'व्हाय डोन्ट यू गो टू विजिट द सबमरिन?' डॉ. नवीनने विचारले.
'सबमरिन? मालदिव में सबमरिन है?' डॉ. अनिल.
'तिथे आहे.... ' डॉ. नविनने खिडकीतून बाहेर दाखवले.. समुद्रात दूर अंतरावर एक पांढरी बोट दिसत होती. इन्दिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून समुद्र फार देखणा दिसतो. मी मुंडके खाली वळवले आणि मुकाटपणे चहा पिऊ लागलो. मालदीवमध्ये चार महिने राहूनही इथे २०० फुटांवर पाण्यात एक सबमरिन आहे हे मला पहिल्यांदाच समजत होते!
शनिवारचा दिवस म्हणजे मालदीवमधील सुट्टीचा दिवस. माझा मित्र डॉ. अनिल मगदूम भारतात परत जाणार असल्यामुळे मला भेटायला मालेमध्ये आला होता. तिथूनच तो कोचीला जाणार होता. सकाळी दहाच्या सुमारास चहा घेऊन आम्ही मालेमध्ये भटकायला सुरुवात केली. माले ही मालदीवची राजधानी, जेमतेम २ चौरस किलोमीटरचे लंबगोलाकार बेट. तेवढ्या बेटावर सुमारे १ लाख लोकवस्ती आहे आणि ते जगातील दुसर्या क्रमांकाचे दाट लोकवस्तीचे शहर आहे. पण तरीही माले सुंदर आणि स्वच्छ आहे. अगदी देखणे. समुद्राजवळच्या रिंग रोडवरून फिरणे यासारखा आनंद नाही.
फिरता फिरता फोटो सेशनही सुरु होते.
माले अर्धं भटकल्यानंतर इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला आम्ही डॉ. नविनला भेटायला गेलो. नविन हा अनिलचा मित्र. ऑपरेशन थिएटरजवळील चेंजिंग रूममध्ये त्यांच्या गप्पा सुरु होत्या. ऑपरेशन थिएटर, त्यातला तो वास, उभ्याउभ्या काहीतरी चार घास ( खरं तर दोन घास म्हणायला पाहिजे.. ) खाऊन पुन्हा पीचकडे पळायच्या तयारीत असणारे 'हिरवेगार' डॉक्टर आणि स्टाफ.. हे सगळं मी पहात बसलो होतो.. प्रॅक्टीस सोडून तीन वर्षे झाली. आता या सगळ्याशी माझा काडीमोड झालेला आहे. आय.जी. एम. एच. हे मालदीवमधील सर्वात मोठे सरकारी हॉस्पिटल. हॉस्पिटलची उभारणी इंदिरा गांधींच्या सहकार्यामुळे झाली . या हॉस्पिटलमधील बरेचसे डॉक्टर्स भारतीयच आहेत. पण तरीही आपल्या देशातील सिव्हिल हॉस्पिटल संस्कृतीपासून ते हजारो कोस दूर आहे.
त्यांच्या गप्पा संपल्या आणि खाली कँटीनमध्ये चहा पिताना सबमरिनचा विषय निघाला.
नविनने त्याच्याकडचा एक कॉन्टॅक्ट नंबरदेखील दिला आणि अनिलने दोन सीटचे बुकिंग करून टाकले. दुपारी २.३० ची फेरी होती... जेटी नंबर एकजवळ ती फेरी थांबणार होती.
आम्ही घड्याळ पाहिलं. १.००
आणि अक्षरशः धावतपळत जेटी नंबर एक गाठलं.
जेटी नं.१ च्या समोरच झुमोरी मैदान आहे. तिथे मालदिवचा 'चंद्रवंशी' ध्वज सतत फडकत असतो.
आणि मैदानात हिरवळीवर कबुतरे बिनधास्त फिरत असतात.
शेजारच्या प्रेसिडेंट हाऊसमध्ये काय सुरु आहे, याची त्या कबुतराना काही चिंता नसते.
प्रेसिडेंट हाऊसबरोबरच फॉरिन अफेअर्स मिनिस्ट्रीची इमारतदेखील जवळच आहे.
एका बाजूला सरकारी तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ मालदीव अशा खासगी कंपन्यांच्या इमारती, मध्ये छोटा रस्ता आणि रस्ताच्या पलीकडे समुद्रात फेरी बोटीसाठी असणारे जेटी.
या सगळ्या भारलेल्या वातावरणात चोवीस तास वावरणार्या कबुतरांचा मला खरं तर खूप हेवा वाटतो.
जेटीजवळच अनिलचे मित्र डॉ. खुशी वाट पहात होते. डॉ. खुशी पाकिस्तानचे. त्यानी सांगितले की इथला जेटीचा पोर्या तुमच्या नावाचा पुकारा करत होता. जवळच झाडाखाली तो पोर्या होता. पाचेक मिनिटातच त्याचा कोरम भरला आणि एका फेरीत बसून आम्ही सबमरिनच्या दिशेने निघालो. जेटीपासून समुद्रात थोडे अंतर गेलो की माले शहर दृष्टीक्षेपात येते. आकाश आणि समुद्र यांच्यामध्ये सँडविच झालेली माले नगरी पहाताना 'जिच्या कीर्तीच्या सागरलहरी वाजविती डंका' आठवल्याशिवाय रहात नाही.
दहा पंधरा मिनिटात आम्ही एका बोटीजवळ आलो. फेरीमधून परस्पर त्या बोटीवर गेलो. तिथे बरेच लोक सबमरिनसाठी वाट पहात होते.
तिथे काउंटरवर आम्ही तिकिट घेतले. ( तिकिट ७५ अमेरिकन डॉलर असते. पण मालदीवचे वर्क परमिट असल्यास ३० डॉलरच तिकिट असते. )
अनिल, मी आणि डॉ. खुशी तीघेजण सबमरिनसाठी वाट पाहू लागलो. ( पाकिस्तानमध्ये खुशी हे एका मध्यमवयीन पुरुषाचे नाव असू शकते!)
सबमरिन शेजारीच तर होती.. वरच्या फोटोत ३ आकडा लिहिलेला पत्रा दिसतोय ना, तेच सबमरिनचे छप्पर! त्याला असलेल्या भोकातून ( दार शब्द त्याला शोभेल काय?) एक एक जण आम्ही आत उतरलो.
लांबट आकाराची पाणबुडी. त्यात साधारणपणे ४० लोक बसू शकतील अशा खुर्च्या आणि त्यांच्यासमोर गोलाकार खिडक्या. आम्ही आपापल्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालो.
खिडकीतून त्या शेजारच्या बोटीचा पाण्याखालील भाग दिसत होता. तिथे बरेच मासे आम्हाला बघायला जमले होते! :)
पाणबुडीत पाणसुंदरी होत्या. पाणबुडीला काही झाले तर स्विमिंग सूट कुठून घ्यावा, ऑक्सिजन मास्क कुठून घ्यावा वगैरे आधी प्रात्यक्षिक त्यानी करून दाखवले आणि मग हळूहळू पाणबुडी त्या बोटीपासून दूर निघाली... आधी आडव्या दिशेत आणि मग उभ्या दिशेत खाली खाली जाऊ लागली.
पाण्यात वरून येणारा सूर्यप्रकाश हळूहळू कमी होऊ लागला. शेजारी समुद्रात किती खोल आलो ते दाखवणारा इंडिकेटरचा आकडा सेन्सेक्सगत वाढू लागला.. आणि हळूहळू आकडा १०० फुटांवर स्थिर झाला आणि समोर गडद पाणीच दिसू लागले.
समुद्राच्या तळात पाणबुडी स्थीर झाल्यानंतर पाण्यामधील एका बेटाच्या बाजूला आम्ही होतो त्याची विरुद्ध बाजू स्थीर झाली आणि तिकडचे लोक अक्षरशः चित्कारू लागले.. आम्ही मागे वळून त्यांच्या खिडकीतून पाहिले, तर रंगीबेरंगी माशांचा नाच सुरु होता. आमच्या समोर मात्र नुसते पाणी ! आम्ही (त्याना) पाण्यात पाहू लागलो.
तेवढ्यात आमच्या खिडकीसमोरदेखील एक मासा आला आणि आमच्याकडे पाहू लागला.
पाणसुंदरीने एक माशाचा कॅट्लॉग आम्हाला दिला. अर्ध्या तासाने पाणबुडीची दिशा बदलेल, मग ती दुसरी बाजू तुम्हीही पाहू शकाल असे तिने सांगितल्यावर मग आमचा जीव भांड्यात पडला.
अर्ध्या तासाने पाणबुडी हळूहळू फिरू लागली आणि अखेर तो क्षण आला. आमच्या खिडक्या आता त्या दिशेला आल्या. समोर बेटाचा भाग. ओबडधोबड पण रंगीत, आणि असे रंग की जे कधीही कुठेही पहायला मिळणार नाहीत. प्रवाळांचे विविध आकार आणि रंग मनाला भुरळ पाडत होते.मालदीवमधील सगळी बेटे अशा मृत प्रवाळापासून बनलेली आहेत.
शिस्तबद्ध वसाहत करणे हा माणसाचाच जणू अधिकार आहे, हा अभिमान पार 'रसातळाला' गेला. जमिनीवरती मानवनिर्मित जे आहे, त्याच्या हजारो पटीने शिस्तबद्ध आणि सुंदर रचना पाण्याखाली आणि इतर निसर्गात आहे... तीही किती तरी जुनी.... तरीही रोज नवी.... आणि तरीही स्वच्छ... इथे माशांचे ट्रॅफिक जाम होत नाही. ट्रॅफिक सिग्नलशिवाय कसलेही अपघात न होता मासे नुसते पळत असतात. 'लाल' मासे आणि 'हिरवे' मासे यांच्यात कधी इथल्या रस्त्यावर ( !) राडा होत नाही.
माशांचे मेनुकार्ड पाहून काही मासे ओळखता आले. ईल दिसला. आणि हा लायन फिश.. तोंडाभोवती काळी आयाळ असणारा....
अनेक मासे, प्रवाळ आकृत्या आणि विविध रंग.. अर्धा तास फक्त हेच पाहिले...
आता मला माशांचाही हेवा वाटू लागला. खूप वर्षांपूर्वी उत्तमकथा या मासिकात वाचलेली फिशटँक ही कथा आठवली.. घरातील जुन्या पद्धतीचा फिशटँक देऊन नवीन घ्यायचे एका वृद्ध व्यक्तीच्या अगदी जिवावर येते. एकदा दुपारी त्याला स्वप्न पडते की तो मासा झाला आहे. माशाप्रमाणे तो हवेमधून सगळीकडे फिरुन येतो. शेवटी मासे काय आणि माणसे काय, आपापल्या वसाहती, आपले फ्लॅट हे एक प्रकारचे फिशटँकच तर आहेत, याचा त्याला साक्षात्कार होतो आणि अखेर तो उद्गारतो :
'उंबरातले किडेमकोडे उंबरी करती लीला!
जग हे बंदीशाळा...'
याच्यापुढे जाऊन मला म्हणावेसे वाटते, माणसाच्या लीला बघायला बाकीचे प्राणी येत नाहीत, हे किती बरे आहे!
माणूस हा या सगळ्यापासून वेगळा झाला हे योग्यच झाले... शांत, शिस्तीत आणि स्वच्छ रहायची आपली पात्रता नाही...
मालदीवच नव्हे तर सगळे जगच आज कचरा डिस्पोज करण्यासाठी समुद्राचा वापर करत आहे...
आणि हजारो वर्षानी इथे काय असेल? पेप्सीच्या बाटल्या, कोकोचे कॅन्स, प्लॅस्टिकच्या- काचेच्या आणि तत्सम वस्तू ??
अशाच कचर्यातून आज आपण वावरत असतो, उद्या तेही असेच वावरतील का?
विचारांचे बुडबुडे डोक्यात येऊ लागले.. आणि बाहेरसुद्धा लाखो बुडबुडे पाण्यात येऊ लागले... गम्मत म्हणजे हे बुडबुडे वेगाने खाली जात होते... मग लक्षात आले, बुडबुडे वर निघाले आहेत आणि पाणबुडीदेखील त्यांच्यापेक्षाही जास्त वेगाने वर जात आहे, म्हणून तसे वाटत आहे.. ... हा अनुभवदेखील मजेशीर होता.. सोडावॉटरच्या बुडबुड्यात असल्यासारखे वाटले.
पाणबुडी पुन्हा बोटीजवळ स्थीर झाली. पाणसुंदर्यानी सर्वाना गुडबाय केले... आम्ही पुन्हा पाणबुडीतून बोटीत आणि तिथून पुन्हा फेरीतून जेटीकडे परत आलो. एक तास आम्ही पाण्याखाली पाणबुडीत होतो, अशा ठिकाणी ...
जिथे सागरा धरणी मिळते!
( लेखातील फोटो डॉ. अनिल मगदूम यानी काढलेले आहेत. त्याचे मूळ गाव जयसिंगपूर. सध्या सनराइज हॉस्पिटल, कोची येथे तो लॅपरोस्कोपीमध्ये फेलोशिप करत आहे. . अशी प्रवासी पाणबुडी फक्त मालदीव आणि ऑस्ट्रेलियात आहे म्हणे ! )
प्रतिक्रिया
15 Oct 2009 - 12:34 pm | अवलिया
झ क्का स !!
मस्त फोटो ... दिवाळीची मस्त भेट मिळाली ब्वा ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
15 Oct 2009 - 12:36 pm | सहज
मस्त हो डॉक्टर.
पाणबुडी चक्कर आवड्या.
15 Oct 2009 - 12:37 pm | विसोबा खेचर
सुं द र...!
क्ला स...!
15 Oct 2009 - 12:43 pm | sneharani
चला पाण्याखालच जग पाहीलतं! धन्य...
फोटो देखील छान!!!
15 Oct 2009 - 1:03 pm | गणपा
प्यारे मस्त मालदिवची सफर घडवलीत.
फोटु छान आहेत. :)
15 Oct 2009 - 3:25 pm | धमाल मुलगा
डॉक्टर,
मस्तच लिहिलंय बरं का :)
एखादा माशांचा फोटो काढायचा होता ना राव! आणखी मजा आली असती. :)
15 Oct 2009 - 3:51 pm | समंजस
सुंदर!!!! मालदीव आणि फोटो दोन्हीही!!
15 Oct 2009 - 3:55 pm | अमोल केळकर
मस्त साहेब
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
15 Oct 2009 - 4:19 pm | मदनबाण
मस्त लेख आणि सुंदर फोटो...
मालदीवच नव्हे तर सगळे जगच आज कचरा डिस्पोज करण्यासाठी समुद्राचा वापर करत आहे...
आणि हजारो वर्षानी इथे काय असेल? पेप्सीच्या बाटल्या, कोकोचे कॅन्स, प्लॅस्टिकच्या- काचेच्या आणि तत्सम वस्तू ??
अशाच कचर्यातून आज आपण वावरत असतो, उद्या तेही असेच वावरतील का?
असेच अनेक विचार बर्याच वेळेला माझ्याही टाळक्यात येतात...
चंद्रावर पाणी शोधणारा मानव पृथ्वीवर असलेले पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी तेव्हढाच पैसा का खर्च करत नाही ???
अंतराळातुन निळा दिसणारा हा आपला ग्रह भविष्यात तसाच दिसेल काय ???
अवांतर :--- पाणसुंदर्यानी
लयं आवडला हा शब्द... ;)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
15 Oct 2009 - 4:29 pm | नरेंद्र गोळे
जागोमोहनप्यारे,
आम्हाला जागायला भाग पाडणारा अनुभव इथे कथन केल्याखातर हार्दिक धन्यवाद. यामुळे मला माझ्याच जाणिवा समृद्ध झाल्यागत वाटत आहे. सुरेख!
जगावेगळा अनुभव! आम्हाला त्यात सहभाग दिल्याखातर पुन्हा एकदा धन्यवाद!!
15 Oct 2009 - 5:20 pm | बाकरवडी
जब्बर
तुम्ही भाग्यवान आहात !!!!
आणि आम्ही मिपाकरही.....
धन्यवाद
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
15 Oct 2009 - 5:31 pm | स्वाती२
धन्यवाद. सुरेख फोटो आणि वर्णन.
21 Oct 2009 - 1:33 pm | झकासराव
सही है भिडु :)
21 Oct 2009 - 1:41 pm | विनायक प्रभू
भारी