्यांचा असंतोष आता उफाळून बाहेर आला. रात्रभर नागरिकांनी फॅसिस्ट पार्टीच्या कार्यालयांवर हल्ले चढवले. त्यातील टेबले खुर्च्या बाहेर आणून जाळून टाकल्या. मुसोलिनीच्या चित्रांची राखरांगोळी केली. रस्त्यात फॅसिस्ट चिन्हांचा, टोप्यांचा खच पडला होता व टिबर नदीतून असंख्य काळे गणवेष वाहतांना दिसत होते. क्षणभर असे वाटत होते की इटली मधे फॅसिस्ट नव्हतेच की काय...

दुसर्‍याच दिवशी मुसोलिनीच्या अटकेची बातमी जनरल आसेनहॉव्हर यांच्या पर्यंत पोहोचली. ते आफ्रिकेत प्रेसिडेंट रुझवेल्ट यांचे सल्लागार मर्फी आणि चर्चिल यांचे प्रवक्ते हॅरॉल्ड मॅकमिलन यांच्या बरोबर सकाळचा नाष्ता करत होते. आयसेन्हॉव्हर यांना वाटत होते की आता ईटली या युद्धातून सन्मानाने माघार घेईल. पण उरलेल्या दोघांचे मत वेगळे होते. ते म्हणाले “त्यांना कदाचित आता शांतता पाहिजे असेल पण प्रश्न असा आहे की ती त्यांना ती कशी मिळवता येईल”
ते ऐकून आयसेनहॉव्हर म्हणाले “ मी सांगतो इटली आता मोडकळीस आली आहे. दुसरे काय करणार तो देश ?”

पण त्याच दिवशी उत्तर दिशेला एक दुसराच कट शिजत होता. फ्युररच्या मुख्यालयात, रास्टेनबर्गमधे हिटलरच्या समोर SS कॅप्टन ऑट्टो स्कोर्झेनी लक्ष देऊन हिटलरचे बोलणे ऐकत होता.

स्कॉर्झेनी

हा माणूस हिटलरच्या अंतर्गत सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचा प्रमुख होता आणि मुख्य म्हणजे हिटलरच्या अत्यंत विश्वासातील होता. त्याचे कामच गुप्तहेरांना प्रशिक्षीत करायचे होते. पण आज त्याला स्वत:लाच कामगिरीवर जावे लागणार होते.

हिटलर म्हणत होता ..
“माझा अत्यंत जवळचा मित्र आणि या लढाईतील माझा पाठिराखा, मुसोलिनीला काल इटलीच्या राजाने आणि काही नागरिकांनी कपटाने अटक केली आहे. जो आपल्याबरोबर आहे, त्याला मी असे वार्‍यावर सोडू शकत नाही. तो दोस्त राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी त्याची तेथून सुटका करायलाच लागेल”

स्कॉर्झेनी ताबडतोब कामाला लागला आणि त्याने आपल्या मागण्यांचा बर्लिनकडे सपाटा लावला. त्याला ५० कमांडो, ज्यांना इटालियन भाषा येत होती, उन्हाळ्यात वापरता येतील असे गणवेष, सामान्य सुटस, अश्रूधूराचे बॉंब, लाफिंग गॅस, प्लास्टीक स्फोटके, ब्रिटीश पौंडाच्या बनावट नोटा आणि पादर्‍यांचे काही पूर्ण पोषाख इ. अशी मागणी त्याने नोंदविली.

दुसर्‍याच दिवशी स्कोर्झेनीने इटालियन भाषा येत असलेल्या आपल्या निवडक ५० सैनिकांबरोबर रोमसाठी प्रस्थान ठेवले. पण येथे त्याला एका अडचणीला तोंड द्यावे लागले. इटली मित्रराष्ट्र असल्यामुळे जर्मन गुप्तहेरांना इटलीमधे कारवाया करायला हिटलरने बंदी घातली होती. अनेक वर्षे हे काम बंद असल्यामुळे आता एखाद्याचा माग काढणे एवढे सोपे राहिले नव्हते. जर्मन पोलिसदलाचा इटलीमधला प्रवक्ता त्याच्या कार्यालयात येणार्‍या बातम्यांमुळे भंजाळून गेला. पहिलीच बातमी मुसोलिनीच्या आत्महत्येची होती. इटलीच्या उत्तरेला असलेल्या एका गावात इस्पितळात ड्युसे ह्र्दयविकाराच्या झटक्यातून सावरत आहे पासून तो एक साधा सैनिक म्हणून सिसिलीच्या आघाडीवर लढत आहे, अशा अनेक बातम्या येऊन थडकत होत्या. शेवटी मुसोलिनीच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त हिटलरने निचआचे चामड्यात बाईंडिंग केलेले सगळे ग्रंथ भेट म्हणून पाठवले. फिल्ड मार्शल केसरलिंग याला ते प्रत्यक्ष मुसोलिनीच्या हातात देण्याच्या सुचना होत्या. परंतू त्याला मुसोलिनी आता राजाच्या संरक्षणाखाली विश्रांती घेत असल्यामुळे हे ग्रंथ त्याला प्रत्यक्ष येऊन घेता येणार नाहीत परंतू ते त्याला पोहोचवायची व्यवस्था होऊ शकेल असे सांगण्यात आले. या ग्रंथांच्या मागे मुसोलिनीपर्यंत पोहोचता येणार होते. पण महिनाभर काहीच झाले नाही.

एक दिवस मात्र SSचा ले. कर्नल हर्बट केपलरला त्याच्या खबर्‍याने एका तारेची प्रत आणून दिली. त्यातील मजकूर त्याला जरा विचित्र वाटला. “ ग्रॅन सास्सोची सुरक्षा व्यवस्था पूर्ण व कडेकोट झाली आहे”

अटक झाल्यापासून मुसिलिनीला एका जागी कधीही एका जागेवर ठेवण्यात आले नव्हते. स्कॉर्झेनीचे इटलीमधील वास्तव्य लपून राहिले नव्हते. त्याच्या कचाट्यातून त्याला सोडवण्यासाठी त्याला पहिल्यांदा त्या कॅरॅबिनिएरींच्या बरॅक्समधे ठेवण्यात आले. नंतर त्याला बंद गाडीतून पोंझाच्या तुरुंगात ठेवण्यात आले. नंतर सॅरिडिनियाच्या निमुळत्या उत्तर टोकावर असलेल्या नौदलाच्या एका तळावर ठेवण्यात आले. स्कॉर्झेनीने त्याचा या तळापर्यंत माग काढला होता पण तो तेथे पोहोचायच्या अगोदर काहीच मिनिटे मुसोलिनीला तेथून हलविण्यात आले. आता मुसोलिनीला मध्य ईटलीतील ग्रॅन सास्सो पर्वत रांगावर गुप्त जागी ठेवण्यात आले होते. ही जागा तशी सापडण्यासारखी नव्हती अर्थात तसे काही होऊ नये याची संपूर्ण काळजी घेतली गेली होती.

ब्रॅसिआनोच्या तळ्यापासून पूर्वेला १२ किमी अंतरावर कॉर्नो नावाच्या उंच डोंगरावर त्याला कैदेत ठेवण्यात आले. याची समुद्रसपाटीपासून उंची होती ३००० मि. याच्या आणि शिखरांवर बर्फ साठलेला होता. या डोंगराच्या पायथ्यापाशी साधारणत: २००० फुटावर एक स्किईंग करणार्‍यांचे आवडते पठार आहे व या पठारावरच्या एकमेव हॉटेलला पोहोचण्यापाशी दरीतील आसर्गी नावाच्या गावातून विजेच्या पाळण्याची सोय होती. स्कॉर्झेनीला अशी शंका होती की मुसोलिनीला या हॉटेलमधे पहार्‍यात ठेवलेले आहे. त्याने त्या स्किईंगच्या शुकशुकाट असलेल्या रिसॉर्टमधील एका खोलीत मुक्काम टाकला.

आसर्गीत जेथे मुसोलिनीला ठेवले होते ती जागा -

मुसोलिनीचा सध्याचा अवतार पूर्वीपेक्षा फारच वेगळा झाला होता. त्याचा सगळा डामडौल उतरला होता. ग्रॅन सास्सो वर तो एखाद्या भविष्याला दोष देणार्‍या गरीब शेतकर्‍यासारखा दिसायला लागला होता. जर्मन त्याची सुटका करतील ही एकच आशा त्याला जिवंत ठेवत होती असे म्हणायला हरकत नाही. तिही शक्यता आता दुरावत चालली होती कारण त्याने जर पळून जायचा प्रयत्न केला तर त्याला गोळ्या घालाव्यात, असे पहारेकर्‍यांना स्पष्ट आदेश होते. त्याची खरे तर केव्हाच हत्या व्हायची पण राजाच्या कृपेमुळे तो जिवंत होता. शिवाय नव्यानेच स्थापन झालेले बाडोग्लिओचे सरकारही डळमळीत झाले होते त्यामुळे त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.

त्यावेळचा राष्ट्रप्रमूख बाडोग्लिओ, ज्याने मुसोलिनीच्या अटकेबाबत ठाम भुमिका घेतली -

सप्टेंबर ३ ला इटालियन सरकारने दोस्तराष्ट्रांच्या सेनेपुढे शरणागती पत्करली आणि पाच दिवसानंतर जनरल आयसेन्हॉव्हर यांनी युद्धबंदीची घोषणा केली. त्याच दिवशी सॅलेर्नो येथे दोस्त राष्ट्रांची सेना उतरली. या शरणागतीची कलमे इटलीसाठी फारच कडक होती पण ती मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हतेच. ती मान्य केल्याची सरकारने रेडिओवर घोषणा केली. यात एक महत्वाची अट होती आणि ती म्हणजे मुसोलिनीला दोस्तराष्ट्रांच्या ताब्यात देणे.

ही युद्धबंदीची घोषणा आणि कलमे यांची माहिती मुसोलिनीने रेडिओवर ऐकली आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. याच्यातही नेहमीप्रमाणे त्याला पहिल्यांदा आत्महत्या करायची होती म्हणून त्याने स्वत:च्या मनगटावर ब्लेड चालवले आणि दुसर्‍याच क्षणी विचार बदलून त्याने पहारेकर्‍याला बोलावून त्या छोट्या जखमेवर आयोडिन लावून बॅंडेज बांधून घेतले व स्वत:चे हसे करून घेतले.

दुसर्‍या दिवशी इटलीच्या इतिहासातील अजून एक काळा दिवस उजाडला. राजा आणि सरकार इटली सोडून परागंदा झाले. ते दोस्त राष्ट्रांच्या सेनेपासून नाही तर जर्मनांपासून पळत होते. जर्मन सैन्याने इटलिची एकंदरीत परिस्थिती बघितल्यावर ऑपरेशन अलारिक अमलात आणले. याच्यातील एक भाग म्ह्णून इटलिच्या सैनिकांचे निशस्त्रीकरण व त्यांच्या जागा जर्मन सैनिकांनी घ्यायच्या हे काम चालू झाले. आता दोस्तराष्ट्रांना आणि जर्मनांनाही मुसोलिनी कुठे आहे याचा पत्ता नव्हता.

स्कोर्झेनीला आता मात्र खात्री झाली होती की तो त्याच्या सावजाच्या जवळ पोहोचला आहे. लवकरच त्याच्या गुप्तहेरांनी बातमी आणली की एसर्गीला जाणार्‍या सगळ्या रस्त्यांवर इटालियन कॅरॅबिनिएरींनी त्यांची ठाणी उभारली आहेत आणि आपल्याला आठवत असेलच की याच गावापासून ती केबल रेल्वे चालत असे.

त्यांनी अशीही बातमी आणली की गावकरी त्यांच्यातील काही जणांना तडकाफडकी त्या हॉटेलमधू काढून टाकण्यात आले अशी तक्रार करत होते आणि स्कोर्झेनीने पाठविलेल्या एका बनावट डॉक्टरलाही येथे हटकण्यात आले. त्याने असे सोंग आणले होते की त्याला त्या डोंगरावरच्या ओसाड पडलेल्या इमारतीमधे मलेरियाच्या रुग्णांसाठी सोय करण्यासाठी पहाणी करायला जायचे आहे. अर्थातच त्याला परवानगी नाकारण्यात आली.

मुसोलिनीला ठेवले होते ती जागा -

या सगळ्या बातम्यांनी स्कोर्झेनीची खात्री झाली की मुसोलिनीच तेथे बंदिवासात असणार. जमिनीवरून हल्ला करणे शक्यच नव्हते. असल्या हल्ल्याचा सुगावा लागला की ती केबल कार उडवण्यात त्यांना कितीसा वेळ लागणार ? हवाईपहाणीने छत्रीधारी सैनिक तेथे उतरू शकणार नाहीत असा अहवाल दिला होता. हवेचे जे स्त्रोत त्या उंचीवर वाहत होते त्याने ते सगळे छत्रीधारी सैनिक परत दरीवर आले असते.

या सगळ्याचा विचार केला असता स्कोर्झेनीला ग्लायडरशिवाय दुसरा पर्याय दिसेना. आणि अभ्यासाअंती असे आढळून आले की ग्लायडर वापरली तरी ही ८० % हानीची तयारी ठेवावीच लागेल. पण त्याला इलाज नव्हता. शेवटी १२ विमाने आणि ती १२ ग्लायडर हवेतून ओढत नेणार अशी योजना ठरली. प्रत्येक ग्लायडरमधे १० सैनिक किंवा कमांडो असणार होते.

ग्लायडर

पहिल्या चार ग्लायडरमधील सैनिकांना त्या हॉटेलवर कब्जा करायची कामगिरी सोपावण्यात आली. जर यात काही गडबड झाली तर उरलेल्यांनी इटालियन सैनिकांना छोट्या तोफा आणि मशिनगन वापरून वर डोकं काढून द्यायचे नव्हते.

अजून एका छोट्या विमानाची मागणी नोंदवण्यात आली. हे एक फिसेलेर-स्टॉर्च विमान होते आणि अत्यंत कमी जागेत उतरण्याची व उडायची किमया फक्त हेच विमान करू शकत होते.

विमानांनी आणि त्याला बांधलेल्या ग्लायडर्सनी रोम नजिकच्या एका गुप्त विमानतळावरून १२ सप्टेंबरला बरोबर दुपारी १ वा उड्डाण केले. स्कॉर्झेनी स्वत: पहिल्याच ग्लायडरमधे बसला होता.........

त्यांना येथे जायचे होते -

क्रमश:

जयंत कुलकर्णी.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

राजघराणं's picture

25 Feb 2012 - 4:28 pm | राजघराणं

मजा येतीय

पैसा's picture

25 Feb 2012 - 4:44 pm | पैसा

ओसामा बिन लादेनच्या लांबलेल्या पाठलागाची आठवण आली.

'रोम'हर्षक!
मुसोलिनी फासाच्या खंब्यापर्यंत नेमका कसा पोचवला गेला हे पहाण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

गद्दाफी आठवतोय.

प्रचेतस's picture

25 Feb 2012 - 5:39 pm | प्रचेतस

अत्यंत वाचनीय, संग्राह्य लेखमाला.

जबरदस्त ...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

मस्त चालू आहे. नवीन माहिती मिळत आहे. फक्त एक विनंती आहे की माहिती मिळवण्यासाठी जी पुस्तके वापरली असतील, त्यांचा संदर्भपण द्या..

- पिंगू

अन्या दातार's picture

26 Feb 2012 - 8:38 am | अन्या दातार

हिटलर त्या मानाने सुखरुप सुटला म्हणायचं का?